Chaitra Chahul - 1 books and stories free download online pdf in Marathi

चैत्र चाहूल - भाग १

चैत्र चाहूल भाग १

मराठी महिन्यात प्रथम येणारा चैत्र हा वसंताच्या आगमनाचा महिना आहे.
ही हिंदू नववर्षाची सुरवात आहे .
आसमंत हळूहळू गरम उष्णतेने भरू लागतानाच चैत्रपालवी झाडावर झळाळू लागते.
गीतरामायणात रामाच्या जन्माच्या वर्णनाच्या वेळी (रामनवमी चैत्रात असते ) ग.दि.मा. म्हणतात, ''गंधयुक्त तरीही उष्ण वात ते किती...'' गरम असली तरी हवा गंधयुक्त म्हणजेच सुगंधित असते कारण सर्वात सुवासिक असा मोगरा याच काळात फुलतो, बहरतो.
यालाच वसंत ऋतू संबोधले जाते .
. वसंताचे वर्णन काय करावे? स्वत: भगवंताने आपला विभूतियोग सांगताना ‘गीते’त सांगितले आहे की, ‘अर्जुना! ऋतूंमध्ये मी वसंतऋतू आहे!’ तेव्हा वसंतोत्सव साजरा करणे म्हणजे भगवंताची पूजा करण्यासारखेच आहे!
वसंताची चाहूल लागताच कोकिळेचे कूजन सुरु होते .

निसर्गाने कात टाकलेली असते.
नवयौवनाचा बहर आलेला असतो.
कौमार्यावस्थेत माहेरी आलेल्या वसंतगौरी यौवनावस्था प्राप्त होताच अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सासरी जातात, याचा अर्थ काय? सृष्टीदेवता वैवाहिक स्थितीचा उपभोग घेते.
फुलांनी बहरते. फळांनी लगडून जाते .
पशुपक्षी सुखावतात.
त्यांना नवा रानमेवा मिळतो.
मातृत्व प्राप्त झाल्यावर कृतकृत्य झाल्यासारखी सुखाची साय सृष्टीवर दिसते.
या सात्त्विक प्रेमसोहळ्याचा आनंद विलक्षण आत्मबोधक असतो.
सौभाग्यालंकारांनी नटूनथटून आनंदोत्सव साजरा करताना सौभाग्यवाण देऊन इतरांनासुद्धा आपल्या सुखात सहभागी करून घ्यावे, हा मुख्य हेतू आहे
‘‘अलबेला मौसम। कहता है, ‘स्वागतम्!’।। असे स्वागत करतो वसंत ऋतू .

मोगरा, मदनबाण ,जाई जुई ,सायली या सार्या सुवासिक फुलांना बहर आल्याने वातावरण सुगंधी झालेलं असते .
पण चैत्राचं ऊन म्हणजे फक्त झळा असं नसतं.
तर त्यात चैत्राची म्हणून एक सृजनशीलता असते.
झाडांना पल्लवीत करणारी आणि फळांना गोडवा आणणारी.
चैत्राची मायाही प्रथम मोहरून आलेल्या झाडावर अलगद उतरते आणि मग ती आपणाकडे येते.
फळांच्या राजाला आंब्याला तर चैत्रच वाजत गाजत घेऊन येतो.
आंबा याच काळात मोहरतो फळतो अन् आपल्या रसाळ गोमट्या फळांनी लहान थोरांची, गरीब-श्रीमंताची रसना तृप्त करायला तयार होत असतो.
तो चैत्राची रंगत वाढवतो आणि चैत्र त्याचं कोडकौतुक करतो.

याच दिवसांत खास चैत्रातली म्हणून ओळखली जाणारी फुलं फुलून येतात.
गुलमोहराला अपूर्व ‌रक्तिमा चढतो तो आपल्या फुलांचे सडे घालू लागतो.
अगदी रस्तोरस्ती !
असाच ‘बहावा’सुद्धा आपल्या अंगावर सोनेरी दागिने लेऊन फुलून येतो आणि तो आपल्या पिवळ्याधमक
फुलांच्या राशीच्या राशी आपल्यासमोर ठेवू लागतो.
आपण त्यांना ओंजळीत घेण्यापूर्वीच चैत्रातल्या झुळका त्यांना इकडे तिकडे हेलकावे देऊ लागतात.

