Bahirji - Third Eye of Swarajya - 7 books and stories free download online pdf in Marathi

बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 7

७. श्रीगणेशा 

         कृष्ण पक्षातला अष्टमीचा दिवस. साल होतं १६४५. प्रभू श्रीरामांची पत्नी सीता यांचा जन्मदिवस. यालाच जानकी अष्टमी असेही म्हणत. उन्हाच्या झळा जाणवू लागल्या होत्या. पहाटे आणि रात्रीच काय ती थंडी वाजायची. सकाळचा प्रहार उलटला कि, सूर्य डोक्यावरून खाली पश्चिमेच्या तोरण्यागडाच्या डोक्यावर येई पर्यंत ऊन चांगलंच चटकायचं. सूर्य नुकताच आपली सोनेरी किरणांची धूळफेक करत हिरव्या सह्याद्रीवर आपलं प्रकाशाचं पांघरून घालण्यासाठी सज्ज होऊ लागला. शिवबाराजे आणि त्यांचे मित्रमंडळी आज रायरेश्वराच्या रावळात जमले होते. बरोबर वडीलधारे दादोजी नरसप्रभू आणि नेताजीही होते. बाकीचे आपले नेहमीचेच! राजांनी कमरेच्या निळ्या जरीच्या दुशेल्यात खोवलेल्या म्यानातून खसकन तलवार बाहेर काढली.त्याचं धारदार पातं पिंडीसमोर तेवत असलेल्या समईंतील ज्योतीच्या प्रकाशात चमकन चमकलंउ. तलवार डाव्या हाती पेलून आपल्या उजव्या हाताचा गुलाबीवर्णी अंगठा हलकेच ओढला. रक्ताची ए लालभडक लकेर क्अंगठ्यावर क्षणात उभी राहिली. श्री रायरेश्वर नामक शंभू महादेवाच्या पवित्र पिंडीवर रक्ताचे चार पाच थेम्ब ओघळले. श्रींना रक्ताचा अभिषेक झाला.बेलभंडार उचलून राजांना कपाळाला लावलं. महादेवाला अर्पण केलं. माथा टेकवून राजांनी नमस्कार केला. आशीर्वाद मागितला. सर्वांनी बेलभंडार वाहून राजांचं अनुकरण केलं. बाहेर चौथऱ्याखाली सगळे जमले होते. बाजूला दादोजी, नेताजी उ होते. राज बोलू लागले,

"माझ्या जिवाभावाच्या सवंगड्यांनो.... हि बारा मावळातील जहागीर आम्हाला थोरल्या महाराजांकडून मिळाली. इतर जहागिरीतील लोकांपेक्षा आपण इथे सुखात आहोत. पण हा कायम आमच्याकडेच राहील असं नाही. कधीही विजापूरकर सैन्य घालून जहागीर काढून घेईल. मग पुन्हा अन्याय, अत्याचार, लुटालूट आणि दांडगाई आहेच पाचवीला! नुसते पूजा, अर्चा, प्रार्थना, उपवास करून देव कधीही आपल्याला मदत करीत नाही! मदतीला येणारही नाही! आपल्या प्रार्थनेला जर प्रयत्नांची, निष्ठेची आणि धाडसाची जोड असेल तरच त्याला अर्थ आहे. परक्याची गुलामी करून लाचारीचा जीवन जगण्यापेक्षा, आपल्या मातीसाठी जगण्या-मरण्यातच खरा राम आहे. स्वाभिमान आहे. ज्याप्रकारे प्रभू श्रीरामांनी वानरांना एकत्र करून अन्यायी रावणाचा वध केला.ज्याप्रकारे वासुदेवकर श्रीकृष्णांनी भारतवर्षातील सर्व गोपांना एक करून अन्यायी, अत्याचारी सत्ताधाऱ्यांचा नाश केला. त्याचप्रकारे जर आपण सर्व एकत्र, एकजुटीने, या मातीच्या रक्षणार्थ उभे ठाकलो, प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आणि प्रसंगी रक्ताचं शिंपण द्यायलाही तयार झालो! तरच कुठेतरी आशेचा स्वातंत्र्य सूर्य सह्याद्रीच्या आसमंतात अखंड तळपत राहील. तरच श्रीचं राज्य होईल! आपलं राज्य होईल! स्वराज्य होईल! तेव्हा स्वराज्याच्या नवनिर्माणासाठी प्रसंगी प्राणाच मोल देण्याची शपथ मी आज श्रींच्या साक्षीने घेतो आहे. बोला कोण कोण आहे माझ्या सोबत?"

पहाडी आवाजात बाजूने आवाज आला. " मी दादोजी नरसप्रभू...."

"मी नेतोजी पालकर...."

"म्या तान्हाजी मालुसरा...."

"म्या येसाजी कंक..."

"म्या संभाजी कावजी...."

"म्या बहिर्जी जाधव...."

"म्या जिवाजी जाधव...."

एक एक करत हात हवेत उंचावत सर्वांनी शपथा घेतल्या. "हर हर महादेव" चा गजरात रायरेश्वराच्या आसमंत दुमदुमून गेला. सगळ्यांना शांत करत राजे दादोजींकडे पाहत म्हणाले,

"दादोजी... तुम्ही जुनी जाणती आणि अनुभवी माणसं... नारळ कुठून फोडायचा ते आता तुम्हीच ठरवा..."

"राजे... आता इचार कसला... रावळाची जागा आणि शेजारचा केळंजा... पयला नारळ देवाच्याच दारात फ़ुटाय पायजे..."

"व्हय राजं... आमास्नी बी आसच वाटतंय...", बाकीच्यांनाही दादोजींना दुजोरा दिला.

"ठीक... वाड्यावर सविस्तर बोलूच.... चला... हर हर महादेव..."

"हर हर महादेव...."

सर्वांनी शिवापूरकडे प्रस्थान केले.


          सायंकाळपासूनच शिवापूरच्या वाड्यात मावळे जमू लागले. भल्या पहाटेच निघायचं होतं. प्रत्येकाने रात्रीचा भाकर तुकडा बरोबरच घेतला होता. शिवबाराजांनी तानाजी, संभाजी, जिवाजी यांना सांगून हत्यारांचा बंदोबस्त आधीच करून ठेवला होता. कुठून कसे जायचे? कोणत्या वेळी ठिकाणावर पोहोचायचे? याची जबाबदारी बहिर्जीकडे होती. तर कोण कोण कोणत्या आघाडीवर असेल? केव्हा हल्ला करणार हे राजांनी आधीच ठरवलं होतं. आता त्यात कसलाही बदल होणार नव्हता! तानाजी येसाजीची मिळून शंभरावर, दादाजीचं पन्नास लोकांचं, नेतोजीकडे वीस पंचेवीस, बहिर्जीनेही तेवढेच रामोशी तरुण, तर शिवराजांच्या पथकातील पन्नासेक आणि इकडून तिकडून मिळालेली अशी तीन चारशे मावळ्यांची सेना जमली होती. रायरेश्वर - केंजळगड घ्यायला पुरून उरेल एवढी. तान्हाजी आणि येसाजीची पथके रात्रीपासूनच रायरेश्वराच्या आणि केंजळगडाच्या पायथ्याला दाट झाडीमध्ये दबा धरून बसली होती. मारत्याच्या हाताखाली त्याच पथक ठेऊन बहिर्जी राजांबरोबर भल्यापहाटे निघणार होता.

          राजांची उठून अंघोळ आणि शरीरधर्म आटोपून, रणवेष धारण करून दालना बाहेर आले. वाड्यात दादाजी, बहिर्जी, नेतोजी, जिवा आणि इतर मंडळी जमली होती.

"दादोजी... शक्यतो सामोचाराने घ्यावे. रक्तपात होणार नाही याची काळजी घ्या. हकनाक लोकांचे बळी जायला नकोत. तान्हाजी, येसाजी यांनाही काल रात्री बजावले आहे."

"जी..."

शे दीडशे घोडेस्वारांचं पथक रायेश्वराच्या दिशेने दौडू लागलं.

