बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 9 Ishwar Trimbak Agam द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 9

९. मोहीम तोरणा 

        तोरणा! कानद खोऱ्यातील बुलंद, बळकट आणि अभेद्य असा गड! ढगांशी स्पर्धा करणारा आणि वाऱ्याशी झुंजणारा! जेवढा उंच तेवढाच रुंदही! गडाला दोन माच्या होत्या. मैल अर्धा मैलावर दोन्हीही माच्या पसरलेल्या. एक झुंजार तर दुसरी बुधला! तेलाचा बुधला उपडा करून ठेवला कि, त्याच्यासारखा दिसायचा म्हणून बुधला माची! त्यावर मध्यभागी एक डोंगराचा सुळका होता. त्याच्यावरचा प्रचंड खडक लक्ष वेधून घ्यायचा! भक्कम कातळी तट आणि खाली खोल खोल दऱ्या म्हणून दुसरी माची, झुंजार माची म्हणून ओळखली जायची!झुंजार माचीवरून गडाखाली उतरायला एक वाट होती. अतिशय भयंकर, अवघड आणि चिंचोळी! उतरताना थोडा जरी पाय घसरला, तोल गेला तर कडेलोटच! 

    बुधला माचीला लागून पश्चिम अंगाला आतकरवाडी, खोपडेवाडी, भालवाडी अश्या वाड्या, वस्त्या होत्या. पन्नास एक घरे असणाऱ्या या वाड्या! आतकारवाडीमध्ये राहणारा बाळंभट, दररोज सकाळी बुधलामाचीवरून तोरणेश्वरच्या पूजेसाठी जात असे. किल्लेदाराने त्याला गडावर प्रवेशासाठी विजापुरी मोहोर दिली होती. ती दाखवल्याशिवाय आतमध्ये येण्यास मज्जाव होता. बाळंभट्टसोबत एकदोन वेळा गडावर जाण्याची संधी बहिर्जीने साधली पण फक्त पूजा होई पर्यंतच! तेवढ्या वेळातही बहिर्जीने बरीचशी माहिती गोळा केली. बाळंभट्टकडून त्याला खूपच विलक्षण आणि कधीही ऐकिवात नसलेली माहिती मिळाली.

        'तोरणेश्वराच्या डोंगरावर अकराव्या शतकामध्ये शैव पंथातील लोकांचा समुदाय राहायचा. डोंगरावर शंभू महादेवाचे मंदिराची स्थापना करून त शिवाची उपासना करायचे. जवळच्याच ब्रह्मदेवाच्या डोंगरावर ब्रह्मदेवाचे उपासक वस्तीला होते. काळानुसार डोंगराचे नाव, ब्रह्मदेव. बृम्बदेव. मुरुंबदेव असे नाव बदलत गेले. दोन्हीही पंथ एकमेकांच्या मदतीने राहायचे. झुंजार माचीच्या खाली एक मोठा महाल होता. त्यामध्ये पाचशे लोक मावतील एवढी मोठी व्यवस्था होती. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात अल्लाउद्दीन खिलजीने दख्खन मध्ये प्रवेश केला आणि त्याचे वर्चस्व प्रस्थापी केले. त्यावेळी त्याचा सेनापती मलिक काफूर तोरणेश्वराला वेढा घालून बसला होता. एक महिना, दोन महिने, असे करत वेढा सहा महिन्यांपर्यंत चालू होता. गडावरचा  शैव पंथाचा योद्धा वीरशैव हा हिमतीचा आणि जिद्दीचा , लढाऊ बाण्याचा होता. त्याने नेटाने खिलजीने आक्रमण थोपवून ठेवले होते. दोन महिने होत आले. वेढा अजूनही चालू होता. रसद संपत आली होती. त्याने एक धाडसी निर्णय घेतला. झुंजार महालातून मुरुंबदेवाच्या डोंगरापर्यंत भुयार खोदायचं! ते हि दीड दोन कोसांचं अंतर! हा शुद्ध वेडेपणा होता. पण पर्याय नव्हता. उपाशी राहून मरण्यापेक्षा प्रयत्न करून मरणं कधीही चांगलंच! झालं! कामाला सुरुवात झाली. शेकडो हात रात्रंदिवस झटू लागले. भुयार तयार होऊ लागलं. दीड कोसांच अंतर पार केलं होतं. तोच मागे दहा पंधरा हातांच्या अंतरावर वरचा सगळा भाग कोसळला. पाच पंधरा  लोक दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडले. दोर टाकून वर जाऊन पाहिलं तर देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात निघाला. आजूबाजूला घनदाटझाडी. खिलजीच्या सैन्याच्या एक मैल दूर. आणि एक दीड मैलावर मुरुंबदेवाचा डोंगर. काम फत्ते झालं होतं. मंदिराच्या खाली तळघर बनवण्यात आलं. वीरभद्राचे साह्य घेऊन रसद तोरणेश्वरावर पोहोचू लागली. वेढा वाढू लागला. मलिक काफूर वैतागला. मुसळधार पावसाळा सुरु झाला. खिल्जीचं सैन्य वेढा उठवून निघून गेला.'

        बहिर्जी आणि त्याच्या सवंगड्यांनी आठवडाभर तोरणा - मुरुंबदेवाचा मधला दोन तीन कोसांचा परिसर धुंडाळून काढला. पण महत्त्वाचं असं काहीच हाती लागत नव्हतं. मुरुंबदेवाच्या वाटेवर उजव्या बाजूला शंभर दोनशे पावलांवर असलेल्या एका देवीच्या प्राचीन रावळात सगळे पथारी पसरून आराम करायचे. तेवढं एकच ठिकाण जरा आडवाटेला होतं. आजूबाजूला काही लहान मोठ्या टेकड्या आणि दाट झाडी! त्यामुळं लोकांची इकडं वर्दळ नसायची. मंदिरावर आणि मंदिराच्या दगडी भिंतींवर रानवेलींनी गच्च दाटी केली होती. पावसाचं पाणी साचून राहिल्यामुळे भिंतींवर, शिखरावर, खांबांवर हिरवं शेवाळ पसरलं होतं. त्यामुळे सहजसहजी कुणाचंही इकडे लक्ष जात नसे. आणि इतक्या आडवाटेला, आणि दाट झाडीमध्ये इकडेही एखादं मंदिर असू शकेल! असा कुणी विचारही केला नसेल. मुरुंबदेवाच्या दक्षिणेकडच्या बाजूची माची इथून एखाद दोन मैल अंतरावर होती.

          राजे शिवपूरच्या वाड्यातील सदरेवर दादोजी, नेताजी, तान्हाजी समवेत पुढच्या हालचालींविषयी सल्ला मसलत करत होते. बाळंभटाकडून मिळालेली आणि इतर माहिती बहिर्जीने राजांसमोर पेश केली.

"राजं... गडावं मुजकीचं शिबंदी हाय... कंदीबी हल्ला क्येला तरी चाललं...", बहिर्जीने माहिती पुरवली.

"हं... येसाजीकडूनही अशीच काहीशी माहिती मिळाली आहे."

हळूच राजांच्या जवळ कानाला लागत तो म्हणाला, "राजं... ती भुयार बी सोधून काढलंय बगा..."

"बहिर्जी सध्या त्याची काही आवश्यकता नाही. फारसा प्रतिकार न करताच गड हाती येईल. त्याबद्दल आपण मोहीम फत्ते झाल्यावरच बोलू."

दादोजी, नेतोजींनीही राजांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. बहिर्जीला सांगून राजांनी बाजी पासलकरांना बोलावून घेतले. तोरण्याचा किल्लेदार बाजी काकांना आणि दादोजींना चांगलाच परिचयाचा होता. ओळखीने जर जास्त काही न करता गड हाती लागला तर चांगलंच! राजांची विचारचक्र फिरत होती. वाड्यात पासलकर, दादोजी, नेतोजी अशी जुनी जाणती मंडळी राजांसोबत तोरण्याच्या हल्ल्याबाबत मसलती करण्यात दंग झाली. शेवटी, बेसावध तोरण्यावर अमावस्येच्या दिवशी गोंधळ घालायचं ठरलं.

        दिवस मावळतीकडे झुकू लागला. वेल्ह्यामध्ये राजांच्या पथकातील मावळे जमू लागले. मावळ्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह संचारला होता. अमावस्या दोन दिवसांवर येऊन ठेपली होती. रात्रीच्या थाळ्याला सगळे एकत्रच बसले होते. राजांनी सगळ्यांकडे एकवार कटाक्ष टाकला.

"तान्हाजी, येसाजी, जिवाजी, बहिर्जी..."

"जी राजं...", सर्वांनी हुंकार भरला.

"तुम्ही आपापली पथकं तयार ठेवा. कोणत्या बाजूने चढाई करायची ते बहिर्जी, राणोजीकडून समजून घ्या."

"जी राजं..."

"बाजीकाका, दादोजी, नेतोजी आमच्यासोबत असतील. सगळ्यांनी एक बात ध्यानी घ्या. कुणाचाही हकनाक बळी नकोय आम्हाला. शक्यतो गड लढाई न करताच आपल्या हाती लागेल. उद्या किल्लेदाराशी आम्ही यावर बोलूच. विरोध तसा होणार नाहीच! पण जर झालाच तर सावध असा!"

"जी राजं...", सर्वांनी मन डोलावल्या.

        दुसऱ्या दिवशी गडाखाली किल्लेदारास बोलावून पासलकर, दादोजी, नेतोजी यांच्यासमवेत राजे बरच वेळ बोलत बसले होते. राजांनी त्यांच्या स्वराज्याचा विचार आणि बिनतोड मसलती किल्लेदाराच्या गळी उतरवून अर्धा अधिक डाव आपल्या बाजूने फिरवला. गडावर विजापूरची एक दोन मुस्लिम पथके होती. त्यांच्याकडूनच काही विरोध होण्याची शक्यता होती. आता वाड्यावर हजारभर मावळे जमले होते.

         पुढच्या दिवशी आमावस्या होती. बेत रात्रीचाच ठरला. राजांचं पथक मिट्ट अंधार पडताच, गडावर बिनीच्या दरवाज्याच्या दिशेने चढाई करणार होतं. झुंजार माचीच्या वाटेने मारत्या, राणोजी, सुंदऱ्या यांच्या मागोमाग तान्हाजी, जिवाजी, गोदाजी यांची पथके डोंगर चढून गडावर दबा धरून बसणार होते. आतकरवाडीच्या दिशेला तोरण, हिरड्याची दाट झाडी होती. वस्तीतून चरायला येणारी जनावरं दुपारी तिथंच रवंथ करत बसायची. सकाळचं धुकं पडलं कि, सारा परिसर गुडूप होऊन जायचा. सूर्य डोक्यावर यायला लागला कि, झाडांचे शेंडे हळू हळू दिसायला लागायचे. याच मार्गाने बहिर्जीने दाखवलेल्या वाटेवरून गडाच्या पश्चिमेच्या बाजूने आतकरवाडीतून येसाजी, संभाजी कोंढाळकर बुधला माचीवरून कोकण दरवाज्यावर हल्ला करणार होते. राजांच पथक दरवाज्याजवळ पोहोचताच दरवाजा उघडला जाणार होता. शिंग तुताऱ्या वाजल्या रे वाजल्या कि, लागलीच सगळीकडून एकाच वेळी हल्ला होणार होता.

         बहिर्जी आणि बरोबरच्या पथकांनी डोंगर चढायला सुरुवात केली. बहिर्जीने सगळ्यांना पुन्हा एकदा सांगितले,

"माझ्या मागून गपगुमान यायचं. अंगाला माती फासून दबकत, लवत, गपचिप हळूहळू सरकायचं. आक्शी वांडरावाणी... कळलं का???"

"हम्म्म्म....", सगळ्यांनी हुंकार भरला.

"हर हर महादेव....", बहिर्जी हात उंचावून म्हणाला.

"हर हर महादेव.....", सगळ्यांनी त्याचे अनुकरण केले.

""श्श्श्श..................... हाळु हाळु.... चला....." राईतून वाट काढत पथक डोंगराला भिडलं. हळूहळू डोंगर चढू लागलं.

        कोकण दरवाज्यावरच्या मशाली जळत होत्या. तटबंदीला लागून असलेल्या देवड्यांमध्ये पांघरून लपेटून पहारेकरी ढाराढूर झोपले होते. तर काही बुरुजावर चिलीम फुकत गप्पागोष्टी करण्यात दंग होऊन गेले होते.

        बिनीच्या दरवाज्याकडून शिंगांचा, तुताऱ्यांचा आवाज येऊ लागला. झुंजार माचीवरून आणि बुधला माचीवरून एकाच वेळी हर हर महादेवचा गजर घुमू लागला.

          तोच बाजूच्या झुडपातून काळी कफनी घातलेला, सहा सडे सहा फूट उंच काळा धिप्पाड देहाचा. साऱ्या अंगाला काळा रंग फासलेला, एका हातात भला थोरला कोयता! डाव्या हातात केसांना धरून ठेवलेलं धडावेगळं केलेलं मुंडकं! त्यातून ओघळत असलेलं लालभडक रक्त! असा भूत पिशाच्चागत अवतार केलेला इसम मोठमोठ्याने बोंबलत, आरोळ्या ठोकत बाहेर पडला. त्याला पाहताच झोपेतून अचानक उठलेल्या पहारेकऱ्यांची तर बोबडीच वळली. ढुंगणाला पाय लावत, बोंबलत,

"शैतान आया... शैतान आया... ", म्हणत किल्लेदाराच्या वाड्याकडे धावत सुटले.

      एवढ्या मोठ्या संख्येने आलेले मावळ्यांचं मोहोळ पाहताच सगळ्या पाहरेकऱ्यांनी हत्यारे टाकून शरणागती पत्करली. काहीही विरोध न होता गड हाती आला.

        राजांनी तोरणेश्वराचे आणि मेंगाई देवीचे दर्शन घेतले. बाहेर येऊन राजांनी मोठ्याने 'हर हर महादेव' ची मोठ्याने आरोळी ठोकली. सगळ्यांनी राजांचे अनुकरण केले. बहिर्जीच्या बाजूला उभा असलेला सहा साडेसहा फूट उंच हातात कोयता आणि माणसाचं मुंडक घेऊन उभा असलेला इसम पाहताच राजे किंचित हसत म्हणाले,

'बहिर्जी... कोंढाळकर दिसत नाहीत... आणि हा वेताळ कुठून आणलात....'

संभाजी पुढे होत म्हणाला, 'आवं... राजं... म्याच कि, संभाजी....!', आजूबाजूच्यांना हसू आवरेना.

"बहिर्जी, संभाजी, कसली रे सोंगं करता...! तुम्हाला पाहून एखादा मेला नाही म्हणजे झालं....!", राजे हसून म्हणाले. सगळे हसायला लागले.

~ जय शिवराय ~

क्रमश:....