Bahirji - 1 books and stories free download online pdf in Marathi

बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 1

१. झुंज

हिरव्या रंगाच्या नानाविध छटांनी नटलेल्या नी जरीचा शालू पांघरलेल्या डोंगराआडून आकाशमणी सूर्याचं तेजबिंब हळूहळू आकाशमंडलात वर चढू लागलं. सोनेरी रंगांची मुक्त उधळण करीत सूर्यकिरणे धरतीवर हात पाय पसरू लागली.  दिवस होता भाद्रपदातल्या चतुर्थीचा. शिवाय, याच शुभ मुहूर्तावर आलेला बैलपोळा. गावकऱ्यांच्या उत्साहाला एक वेगळंच उधाण आलं होतं. लोकांनी आपापली घर फुला तोरणांनी सुशोभित केली होती. गावातील घरे, मंदिरे, वाडे आणि गावचे प्रवेशद्वारही झेंडू, जास्वंद, शेवंता अशा नाना फुलांनी शृंगारली होती. कालच, गावकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी आपली दूधदुभती, वासरं, बैलं नदीच्या पाण्यात दगडा मातीने घासून पुसून स्वच्छ चकचकीत केली होती. त्यांच्या नैसर्गिक काळ्या, पांढुरक्या, तांबड्या रंगाला एक वेगळीच झळाळी आली होती. त्यांची बाकदार शिंगे नाना रंगांनी सुरेख रंगवून काढली होती. आपल्या वाडवडिलांपासून वापरत असलेल्या लाकडी / लोखंडी पेटाऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे जपून ठेवलेल्या रंगीबेरंगी नक्षीदार झुली धुवून स्वच्छ केल्या होत्या. त्या आता जनावरांच्या पाठीवर विराजमान झालेल्या होत्या. बैलांची, खोंडांची डौलदार वशिंडं , शेपट्या, पाय विविध नैसर्गिक रंगांनी रंगवलेली होती. गळ्यांत चामड्याचे पट्टे असलेल्या घुंगरा घंट्यांच्या माळा चढवल्या होत्या. त्याच बरोबर आपल्या घरच्यांनी रात्री स्वतः बनवलेल्या झेंडूच्या फुलांचे हार त्यांच्या गळ्यांत आणखीनच आकर्षक दिसत होते. सर्व जनावरांच्या कपाळावर घरच्या सुवासिनींनी भरलेल्या कुंकवा गुलालाचा रंग उठून दिसत होता. सणासुदीला आपल्या ठेवणीतली वस्त्रे नेसून पोरंबाळं घराच्या समोर शेणाने सारवलेल्या अंगणात, गोठ्यातल्या जनावरांच्या आसपास घुटमळत होती. आज गावाचं रुपडंच पाहत राहावं असं होतं.

        सूर्याच्या आगमनाबरोबरच गावाच्या मुख्य चौकात असलेल्या दगडी चौथऱ्यावर ढोल, ताशे, सनया घुमत होत्या. हळूहळू लोक आपली सजवलेली, शृंगारलेली जनावरे मुख्य चौकाकडे हाकारून आणू लागली. गर्दी दाटू लागली. ढोल ताशे एका सुरात घुमत होते. पाटलांची खिलार बैलजोडी सामोरी ठेऊन त्या मागोमाग गावकरी आपापल्या जनावरांसोबत नदीच्या दिशेने चालू लागली. वाजत गाजत वरात घाटावरच्या शंभू महादेवाच्या आणि भवानी देवीच्या मंदिरांना गूळ पोळ्यांचा नैवैद्य आणि प्रदक्षिणा घालून वेशीजवळ असलेल्या ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिराकडे हळूहळू सरकू लागली. लहान मुलं आपल्या वडीलधाऱ्यांच्या संगतीने आपल्या जनावरांची दावी धरून आनंदात रमतगमत चालली होती. घरी गेल्यावर आईने बनवलेल्या गव्हाच्या कडाकण्या कधी एकदा बैलांच्या, गाईंच्या, वासरांच्या शिंगातून काढतोय आणि खातोय! अशा आनंदी  विचारात परं टोरं चालली होती. भैरवनाथाला नैवैद्य आणि प्रदक्षिणा घालून वरात गावच्या वाटेने मार्गक्रमण करू लागली. सूर्यनारायण आता डोक्यावरून उतरणीला लागला होता.

        वस्तीच्या सुरुवातीलाच झांबरे पाटलांचा गुरांचा आणि बैलांचा मोठा गोठा होता. त्यात त्यांची खिलार जातीच्या बैलांच्या दोन जोड्या, खोंडं आणि वासरं असायची तर दुसऱ्या  बाजूला दूधदुभती जनावरं. ढोलताशांच्या आवाजात आणि देवी-देवतांच्या जयजयकारात वरात वस्तीच्या दिशेने येत होती. तोच वस्तीतून गडबड - गोंधळ आणि पळापळ चालू झाली. ढोल ताशांच्या आवाजाने पाटलांच्या दावणीचा काळा धिप्पाड खोंड दावं तोडून उधळला होता. खवळलेला मदमस्त हत्ती समोर येईल त्याला चिरडत सुटावा अशाच अविर्भावात तो वरातीच्या दिशेने येऊ लागला. समोर येईल त्याला शिंगावर घेऊन दूर भिरकावण्यासाठी वा जोरदार धडक देऊन त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवण्यासाठी तो उतावीळ झाला होता. जमिनीवर पडलेलं पावसाचं पाणी जसं क्षणभरात इतरत्र पसरतं तसं त्या खोंडाला पाहताच सगळे कुठच्या कुठं पसार झाले. लोकांनी मोठाल्या दगडांचा, झाडांचा, मंदिराचा आसरा घेतला. खोंडाला पाहताच वाजंत्री तर हातातलं ढोल ताशे केव्हाच टाकून पसार झाले होते.

        पाटलांनी त्यांची बैलजोडी गड्याला सांगून कधीच दूर नेली होती. पाटील आणि त्यांचे दोन गडीचं काय ते आता समोर उभे होते. समोर दिसेल ते ढुसण्या देत. डुरकत तो खोंड त्यांच्या दिशेने उधळत येत होता. त्याचं आक्राळविक्राळ रूप पाहताच पाटलांचे गडी लटपटायला लागले. त्यांची तर बोबडीच वळली होती.

"मालक, पळा... ", एकाने पाटलांना स्पर्श करत चुचकारलं. पण पाटील काही ऐकण्याचा मनस्थितीत नव्हते. पाटलांचा नकार मिळताच ते दोघेही मागच्या मागे पसार झाले.

    तो खोंड आता अगदी जवळ आला होता. त्याच्या तोंडातून पांढरट फेस येत होता.

"पाटील... बाजूला व्हा.. पळा....", लोक ओरडून पाटलांना सांगत होते. पण पाटील काय माघार घ्यायच्या मनःस्थितीत नव्हते. चांगलेच तयारीचे होते. अशा खोंडांना कसं वठणीवर आणायचं? हे त्यांना चांगलच माहिती होतं. त्याच्या वेसणीला एकदा का हात घातला कि काम फत्ते! पाटील सावध पावित्र्यात उभे होते. खोंड अगदी जवळ येऊन ठेपला होता. दोन हाताचं अंतर काय ते बाकी होतं. आता तो पाटलांना एक जोरदार धडक मारणार! तोच पाटील झटकन बाजूला सरकले आणि वेसणीला हात घातला. वेसण हाताला तर लागली. पण खोंडाने मानेला जोरदार हिसडा दिला आणि त्या हिसड्यासरशी पाटील एकदम बाजूला फेकले गेले. कसबसं स्वतःला सावरत पाटील उठतच होते तोच, पुन्हा एक जोरदार ढुसणी देण्यासाठी खोंड अगदी जवळ आला. त्याने बेसावध पाटलांना एक जोरदार धडक मारली. पण अचानक, पाटलांच्या डाव्या हाताला धरून कुणीतरी त्यांना खसकन बाजूला ओढलं. खोंडाची धडक चुकली. एक पंधरा सोळा वर्षांचं, साडे पाच सहा फूट उंच, सडसडीत, पण मजबूत बांध्याचं पोरं हातात जाडजूड दावं घेऊन उभं होतं. दाव्याला बांधलेल्या लाकडाच्या जडशीळ ओंडक्याजवळ तो उभा होता. वस्तीतून वरातीच्या दिशेने खोंडाला उधळत येताना त्याने आणि त्याच्या मित्रांनी पाहिलं होतं. त्यातल्या एकाने त्याच्या जनावरांची दावी सोडली. मंदिराच्या जवळ पडलेला एका लाकडी ओंडका तिघा चौघांनी उचलून आणला. तोपर्यंत एकाने त्याला घट्ट दांव बांधलं आणि दुसऱ्या बाजूला गोलाकार फास बनवला. एका काठीला डोक्याचं लाल मुंडासं बांधून त्यातला एक तरुण पोर पाटलांच्या जवळ पोहोचतो न पोहोचतो! तोच पाटलांना खोंडाचा हिसडा बसला होता. पाटलांना बाजूला करत त्याने हातातल्या काठीला बांधलेलं लाल मुंडासं हलवत खोंडाच लक्ष आपल्याकडे वळवलं. एक दोनदा त्याला चकवत वेगाने ओंडक्या जवळ आला. हातात दावं घेऊन तो आता सावध पावित्र्यात उभा होता. लोकांचा आरडा ओरडा चालूच होता. त्याने पाटलांना इशाऱ्यानेच दूर जायला सांगितलं. आता ह्या पोराचा निभाव कसा लागणार त्या खोंडासमोर! म्हणून आजूबाजूला लपलेले लोक डोळे फाड - फाडून बघत होते.

        धडक चुकल्यामुळे काही अंतर पूढे जाऊन खोंड थांबला होता. आता तो चांगलाच बिथरला. आपली गोंडेदार शेपटी ताठ उंच करत, नाकपुड्या फुस्कारु लागला. त्याचे मोठाले डोळे गोलगोल फिरत होते. खोंडामध्ये आणि त्या पोरामध्ये आता पाच दहा हातांचं अंतर होतं. खोंडाने पुढच्या उजव्या पायाच्या खुराने खरखर माती उकरली. त्याच्या दिशेने शिंग रोखून कानात वारा भरल्यासारखं तो एकदम उसळला. अगदी जवळ, हाताच्या अंतरावर येऊन ठेपला. डोकं खाली घेत, तो आता त्या पोराला शिंगावरच घेणार! तोच त्या पोराने चपळाईने स्वतःला बाजूला घेत उजव्या हाताने त्याचं शिंग पकडलं आणि जोरात हिसका दिला. क्षणात खोंडाची दिशाच बदलली. त्याचा नेम चुकला होता. एकच क्षण तो बेसावध होता. नेमकं त्याच वेळी त्या पोराने हातातलं गोलाकार दावं त्या खोंडाच्या शिंगात फेकलं आणि दुसऱ्या बाजूने जोरात हिसका दिला. त्याच्या शिंगात दाव्याचा फास अगदी घट्ट बसला. आणि त्याबरोबर दुसऱ्या बाजूला बांधलेला लाकडाचा ओंडाकाही अडकला. आता त्या ओंडक्याबरोबर खोंडाला धड चालताही येईना. खोंड फुरफुरत त्या दाव्याला बांधलेल्या ओंडक्याला हिसडे देऊन लागला. त्याचं लक्ष आता त्या ओंडक्याने वेधलं होतं. काहीच वेळात तो ओंडका नेमका त्याच्या दोन्ही पायांच्या मधोमध आला. चारी पाय उधळीत मानेला वेडेवाकडे झटके देऊ लागला. पायाच्या खुरांनी माती उकरू लागला. अर्धा एक घटका तो पायातला खोडा सोडवण्याचा प्रयत्न करत होता. पण शेवटी एकदाचा तो दमला. आणि शांत उभा राहिला. त्याच्या तोंडातून फेसाची धार लागली होती. तो एकसारखा फुसफुसत होता. सावकाश पण सावध जवळ जात त्या तरुण पोराने खोंडाच्या वेसनीचं दावं हातात घेतलं. त्याला चुचकारत थोपटू लागला. जनावर शांत झालं होतं. पाटलांचे गडी धावतच आले. त्यांनी खोंड ताब्यात घेतलं आणि गोठ्याकडे चालू लागले. धीमी पावलं टाकत पाटील त्याच्या जवळ आले. त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाले,

"शाब्बास रे बहाद्दरा...! कुणाचा तू? नाव काय तुझं?"

कमरेत किंचित झुकत तो म्हणाला, "म्या रामोश्याचा बहिर्जी... बहिर्जी जाधव."

"आरं... तूच ना त्यो. जो गावात नकला करून आणि येगयेगळी सोंग करून लोकांची करमणूक करतो."

"व्हय जी. पोटापाण्यासाठी करावं लागतंय...", बहिर्जी म्हणाला. तोच त्याचे मित्रही जवळ आले होते.

"बरं... वाड्यावर ये उद्याच्याला..."

"जी..."

        पाटील निघून गेले. गावातल्या लोकांनीही बहिर्जीची बहादुरी पाहून त्याला शाबासकी दिली. आशीर्वाद दिले. दिवस मावळतीकडे कलू लागला होता. लोकं आपापल्या घरी परतु लागली. अशा एक ना अनेक गावच्या मावळ्यांच्या बातम्या हा हा म्हणता पुण्यातल्या लाल महालात पोहोचत होत्या. शिवबाराजेंचं घोडदळ पुण्यातून मावळ खोऱ्यातल्या गावागावात अशाच सह्याद्रीच्या वाघांच्या शोधात दौडत होतं.

~ जय शिवराय ~

क्रमश:....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED