sher - 4 books and stories free download online pdf in Marathi

शेर (भाग 4)

मागील भागावरून पुढे ......


" शेखर.. आता जेवायची वेळ झाली आहे... आणी इथे पुढे मस्त कबाब भेटतात..."

" हा मग ? खाऊन मग या..."

" कसे खाणार...? पैसे नकोत.. महिना अखेर आहे माहित आहे ना ?"

" च्यायला, तुला इथे घेतला ना त्याचा मला कधी कधी खूप पश्चाताप होतो. जाताना तो मास्क काढून ठेव.."
शेखर बडबडला आणी त्याने पाकिटातुन पाचशे रुपये काढून त्याला दिले...

" सारंग राव , खायची व्यवस्था झाली... "असे म्हणून विनू सारंग ला घेऊन त्या कबाब शॉप च्या दिशेने निघाला..

" बस " त्याने तिला आत बसवले..
" इस्माईल ऑफिस ला घे गाडी..."
इस्माईल में सावकाश काढत गाडी रस्त्यावरील ट्राफिक मध्ये टाकली.. शेखर मान मागे टेकून शांत बसला होता.

" तुम्ही नाही मास्क काढत.. " तिने त्याची तंद्री भंग करत विचारले...

" हं... " त्याने पण मास्क काढला.. ती काळजीपूर्वक त्याचा चेहरा बघत होती. शेखर ला तिने घरी बघितले होते म्हणून तिला धक्का वैगरे बसला नाही. पण आपला अंदाज बरोबर असल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

थोड्या वेळात ते पंचरत्न च्या आलिशान पार्किंग लॉट मध्ये आले.

त्याच्या मागे ती पण कार मधून खाली उतरली. वॉचमन ने त्याला बघून कडक सॅल्यूट मारला... तिकडे दुर्लक्ष करत तो आत निघाला. सुजाता ती आलिशान , सुंदर बिल्डिंग बघत होती.

" कितव्या माळ्यावर तुमचे ऑफिस आहे सर..."

" ही पूर्ण बिल्डिंग आमच्या मालकीची आहे.. माझ्या दोन केबिन आहेत एक वर पाचव्या माळ्यावर आणी एक अंडर ग्राउंड... " तो म्हणाला...

तिला घेऊन त्याने आपली अंडर ग्राउंड केबिन गाठली... आता ती शेर च्या गुहेत होती... पण ही गोष्ट तिला माहित नव्हती...

" बस... काही थंडा...?"

" चालेल..."

त्याने सदाला.. थंडा आणायला सांगितला...

" हे माझे ऑफिस... माझी कंपनी हिऱ्याच्या व्यापारात काम करते म्हणून ह्या बिल्डिंग चे नाव पंचरत्न...
वरच्या पाचही माळ्यावर सगळा स्टाफ हा पंचरत्न चा आहे..."

" आणी खाली ?"

" सांगतो.. पाहिले थंडा पी..." त्याने समोर ठेवलेल्या थंड्याकडे इशारा केला..

" तर ... तु आता कुठे बसली आहेस ह्याचा तुला काही अंदाज..?"

" हो .. हे तुमचे पंचरत्न चे ऑफिस आहे. हिऱ्याचा व्यापार आहे. आताच तर सांगितलेत तुम्ही...."

" हे वरवर झाले.... तु कधी शेर हे नाव ऐकले आहेस ?"

ते नाव ऐकताच ती दचकली. तिला त्या बद्दल ऐकून माहिती होती. तिने मान डोलावली.

" आता तु शेर च्या गुहेत... शेर चा प्रमुख शेखर रत्नपारखी ह्याच्या समोर बसली आहेस.. " तो शांत आवाजात म्हणाला. त्याची थंडगार नजर जणू तिच्या अंतरमनाचा ठाव घेत होती . जास्त वेळ त्याच्या नजरेला नजर देणे तिला शक्यच झाले नाही . तिने भीतीने एक आवंढा गिळला.. कपाळावर ac मध्ये पण घाम दाटून आला...

" घाबरू नकोस..." तिची ती अवस्था बघता त्याने तिला आश्वस्थ केले..

" आता तुला कळले कि शेर ला कोणी कधी कां बघू शकले नाही... कारण आम्ही कधीही आमची ओळख ठेवत नाही. आम्हाला बघणारा जगात जिवंत रहात नाही... तु एकच आहेस कि जिला ह्या बद्दल सगळे माहित झाले आहे."

" नाही मी कोणाला काहीही सांगणार नाही.. " आता ती घाबरली होती. तिने शेरच्या निर्दयतेचे खुप किस्से ऐकले होते...

" घाबरू नकोस... आम्ही कधीही कोणा नीरअपराध्याला मारले नाही.. त्यामुळे तुला पण अजिबात धोका नाही...
खरं म्हणजे मी तुमच्या घरीच यायला नको होते. पण सुकन्या मला आवडायला लागली आणी म्हणून मी तुमच्या घरी आलो.. आणी तिथूनच हा गोंधळ चालू झाला.."

" तुम्ही दीदीवर प्रेम करता ?"

" होय... पण तु आताच तिला ही गोष्ट सांगू नकोस..."

" बहुतेक ती पण तुमच्या प्रेमात पडली आहे..."

" काय सांगते..?"

" हो... मला असे जाणवत आहे... तुम्ही पटकन तिला विचारून टाका..."

" लगेच नको... मला तिला सगळे सांगावे लागेल... तिचे मत काय ते बघावे लागेल.. कारण आम्ही जे करतो ते जरी किती माणुसकीचे असले तरी शेवटी ते बेकायदेशीरच आहे.. अश्या गोष्टी तिला न सांगता तिला फसवणे मला शक्य होणार नाही..."
तिला तर मी जॉब पण ऑफर केला होता. पण आई नाही म्हणेल म्हणून तिने तो नाकारला...

" एक काम करा... तुम्ही तिला इथे बोलावून घ्या... हे सगळे बघून ती कदाचित तयार होईल..."
त्याला पण ते पटले.. त्याने सुकन्या ला फोन लावला आणी दुसऱ्याच रिंग कां कॉल उचलला गेला...

" हॅलो..."

" हा सुकन्या... अग सुजाता आलीय इथे ऑफिस ला..."

" ती तिथे काय करतेय...?"

" तूच येऊन बघ ना... बोलायचे आहे कां तिच्याशी...?"

" हो दया..."

" बोल दीदी मुझे बचाओ..." हसत शेखर ने मोबाइक सुजाता कडे दिला...

" काय ग.... तु कॉलेज ला गेली होतीस ना ?"

" दीदी तु इकडे ये मग तुला सगळे सांगते ... तुझ्यासाठी गंम्मत आहे..." सुजाता म्हणाली...

" बरं मी येते.. " सुजातानी परत शेखर कडे फोन दिला.

" एक काम कर त्या दिवशी मला कुठे सोडलेस तिथे ये मी गाडी पाठवतो.."

" त्याची गरज नाही.. मी येईन बस नी ...."

" अग आम्हाला खुप भूक लागली आहे. लवकर आलीस तर जेवायला होईल म्हणून..."

" बरं ठीक आहे..."

त्याने कॉल कट केला आणी इंटरकॉम वरून इस्माईल ला बोलावले..

" इस्माईल , जेवलास कां ?"

" हो सर जेवलो..."

"'बरं एक काम कर परवा मला सोडले होतेस बघ.. रविवारी... तिथे जा आणी एक मॅडम आहेत त्यांना इथे घेऊन ये..."

" बरं.. पण मी त्यांना ओळखणार कसे ?"

" अरे हो रे... सुजाता तुझ्या कडे सुकन्याचा फोटो आहे कां ?"

" आहे.."

" मग ह्याच्या नंबर वर पाठव... हा तिला घेऊन येईल..."

तिने फोटो पाठवतात इस्माईल निघून गेला.
अर्ध्या तासात इस्माईल सुकन्या ला घेऊन आला..

" तु इथे काय करतेस ?" आल्या आल्या सुकन्या ने विचारले.

" अग आधी जरा बसून तरी घे... काही खाऊन घे... मग काय ते विचार... सदा... जेवण लावायला घे..". शेखर म्हणाला..

सदा ने पटकन जेवण लावले... तिघे गप्पा मारत जेवत होते. आणी विनू आत आला..

" तरी म्हणले कि आम्हाला सोडून आज एकटाच कसा जेवतो आहे... आज काय दोन घास सरस जातील.." विनू नेहमी प्रमाणे म्हणाला.. पण त्याचा विनोदी स्वभाव सुकन्याला माहित नसल्याने तिने एक जळजळीत कटाक्ष त्याच्या कडे टाकला.. तसा तो गडबडला...

