भारतातील दीपावली - भाग २ Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भारतातील दीपावली - भाग २

भारतातील दीपावली भाग २

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतात दिवाळीच्या उत्सवाचे स्वरूप साधारणपणे सारखंच आहे.
घरं स्वच्छ झाडून, सारवून, रंगवून आणि फुलांच्या माळा, पताका, तोरणे वगैरे लावून सजवणे,
अभ्यंगस्नान करून नवीन कपडे, दागिने घालणे, नातलगांसह फराळ करणे दिव्यांची रोषणाई, लक्ष्मीपूजन, दीपदान करणे वगैरे .
याशिवाय, प्रत्येक प्रदेशाची काही पारंपारिक वैशिष्ट्ये आहेत.

गुजरातेत आश्विन वद्य द्वादशीपासून दिवाळी सुरू होते. त्या दिवसाला वाघवारान असं म्हणतात.
त्या दिवशी स्त्रिया सकाळी उठून सडासंमार्जन करून रांगोळ्या काढतात. त्यात वाघाचं चित्र हमखास असतं.
ते चित्र भाऊबीजेपर्यंत ठेवतात.
आश्विन वद्य चतुर्दशीला रूपचतुर्दशी म्हणतात. त्या दिवशी लवकर स्नान करून नवीन कपडे घातले जातात. मात्र त्या रात्री सर्वत्र भूतांचा संचार असतो अशी समजूत असल्याने लोक सामान्यपणे रात्री बाहेर पडत नाहीत.
त्या रात्रीला काळरात्र म्हणतात. अनेक लोक त्या रात्री शेंदूर व तेल लावून हनुमानाची पूजा करतात आणि नारळ फोडतात.

राजस्थानी लोक दिवाळीचा संबंध राम वनवासातून आला, या मंगल घटनेशी जोडतात.
काही ठिकाणी लंकादहनाचा देखावा उभा करतात.
मांजरीला लक्ष्मी मानून तिला नैवेद्य दाखवतात.
दिवाळीतील चतुर्दशीला रूपचौदस म्हणतात.
त्या दिवशी संध्याकाळी मुली डोक्यावर 'घुडल्या' घेऊन घरोघर फिरतात. घुडल्या म्हणजे खाली छिद्र असलेलं मडकं, व त्यात दिवा लावलेला असतो.
ते घुडलेखां नावाच्या मुसलमान सरदाराचे प्रतीक आहे.
त्या अत्याचारी सरदाराला मारवाडी वीरांनी ठार मारून अनेक मुलींची सुटका केली होती. व घुडलेखांचे शिर कापून आणून त्याला अनेक बाणांनी अनेक छिद्रे पाडली होती, अशी एक दंतकथा आहे.
मारवाडी वीरांच्या शौर्याची आठवण म्हणून ही घुडल्यांची मिरवणूक असते, असा समज आहे.
हा मुळात दीपपूजेचाच एक प्रकार आहे. नामसादृश्यामुळे घुडल्याचा संबंध घुडलेखांशी जोडला गेला असावा.

अमावास्येला लक्ष्मीपूजन फार थाटात करतात.
प्रतिपदेला खेंखरा म्हणतात.
त्या दिवशी गोवर्धनपूजा व अन्नकुट करतात.
संध्याकाळी बैलांची पूजा करतात.
महाराष्ट्रातल्या पोळ्याप्रमाणेच हा सण असतो. खेंखराच्या दुसर्‍या दिवशी घरोघरी दौतीची व लेखणीची पूजा होते.
त्याच दिवशी नवीन वर्षासाठी नवीन वह्यांत जमाखर्च मांडण्यास सुरुवात करतात.

पंजाबात लोक रामराज्याभिषेकाच्या स्मृतीप्रित्यर्थ दिवाळी साजरी करतात.
अमृतसरच्या सुवर्णमंदिराच्या स्थापनेचा दिवस म्हणूनही हा दिवस महत्त्वाचा आहे.
उत्तरांचलमधील लोक दिवाळीच्या दिवशी गायीची पूजा करतात, तर सिंधी लोक तलावाच्या काठची माती आणून चबुतरा करतात व त्यावर काटेरी वृक्षाची फांदी रोवून तिची पूजा करतात.
मग त्याच चबुतर्‍याची थोडी माती ते घरी नेतात. दुसर्‍या दिवशी त्या मातीचे सोने होते, अशी समजूत आहे.
बंगालमध्ये लक्ष्मीपूजनापेक्षा कालीपूजनाला अधिक महत्त्व मिळाले आहे. आश्विनी अमावास्येच्या रात्री बंगालात कालीची स्तोत्रे गात जागरण करतात.
या रात्रीला महानिशा असं म्हणतात.
काली हीच लक्ष्मी, सरस्वती व शक्ती होय, अशी त्यांची धारणा असते.

दक्षिण भारतात दिवाळीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी केलेले स्नान गंगास्नानाइतके पवित्र मानले जाते.
तामिळनाडूत काही लोक सूर्योदयापूर्वी दोनदा स्नान करतात.
आंध्र प्रदेशात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रेड्यांच्या टकरी लावतात.
या भागात आश्विनी अमावास्येच्या दिवशी केलेलं पितृतर्पण विशेष फलप्रद मानलं जातं.
कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून बळिराजाच्या स्मरणार्थ साजरा होतो.
त्या दिवशी बळीची प्रतिमा तयार करून गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात.
गायी-बैलांना माळा घालून सजवतात, त्यांची मिरवणूक काढतात.

केरळात ओणम् हा सण आश्विन महिन्यात बळीच्या स्मरणार्थच साजरा होतो.
महाराष्ट्रात काही ठिकाणी नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराची शेणाची आकृती करून तिच्यावर घरातील सर्व केरकचरा टाकतात व त्या ढिगावर एक पैसा ठेवतात.
नरकासुराच्या स्मरणार्थ काही ठिकाणी पायाने कारीट ठेचून त्याचा रस जिभेला लावण्याचीही पद्धत आहे. अमावास्येच्या दिवशी नवी केरसुणी विकत घेतात, तिला लक्ष्मी म्हणतात, कारण ती अलक्ष्मीला म्हणजे कचर्याला झाडून टाकण्याचे काम करते.

बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्याभोवती एकवीस दिवे मांडण्याचीही पद्धत आहे
बळिराजा देवांचा शत्रू असला तरी तो दुष्ट नव्हता.
अलोट दातृत्व आणि प्रजाहितदक्षता यांसाठी त्याची ख्याती होती. त्याचे राज्य हे सुराज्य होते.
म्हणूनच ते पुन्हा प्रस्थापित व्हावं, अशी इच्छा या पद्धतींत प्रकट झाली आहे, असं वाटतं.

खरं म्हणजे या सार्‍या परंपरांमागे खोलवर सामाजिक संदर्भ दडले आहेत.
जीवन सुखकारक व्हावं, या हेतूने निसर्गातील विविध शक्तींची पूजा सुरू झाली.
जन्म, मृत्यू या घटनांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न केला गेला, आणि निसर्गातील अतिभव्य अशा घडामोडींतील हा एक फार छोटा भाग असल्याचं मानवाला कळून चुकलं.
पहिला मर्त्य, तो यम. या यमाला दैवत्व प्राप्त झालं, आणि यमलोकी गेलेल्या आपल्या पितरांना शांती मिळावी म्हणून विविध धार्मिक प्रथा सुरू झाल्या.
या धार्मिक प्रथा पुढे व्यापक स्वरूपात पाळल्या जाऊ लागल्या. नवीन कपडे, कापणीनंतर घरात आलेले नवीन धान्य हे देवाला अर्पण केल्याशिवाय वापरू नये, असा दंडक होताच.
आश्विनात शेतकर्‍याचा हाती पैसा असतो. आपल्या पूर्वजांचं स्मरण तो यथोचित करू शकतो. गोधनाविषयी कृतज्ञता व्यक्त करायची असते. नवीन खरेदीही होते. शेतात काम करणार्‍या मजुरांनाही मालकाकडून बिदागी मिळते. अशावेळी पैसे, कपडे, धान्य, देवाला आणि पितरांना अर्पण करण्यासाठी लोप पावत चाललेल्या यज्ञविधींना नवं स्वरूप देण्यात आलं.
आणि दीपोत्सव साजरा होऊ लागला. त्यात असंख्य संदर्भ, आख्यायिका नंतर येत गेल्या. पण सुखी आयुष्य जगण्यासाठी पितरांना, निसर्गाला तुष्ट ठेवणं हा हेतू मात्र कायम राहिला.

इतर गोष्टींप्रमाणे दिवाळीचं स्वरूपही बदललं. घरात आलेल्या नवीन तांदळाचे पोहे करून देवाला नैवेद्य दाखवणं, पितरांना सुखरूप परतता यावं म्हणून घरावर आकाशकंदिल लावणं, या प्रथांचे संदर्भच बदलले. पण वात्स्यायनाच्या यक्षरात्रीइतकीच आजची दिवाळी उत्साहात साजरी केली हाते. अज्ञानाला, दु:खाला, अंधकाराला पळवून लावणारी ही दिवाळी आजही प्रत्येकाचं आयुष्य उजळवून टाकते.
अशी ही दिवाळी !!

समाप्त