४. लाल महाल सूर्य डोक्यावरून ढळू लागला होता. दिवे घाटाच्या डोंगरावरून खाली उतरून पुण्यात पोहोचायला बहिर्जी आणि मारत्याला दुपार टळून गेली. दोघेही आता कसब्यात पोहोचले होते. देवी देवतांची मंदिरे, वाडे, घरे पाहत लोकांना विचारत वाड्याच्या दिशेनं चालत होते. काही वर्षांपूर्वी आदिलशाही फौजेने पुण्यावर, त्यातही मुरार जगदेव या मराठा सरदाराने पुणे जाळून बेचिराख केले होते. पुण्याच्या वेशीवर पहार रोवून त्यावर चपला टांगल्या होत्या. याचा अर्थ, कुणीही या जागेवर वस्ती करू शकत नाही. शेती करू शकत नाही. आणि असे आढळल्यास त्याचं मुंडकं धडा वेगळं केलं जाईल. ज्या पुण्यात आधी आनंदाने लोक राहायचे तिथं बाभळी, गवत आणि जंगली