भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग ५ Vinit Rajaram Dhanawade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भटकंती .... आठवणींच्या गर्द रानातली - भाग ५

" कधी कधी तर असा भास व्हायचा.... आपण कुठंतरी उंच ठिकाणी उभे आहोत... आपण म्हणजे मी एकटाच , बरं का .... समोर नजर जाईल तीत पर्यंत पसरलेलं फेसाळणाऱ्या नदीचं पात्र... उधाणलेला वारा... त्यात मुसळधार पाऊस... हे सर्व बघत असतो मी आणि एका क्षणाला मी स्वतःला झोकून देतो त्या पाण्यात... उंचावरून खाली येतं असतो मी , आजूबाजूला वरून कोसळणाऱ्या झऱ्यांचे पांढरे शुभ्र पाणी.... सोबत पाऊस तर असतोच... वाराही येतो मग साथीला.. आणि एकदम आम्ही तिघे त्या थंड पाण्यात खोल डुबकी मारतो.... हे असं व्हायचं मला... कधी कधी तर सकाळी उठलो कि डोळ्यासमोर एखादा हिरवा कंच डोंगर शोधायचो... नजरेसमोरून एखादा मोठ्ठा पक्ष्यांचा थवा जातो का त्याची वाट पाहायचो... किंवा ते शाळेत लहान मुले कशी रांग लावतात तशीच ढंगांची रांग दिसते का ते बघायचो..... नंतर कळायचे.. आपण घरात बेडवर आहोत.. तुम्हाला हे सर्व विचित्र वाटेल. म्हणजे असे काही वेगळेच भास होयाचे मला... तुला कळलं असेलच .... मी या क्षणाची किती वाट पाहिली .... आजच्या दिवसाची..." सुप्रीच्या डोळ्यात सुद्धा आभाळ भरून येतं होते. " ये वेडा बाई .... इतकं इमोशनल नाही व्हायचे... वेडी कुठली.. " आकाशने पुन्हा तिच्या डोक्यावर टपली मारली.


" किती साठवून ठेवलं होते तू .... " संजनाही डोळे पुसत म्हणाली.
" काही नाही ग ... जुने दिवस आठवले... मी जेव्हा निघालो होतो ना .... एकटाच .... तेव्हा , पहिल्यांदा निघालो तेव्हा हेच स्टेशन होते. असाच निघालो होतो.... फक्त आई आलेली निरोप देयाला ... जश्या तुम्ही दोघी आला आहात... " बोलता बोलता आकाशची ट्रेन आली.


" बघ ... वेळ कसा निघून गेला... सुप्री, बोललो ना आठवणी काढू नयेत ... हे आठवणींचे गर्द रान असते .... त्यात गेलो कि हरवून जातो आपण .... " सामान घेऊन आकाश गाडीत जाऊन बसला. खिडकीजवळच त्याची सीट होती. गाडी सुरु होईल म्हणून या दोघी बाहेरच थांबल्या. आकाश खिडकीजवळ येऊन बसला. या दोघीकडे पाहत होता.


" बरं ... १०-१५ दिवस ती स्पर्धा आहे... तेवढेच दिवस राहायचे तिथे... संपले कि लगेच घरी.... आणि मोबाईल.... त्याचा वापर बोलण्यासाठी करतात माणसं. उगाच खेळणे म्हणून दिला नाही आहे तो. त्याचा वापर कर... मी करतच राहीन फोन.... फोन उचल ... समजलं ना ... " सुप्रीच्या सूचना....


" हो हो ... माझी आई.. आहे सर्व लक्षात... विसरू नकोस हा मला... " आकाश हसला स्वतःच्या वाक्यावरच..
" हो का .... तुमचाच जय महाराष्ट्र्.... " सुप्रीच्या या वाक्यावर तिघेही हसले.


गाडी सुरु झाली हळूहळू... " काळजी घे ... फोन करत राहा.... पोहोचला कि फोन कर .... " सुप्रीचं सुरूच.... गाडीने वेग पकडला. आकाश, सुप्री डोळ्याआड होई पर्यत तिला बघत होता. निरोप घेताना सुप्री- संजना भावुक झालेल्या. गाडीने स्टेशन सोडले आणि finally, दोन वर्षांपासून कुठेतरी भावनांच्या बंधनात थांबलेला आकाशचा प्रवास सुरु झाला.


============================== ============================== =====


पूजा - कादंबरीचा ग्रुप त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. सर्वच त्या बसच्या प्रवासाने थकलेले होते. जमलेल्या ठिकाणीच कुठेतरी जवळपास आज वस्ती करून पुढे वाटचाल करावी , असं सगळयांचे ठरले. कादंबरीने कॅमेरा बाहेर काढला आणि " क्लिक क्लीक " सुरु झाले. पूजा आणि तिच्या सहकाऱ्यांनी एक छान जागा निवडली. आणि तंबू लावायला सुरुवात केली. कादंबरी आपल्याच विश्वात.... फोटो काढत. खूप वेळाने तिला आठवलं कि आपल्याला हि त्यांना मदत करायला हवी. तशी घाईघाईत मदत करायला पळाली. काही वेळातच काम झाले. मग उरलेले जेवणाची तयारी करायला लागले. जिप्सीच होते ते... मिळेल त्यात आनंद.... पण यावेळेस सर्वांनीच काही ना काही आणले होते शहरातून. तेच खाऊन सगळे आराम करू लागले. सर्वांच्या शहरातल्या गप्पा - गोष्टी सुरु झाल्या. पूजा मात्र एकटीच या सर्वांपासुन वेगळी बसली होती. कुठेतरी एकटक पाहत होती. कादंबरी येऊन बसली तिच्या शेजारी. " दमली वाटते माणसं .. " तिच्या त्या डायलॉग वर पूजाने फक्त एक छानशी smile दिली. " पू .... काय झालं .... इतकी शांत का... " ," असंच ... समोर बघ... " पूजाने कादंबरीला समोर बघायला सांगितलं.


समोर मोकळी जागा होती. तिथून खाली एक गाव दिसत होते. भर दुपारी सुद्धा तिथे सावली होती. पाऊस सुरु झालेला नसला तरी एखादा वाट विसरलेला ढग ... पाण्याचा शिडकावा करून जायचा. त्यामुळे उन्हाळ्यात रखरखीत झालेल्या जमिनीला थोडासा दिलासा मिळायचा. गवताचे कोंब वर येऊ लागले होते. त्यामुळे थोडी सुकलेली जमीन आता हळूहळू हिरवा रंग धारण करू पाहत होती. गाव सुरेखच होते, तिथे शहरीपणा रुजू होतं होता. तरी निसर्गाने आपले अस्तित्व टिकवून ठेवले होते. झाडांनाही चाहूल लागलेली पावसाची. एकंदरीत सर्वच तयार होते पावसाला.


कादंबरीने फोटो काढला. " पावसाचा गंध दाटला आहे ना अवती भवती ... आभाळात सुद्धा आहे त्याचे अस्तित्व... काही दिवसांनी स्वतःच अवतरेल... " पूजा एकटीच बडबडत होती.


" कसलं भारी बोलतेस तू... हे लिहिणार आहेस का कुठे ब्लॉग मध्ये.. " कादंबरीने विचारलं.
" नाही ग ... तो बोलायचं असं ... त्याचे शब्द आहेत हे .... मला त्याचं असं बोलणं खूप आवडायचं... जास्त कोणाशी बोलायचा नाही तो... स्वतः मधेच असायचा तो. पण असे आभाळ भरून आलं ना ... कि कवी - लेखक बनायचा. आणि असंच छान छान बडबडत राहायचा. जवळची माणसं होती त्याची... परंतु त्याचा एकच सोबती.... त्याचा कॅमेरा.. हे फोटो , कॅमेरा .... त्याच्याकडून आलं ते वेडं ... " पूजा हसत होती बोलताना. कादंबरी तर तिच्या चेहऱ्याकडेच पाहत होती.
" किती वर्ष झाली त्याला शेवटचं भेटली होतीस... " कादंबरीचा प्रश्न.
" ५ वर्ष... तू भेटलीस ना... त्याच्या थोडे आधी... म्हणजे कसं झालं माहित आहे... तो वेगळ्या वाटेने गेला. हा आपला ग्रुप आणि मी , वेगळ्या वाटेने... त्यानंतर बरोबर २ दिवसांनी तुझी भेट झाली. " पूजाने तिच्या खांद्यावर हात ठेवला.
" तुला माहित आहे .. मी किती लकी आहे ते.... " कादंबरी म्हणाली.
" का ग ... " पूजाचा प्रतिप्रश्न.
" मला ना.... life मध्ये खूप चांगली चांगली माणसं भेटली. नेहमीच .... देवाकडे न मागताच... म्हणून मी देवाकडे काहीच मागत नाही कधी... पण .... ' त्याची ' एकदा तरी पुन्हा भेट व्हावी, असं मी मागते देवाकडे ... तुझ्यासाठी.... " ,
" लाडाची बाय माझी ती .... " पूजाने तिचा गालगुच्चा घेतला. दोघीही हसू लागल्या.


============================== ============================== ====


आकाश तसाही रात्रभर झोपला नव्हता. ट्रेन मध्ये झोप लागली. ट्रेन थांबली तेव्हा जागा झाला. स्टेशन ओळखीचे. आधीही किती तरी वेळा तो निघायचा आणि इथेच उतरायचा. याच स्टेशन वरून भटकंती सुरु व्हायची. पण आता फरक होता. दोन वर्षांपासून थांबवलेलं त्याने स्वतःला. दीर्घ श्वास घेतला आकाशने. थोडंसं पुढे चालत आला. पावसाळा ऋतू सुरु व्हायला अवधी आहे अजून. त्यामुळे अजूनही काही करडा रंग डोंगरांवर रेंगाळत आहे. थोड्या दिवसांनी त्यालाही माघार घ्यावी लागेल. हिरव्या रंगाची भूल पडेल सर्वांना. आकाश आजूबाजूला निरीक्षण करत पुढे जात होता. चालता चालता एका माळरानावर पोहोचला. पुढे फक्त आणि फक्त , डोंगरांच्या रांगा दिसत होत्या. उभ्या असलेल्या जागेवरून एक वाट ती स्पर्धा होती, त्याच्या कॅम्प कडे जात होती. आणि दुसरी वाट , त्या निसर्ग सौंदर्याकडे.... आकाशने खाली वाकून त्या ओल्या मातीला हात लावला. आजचं भल्या पहाटे थोडा शिडकावा झाला असावा पावसाचा....ती ओली माती त्याने हातात उचलून घेतली आणि मन भरून मातीचा गंध मनात भरून घेतला. इतके दिवस दूर होता ना तो .. या सर्वापासून.... आणि आज समोर इतकं भरभरून निसर्ग सौंदर्य... टचकन पाणी आलं त्याच्या डोळ्यातून.... हातातली माती त्याने कपाळाला लावली. एक नजर त्याने कॅम्प कडे जाणाऱ्या वाटेकडे टाकली. छान हसू आलं त्याच्या चेहऱ्यावर. आठवणी सुद्धा दाटून आलेल्या त्याच्या. गड - किल्ले, डोंगर , कडे - कपारी... त्याचे मित्र त्याला बोलवत होते. दुसऱ्या हातात असलेला तो स्पर्धेचा कागद, त्याकडे त्याने हसून पाहिलं. आणि पुन्हा त्याच्या पाठीवरच्या सॅक मध्ये टाकला. डोळ्यात साठवलेल्या आठवणी सहित निघाला दुसऱ्या वाटेने.... त्याच्या मित्रांना भेटायला...

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

क्रमश: