डिसेंबर १९४१ मध्ये अमेरिकेने अधिकृतरीत्या दुसऱ्या महायुद्धात उडी घेतली होती. पण अमेरिकेला आपले अवाढव्य लष्कर उभे करण्यासाठी आणि ते युरोपमध्ये आणण्यासाठी काही महिन्यांचा वेळ लागणार होता. तोपर्यंत युरोपच्या बर्फाळ आणि रक्ताळलेल्या भूमीवर हिटलरच्या नाझी लष्कराला एकाकी रोखण्याची संपूर्ण जबाबदारी रशियावर, म्हणजेच जोसेफ स्टालिनवर होती. मॉस्कोच्या वेशीवर थंडीने गोठलेले आणि पराभूत झालेले जर्मन लष्कर आता १९४२ च्या उन्हाळ्याची वाट पाहत होते. उन्हाळा आला आणि बर्फ वितळू लागला. हिटलरला आता समजले होते की संपूर्ण रशिया एका झटक्यात जिंकणे शक्य नाही. तसेच जर्मनीचे रणगाडे आणि विमाने चालवण्यासाठी आता हिटलरला कच्च्या तेलाची अत्यंत गरज होती. त्यामुळे हिटलरने आपला मोर्चा मॉस्कोवरून हटवून रशियाच्या दक्षिणेकडे वळवला.