शोध चंद्रशेखरचा! ३---- आपल्या लांब सडक बोटात धरलेली किंगसाईझ सिगारेट, कस्तुरीने जवळच्या ash ट्रे मध्ये चिरडून विझली. मनातली चरफड त्या निर्जीव सिगारेट वर काढली होती. पसरट बुडाच्या जड काचेच्या ग्लासातल्या, जीनच्या घोटकडे, जडपापण्यांनी एक नजर टाकली. तिच्या धुंद डोळ्यांना पापण्यांचे ओझे पेलवत नव्हते. त्या क्षणा क्षणाला मिटत होत्या. अट्टाहासाने तिने पुन्हा डोळे उघडले. जीनच्या बाटलीत राहिलेली जीन ग्लासात ओतून घेतली, आणि तो ग्लास पुन्हा तोंडाला लावला. रोस्टेड काजूचे चार दाणे तोंडात टाकून ते सावकाश चघळू लागली. आज पुन्हा चंद्रू घरी आला नव्हता. म्हणजे आजून पर्यंत तरी. एखादी बिझनेस मिटिंग असेल तर, होतो त्याला घरी यायला उशीर. पण तो अकरापर्यंत परततो.