4 खाशा स्वाऱ्या वेशीनजीक येऊन पोहोचल्या आहेत आणि लवकरच महालापर्यंत पोहोचतील अशी दिवाणजींची वर्दी घेऊन खास दूत पोहोचला आणि एकच गडबड उडाली. महालातील सर्व दीप प्रज्वलित करून, झुंबरे वर चढवली गेली. वादक, गायक, आपापल्या नियोजित जागी स्थानापन्न झाले. दशसुवासिनी औक्षणासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ सज्ज झाल्या. मुख्य प्रवेश द्वारापासून महालापर्यंत पसरलेल्या पायघड्यांच्या बाजूने उभारलेल्या उंचवट्यांवर, सेविका, सुगंधित पुष्पांची, गुलाबजलांची पात्रे घेऊन, खाशा पाहुण्यांवर हलकेच वृष्टी करण्यासाठी जय्यत तयारीत उभ्या राहिल्या. फळे, पेय, मिष्टपदार्थांची तबके, श्वेत जाळीदार वस्त्रांनी झाकून तयार ठेवण्यात आली. विलायती पद्धतीप्रमाणे चहापानाचीही व्यवस्था चोख ठेवण्यात आली. खुद्द राजे आणि राणीसरकार मुख्य दरवाजाजवळच्या दालनात स्वागतासाठी जाऊन थांबले. सुवर्णमतीसदेखील सेविका सांगावा