cell number 44 - 1 books and stories free download online pdf in Marathi

सेल नंबर ४४ - रहस्याची सुरूवात (भाग १)

“जगातील सर्वात सुरक्षीत जागा आपले घर असते.”

“सेल नंबर ४४”च्या भिंतीवर असे वाक्य रक्ताने लिहिले होते.

शहरापासुन बरेच लांब डोंगराळ भागात तिन मोठ्या इमारती होत्या. त्यापैकी एक इमारत हॉस्पीटलची होती, जिथे मानसिक रुग्णांना ठेवले जात असे. ते होते रॉयल मेंटल हॉस्पीटल. त्यापैकी बी विंगच्या इमारतीमध्ये भारतातल्या सगळ्यात जास्त हिंसक रुग्णाना ठेवले होते. त्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीच्या मागच्या खिडकीमधुन एका रूग्णाने उडी मारली. तो वाळूच्या ढिगाऱ्यात पडल्याने त्याला थोडी फारच इजा झाली. परंतू त्याकडे लक्ष न देता तो जंगलाच्या दिशेने धावु लागला. त्याला हॉस्पीटलमधुन बाहेर जाताना पाहुन गेटवर थांबलेले वॉचमन त्याच्या मागे धावु लागले. त्याला थांबवण्यासाठी ते त्या रूग्णाला आवाज देत होते. पण त्यांचा आवाज ऐकून तो रुग्ण आणखी जोरात धाऊ लागला. जंगलातल्या दगडांवरून, झुडपांमधुन आणि वेलींच्या जाळ्यांमधुन त्या वॉचमनांना धावता येत नव्हते. परंतू तो रूग्ण उड्या मारून, झुडपांमधुन रस्ताशोधत जलद गतीने धावत होता. त्यामुळे तो त्या वॉचमनांपासून खुप दूर निघून गेला.

धावता धावता तो जंगलातून बाहेर रस्त्यापर्यंत पोहोचला. तो वारंवार मागे वळुन पाहत होता. त्याची त्याच्या शरीरावरील पकड कमी होत चालली होती. तेवढ्यात एका वळणावर भरधाव वेगात येणाऱ्या एका कारला तो समोरून जाऊन धडकला. त्या धडकेने तो उडून रस्त्याच्या डाव्या बाजुला असणाऱ्या दरीत जाऊन पडला. कार चालकाने जोरात ब्रेक मारला आणि कार काही अंतरावर जाऊन थांबली. तो पर्यंत त्या रूग्णाच्या मागे धावणारे वॉचमन तिथे आले. रस्त्यावर पसरलेल्या धुराला आणि रस्त्या शेजारी थांबलेल्या कारला पाहून, तिथं काय झालं असणार याची त्या वॉचमनांना कल्पना आली. ते गुढग्यावर हात टेकवु तिथेच उभे राहिले.

“कोण होता रे तो?”

एका वॉचमनने दुसऱ्याला विचारले.

“अरे तो नाही का, अनिकेत? ४४ नंबरच्या खोलीतला पेशंट.... १७ वर्षाचा होता तो. त्याच्यासोबत इतकं वाईट व्हावं....”

*****

आठ वर्षां नंतर.

रॉयल मेंटल हॉस्पीटलच्या परीसरात एक कार थांबली. काळ्या रंगाचा सुट घातलेला एक तरून त्या कारमधुन उतरला. त्याने कारच्या मागच्या सिटवरून त्याची बॅग बाहेर काढली आणि धावत हॉस्पीटलमध्ये आला. हॉस्पीटलमध्ये प्रवेश करताच त्याने चारही दिशेला पाहिले. त्याला एक महिला जिन्याच्या पाहिरीवर बसलेली दिसली. तो तिच्या जवळ गेला आणि त्याने त्या महिलेला विचारले.

“इथे डॉ. सायमंडची केबीन कुठे आहे?”

“तुम्ही कोण?”

त्या महिलेने रागात विचारले.

“मी डॉ. अमेय. मी एक मनोचिकित्सक आहे.”

तो पुढे काही बोलणार त्या आधी त्या महिलेने अमेयची कॉलर पकडली आणि त्याला ओरडून विचारले.

“तुला काय गरज होती इथे यायची. इथे मनोचिकित्सक काय कमी होते का? ते किती त्रासदायक आहेत तुला माहित आहे का?”

त्या महिलेच्या वागण्याने अमेय घाबरला. तो काही बोलणार त्या आधी एका व्यक्तीचे हात त्या महिलेच्या खांद्यावर आले आणि त्यांनी त्या महिलेला अमेयपासून दूर केले. त्या माणसाने पांढऱ्या रंगाचा ऍप्रोन घातला होता. अमेय घाबरून मागे सरकला.

“रोहिनी शांत हो. आपण काल काय शिकलो होतो विसरलीस का? कोणावरही ओरडायचं नाही म्हणुन. ते डॉक्टर आहेत ना. असं वागायचं नाही त्यांच्यासोबत. तू जर तुझा स्वभाव बदलला नाही तर तुला नाईलाजाने शॉक दिला जाईल. ते तुला चालेल का?”

शॉक हा शब्द उच्चारताच ती महिला घाबरली आणि पुन्हा एकदा जिन्याच्या पाहिरीवर जाऊन बसली. ती घाबरलेल्या नजरेने अमेयकडे पाहत होती.

“सॉरी डॉक्टर. तुम्हाला त्रास झाल्याबद्दल...”

त्या व्यक्तीने अमेयच्या दिशेने हात पुढे केला. अमेयने हस्तांदोलन करून त्याला विचारले.

“हि कोण होती?”

“हि रोहिनी आहे, मनोरूग्ण. सहसा ही अशी वागत नाही. पण जेव्हापासून तिच्यावर शॉक थेरेपीचा वापर केलाय, तेव्हापासून ती डॉक्टरांना पाहून थोडीशी एग्रेसीव्ह होते... बाय द वे. मी डॉ. चार्ली.”

“ओ... अच्छा, तर तुम्ही इथले डॉक्टर आहात. मीसुध्दा डॉक्टर आहे. डॉ. अमेय...”

“नाईस टू मिट यु. तुम्ही इथे जॉईन करणार आहात का?”

“हो. आजपासून मी या हॉस्पीटलला जॉईन करणार आहे. पण ऍझ् अ इंटर्न म्हणुन. माझी गेल्याच महिन्यात डिग्री पुर्ण झाली. इंटर्नशिपसाठी मला इथं पाठवण्यात आलं आहे.”

“अच्छा तर तुम्ही इन्टर्न आहात तर...”

चार्ली बोलत असताना नर्सने त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला मध्येच थांबवले.

“चार्ली तुला किती वेळा सांगितलं की तू हा डॉक्टरांचा कॉट घालुन फिरायचं नाही म्हणुन. हा एप्रोन जिथुन घेतलाय तिथं ठेऊन ये. आणि दहा मिनीटात वेळ संपनार आहे. त्यानंतर कॉरीडोरमध्ये फिरताना दिसायचं नाही. नाहीतर माहित आहे ना काय होतं ते...”

नर्सला पाहताच चार्ली घाबरला. त्याने एप्रोन काढून हातात घेतला आणि नर्सचे वाक्य संपताच तो धावुन जिन्यातुन वर्ती निघून गेला. हा प्रकार पाहून अमेय थोडा गोंधळलेला होता.

“आता लक्षात ठेवायचं डॉक्टर. आय.डी. कार्ड पाहिल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवायचा नाही.”

“तो पेशंट होता?” – अमेयने विचारले.

“हो. तो पेशंट होता. आज रवीवार आहे आणि दर रवीवारी आम्ही संध्याकाळी ४ वाजेपर्यंत रूग्णांना बिल्डींगमध्ये मोकळे सोडतो. रवीवारी स्टाफला सुट्टी असल्यामुळे हे पेशंट बिनधास्तपणे फिरतात. त्यामुळे रवीवारी चार पर्यंत इथे तुम्हाला डॉक्टर, इंजिनीअर्स आणि साईन्टीस्ट फिरताना दिसतील.”

नर्स हसून म्हणाली. गळातला आई.डी. कार्ड दाखवत ती पुढे म्हणाली.

“मी इथली हेडनर्स, स्मिता. तशी मी हेडनर्स आहे. परंतू इथली मॅनेजमेंटसुध्दा मीच पाहते.”

ती इमारतीच्या डाव्या बाजुच्या कोपऱ्यातल्या केबीनकडे जाऊ लागली. तिच्या मागे अमेयसुध्दा निघाला.

“मला डॉ. सायमंडला भेटायचं होतं. त्यांच्या साईनशिवाय मी इथं जॉईन नाही करू शकणार आणि त्यांनी मला आज दुपरी दोन पर्यंतचा वेळ दिला होता. मला इथ यायला उशीर झालाय... तर तुम्ही मला सांगाल का....”

“घाबरू नका. आता पुढच्या एक वर्षांसाठी तुम्ही इथले मेंबर आहात. डॉ. सायमंड वाटतात तितकेसे कडक नाहीत. त्यांनी मला तुमच्याबद्दल सगळं काही सांगितलं आहे. ते आता तुम्हाला उद्या सकाळीच भेटू शकतात. पण काळजी करू नका. तुम्ही आजपासून जॉईन केलंय असंच समजा.”

केबीनचा दरवाजा उघडून स्मिता आत गेली. अमेयसुध्दा तिच्या मागोमाग आत आला.

“हि केबीन माझी आहे. तुमची राहन्या – खान्यासंबंधीत कोणतीही तक्रार असली तर तुम्ही आधी मला येऊन ती सांगायची. तसं मी सगळ्याच गोष्टी पाहते. पण खास करून इथल्या हॉस्पीटल स्टाफच्या राहण्या खान्याची व्यवस्था करणे हे माझे काम आहे.”

स्मिता तिच्या खुर्चीवर बसली आणि ड्रोवरमधुन तिने किल्ली बाहेर काढली.

“खास इन्टर्न्सच्या राहण्यासाठी या इमारती मागे एक कॉटेज होता. पण काही कारणांनी तो कॉटेज बंद केला आहे. तसंही गेल्या कित्तेक वर्षांपासून इथं कोणी इन्टर्नशिपसाठी आलं नव्हतं. त्यामुळे मी तुम्हाला “बी” बिल्डींगमधली एक खोली तुम्हाला देत आहे. तसंही कुठं तुम्ही एकटे त्या बिल्डींगमध्ये राहणार. बी विग मधला पहिला मजला खास हॉस्पीटल स्टाफसाठीच आहे. तिथे माझ्यासोबत डॉक्टर साराचीसुध्दा खोली आहे.”

स्मिताने ती चाली अमेयच्या हातात दिली.

“माझ्या इन्टर्नशिपचा नक्की शेड्युल काय असेल?”

अमेयने स्मिताला विचारले.

“त्याबद्दल तुम्हाला डॉ. सायमंडच जास्त व्यवस्थित सांगु शकतात.”

स्मिताचे ते वाक्य संपल्यानंतर काही वेळासाठी त्या दोघांमध्ये शांतता पसरली. स्मिता एकटक अमेयकडे पाहत होती. अमेय मात्र केबीनमध्ये ठेवलेल्या गोष्टी पाहण्यात मग्न होता.

“लक्षात ठेवा. हि बिल्डींग सामान्य आणि इतर रूग्णांसाठी आहे. बिल्डीग बी, सीव्हीअर आणि हिंसक अशा रूग्णांसाठी आहे. परंतू त्यांना खोल्यांमध्ये बंद करून ठेवलेले असते. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये आणि सी बिल्डींगमध्ये डॉ. सायमंडच्या केबीनसोबत इतर मुख्य कार्यालये आहेत. तसेच इतर डॉक्टरांचे रूम आणि थेरेपीरूम तिथे आहेत...”

होकारार्थी मान डोलवत अमेय स्मिताचं बोलणं ऐकत होता. स्मिता पुढे म्हणाली.

“... आणि इतर कोणत्याही गोष्टीची त्रास झाल्यास किंवा कशाचीही गरज असल्यास तुम्ही मला सांगा.”

बोलता बोलता स्मिताने तिच्या शर्टचे वरचे बटन काढले आणि तिच्या बोटाने शर्ट हळुवारपणे बाजुला सरकवत, तिरप्या नजरेने पाहत ती म्हणाली.

“कोणत्याही प्रकारची गरज मी पुर्ण करू शकते.”

अमेय काहीसा दचकला. अडखळत होकार दर्शवत तो म्हणाला.

“हो... नक्कीच... अं... मी आता निघु.”

“चालेल. डाव्या बाजुला बी बिल्डींग आहे... पहिला मजला, तिसरी खोली. सामान शिफ्ट करून घ्या आणि थोडा आराम करा.”

स्मिताने त्याला एक कागद दिला. ज्यामध्ये हॉस्पीटलचे नियम लिहिले होते. तो कागद घेऊन अमेय तिथुन निघुन गेला.

******

दुसऱ्या दिवशी सकाळी तयार होऊन अमेय डॉ. सायमंडच्या केबीनच्या दिशेने निघाला होता. केबीनच्या बाहेर एका रूग्णाने त्याला अडवले आणि तो अमेयला म्हणाला.

“तुम्ही इथं येऊन खुप मोठी चुक केली आहे. तुम्ही परत निघुन जावा.”

“पण का? मी इथं येऊन काय चुक केली?”

अमेयने त्या रूग्णाला विचारले.

“मी तुम्हाला काही सांगु शकत नाही. फक्त एवढंच सांगु शकतो की तुम्ही हा हॉस्पीटलसोडून निघुन जावा. नाहीतर या हॉस्पीटलमध्ये राहून तुमचासुध्दा मृत्यु होऊ शकतो...”

तो पुढे काही बोलणार त्या आधी वॉर्डबॉय त्याला तिथुन घेऊन गेला. काही क्षणासाठी अमेयने त्याच्या बोलण्यावर विचार केला आणि तो डॉ. सायमंडच्या केबीनमध्ये गेला.

केबीन उघडून आत आल्यावर त्याने पाहिले की डॉ. सायमंड केबीनमध्ये नव्हते. त्याने सोबत आणलेली ब्रीफकेस खुर्चीवर ठेवली आणि तो केबीनमधल्या वस्तुंना पाहु लागला. केबीनच्या भिंतीवरती मेनबत्त्यांच्या आकाराच्या लाईटी लावल्या होत्या. त्यामुळे केबीनमध्ये पिवळ्या रंगाचा प्रकाश बडला होता. भिंतींवरती विचित्र प्रकारच्या आकृत्यांचे चित्र लटकवले होते. एका चित्रात मानवी कवटींचे तिन वेगवेगळ्या आकारामध्ये पेंटींग बनवली होती. त्याच्या शेजारी दानवाच्या आकाराची आकृती मानवी मेंदुला धरून ठेवल्याची पेंटींग होती. त्या पेंटींगच्या शेजारी पुस्तकांचे कपाट होते. त्या कपाटामध्ये छोटी, मोठी सगळ्याच प्रकारची पुस्तके ठेवली होती. अमेय त्या पुस्तकांची नावे वाचत होता. त्यापैकी पहिले पुस्तक होते “मानसशास्त्र आणि आत्मांचा संबंध”

एका मनोचिकित्सकाच्या केबीनमध्ये आत्मांशी संबंधीत पुस्तक असणे अमेयला थोडेसे विचित्र वाटले. त्यापुढील पुस्तकांचे शिर्षकसुध्दा त्याच प्रकारचे होते. सगळी पुस्तकं आत्माशी संबंधीत होती. त्याने त्या पुस्तकांमधला “मानसशास्त्र आणि आत्मांचा संबंध” हे पुस्तक बाहेर काढले. त्या पुस्तकाच्या अनुक्रमनीकेमध्ये आत्मा, शव, पिशाच्यादी असे शब्द सापडले. तो पुढे काही वाचणार त्या आधी एक आवाज आला.

“दुसऱ्यांच्या वैयक्तीक गोष्टींना हात लावणे कितपत योग्य आहे असे तुम्हाला वाटते.”

अमेयने मागे वळुन पाहिले. अर्धवट टक्कल पडलेला, पांढरे केस, फ्रेंचकट पांढरी दाढी आणि काळा सुट घातलेला एक वयस्कर व्यक्ती त्याच्या मागे उभा होता.

“हैलो. मी डॉ. सायमंड.”

अमेयने घाबरून ते पुस्तक टेबलावर ठेवले. डॉ. सायमंड टेबलाच्या डाव्या बाजुने आतल्या बाजुस गेले आणि खुर्चीवर बसले.

“सॉरी सर... मी तर जस्ट पुस्तक पाहत होतो... कारण त्याचे शिर्षकच तसे होते....”

अमेयचे वाक्य मध्येच थांबवत डॉ. सायमंड त्याला म्हणाले.

“राहुद्या. अशा वायफळ विषयावर बोलण्यापेक्षा मला वाटतं तुमच्या जॉयनिंग लेटरवरती सही करणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही ते लेटर देण्याचे कष्ट घ्याल का?”

“हो नक्कीच.”

अमेयने त्याच्या ब्रिफकेसमधुन काही कागदे काढली आणि डॉ. सायमंडला दिली. डॉ. सायमंड त्या लेटवरती सही करे पर्यंत अमेयने एक फाईल काढली आणि त्यांच्यासमोर धरून तो म्हणाला.

“सर, “मनोरोग हा प्रेमाच्या भावनेने बरा करता येतो” मी या विषयावर अभ्यास करत आहे. त्या संदर्भातल्या बऱ्याच पुस्तकांमधुन मी हि माहिती गोळा केली आहे. तर तुम्ही यावर...”

यावेळीसुध्दा अमेयचं वाक्य पुर्ण होण्या आधीच डॉ. सायमंडने त्याला मध्येच थांबवले आणि म्हणाले.

“रॉयल मेंटल हॉस्पीटल, हे जगातील दहा मोठ्या मनोरूग्णालयापैकी एक आहे. इथे रूग्णांवर उपचार या शिवाय इतर कोणत्याही गोष्टीबद्दल तुम्ही मला विचारायचे नाही. तुम्ही या ह़ॉस्पीटलमध्ये पिकनीकसाठी आलेला नाहीत. या हॉस्पीटलची एक परंपरा आहे. ती परंपरा पुढच्या एका वर्षासाठी तुम्हीसुध्दा जपावी अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे अशा गोष्टींवर तुम्ही इथुन बाहेर पडल्यानंतर वेळ घालवु शकता. परंतू इथे असताना फक्त कामाबद्दल बोलायचं. बाकी तुम्ही समजदार आहात. वर्षाच्या अंती तुम्हाला चांगले मार्क्स कसे मिळतील, याचा विचार मी वर्षभर करणार आहे. त्यामुळे थोडे जपुन रहा.”

डॉ. सायमंड बोलत असताना दारावर आवाज झाला. डॉ. सायमंडने त्यांना आत येण्याची परवानगी दिली. दार उघडून डॉ. शर्मा आणि डॉ. कांबळे आत आले.

“अरे वाह् ... तर इथे आहे जिनीअस. मी याला पाहता क्षणीच ओळखला.”

डॉ. शर्मा आत येताच अमेयकडे पाहुन म्हणाले.

“तर हाच आहे तो?”

डॉ. कांबळेंनी डॉ. शर्मांना विचारले.

“हो. हाच आहे. याच्या वडीलांनी आणि मी बऱ्याच सभांना एकत्रीतपणे संबोधीत केले होते. कित्तेक सेमीनार्समध्ये आम्हा दोघांना एकत्रीतपणे बोलवायचे. यांचे वडील माझे घनिष्ठ मित्र होते. आणि एक वेळ तर...”

“मला असं वाटतं या गोष्टी डिसकस करण्याची हि योग्य वेळ नाहीये.”

डॉ. सायमंड त्यांना मध्येच थांबवत म्हणाले.Contest

“सॉरी सर, मी तर फक्त...”

“तुम्ही फक्त त्याला इथल्या परंपरेबद्दल आणि इथल्या नियमांबद्दल जास्त सविस्तरपणे सांगावं अशी माझी इच्छा आहे.”

“यस सर.”

डॉ. शर्मा शांतपणे म्हणाले.

“यांना डॉ. साराकडे पाठवा. मी तिला सांगतो. ती यांना हॉस्पीटलच्या सगळ्या डिपार्टमेंट आणि इथल्या प्रोसीजरबद्दल सगळं काही सांगेल.”

एवढं बोलून डॉ. सायमंड खुर्चीवरून उठले.

*****

एका हॉलमध्ये सगळ्या रूग्णांना आणले होते. त्या हॉलमध्ये नेहेमी रूग्णांना दुपार आणि रात्रीच्या वेळी जेवायला आणले जायचे. सारा तिथे त्यांच्या जेवणाच्या वेळी त्यांच्यावर लक्ष ठेवायची. तिच्या सोबत तिन ते चार नर्सेससुध्दा असायच्या आणि पुरूष रूग्णांसाठी वॉर्डबॉय. अमेय साराच्या शेजारी उभा होता.

“... आणि हे फुड डिपार्टमेंट आहे. इथे रुग्णांना रोज दुपार आणि रात्री जेवायला दिले जाते. आपलं काम इथं थांबुन देखरेख करणे आहे. कधी कधी इथले रुग्ण जेवताना हिंसक होतात. कदाचित त्यांच्या नावडत्या भाजीला ताटात पाहून. म्हणुन आपण त्या रुग्णांना शांत करण्यासाठी इथे थांबतो.”

सारा अमेयला सांगत होती.

“... सगळ्याच रुग्णांना इथे घेऊन येता का? म्हणजे जे जास्त हिंसक असतात. जसे बी बिल्डींगमध्ये ज्या रूग्णांना ठेवलंय...”

अमेयने साराला मनातली शंका विचारली.

“नाही. त्यांना इथं घेऊन येत नाही. आपण त्यांना जेवन त्यांच्या त्यांच्या रूममध्येच देतो.”

डॉ. सारा वयाने अमेयच्याच वयाची दिसत होती. म्हणुन अमेयने तिला विचारले.

“तुम्ही इथं कधी जॉईन केलं?”

“अं... सात आठ महिने झाले असतील.”

“अच्छा आणि तुम्ही डिग्री कधी पास झालात?”

“गेल्या वर्षी.”

“अच्छा तर तुम्ही माझ्यापेक्षा एका वर्षांनी मोठ्या आहात.”

सारा एक भुवई उंचावत गालातल्या गालात हसत म्हणाली.

“तुम्ही इथं इन्टर्नशिपला आलेला आहात, याचा विसर पडून देऊ नका.”

या वाक्यावर अमेय हसला.

“नाही – नाही. तुम्ही चुकीचा अर्थ काढताय. मी तर असंच म्हणालो.”

सारा आणि अमेय बोलत असताना तिथे एक नर्स आली आणि साराकडे पाहुन म्हणाली.

“मॅम् . मी आज लवकर जाऊ का?”

“का रे? काय झालं नम्रता?”

“काही नाही. काल संध्याकाळी या घाटाच्या खाली पोलीसांना एक डेड्बॉडी सापडली आहे. त्यामुळे त्या भागात थोडेसे तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे माझ्या नवऱ्याने मला आज लवकर बोलावले आहे.”

“ठिक आहे जा.”

नर्स तिथुन निघुन गेली. साराच्या चेहेऱ्यावर काळजी दिसत होती.

“काय झालं? तुम्ही टेंशनमध्ये दिसताय.”

“गेल्या तिन आठवड्यात ही चौथी डेड्बॉडी सापडल्याची घटना आहे. आजकाल या भागात फिरायचीसुध्दा भिती वाटते.”

“तशी काळजीची गोष्ट तर आहेच. कारण हे हॉस्पीटल शहरापासुन इतके लांब आणि डोंगराळ भात आहे. इथे जवळ पास एक साधी वस्तीसुध्दा नाहीये.”

“आणि या चारही डेड्बॉड्या हॉस्पीटलच्याच आसपास सापडल्या आहेत. घाटाच्या खाली म्हणजे इथुन दोन एक किलोमिटरवरतीच...”

सारा बोलता बोलता शांत झाली आणि शुण्यात पाहू लागली. तिच्या चेहेऱ्यासमोर चुटकी वाजवत अमेयने विचारले.

“बाकीचे डिपार्टमेंट तू दाखवशील की मी स्वतःच जाऊन बघून घेऊ?”

सारा भानावर आली आणि हसत म्हणाली.

“नको. तू एकटा जाशील तर परत येशील की नाही याची गॅरेंटी नाहीये.”

एवढं बोलून सारा दाराच्या दिशेने चालू लागली.

“का? असं का म्हणालीस तू?”

अमेयने तिच्या मागे मागे चाल तिला विचारले.

“लवकरच समजेल.”

सारा अमेयला बी विंगमधल्या बिल्डींगमध्ये घेऊन गेली. ग्राऊंड फ्लोअरवरून ते लिफ्टमध्ये बसले.

“आता मी तुला या हॉस्पीटलच्या सगळ्यात भयानक एरीयामध्ये घेऊन जाते.”

सारा अमेयला म्हणाली.

“भयानक? का असं इथं काय आहे?”

“या बिल्डींगच्या तिसऱ्या मजल्यावर आपल्या देशातील सगळ्यात भयानक आणि हिंसक रूग्णांना ठेवले जाते. यांमध्ये खुनी, बलात्कारी आणि त्याहीपेक्षा जास्त वाईट गुन्हे केलेले रूग्ण असतात.”

“जर त्यांनी असे गुन्हे केले आहेत. तर त्यांना इथं का ठेवलं जातं? त्यांना जेलमध्ये का नाही ठेवत ?”

“कारण ते जरी गुन्हेगार आहेत, कृर आणि हिंसक आहेत, परंतू ते मानसिक रूग्ण आहेत. त्यांना त्यांच्या कर्माचे फळ जेलमध्ये जरी मिळत नसले, तरी त्यांना जेलपेक्षा बेकार शिक्षा इथे दिली जाते. ”

“म्हणजे? मला काही समजलं नाही.”

“म्हणजे जेलच्या शिक्षेपेक्षाही वाईट शिक्षा त्यांना इथे दिली जाते. त्यांना एका खोलीत डांबुन ठेवले जाते. त्यांच्यावर उपचार म्हणुन आम्ही त्यांना गोळ्या देतो, परंतू त्यांना इथे कोणीही दया दाखवत नाही. ते त्याच खोलीत जेवतात, त्याच खोलीत शौच करतात, त्याच खोलीत उलटी करतात आणि त्याच खोलीत झोपतात.”

अमेयने ते ऐकुनच तोंड वाकडे केले.

“मी जेवढं त्यांच्याबद्दल सांगतीये... परीस्थिती त्यापेक्षा खुप वाईट आहे त्यांची.”

लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर येऊन थांबली. साराने लिफ्टचे दरवाजे उघडले. अमेयला हाताने बाहेर जाण्याचा इशारा केला.

“लेडीज् फस्ट.”

असं बोलून अमेयने स्मितहास्य केले. त्याच्या त्या शब्दांना हसून सारा लिफ्टमधुन बाहेर आली. लिफ्टच्या बाहेरचा पॅसेज पुर्ण रिकामा होता. त्या पॅसेजच्या कोपऱ्यामध्ये एक वॉचमन रेडीओवर गाणी ऐकत होता. सारा आणि अमेय त्याच्या जवळ गेले. वॉचमनने त्यांना येताना पाहुन रजीस्टर टेबलच्या कप्प्यातुन बाहेर काढले.

“पेन, पेन्सिल, नेलकटर, कात्री किंवा सुई, अशा प्रकारचे कोणतेही टोकदार वस्तू आत घेऊन जाऊ नका. कोणत्याही पेशंटच्या दाराजवळ जाऊ नये. पेशंटला काहीही खायला देऊ नका किंवा पेशंटने सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका.”

सारा आणि अमेय रजीस्टरवर नाव लिहून सही करेपर्यंत वॉचमनने त्यांना सुचना दिल्या. सही करून झाल्यावर त्याने रजीस्टर पुन्हा कप्प्यात ठेवत रेडीयो चालु केला आणि म्हणाला.

“तुमचा दिवस चांगला जावो.”

सारा अमेयला दारापुढे घेऊन गेली आणि तिने विचारले.

“तुम्ही तयार आहात?”

“मी तयार आहे. या आधी मी बरेचसे सिव्हीअर पेशंट पाहिले आहेत त्यामुळे मला नाही वाटत की माझ्यासाठी हे नवीन आहे म्हणुन.”

तिने दार उघडले.

“वेलकम टू द डेड हाऊस.”

“डेड हाऊस? म्हणजे?”

“इथे येणाऱ्या रुग्णांची आत्मा मेलेली असते. त्यांचे शरीर फक्त इथे असतात. त्यामुळे या जागेचे डेडहाऊस म्हणुन नाव ठेवले आहे.”

दार उघडताच उग्र असा वास आला. माश्यांचे झुंड बल्बांच्या अवतीभोवती फिरताना दिसले. पहिल्या खोलीची खिडकी मोठी होती. त्या खिडकीला लोखंडी जाळी लावली होती. आत तिस पस्तीशीची महिला नग्न बसुन तिच्या अवयवांवरून हात फिरवुन ओरडताना अमेयला दिसली.

“सिव्हीअर निम्फोमेनीयाची पेशंट आहे ती.”

साराने त्याला सांगितले.

ते पुढे चालत गेले. पुढच्या खोलीत त्यांना एक माणुस जमीनीवर लोळताना दिसला आणि त्या पुढच्या खोलीत एक महिला नाचताना दिसली.

“तू आलास. खुप उशीर केलास. मी तुझी कधीपासुन वाट पाहत आहे.”

ती रूग्णा खिडकीजवळ आली. ती खिडकीवर लावलेल्या काचेला चाटू लागली. सारा अमेयला घेऊन पुढे निघाली.

“कुठ जातोयस? मला सोडून तू असा जाऊ शकत नाहीस. मी तुला अशी जाऊन देणार नाही.”

ती रूग्णा जोरजोरात ओरडू लागली. साराने तिच्याकडे लक्ष देऊ नकोस असे अमेयला सांगितले. पुढच्या रूग्णाला पाहणार त्या आधी तो रुग्ण खिडकीजवळ आला आणि त्या काचेवर जोर जोरात डोकं आपटू लागला. डोकं आपटण्याच्या आघाताने काचेला तडा गेला. साराने खिशातला मोबाईल काढला आणि बाहेर बसलेल्या वॉचमनला बोलावले. दुसऱ्याच क्षणाला वॉचमन आत धावत आला आणि त्याने त्या रूग्णाचे दार उघडले आणि आत जाऊन त्याला इलेक्ट्रीक करंट असणाऱ्या दांडक्याने दोन फटके दिले.

“रुग्णांना असं मारणं अयोग्य आहे.”

अमेय साराला म्हणाला.

“ज्या प्रकारचे गुन्ह्ये यांनी केले आहेत. त्यासाठी त्यांना हिच शिक्षा मिळायला पाहिजे. आणि तसंही यांच्यावर दया दाखवुन हे बरे होणार नाहीये.”

“त्यांनी जरी गुन्हा केलाय, परंतू ते आपल्यासाठी तर रुग्ण आहे ना. त्यांना दुसऱ्या मार्गाने शांत नाही करू शकत का आपण?”

“आजच्यासाठी एवढंच पुरे आहे... राहिला प्रश्न उपचाराचा. तर या प्रत्येक रुग्णाला दहा ते बारा गोळ्यांचा डोस चालू आहे. मात्र यांच्या आजारामध्ये थोडासुध्दा फरक दिसुन येत नाहीये. एवढंच काय तर झोपेच्या पाच पाच गोळ्या खाऊनसुध्दा ते झोपत नाही. अशा वेळी आम्हाला त्यांना बांधुन ठेवणे, इलेक्ट्रीक शॉक देणे, बेल्टने मारणे, हा एकच उपाय उरतो.”

“पण इतर हॉस्पीटलमध्ये असं होत नाही. तिथं एक सिस्टीम असतं. रूग्णासोबत असं करणं किती कृरपणा आहे.”

“हेच तर तुला शिकायचंय. आपण जे पुस्तकात वाचतो आणि जे सत्य हकीगत आहे. यांमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. यालाच तर इन्टर्नशिप म्हणतात. ज्यामध्ये तुम्हाला तत्वज्ञान आणि प्रात्यक्षिकामधला फरक समजतो.”

बोलता बोलता दोघेही डेडहाऊस मधुन बाहेर निघुन गेले.

*****

रात्रीचे साडे नऊ वाजता अमेय त्याच्या खोलीत जेवन करून आला. तो त्याचा पहिलाच दिवस होता कामाचा आणि पहिल्याच दिवशी त्याला काही गोष्टी हॉस्पीटलच्या पटल्या नाही. तो काहीसा उदास दिसत होता. तो बाथरूममधुन फ्रेश होऊन आला, तेव्हा त्याला लहान मुलाच्या बोलण्याचा आवाज आला. त्याने आवाजाचा अंदाज घेतला. तो आवाज त्याच्या बेडरूममधुन येत होता. तो एक एक पावलं टाकत बेडरूमच्या दिशेने जाऊ लागला. जस जसा तो बेडरूमच्या दिशेने जात होता, तसा तो आवाज आणखी स्पष्टपणे ऐकू येत होता.

“कोण आहे आत? समोर येऊन स्वतःबद्दल सांग...”

अमेय त्या आवाजाच्या दिशेने पाहून म्हणाला.

काही क्षणासाठी तो आवाज बंद झाला आणि अचानक सात आठ वर्षाचा मुलगा बेडरूमच्या उघड्या दारामधुन फिरताना दिसला. अमेय दचकला. पण पुढच्याच क्षणी तो धावत बेडरूममध्ये गेला. त्याने पाहिले तेव्हा बेडरूममध्ये कोणीही नव्हते. बेडरूमची खिडकी उघडी होती. तो खिडकीच्या जवळ गेला. खिडकीवर लावलेले पडदे हवेमुळे उडत होते. त्याने खिडकीतून खाली पाहिले. खाली त्याला कोणीही दिसले नाही. त्याच्या खिडकीतून “ए” विंगची बिल्डींग दिसत होती. त्याने पाहिले की ए बिल्डींगच्या खाली रोहिनी आरडा ओरडा करत होती. तिन ते चार नर्सांनी तिला धरून ठेवले होते. तिथे डॉ. सायमंडसुध्दा उभे असल्याचे त्याने पाहिले. ते रोहिनीला काहीतरी सांगत होते. अशा परीस्थितीत ते हिंसक रुग्णांना इंजेक्शन का नाही देत? असा प्रश्न अमेयला पडला. काही वेळ त्यांचं नाटक चाललं आणि नंतर ते रोहिनीला उचलुन बिल्डींगच्या आत घेऊन गेले.

अमेयला पुन्हा एकदा त्याच मुलाचा आवाज आला. परंतू यावेळी तो आवाज त्याच्या खोली बाहेरून येत होता. तो दबक्या पावलांनी दारापर्यंत गेला. त्याने आवाज न करता दार उघडले. हळुवार डोकावल्यावर दारा बाहेरच्या पॅसेजमध्ये तो मुलगा उभा असल्याचे त्याने पाहिले. त्या मुलानेसुध्दा त्याला डोकावताना पाहिले. त्याला पाहताच तो मुलगा जिन्याच्या दिशेने धावला. अमेयसुध्दा त्याच्यामागे धावु लागला. त्याच्या पायाच्या आवाजावरून तो कोणत्या दिशेला चालला आहे ते अमेयला समजत होते. अमेय जिन्यातुन त्याच्या मागे धावत होता. तिसऱ्या मजल्यावर जाऊन त्या पावलांचा आवाज त्या मजल्याच्या डेडहाऊसच्या दिशेने गेला. अमेयने पाहिले की दाराजवळ तो वॉचमनसुध्दा नव्हता आणि डेड्हाऊसचे दारसुध्दा उघडे होते. त्या मुलाला काही इजा होऊ नये म्हणुन अमेय त्याच्या मागे धावत गेला. परंतू आत आल्यानंतर त्याला तिथे कोणीही दिसले नाही. त्याने शेवटपर्यंत पाहिले मात्र त्याला कोणीही सापडले नाही.

तो परतताना त्याला समोर वॉचमन दिसला.

“परवानगीशिवाय तुम्ही इथे काय करत होता?”

वॉचमनने अमेयला विचारले. त्या लहान मुलाबद्दल त्याला सांगावे की नको, अशा प्रश्न अमेयला पडला. मात्र तिथे कोणीही दिसत नसल्याने त्याने वॉचमनला काही न सांगण्याचे ठरवले.

“परवानगी घेण्यासाठी तुम्ही नव्हता?” – अमेयने उत्तर दिले.

“तुम्ही इथं यावेळी काय करताय, हे मी तुम्हाला विचारू शकतो का?”

“रात्रीचा राऊंड घ्यायला आलो होतो.”

“हं... पुढच्या वेळी सही केल्याशिवाय आत जाऊ नका. असं केलेलं डॉ. सायमंडला आवडत नाही?”

******

इतर रसदार पर्याय