Shetkari majha bhola - 1 books and stories free download online pdf in Marathi

शेतकरी माझा भोळा - 1

१)शेतकरी माझा भोळा!
रात्रीची वेळ होती. अमावस्येचा अंधार सम्दीकडं पसरला होता. गावात सम्दीकडं सामसूम होती. रातकिड्यांच्या आवाजासोबत पारावरील पोथीकऱ्याने मधूनच उंचावलेला आवाज रातरची शांतता भंग करत होता. देवळात पाच-सात म्हाताऱ्या आणि चार-दोन म्हातारेच काय ते पोथीपुढे बसून होते. पारासमोरील घरात राहणारा गणपत बायकोशेजारी बाजेवर पडला होता.
"धनी, औंदा हायब्रीडीचा उतार लै चांगला यील आस वाटत..."
"व्हय. आज सम्दी हायब्रीड कापून टाकली हाय. उंद्या या फार तं परवाच्या दिसी खळं व्हईल. च्यार- आठ रोजात घर हायब्रीडीनं भरून जाईल बघ. पाय ठिवायला जागा राहणार न्हाई. आडचणच व्हईल बग..."
"व्हवू द्या हो. त्यो आनंद, त्ये समादान काही येगळंच आस्ते..." यसोदा आनंदानं बोलत आसताना बाहीर कोणीतरी आल्याची चाहूल लागली...
"गणपत...अरे, गणपत..." कुणी तरी घाबऱ्या घाबऱ्या आवाज देत व्हतं. गणपतनं दार उघडलं. पाहतो तर समोर नारबा उभा होता. फार लांबून पळत आल्याप्रमाणे नारबा म्हणाला,
"गणपत, अरे,पळ. लवकर वावराकडं चल. मी तिकडूनच येतोय. तुह्या वावरात फार मोठा जाळ झालायं."
"जाळ? माझ्या वावरात? आरं, खर बोल्तूस ना?"
"हो रे बाबा. म्या खोटं कहापायी बोलू. चल-चल पळ..."
यसोदाला न सांगताच दोघेही पळत सुटले. यसोदाने सम्द्ये ऐकले होते. नशिबाला दोष देत ती बसून ऱ्हायली. गणपत नारबाची धावपळ पाहून पारावर पोथी ऐकणारे बाहीर आले. एका म्हातारीने इच्चारले,
"काय झालं ग यस्वदे?"
"आग लागली म्हण आत्या शेतामंधी..."
"आर... आर...काय नशीब म्हणाव...?"
"पर शेतामंदी तर पीकबिक न्हाई ना!''
"न्हाई कावून! आजच हायब्रीड कापून टाकलंय की..."
"बाई..बाई.काय दैवाचा खेळ..."
शेजारच्या घरातून बाहेर आलेल्या दिराला पाहून रखमा म्हणाली, "दाजी, बघता का वो जाऊन?"
"आता मी जाऊन काय करणार हो? मी जाईपर्यंत आगीत सारं जळून जाईल की."
नारबासंग शेताकडं जाणाऱ्या गणपतला दुरून जाळ दिसत होता. विठोबा म्हण्ला,
"गणपत,जाळ लै मोठा झाला हाय की रं. मी आत्ताच इथून गेल्तो तव्हा येवढा मोठ्ठा न्हवता रं. "
"म्हंजी हायब्रीड जळाले की काय?" बोलत बोलत दोघे शेतात पोहोचले. कापून टाकलेल्या हायब्रीडचा ढीग पार धगधगत व्हता. खालपस्तूर सम्दा ढीग पेटला व्हता. जवळपास पाणीही नव्हतं.
"हाय रे देवा, कोण्या जलमाचा बदला घेतो रे? आर काय पाप केलें रे म्या? दोन एक्करात आलेला दिट लागायसारखा दाणा व्हता रे. आर, चोईस घंटे बी झाले न्हाईत हायब्रीड कापून. आजूक पुरं सपान बी फायल न्हाई..."
"गणपत, शांत हो. दमाने घे"
"काय दमानं घेऊ नाऱ्या? घात झाल रं घात झाला. कोणाच्या अध्यात ना मध्यात कोणी डाव साधला...."
"आरं नशिबाचा...."
"मह्याच मागं कामून लागलं रे नशीब हात धुवून?" दोघांचे असं बोलणे सुरू आसताना जाळ हलकेच थंडावत व्हता. ढिगात कुठं कुठं कंदिलाच्या वातीप्रमाणे जाळ दिसत होता..."
"चल, गणपत. घरी जाऊ."
"आता काय त्वांड दावू रं यस्वदीला?? आरं आताच सपान बघितलं आम्ही.. पर आता काय सांगू?"
"चल, अंधारात काय करावं?"
"आर जिंदगानीत झालेल्या आंधारापरीस ह्यो आंधार बरा हाय. कोनाला काळं त्वांड तर दिसत न्हाई."
नारबाने बळेच गणपतला उठवले आणि दोघेही शेताबाहेर आले. विठोबाने पुन्हा एकदा मागे वळून फायले. त्याच्या स्वप्नाची राख करणारी हायब्रीडची राख त्याला स्वत:च्या राखेप्रमाणे दिसली. दोघे रस्त्याला लागले. त्या भयाण शांततेत दोघांचे श्वास एकमेकांशी संवाद साधत होते.
हे काम नक्कीच राम्याचे आसल. ल्हानाभाऊ हाय पर पक्का वैरी बनला हाय... मनात विचार येताच विठोबा नकळत मागे गेला.....
सकाळचे नऊ वाजत होते. सकाळी सकाळी शेताकडे गेलेला गणपत शेतातून परतला त्याने यस्वदाला इच्चारले, "राम्या उठला न्हाई?"
"न्हाई. रात्री उशिरा आल्ते. लागली आसल.."
"ह्ये रोजचंच हाय. आता त्येच लगीन झाल हाय. तव्हा जरा त्यान पाहाय नग..."
"लगीन झालं म्हंजी लै मोठे झाले व्हय? हसण्या-खेळण्याचं वय हाय. जलमभर हायेच की वावर आन सौंसार!"
"तू लईच लाडावून ठेवलं हाय बग, राम्याला. पर आता मला बी मदत पायजेत का न्हाई? लहानपणीच आमचा बाप मेला तवापासनं आता बायको येईस्तो सांभाळलं. आता त्येनं..."
"काय झालं दादा, ओरडायला?" बाहेर येत राम रागारागाने म्हण्ला.
"काय म्हण्लास राम्या?"
"मग काय म्हणू? उठलो न्हाई तर तुझी भनभनी सुरू."
"भनभनी आन् मझी? चौदावी, पंद्रावी शिकवलं तुला. कव्हा पेंडी थी टाकू देली न्हाई ढोराम्होर. आन लगीन झालं की लागला...."
"हे बघ दादा, लहानपणी बापू गेला. चार वर्षानी माय गेली. तू मोठा व्हतास. तू कर्तव्य केलस. तुझ्या जागी मी असतो तर मी नसतं तुला सांभाळलं?"
"पर म्या कुठ काय म्हंतो? पर आसं बघ राम्या, आता मला बी कट्टाळा येतुया रं. त्वा फाटे फाटे एखांदी चक्कर वावराकडं टाकली तर बिघडलं काय?"
"दादा, ती शेतीची कामे माझ्याने होणार नाहीत."
"मंग काय ईच्यार हाय तुहा?"
"मी शहरात नोकरी करणार. मला माझा वाटा दे. तुला त्रास होतोय ना, वाटणीमुळे तुझ्याकडचं शेत कमी राहील अन्..."
"काय झालं धनी? काय पेटलं होतं..." यस्वदाच्या आवाजाने भानावर आलेल्या गणपतनं समोर फायलं. घरापुढे बरीच माणसे जमली होती. त्यात रामा दिसताच गणपत ओरडला,
"यस्वदे, कोण्या वैऱ्यानं डाव साधला ग. कापून टाकलेल्या धानाची नुसती राख झाली. आपलं सपान बी जळालं ग..."
"आरार्र! वाईट झालं की."
"आरं, पाटलाला सांगावा धाडा. फाटे वर्दी..."
"काय व्हणार हाय वर्दी देऊन. मला ठाव हाय वैरी. आपलच दात अन् आपलाच व्हट. नग पोलिस."
गणपतच्या नशिबाला दोष देत एक-एक जण निघून गेले. सर्वांनी सहानुभूती दाखवली. रामा आणि त्याची बायको एक शब्द न बोलता निघून गेले. गणपत आणि यस्वदा घरात गेले...
खोलीतल्या कंदिलाच्या उजेडात दोघांनी येकमेकांकड फायले. दोघांचेही डोेळे पाण्यानं भरलेले व्हते. यस्वदाने गणपतला मिठी मारली आणि ती हमसून रडू लागली... दोगं बाजेवर पडले! गणपतने डोळे लावले. त्याला आठवले...
गणपतपेक्षा चार वर्सांनी ल्हान असणाऱ्या रामाला लग्नापूर्वी गणपतनं आणि गणपतचं लगीन झाल्यानंतर यस्वदाने कंधी आई-बापाची उणीव भासू दिली नाही. पाठच्या भावाप्रमाणे तिने रामाला वागवले. तिचे लगीन झाले तव्हा रामा कालीजात व्हता. कालेजला जाण्यासाठी त्याला लवकर जाया लागायचं. फाटे उठून यस्वदा आंधी त्येचा डब्बा करून देई. सांच्यापारी रामा कालीजातून येईस्तोर गरमागरम जेवण तयार ठेवायची. कधीही न थकता त्याचं कालीजचं शिक्शान होईस्तोर चार वर्से सारे केले. रामाचे लगीन झाले आणि आवघ्या सहा म्हैन्यात ती फाट का उगवली याचं कोडं तिला नेहमी पडायचे. त्या दिवशी सकाळी सकाळी सहज बोल्ता बोल्ता भावा-भावातला वाद वाढला. वरवर सहज वाटणारा तो वाद रामाने ठरवून केला आसल्याच त्येच्या बोलण्यातून सपष्ट कळत व्हतं.
"दादा, माझी वाटणी मला दे. मग तुला काय कमी...."
"काय म्हन्लास राम्या. वाटणी फायजेत?"
"व्हय. मला वाटणी फायजेत... शेताची... घराची बी."
"राम्या. टकुरं ठिकाणावर हाय का?"
"दाजी, हे काय बोल्ता व्हय? येड लागलं तर नाय, अव्हो, तुमच्या बिगर हे घर..."
"मग काय या घरातच मरू?"
"राम्या, थोबाड सांभाळ..."
"मग माझा वाटा दे."
"राम्या, शिकल्याली बायकू झाली म्हून इतक बी तिच्या नादाला लागून..."
"दादा मला वेळ नाही. काय ठरवलंस?"
"वाटणीच कहापायी? पायजेत तर समद...!"
"मला भीक नको."
"ठीक हाय. बोलाव पंचांना."
पडत्या फळाची आज्ञा घेत आर्ध्या तासात रामानं पंच मंडळी जमवली. प्रथम शेताची वाटणी झाली. सोळा एक्करचे दोन तुकडे झाले. धाकटा असल्यामुळे वाटणी उचलायचा मान रामाला मिळाला. त्याने वरच्या बाजूचा चांगला तुकडा घेतला. घराचीबी वाटणी झाली. दुखीकस्टी व्हत गणपतनं ती वाटणी घेत्ली... च्यार-सा म्हैन्यानं रामाला शेहरात नवकरी लागताच हिश्श्याला घर आन् वावर ईकून शेहरात निंघून गेला. जाताना एक सब्द बी दोगं नौरा-बायकू गणपतला वा यसोदाला बोलले न्हाईत...
०००

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED