नश्वर - भाग 1 Abhijeet Paithanpagare द्वारा साहसी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नश्वर - भाग 1

ती अमावस्येच्या रात्र होती,संपूर्ण प्रदेश शांत होता..मागे दिमाखात उभा असलेला सह्याद्री आज खूपच गंभीर वाटत होता. त्याच्याच पायथ्याशी वसलेली मलुकनगरी पूर्णतः निद्रा अवस्थेत होती,कधीकाळी संपूर्ण भारतवर्षात प्रसिद्ध असलेल हे शहर आता मात्र तेव्हढं संपन्न राहिलेलं नव्हतं.या शहराची विशेष ओळख असलेलं एक मंदिर मात्र दिमाखात उभं होत.हो पण मंदिर मात्र कशाचं हे मात्र देव जाणे कारण त्याच्या निर्माणापासूनच मंदिराचा गाभारा कधी उघडलाच नव्हता.
एव्हढ्या रात्री चांदणं नसताना सुद्धा 'तो' नदी पार करून मंदिराकडेच निघाला ,,मंदिराची पायरी लागताच त्याच्या चेहऱ्यावर असुरी हावभाव प्रकट झाले होते.हळूहळू तो एकेक पायरी चढत होता,13 पायऱ्या चढल्यानंतर आता मंदिराचा प्रवेशद्वार लागलं,प्रवेशद्वार म्हणाल ना तर कलेचा तो एक अतिउत्तम असा नमुना होता.फारच रेखीव नक्षीकाम त्यावर केलेलं होत,दोन सुंदर स्त्रियांचं अत्यन्त मादक अस रूप त्यावर साकारलं गेलं होतं,त्यातून गुलाबपाण्याचा सुगन्ध सुद्धा दरवळत होता कदाचित दररोज याची याप्रकारे निगा राखली जात असणार.
'त्याने' त्या नाक्षीकामाना बघण्यात जास्त वेळ न दवडता आतमधे प्रवेश केला,, आणि कलेचा खरा नमुना मात्र आता दिसला होता.एका स्त्रीचा पुतळा गाभार्याच्या एकदम पुढ्यात निर्माण केल गेलेला...त्या स्त्री चा चेहरा म्हणाल तर इतका सुंदररित्या कोरला गेला होता कि ते प्रथम बघणारा पुरता घायाळ झाला पाहिजे.पण एक जरा विचित्र होत.तो पुतळा पायापासून ते मानेपर्यंत भगव्या वस्त्राने झाकला गेलेला होता.'त्याने' पुतळ्याकडे बघून स्मित हास्य केलं आणि ते वस्त्र बाजूला करण्यासाठी हळुवार हात पुढे केला.पूर्णपणे मखमलीने बनलेल्या त्या कापडाला स्पर्श करताच मागून एक व्यक्ती ओरडली,,
"थांब,, खूप मोठं पाप करत आहेस,माहिती आहे ना त्या कोण आहेत ते?"
एक वृद्ध गृहस्थ होते ते,कदाचित तो आज येणार याची पूर्वकल्पना त्यांना असावी.
"तुम्ही आज यामध्ये नाही पडला तर बरं होईल"
"तू हे चुकीचं करतो आहेस मूर्ख माणसा.तुझ्या या कृत्याचे पाप तुझ्यासह सर्वाना फेडावे लागतील,मी जीवन्त असेपर्यंत तुला अस करता येणार नाही"
तो छद्मि हसला आणि म्हणाला,
"जर तुमची जीवन्त राहण्याची इच्छाच नाहीये तर त्याला मी काय करणार?",,एव्हढं बोलून त्याने त्याची तलवार काढली आणि त्या वृद्ध माणसावर सपासप वार केले आणि आपलं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी वळला.त्याने त्याचे हात पुतळ्याकडे वळवले आणि खसकन ते वस्त्र ओढलं,,ते वस्त्र ओढताच त्याच्या नजरेसमोर संपूर्ण पुतळा दिसत होता,,अस वाटत होत जणु जीवन्त स्त्री च समोर आहे,,विलक्षण ते सौंदर्य,, बघणाऱ्याचे डोळेच दिपून जावेत एव्हढं तेज,,पण एक विक्षिप्त गोष्ट होती ती म्हणजे तो पुतळा पूर्णतः नग्नावस्थेत होता,,कदाचित याच गोष्टीमुळे पायापासून ते मानेपर्यंत तो झाकलेला असावा.त्याने पुतळ्यावर एकवार नजर फिरवली,,आणि तलवार उचलून पुतळ्यावर वर करायला सुरुवात केली,,पण तो पुतळा तुटायच नाव घेत नव्हता,,कुठेतरी चुकून टिच पडली तर ती सुद्धा लगेच भरून निघत होती.जवळ जवळ अर्धा तास प्रयत्न करून सुद्धा यश येत नसल्याने तो पुरता गोंधळला,, तळपायाची आग मस्तकात गेली,,आणि अचानक त्याला काहीतरी आठवलं,,त्याने त्याच्या सोबत आणलेल्या पिशवीत हात घातला आणि एक वस्तू बाहेर काढली,,तेव्हढ्या अंधारात सुद्धा विलक्षण चकाकणाऱ्या त्या धातुकडे बघून तो जोरजोरात हसू लागला आणि त्या वस्तूने त्याने एकाएकी त्या पुतळ्यावर वार केला आणि चर चर आवाज करत एक भेग पडली ,, आणि ती भेग बघून तो राक्षसी हसू लागला,,नकळत त्याने मलुकनगरी साठी एका वेगळ्याच पढावाची सुरुवात केली होती
*****
(काही महिन्यानंतर)

प्रतिष्ठाण शहरात आज जल्लोषाच वातावरण होत,,आणि त्याच कारण म्हणजे आजच्याच दिवशी राज्याचे युवराज श्रवण याचा विवाह सोहळा होता.संपूर्ण नगरी सजवली गेली होती,,संपूर्ण शहरात हत्तीवरून मिठाई वाटत होते,,या शहराची जीवनदायिनी असणाऱ्या गोदावरी नदीच्या शेजारीच बांधलेल्या भव्य दिव्य राजवाड्यातच लग्न समारंभ होता.सर्वच जनता येऊन नवीन जोड्याला येऊन आशीर्वाद द्यायचे,,
खरं सांगायचं झालं तर श्री गिरीराज म्हणजेच राज्याचे महाराज हे एक शूर पण फारच दयाळू असे राजा असल्याने प्रजेच त्यांच्यावर खूप प्रेम होत .महाराजांनी सुद्धा स्वतःच्या वैयक्तिक सुखापेक्षा जनतेच्या कल्याणाखातर जास्त काम केलेलं ,,त्यांच्या असीम प्रेमामुळे जवळ जवळ शहराच्या,राज्याच्या अनेक भागांतून लोक नव्या जोड्याला आशीर्वाद देण्यासाठी आले होते.
वाड्याच्या मधोमध एक व्यासपीठ उभारलं होत आणि त्याच्यावर दोघे युवराज व युवराज्ञी उभे ठाकले,,युवराज्ञी या सामदेशातील उमराव यांच्या कन्या होत्या ,ज्याप्रमाणे युवराज्ञी च रूप भल्याभल्यांचं पारणं फेडत होत त्याचप्रमाणे तिची बुद्धिमत्ता सुद्धा तेव्हढीच कुशाग्र ,,आणि युवराजांबद्दल बोलायचं तर काहीच दिवसांपूर्वी आपल्या गुरुकुळातून विद्या अर्जित करून आले होते ते.येणारे जाणारे अतिथी युगुलाच कौतुक करत होते.व्यापारी लोक मोठमोठ्या भेटवस्तु,, तर साधु संत आशीर्वाद देऊ लागले.
"श्रवण,तुमची प्रजा तुमच्यावर जरा जास्तच प्रेम करते अस वाटतंय",,हळूच युवराज्ञी युवराजच्या कानात पुटपुटली.
"प्रेम तर करतातच,पण खरं सांगायचं झालं तर हे सगळे त्यांच्या नव्या सुनेला म्हणजे तुम्हालाच बघायला आले आहेत बरं!!,,ते तिकडे बघा तरुण मुलींचा समूह किती वेळेपासून तुमच्या अंगावरील शृंगार,कपडे याचीच चर्चा करताय,,काही वृद्ध स्त्रिया तुम्ही कशा उभ्या राहतात,,इतरांना कसा मान देतात,,कुठे चुकतात याच निरीक्षण करताय तर उरलेली जनता तुमचं सौंदर्य बघण्यात मग्न आहे,,एकंदर सांगायचं तर या व्यासपीठावर माझं अस्तित्व फक्त आशीर्वाद घेण्यापूरतच"
एव्हढं बोलून दोघेही हसायला लागले.
सगळं व्यवस्थित चालू असताना अचानक एक घोडेस्वार आला,,आणि सरळ चालून राजांकडे आला आणि जवळील पत्र त्यांच्या हातात सोपवलं आणि आल्या मार्गे पुन्हा निघून गेला.
ते पत्र वाचत असताना हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलू लागले ,
पत्रात लिहिलं होतं,,
"महाराज,काहीच महिन्यांपूर्वी मलुकनगरात झालेल्या घटनेची माहिती तर तुम्हाला दिलेलीच आहे.आणि तुमच्या आदेशावरून गोंधळ पसरू नये म्हणून ही माहिती लपवून ठेवली गेली आहे.परंतु अशुभ वार्ता येन सुरु झालं आहे,,शहरातल्या 2 लहान मुलींचा मृत्यू झाला आहे.शहरात अनेक अफवाना उधाण आलंय,,त्यात अचल ऋषींचा झालेला वध,मंदिराची वाढवलेली सुरक्षा ,,या गोष्टींमुळे लोक संशय घेत आहेत,,त्यांच्यात भीती वाढत चालली आहे.मला वाटत परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी योग्य ते पाऊले उचलावीत,,"

पूर्ण पत्र वाचून झाल्यावर त्यांनी ते पत्र हळूच त्यांच्या प्रधानांकडे दिल आणि बोलले
"प्रधानजी,,मलुक नगरात अराजकता सुरु झालीये,, त्या ऐतिहासिक मंदिरात नेमकं काय होतंय याचा छडा लावलाच पाहिजे.आपण आतापर्यंत याला अंधश्रद्धा समजत होतो पण आता त्याचे परिणाम खरंच दिसायला लागले आहेत.आज रात्रीच योग्य ती पाऊले उचलण्यासाठी बैठक घ्यायला हवी,,तुम्ही आपल्या सर्व कार्यकरिणीतल्या लोकांना संदेश पोहोचवा आणि आज रात्री बैठकीला हजर राहायला सांगा आणि हो गुप्तहेरांना अजून सावध राहायला सांगा,,मला प्रत्येक क्षणाची माहिती हवीये.आणि सामान्य जनतेला याबद्दल काही कळू नका देऊ ."
"ठीक आहे महाराज,जशी आपली आज्ञा,,मी आजच सर्वाना सूचित करतो आणि बैठकीला हजर राहायला सांगतो...पण..."
"पण काय?"
"युवराजना याबद्दल सांगू का?आजच त्यांचा विवाह सोहळा संपन्न झालाय आणि लगेचच त्यांना अशा गोष्टीत सामील करावं का?"
"लग्न झालं म्हणून काय,,देश आधी नंतर आयुष्य,,आणि त्यांनी गुरुकुलात 12 वर्ष जे ज्ञान अर्जित केलंय त्याचा फायदा कधी होणार??त्यांनाही बैठकीला हजर राहायला सांगा"
"जशी आपली आज्ञा"

बघता बघता संध्याकाळ झाली.आतापर्यंत गर्दी ने भरलेला नदीकाठचा परिसर आता एकदमच शांत झाला होता.हळूहळू सूर्य गुडूप होत चालला आणि काहीच वेळात अंधाराच साम्राज्य येणार होत.राजवाड्यातील तळमजल्यात 10-12 लोक जमले होते.बसलेल्या मंडळींमध्ये काहींना काही कुरबुर चालू होती.

"आपल्याला अस अचानक इथे का जमवलं असेल?"
"कदाचित दक्षिणेकडून पुन्हा चढाईची शक्यता तर नाही ना?,,"
"अहो पण मागच्या वेळी आपण त्यांना चांगला धडा शिकवला आहे,,शिवाय राजांचा त्यांच्यावर चांगला जरब पण बसला आहे,,आज गोष्ट जरा निराळीच वाटते"
"हो निराळी तर आहेच आणि कदाचित जरा भयावय सुद्धा,,नाहीतर आजच एव्हढा मोठा कार्यक्रम झाल्यानंतर अशी बैठक घेतली नसती,,आणि विशेष म्हणजे तिकडे सेनापतींसोबत युवराज सुद्धा बसलेलं आहेत"
"महाराज आल्यानंतरच आपल्याला कळेल कि नेमकं झालं काय आहे?"

आणि तेव्हढ्यात महाराजानी प्रधानजी सोबत प्रवेश केला.त्यांना मान देण्यासाठी सगळेच जण एकाएकी उठले.
"कृपया आपापलं स्थान ग्रहण करा,,आपण काहीच वेळात बैठक संपवण्याचा प्रयत्न करू",महाराज म्हंटले.

तेव्हढ्यात सेनापती उत्तरले,"पण इतक्या घाईघाईत बैठक घेण्याची गरज पडली म्हणजे याचा अर्थ आपले शत्रू पुन्हा हालचाली तर नाही ना करत?अस काही असेल तर आम्ही लढण्यासाठी नेहमीच तयार आहोत,,आणि यावेळी सुद्धा त्यांना पराभवाचा हिसका दाखवू"

"आम्ही तुमच्या पराक्रमाची कदर करतो सेनापतिजी पण यावेळी संकट कदाचित मानवी शत्रूंच नाहीचेय,,"
"काय?म्हणजे?याचा अर्थ कळला नाही आम्हाला"
"सगळे ऐका,,मलुका शहरातलं जे गूढ मंदिर आहे ना त्यावर कुणीतरी आक्रमण केलंय,,पण ते कुणी केलं ,,किती जणांनी केलं याबद्दल फारच कमी माहिती आहे आपल्याकडे"

"काय?"

"हो सेनापतिजी,,आणि अजून एक वाईट बातमी म्हणजे गाभार्याच्या बाहेर असणाऱ्या राणीच्या पुतळ्याला सुद्धा मधोमध एक मोठा तडा गेलाय"

ते ऐकताच सर्वांमध्ये एकाएकी शांतता पसरली.काही वेळासाठी काय बोलावे हेच कुणाला कळेना.तेव्हढ्यात सामदेशाचे सामंत म्हणजेच श्री कृष्णदेव बोलले,
"पण तो पुतळा तोडणं तर अशक्य आहे ना?अस म्हणतात की तो पुतळा पृथ्वीवरील कोणत्याच भौतिक वस्तूने तुटू शकत नाही ते!!"

"बरोबर आहे कृष्णदेव तुमचं,,चिंता याच गोष्टीची आहे,,कदाचित कोणत्या तरी असुरी शक्तीचा सामना आपल्याला करावा तर नाही लागणार ना?"

"बाबा पण या मलुकनगरीच्या मंदिराज रहस्य तरी काय आहे नेमकं?",बऱ्याच वेळेपासून शांत बसलेल्या श्रवण म्हणजेच युवराज याने प्रश्न विचारलाच.
हा प्रश्न बहुतेक तिथे बसलेल्या प्रत्येकालाच होता.कारण त्या मंदिराबद्दल माहिती नेहमीच गुपित ठेवली गेली होती.

"हो युवराज,,त्यासाठी तर मुद्दाम इथे सगळ्यांना बोलावलं आहे.प्रधानजी मला वाटत तुम्ही सगळ्यांना याबद्दल सांगावं"

प्रधानजी च्या हातात काही ताम्रपत्रे,,संदेश होते.कदाचित त्याचा संदर्भ घेऊन ते जे काही आहे ते सांगणार होते.

"मलुकनगर,सह्याद्रीच्या पायथ्याला वसलेलं आणि संपूर्ण आर्यवर्तात प्रसिद्ध अस शहर. हे शहर मुख्य व्यापारी मार्गांवर वसलेलं आहे,,पश्चिम सागरी मार्गावरून जी व्यापारी वाहतूक होते त्यासाठीचे सर्व रस्ते याच शहरातून जातात.पाठीशी सह्याद्री ,दक्षिण बाजूने वेढलेली किर्रर्र जंगलं,उत्तरेकडे मैलों मैल पसरलेली दरी ,आणि पूर्वेकडे पसरलेला सुपीक प्रदेश अशी त्याची रचना आहे.याच गोष्टीमुळे तीन बाजूनी या शहराला भक्कम संरक्षण भेटल आहे.याच गोष्टीमुळे तेव्हा ची राजधानी या शहराला केलं होतं.याच शहरात जवल जवळ 300 वर्षांपूर्वी घडलेली हि घटना,तेव्हा समृद्धीच शिखर या शहराने गाठल होत.त्यावेळी राजा मारुत यांची संपूर्ण दंडकारण्यावर एकाधिकार असायचा. जवळ जवळ संपूर्ण जगभरात त्याच्या पराक्रमाचे गोडवे गायले जायचे.ज्यप्रमाणे राजाच्या पराक्रमाची कीर्ती होती त्याचप्रमाणे त्यांची राणी सुद्धा सौंदर्या मुळे फार प्रसिद्ध होत्या.
या काळात राज्यावर बरीच आक्रमण झाली पण कुणीच इंचभर जमीन सुद्धा जिंकू शकलं नाही.अशाच आक्रमन कारणाऱ्यांपैकी एक होता रमण.रमण हा तळकोकणापासून ते पश्चिम कर्नाटक पर्यंत पसरलेल्या भागाचा शासक होता.असं म्हणतात त्याने जवळ जवळ 3 वेळा चढाई केली,पण प्रत्येकच वेळेस तो असफल राहिला.पण त्याने हार मानली नाही,, या 3 पराभवानंतर त्याने असुरी शक्तीची आराधना करणं सुरु केलं,,बरेच नरबळी दिले.एव्हढंच काय त्याने स्वतःच्या लहानग्या मुलीला सुद्धा नैवेद्य म्हणून चढवलं आणि याचच फळ म्हणून का काय त्याला महाभयानक अशा अघोरी शक्ती भेटल्या.आणि त्याने यावेळी पुन्हा चढाई केली,,सोबत होती डोळ्यांनी दिसणारी मानवी आणि न दिसणारी पण जाणवणारी अमानवीय फौज.येताना वाटेत लागणारी गावं तुडवत,अत्याचार करत शेवटी ते मलुकनगरीच्या 40 मैलांवर येऊन ठेपले.मारुत राजाने त्यांना इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला.
सोबत हजारोंच्या फौज घेऊन राजा मारुत ने रमण च्या सैन्यावर धावा बोलला.सूर्योदय होताच युद्ध सुरू झालं.खरंतर हे युद्ध सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये चालू होत.,दाट झाडी,,हिंस्र श्वापद यांनी भरलेली ती डोंगर होती.काही ठिकाणी तर दिवसा सुद्धा अंधारच होता.पण या युद्धात राजा मारुतने प्रयत्नांची पराकाष्ठा केली,,अचाट बुद्धिमत्ता आणि पराक्रम वापरून रमणी फौजेला जेरीस आणलं,जवळ जवळ दुपार पर्यंत मलुक ची फौज सहज जिंकेल अशे चिन्ह होते.आता हार निश्चित अस वाटल्याने रमणी फौजेच्या सेनापतीला माघारी फिरण्याचे आदेश दिले.जसे आदेश मिळाले तशी संपूर्ण फौज दक्षिणेकडे धावायला लागली अजाणबनाकडे.अशा ठिकाणी जिथं जंगल अधिक घनदाट होत.माघारी फिरणारे शत्रू बघून राजा मारुत ला अझूनच चेव आला,त्यानेकाही सैन्य हाताशी घेतलं,एकदाचा काय तो याचा निकाल लावावा म्हणून सैन्य घेऊन रमण ला पाकडन्यासाठी अजाणबन कडे निघाला,, जस ते जंगल सुरु झालं तसा चिक्कार अंधार सुरु झाला.असे वाटत होत जणू आताच रात्र झाली आहे,अक्षरशः मशाली पेटवून पुढे जावं लागतं होत.काही मैल पुढे गेल्यावर ते एका टेकडीवर आले,,,,टेकडीच्या पायथाशी एक नदी वाहत होती.इथून पुढचा पूर्णच प्रदेश नजरेत येत होता, अर्धा मैलावर काही हालचाल जाणवू लागली,,राजाने सर्वाना सावधानतेचा इशारा केला आणि हळूहळू सर्व जण पुढे सरकू लागले.अचानक समोरून एक सैन्याची तुकडी चाल करून येत होती,,हि तुकडी कधी आपल्या पल्ल्यात येते याचीच वाट मलुक सैनिक बघत होते,,आणि तेव्हढ्यात जशी ती तुकडी जवळ येत होती तसा हवेतला गारठा हळूहळू वाढू लागला,काहीच क्षणात हाड गोठावी एव्हढी थंडी वाढली,,सोबत असलेल्या मशाली विझून गेल्या.राजाला कळत नव्हतं नेमकं चालू काय आहे ते,,प्रत्येकच व्यक्ती इतका गोठून गेला होता की हातपाय चालवणं सुद्धा अवघड होऊन बसलं.तिकडून ती सैन्य तुकडी समोर कूच करत होती.बघता बघता ते नदीजवळ आले,,आता मात्र इथे त्यांना थांबावं लागणार होत आणि मलुक सैनिक बाणांच्या साह्याने त्यांचा फडशा पडू शकणार होते.पण एक आश्चर्य घडलं,ते सैनिक अक्षरशः नदीवरून चालत होते,,थोड्याच वेळात त्यांनी पूर्ण नदी पार केली आणि जशी नदी पार झाली तस तीच पूर्णतः बर्फात रूपांतर झालं, ते सगळं बघून मलुक फौजेच पूर्ण अवसानच गळून पडलं.त्यात थंडी एव्हढी वाढली होती की बरेच सैनिकांनी शस्त्र टाकून दिले होते.मग काय जे व्हायचं त्याच्या उलटंच झालं.त्या आलेल्या तुकडीने नुसती कापाकापी सुरु केली,,अर्ध्या प्रहरात हजारोंची फौज संपली,,आणि राजा व त्याच्या काही साथीदारांना अटक केलं गेलं. आता मात्र विनाश अटळ होता.राजाच अटक झाला म्हंटल्यावर मागे ठेवलेली सेना तरी काय लढणार ना,ते सुद्धा रमण च्या अमानवी सेनेला शरण गेले.".
प्रधानजी हि घटना सांगत असताना अचानक त्यांचं बोलणं थांबवत श्रवण म्हणाला
"प्रधानजी पण ती अमानवी शक्ती होती तरी काय?"

"त्याच नाव होता ,'कामक',नावाप्रमाणेच कामवासनेतून जन्माला आलेला दैत्य,,अस म्हणतात जेव्हा कलयुग सुरु झालं होतं तेव्हा माणसातल्या अनेक राक्षसी प्रवृत्तींनी शिखर गाठलं होत आणि त्यात कामवासना या गोष्टीने तर स्त्रियांवरील अत्याचार खूपच वाढले होते.म्हणून त्या काळातल्या जीवक ऋषींना यावर तोडगा काढावं अस वाटलं,जीवक ऋषी म्हणाल तर त्या काळचे सर्वोच आयुर्वेदाचार्य .जवळ जवळ 12 वर्ष प्रयत्न केल्यानंतर त्यांनी एक औषधी तयार केली.यासाठी त्यांनि सह्याद्री,निलगिरी,हिमालय,ब्रह्मदेश पालथं घालून वेगवेगळ्या जडीबुटी जमा केल्या.यासर्व जडीबुटी शिवाय अजून एक गोष्ट लागत होती ती म्हणजे उन्मत्त झालेल्या व्यक्तीच रक्त.हा पदार्थ बनवण्यासाठी कृष्णा नदीचा जिथून उगम होतो त्या पर्वतातून झिरपणार पाणी सर्वात अनुकूल होत म्हणूनच सह्याद्री मधे निर्माण करायच ठरवलं.परंतु प्रत्येक व्यक्तीला पुरेल एव्हढी औषधी तयार करणं हे काही साध काम नव्हतं.त्यासाठी दिवस रात्र एक केला गेला,,माणसा ऐवजी उन्मत्त झालेले हत्ती वापरले गेले,हजारो हत्ती चे प्राण गेल्यानंतर कुठे जाऊन आवश्यक प्रमाणात औषधी बनवता आली आणि त्यानंतर जीवक ऋषींच्या शिष्यानी संपूर्ण भारतात पसरून जेव्हढ्या काही नद्या अस्तित्वात आहेत त्या नद्यांमध्ये हि औषधी टाकून दिली.काही दिवसांतच त्या औषधींचा प्रभाव दिसायला सुरुवात झाली आणि बघता बघता सर्वकाही सुरळीत झालं.पण म्हणतात ना प्रत्येक गोष्टीचा फायदा आणि तोटा दोन्हीही असतात.असंच काहीसं यावेळीही झालं आणि त्यातुनच 'कामक' या असुरी शक्तीची निर्मिती झाली.पण ही शक्ती कोणत्या प्रक्रियेतून निर्माण झाली हे मात्र आपणाला माहित नाहीये.
असो पण रमण ने याच कामक ची उपासना केली ,,पण सहजा सहजी तो प्रसन्न झाला नाही,,अस म्हणतात की रमण ने आजूबाजूची जी काही राज्य जिंकली होती त्या राज्यांतील स्त्रिया कामक ला दान केल्या होत्या.कामक या स्त्रियांचा दिवसरात्र उपभोग घेत होता.वर्षभर असा स्त्रियांचा पुरवठा चालूच होता,,पण कामक हि एका प्रकारे लक्षावधी पुरुषांच्या वासनेतूनच तर बनला होता,,एव्हढ्या लवकर त्याची तहान भागण कठीण होत,,शेवटी कामक ने तर रमण कडे सरळ त्याच्या लहानग्या मुलीची मागणी केली.रमण सुद्धा सुढ भावनेत इतका वाहून गेला की त्याने कामक ची हि मागणी सुद्धा मान्य केली.रमण च्या या बलिदानामुळे तो प्रसन्न झाला आणि त्याने स्वतःच्या शक्ती त्याला दान केल्या.युद्धात मलुक सैन्यसोबत जे झालं तो त्या शक्तीचा एक छोटासा हिस्सा.

ही झाली कामक ची माहिती,,तर मी तुम्हाला युद्धाबद्दल सांगत होतो.अजाणबनमध्ये कामक ची शक्ती वापरून रमण ने राजा मारुत ला अटक केली.सोबत काही राजाचे मित्र,अधिकारी सुद्धा होते.आणि या सर्व बंदिना घेऊन त्याने थेट मलुकनगर गाठलं.पूर्ण जनतेसमोर राजाचा शिरच्छेद करून मलुक चा अधिपती होण्याची त्याची इच्छा होती.पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होत.

(क्रमश:)