" तुमचे चालू दया... मी पण जेऊन आलो... " असे म्हणून विनू पटकन बाहेर सटकला...

" त्याच्या बोलण्याचे मनावर घेऊ नको तो असाच आहे... पण मनाने खुप चांगला आहे.. " सुजाता पण खुद्कन हसली..

जेवणे झाल्यावर त्याने दोघीना सगळे ऑफिस दाखवले. पंचरत्न चा सगळा डोलारा इथेच एकवटला होता. शेर सोडून त्याने तिला सगळी माहिती दिली. बाबा बरोबर भेट घालून दिली... बाबानां पण सुकन्या खुप आवडली हे त्यांच्या नजरेतून कळून येत होते..

" तुला इथेच जॉब ऑफर केला होता... राहायला आपल्या कंपनीचे क्वाटर आहेत... तुम्हाला दाखवतो.." म्हणून शेखर ने सदा ला पाठवून परेश भाई कडून चावी मागवली...

" चला .." त्याने दोघीना कार कडे नेले. इस्माईल त्यांना बघून पुढे आला... शेखर ने त्याला हातांनीच नको म्हणूंन इशारा केला.. आणी त्याच्या जवळून चावी घेऊन तो दोघीना घेऊन निघाला.. तसे जवळच होते क्वाटर... चालत गेले तर फार तर दहा मिनिटे.. मग कार ने कितीसा वेळ लागणार..

" या..." त्यांना घेऊन तो पहिल्या माळ्यावर आला.. ही पाच माळ्याची मोठी बिल्डिंग होती.. प्रत्येक माळ्यावर सहा फ्लॅट होते. सगळी माणसे पंचरत्न चे एम्प्लॉईज होते.

फ्लॅट नंबर पाच... त्याने नंबर बघितला...
त्याने कुलुपात चावी घातली पण कुलूप उघडायला तयार नव्हते.चावी त्या कुलुपाची नव्हती हे अनुभवी शेखर ला कळायला वेळ लागला नाही.

त्याने परेश भाई ला फोन केला..

" परेश भाई चावी चुकीची दिली आहे...."

" अरे सॉरी.... शेखर भाई.. मी लगेच कोणाबरोबर तरी पाठवतो..."

" ओके..." शेखर म्हणाला पण असे किती वेळ उभे राहणार म्हणून त्याने इकडे तिकडे बघितले आणी....

" तुझ्या कडे पिन आहे कां.. केसाचा?"

" आहे ना... कां ?"

" दे तर खरं...." तिच्या कडून पिन घेऊन त्याने क्षणात कुलूप उघडले. ते बघून दोघी चकित झाल्या...

" असे बघू नका... अजून खुप कला आहेत माझ्यात..." तो मंद हसत म्हणाला..

" चला या आत...." त्यांना घेऊन तो त्या फ्लॅट मध्ये शिरला..

तो चांगला ऐसपैस फ्लॅट होता.. आत सगळ्या सोयी होत्या.. ac , tv , डब्बल बेड , फ्रिज सगळे आधीच होते.

" हा तुमचा फ्लॅट... जर तुम्ही पंचरत्न जॉईन केले तर..." तो म्हणाला... दोघी सगळा फ्लॅट फिरून बघत होत्या. सुजाता तर खूप खुश होती. पण सुकन्या ला जरा दडपण आले होते...

तो पर्यंत परेश भाई चा माणूस चावी घेऊन आला. आणी दरवाजा उघडून हे लोक आत बसलेले पाहून तो गोधळला. तो एकदा आपल्या हातातील चावी कडे आणी एकदा त्यांच्या कडे बघत होता. त्याची ती अवस्था बघता तिघांना खूप हसायला येत होते. त्याच्या कडून चावी घेऊन शेखर ने त्याला परत पाठवले..

" ही चावी तुझ्याकडेच राहू दे... हवं तर आईला फ्लॅट दाखव..."

" नको... नको... कशाला ?"

" असू दे... जर आई नाही म्हणाली तर परत देऊन टाक.."
त्याच्या अश्या बोलण्याने तिचा नाईलाज झाला. थोडा वेळ गप्पा मारून तिघे परत निघाले. त्या दोघीना घरी सोडून शेखर परत ऑफिस ला आला. सुजाताला त्याने रात्री एकांतात सुकन्या ला सगळे सांगायला सांगितले. त्या नंतर तिला निर्णय घ्यायचा होता.

दोन दिवस उलटून गेले. ह्या दोन दिवसात शेर ने पास्कल चे सगळे अड्डे उध्वस्थ केले. त्याच्या सगळ्या माणसांना टिपून टिपून मारण्यात आले. आत एक तर त्याची माणसे गायब तरी होती नाहीतर हॉस्पिटल मध्ये तरी होती पण आता त्याचा एकही माणूस कामाच्या लायक राहिला नव्हता.. त्या मुळे पास्कल वेडापिसा झाला होता.

हे दोन दिवस खूप धामधूमीत गेले आणी त्यामुळे शेखर सुकन्या बद्दल विसरून गेला. अशातच तीचा फोन आला. तिला भेटायचे होते. शेखर ने तिला ऑफिस ला बोलवून घेतले. सुजाता कॉलेज ला जाताच ती त्याला भेटायला ऑफिस ला आली. तेव्हा शेखर सगळ्यांन बरोबर पास्कल प्रकरणावर चर्चा करत होता. तेव्हड्यात सदा आला.

" सर , त्या परवाच्या मॅडम आल्यात.."

" अच्छा... तुम्ही सगळे तुम्हाला सांगितलेली कामे करा....सदा तिला पाठव आत.." शेखर सगळ्यांना कटवत म्हणाला.. तसे सगळे उठून जाऊ लागले आणी सुकन्याची एन्ट्री झाली.

" आज मौसम....बडा.... बेईमान है... बडा... " विनू गाणं गुणगुणतच सुकन्याच्या जवळून बाहेर गेला. पण आज तिला त्याचा राग आला नाही. कुठे तरी तिच्या मनाला गुदगुल्या झाल्या. आज शेखर ला भेटायचे म्हणून ती मुद्दाम वेळ काढून आली होती.

" बस्स... काय घेणार थंडा कि गरम ?"

" नको काही नको..."

" बरं... सदा... मस्त कॉफी आण... " त्याने हसतच म्हंटले..

" मग आईला सांगितले जॉब बद्दल....? काय म्हणाल्या आई ?" शेखरने विचारले. खरंतर तिला हा विषय आताच नको होता.. कारण तिच्या उत्तराने तो नाराज होणार हे तिला माहीत होते. त्यामुळे तिने काहीही न बोलता हातातील फ्लॅट चीं चावी त्याच्या समोर टेबलावर ठेवली.

" ओह..." शेखर मनातून खूप कष्टी झाला.

"'सुजातानी तुमच्या बद्दल सांगितले. आणी माझ्यावर माझ्या आई आणी सुजाताची जबाबदारी असताना मी असे धोकादायक काम स्वीकारू शकत नाही." ती त्याची नजर टाळत म्हणाली.

" हरकत नाही..." तेव्हड्यात सदा कॉफी घेऊन आला.. दोघे शांतपणे कॉफी पीत होते. शेखर ला आज कॉफी जास्तच कडू भासत होती. थोडावेळ त्याने तिच्या बोलण्याची वाट पाहिली . पण ती अजून ही शांतच होती.

" सुकन्या ! तुझे अजूनही काही काम होते कां ?"

" नाही .. मी हेच सांगायला आली होती ."

" बरं मग ठीक आहे... मला जरा एक मिटिंग आहे तर मी निघू कां ? " शेखर आपल्या खुर्चीतून उठत म्हणाला. तो आपल्याला जा सांगत आहे हे लक्षात आल्यावर सुकन्या चिडली खरंतर त्याला भेटायचे म्हणून ती आज मुद्दाम वेळ काढून आली होती. पण त्याने आधीच नको असणारा प्रश्न विचारून सगळा विचका केला.

" हो... मी पण निघते..." ती उठत म्हणाली.

" ड्राइव्हर ला सांगतो तो सोडेल तुला.."

" नको त्याची काही गरज नाही. मी आली तशी जाईन ती पण ताडकन म्हणाली..." आणी दोघे केबिन बाहेर पडले. तिला जाताना बघून शेखरच्या मनाला यातना होत होत्या. आयुष्यात पहिल्यांदाच कोणी मुलगी आवडली होती तर... असो ह्या पुढे आपल्या साठी प्रेम वैगरे प्रकार बंद असे त्याने तिथेच ठरवून टाकले.

" इस्माईल..... गाडीची चावी दे...". ती दिसेंनासी झाल्यावर त्याने आवाज दिला. आणी गाडी घेऊन तो पण बाहेर निघून गेला...

संध्याकाळी सारंग पास्कल च्या अड्ड्याची नासधूस करून आला. तर शेखर ऑफिस ला नव्हता...

" सदा... शेखर कुठे गेला?"

" मला नाही माहीत.."

" माहीत नाही... एक काम कर इस्माईल आहे कां बघ बाहेर.."

सदा तसाच बाहेर पळाला.. आणी इस्माईल ला घेऊनच आला.

" इस्माईल, शेखर कुठे गेला ?"

" मला नाही माहीत. दुपारीच बाहेर गेलेत."

" दुपारीच बाहेर गेलाय ?" सारंग विचार करत पुटपुटला.

" सकाळी ती मुलगी आली होती तिच्या बरोबर ?" त्याने पुन्हा विचारले.

" नाही. त्या मॅडम तर एकट्याच गेल्या. त्या गेल्यावर साहेबांनी माझ्या कडून कार चीं चावी घेतली आणी कुठेतरी निघून गेले. " इस्माईल बोलला. सारंग ने विचार करत बाळू ला फोन लावला.

" बाळु, शेखर घरी आला कां ?"

" होय साहेब... दुपारीच घरी आले आणी पिण्याचा कार्यक्रम चालू आहे. " बाळू ने सांगितले. आता सारंग च्या लक्षात आले बिचारा प्रेमात तोंडावर पडलेला दिसतो.

" बरं..." म्हणून सारंग ने फोन ठेवला.

इकडे शेखर सुकन्या गेल्यावर खूपच अपसेट झाला. त्यामुळे तो सरळ घरी आला. त्याला असा अवेळी घरी परत आलेला बघून बाळू चमकला..

" बाळु... थोडा आईस आणी काही खायला घेऊन माझ्या रूम मध्ये ये..." आल्या आल्या त्याने बाळु ला सांगितले.

थोड्या वेळात सगळी तयारी करून बाळु वर गेला तर शेखर बाल्कनीतुन बाहेर बघत बसला होता.

" साहेब ," त्याने आवाज दिला.

"'ह्म्म्म... ठेव... आणी आता मला कोणी डिस्टर्ब् करू नका... मला जेवायला नको आहे..."

" बरं. साहेब..." बाळु आल्या पावली निघून गेला.

शेखर ने इम्पोर्टेड व्हिस्की चा एक लार्ज पेग भरला. त्यात आईस टाकून तो आपल्या आवडत्या जागी बाल्कनी जवळ बसला.

सुकन्या ने त्याचीं ऑफर नाकारल्याचे त्याच्या मनाला खुप लागले होते. आता तिच्याशिवाय त्याला जगणे खूप कठीण वाटत होते. कदाचित त्याचे पहिलेच प्रेम असल्यामुळे असेल पण तिला विसरता येणे त्याला शक्य वाटत नव्हते. अर्थात तिचे पण बरोबर होते. तिच्या आई आणी बहिणीचा विचार करता ती अश्या धोकादायक ठिकाणी काम करणे शक्यच नव्हते.

पण तिला आपण तिच्यावर प्रेम करतो ते तरी माहिती असेल कां ? आपण तिला कधी विचारले नाही. कदाचित सुजाता तिला काही बोलण्याची शक्यता असू शकते. आणी जर ती तिच्या आई आणी बहिणीचा एव्हडा विचार करते तर आपल्या होणाऱ्या जोडीदारा विषयी ही तसा विचार करणार नाही कां ?

तो उलट सुलट सगळ्या बाजूने विचार करत होता. आपलेच अंदाज बांधत होता आणी तेच अंदाज आपणच खोडून काढत होता. असाच खुप वेळ गेला. आता त्याच्या व्हिस्कीचीं बाटली पण अर्धी खाली झाली होती. संध्याकाळ झाली होती. सगळी कडे काळोख पसरला. रस्त्यावर आणी आजूबाजूला दिवे लागले पण शेखर च्या रूम मध्ये अजूनही काळोखच होता. त्या दिवशी तो तसाच न जेवता झोपला.

सकाळी त्याला बरोबर पाच वाजता जाग आली. ही त्याची नेहमीची सवय रात्री कितीही उशिरा झोपला तरी सकाळी पाच ला त्याला जाग यायचीच. त्या नंतर योगा आणी मार्शल आर्टस् चीं प्रॅक्टिस त्या नंतर सात वाजता गरम गरम दूध बाळु घेऊन यायचा..

आज पण त्याने नेहमी प्रमाणे योगा आणी मार्शल आर्ट्स चीं प्रॅक्टिस केली. अंग मोकळे केले. तो पर्यंत बाळु दूध घेऊन वर आला.

आपले सगळे आटपून त्याने कॉफी घेतली आणी बरोबर दहा वाजता तो ऑफिस ला निघाला . आता त्याच्या डोक्यातून सुकन्या हा विषय बाजूला निघाला होता. पण आता पुन्हा प्रेमात पडायचे नाही हे पण त्याने ठरवून टाकले होते...

" काय नवीन ? "ऑफिस ला आल्यावर त्याने विचारले. त्याच्या काळजीने सगळे त्याच्या केबिन ला जमा झाले होते. पण त्याला नेहमी सारखा फ्रेश बघून सगळ्यांना हायसे वाटले.

" तो आपला आमदार आहे ना सरपोतदार.... भडवा... पास्कल ला खूप पाठीशी घालतोय.. वरून पोलिसांवर दबाव आणतोय.. आपल्या माणसानां पोलिसांनी उचलले आहे काल रात्री..."

" काय सांगतो...?"

" हा... पण त्यांना फार काही माहिती नाही... पण गोधंळ तर झालाय.."

" एक काम कर सगळ्यात पाहिले एक चांगला वकील कर आणी आपल्या माणसांना बाहेर काढ... " मी स्वतः cm शी बोलतो..

" बरं.. पण त्या सरपोतदार चे काय करायचे तो सारखा मध्ये काडी घालणार ?"

" त्याचे मी बघतो तु जा वकिलाचे बघ... " शेखर म्हणाला तसा सारंग उठून गेला. आणी शेखरने cm ला फोन लावला.. आणी त्यांना समजवून सांगितले. खरं म्हणजे एका ड्रॅग डीलरच्या अड्ड्यावर झालेल्या हल्ल्याला एव्हडे महत्व द्यायचे कारण नव्हते पण सरपोतदार वरून प्रेशर टाकत असल्याने पोलिसांनाही ऍक्शन घ्यावी लागली.
त्याचे म्हणणे cm ना पटले आणी त्यांनी पोलिसांना आदेश दिले. त्यामुळे शेखर च्या माणसांना बेल मिळायला कोणताही त्रास होणार नव्हता.

" विनू, सरपोतदार ला फोन लावायचा आहे."

" बरं.. " त्याने पटापट आपल्या लॅपटॉप वरून जोडण्या केल्या.

" ऑल सेट... गो अहेड..." त्याने इशारा केला. आणी शेखरने सरपोतदार ला फोन लावला. हा त्याचा एकदम खाजगी नंबर होता.

" हॅलो..." पलीकडून एक मस्तवाल , गुर्मीष्ट आवाज आला.

" सरपोतदार !.... आजकाल तुझे सामाजिक कार्य खूपच वाढले आहे... अरे इतके लक्ष आपल्या मतदार संघा कडे टाकले असतेस तर आता पर्यंत खासदार झाला असतास."

" कोण बोलतेय..."

" मी शेर....." ते नाव ऐकताच सरपोतदार खवळला...

" शेर काय ?... कधीतरी माझ्या समोर ये तुला शेराला सव्वा शेर कसा असतो ते दाखवतो.."

" अरे वा मग आता मज्जा येईल ... काय आहे ना सरपोतदार असे खुप जण भेटले ज्यांना वाटत होते कि ते सव्वा शेर आहेत पण माझ्या समोर ते पाव शेर पण भरले नाहीत रे..."
शेखर त्याला जबरदस्त टोला लगावत हसला..

" ह्म्म्म... तु अजून ह्या सरपोतदार ला ओळखत नाहीस नाही जर तुला गाडून टाकले तर नाव नाही सांगणार.. सरपोतदार.." तो म्हणाला.

" मला गाडणे म्हणजे वृक्ष रोपण करण्या एव्हडे सोपे वाटले कां तुला. . खड्यात झाड लावले . पाणी घातले आणी वरून माती लोटली कि झाले."

" बघशीलच तु ...."

""नाही मी नाही , तु बघ ... एक क्लिप पाठवतो आहे तुझ्या मोबाईल वर बघ जरा..." शेखरने विनू ला इशारा केला. त्या बरोबर विनू ने काही बटणे दाबत ती क्लिप सरपोतदार च्या मोबाईल वर फॉरवर्ड केली. आणी शेखर ला थम्ब दाखवला.. ती क्लिप सरपोतदार चे एका तरुणी बरोबरचे असलेल्या समंधावर होती . त्यात दोघे कामक्रीडेत गुंतलेले दिसत होते. सरपोतदार चा चेहरा तर स्पष्ट दिसत होता.

" ही... ही.. क्लिप..." सरपोतदार चे धाबे दणाणले... त्याची सगळी मग्रुरी उतरली होती.

" हे बघ.. सरपोतदार.. जर पास्कल ला परत पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलास तर ही क्लिप तुझ्या पार्टी प्रमुखा पासून सगळी कडे वायरल करीन..नंतर आमदारकी तर सोड तुला कोणी ग्रामपंचायतीचे पण तिकीट देणार नाही..
कळले कां ?"

" हो ... हो... " सरपोतदार कसाबसा म्हणाला. आणी शेखरने फोन कट केला.

" काय सॉलिड दम देतोस यार.... मज्जा आली ." विनू खुश होऊन म्हणाला...

"'हा.... जा आता सगळे पास्कलच्या मागे लागा. त्याला अजिबात उसंत घेऊ देऊ नका... पळा..." शेखर सगळ्यांना म्हणाला... तशे सगळे त्वरेने उठले..

पुढच्या आठ दिवसात खुप धामधूम चालू होती. पास्कल चे सगळे मोठे कॉन्टॅक तोडण्यात आले. पास्कल आता तोंड लपवत पळत होता. आणी शेर त्याच्या मागे हात धुवून लागली होती. असा खेळ पास्कल दुबई ला पळून जातं नाही तोपर्यंत चालू होता... पास्कल गेला पण त्याची इथली सगळी प्रॉपर्टी सरकार ने सील केली. त्याचे सगळे ac फ्रिज केले. आता तो दुबईला जाऊन पण हात चोळत बसण्या खेरीज काही करू शकत नव्हता.

असेच आणखीन काही दिवस गेले.. सुकन्याचीं आठवण होऊ नये म्हणून आता शेखर स्वतःला जास्त कामात गुंतवून घेऊ लागला. त्यामुळे डोक्यात विचार यायला अजिबात वेळ मिळत नव्हता. पण आता तो यंत्रवत काम करत होता. त्यात पहिल्या सारखी भावना नसायची... एखादा रॉबर्ट असल्या सारखा ...

त्या दिवशी संध्याकाळी साधारण सात वाजयला आले होते. अचानक त्याच्या मोबाईल वर कॉल आला नंबर अननोन होता .

" हॅलो... शेखर सर , मी सुजाता बोलतेय..."

" हा सुजाता बोल आज अचानक कसा फोन केला." तो बोलला खरा पण सुकन्याच्या आठवणीने त्याचे तोंड कडू झाले होते.

" सर , आई.... आईला...." तिला धड बोलता पण येत नव्हते.

" सुजाता शांत हो... घाबरू नकोस.. हळू हळू सांग...."

"'आईला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे. तिची प्रकृती खुप क्रिटिकल आहे. मी दीदी ला फोन करत होते पण ती ट्रॅफिक मध्ये अडकली आहे. मला काही सुचत नव्हते म्हणून मी तुम्हाला फोन केला..."

"'बरं केलेस... आता मला सांग कोणत्या हॉस्पिटल मध्ये ठेवले आहे आई ला ?"

" होली स्पिरिट..."

" बरं मी लगेच येतो. काळजी करू नको.... तु आई जवळच थांब ... ओके."

" ठीक आहे.."

त्याने पटकन इस्माईल ला गाडी होली स्पिरिट हॉस्पिटल ला घ्यायला सांगितली. पंधरा वीस मिनिटात ते हॉस्पिटल ला पोचले.. ती दरवाज्या जवळच त्याचीं वाट पाहत होती. त्याला बघताच ती रडत त्याच्या कुशीत शिरली ..

" रडू नकोस... आता मी आलोय ना.... चल आपण डॉक्टरांना भेटू..." तिला समजावत शेखर तिला घेईन डॉक्टर कडे गेला.

" डॉक्टर.. धिस पेशन्ट इज बिलॉन्ग्ज टू मी... कॅन यु एक्सप्लेन मी व्हाट्स हेपन ?"

" सी.. मिस्टर...?"

" शेखर... शेखर रत्नपारखी..."

" ओह.. फेमस बिजनेस मेन.... ग्लॅड टू मीट यु सर...."

" सेम हियर..."

" ह्म्म्म.... त्यांच्या हृदयाच्या दोन्ही झडपा व्यवस्थित काम करीत नाहीत त्यामुळे हा प्रॉब्लम झाला आहे. प्रेशर जरा पण वाढले तर अटॅक चे चान्सेस आहेत.. " ते ऐकून सुजाताने परत गळा काढला..

" अग बाई रडू नकोस... डॉक्टर एनी होप्स ?"

"'आहे ना... आपण हार्ट स्पेशलिस्ट ला बोलावू ऑपरेशन करून आर्टिफिशल झडपा टाकल्या तर त्या नॉर्मल होतील.. पण लवकर करावे लागेल... अँड दॅट विल बी सो कॉस्टली .."

" डॉक्टर यु कॉल बेस्ट ऑफ बेस्ट स्पेशलिस्ट. आय डोन्ट केअर अबाऊट मनी बट पेशन्ट गेट वेल सून..."

" देन फाईन... आय विल कॉल डॉक्टर.. यु टेक केअर ऑफ पेशन्ट..."

" ओके. थँक्स डॉक्टर..."

" इट्स माय ड्युटी... शेखर सर..."

शेखर बाहेर येऊन बसला. समोरच्या रूम मध्ये तिच्या आई ला ठेवले होते. सुजाता येऊन त्याच्या बाजूला बसली .

" काळजी करू नको सुजाता... तुझ्या आई साठी आपण जे जे शक्य असेल ते करू..." तीने मंद मान हलवली. काही वेळात सुकन्या आली. तिने आल्या आल्या आईला पाहिले. आई अजून शुद्धीवर आली नव्हती... तिने मग सुजाताला सर्व विचारले. तेव्हड्यात मोठे डॉक्टर आले. म्हणून शेखर त्यांना भेटायला गेला. तो तिथे नसल्याचे बघून सुकन्या सुजातावर चिडली . तिने शेखर ला बोलावले ते तिला अजिबात आवडले नव्हते. सारखी सारखी त्याची मदत घ्यावी हे तिला रुचणारे नव्हते. त्या दिवसा नंतर तिला पण त्याचा राग आला होता. ती किती उत्साहात त्याला भेटायला गेली होती. खुप काही बोलायचे तिच्या मनात होते. आणी त्यांनी काय केले... त्या दिवसा नंतर त्याने एकदा ही तिला फोन केला नव्हता... जणू काही तो तिला विसरूनच गेला होता.

इकडे स्पेशलिस्ट डॉक्टर आले म्हणून शेखर त्यांना भेटायला गेला. आणी काही वेळातच सुकन्या आणी सुजाता पण तिथे आल्या.

" अरे शेखर..... सर... आप यहा पे..." डॉक्टर मूर्ती त्याला बघून चमकले..

" हॅलो डॉक्टर मूर्ती...." शेखर ने त्यांना ओळखले होते. एका मोठ्या प्रोग्राम मध्ये समाजातील यशस्वी लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. तेव्हा डॉक्टर मूर्ती आणी शेखर चीं ओळख झाली होती.

" डॉक्टर धिस पेशन्ट इस बिलॉन्ग टू हिम..."

" ओह... आय सी... डोन्टअ.. वररी..." आपल्या टिपिकल मद्रासी टोन मध्ये डॉक्टर मूर्ती म्हणाले.

" अब मै आया हू... देखते है... क्या कर सकते है.. नाऊ कॅन एस्क्युज मी प्लिज.... मे आय लाईक टू टोक विथ डॉक्टर फर्स्ट..."

"'ओह... प्लिज.. डॉक्टर.. " असे म्हणून शेखरने दोघीना ही उठण्याची खूण केली. तिघे बाहेर आले.

" हे डॉक्टर मूर्ती खूप मोठे हार्ट सर्जन आहेत.. ते आले म्हणजे आता आपण अर्धी लढाई जिंकलोच समज..." शेखर ने सुजाताला समजावून सांगितले... पण आल्या पासून त्याने सुकन्या कडे एक साधी नजर पण टाकली नव्हती.. हे गोष्ट सुजाताच्या लक्षात आली होती. आणी सुकन्याच्या मनाला लागून राहिली होती.


पुढील भाग लवकरच.....

© सर्वाधिकार लेखकाकडे ..

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED