कॉन्स्टेबल विजय जेव्हा नदीकाठावर पोहोचला तेव्हा पावसाचा जोर वाढला होता. त्याच्या सोबत त्याचे मित्र राजन, सोनू आणि सखाराम सुद्धा होते. नदीकाठावर जाऊन तिथेच चूल पेटवून मस्तपैकी मटण बनवण्याचा त्यांचा प्लॅन होता. सर्व सामान घेऊन ते घरातून निघाले. पण ते वाटेत असतानाच पावसाने हजेरी लावली व त्यांचा उत्साह ओसरला. ते जेव्हा नदीकाठी पोहोचले तेव्हा चौघेही पूर्ण भिजले होते. तिथेच गाड्या लावून ते एका मोठ्या झाडाखाली थांबले. एवढ्या दूर येऊन परत माघारी जाण्यापेक्षा पाऊस थांबायची वाट पाहत ते त्या झाडाखालीच थांबले होते. त्यांना येऊन बराच वेळ झाला होता. अजूनही पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. विजय वैतागून म्हणाला, “च्यायला आपलं नशीबच खराबाय. म्हनुनच माझं परमोशन होईना. येवढा मस्त मटनाचा प्लॅन केलता तर या पावसानं घान केली.” “परमोशनसाठी चोर पकडावा लागतो. तू किती चोर पकडलेत ते सांग आदी.” सोनू विजयला चिडवत म्हणाला. हे ऐकून विजय चिडला व सोनूच्या मागे धावत सुटला. सोनू काही त्याच्या हातात आला नाही. सोनू पळत पुन्हा झाडापाशी आला. “कशाला चिडवतो रे त्या विज्याला. तुला माहितीये ना तो किती तापतो?” सखाराम सोनूला म्हणाला. सोनू अजूनही हसत होता. आता विजयही धापा टाकतच झाडापाशी आला. त्याला चांगलाच दम लागला होता. त्यामुळे त्याचं वाढलेलं पोट वर खाली होत होतं. तो अजूनही सोनूकडे रागाने पाहत होता. शेवटी राजनने त्याला शांत केलं. विजय जेव्हा पोलीस खात्यात भरती झाला तेव्हा चांगलाच सडपातळ होता. पण जशी जशी वर्ष सरत गेली तशी विजयच्या अंगातली चरबीही वाढत गेली. विजय मुळातच मुलखाचा आळशी होता. आपलं प्रमोशन व्हावं अशी त्याला तीव्र इच्छा होती मात्र त्यासाठी कष्ट करायची मात्र त्याची तयारी नव्हती.
पाऊस थांबला तसे चौघेही खुश झाले व मटणाच्या तयारीला लागले. विजय अर्थातच नुसता बसून होता. बसून बसून कंटाळा आला तेव्हा तो उठला व एक फेरफटका मारण्याच्या उद्देशाने चालू लागला. थोडा पुढे गेल्यावर त्याला तीन सायकली दिसल्या. त्यातली एक सायकल त्याने ओळखली. ती विजयच्या शेजारी राहणाऱ्या विनूची सायकल होती. ‘ही पोरं इथं काय करतायत? तेबी येवढ्या रात्री?’ विजयला प्रश्न पडला. तेवढ्यात रस्त्यावरून एक कार येताना त्याला दिसली. ती लाल रंगाची कार त्याने ओळखली. विजय एका झाडामागे लपून पाहत होता. कार थांबली व बळवंत मास्तर कारमधून उतरला. त्याने आजूबाजूला नजर फिरवली व बंगल्याच्या दिशेने चालू लागला. त्याला पाहताच एक वेगळीच शंका विजयच्या मनात आली. त्या मुलांच्या सायकली आणि आता हा बळवंत मास्तर बंगल्याकडे जातोय. हा या मुलांना ड्रग्स तर देत नसेल ना? तसं असेल तर त्याला रंगेहात पकडायची आयतीच संधी आहे याची विजयला जाणीव झाली. तो परत झाडापाशी गेला. सखाराम आणि सोनू चूल लावण्यात मग्न होते. राजन एकटाच झाडाखाली बसला होता. विजय राजनला म्हणाला, “आर राजन चल लवकर. मी त्या बळवंत मस्तराला रंगेहात पकडनारे.” “आर तू काय बोलतोय मला कायबी कळना झालंय.” राजन म्हणाला. “आर तू फकस्त माज्याबरोबर चल. बाकी काय इचारु नको.” असे म्हणून विजयने राजनला हाताला धरून ओढतच नेला. राजन नाईलाजाने त्याच्या मागून चालू लागला.
ते चालतच बंगल्याच्या दिशेने जाऊ लागले. बंगल्याकडे चाललेला बळवंत मास्तर त्यांना दिसला. बंगल्याच्या प्रवेश द्वारातून आत जाताच बळवंतने त्याच्या जवळच्या पिशवीतून एक पुडी काढली व त्या पुडीतील भुकटी प्रवेशद्वाराखाली शिंपडली. बळवंत पायऱ्या चढून वर गेला व त्याने बंगल्यात प्रवेश केला. हे पाहताच विजयच्या मनातला संशय अजूनच वाढला. हा काहीतरी भानामतीचा प्रकार आहे याची जाणिव त्याला झाली होती. आता पुढे जाणं धोक्याचं होतं. नदी ओलांडून पलीकडे गेलं की दुसऱ्या गावाची हद्द सुरू व्हायची. त्या गावात एक मांत्रिक होता. विजय आता या मांत्रिकाचीच मदत घेणार होता. विजयने राजनला तिथेच थांबायला सांगितलं व तो स्वतः धावतच त्याच्या मोटरसायकल पाशी पोहोचला. विजयला पाहताच सखरामने त्याला हाक मारली. पण विजयला मात्र आता थांबायला वेळ नव्हता. त्याने गाडीला किक मारली व काही क्षणातच तो पूल ओलांडून नदीच्या पलीकडे गेला.
थोड्या वेळातच विजय मांत्रिकाला बरोबर घेऊन आला. दोघेही बंगल्यापाशी आले. त्यांना पाहताच झाडामागे लपलेला राजन बाहेर आला. इतक्या वेळात काहीच हालचाल झाली नसल्याचं राजनने विजयला सांगितलं. तिथे पोहोचताच मांत्रिकाने पुढे जाऊन त्या राखेवरून नजर फिरवली व तो विजयकडे पाहून म्हणाला, “आप आगे नही गये ये आपने आच्छा किया. नहीतो आपके पेर जल जाते.” हे ऐकून विजय व राजनच्या अंगावर काटा आला. विजय मंत्रिकाला म्हणाला, “तुमीच आता कायतरी करा. कायबी करून आमाला बंगल्यात जायचं हाय.” मांत्रिकाने त्याच्या खांद्यावर अडकवलेल्या पोतडीतून एक डबी बाहेर काढली व त्या डबीतला द्रव त्या भुकटीवर शिंपडून तोंडाने काही मन्त्र पुटपुटले. मांत्रिकाने एक पाऊल प्रवेशद्वारातून आत ठेवलं. काहीच झालं नाही. भुकटीची शक्ती आता निकामी झाली होती. मांत्रिक प्रवेशद्वारातून चालत पुढे गेला. विजय आणि राजनही त्याच्या पाठोपाठ आत आले. आता ते बंगल्याच्या मुख्य दरवाजासमोर उभे होते. तिघेही भिंतीमागे लपले. सर्वात पुढे विजय उभा होता. त्याने हळूच आत डोकावून पाहिले. एका कोपऱ्यात खुर्चीवर म्हातारी बसली होती. तिच्या समोर बळवंत मास्तर उभा होता. तो तिच्याशी काहीतरी बोलत होता. त्याचा आवाज विजयपर्यंत नीट पोहचत नव्हता. त्यामुळे तो नक्की काय बोलतोय हे कळायला मार्ग नव्हता. पण “आज्जी” हा शब्द एकदोनदा विजयच्या कानावर आला यावर ती म्हातारी बळवंत मास्तरची आजी असावी असं विजयला वाटत होतं. थोड्या वेळाने बोलून झाल्यावर बळवंत तिथून स्वयंपाकघराच्या बाजूच्या खोलीत गेला. तो जाताच म्हातारीने डोळे मिटले. तिचा चेहेरा फारच आनंदी दिसत होता.
म्हातारीला झोपलेला पाहून विजय मांत्रिकाला म्हणाला, “त्या म्हातारीला कायबी करून बेशुद करा. ती जर मधेच उठली तर आपला खेळ खलास होईल.” मांत्रिक अतिशय हळुवारपणे एकेक पाऊल टाकत आत गेला व म्हातारीजवळ जाताच त्याने त्याच्या पोतडीतून एक पुडी बाहेर काढली. तोंडाने काही मंत्र पुटपुटले व ती पुडी उघडून म्हातारीच्या तोंडासमोर धरून फुंकर मारली. पुडीतील भूकटी म्हातारीच्या नाकात गेली. मांत्रिकाने हाताने खूण करताच विजय आणि राजन चोरपावलाने खोलीत आले. खोलीच्या मधोमध एक मोठा खांब होता. तिघेही त्या खांबाआड लपले. विजय सर्वात पुढे उभा होता. त्याला समोरच्या खोलीच्या दारातच पाठमोरा उभा असलेला बळवंत दिसला. विजय तसा दूर उभा होता व त्यात बळवंत दारातच उभा असल्यामुळे विजयला पूर्ण खोली पाहता येत नव्हती. त्याला फक्त पाठमोरा उभा बळवंत व खुर्चीला बांधलेला विनू दिसत होता. बळवंत मध्ये उभा असल्यामुळे विनूही अर्धाच दिसत होता. बळवंत काहीतरी सांगत होता. बळवंतचा आवाज विनूला स्पष्ट ऐकू येत नव्हतं. तो कोणत्यातरी गुब्बू नावाच्या मुलाची गोष्ट सांगतोय हे बऱ्याच वेळाने विजयला समजलं. गोष्ट संपताच तो बळवंतला रंगेहात पकडणार होता. विजय आता मनोमन प्रमोशनची स्वप्न रंगवत होता. प्रमोशनच्या नुसत्या विचारानेच त्याच्या अंगात उत्साह संचारला होता. ‘कायबी झालं तरी आता या नालायकाला सोडनार नाय.’ असे मनात म्हणून विजयने म्हातारीच्या खुर्चीच्या बाजूला ठेवलेली काठी उचलली व तो परत खांबाच्या मागे येऊन थांबला. बराच वेळ झाला तरी बळवंत अजूनही बोलतच होता. आता विजयची सहनशक्ती संपली होती. तो पुढे गेला व पूर्ण ताकदीनिशी त्याने काठी बळवंतच्या डोक्यात हाणली. त्याच क्षणी बळवंत खाली कोसळला. त्याचं डोकं फुटून रक्त वाहात होतं. काही मिनिटातच बळवंतने प्राण सोडला.
आपल्याकडून किती मोठी चूक झाली आहे हे विजयला समजलं होतं. विजयने खरंतर बळवंतला बेशुद्ध करायच्या उद्देशानेच काठी मारली होती पण घाव थेट वर्मावरच लागल्याने बळवंतचा खेळ खल्लास झाला होता.
विजय बराच वेळ डोकं धरून बसला होता. एवढी मोठी संधी त्याने त्याच्या मुर्खपणामुळे घालवली होती. प्रमोशन तर आता फारच लांबची गोष्ट होती. जे काही घडलं होतं ते जर गावात कुणाला कळालं तर नोकरी तर गेलीच शिवाय पूर्ण आयुष्य तुरुंगात. “आता जे झालं ते झालं. अन तू काय मुद्दाम मारलं नायस ना. मग कशापायी उगी तरास करून घेतो. अन तसही तो बळवंत नालायकच होता. उलटा तूच त्या पोरांचा जीव वाचवला.” राजन विजयच्या जवळ गेला व त्याला समजावत म्हणाला. हे ऐकताच एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. खरच की, आपण तर उलट या निष्पाप मुलांना त्या राक्षसाच्या तावडीतून सोडवलंय. आपण कुणाचा तरी जीव वाचवलाय या विचारानेच विजयच्या मरगळलेल्या पश्चातापदग्ध मनाला नवी उभारी आली. विजय उठून उभारला व त्याने आजूबाजूला पाहिले. राजन त्याच्या बाजूला उभा होता. मांत्रिक केव्हाचाच पळाला होता. म्हातारी खुर्चीवर अजूनही झोपल्यासारखी दिसत होती. विजय समोरच्या खोलीत गेला. समोर तीन खुर्च्यांवर तीन मुलं बसली होती. तिघांचेही हात, पाय व तोंड बांधलं होतं. विजयने त्यांना सोडवलं. तिघेही विजयकडे आदरपूर्वक नजरेने पाहात होते. त्यांच्या जवळ जात तो म्हणाला, “हे बघा पोरांनो, तुमी आज जे काय बी पाहिलं ते कुनालाबी सांगायचं नाही. समजलं?” तिघांनीही मान हलवली. खरंतर हे सांगायची काहीच गरज नव्हती.
आता राजन व विजयपुढे दोन प्रश्न उभे होते. बळवंतच्या मृत शरीराची विल्हेवाट काशी लावायची आणि म्हातारीचं काय करायचं. विजय म्हातारीजवळ गेला व त्याने हळूच म्हातारीचं मनगट हातात घेतलं तिची नाडी तपासायला. नाडी बंद होती. म्हातारी खुदाला प्यारी झाली होती. मांत्रिकाच्या भुकटीमुळे म्हातारी मेली असावी असा विजय आणि राजनचा समज झाला होता. पण तसं नव्हतं. त्याआधीच म्हातारीने प्राण सोडला होता. “आज्जी तू काहीच काळजी करू नकोस. आता मला आयते तीन तीन सावज मिळाले आहेत. आता पुढची तीस वर्ष तरी तुला मरण नाही.” असे जेव्हा बळवंत तिला म्हणाला तेव्हा आपण अजून तीस वर्षे जगणार या विचारानेच तिला अतिआनंद झाला होता व या आनंदानेच तिचा घात केला.
आता विजय आणि राजनसमोर एका ऐवजी दोन मृतदेह होते. बराच वेळ विचार केल्यावर बंगल्याच्या मागेच खड्डा खणून मृतदेह पुरायचा त्यांनी निर्णय घेतला. विजय, राजन आणि तिन्ही मुलं बंगल्याच्या बाहेर आली. “पोरांनो आता तुमि जावा तुमच्या घरी. मी काय बोललो ते फकस्त ध्यानात ठिवा.” विजय म्हणाला. विजय व राजनचे आभार मानून सनी, नंदू आणि विनू तिथून निघाले.
विजय आणि राजननी दोन्ही मृतदेह पोत्यात भरले व ते ओढतच बंगल्याच्या मागच्या बाजूला घेऊन आले. खड्डा खणायला त्यांना बराच वेळ लागला. एकदाचे मृतदेह खड्यात पडले व दोघांच्याही मनावरचं ओझं कमी झालं. खड्डा बुजवून ते नदीकाठावर परतले.
“आर कुठं गेलता येवडा येळ? तुमची वाट बघून आमी दमलो राव! शेवटी राहवना म्हनून पोट भरून घेतल. आता बसा तुमीबी जेवाया.” दोघांच्या घामेजलेल्या चेहेऱ्यांकडे पाहत सोनू म्हणाला. “लय मोठी स्टोरी हाय! सांगीन कवातरी.” विजय म्हणाला व खाली चटईवर बसून दोघांनीही मटणाच्या तुकड्यांवर ताव मारला.
सलग चार दिवस बळवंत मास्तर शाळेत आले नाहीत. त्यांचा फोनही लागत नव्हता. मुख्याध्यापकांनी त्यांच्या घरी शिपाई पाठवले पण घराला कुलूप होतं. त्यांना आता काळजी वाटत होती. पण बळवंत मास्तरांचा कुठेच पत्ता लागत नव्हता.
रविवारचा दिवस उजाडला. आज कामावर जावं लागणार नाही म्हणून विजय खुश होता. सकाळचे नऊ वाजले होते तरी तो निवांत लोळत पडला होता. त्याने सहजच खिडकीतून पाहिले तेव्हा त्याला त्याचा मित्र शंकर येताना दिसला. शंकरला येताना पाहताच विजय उठून बसला. “बातमी कळली का रे?” शंकर दारात उभा राहूनच म्हणाला. “कसली बातमी?” विजयने विचारलं. “त्या बळवंत मास्तरची रे.” एका हाताने सँडलचा पट्टा सोडवत शंकर म्हणाला. बळवंत मास्तरचं नाव ऐकताच विजयच्या हृदयाची धडधड अचानक वाढली. इतकी की स्वतःच्या हृदयाचे ठोके सुद्धा तो ऐकू शकत होता. “काय झालं त्येचं?” विजय कसाबसा म्हणाला. “बळवंत मास्तर सहा दिवसांपासून बेपत्ता झालाय हे तुला माहीतच असेल पण आज पहाटे घाटोळांची मेघा कपडे धुवायला नदीकाठावर गेली होती. तिला तिथे बळवंत मास्तराची ती लाल कार दिसली. मास्तरला उलट्या पायांच्या म्हातारीने खाल्लं असंच आता सगळे म्हणतायत.” हे ऐकताच विजयच्या जीवात जीव आला. शंकर पुढे बोलला “मलापण तेच वाटतंय. पण या बळवंत मास्तराला कोणी सांगितलं होतं तिथे तडमडायला! तू सांग ना तुला काय वाटतंय खरच उलट्या पायांच्या म्हातारीने खाल्ला असेल मास्तरला?” शंकरने विजयला प्रश्न विचारला. पण विजय काहीच बोलला नाही, तो फक्त हसला.
समाप्त