अग्निदिव्य - भाग १ Ishwar Trimbak Agam द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अग्निदिव्य - भाग १

भाग १


साल १६६६ ची सुरवात, आदिलशाहीच्या अखत्यारीतील मंगळवेढा किल्ला मराठी फौजेने काबीज केला होता. त्यावर मुघलशाहीचा चांदतारा फडकत होता. आजूबाजूला अजस्र मोगली सेनासागर डेरेदाखल झाला होता. तर मंगळवेढानजीक कृष्णा नदीकिनारी मराठ्यांची छावणी पडली होती. विजारपूरचा पराक्रमी सेनापती सर्जा खान याच्याकडून नामुष्कीचा पराभव झाल्यामुळे दिलेरखान संतापला होता. मोगलांना मानहानीकारक माघार घ्यावी लागली होती. त्यातच त्याला कुठूनतरी कुणकुण लागली कि, मराठ्यांची सर्जाखानाला अंतस्थ हातमिळवणी आहे. परिणीती, त्याचा शिवाजी राजांवरचा संशय बळावला. आणि त्याची घातपाती कारस्थानं शिजू लागली.

संध्याकाळची वेळ होती. किल्ल्याच्या बाहेर काही अंतरावर मिर्झाराजे जयसिंग आपल्या डेऱ्यात चिंतातुर बसले होते. पराभवाची कधीही सवय नसलेल्या मिर्झा राजेंना हा पराभव, ही माघार जिव्हारी लागली होती. सारी हयात रणांगणात आणि राजकारणात मुरलेला मातब्बर..! उतार वयात मात्र या पराभवाने पुरता खजील झाला होता. तोच दिलेरखान वर्दी न देता त्यांचा देऱ्यात ताडताड पावलं टाकत दाखल झाला. हाताच्या मुठी आवळलेल्या, डोळ्यांत अंगार. आधीच अफगाणी गुलाबी रंग, त्यात रागानं पूर्ण चेहरा लालबुंद झालेला. खानाचे छातवाण दुरून चालत आल्यामुळे आणि जोराच्या श्वासोच्छ्वासाने धपापत होत. कमरेवर हात ठेवून बेदरकार नजरेनं तो मिर्झाराजेंकडे पाहत म्हणाला,

"क्यूँ राजाजी? अब क्यों खामोश बैठे हो?"

"अभी भी आपको उस काफर सीवा पर विश्वास है। जो दुश्मन आदिलशाह से मिला हुआ है | अगर ऐसा ना होता तो, इतनी बडी मुघलोंकी फौज कैसे हार गयी? हमारे दस बारा हजारकी मुघली सेना आपके सामने काट दि गई ।"

"ताज्जूब कि बात है, कि उसके बावजुद भी आप चूप हो?"

"दिलेरखां, अपनी जबान को लगाम दो। किसके सामने खडे रहकर बात कर रहे हो? तमीज सिखाने की उमर नहीं है तुम्हारी?", मिर्झाराजे त्यांच्या घोगऱ्या आणि दमदार आवाजात गरजले.

"आप कुछ भी कहे, मगर हम अब चूप नहीं बैठेंगे। हमने आपसे पहले भी कहा था और आज भी कहते है की, उस काफर दगाबाज सीवा को हमारे हवाले कर दिजीए। आज ही हम उस काफर को ऐसी मौत..."

"खमोश ...", ताडकन आपल्या आसनावरून उठून राजाजी कडाडले.
"दिलेर खां, इसके आगे गर एक भी लब्ज कहा, तो हमारी तलवार को हम भी ना रोक सकेंगे।"

"दफा हो जाओ यहाँ से और सिवाजी राजे के बारे मे सोचना भी मत। गर उनका बाल भी बाका हुआ तो हमसे बुरा कोई ना होगा |"

"ये तो वक्त बतायेगा मिर्झाजी |"

आल्या पावलं फुत्कार सोडत दिलेरखान तडक निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव राजाजींनी नेमके हेरले होते. दिलेरखानाचा कपटी स्वभाव मिर्झाराजे पुरेपूर जाणून होते आणि त्यामुळेच ते आणखी चिंतीत झाले. दिलेरखान जातो न जातो तोच घटकाभरात एक हुजऱ्या, शिवाजी राजे भेटीसाठी आले आहेत म्हणून सांगून गेला. मिर्झाराजे आणि राजांची दिर्घ चर्चा चालू होती. एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेऊन राजांनी मिर्झाराजेंकडे पन्हाळा मोहिम आम्ही फतेह करू, म्हणून विनंती केली.

"राजाजी, हमे भी इस बात का अफसोस है। इसलीये, हम चाहते है, की आप हमपर कोई स्वतंत्र मूहिम की जिम्मेदारी दे |और सर्जाखान से हुई हार का बदला हम ले सके।"

"हम भी यही सोच विचार कर रहे है, की.."

मिर्झाराजेंच बोलणं अर्धवट तोडत राजे हिंदुस्तानी भाषेत म्हणाले,
"माफ किजीए राजाजी लेकीन, यही सही मौका है पन्हाळा जैसे बुलंद किले पर कूच करके फतेह हासिल करने का। एकबार किला हात मे आ गया, तो हम कभी भी आदिलशाह पर अपना धोंक जमा सकते है |"

शिवरायांची बिनतोड मसलत मिर्झाराजेंना पसंत पडली. दिलेर खनाच्या कपटी करस्थानापासून राजांना दूर ठेवण्यासाठी त्यांनी सहमती दिली आणि संधीचा फायदा उठवत राजांनी रातोरात छावणी सोडली. कारण, दिलेरखानाने शिजवलेला घातपाताचा कट राजांना आधीच कळला होता. राजांकडे पाच हजारांच्या आसपास सैन्य होतं. सोबत नेतोजी पालकर, येसाजी कंक, प्रतापराव गुजर अशी एकापेक्षा एक मातब्बर मंडळी होती. राजांचा पहिला मुक्काम अशा ठिकाणी आणि एवढ्या अंतरावर पडला होता, कि दिलेरखानाला जरी सुगावा लागला तरी मोगली फौज घेऊन या ठिकाणी पोहोचायला त्याला दोन प्रहर लागले असते.

क्रमशः