कर्ण - भाग 1

  • 12.2k
  • 7.2k

एक आज मला थोडं बोलायचं आहे! मी बोलणार म्हणून काही लोक दचकतील! म्हणतील कालवश माणसं केव्हापासून बोलायला लागली? पण केव्हा-केव्हा अशांनाही बोलावं लागतं! जेव्हा-जेव्हा हाडामांसाची जिवंत माणसं मृतांसारखी वागायला लागतात, तेव्हा-तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं. छे! मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही; कारण मला चांगलं माहीत आहे की, तसं बोलणारा मी काही कोणी मोठा तत्त्वचिंतक नाही. माझ्यापुढं जग उभं राहिलं तेच मुळी समरांगण म्हणून! आणि माझं जीवन म्हणजे तर त्या समरांगणावरचा केवळ एक बाणांचा भाता! अनेक प्रकारच्या, अनेक आकारांच्या विविध घटनांचे बाण ज्यात अगदी काठोकाठ ठासून भरले आहेत असा एक भाता!! आज मला माझ्या आयुष्‍याचा तो भाता सर्वांसमोर स्पष्ट