Majha Agadbam books and stories free download online pdf in Marathi

माझा अगडबम..

माझा अगडबम..

काही वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या 'अगडबम' चित्रपटामधली नाजुका आठवतेय का? होय, तीच तृप्ती भोईर. या चित्रपटामधून तिनं कमालीचा अभिनय केला होता. या चित्रपटाचा सिक्वेल 'माझा अगडबम'मधून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात पुन्हा एकदा ती मुख्य भूमिका साकारातांना दिसेल. सध्याचा आघाडीचा मराठी अभिनेता सुबोध भावे, तिच्या नवऱ्याच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे.

कलावंत- तृप्ती भोईर,सुबोध भावे,उषा नाडकर्णी,जयवंत वाडकर,तानाजी गालगुंडे,डॉ. विलास उजवणे

दिग्दर्शक- तृप्ती भोईर

चित्रपटाच्या नावावरूनच कथेचा थोडा फार अंदाज लावता येतो. 'अगडबम' या चित्रपटातून धमाल उडवून दिल्यानंतर अभिनेत्री तृप्ती भोईर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'अगडबम'नंतर 'अगडबम पार्ट 2' करण्याचे आव्हान पुन्हा एकदा तृप्ती भोईरने स्वीकारले आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ह्या चित्रपटच वैशिष्ट म्हणजे, निर्माती, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री अशा तिहेरी भूमिकेतून तृप्ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विषय सुद्धा थोडा वेगळा आहे. रेसलिंगच्या रिंगमध्ये WWF चॅम्पिअन आणि नाजुका यांच्यातील दमदार सामना प्रेक्षकांना या चित्रपटात बघता येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून यातील नाजुकाचा हटके अंदाज लक्ष वेधून घेतोय. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावेने नाजुकाच्या पतीची भूमिका करत आहे आणि सुबोध भावे नेहमीच आपली छाप पडतो. त्याचबरोबर, उषा नाडकर्णी यांचीही महत्त्वाची भूमिका यात आहे. 'माझा अगडबम' या सिनेमाचा हा पोस्टर लोकांचे भरघोस मनोरंजन करण्यास यशस्वी ठरत आहे. या सिनेमाच्या पोस्टरमुळे, 'माझा अगडबम' हा सिनेमा पूर्वीपेक्षा अधिक डबल धमाका करणार असल्याचे दिसून येत आहे.

या चित्रपटातील जाडजूड नाजुका साकारण्यासाठी तृप्ती भोईरने प्रोस्थेटिक मेकअपची मदत घेतली आहे. तिच्यासाठी तृप्ती ते नाजुका हा प्रवास खूपच कठीण होता. जाडजूड दिसण्यासाठी तृप्तीने सिलिकॉनने बनवलेला वन पिस चेहरा जो खांद्यापर्यंत येत होता असा मेक अप केला होता. तश्या अवस्थेत तृप्तीने सतत 47 दिवस रोज 12 तास शूट केले आणि तिचे त्या आधी तयार होण्यासाठी 4 ते 5 तास जायचे. पण मेकअप दादा अनिल प्रेमगिरीकर आणि त्याची कन्या रेणू प्रेमगिरीकर यांच्या अतिशय कठीण आणि सुंदर प्रयत्नाने अखेर नाजुकाचा गोंडस चेहरा तृप्तीला मिळाला. हा चेहरा मिळवण्यासाठी मी 1 नाही 2 नाही तर तब्बल 10 वेळा मेकअप केला. म्हणेज 10 वेळा नाजुकाच्या चेहऱ्यासाठी परीक्षा दिली आहे. त्यानंतर नाजुकाचे हे रुप समोर आले आहे. आणि ते पाहतांना काहीतरी वेगळ पहिल्याचा आनंद मिळेल.

कधी, आपण आपल्या कल्पनेवर कधी इतके खूश असतो की ते प्रेम आपल्याला आंधळे बनवत आहे, हे आपल्याला कळत नाही. अतिलठ्ठ असलेल्या नाजुकाची ही दुसरी कथा बालसुलभ पद्धतीने आणि अर्थातच तशा सोयीने घडते. ते पाहण्यात मजा येते. आता दिवाळीची सुट्टी आहे. पूर्वीच्या मानाने लहान मुलांसाठी बालनाट्ये पुरेशा प्रमाणात प्रदर्शित होत नाहीत. त्यामुळे एकंदरीत बाल रंगभूमीवर एरव्ही शोभून दिसणारे हे बालनाट्य थिएटरमध्ये पाहण्याची सोय त्यांनी केली आहे, असेच म्हणता येईल पण चित्रपट मंजोरंजन करतो हा मुख्य भाग विसरता येणार नाही. सगळ्या गोष्टी बालरंगभूमीच्या सोयीची आहेत. अतिशयोक्ती हा विनोदाचा आत्मा आहे हे मान्य केल तर चित्रपटाचा आनंद घेता येतो! काही ठिकाणी मात्र काही गोष्टींचे भान न राहिल्यामुळे केवळ जाडजुड दिसण्याभोवती आणि त्यासंबंधी असंख्य वेळा पाहिलेल्या चित्रपटासारखा एक चित्रपट वाटू शकतो. आणि अपेक्षेनुसार घडणाऱ्या घटनाक्रमामुळे तो नाजुकाच्या वजनासारखाच हाताबाहेर गेला आहे, असही वाटू शकत.

ह्यात चित्रपटात लक्ष वेधून घेतात त्या दोन गोष्टी. एक म्हणजे कायम संतापलेली, सारख्याच पद्धतीने ओरडून बोलणारी (सुबोध भावेसह) सगळी पात्रे आणि मनात रेंगाळणारे गीतसंगीत. सिनेमाची गाणी रेहमान यांचे दीर्घकाळ सहकारी असलेल्या टी सतीश चक्रवर्ती यांनी संगीतबद्ध केलीत. आपल्या शिष्याच्या सिनेमाच्या मुझिक लाँचिंगसाठी हजेरी लावत त्यांनी सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या होत्या. सुबोध भावे ही भूमिका करीत असेल तर तो काहीही करू शकतो, यावर सगळ्यांनी विश्वास ठेवावा. एका मागे एक वेगळे विषय असलेले अव्वल चित्रपट करत सुबोध भावेची घोडदौड दिमाखात चालू आहे.

चित्रपटाची कथा-

अति सुटलेली नाजुका आपल्या पैलवान वडिलांच्या इच्छेनुसार लपून पैलवान बनते आणि जगज्जेत्त्या पैलवानाला हरवते, असा काहीसा त्याचा प्लॉट आहे. वेगळी संकल्पना विनोदी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न ह्या चित्रपटात झाला आहे. खूप वेळा जाड असल्याचा न्यूनगंड निर्माण होतो पण ह्या चित्रपटात काहीसा वेगळा विचार मांडला आहे. अतिविशाल शरीराचा उपयोग होऊन होऊन काय होईल? तेच ह्या चित्रपटात दाखवलं आहे.

नाजूका (तृप्ती भोईर) आणि रायबा (सुबोध भावे) हे सुखी जोडपे असते. नाजूकाचे वजन प्रचंड असल्याने लोक तिची चेष्टा करत असतात. पण रायबा नेहमीच तिच्या पाठिशी उभा राहात असे. तिची सासू (उषा नाडकर्णी) सोबत देखील चांगले संबंध असतात. त्यांच्या आयुष्यात सगळे काही सुरळीत सुरू असले तरी त्यांच्यात आयुष्यात एक कमतरता असते. त्यांच्या लग्नाला सहा वर्षं झाले असले तरी त्यांना मूल नसते. त्यासाठी ते एका बाबाकडे उपचार घेत असतात. त्याच दरम्यान एकदा नाजुकाचे वडील (जयवंत वाडकर) एका रेसलिंगच्या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून जातात. ते एक प्रसिद्ध कुस्तीपट्टू असतात. पण त्या रेसलिंग कार्यक्रमात विजेता ठरलेल्या रेसलरसोबत त्यांची शाब्दिक बाचाबाची होते आणि ते स्वतःच रेसलिंगच्या आखाड्यात उतरून त्याच्यासोबत रेसलिंग खेळतात. पण यात त्यांना प्रचंड दुखापत होते. नाजूकाच्या वडिलांना हरवणारा रेसलर महाराष्ट्रातील सगळ्याच रेसलरना त्याच्यासोबत रेसलिंग करण्याचे आव्हान देतो. त्यावेळी मला मुलगा असता तर त्याने या रेसलिंगमध्ये भाग घेतला असता असे नाजूकाचे वडील तिला म्हणतात. त्यानंतर तीच मुलगा बनून रेसलिंग करण्याचे ठरवते. या सगळ्या प्रकरणाचे पुढे काय होते, नाजूका रेसलिंग जिंकते का, रेसलिंग करणारा मुलगा नसून मुलगी आहे हे सगळ्यांना कळते का या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना माझा अगडबम या चित्रपटात मिळतील.

माझा अगडबम या चित्रपटाच्या कथेत अनेक उणिवा आहेत अस चित्रपट पाहिल्यावर वाटू शकत. नाजूकाचे वजन प्रचंड असून देखील ती बाथरूमच्या खिडकीतून रोज कशी बाहेर पडते? इतक वजन सांभाळत पाईपवरून खाली उतरते या गोष्टी मनाला पटत नाहीत. तसेच नाजूका रेसलिंगचे धडे गिरवायला जाते याचा चित्रपटात उल्लेख करण्यात आला आहे. तसेच तिचे गुरू देखील दाखवण्यात आलेले आहेत. पण ती रेसलिंग खेळण्यासाठी घेत असलेली मेहनत चित्रपटात एका गाण्यात वगळता दाखवण्यात आलेली नाही. जर मेहनत दाखवली असती तर कदाचित चित्रपटात अजून मजा आली असती. चित्रपटाचा पूर्वाध चांगला जमून आला आहे पण उत्तरार्धात चित्रपट रटाळ होतो. उगाच चित्रपट उगाचच ताणल्यासारखा वाटतो. चित्रपटातील अॅक्शन दृश्य देखील खरीखुरी वाटत नाहीत. चित्रपटाच्या कथेत दम नसला तरी कलाकारांनी हा चित्रपट आपल्या अभिनयाने तारला आहे. या चित्रपटात तृप्ती भोईर, सुबोध भावे, उषा नाडकर्णी, तानाजी गालगुंडे आणि कान्हा भावे यांनी खूप चांगला अभिनय केला आहे. तृप्ती आणि सुबोधची केमिस्ट्री मस्त जमून आली आहे. तसेच उषा नाडकर्णी ह्या बरीच वर्ष उत्तम काम करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याचे आपल्या मृत पतीसोबत गप्पा मारण्याचे प्रसंग नक्कीच खळखळून हसवतात. चित्रपटातील एका दृश्यात तृप्ती बाथरूममधून काहीही प्रतिसाद देत नसल्याने सुबोध बाथरूमचा दरवाजा तोडतो हा प्रसंग प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करतो.

थोडक्यात म्हणजे, अभिनय पाहायचा असेल तर हा चित्रपट नक्कीच पाहावा.

इतर रसदार पर्याय