Makar sankrant - 1 books and stories free download online pdf in Marathi

मकर संक्रांत भाग १

मकर संक्रांत भाग १

भारत हा सणवारांचा देश म्हणून ओळखला जातो.
भारतीय संस्कृतीत जवळपास दर महिन्याला एक सण असतोच.
थंडीच्या दिवसात, वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती. विशेष म्हणजे इतर सणांची तारीख ही पंचांगानुसार बदलती असते मात्र संक्रांत ही दरवर्षी १४ जानेवारी या तारखेलाच येते .
फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले.
अशी ही कथा आहे .
या तीन दिवसांच्या सणाची सौभाग्यवती महिला व नववधू आवर्जून वाट पाहत असतात.
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात.

ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी (मिश्र भाजी), ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे.
संक्रांतीनंतर ऋतूबदल होण्यास सुरुवात होते.
हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला लागते.
थंडीत बाजारात जास्त भाज्या उपलब्ध असल्याने सर्व भाज्या खाऊ शकतो. भोगीच्या दिवशी सर्व भाज्या एकत्र करुन भाजी केली जाते. तसेच बाजरी शरीर उष्ण ठेवण्यास आवश्यक असल्याने या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी खाण्याचीही पद्धत आहे.
या दिवसात शाकंबरी( बनशंकरी ) देवीचे नवरात्र असते .
ही शाक भाज्यांची देवी म्हणून ओळखली जाते .
सगळीकडे अकाल पडल्यावर या देवीने आपल्या अंगातून शाक भाज्यांची निर्मिती केली व भक्तांना वाचवले असे म्हणतात .
या देवीच्या प्रसादासाठी १०८ भाज्यांचा नैवेद्य केला जातो .
याचाच अर्थ असा की त्या वेळेस या सर्व भाज्या उपलब्ध असतात .

भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात.
घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात.
सासरी असणात्र्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात.
कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास असतो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार स्वयंपाक केला जातो . प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात.

दुसरा दिवस मकर संक्रांत

मकर संक्रांत हा महाराष्ट्रातील गृहिणीचा अगदी आवडता सण आहे. ह्या दिवशी महिला घर आवरून घरासमोर सडा घालून रांगोळी काढतात .

नवीन वस्त्र परिधान करून, दागिने, नाकात नथ घालून तयार होवून बोळक्याची (सुगड) पूजा करून आपल्या संसारासाठी सुख संपती, धन-धान्य कधी कमी पडू नये म्हणून देवाजवळ मागणे करतात.

पूजेसाठी ५ बोळकी (सुगड), १ पणती, नवा पांढरा दोरा, हळद-कुंकू, नवीन कपडा, तीळ-गुळ, ऊस, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर व ताम्हन अथवा स्टीलचे ताट, दिवा व अगरबत्ती घेतात .

पाच बोळक्यांना दोरा बांधतात , त्यांना हळद-कुंकू लावतात .
त्यामध्ये उसाचे काप, तील-गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर घालावे वरती एक पणती ठेवतात.
हे सर्व एका स्टीलच्या ताटात ठेवतात वरतून एक नवीन कापड घालून झाकून ठेवतात .
समोर निरांजन, अगरबत्ती लावतात .
ह्याचा अर्थ संसारात धनधान्य, कपडा लक्ता कशाची कमरता पडू नये व माझ्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये.
नंतर ही सुगडी अथवा बोळकी देवळात जाऊन पाच सवाष्णीना दिली जातात याला वाणवसा म्हणतात .
संक्रांती देवी ही दर वर्षी नवीन वाहना वर बसून येत असते .

संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे.
तीळ हे थंडीमध्ये शरीराला आरोग्यदायी असतात.
ह्या दिवशी महाराष्ट्रात तिळ व गुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. तिळाची चटणी, तिळाची वडी, तिळाचे लाडू, तीळ-गुळाची पोळी ह्याचा नेवेद्य बनवतात.

मकर संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेर कडून काळी चंद्रकळा, हळद-कुंकूचा कोयरी अथवा करंडा देवून तीळ-गुळ वापरून दागिने बनवून तिला परिधान करायला देतात .
जावई बापूंना चांदीची वाटी तीळ-गुळ घालून द्यायची प्रथा महाराष्ट्रात आहे.
मकरसंक्रांतीला काळे कपडे घालण्याची, एकमेकांना देण्याची देखील प्रथा आहे.
संध्याकाळी महिलांना (सुवासीनीना) घरी हळदी-कुंकूला बोलवून त्यांना हळद-कुंकू अत्तर लावून वाण म्हणून बांगड्या, नारळ, आरसा, एखादी स्टीलची वस्तू, किंवा फळ दिले जाते.
याला वाण लुटणे म्हणतात .

मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांच्या घरी जावून तिळ-गुळ देवून आपल्या मनातील क्रोध, लोभ, भांडण विसरून एकमेकांशी गोड बोलायचे व आपल्या स्नेह संबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते.
मतभेद, भांडण, वितुष्ट, द्वेष, मत्सर, अबोला दूर करून मकर संक्रांतीचा सण गोडी, प्रेम वाढवितो. स्नेहाचे नाते निर्माण करतो.
नात्यातल्या व शेजार पाजारच्या ज्येष्ठ लोकांना तिळगुळ देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो .
म्हणूनच ह्या दिवशी “तीळगुळ घ्या गोड बोला” असे म्हणतात .
तीळ आणि गुळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या मौसमात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पुर्ण करतं आणि याच मुख्य कारणामुळे मकरसंक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी.

संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरनाहाण करायची महाराष्टात पद्धत आहे.
ह्या दिवशी घरातील पाच वर्षापर्यंतच्या लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नवीन रेशमी कपडे घालून सजवतात .
संध्याकाळी आजूबाजूच्या लहान मुलांना घरी बोलवतात.
तेव्हा एका भांड्यामध्ये चुरमुरे, तील-गुळ, साखर फुटणे, बोर, चॉकलेट, मिक्स करून आपल्या बाळाच्या डोक्यावर त्याचा अभिषेक करतात.
व नंतर हे सर्व मुलामध्ये वाटले जाते .
हा लहान मुलांचा सोहळा अगदी नेत्रदीपक असतो. सर्व लहान मुले गुण्यागोविंदाने ह्या मध्ये भाग घेतात.सर्वाना खुप मजा वाटत असते .

संक्रातीच्या दुसऱ्या दिवशी कीक्रांत असते.

पौष शुक्ल ७ हा दिवस कींक्रांत म्हणजेच करिदिन असतो. ह्या दिवशी चांगले कोणते काम करीत नाहीत .

संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो.

किंक्रांतीला सामिष आहार करण्याची कोल्हापूर भागात पध्धत आहे .
हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदी कुंकू समारंभा साजरा करतात.
संक्रांतीचे हळदी कुंकू रथ सप्तमी पर्यंत करता येते.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED