Novel - Premaachi Jaadu Part - 5 books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी - प्रेमाची जादू - भाग -५ वा

कादंबरी – प्रेमाची जादू

भाग -५ वा

----------------------------------------------------------------

यशच्या घरची सकाळ अगदी साडेपाचला होते , सकाळचे फिरणे , असे फिरून आल्यावर

बंगल्याच्या भवती मोठ्या प्रेमाने फुलवलेली बाग, त्या बागेतील झाडांना पाणी देणे ,

देवपूजेसाठी ताजी फुले तोडून ठेवणे ..

या कामात गुंतणे घरातील प्रत्येकला आवडते .

त्यामुळे ..या विषयावर त्यांच्यात रोज वाद होतात ..आज माझा नंबर आहे , मी

झाडांना पाणी देणार .. कारण .बागेत जी झाडे आणि वेली आहेत ..त्या यातल्या एकेकाने

आणून लावल्या आहेत ..त्यामुळे बागेंत फिरून झाडांना पाणी देणे हे सगळ्यांचे आवडते

काम.

यशचे बाबा रिटायर्ड झाले आणि त्यांनी हे काम स्वतःच्या हातात घेत ..सांगून टाकले ..

रोज सकाळी मोर्निंग –वॉक करून आलो की मी बागेत फिरणार ,झाडांशी बोलत बोलत

पाणी देणार आणि मगच पहिला चहा घेणार . माझ्या या कामात कुणी मध्ये मध्ये

अजिबात करायचे नाही.

तसे तर आठवड्यातून दोन वेळा माळी-काका येत असतात ,आणि साफ -सफाई करतात

या निगराणीमुले यशच्या बंगल्यातली बाग .आजूबाजूच्या परिसरातल ..सुंदर ,सुशोभित

अशी बाग म्हणून फेमस होती.

या बागेत येऊन बसले कि मन खूप प्रसन्न होते . वेगवेगळे पक्षी येऊन बसायचे ,त्यांना

पहाण्यात वेळ चिमणीसारखा भुर्रकन उडून जातो “ असे या बागेत येणारा बोलून दाखवल्याशिवाय

राहत नाही.

शहरातील पर्यावरण-प्रेमी , निसर्ग-प्रेमी , फुलांचे रसिक ..यशच्या घरी आवर्जून येतात आणि

बागेत बसण्याचा मस्त अनुभव घेऊन जातात . या बागेत खेळता –बागडता येत नाही ,

पण.मोठ्या माणसांना थोडावेळ बसण्याची परवानगी होती . त्यामुळे संध्याकाळच्या वेळी

आजूबाजूचे परिचित लोक येतात , यशचे आई-बाबा आणि त्यांच्या मित्रांच्या छान गप्पा रंगतात .

या बागेच्या कोपर्यात एक मोठा हॉल आहे , भारतीय बैठक व्यवस्था असलेला ...शंभर –दोनशे

अगदी सहज बसतील असा हा हॉल, खूपच उपयोगी आहे ..कारण

यशचे आई-बाबां शहरातील अनेक साहित्यिक मित्र-मंडळ , संगीत –संस्था मित्र मंडळ ..यांच्याशी

जोडले गेले आहेत . अनेक संस्थांचे ते सक्रीय पदाधिकारी आहेत . त्यामुळे ..त्यांच्या या हॉलमध्ये

अनेक सांस्कृतिक –उपक्रम , कार्यक्रम नेहमीच होत असतात .

कुठेच काही जागा उपलब्ध नाही झाली तर शेवटी सर्वानुमते ..हक्काची जागा ..यशचा हॉल “,

त्यामुळे महिन्यातून किमान दोन –वेळा ..विशेषता रविवार या एका वारी

एखाद्या गायक-कलावंताची मैफिल ठरवली जाई .. हे आता सगळ्यांना माहिती होते ..

या हॉलमध्ये गर्दी नसेल ..

..पण दर्दी आणि रसिक यांची नजरेत भरणारी छोटीशी गर्दी नक्कीच असते .

साहित्य परिषदेचे व्याख्यान , कविसंमेलन ..असले की मात्र हॉल अपुरा पडायचा ..असा ही माहौल

अनुभवायला मिळतो .

यशच्या बाबांनी सगळ्यांना सांगून ठेवले होते -

इथे कार्यक्रम जरूर करा ..पण..दिलेल्या वेळा आणि आजूबाजूच्या रहिवाशांना अजिबात त्रास होणार

नाही याची काळजी घेत कार्यक्रम केला पाहिजे ..तो तसा झाला पाहिजे ..

यशचे बाबा अशा बाबतीत अतिशय कठोर आणि सपष्ट बोलणारे ..कारण..जो कुणी हे नियम

पाळण्यात चुकला “ त्याला पुन्हा इथे कधीच कार्यक्रम करण्यास मिळणार नाही “ हे माहिती असायचे .

सुरुवातीला परिसरातील काही लोकांनी आक्षेप घेऊन पाहिला ..पण, जस जसे नियमितपणे कार्यक्रम होऊ लागले

तेव्हासगळ्यांना ..दिसू लागले की..या निमित्ताने शहरातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती ..

आपला मोठेपणा विसरून इथे अगदी सहजपणे ..सगळ्यांच्या सोबत कार्यक्रमाचा आनंद घेत असतात .

या उपक्रमामुळे ..यशचे आई-बाबा सगळ्या वर्तुळात परिचित तर होतेच ..त्यापेक्षा त्यांच्या

मनाच्या मोठेपणाच्या दर्शनाने सगळे प्रभावित होऊन जातात .

यशच्या घरी होणारा कार्यक्रम अगदी शंभर टक्के – “यश –दायी “ होणार याची सगळ्यांना खात्री झालेली होती.

लहानपासुनच सुधीरभाऊ आणि यश या दोघांनी आई-बाबांच्या या कार्याचे महत्व ओळखून त्याला

मदत करण्याचे ठरवलेले होते . याचा एक मोठा फायदा हा झाला की..

आई-बाबा या दोघांना सांगत ..

अरे यश येत्या पंधरा तारखेला ..कार्यक्रम आहे ..आपल्या हॉल मध्ये घेण्याचे ठरले आहे.

तो संगीताचा कार्यक्रम आहे की साहित्यिक ..हे स्वरूप सांगितले की..सुधीरभाऊ ,यश आणि त्याचे

मित्रमंडळी कार्यक्रमाच्या तयारीला लागत .

यशच्या बापू –आजोबंना हे खूप आवडायचे ..आजींना या सगळ्या गोष्टींची आवड होती.

एका कार्यक्रमानंतर उपस्थित रसिकांच्या समोर बापू-आजोबा उभे राहत म्हणाले -

आज मी यशच्या आई-बाबांना आणि तुम्हा सर्वांना एक सुचना आणि विनंती करतो आह की -

तुम्ही ..या कार्यक्रमासाठी कुणाकडून ..हॉलसाठी भाडे म्हणून कधीही काही रक्कम घेऊ नका .

पण, एक मात्र जरूर करावे ते असे –

..ज्याचा कार्यक्रम होईल ..त्याने या हॉलमध्य होणार्या कार्यक्रमासाठी

लागणाऱ्या काही गोष्टी ..उदा – माईक , स्पीकर , साऊंड-सिस्टीम , बसण्यासाठी मोठ्या सतरंज्या ,

बिछाईत , व्यासपीठासाठी आवश्यक असणार्या गोष्टी ..

चहापान –अल्पोपहार यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी.यातले जे नाही ..त्यासाठी यथाशक्ती हातभार

लावायचा , ते ही जमत नसेल तर ..समोर स्वेच्छा –देणगी पेटी ठेवावी , “यात मनाला जे योग्य

वाटेल ते टाकावे अगदी ..एकशे एक रुपये टाकले तरी हरकत नाही.

किती पैसे ? हे महत्वाचे नाही, काही देण्याची भावना असणे “ हे महत्वाचे

कारण..इथे लागणार्या सगळ्या गोष्टी .घेऊन देणे आमच्यासाठी काहीच अशक्य नाहीये. पण आपण तसे

करू नये असे मला वाटते ..

कारण लोक-सहभागातून ज्या ज्या गोष्टी इथे उपलब्ध होत जातील ..त्यात सगळ्यांच्या आपलेपणाच्या

भावना असतील “ ,माझ्या दृष्टीने हे सर्वात महत्वाचे आहे.

बापू-आजोबांच्या या सूचनेचे सर्वांनी स्वागत केले ..

आणि गेल्या एक-दोन वर्षापासून कार्यक्रम झाला की ..

संयोजक आणि ज्याचा कार्यक्रम असेल, तो दोघे ही ..आपल्याला शक्य असेल तितके देणार “हे सगळ्यांना

माहिती झाले होते. याचा खूप छान असा परिणाम झाला ..

हॉलमध्ये आता अनेक उपयोगी गोष्टी घेता येऊ लागल्या ..आणि कार्यक्रम अधिक रंगतदार होण्यास

मदत होऊ लागली.

यश आणि त्याचे मित्र ,हे या हॉलमध्ये होणार्या कार्यक्रमाचे कार्यकर्ते म्हणून दरवेळी सगळ्यांना दिसू लागले .

यात कधी कधी सुधीरभाऊ आणि त्याचे काही मोजके रसिक मित्र सामील होतात .

यशच्या आई-बाबंना आपल्याकडे होणार्या प्रत्येक कार्यक्रमाचे फार अप्रूप असते . असा काही कार्यक्रम करायचा

आहे, तुमची परवानगी हवी आहे ,

असे कुणी विचारायला आले की ..त्यांना खूप आनंद होतो .

अगदी मनापसून ते आलेल्या माणसांना आपला होकार तर देतातच ,

शिवाय काही मदत हवी असेल तर मोकळेपणाने सांगा .संकोच करू नका !

असा धीर देतात .

बाहेर विपरीत अनुभव घेऊन आलेल्या पाहुण्यांना .

.इथे होणारे स्वागत आणि आपलेपणा पाहून नवल वाटते .

आणि भारवलेल्या मनाने ते परत जातात ,त्यांना आता खात्री असते ..आपण जे काही

इथे सादर करूत..त्यासाठी हीच सर्वात योग्य जागा आहे .

हे सगळे यासाठी सांगितले आहे की – माणूस हा माणसातच रमला तर त्याचे जगणे सुसह्य होण्यास

मदत होत असते. एकटेपणा ,आणि एकलकोंडेपण या दोन गोष्टी मनाला नैराश्य आणीत असतात .

सार्वजनिक आयुष्य हे विविधरंगी असते ..यातील हर एक रंग आपले जगणे रंगतदार करीत असतो .

म्हणून ..माणसाने आपले छंद ,आपल्या आवडी या मनापासून जपल्या पाहिजे .तरच हे शक्य होत असते .

कारण ..ज्या लोकांनी पोटापाण्याची नोकरी करीत असतांना ..फक्त ऑफिस ते घर “ या चाकोरीतले

जगणे जगतांना .इतर कोणत्याही उर्जात्म्क भावनाना मनात स्थान दिलेले नसते “ अशा लोकांचे

निवृत्ती नंतरचे आयुष्य ..फार त्रासदायक असते .

आपल्या भवती असे निराश होऊन बसलेले स्त्री-पुरुष सहजतेने दृष्टीस पडतात .

हे लक्षात घेतले तर ..यशच्या परिवाराचे त्यातील सगळ्या माणसांचे जगणे हे उत्सहाने ,आनंदाने

आणि उत्सुकतेने शिगोशिग भरलेले आहे हे जाणवल्याशिवाय राहणार नाही.

आणि एकदा का अशा छान आणि स्ट्रेस घालवणारे उपक्रम यात आपण स्वतःला एंगेज ठेवू

लागलो तर ..तणाव-ग्रस्त मनावरील ..ताण कमी होण्यास नक्कीच मदत होते.

अशा या परिवारातील यश ..त्याच्या अम्माआजी आणि बापू-आजोबांच्या येण्यामुळे अतिशय खुश

झालेला आहे.

यात आणखी एक भर पडली ..ती अंजलीवहिनीनी मनावर घेतलेल्या – वधू –संशोधन “मोहिमेची .

अम्मा –आजी आणि बापुआजोबा हे आनंदित झालेच होते ..त्यांच्या इतकाच आनंद यशच्या आई-बाबांना

झालेला होता .

सुधीरभाऊ आणि अंजली हे जोडी अगदी अनुरूप अशीच होती . यशची आई त्याच्या बाबांना म्हणते –

आपली अंजली स्वभावाने फटकळ असली तरी ..

तिला कधी., कुठे ,कसे वागावे याचे भान असते .

आपल्या सोबत घरात वावरताना सुनबाईच्या रुपात वावरणारी अंजली ..एक प्रेमळ गृहिणी ,

आणि कुटुंबाची काळजी घेणारी घरातली कर्तीबाई असते ..

आणि ऑफिसला निघालेली अंजली एकदम वेगळी ..धडाडीची कर्तबगार स्त्री ,स्वताच्या हुशारीचा ,

देखण्या रूपाचा गर्व असणारी ..तो दाखवणारी ..एक प्रभावशाली स्त्री ..

तिच्या समोर आपला सुधीरभाऊ ..मला कधी कधी फार साधारण माणूस वाटू लागतो .

हे ऐकून यशचे बाबा म्हणतात –

तुझ्या बोलण्यात अजिबातच तथ्य नाही “असे मी म्हणणार नाही..पण,

अंजलीचे व्यक्तिमत्वच तिने असे डेव्हलप केले आहे की ..ती इतरांच्या समोर खूपच अग्रेसिव्ह ,

आणि domineting आहे असे दिसणार आणि वाटणार ..

हे असे होण्याचे एक महत्वाचे कारण ..

अंजलीला असलेले स्वतः बद्दलचे भान , “आत्मभान म्हणू या “, तिला आपले प्रभावी गुण

माहिती आहे . आणि दुसर्यावर आपला प्रभाव कसा पाडता येतो ,हे भान आणि जाणीव तिला तिच्या जोब मधील

मोठ्या पदावरील खुर्चीने दिला आहे .

अधिकार अनेकांना असतो , पण, अधिकार –गाजवता येणे ही एक कला असते “

ती सगळ्यांनाच जमत नसते . अशा थोड्या व्यक्ती मधली एक आपली अंजली नक्कीच आहे.

आणि सुधीरभाऊ तिच्या समोर साधारण वाटतो ..याचे कारण ..त्याने स्वतःकडे कमीपणा “

घेत त्याच्या मनाचे मोठेपण दाखवले आहे “ हे आपल्या लक्षात येत नाही.

अंजलीसारख्या स्त्रीने ..सुधीरला आपला जोडीदार म्हणून निवडले ..याचाच अर्थ असा आहे की..

तो तिच्या तोडीस तोड तर नक्कीच आहे..कदाचित प्रसंगी तिच्यापेक्षा काकणभर सरस आहे “

त्याशिवाय अंजलीने आपल्या सुधीरची जीवनसाथी होण्याचा निर्णय घेतला नसणार.

एक मात्र नक्की ..सुधीर आणि अंजली यांच्याबद्दल आपण पूर्णपणे निश्चिंत आहोत .

यशच्या बाबांचे बोलणे ऐकून आई म्हणाल्या –

बापरे .. असा विचार मी तर कधीच करू शकले नसते . तुम्हाला तर हे जमणार ,शेवटी

तुम्ही मानसशास्त्राचे प्रोफेसर ...

तुमच्या इतके अचूक विश्लेषण इतर कुणी करूच शकणार नाही.

यशची आई म्हणाली –.

मला आता काळजी आणि उत्सुकता आहे..ती आपल्या घरात येणाऱ्या नव्या सुनबाईची ,

ती अंजलीची बरोबरी करणारी असली पाहिजे असे नाही , पण, तिच्या समोर डावी वाटणारी पण

नसावी , अशी तर अपेक्षा करणे चुकीचे ठरणार नाही.

बाबा म्हणाले – हो ,हे पण महत्वाचे आहे.

तुमची वधू-संशोधन मोहीम सुरु तर करा ..

-------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी –पुढच्या भागात

भाग – ६ वा लवकरच येतो आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाची जादू

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED