बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 6 Ishwar Trimbak Agam द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
शेयर करा

बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 6

६. सुरवात...

लाल महालात येऊन बहिर्जी आता चांगलाच रुळला होता. वाड्याच्या जवळच त्याला एक खोली देण्यात आली. मित्रांच्या ओळखी होऊ लागल्या. सवयी, स्वभाव माहित होऊ लागले. विटीदांडू, सूरपाट्या, सूरपारंब्या, लगोरी, हुतूतू, कुस्तीचे डाव सकाळ संध्याकाळ रंगू लागले. त्याचबरोबर तलवारबाजी, भाले, बरचे, दांडपट्टा, विटा, तिर कमान अशा ना नाविध शास्त्रांचे हात होऊ लागले. सकाळ संध्याकाळ नदीच्या काठी दाट झाडीमध्ये कसून सराव होऊ लागला. कुस्तीचे डाव रंगू लागले. सोबतीला व्यायाम आणि घौडदौड त्यामुळे शरीरही आकार घेऊ लागलं. स्वराज्याविषयीचे आऊसाहेबांचे, शिवबाचे विचार मनात घर करू लागले.

        दिवसाचा तिसरा प्रहार सुरु झाला होता. संध्यासमयी सूर्याच्या तांबूस सोनेरी प्रकाशाने आकाश उजळून निघाले होते. थंडगार वाऱ्याची झुळूक अचानक अंगाशी लगड करायची, तसं अंगावर सरसरून काटा यायचा. रायरेश्वराच्या मंदिराजवळचा परिसर हा तसा तीन एक कोसाच्या घेराचा, त्यामुळे फेरफटका मारायला चांगला वाव मिळायचा. जवळच असलेल्या उंच टेकडीवरून आजूबाजूचा नयनरम्य परिसर डोळ्यांचं पारणं फेडत असे. टेकडीच्या उत्तर बाजूला तुंग, तिकोना, लोहगड व विसापूर हे किल्ले दिसायचे अन नजर थोडी डावीकडे वळवली कि समोरचा केंजळगड नजरेत भरायचा. अन त्याच्या पलीकडे आदिलशाही अधिपत्त्या खाली असणारा जावळीचा प्रदेश टप्प्यात यायचा. जावळीच्या खोऱ्यात पारघाटाच्या तोंडावर अन रडतोंडी घाटाच्या नाकावर भोरप्या डोंगर एखाद्या पहारेकऱ्यासारखा भासायला. राजांना या डोंगराचे खास आकर्षण होते. डोंगराकडे बघत बराच वेळ विचार करत बसायचे. खरंच काय आहे, त्या डोंगरात? की राजे एकटक खूप वेळ शांत बघत बसायचे. 

        शिवबाराजेंबरोबर सगळे रायरेश्वराच्या मंदिराकडे चालू लागले होते. राजांच्या मस्तकावर निळ्या रंगाचा अन चंदेरी किनार असलेला जिरेटोप उठून दिसत होता. गुलाबी ओठांवर तांबूस काळ्या रंगाचं मिसरूड डोकावू पाहत होतं. कमळाच्या पाकळ्या प्रमाणे असलेले डोळे व त्यावरील रुंद कपाळावरचे रेखीव शिवगंध अन मधोमध असलेला केसरी टिळा, त्या चैतन्याने ओतप्रोत भरलेल्या चेहऱ्यावर अजूनच आकर्षक दिसत होते. शिवबा अन त्याच्या मित्रांनी शंभू महादेवाचे दर्शन घेतले अन मंदिराबाहेर असलेल्या दगडी चौथऱ्यावर जरा निवांत हवेला बसले. बराच वेळ शिवबा शांत बसला होता, काहीच बोलत नव्हता.

तेवढ्यात येसाजी म्हणाला, "राजं.... हिकडं आल्यापासनं आज जरा लईच गप झालाईसा."

शिवबा, "येसाजी, असं किती दिवस फक्त हे नावापुरतं राजेपण मिरवायचं."

तसं बहिर्जी खाली मांडी घालून काटकीने माती उकरत म्हणाला , "का...? काय झालं राजं....?"

