Shree Datt Avtar - 13 books and stories free download online pdf in Marathi

श्री दत्त अवतार भाग १३

श्री दत्त अवतार भाग १३

९) विश्वंभरावधूत

पुढे आणखी एकदा सिध्दांना बोध देण्यासाठी दत्तात्रेयांनी 'विश्वंभरावधूत' या नावाचा नववा अवतार घेतला व योगीजनांना बीजाक्षर मंत्रांचा (द्रां) उपदेश केला. हा अवतार चैत्र शुद्ध पौर्णिमेला, मंगळवारी, चित्रा नक्षत्रावर, दुसऱ्या प्रहरावर झाला.

हा अवतार श्री अत्रिनंदन भगवान श्री दत्तात्रेय यांनी बदरिकाश्रमांतील सिध्दजन व भक्तजनांच्या कल्याणासाठी घेतला.

बदरिकाश्रमी राहून खडतर तपश्चर्येने सिध्दिसंपन्न झालेल्या भक्तजनांवर अनुग्रह करण्याकरिता ज्ञानसागर रुपाने प्रकट होऊन त्यांच्या अहंकाराचा परिहार करुन व सदुपदेशाने त्यांच्या अज्ञानरुपी तिमिराचा नाश करुन त्यांना सदाचाराचे वळण लावले.

यानंतर बराच काळ निघून गेल्यावर दत्तात्रेयांना त्यांचे स्मरण झाले.

ते सर्व सिध्दजन आपल्या उपदेशाप्रमाणे बागून उत्तम गति प्राप्त करुन घेण्याच्या स्थितीत आले आहेत की नाहीत, हे पाहण्याची दयासागर दत्तात्रेयांना इच्छा झाली.

सद्गुरु केवळ उपदेश करुन थांबत नसतात तर आपण केलेल्या उपदेशाप्रमाणे वागून साधक हे उत्तम गतीच्या दिशेने उत्तरोत्तर प्रगमनशील वाटचाल करीत आहेत की नाहीत हेही परीक्षण करीत असतात .

हे पाहण्यासाठी भक्तजनांना वारंवार भेटी देतात व त्या भेटीतून पुन:पुन: सदुपदेशाचा लाभ देऊन साधकाला ते कृतार्थ करतात.

श्री दत्तात्रेय यांनी बदरिकाश्रमांतील सिध्दजनांची परीक्षा घेण्याचे ठरविले.

या सर्व भक्तांना पूर्वी आपण मंत्रानुष्ठानाचा मार्ग दाखवला होता.

बदरिकाश्रमातील आपल्या भक्तांच्या हातून ही सर्व अनुष्ठाने व्यवस्थित पार पडत आहेत की नाहीत, ते पाहण्यासाठी मंगलमय अवधूत अमंगल रुपात अवतरले.

त्यांनी एक विचित्र वेष धारण केला व बदरिकाश्रमात प्रवेश केला.

श्री दत्तप्रभूंनी एका म्लेंच्छाचे (क्रूर मांसाहार करणारा - खाटिक /कसाई) रूप धारण केले.

त्याचा चेहरा राकट होता. त्याने गळ्यामध्ये ताईत बांधला होता, त्याच्या हातात एक वाकडीतिकडी काठी होती आणि एक काळा कुत्रा त्याच्या मागे मागे चालत होता. अशा अवतारात हा म्लेंच्छ त्या सिद्ध लोकांजवळ पोहोचला

म्लेंच्छ रुपाने अवतरलेल्या दत्तात्रेय यांनी मात्र सर्व सिध्दांचे निरीक्षण केले आणि त्या सिध्दांच्या समाजात ध्यानमुद्रेने ते शांतपणे एका बाजूला बसले.

त्या वेळेला काही लोक चित्ताचा स्वरुपी लय करुन बसले होते, तर काही चंचल चित्ताने थटटामस्करी करीत बसलेले होते.

काही एकमेकांवर संतापलेले होते तर काही दु:खित व कष्टी होऊन बसलेले होते.

काही ग्राम्य गोष्टींच्या चर्चेत दंग होते, तर काही लोकांना कामक्रोधादि विकारांनी ग्रासून टाकलेले होते.

काही लोक पूर्वी अभ्यासलेल्या ध्यानयोगाच्या बळावर ध्यानसमाधीमध्ये मग्न होऊन बसलेले होते.

दयानिधी दत्तात्रेयांनी हा प्रकार पाहिला. त्यांचे मन दयेने कळवळले.

त्यांच्याकडे सिद्धांचे लक्ष गेले परंतु यावेळी प्रभूंची लीलाच वेगळी होती.

ह्यावेळी ते तेजोमय कुमार नव्हते आणि अचंबित करण्यासाठी हवेतही नव्हते.
त्यामुळे केवळ हे विचित्र बाह्यरूप पाहून सिद्ध चकित झाले .

त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठी दत्तात्रेयांनी त्या सर्वाची मने आपल्याकडे वळवून घेतली तेव्हा ते सिध्द महात्मे आपापली कर्मे सोडून निश्चलपणे व एकटक दृष्टीने दत्तात्रेयाकडे पहात राहीले. दत्तात्रेय पूर्वीप्रमाणे आपल्याला सोडून जातील या भितीने त्यांची मने घाबरुन गेली होती, त्यामूळे दत्तात्रेय बसले की ते बसत व दत्तात्रेय उठले की ते ही उठत.

अशा रितीने ते दत्तात्रेयांचे अनुकरण करु लागले.

मग त्या सर्व सिध्दांनी दत्तात्रेयांना प्रश्न केला की, "तुम्ही कोण आहात?"

यावर दत्तात्रेयांनी मागील अवताराप्रमाणे उत्तरे देण्यास प्रारंभ केला.
ती उत्तरे ऐकून त्या सर्वाना कळून चुकले की हे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात दत्तात्रेयच आपली परीक्षा पाहण्यासाठी पुन्हा आले असावेत .
यावर काही सिध्दलोक भानावर येऊन म्हणाले की, हा खरोखर तो सिध्दराज ज्ञानसागर भगवान श्री दत्तात्रेयच आहे.

पश्चात्तापदग्ध ते सर्व दत्तगुरूंना शरण गेले. मग मात्र दत्तात्रेय त्यांच्या नेहमीच्या रूपात प्रकट झाले आणि बाह्य स्वरूपावर न जाता त्याच्या तत्व स्वरूपावर ध्यान करण्याचे मार्गदर्शन त्यांनी सर्वांना केले.

विश्वरूप अवतारात सुद्धा अर्जुनाला श्रीकृष्णांचे असेच काहीसे रूप दिसत होते - ती अक्राळ विक्राळ तोंडे सर्व सृष्टीचा घास करून भक्षण करीत होती. त्याला काळाचे परीमाण नव्हते. प्रत्यक्ष कालसर्पच त्याने धारण केला होता. मायेने नटलेला हा गुरू विश्वंभरच होता आणि मायेच्या पलिकडचा अवधूतसुद्धा तोच होता.

म्लेंच्छरूपा महावदना || सर्पकरदंडधारका ||

विश्वंभरावधूताय || दत्तात्रेयाय नमो नम: ||

म्लेंच्छरूप धारण केलेल्या, अक्राळ विक्राळ तोंड असलेल्या, हातात (सापासारखा) वाकडीतिकडा दंड धरलेल्या विश्वंभरावधूत श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो.

१०) मायामुक्तावधूत

भक्तांच्या अंतःकरणातील प्रेम व श्रध्दा दृढ करण्यासाठी दत्तात्रेयांनी 'मायामुक्तावधूत' या नावाचा दहावा अवतार घेतला. जेष्ठ शुद्ध त्रयोदशीला, स्वाती नक्षत्रावर, शुक्रवारी, सूर्योदयाच्या वेळेस हा अवतार झाला.

एकदा वैशाख शुद्ध चतुर्दशीदिवशी, मध्यान्हीच्या वेळी श्रीगुरू एका भिक्षुकाच्या रूपात, आपल्या प्रिय भक्त शील ह्याच्या घरासमोर प्रकट झाले.

त्यांचे हे अवताररूप फार सुंदर आणि तेजस्वी होते.

त्यांच्या गळ्याभोवती रूद्राक्षांच्या माळा होत्या.

त्यांच्या हातात एक भिक्षा पात्र होते आणि उजव्या हातात एक दंड होता.

शीलच्या घरात त्यावेळी श्राद्धकार्य चालू होते आणि त्यासाठी त्यांनी ब्राम्हणांना आमंत्रित केले होते.

या अगांतुक भिक्षुकाला पाहून ब्राम्हणांना राग आला.

त्यांनी त्या भिक्षुकाला विचारले, "तु कोण आहेस?"

"मी अजिंक्य, अविनाशी, सर्वावस्थांच्या पलिकडे असलेला अवधूत आहे!".

त्यांचे हे उत्तर ऐकताक्षणीच शीलला कळून चुकले की हे गेल्या अवतारातील सिद्धराज ज्ञानसागर आहेत.

तथापि खात्री होण्यासाठी, शीलने त्यांना विचारले, "आपण कोठे आश्रय घेता आणि आपले गुरू कोण आहेत हे कृपा करून सांगावे?"

यावर भिक्षुकाच्या रूपातील श्रीगुरू म्हणाले, "माझे निश्चित निवासस्थान कोण्या विशिष्ट जागी नाही. माझा कोणीही गुरू नाही उलट मीच या त्रैलोक्याचा स्वामी आहे."

हे उत्तर ऐकताच हेच आपले सद्गुरू दत्तमहाराज असल्याची शीलची खात्री झाली.

तो त्यांना मनोभावे शरण गेला.

त्याने श्रीगुरूंना यथोचित आसनावर बसवून, पाद्यपूजादी करून योग्य सन्मान केला.

त्यांना उत्तम नैवेद्य अर्पण केला.

हे घडत असलेले सर्व ब्राम्हण पाहत होते.

श्राद्धाचे भोजन त्या भिक्षुकाला दिल्याचे पाहून त्यांना अधिकच राग आला.

शीलने केलेले हे कार्य धर्मसंमत नाही असे सांगून त्यांनी शीलला दुषणे दिली.

यावर श्रीगुरूंनी त्या ब्राम्हणांना विचारले, "ब्रम्ह म्हणजे काय हो?"

"हे विचारणारा तु कोण? ॐ हेच परब्रह्म आहे आणि त्यानेच वेदांचे रूप धारण केले.

पण तु अपवित्र आणि अ़धर्मी आहेस.

त्यामुळे तुला वेद ऐकण्याचा पण अधिकार नाही."

अहंकारी ब्राह्मण उत्तरले.

संन्यासी यावर बोलले, "मी मायेच्या प्रभावाच्या पलिकडला आहे, म्हणूनच सामान्य जगतातील कुठलेही नियम मला लागू पडत नाहीत.

वेदात विषद केलेली कर्मे ही तीन प्रकारची आहेत आणि हे जग सुद्धा त्रिगुणात्मक आहे आणि हे सर्व माझ्यासोबतच्या ह्या काळ्या श्वानाच्या रूपातच आहे.

माझा हा कुत्रा सर्वच वेद-शास्त्रांमध्ये पारंगत आहे, हाच तुमचे समाधान करेल."

असे बोलून त्यांनी कुत्र्यास वेद बोलण्याची आज्ञा दिली.

आज्ञा होताच तो कुत्रा शिकलेल्या पंडितासारखा वेद बोलू लागला.

सर्व उपस्थित ब्राह्मण हा चमत्कार पाहून स्तब्ध झाले.

अवधूतांनी मग शीलच्या पितरांनाही पाचारण केले आणि ते सर्व ज्योतिरूपाने श्रीगुरूंमध्ये समाविष्ट झाले.

झाला प्रकार पाहून ब्राम्हणांचा वृथा अभिमान पूर्ण गळून पडला आणि ते सर्व श्रीगुरूंना शरण गेले.

श्रीगुरूंनी त्यांना भक्तिमार्गाचा उपदेश केला.क्रमशःइतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED