'एक मारुती भरधाव वेगात निघाली होती. मागोमाग एक काळी ह्युंदाई कार तिचा पाठलाग करत होती. पाठलाग जवळजवळ संपणारच होता एवढ्यात भरधाव वेगाने दुरून येणाऱ्या लाल-निळ्या ट्रकने मारुतीला खोल दरीत उडवून लावले. तो आपली ह्युंदाई जागीच थांबवून विद्युत वेगाने धावत सुटला, तिच्यापर्यंत पोहोचेपर्यंत फार उशीर झाला होता. कारमधून बाहेर रस्त्यावर फेकली गेलेली ती मात्र रक्ताच्या धारोळयात गतप्राण झाली होती. त्याही अवस्थेत तिला आपल्या दोन्ही हातांनी उचलून तो गदागदा हलवू लागला होता. मैथिली, मैथिली ... मैथिली डोळे उघड प्लिज.' अंगातील शर्ट पूर्णपणे घामाने भिजला होता. बाजूला असणाऱ्या फोनची रिंग वाजली आणि क्षितिज शुद्धीवर आला. तसाच फोन कानाला लावत त्याने, आजूबाजूला लक्ष दिले.