शिवबाने एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, "अजून कुठवर आपण आपल्याच मुलखात परक्यासारखं राहायचं. कुठे गडावर जावं म्हटलं, निसर्गरम्य ठिकाणी जायचं म्हटलं तरी गडकऱ्याची वा ठाणेदाराची परवानगी मिळेपर्यंत वाट बघत बसायची. आपलाच मुलुख, आपली माणसं अन हे परकीय लोक येऊन आपल्यावर राज्य करणार! यांचं लष्कर आपल्या रयतेचं पीकपाणी हिसकावून घेणार, मनमानी सारा वसूल करणार, दिवसाढवळ्या आय बहिणी उचलून नेणार. आता सहन नाही होत हे मित्रांनो."

तान्हाजी लगेच हाताची मूठ त्वेषाने उंचावत म्हणाला, "राजं.... तुम्ही फक्त हाक दया. या बारा मावळ्यातल्या घराघरातला एकूण एक माणूस हातात हत्यार घेऊन तुमच्या संगट हुभा राहायला तयार हाय."

"तुमच्या एका इशाऱ्यावर जीव द्यायला अन घ्यायला बी फूड मागं बगनार न्हाय जी.", येसाजीही तावा तावानच बोलला.

"एवढ्यानं हे नाही होणार मित्रांनो. फक्त तरुण मावळ्यांना घेऊन जर आपण या जुलमी सत्ते विरोधात लढलो तर ते फक्त एक बंड होईल अन असे बंड केव्हाही मोडू शकतं. महाराज साहेबांनी सुद्धा असाच प्रयत्न केला होता. पण जर आपल्या मुलखातील वतनदार, जमीनदार, देशमुख या लोकांनी आदिलशाही वा मुघलांची चाकरी करणं सोडून एकजूट झाले तरच आपल्याला आपला अंमल, आपलं राज्य, स्वराज्य निर्माण करता येईल, साकारता येईल. जनतेला त्यांचं पीक पाणी खाता येईल. सगळीकडे शांतता अन सुबत्तता नांदू लागेल."

शिवबाचं बोलणं चालू होतं. बसलेल्या एकाएकाच्या अंगात रक्त सळसळत होतं. हातांच्या मुठी आवळल्या जात होत्या. स्फुरण चढत होतं. पुन्हा एकदा शिवबा शांत झाला अन उठत म्हणाला, 

"चला खूप वेळ झाला. नेताजी, जिवाजी वाट बघत असतील."

शिवबा अन त्याचे शंभर दीडशे मावळ्यांचा पथक मुक्कामाच्या ठिकाणी चालू लागले.

          आता शिवबा आणि त्याचे सवंगडी मावळ खोऱ्यातील डोंगर, किल्ले, नद्या, खिंडी, घाट. दऱ्या, चोरवाटा, भुयारे पिंजून काढू लागले. त्यात माहितगार तरुण रक्तात पुढे होते येसाजी, तानाजी, गोदाजी, बालाजी तर बडे बुजुर्ग जाणती सवरती मंडळी म्हणजे बाजी पासलकर, नेताजी पालकर, दादाजी नरसप्रभू! पण बहिर्जीच्या चाणाक्ष नजरेची सर कुणालाच नव्हती. एखाद्या गडावर फिरायला गेल्यावर शिवबा, बाजी, नेताजी गडकऱ्यांशी, सरदारांशी बोलण्यात गुंतले कि, बहिर्जीची घारीची नजर सगळीकडे भिरभिरत राहायची. गडाला दरवाजे किती आहेत? बुरुंज किती आहेत? गडावर शिबंदी किती आहे? पहारे कुठे आहेत? गडावर पोहोचण्यासाठी चोरवाटा किती आणि कशा कशा आहेत? लहानातली लहान पण अतिमहत्वाची गोष्ट बहिर्जी हेरून ठेवायचा. त्यांच्या नोंदी करून ठेवायचा. जिथे जिथे म्हणून फिरायचे त्या त्या ठिकाणांचा, प्रदेशाचा नकाशाच राजांसमोर बहिर्जी पेश करायचा. रायरेश्वर, रोहिडेश्वर असे टेकडी वजा किल्ले, तर रोहिडा, तोरणा, सिंहगड, पुरंदर यांसारखे दुर्गम गड आणि चाकण, सुभानमंगळ सारख्या गढी वजा भुईकोट किल्ले! यांच्या वरच्यावर भेटी होऊ लागल्या. तसं तसे बहिर्जीच्या माहितीत आणखीनच भर पडू लागली. बारीक सारीक तपशिलांसह नकाशे तयार होऊ लागले.

     उन्हाळा चालू झाला होता. तरीही पहाटेची थंडी भारीच वाजायची. सकाळचा समय होता. वातावरणात गारवा होता. सदरेवर आऊसाहेब, शिवबा बोलत बसले होते. आजूबाजूला तानाजी, येसाजी, सूर्याजी, गोदाजी, आणि इतर सवंगडी बैठकीवर बसले होते. बहिर्जीला उभं राहिलेलं पाहताच एका बैठकीकडे अंगुलीनिर्देश करत आऊसाहेब म्हणाल्या,

"अरे बहिर्जी असा उभा का? बैस इकडे?"

"न्हाई जी. मी बराय हिथं."

"अरे बैस म्हणतोय ना आम्ही."

"नगं आउसाब... आम्ही गरीब माणसं... आमची लायकी..."

"बहिर्जी...", आऊसाहेब खवळल्याच ! त्यांचा आवाज ऐकून तिथं जमलेली सारी मंडळी क्षणभरच थरकले.

"माणसाची लायकी ठरवणार कोण? माणसाचं काम, धाडस, त्याची निष्ठा, त्याच वागणं यावरूनच त्याची लायकी ठरते."

"पर आमची जात... "

"अरे पुन्हा तेच! तुमची जात पाहून शिवबाने तुमच्याशी मैत्री केली का? एकत्र खेळता, फिरता, उठता, बसता. एवढंच काय एकत्र मांडीला मांडी लावून चटणी भाकर खाता. मग इथे कुठं आडवी येते का जात? आणि काय रे तुझी जात? रामोशीच ना? रामोशी रामोशी म्हणजे तरी काय? ज्याच्या मनात राम वसतो. त्याला आम्ही रामोशी समजतो. मग ती जात कसली! ही सारी मानव जात एकच. माणसानं माणसाला माणसासारखं वागवलं, म्हणजे झालं. हीच ती एक जात बाकी सगळं गौण समजतो आम्ही."

        आऊसाहेबांचं असं बोलणं चालू झालं कि, ऐकतंच बसावसं वाटे! त्यांचं आर्जवी आणि लाघवी बोलणं अगदी मनाला स्पर्शून जात असे. सगळे अगदी भारावल्यासारखे ऐकत असत.

        दिवस भरभर पुढे सरकत होते. आठवडा दोन आठवड्यांनी घराकडे एखादी चक्कर व्हायची. बहिर्जी, मारत्या आणि त्याची मित्रमंडळी रोहिडेश्वर आणि रोहिडा टेहळणीवर होते. आऊसाहेब पंत, बाजी शिवनेरीला गेले होते. रात्रीपर्यंत पुण्यात दाखल होणार होते. आणि त्या दिवशी एक विलक्षण आणि हादरवून सोडणारी घटना घडली! रांझे गावाच्या पाटलांनी एका परस्त्रीवर अत्याचार केल्याची खबर लाल महालात पोहोचली. लागलीच येसाजी निवडक मावळे घेऊन सूर्य डुबायच्या आधी पाटलांच्या मुसक्या आवळून लाल महालात दाखल झाला. गुन्हा साबित झाला आणि रागाने लालबुंद झालेल्या शिवबाराजेंकडून आदेश सुटला.

"याचे कोपरापासून हात आणि गुढग्यापासून पाय कलम करा. चौरंगा करा याचा....! आणि गाढवावरून रवानगी करा याची."

       शिवबाराजेंचा रुद्रावतार त्या दिवशी साऱ्यांनीच पाहिला. सगळ्यांची पाचावर धारणच बसली होती. राजांचा बोलणं, वागणं जेवढं मवाळ आणि गोड होतं, तेवढाच त्यांचा राग अनावर होता. शिव शंकराचे प्रतिरूपच जणू!   

~ जय शिवराय ~

क्रमश:....