Mulshi pattern ... books and stories free download online pdf in Marathi

मुळशी पॅटर्न...

मुळशी पॅटर्न...

दमदार संवाद, तगडी स्टार कास्ट असलेला 'मुळशी पॅटर्न' आज प्रदर्शित झाला. 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटात मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, मालविका गायकवाड, सविता मालपेकर, सुरेश विश्वकर्मा, क्षितिज दाते, सुनील अभ्यंकर,ओम भूतकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. सगळ्याच कलाकारांनी आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. सगळ्या कलाकारांचा अभिनय उत्तम झाला आहे. पुरुषोत्तम करंडक या अतिशय मानाच्या स्पर्धेत महत्वाची पुरस्कार पटकावलेल्या अनेक व्यक्ती एकाच चित्रपटात काम करतात, असा अनोखा योगायोग ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आला आहे. महाविद्यालयीन तरुणाईच्या कलाविष्कारासाठी असणारे हक्काचे व्यासपीठ म्हणजे पुरुषोत्तम करंडक. या स्पर्धेत पारितोषिक मिळणे म्हणजे कलाकाराच्या कौशल्यावर मोहोर उमटवण्यासारखे आहे. या स्पर्धेत मानाची विविध पारितोषिके मिळवलेले अनेक कलाकार ‘मुळशी पॅटर्न’च्या निमित्ताने एकत्र आले आहेत. बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लेखकासाठीचे अनंत नारायण आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचे नटश्रेष्ठ गणपतराव बोडस पारितोषिक मिळालेले आहे, अभिनेते उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, अनिरुद्ध दिंडोरकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचे नटश्रेष्ठ गणपतराव बोडस पारितोषिक मिळालेले आहे. अभिनेता ओम भूतकर, देवेंद्र गायकवाड, क्षितीज दाते, देवेंद्र सारळकर यांनी ‘नटवर्य केशवराव दाते पारितोषिक’ पटकावलेले आहे. शैलेश देशमुख यांना निर्मल पारितोषिक, स्नेहल तरडे यांना माई भिडे आणि अक्षय टंकसाळे यांना काकाजी जोगळेकर पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. पुरुषोत्तम करंडक या अतिशय मानाच्या स्पर्धेत महत्वाची पुरस्कार पटकावलेल्या अनेक व्यक्ती एकाच चित्रपटात काम करतात, असा अनोखा योगायोग ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आला आहे. ही ह्या चित्रपटाची खासियत म्हणता येईल.

खरे तर या चित्रपटाच्या कथेत काहीच नावीन्य नाही अस वाटू शकत कारण अशा प्रकारची कथा आपण बऱ्याच चित्रपटात पहिल्या आहेत. उदाहरण द्यायचं झाल तर- वास्तव, सत्या, लालबाग परळ यांसारख्या अनेक चित्रपटात अशीच कथा पाहिली आहे. पण ह्या चित्रपटचं दिग्दर्शन उत्तम आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहतांना कंटाळा येत नाही. ह्या चित्रपटात एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते एक अट्टल गुन्हेगार हा राहुलचा प्रवास दिग्दर्शकाने चित्रपटात खूप चांगल्या प्रकारे मांडला आहे. चित्रपटाच्या पहिल्या दृश्यपासून आता चित्रपटात पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहते. चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा खूप चांगल्या प्रकारे रेखाटण्यात आल्या आहेत. आणि कलाकारांच काम सुद्धा वाखाखाण्याजोग झाल आहे. त्यामुळे सगळ्याच व्यक्तिरेखा तितक्याच चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. चित्रपटांमध्ये पात्र खरी वाटण्यासाठी अनेकदा मेहनत घेतली जाते. तसेच ह्या चित्रपटात सुद्धा 'अराररा खतरनाक' ह्या गाण्यात दिसून येत. आणि हे गाण चांगलच गाजल आहे.

'मुळशी पॅटर्न'मधून लेखक, दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांनी शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नावर भाष्य करताना महानगर आणि लगतच्या गावातील गुन्हेगारीचे भीषण वास्तव मांडले आहे. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने 'कुंकू' ह्या मालिकेसाठी त्याने तब्बल एक हजार भागांचे लिखाण केले आणि ही मालिका सुपरहिट ठरली. पुढे 'पिंजरा', 'अनुपमा', 'दिल्या घरी तू सुखी रहा', 'मेंदीच्या पानावर', 'तुझं माझं जमेना', 'असं हे कन्यादान' अशा अनेक यशस्वी मालिका प्रवीणने लिहिल्या आहेत. अनेक चित्रपटातून त्याने छोट्या पण उल्लेखनीय भूमिकाही केल्या. 'चिनू' , 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'तुकाराम', 'मसाला', 'रेगे', 'कोकणस्थ' ह्या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या. मालिकेनंतर चित्रपटाच्या लेखनाचे आणि दिग्दर्शनाचे शिवधनुष्य त्याने उचलले. 'देऊळबंद' ह्या मराठी चित्रपटासाठी लेखन, दिग्दर्शन आणि आपल्या अभिनयाने त्याने मराठी चित्रपटसृष्टीला 'देऊळबंद'सारखा सुपरहिट चित्रपट दिला. 'देऊळबंद'च्या व्यतिरिक्त इतरही अनेक प्रसिद्ध चित्रपटाचे लेखण प्रवीणने केले आहे. आणि आता 'मुळशी पॅटर्न' मध्ये प्रवीण तरडेंच काम पाहण औत्स्युक्याच ठरणार आहे.

चित्रपटाची कथा-

ही कथा मुळशी तालुक्याची असली, तरी ती ‘प्रगत’ शहरांच्या बाजूला असलेल्या कोणत्याही भागाला लागू होईल. या कथेत आपली जमीन विकलेले एक शेतकरी कुटुंब आहे. सखाराम (मोहन जोशी) गावचे पाटील असतात. त्यांची खूप शेत जमीन असते, ती जमीन विकून त्यांना चांगला पैसा देखील मिळतो. पण हा पैसा ते खर्च करून टाकतात आणि सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करण्याची त्यांची वेळ येते. पण तिथे गावच्या सरपंचाकडून त्यांचा अपमान केला जातो आणि त्यांना नोकरी वरून काढून टाकण्यात येते. त्यांनतर ते मार्केट यार्डात हमालीचे काम करू लागतात. तिथे त्यांचा मुलगा राहुल (ओम भूतकर) त्यांच्या सोबत काम करत असतो. त्या मार्केटमधील एका व्यापाऱ्यासोबत त्याचा वाद होतो आणि राहुल त्या व्यापाऱ्याचा खून करतो आणि अशा प्रकारे तो गुन्हेगारी विश्वाकडे वळला जातो. तिथे त्याची भेट नान्या भाई (प्रवीण तरडे) सोबत होते. तो एक मोठा भाई असतो. त्याच्या हाताखाली काम करत राहुल देखील एक मोठा भाई बनतो. या मुलाच्या एकंदर वागण्यामुळे त्याचे नाव बकासूर पडते आणि हा बकासूर एक दिवस आपल्या भाईचाच घास घेतो. राहुल या वाईट मार्गाकडे वळल्यानंतर त्याच्या आयुष्यात पुढे काय होते. तो गुन्हेगारी विश्वातून बाहेर पडतो का या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळतील.

ओम भूतकर हा अभिनेता त्याची भूमिका जगला आहे. डोक्यात राग असलेला, साऱ्याचा दोष आपल्या वडिलांच्या निर्णयावरच मारू पाहणारा आणि वडिलांच्या ओठांवरचे हास्य हरपले आहे, याचा साक्षात्कार झाल्यानंतर खचलेला भाई तो ताकदीने रंगवतो. मोहन जोशी आपल्या उत्तम अभिनयासाठी ओळखले जातात. ते बाप उत्तम उभा करतांना ह्या चित्रपटात पाहता येणार आहे.

जंगलाचा कायदा ‘जीवो जीवस्य जीवनम’ असा चालतो. जो जास्ती शक्तिमान तो नेहमीच वरचढ ठरतो. जो दुर्बळ असतो, तो सबळाचा घास होतो आणि पुढे तो सबळही कोणाचा तरी घास होतोच कारण त्याच्यापेक्षा शक्तिमान कोणी असतोच! आपल्यापैकी कोणी असे वागू नये, साऱ्यांना जगण्याला पुरेसा वाव मिळावा, यासाठी माणसाने कायदे केले. चौकटी उभारल्या. या चौकटी, कायदे मोडून जेव्हा कोणीतरी जंगलाच्या कायद्याने वागू लागतो, तेव्हा माणसाच्या जगात जंगलाचा पॅटर्न सुरू होतो. ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट या अंतहीन आणि रक्तरंजीत पळापळीचा मागोवा घेत राहतो.

कथा साधी, सरळ माहिती असलेली असली, तरी त्याची मांडणी, संवाद आणि पटकथा या बाबतीत लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी उत्तम काम केले आहे. एखाद्याच्या डोक्यात खून चढतो म्हणजे किती, साऱ्याच गोष्टींचे टोक गाठतो म्हणजे किती, आपल्याकडे पैशाने विकत घेण्यासारखी नसणारी गोष्ट दुसऱ्याकडे असणे किती बोचते, हे दर्शविणारे हॉटेलमधील दृश्य अंगावर काटा उभा करते. चित्रपटात उत्तम संवाद ऐकायला मिळतात. ‘जमीन विकायची नसते, राखायची असते’, ‘मेल्यानंतरही मारत रहा’, ‘आपला पॅटर्नचं वेगळा आहे’ ,असे संवाद चांगलेच गाजले आहेत. चित्रपटाचे संवाद प्रेक्षकांच्या टाळ्या घेणार यात काहीच शंका नाही. पोलिसांची मानसिक अवस्था, आपली न्यायव्यवस्था, गुन्हेगारी विश्वातील टोळी युद्ध या गोष्टींवर खूप चांगल्याप्रकारे प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. थोडक्यात, गुन्हेगारी विश्वाचा आरसा दाखवणारा हा चित्रपट आहे. पण चित्रपट खूप मोठा असल्याने काहीसा कंटाळवाणा होतो. तसेच चित्रपटाचा शेवट रुचत नाही. काही गोष्टी अतिशयोक्तीच्या वाटतात. अनेक जण रस्त्यावर तलवारी घेऊन फिरतात पण त्यांना पोलीस थांबवत नाहीत अश्या काही घटनांवर विश्वास ठेवता येत नाही. चित्रपट सुरुवातीपासून प्रेक्षकांना खिळवून ठेवतो पण शेवट निराशा करू शकतो. बाकी चित्रपट उत्तम बनला आहे पण संकलन आणि थोड्या रेंगाळणाऱ्या जागा अधिक काटेकोरपणे सांभाळल्या असत्या, तर चित्रपट अधिक उत्तम झाला असता.

अभिनेता, लेखक प्रविण विठ्ठल तरडे लिखित आणि दिग्दर्शित 'मुळशी पॅटर्न' या बहुचर्चित मराठी सिनेमा आज प्रदर्शित झाला. त्याची निर्मिती अभिजित भोसले जेन्यूइन प्रोडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची आहे. .

कलावंत- मोहन जोशी,महेश मांजरेकर,प्रवीण तरडे,ओम भुतकर,क्षितिश दाते,उपेंद्र लिमये,सुरेश विश्वकर्मा

दिग्दर्शक - प्रवीण ‌‌विठ्ठल तरडे

इतर रसदार पर्याय