आज बऱ्याच दिवसांनी मी गावाकडं आलो होतो. चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो, तशीच माझी आई दारात माझी वाटच पाहत होती. मी आलेलो दिसताच तिला अगणीत आनंद झाला. माझ्या डोक्यावरुन हात फिरवून तिनं तिच्या डोक्याला कडाकडा बोटं मोडले. मी आल्यामुळे तिला काय करु अन् काय नाही असं झालं होतं. शेवटी आईच ती, तिच्यापुढं जगातले जेवढे प्रेम तेवढे एकत्र केले तरी फिकं पडणार. आईनं माझ्यासाठी आंब्याचा रस अन् पोळया केल्या होत्या. कितीतरी दिवसानं आईच्या हातचं खायला मिळाल्यामुळं मी जेवणावर मनसोक्त ताव मारला. जेवण झाल्यानंतर आई-आबा सोबत बऱ्याच गप्पा मारल्या व नंतर अंथरुणावर अंग टाकले.