माझा सिंह गेला - भाग-१ Ishwar Trimbak Agam द्वारा साहसी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

माझा सिंह गेला - भाग-१

भाग 1 - गड आला पण माझा सिंह गेला

(प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.)

तानाजीच्या अन त्याच्या शूर मावळ्यांच्या रक्ताने गडाला आधीच अभिषेक झाला होता, आता त्याच मावळ्यांच्या अश्रूंच्या जलधारा मातीत मिसळून कोंढाणा कृतकृत्य पावत होता. तानाजीच्या निश्चल देह पालखीमध्ये चिरविश्रांती घेत होता. राजे आपल्या लाडक्या तानाजीच्या देहाला बिलगून धाय मोकलून रडत होते. तानाजीच्या देहाला घट्ट बिलगून हमसून हमसून रडणाऱ्या राजांना पाहून तिथं उभा असणाऱ्या एकूण एक मावळ्यांचे डोळे अश्रू धारांनी भरून वाहत होते.

'ताना sssssss
ताना sssssss
माझा ताना sssss
राजं... ह्यो असा गड घिऊन येतोस म्हणाला होता ना रे.. !
मग काय झालं.. काय झालं ताना ???
गड घ्यायची एवढी काय घाई झाली होती, की आम्ही यायची वाटही न पाहता आम्हाला एकट्याला सोडून गेलास..

आरं काय केलस रे हे तान्या..
आरं काय केलस हे..
आरं या शिवबाला राजा म्हणून डोक्यावर मिरवलत ना रे..
आता काय करू या राजेपणाचं..
कोणासाठी मिरवु हे राजेपण..
सगळेच असे एकापाठोपाठ चालला..
कसा राहू आता ...
कसा राहू...
तुमच्या शिवाय...

येश्या आरं येश्या sssss
सांग कि रं तान्याला..
आरं उठ म्हणावं त्याला..
बघ ना...
मी आलोय तान्या...
तुझा शिवबा आलाय...

तान्या ssss....
तुला सांगितलं होतं ना,
एक वेळ गड नाही आला तरी चालेल...
अन हे काय करून बसलास रे ssss...

येश्या ssss
गड आला रं पण माझा सिंह गेला...
पण माझा सिंह गेला रं ..."

राजांनी अन येसाजीने तानाजीच्या पालखीला समोरून खांदा दिला होता. तानाजीच्या आठवणीत राजे चालत होते. तानाजीसोबत घालवलेला एक न एक प्रसंग राजांच्या डोळ्या समोरून जात होता.
----------------

लाल महालाच्या वाड्यात येऊन नुकतेच पाच सहा महिने झाले होते. शिवबा अन त्याचे सवंगडी नेहमीच काहीना काही उद्योग करण्यात मश्गुल असायचे. जिजाऊ तर त्यांच्या ना ना तऱ्हेच्या उद्योगांना अन कारस्थानांना कंटाळून गेल्या होत्या. तानाजी, येसाजी, कोंडाजी, बहिर्जी, बाळाजी अन अजून चार पाच जण अशी त्यांची पंधरा सोळा वर्षे वयोगटाची टोळी असायची. काही शिवबा पेक्षा वयाने मोठे, काही लहान तर काही जण त्याच्या वयाचे होते. शिवबाने आज रायरेश्वराच्या दर्शनाला जायचा बेत ठरवला होता. आजकाल शिवबा अन त्याच्या सवंगड्यांचे रायरीच्या डोंगर माथ्यावर अन रोहिडेश्वराच्या परिसरामध्ये फिरण्याचे प्रमाण वाढले होते. जाता जाता रोहिडेश्वराचे दर्शन अन ओळखीच्या गडकऱ्यांचीही भेट होणार होती. त्यामुळे सोबत शंभर दीडशे मावळ्यांची फौज दिमतीला होती. जवळच येसाजीचा गाव होता. शंभू महादेवाचं दर्शन घेऊन आजचा मुक्काम तिकडेच करणार होते. आऊसाहेबांच्या सांगण्यावरून अगोदरच मावळ्यांचा दानागोटा तानाजीच्या गावी जाऊन पोहोचला होता. तानाजीही पुढे जाऊन सगळा बंदोबस्त करण्यात गुंतून गेला होता. बहिर्जी अन त्याचे साथीदार आजूबाजूच्या परिसरावर चाणाक्ष नजर ठेऊन होते.

दिवसाचा तिसरा प्रहार सुरु झाला होता. संध्यासमयी सूर्याच्या तांबूस सोनेरी प्रकाशाने आकाश उजळून निघाले होते. थंडगार वाऱ्याची झुळूक अचानक अंगाशी लगड करायची, तसं सरसरून अंगावर काटा यायचा. रायरेश्वराच्या मंदिराजवळचा परिसर हा तसा तीन एक कोसाच्या घेराचा, त्यामुळे फेरफटका मारायला चांगला वाव मिळायचा. जवळच असलेल्या उंच टेकडीवरून आजूबाजूचा नयनरम्य परिसर डोळ्यांचं पारणं फेडत असे. टेकडीच्या उत्तर बाजूला तुंग, तिकोना, लोहगड व विसापूर हे किल्ले दिसायचे अन नजर थोडी डावीकडे वळवली कि समोरचा केंजळगड नजरेत भरायचा. अन त्याच्या पलीकडे आदिलशाही अधिपत्त्या खाली असणारा जावळीचा प्रदेश टप्प्यात यायचा. जावळीच्या खोऱ्यात पारघाटाच्या तोंडावर अन रडतोंडी घाटाच्या नाकावर भोरप्या डोंगर एखाद्या पहारेकऱ्यासारखा भासायला. शिवबाला या डोंगराचे खास आकर्षण होते. डोंगराकडे बघत बराच वेळ विचार करत बसायचा.

शिवबा अन त्याचे सात आठ सवंगडी रायरेश्वराच्या मंदिराकडे चालू लागले होते. डोक्यावर निळ्या रंगाचा अन चंदेरी किनार असलेला जिरेटोप उठून दिसत होता. गुलाबी ओठांवर तांबूस काळ्या रंगाचं मिसरूड डोकावू पाहत होतं. कमळाच्या पाकळ्या प्रमाणे असलेले डोळे व त्यावरील रुंद कपाळावरचे रेखीव शिवगंध अन मधोमध असलेला केसरी टिळा, त्या चैतन्याने ओतप्रोत भरलेल्या चेहऱ्यावर अजूनच आकर्षक दिसत होते. शिवबा अन त्याच्या मित्रांनी शंभू महादेवाचे दर्शन घेतले अन मंदिराबाहेर असलेल्या दगडी चौथऱ्यावर जरा निवांत हवेला बसले. बराच वेळ शिवबा शांत बसला होता, काहीच बोलत नव्हता.

तेवढ्यात येसाजी म्हणाला, "राजं.... हिकडं आल्यापासनं आज जरा लईच गप झालाईसा."

शिवबा, "येसाजी, असं किती दिवस फक्त हे नावापुरतं राजेपण मिरवायचं."

बाळाजी, "का...? काय झालं राजं....?"

शिवबाने एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, "अजून कुठवर आपण आपल्याच मुलखात परक्यासारखं राहायचं. कुठे गडावर जावं म्हटलं, निसर्गरम्य ठिकाणी जायचं म्हटलं तरी गडकऱ्याची वा ठाणेदाराची परवानगी मिळेपर्यंत वाट बघत बसायची. आपलाच मुलुख, आपली माणसं अन हे परकीय लोक येऊन आपल्यावर राज्य करणार, यांचं लष्कर आपल्या रयतेचं पीकपाणी हिसकावून घेणार, मनमानी सारा वसूल करणार, दिवसाढवळ्या आय बहिणी उचलून नेणार. आता सहन नाही होत हे मित्रांनो."

येसाजी लगेच हाताची मूठ त्वेषाने उंचावत म्हणाला, "राजं.... तुम्ही फक्त हाक दया. या बारा मावळ्यातल्या घराघरातला एकूण एक माणूस हातात हत्यार घेऊन तुमच्या संगट हुभा राहायला तयार हाय."

"तुमच्या एका इशाऱ्यावर जीव द्यायला अन घ्यायला बी फूड मागं बगनार न्हाय जी.", कोंडाजीही तावानच बोलला.

"एवढ्यानं हे नाही होणार मित्रांनो. फक्त तरुण मावळ्यांना घेऊन जर आपण या जुलमी सत्ते विरोधात लढलो तर ते फक्त एक बंड होईल अन असे बंड केव्हाही मोडू शकतं. महाराज साहेबांनी सुद्धा असाच प्रयत्न केला होता. पण जर आपल्या मुलखातील वतनदार, जमीनदार, देशमुख या लोकांनी आदिलशाही वा मुघलांची चाकरी करणं सोडून एकजूट झाले तरच आपल्याला आपला अंमल, आपलं राज्य, स्वराज्य निर्माण करता येईल, साकारता येईल. जनतेला त्यांचं पीक पाणी खाता येईल. सगळीकडे शांतता अन सुबत्तता नांदू लागेल."

शिवबाचं बोलणं चालू होतं. बसलेल्या एकाएकाच्या अंगात रक्त सळसळत होतं. हातांच्या मुठी आवळल्या जात होत्या. स्फुरण चढत होतं. पुन्हा एकदा शिवबा शांत झाला अन उठत म्हणाला,

"चला खूप वेळ झाला. तानाजी, बहिर्जी वाट बघत असतील."

शिवबा अन त्याचे शंभर दीडशे मावळ्यांचा पथक मुक्कामाच्या ठिकाणी चालू लागले.
****

क्रमश:


जय जिजाऊ

जय शिवराय

जय शंभूराजे