        रायरेश्वराचं पठार तसं उंचावरचं. वारा भरारा वाहायचा. आधी चार बुरुंज आणि तटबंदीही होती पण, कालौघात आणि दुर्लक्षित राहिल्यामुळे सगळं नामशेष झालं होतं. केळंजाच्या जवळचा मोठा विस्तार असलेला डोंगर असल्यामुळे पाच एक पहारेकरी फक्त नावापुरते असायचे. केळंजा गडाचा घेर तसा लहानच होता. पण नैसर्गिकच कातळाची भक्कम तटबंदी लाभल्यामुळे आपोआपच एखाद्या किल्ल्याची रचना झाली होती. त्यात गडावर जाण्यासाठी कातळातच खोदलेल्या पायऱ्या होत्या.  विजापुराहून केळंजा गडाच्या खर्चासाठी काहीही मिळत नव्हतं. आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांवरून गोळा झालेला पैसा शिरवळच्या ठाणेदाराकडेच द्यावा लागायचा. त्यातून काही राहिलेच तर किल्लेदाराच्या  खिशात. गडाकडे लक्ष द्यायला, पैसा कुठं शिल्लक राहतंच नसायचा. गडावर दहाएक घरटी आणि पन्नासेक पहारेकरी, रखवालदारी करणारे लोक. रात्रीचे तर त्यातलेही अर्धे अधिक वस्तीला खाली जाणारे. त्यामुळे रात्री गडावर माजून वीसेक लोक असायचे. हि सगळी माहिती बहिर्जीने राजांना पुरवली होती. आन त्यामुळेच राजांनी पहाटे पहाटेच गडावर हल्ला करण्याचा बेत आखला होता. रायरेश्वरावर असलेल्या पाच एक पहारेकऱ्यांच्या समाचाराला मारत्या सोबत दहा पंधरा, गोदाजी दहा एक सवंगड्यांसोबत रात्रीपासूनच दबा धरून बसले होते. तर तान्हाजी, सूर्याजी, येसाजी, संभाजी हि सगळी केळंजाच्या चारी बाजूंनी तीसेक तीसेक मावळ्यांसोबत राजांच्या यायच्या इशाऱ्याची वाट पाहत होते.

        सूर्याची सोनेरी किरणे धर्तीवर पडायच्या वक्ताला राजे रायरेश्वराच्या पायथ्याला पोहोचले. मारत्या, गोदाजी राजांना भेटून आपापल्या मुक्कामावर गेले. राजांच्या पुढे आणि मागे तलवारी घेऊन हर हर महादेवचा गजर करत रायरेश्वर चढू लागले. मागच्या बाजूने मारत्या आणि गोदाजीने वर जाऊन पहारेकऱ्यांचा बंदोबस्त केला. रायरेश्वरावरच्या मुख्यद्वारावरचं आदिलशाही निशाणाच्या जागी भगवा फडकू लागला. श्री रायरेश्वर मुक्त झाले. राजांनी शंभू महादेवासमोर नारळ फोडून स्वराज्याचा श्री गणेशा केला. सुंदऱ्याच्या वाटेवर मारत्या आणि त्याच्या साथीदारांनी शिंग फुकून हल्ल्यासाठी इशारा केला. सुंदऱ्याच्या वाटेवरून राजांचं पथक केळंजाकडे दौडू लागलं.

        सूर्य डोक्यावर चढू लागला होता. वस्तीतून सकाळचे येणारे पहारेकरी आज आलेच नव्हते. सकाळची जेवण उरकून झाडांच्या सावलीच्या आसऱ्याने पहारेकरी निवांत पहुडले होते. झाडांच्या खोडाला टेकवून भाले तलवारी ठेवलेल्या होत्या. अचानक, झाडाझुडपांतून शिंगं, तुताऱ्या वाजू लागल्या. 

        एकाच वेळी वीस पंचवीस मावळे एकेका बुरुजावर "हर हा महादेव.... जय भवानी..." आरोळ्या ठोकत येताना पाहताच, पहारेकऱ्यांनी हत्यारे टाकून शरणागती पत्करली. मुख्य द्वाराखाली तान्हाजी राजांची वाट पाहत होता. शिवबाराजे दादोजी, नेतोजींसोबत द्वाराजवळ आले. द्वारावरचे पहारेकरी एवढा मोठा जमाव पाहून आधीच हबकून गेले होते. पण आतूनच दरवाजा बंद असल्याने काहीच करता येत नव्हतं. काहीच वेळात सारा गड मावळ्यांच्या ताब्यात आला. किल्लेदाराला मावळ्यांच्या कोंडाळ्यात येसाजीमी केळंजाई मंदिरासमोर आणू लागला. बहिर्जीने दरवाजा ताब्यात घेतला. उघडला जाताच, बाहेरचे मावळे 'हर हर महादेव ' म्हणत भसाभसा आतमध्ये घुसले.

    दादोजी सामोरे होत राजांच्या पुढे चालत होते. त्यांना समोर येताना पाहताच किल्लेदार उसळला.

"दादोजी.... काय म्हणायचं ह्येला...?"

"कुटं काय? ह्ये आपलं.....?", हातवारे करत हसू दाबत नरसप्रभू बोलू लागले.

"ह्ये म्हंजी काय???"

"काय न्हाई... पोरं म्हणली का... कि एखांदा किल्ला कसा जिकून घ्येत्यात येकडाव दावा..."

"ह्ये आस्स्स....? आन ह्या वक्ताला..... काय पंत....? क्येस पिकाय लागलं तरीबी पोरखेळ काय ग्येला न्हाई... काय म्हातार चळ लागलाय... "

        दोघांचं बोलणं चालू होतं. आजूबाजूला जमलेले मावळे दोघांची मजा बघत उभे होते. पाठीमागे राजांनी बहिर्जीच्या कानात काही कुजबुज केली. गर्दीतून वाट काढत बहिर्जी बाजूला गेला. मुख्य दरवाज्यावरच्या बुरुजावरचा आदिलशाही झेंडा खाली उतरून त्या जागी भगवा आकाशामध्ये सरसर करत चढला. डौलाने फरफरू लागला. बहिर्जी मोठ्याने ओरडला,

"हर हर महादेव..."

त्याबरोबर सगळ्या मावळ्यांनी "हा हर महादेव..." चा गजर केला.

     किल्लेदाराचं लक्ष तिकडे गेलं. त्याचा पारा आणखीनच चढला. दादोजींच्या आणखी सामोरे येत ओरडलाच,

"दादोजी.... क्काय खेळ लावलाय....?"

पाठीमागून धीमी पावलं टाकत राजे सामोरे आले.

"बाबा... शांत व्हा... किल्ला तुमचाच आहे. पण आता विजापूरची चाकरी सोडून द्यावी लागेल."

"म्हंजी....?"

"हे भगवं निशाण आपल्या मराठी दौलतीचं... या मातीसाठी सगळे एकत्र होऊन उभे राहू... दुसऱ्याची गुलामी कशाला?"

"म्हंजी... सरळ सरळ बंडावाच कि...?"

"नाही बाबा... हा आपला मुलुख! आपण इथं घाम गाळणार आणि दुसरे त्याचं मोल घेणार! हे कुठवर चालणार! आपल्या हक्काचंच आपण घेतोय. यात बंडावा कसला?"

"न्हाई... बाच्छाशी बेईमानी न्हाई व्हनार... आम्ही शिरवळात जाऊ..."

"आस्स्स... शिरवळला जायला वेळ होईल. त्यापेक्षा... आम्हीच तुमचा फैसला करतो..."

"म्हंजी....??"

येसाजीकडे पाहत राजे म्हणाले, "येसाजी... यांचे हातपाय बांधून, बुरुजावरून..."

"न्हाई... राजं... आम्ही नोकर माणसं... आमचा काय गुन्हा...?"

"ठीक... मग आता मातीशी इमानी राहाल अशी शपथ घ्या. आणि तुमची निष्ठा आपल्या मराठी दौलतीसाठी असू द्या. स्वराज्यासाठी असू द्या."

        राजांचे स्वराज्याप्रती असलेले विचार किल्लेदाराला पटले. सर्वांनी केळंजाई देवीचे दर्शन घेतले. राजांनी गडावर बंदोबस्तासाठी आणि डागडुजीसाठी किल्लेदाराकडे काही रक्कम ठेवली आणि शिबंदीही ठेवली. घोडी शिवापूरच्या वाड्याकडे दौडू लागली. आता पुढचं लक्ष्य मोठं होतं...

~ जय शिवराय ~

क्रमश:....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED