Bahirji - Third Eye of Swarajya - 2 books and stories free download online pdf in Marathi

बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 2

२. दवंडी

निसर्ग देवतेच्या कुशीत वसलेलं गाव, आजूबाजूला हिरव्या रंगाचा पदर ओढून सज्ज असलेल्या सह्याद्रीच्या मुशीत, बाजूनेच खळाळत वाहणाऱ्या नदीच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या मंद मंद शीतल वायुलहरी अंगावर पांघरून निजल होत. पक्ष्यांच्या कलकलाटाने हळूहळू जागं होऊ लागलं होत. पूर्वेकडून सुर्यादेवताही आपल्या असंख्य रंगीबेरंगी कुंचल्यांनी आकाशाचं छत नानाविध रंगात रंगवून टाकण्यासाठी प्रकट होऊ लागला होता. त्याच्या तांबूस सोनेरी किरणांनी अवघा भवताल उजळून टाकण्यासाठी डोंगरा आडून वर सरकत होता.

        नदीपासून आणि घाटावरच्या मंदिराच्या मागच्या बाजूने अर्धा एक फर्लांग अंतरावर निंबाच्या झाडामध्ये रामोश्यांची वस्ती होती. मोजून दहा बारा घर होती. मातीच्या भिंती आणि गव्हाच्या, किंवा नदीतल्या पानगवताने शाकारलेली छप्पर असलेली, समोरचं अंगण गाई म्हशींच्या शेणाने सारवलेली होती. वस्तीतून एक वाट नदीकडे, तर दुसरी गावच्या मुख्य चौकाकडे जात होती. एका लहान पायवाटेने नदीच्या घाटावर जात येत होतं. रामोशी जाधवाच्या घरासमोर काही अंतरावर नदीच्या दिशेने एक भलं मोठं आंब्याचं डेरेदार झाड होत. त्याच्यावर अनेक रंगांच्या, अनेक आवाज काढणाऱ्या पक्षांची घरटी होती. झाड कसलं ती एक पक्षांची वस्तीच होऊन गेलं होतं. उन्हाळ्यात लहान मोठ्या हिरव्या, पिवळ्या, पोपटी, लाल, नारंगी रंगांच्या फळांनी झाड अगदी डवरून जायचं. त्यावेळी ते आकाशात लुकलुकणाऱ्या असंख्य तारकांनी बहरून गेल्यासारखं भासायचं. त्या मौसमात पक्षी फारच आनंदात असायचे. निरनिराळे आवाज काढून, किलबिलाट करून, चिवचिवाट करून ते आपला आनंद प्रकट करून दाखवीत असत. एखादा मोर,  कोकीळ, भारद्वाज, खंड्या क्वचितच झाडावर आलेला दिसे. झाडाचा आकार, घरात खूप दिवस वापरात असलेल्या एखाद्या केरसुणीसारखा भासे! झाडाच्या खाली आजूबाजुला लोकांनी शक्य असेल तिथे बसायला मोठमोठाली दगडी व्यवस्थित एकसंघ रचून ठेवलेली होती. वस्तीतल्या पोराटोरांचं ते एक हक्काचं खेळण्याचं ठिकाणचं झालं होतं. संध्याकाळी घरातली करती सवरती पुरुष मंडळी, काही वृद्ध लोकं तिथं गप्पा मारण्यासाठी जमायची. 

        झांबरे पाटलांनी बहिर्जीला त्यांच्या मळ्यात रात्रीची राखणी करण्याच्या कामाला लावून घेतलं. दिवसा आजूबाजूच्या गावात फिरून शक्य असेल तिथं बहुरुप्याचे खेळ करायचे आणि रात्रीला मळ्यात शेतीची राखण करायची. घरातल्या मीठ मिरचीची चिंता काही प्रमाणात कमी झाली होती. मळ्यात राखणीचे काम मिळाले होते. पण बहिर्जीचं मन त्या कामात काही गुंतत नव्हतं. 'जे काम माणसाला मनापासून करायला आवडतं! तेच काम त्यानं करावं.' शिवबाराजेंचे शब्द कानात सारखे घुमत होते. ओढ लागली होती पुण्याची!

        काही दिवसांपूर्वीची गोष्ट ! शेजारच्या गावात शिवबाराजे पंतांसोबत मावळात फिरतफिरत आले होते. लोकांच्या अडीअडचणी ऐकून घेत होते. पुण्याला भेटायला बोलावत होते. एवढ्या मोठ्या जहागिरीचा राजा सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळत होता. लोकांशी बोलत होता. त्यांच्या हातचं पाणी पित होता. खात होता. लोकांना या गोष्टीचं अपार कौतुक आणि आश्र्चर्य वाटत होतं. कारण या अगोदर जे जे म्हणून जहागीरदार होते ते ते फक्त लुटायची काम करायची. त्यांच्या खाली कामं करणारी देशमुख मंडळी स्वतःलाच त्या त्या प्रदेशाचा राजा समजायची. जहागीरदार देशमुखांना लुटायचे आणि देशमुख शेतकऱ्यांना. अन्याय, अत्याचार, पिळवणूक हा आपला हक्कच असल्यासारखे वागायचे. कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घ्यायचं तर दूरच! समोर उभं सुद्धा करत नव्हते. त्याच लोकांना शिवबाराजे जवळ करत होते. याच मावळातल्या दऱ्या खोऱ्यांतले देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी स्वराज्यासाठी निष्ठेने बांधले गेले तरच एकसंघ राज्य बांधता येईल. स्वराज्य बांधता येईल. कारण ते पुरते समजून होते, कि मराठी राज्यचं बळ हे सह्याद्रीच्या डोंगरात आहे. आणि या डोंगरात निर्भयपणे वावरणाऱ्या वाघात आहे. या मावळ खोऱ्यातल्या प्रत्येक माणसात आहे. 

        शेजारच्या गावातल्या देशमुखांच्या वाड्यात काही वेळ विसाव्यासाठी पंत आणि शिवबाराजे थांबले होते. संध्याकाळ होत आली होती. मारुतीच्या मंदिराजवळच्या पारावार बहुरुप्याचे खेळ करून लोकांचं मनोरंजन करत असताना शिवबाराजांनी बहिर्जीला पाहिलं. त्याची विचारपूस केली. त्याच्यातले नेमके गुण हेरून त्याला पुण्याला भेटायला बोलावलं होतं.

        गुलाबी गौरवर्ण, लालचुटुक ओठ, आणि त्यावर आलेली तांबूस लव. कपाळावर दुबोटी शिवगंध आणि डोक्यावर काषायवर्णी जिरेटोप. बहिर्जीने राजांना लवून मुजरा केला. शिवबाराजे म्हणाले,

"तूच ना रे? झांबरे पाटलांचा उधळलेला बैल अंगावर घेतला होतास?"

हे ऐकताच बहिर्जी चमकालाच. डोंगराच्या कुशीत लपलेलं आपलं एवढंसं गाव. आणि हि गोष्ट राजांना कशी कळली?

"कसला विचार करतोयस?"

"न्हाई राज... एवढीशी गोष्ट तुम्हास्नी कशी कळली म्हून इचार करत हुतो जी..."

शिवबाराजे हलकेच हसले. म्हणाले, "सवड मिळाल्यावर पुण्याला ये."

"जी राजे..."

        पारावर पंत, शिवबाराजे आणि त्यांचं पथक जाण्यासाठी थांबलं होतं. त्यांना निरोप देण्यासाठी आजूबाजूला लोकांचा मेळा जमला होता. पंत बोलत होते, 

"लोकहो... थोरले महाराज शहाजीराजे यांना पुणे प्रांत आदिशाहीकडून जहागिरी म्हणून कायमचा नावे झाला आहे. आणि शिवाजीराजे जातीने या प्रांताचा कारभार पाहत आहेत. आता कुणाचेही भय बाळगण्याचे कारण नाही.तुमच्या तक्रारी, अडीअडचणी असल्यास लाल महात अष्टोप्रहर खुला आहे."

        उध्वस्त झालेली गावे, वस्त्या पुन्हा नव्या उमेदीने वसू लागली. विस्कटलेले संसार पुन्हा फुलू लागले.

        मावळ खोऱ्यामध्ये वसलेल्या गावांत वाघ, बिबट्या, रानडुकरे, कोल्ह्या लांडग्यांनी उच्छाद मांडला होता. शेळ्या, मेंढ्या, गाई वासरं आजची उद्या राहतील की नाही, शाश्वती नव्हती. रानडुकरं तर दिवसाढवळ्या उभ्या पिकात शिरायची आणि नासधूस करून पसार व्हायची.

        दिवस कासवाच्या गतीने पुढे सरकत होते. शिवबाराजेंना भेटल्यापासून बहिर्जीच चित्तच थाऱ्यावर नव्हतं. एकटक आंब्याच्या झाडाकडे बघत आणि पक्षांचा किलबिलाट ऐकत बराच वेळ बहिर्जी घरच्या समोरच्या बाजेवर निवांत पहुडला होता. इतक्यात 'फाssssड फाssssड' कसला तरी आवाज आला म्हणून बहिर्जी त्या बाजूला पाहिलं. मारत्या त्याची खोंड बैलगाडीला जुंपून नदीच्या दिशेने निघाला होता.  

"ये भैऱ्या... काय करतूय?"

"काय न्हाई... बसलूया आपलं झाडाकडं बघत."

"झाडाकडं काय बघत बसलाय. चल नदीवर. माती भरायला. पाटलांच्या वाड्यावर खेपा टाकायच्या आहेत."

काम म्हटलं कि बहिर्जी कधीही नाही म्हणत नसे. 

"किती पैक देणार?"

"आता पाटील जे दिल, ते घिव आर्ध आर्ध..."

"हां चल... ह्यो म्होरं... म्या आलुच..."

        मारत्याला माहित होतं. 'भैऱ्याला संग घेण्याचा फायदाच होता. अंगापिंडानं बळकट भैऱ्या रोज सकाळी घाटावर घामाघूम होईस्तो जोर बैठका मारायचा. सोबत आणलेला लहान दुधाचा माठ हा हा म्हणता रिचवायचा. पिशवीत आणलेला भुईमूग, फुटाणे दोन चार मुठी खायचा. सकाळी सकाळी सूर्याला अर्घ्यदान करताना मंदिरात येणाऱ्या भटजींच्या तोंडून कैक वेळा गायत्री मंत्र ऐकला होता. तो आता त्याला अस्खलित पाठ झाला होता. कमरेभर पाण्यात उभा राहून गायत्री छंदातील मंत्र म्हणत सूर्याला अर्घ्यदान करायचा. अर्धा एक घटका नदीत पोहायचा आणि सोबत आणलेली मोठी घागर नदीच्या स्वच्छ पाण्यानं भरून मगच घरी जायचा.' 

        दोघेही घमेलं फावड्याने गाडीत माती भरू लागले. मारत्यापेक्षा दिड दोन पट जास्तीची घमेली बहिर्जी त्याच वेळात भरायचा. चार खेपा झाल्या होत्या. पाचवी खेप माती खाली उतरवत असताना पाटलांचे निसटते शब्द मारत्याच्या कानावर पडले. 'माजलेल्या लांडग्याचं शेपूट... नासधूस करणारं रानडुक्कर सोन्याचं कड... आउसाब.. लालमहाल...!' भरभर त्यांनी माती खाली केली. घरी जाताना. गाडीत तो बहिर्जीला म्हणाला,

"भैऱ्या, आपुन मारायचा का रं लांडगा? न्हाईतर रानडुक्कर...?"

"का रं ?? पण त्येला मारून आपल्याला काय मिळणार?"

"आरं... तू ऐकलं नाहीस का? पाटील काय म्हणत हुतं?"

"न्हाय ब्वा...."

"आरं... शेजारच्या गावात पुण्यावरनं दवंडीवाला आला हुता म्हणं. रानटी जनावर न्हायतर शेतात नासधूस करणाऱ्या रानडुकरांचं शेपूट न्हेऊन लालमहालात दावलं कि, सोन्याचं कड मिळतंय म्हणं...."

"क्काय? सोन्याचं कड....??"

"आरं... खरंच... आयच्यान मी ऐकलं त्येच सांगतुय तुला."

"मंग आपल्या गावात कशी न्हाई आली दवंडी."

"त्ये काय माहित न्हाई ब्वा... यील दोन चार दिसात... मंग जायचं का आज रातच्याला जंगलात?"

"आर... मला एक सांग. आता लांडगा यीतू का हिकड वस्तीत..."

"न्हाई..."

"आता आपुनच आधी त्येंचा मुडदा पडलाय म्हणाल्याव कशाला वस्तीकड फिरतंय...."

थोडा विचार करून बहिर्जी म्हणाला, "मग कशापाई आपून जंगलात जाऊन त्येला शोधून मारायचं? उगा जीवाला कार..."

"चल सांच्याला ये देवळात."

बहिर्जी मारत्या घरी निघून गेले.

~ जय शिवराय ~

क्रमश:....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED