आदर्श आपल्या दैनंदिन रोजच्या कामावर जायला निघाला. दररोज तो याच मार्गाने जात होता. तो एका टोल नाक्यावर कॉम्पुटर ऑपरेटर म्हणून कामावर होता. तो सकाळी आठ वाजता आपला डब्बा घेऊन निघाला. दररोज त्याच रस्त्याने जात असल्याने तो रस्ता परिचित होता. वाटेत एक शंकराचे मंदिर पडत होते, त्यांच्यासमोर सरकारी दवाखाना रस्त्याला लागूनच होता.
पण आज आदर्श रस्त्यांना जाताना शंकराच्या मंदिराच्या बाजूने असलेल्या फुटपाथवर दोन निरागस चेहरे दिसले. आदर्शाने गाडी उभी ठेवली, तो स्तब्ध झाला होता. त्या चेहऱ्याकडे पाहून. तो इकडे तिकडे सैरभावाने पाहू लागला. हे निरागस चेहरे कुणाचे आहे म्हणून...! तो गाडीवरून उतरून आजूबाजूला लक्ष करत होता. या निरागस कोमल चेहऱ्याचे पाल्य कुठे आहे ? कुठे गेले असेल ते. आज पर्यंत त्याला मंदिराच्या आडोशाला कुठेही अशा चेहऱ्याचे दर्शन झाले नव्हते. फक्त दिसत होते म्हातारे भिक्षुक पण आज आदर्शच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा भाव दिसत होता. त्यांच्या हृदयाला धक्का बसल्यासारखे चित्र आज त्यांच्या डोळ्यासमोर होते.
तो काही मिनिट त्यांच्याकडे टक लावून पाहू लागला. कोमलता निरखू लागला, त्यांचा गोळसपणा, त्या चेहऱ्याकडे पाहून तो सर्व काही विसरलाच जणू. आजूबाजूने येणारे-जाणारे लोक जात होते. पण कुणीही या निरागस चेहऱ्याकडे दुर्लक्ष करत होते.
आदर्श एकदम भानावर आला. त्याला कामावर जायचे होते. त्याने आपला मोबाईल काढला आणि मित्राला थोडा उशीर होईल म्हणून सांगितले.
मग तो हळू हळू त्या निरागस सात वर्षाचा मुलगा आणि तीन वर्षाची निरागस मुलगी असे दोन निरागस मुलांच्या जवळ गेला.
आदर्श त्या मुलाला म्हणतो....! बाळा तुझे नाव काय ? तो काही बोलतच नाही. आदर्श पुन्हा दुसरा प्रश्न करतो. तुमचे आई-वडील कुठे आहे ? पण ते दोन निरागस चेहरे भुकेने व्याकूळ होते आणि आदर्श त्यांना नाव आणि पाल्याबद्दल विचारतो.
त्या मुलाच्या तोंडातून एक शब्दही निघत नाही....!
त्या चेहऱ्याकडे पाहून आदर्श म्हणतो की, बाळा तुम्हाला भूक लागली आहे का ? तरी तो शांत बसतो. पण त्या निरागस मुलींच्या चेहऱ्यावर जणू दिसतच होते की, मी भुकेने व्याकूळ झाले आहे.
मग आदर्शला जाणवलं आपला डब्बा यांना देऊन टाकावा. तो आपला डब्बा त्यांच्यासमोर करतो. तरी पण तो मुलगा काहीच बोलत नाही. पण त्यांच्या मनात येत असलेली तळमळ आदर्श जाणतो. आणि डब्याचे झाकण उघडून त्या निरागस चेहऱ्यासमोर ठेवतो. तसेच वॉटर बॅग मधल्या पाण्याने त्यांचे हात धुण्यास पाणी देतो.
असे वाटत होते की, कित्येक दिवसांपासून उपाशी आहे. असे त्या दोन बहिण भावाचे चेहरे होते.
त्या डब्याकडे पाहून त्या मुलांच्या डोळ्यातून अश्रुचे थेंब पडत होते. तो निरागस मुलगा आपल्या लहान च्या बहिणीला घास भरवत होता अगोदर त्या मुलाने आपल्या बहिणीला भरवले आणि तो स्वतः जेवायला लागला. त्या दोघांनीही डब्बा संपविला. आदर्श शांतपणे त्यांच्यासमोर बसून होता.
मग आदर्शनेच आपल्या वॉटर बॅग मधून पाणी त्यांना हात धुण्यासाठी दिले. मग त्याच वॉटर बॅग झाकणाने त्या बहिणीला पाणी पाजले आणि नंतर तो स्वतः पाणी प्यायला. जेवण करून त्यांचं मन शांत झालं.
पण आदर्शचे मन काही शांत होईना.....! परत आदर्श ने प्रश्न केला. बाळा तुझं नाव काय ? तो प्रथमच उदगारला....! भाविक. आदर्शच्या मनाला समाधान वाटले. तरी पण आदर्शच्या मनात दुसरे प्रश्न येतच होते. दुसरा प्रश्न केला. तुझे आई वडील कुठे आहे ? तो उद्गारला...! मला आई वडील नाही आहे. तेव्हा आदर्शला खूपच मोठा धक्का बसला. तो पुन्हा एकदा एवढा स्तब्ध झाला की, काही वेळ काय बोलावे कळेनाच झालं. तो शांत झाला. त्याला वाटत होते, हे कसे शक्य आहे. तरी पण मोठ्या हिमतीने पुन्हा तोच प्रश्न आदर्श करतो. पुन्हा तोच धक्का त्याला लागतो.