सगळीकडे उत्तमोत्तम गोष्टींची पखरण करणारा हा वसंत म्हणजे राजाच आहे ऋतूंचा !!
राजाच असल्याने त्याला कशाची कमतरता नसते .
सगळ अगदी व्यवस्थित, साग्रसंगीत व आपल्या उच्च अभिरुचीनुसार तो घडवतो जसे मोगर्‍याचा सुगंध, आंब्याची डाळ, पन्हे, वाळ्याचे पडदे हा सारा थाट, ही व्यवस्था याची खुणगाठ असते .
याच महिन्यात 'बालचंद्रमा व्रत' करतात म्हणजे सूर्यास्ताला अंघोळ करून आकाशातल्या चंद्राची किंवा तांदळा पासून चंद्र तयार करून त्याची पूजा करायची. (बालचंद्रमसे नम:)
प्रत्येक महिन्याच्या चंद्रदर्शना दिवशी ह्या प्रमाणे वर्षभर हे व्रत केले जाते.

गुढी पाडवा या सणाने या महिन्याची सुरुवात होते .
हिंदू पंचांगाचा आरंभ हा गुढी पाडवा घरोघरी गुढ्या उभ्या करून साजरा केला जातो .
गोडधोड नेवेद्य दाखवला जातो .
या सणाला अनेक धार्मिक संदर्भ आहेत ,साडेतीन मुहूर्तामधील हा एक आहे .

तसे चैत्राचे दिवस म्हणजे गावोगावी होणाऱ्या जत्रा-यात्रांचे दिवस.
बहुतेक साऱ्या ग्रामदैवतांच्या यात्रा चैत्रातच आपणाला गावाकडे खेचून नेतात.
कुठे गोडा नैवेद्य तर कुठे खारा.
पण एकूण गोतावळा गोळा करणं हेच या साऱ्यात चैत्राच्या साक्षीने होणारे आनंदाचं एक महोत्सवी स्वरूपाचं असं काम असतं.
कधीकाळी आपल्यासारख्या एकत्र कुटुंबात वाढणाऱ्या माणसांना वर्षभर घरगाड्यातून आणि गावगाड्यातून डोकं वर काढण्याचीही उसंत नसायची. अशा वेळेस चार दिवस जत्रेच्या निमित्ताने खिशाला परवडण्याइतपत हौसमौज करण्याची व्यवस्था होत असायची आणि त्याकरिता हे दिवस अगदी चांगले असायचे.

महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौर बसविली जाते.
देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर म्हणजे वैशाख शुक्ल तृतीया(अक्षय्य तृतीये)पर्यंत तिची पूजा केली जाते.शिवपत्नी पार्वतीची हीचीच ही गौरी रूपातील पूजा होय.

चैत्र महिन्यात मराठी स्त्रिया साजरा करीत असलेला हा एक पारंपरिक सोहळा आहे
विवाहित स्त्रिया आपापल्या घरी हा समारंभ साजरा करतात.
एका छोट्या पितळी पाळण्यामध्ये गौरीची स्थापना करतात.
तिची रोज पूजा केली जाते नेवेद्य दाखवला जातो.
या महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते अशी कल्पना आहे.
गौरीची आरती करताना 'गौरीचे माहेर'नावाचे एक गाणे म्हणतात.ही पद्धती कोकणात दिसून येते.
या निमित्ताने महिनाभर घराच्या अंगणात चैत्रांगण काढले जाते.

देवीची शस्त्रे म्हणजे शंख, चक्र, गदा, पद्म आणि तिची वाहने म्हणजे गाय, हत्ती, कासव, नाग, गरूड होत.
तिची सौभाग्याची लेणी म्हणजे फणी, करंडा, आरसा, मंगळसूत्र व सुवासिनींच्या ओटीचे ताट असून दारापुढे तुळशी वृंदावन, ॐ, स्वस्तिक, आंबा, श्रीफळ, उंबर- पिंपळ वगैरे पूजनीय वृक्ष ही हिंदू संस्कृतीची प्रतीके म्हणजेच रंगीत रांगोळी भरून काढलेले चैत्रांगण असते .

चैत्रांगणामध्ये चैत्रगौरीचा पाळणा, गणपती, समई, नाभी कमळ, कासव, शंख, सूर्य, चंद्र, गोपद्म, सर्प, त्रिशूळ, स्वस्तिक, कमळ, गदा, चक्र, इ. हिंदू धार्मिक तसेच नैसर्गिक आकृत्या काढल्या जातात.
यामध्ये प्रत्येक महिन्यात साज-या होणा-या विविध सण व व्रतांचे अंकन रांगोळीच्या माध्यमातून केले जाते. मध्यभागी झोपाळ्यात बसलेल्या देवीचे चित्र, राधाकृष्ण, तुळशी अशी चित्रे चैत्रांंगणात काढली जातात.
या मधून या सृष्टीतील प्रत्येक प्राणिमात्राचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध दर्शवला जातो
या महिनाभरातल्या कोणत्याही एका दिवशी आजूबाजूच्या स्त्रियांना हळदीकुंकवाला बोलावतात.
कैरी घालून वाटलेली हरबर्‍याची डाळ, कैरीचे पन्हे,बत्तासे, टरबूज,कलिंगड यासारखी फळे ,भिजवलेले हरभरे असा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो.
घरातील मुली व स्त्रिया त्यावेळी चैत्रगौरीपुढे शोभिवंत आरास मांडतात . हळदी कुंकवा साठी घरी आलेल्या स्त्रिया व कुमारिका यांचे पाय धुवून त्यांच्या हातावर चंदनाचा लेप लावतात.
अत्तर व सुवासिक गजरे दिले जातात .
भिजविलेले हरभरे आणि फळे यांनी त्यांची ओटी भरतात.
तसेच कैरीचे पन्हे, कैरी घालून वाटलेली हरबर्‍याची डाळ देतात.
संध्याकाळी आजूबाजूची पुरुषमंडळी बोलावून त्यानाही डाळ पन्हे हरबरा उसळ दिली जाते .
या निमित्ताने सर्वजण एकत्र येऊन गप्पा गोष्टी होतात .

चैत्रगौरी ही कर्नाटकातही मांडली जाते.
तिचे पूजन करुन सुशोभन केले जाते.स्रियांची भिजवलेल्या हरभर्‍यांनी ओटी भरतात.

राजस्थानात होळी पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी चैत्र महिना सुरु होतो.या दिवशी गणगौर बसवितात.
होळीच्या राखेचे आणि शेणाचे १६ मुटके करतात.भिंतीवर १६हळद आणि कुंकवाच्या टिकल्या काढतात.त्याखाली मुटके मांडतात.
हे मुटके हे गौरीचे प्रतीक मानतात .
गव्हाच्या ओंब्या,हळद यांनी पूजा करतात.
ज्वारीच्या कणसाला पांढरा दोरा बांधून गौरीच्या मुटक्यांजवळ ते कणीस ठेवतात.
त्याला शंकर म्हणतात.आणखी एका कणसाला केसांचा गुंता आणि लाल पिवळा धागा बांधतात.
हेही गौरीचे प्रतीक मानले जाते.
या गौरीला चुरमा आणि लिंबाच्या डहाळ्यांचा नैवेद्य दाखवतात.

भारतातील आदिवासी जमातींमधेही महिला चैत्रगौरीचे पूजन करतात.

चैत्रमासाचं आपल्या सांस्कृतिक जगण्याशी फार उत्कट नातं आहे

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED