Bahirji - Third Eye of Swarajya - 4 books and stories free download online pdf in Marathi

बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 4

४. लाल महाल 

          सूर्य डोक्यावरून ढळू लागला होता. दिवे घाटाच्या डोंगरावरून खाली उतरून पुण्यात पोहोचायला बहिर्जी आणि मारत्याला दुपार टळून गेली. दोघेही आता कसब्यात पोहोचले होते. देवी देवतांची मंदिरे, वाडे, घरे पाहत लोकांना विचारत वाड्याच्या दिशेनं चालत होते. काही वर्षांपूर्वी आदिलशाही फौजेने पुण्यावर, त्यातही मुरार जगदेव या मराठा सरदाराने पुणे जाळून बेचिराख केले होते. पुण्याच्या वेशीवर पहार रोवून त्यावर चपला टांगल्या होत्या. याचा अर्थ, कुणीही या जागेवर वस्ती करू शकत नाही. शेती करू शकत नाही. आणि असे आढळल्यास त्याचं मुंडकं धडा वेगळं केलं जाईल. ज्या पुण्यात आधी आनंदाने लोक राहायचे तिथं बाभळी, गवत आणि जंगली प्राण्यांची वस्ती होती. तेच पुणे आऊसाहेबांनी आणि शिवाजीाराजांनी बसवलं होतं. फुलवलं होतं. इथ ठोकलेली पहार समूळ उखडून काढली होती. जिथं गाढवाचा नांगर फिरवला होता, तिथं सोन्याचा नांगराने जमीन नांगरून लोकांना आश्वस्त केलं होतं. उद्ध्वस्त केलेली देवळे, लोकांचे घरदार शेती पुन्हा सजवायला, फुलवयाला सुरुवात केली. लोकांना जमिनी देऊन शेती करण्यासाठी उद्युक्त केलं. पुणे नगर पुन्हा एकदा उभं राहीलं. पूर्वीपेक्षाही अधिक जोमाने, हिमतीने आणि इथल्या मातीतल्या कष्टकऱ्यांच्या घामाने! ज्या मुरार जगदेवनाने पुण्यात गाढवाचा नांगर फिरवला होता, त्याची आदीलशाही भर दरबारात हत्या करण्यात आली होती. कर्माचं फळ कधीच कुणाला चुकत नाही.

        कसबा गणपतीचं बाहेरूनच दर्शन घेऊन दोघेही लालमहालाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचले. बाहेरूनच काहीवेळ लालमहालाचं रुपडं डोळ्यांत साठवू लागले. तोच एका पहारेकऱ्याने त्यांना हटकलं. दरडावणीच्या स्वरात विचारले,

"काय रे पोरांनो? काय काम आहे इकडे?"

"लांडगा मारून आलोय, सोन्याचं कड घ्याया.", बहिर्जी म्हणाला.

"हम्म... आज काल कुणीबी उठतंय आणि लांडगा मारलाय म्हून सोन्याचं कड घ्यायला येतंय. बगु दाव शिपुट कुटंय?"

"तुला का म्हून दावु. आऊसाहेबास्नी दावाय आणलंय.", मारत्या जरा आवाज चढवूनच म्हणाला.

"क्काय...!", पहारेकरो मोठाले डोळे करत म्हणाला.

"ये, गप कि...", बहिर्जी हळू आवाजात त्याला शांत करत म्हणाला. खांद्याला अडकवलेल्या पिशवीतून लांडग्याचं शेपूट दाखवत म्हणाला. 

"माफ करा सरकार. बारीक हाय त्यो. आत जाऊ का आम्ही?"

"हम्म... जावा. पर कडं घ्येतलं कि, टाकोटाक माघारी फिरायचं. हिकडं तिकडं उगा उंडरायचं काम न्हाई."

"न्हाई जी. काम झालं कि, लगीच ईतु. लय उपकार झालं बगा.", त्याला हात जोडत, कमरेत वाकत बहिर्जी म्हणाला.

        दोघेही आतमध्ये जाऊ लागले. प्रवेशद्वाराच्या उंबऱ्याला हात लावून बहिर्जीने कपाळाला भिडवला. आज खूप दिवसांची मनीषा पूर्ण होणार होती! आऊसाहेबांचं, शिवबाराजेंचं दर्शन होणार होतं! प्रत्यक्ष भेटता येणार होतं! बोलता येणार होतं! आतमध्ये गेल्यावर लालमहालाचा परिसर दोघेही डोळे विस्फारून पाहू लागले. पूर्ण लाल रंगाच्या दगडा विटांनी बांधलेली इमारत. बाजूला फळा फुलांनी भरलेला बगीचा. लोकांचा राबता. हातात भाले, तलवारी घेतलेले पहारेकरी. समोरच्या चौकात पाण्याचे तुषार उडवणारं मनमोहक कारंजं! दोघेही भान हरपून पाहत होते. उजव्याबाजूला बैठकीसाठीची प्रशस्त सदर होती. सदर कसली, एक छोटा दरबारी महालच होता. डाव्याबाजूला लिखापडीची कामं करणारे कारकून यांची लगबग चालू होती. समोर दुमजली इमारत, त्यांना सागवानी लाडकांच्या महिरपी आकारातील सज्जे होते. समोरच्या स्वच्छ दगडी पायऱ्यांवरून मारत्या पुढे जाऊ लागला.

"आरं... थांबा...", मागे असलेला बहिर्जी म्हणाला.

"का रं? काय झालं? चल कि?"

"आरं... कुठून कुठून कसं कसं आलुय आपुन. पाय घाण झाल्यात आपलं. हिथं किती साफसूफ हाय सगळं. आणि आपुन बग हे आसं. हे बग, हिथं पाणी बी हाय. जरा पाय धुवू आन मंग जाव."

डावीकडे काही अंतरावर ठेवलेल्या घंगाळ्यातलं पाणी आपल्या पायावर घेतलं. खाली गवतावरच जरा पाय घासले आणि पायऱ्या चढून वर आले. एक शिपायाला सांगून काही वेळ तिथंच थांबले. काही वेळात समोरच्या महिरपी द्वारातून एक स्त्री हळुवार पावलं टाकत बाहेर आली.

        अंगावर जरीची वेलबुट्टी असलेली लाल केशरी रंगाची नऊवारी ल्यायलेल्या. गळ्यामध्ये सुवर्णलंकार, नथ, कुंकू भरलेला माथा.  कपाळावर सूर्यबिंबासारखं तेजस्वी भासणारं लाल कुमकुम तिलक. पाणीदार डोळे, आणि हसरी गोल चर्या पाहून बहिर्जी च्या मनात विचार आला. 'शंभू महादेवाच्या मंदिराच्या चहूबाजूंनी असलेलं नदीचं विशाल पात्र आणि त्यावर चकाकत सूर्यबिंब, ज्याचा थांग कधीही लागत नाही.' कमरेत किंचित झुकून हात कपाळावर नेत म्हणाला, 

"मुजरा आउसाब.", मारत्यानेही बहिर्जीचं अनुकरण केलं.

"काय रे बाळांनो. काय काम काढलंत?", जवळच्याच बैठकीवर बसत आऊसाहेब म्हणाल्या. त्या मायाळू आणि मंजुळ आवाजाने बहिर्जी आणि मारत्याची भीती जरा कमी झाली.

"आउसाब, त्ये रानात नासाडी करणारं रानडुक्कर आन लांडगा मारून आणल्यावं सोन्याचं कड मिळतंय म्हून श्यान आलतु जी.", मारत्या मधेच म्हणाला.

"बरं. बघू...."

बहिर्जीने त्याच्या पिशवीतून रान डुकराच्या आणि लांडग्याच्या शेपट्या बाहेर काढल्या. समोर धरत म्हणाला,

"हे बघा."

त्यात चार पाच रानडुकरांच्या आणि दोन तीन लांडग्यांच्या शेपट्या बघून आऊसाहेब जरा अवाकच झाल्या. चौदा पंधरा वर्षे वयाची पोरं आणि रान डुकरांचा, लांडग्यांच्या कसा काय समाचार घेतला असेल?  म्हणून विचार करू लागल्या. त्यांना त्याचं कुतूहलच वाटलं. कौतुकानं त्या म्हणाल्या,  

"अरे.. वाह... शाब्बास... एकत्रच शिकार केली म्हणायची?"

"न्हाई जी. जाळी लावून, एक एक करून पकडून मारला .", बहिर्जी काही बोलणार तोच मारत्या म्हणाला.

"पाच सा दिस लागलं. आणि लांडगं तर आधीच मारलं हुतं....!

"बरं... कुठून आलात तुम्ही? आणि नावं काय तुमची?"

"हिवऱ्यातनं जी... म्या रामोश्याचा बहिर्जी. बहिर्जी जाधव."

"आन, म्या मारत्या.", पटकन बहिर्जीच्या बाजूला होत मारत्या म्हणाला.

"हम्म छान... बरं... पलीकडे बसलेल्या कारकुनाकडे ते जमा करून या. आणि तुमची नावं पण त्यांना सांग."

मारत्या त्या शेपट्या हातात घेऊन तिकडे गेला. शेजारीच पांढऱ्याशुभ्र पिळदार मिशा आणि भुवया असलेला. कमरे च्या निळ्या शेल्यात खोचलेली म्यानबंद तलवार. अंगावर पांढऱ्या रंगाचा सरदारी वेष. डोक्यावर गुलालाच्या रंगाचा भडक फेटा. सह्याद्रीच्या एखाद्या उंच, अभेद्य, निर्भय आणि धिप्पाड पहाडासारखा भासत होता. त्यांच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या असलेल्या इसमाकडे बघत त्या म्हणाल्या,

"बाजीकाका... ती संदूक घेऊन यायला सांगा.", तो इसम आतमध्ये गेला.

बहिर्जीने पटकन ओळखलं कि, हे दुसरे तिसरे कुणी नसून सरदार बाजी पासलकर आहेत. त्याची छाती कितीतरी अभिमानाने भरून आली. त्या कारकुनाकडे नावे सांगून आणि शेपट्या देऊन मारत्याही एव्हाना आला होता.

"आउसाब...?"

"हं... बोल..."

"शिवबाराज... दिसत न्हाईत...?"

"तो बरा वाड्यात थांबतोय... गेला असेल नदीवर खेळायला."

बहिर्जी हिरमुसला. "मंग, आम्हीबी जातो तिकडंच.", आणि तो मागे फिरू लागला..

"अरे, सोन्याचं कड पाहिजे ना? आधी घेऊन जा मग."

"न्हाई आउसाब... कड्यासाठी नव्हतु आलू... तुमची शाबासकीची थाप पाठीव पडावी. तुमास्नी आणि शिवबाराजास्नी भेटाय मिळावं म्हून आल्तो जी. तुमास्नी भेटलो, तुमचं बोलणं आईकलं कि, दहा हातींचं बळ येत बघा. तुम्हास्नी भेटलो भरून पावलो. आता फकस्त राजास्नी भेटून निघतो आम्ही."

"ये... आरं त्ये सोन्याचं कड??", मारत्या हळूच त्याला ढोसलत म्हणाला. आऊसाहेबांनी नेमकं ते हेरलं आणि मायेनं म्हणाल्या,

"बहिर्जी, मारुती. अरे जीवावर उदार होऊन तुम्ही मुलांनी शेतात नासधूस करणाऱ्या जंगली जनावरांचा बंदोबस्त केलात. बाळांनो, खूप मोठं काम केलंत. हे कडं घातल्याशिवाय बरी जाऊ देईन मी. आणि शिवबाला कळलं तर? त्याला सुद्धा वाईट वाटेल ना?."

आऊसाहेबांचा प्रेमळ उबदार स्पर्श आणि लाघवी बोलणं, बहिर्जी अगदी भारावून गेला. त्यांचं बोलणं असंच ऐकत राहावं असं होतं. आऊसाहेबांनी दोघांनाही स्वतःच्या हाताने सोन्याची कडी घातली. पाठीवर शाबासकी दिली. बहिर्जीचे डोळे भरून आले. आज जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं.

"जा तुम्ही. नदीवरच गेले असतील सगळे. विट्टी दांडू नाहीतर लगोरी खेळत असतील."

        वाटेत भेटेल त्याला विचारत, बहिर्जी आणि त्याचे सवंगडी नेमके हव्या त्या ठिकाणी पोहोचले. आजूबाजूला चिटपाखरूही नव्हतं. फक्त झाडांची सळसळ आणि पक्षांचा चुकार चिवचिवाट. मधूनच एखाद्या मोराच्या 'म्याऊऊऊउ म्याऊऊऊउ' आवाज येत होता. बस्स...! पण त्या आवाजात एक वेगळीच छटा जाणवत होती. बहिर्जीने नेमकं हेरलं कि, कुणीतरी नक्कीच मोराचा आवाज काढतंय. अचानक, मुलांचा खेळण्यातला आवाज येऊ लागला.

"हां हां तिथंच... तिथंच..."

"आणखी जोरात...."

"पकड पकड त्याला... सोडू नको..."

आवाजाच्या दिशेने बहिर्जी आणि त्याचे सवंगडी निघाले. झाडाझुडपांतून वाट काढत आणखी थोडं पुढे गेले तर समोर एका मोकळ्या जागेमध्ये काही मुलं हुतूतू खेळत होती. दोघे तिघे विट्टी दांडू खेळायचं नाटक करत होती. दोघेजण गडबडीत शेजारच्या झाडाच्या जाळीतून बाहेर आली. काहीच न कळल्यामुळे तशीच गपगुमान उभी होती. 

त्यातल्या एकूण जवळ येत विचारलं, "काय रं ? काय काम हाय?"

"काय न्हाई... शिवबाराजेस्नी भेटायचं हुतं."

तोच गुलाबी रंगाचा त्यावर सोनेरी किनार असलेला फेटा घातलेले शिवबा राजे सामोरे येत म्हणाले,

"अरे.... बहिर्जी... तुम्ही इकडे?"

शिवबाराजेंना पाहताच बहिर्जीचे डोळे चमकले. कमरेत वाकून त्याने अदबीने मुजरा केला.

"मुजरा राजं..."

मुजरा करताना त्याच्या हातातलं सोन्याचं कड सूर्यप्रकाशात चमकले. शिवबाने ओळखले. गालावर मिस्कील हसू आणत म्हणाला,

"अरे वाह... लांडग्याची शिकार केलेली दिसतेय?."

तोच बहिर्जी सारखा मुजरा करत मारत्या मधेच म्हणाला, "राज, म्या बी शिकार केलीया. आऊसाहेबांनी ह्ये कड घातलंय बगा."

"अरे वाह... शाब्बास... नावं काय तुझं?"

"म्या मारत्या जाधव."

"राजं... मारुती.", बहिर्जी दुरुस्त करत म्हणाला.

"हम्म... आता कडं मिळालं ना! या तुम्ही.", काहीतरी विचार करून शिवबाराजे म्हणाले.

"राजं... आम्हास्नी बी घ्या कि तुमच्या संग खेळायला?"

"बरं... काय काय येत तुला?"

"मला समदं येतं. मी शिकार करतो, तलवार चालवतो, कुस्तीबी येतीय. आन भविष्य बी सांगतु बगा."

तोच एक लाल मुंडासं घातलेला लहान पोरगा, जो काहीच वेळापूर्वी झुडपातून लगबगीने बाहेर आला होता. तो जवळ येत, आणि डावा हात दाखवत म्हणाला,

"अस्स्स? मंग माझं भविष्य सांग बरं..."

"तुमचं नाव काय म्हणायच?", बहिर्जीने गमतीने त्याला विचारलं

"गोदाजी राजे जगताप म्हणत्यात आमास्नी..."

हसत त्याला नमस्कार करत बहिर्जी म्हणाला, "मुजरा गोदाजी राजे..."

"हां हां... ठीकाय ठीकाय... " डावा हात समोर करत गोदाजी म्हणाला, "हां सांग आता..." 

"हा नाही. दुसरा हात दाखवा."

काहीशा घुश्यातच त्याने उजवा हात समोर केला. तलवार धरून लाल झालेले आणि राठ झालेले त्याचे हात पाहून बहिर्जी म्हणाला,

"तू, तलवार चालवोस न्हवं?", त्याने झटकन हात मागे घेतला. शिवबाही त्याच्याकडे जरा संशयाने पाहू लागला.

"ये गपय... काय बी काय...! ", गोदाजी मागे सरकत म्हणाला.

"बहिर्जी... कसं काय ओळखलंस रे?", शिवबा किंचित हसत म्हणाला.

"माफी असावी राजं..."

"अरे माफीचं काय त्यात... सांगा आता. कसं काय ओळखलंस?"

"आम्ही यायच्या आधी तुम्ही हिथं ढाल तलवारी चालवत हुता न्हवं? आम्ही येतोय हे कळताच ,",

एका झाडाकडे बोट दाखवत बहिर्जी म्हणाला, "त्या झाडयावर बसलेलं पोर मोराच्या आवाजात वरडू लागलं."

"आणि एक सांगू का राज? ह्या  दिसात मोर वरडत न्हाईत. तवाच म्या वळखलं की, तुम्ही हिथच कुटं तरी आसताल म्हून. मोराचा आवाज हुताच, तुम्ही ढाल तलवारी लपवल्या. आन खेळायचं नाटक करू लागला. मला लगीच कळलं कि, तुम्ही काय खराखुरा खेळ खेळत न्हाई त्ये. आणि डोक्याला फेटा, मुंडासे बांधून कुणी खेळ खेळतं का?"

"मोराचा आवाज खोटा आहे हे तुला कसं कळलं?", शिवबात्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघत म्हणाला . बाकीचे त्याला आता खरंच भविष्य वगैरे येतंय कि काय म्हणून आ वासून आणि डोळे मोठे करून बघत होते.

"राजं... आमी रानात राहणारी माणसं. कोणता पक्षी कसा आणि कधी वरडतो. हे चांगलं माहित हाय जी. आन पक्षांचा चांगला आवाज बी काढाय ईतु. त्यो आवाज मोराचा न्हाई त्ये लगेच वळखलं आमी."

त्याच्या उत्तरावर शिवबा खुश झाला. जवळ जात त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला,

"वाह... शाब्बास... कमाल आहे तुझी..."

तोच मारत्या सामोरा येत म्हणाला, "आन राजं... आमी?"

शिवबा हसतच मारत्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, "हो रे.. तु हि ..."

बहिर्जी आणि सगळेच हसायला.

"राज... एक राहिलंच बगा. उन्हाळ्यात मोर वरडत न्हाईत. पावशी वरडते."

"अस्स्स....!", शिवबा त्याच्या बुद्दीमतेवर आणखीनच खुश झाला.

"बरं... आमच्या खेळात सामील व्हाल?"

"चालतंय कि....", हात वर करत मारत्याने होकारही देऊन टाकला.

        आऊसाहेबांच्या हातून घातलेलं कडंआणि शिवबाराजेंच्या भेटीचा प्रसंग आठवत, मनोमन खुश होत बहिर्जी आणि मारत्या घराकडे चालू लागले. हळूहळू सूर्यही डोंगराआड होऊ लागला होता. चंद्रकोरीच्या आकाराची पांढऱ्याशुभ्र बगळ्यांची माळ पुरंदरच्या दिशेने हळूहळू सरकत होती. काळ्या चिमण्यांचा एक थवा तांबूस वर्णीय आकाशात चुहूदिशांनी हुंदडत होता.

~ जय शिवराय ~

क्रमश:....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED