सुवर्णमती - 2

  • 7.8k
  • 4.2k

2 राजवाड्यामधे सकाळपासूनच गडबड उडाली होती. महाराज आणि राणीसरकार जातीने सर्व तयारीवर बारीक नजर ठेवून होते. दिवाणजी परत परत सर्वांना सूचना देत होते. मुदपाकखान्यात मुख्य आचारी खास मेजवानीच्या तयारीला पहाटेपासूनच लागला होता. आज त्याच्यावरच्या मोठ्या जबाबदारीची त्याला पुरेपूर कल्पना होती. आणि म्हणूनच, मुदपाकखान्यातले आपले सर्व कसब, त्याने पणाला लावायचे ठरवले होते. प्रत्येक मसाल्याचा आणि इतर पदार्थ त्याने निवडून उत्तम प्रतिचा घेतला होता. खास उत्तमोत्तम आचारी आजच्या मेजवानीसाठी निवडले होते. त्याला कोणतीच त्रुटी राहू द्यायची नव्हती. दरबार सजवण्यासाठी सुगंधी, रंगीत, लहानमोठी, सर्व प्रकारची फुले वेगवेगळ्या मळ्यातून निवडून, वेचून पाट्या भरभरून आणली जात होती. सेवक त्यांचे हार, माळा करण्यात गुंतले होते.