सैतानी पेटी - भाग २ preeti sawant dalvi द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सैतानी पेटी - भाग २

(ही कथा एका इंग्रजी चित्रपटावरून प्रेरित आहे)

त्याच रात्री पुन्हा एकदा ती पेटी आपोआप उघडली आणि ह्या वेळी त्या पेटीमधून खूप सारे उडणारे कीटक बाहेर पडले. तेवढ्यात रात्री दात घासण्यासाठी म्हणून जुलिया तिच्या खोली बाहेर जेव्हा आली, तर तिला पूर्ण घरात खूप सारे कीटक फिरताना दिसले. ती हे पाहून इतकी घाबरली की, ती जोरजोरात तिच्या वडिलांना म्हणजेच पीटरला हाक मारायला लागली. पीटर धावतच जुलियाच्या आवाजाच्या दिशेने आला. बघतो तर सगळ्या घरात खूप सारे कीटक उडत होते.
त्याला समजत नव्हते की, हे इतके सारे कीटक अचानक कुठून येत आहेत? इतक्यात त्याची नजर रिहानाच्या खोलीकडे गेली, तेव्हा त्याच्या लक्षात आले की, हे किटक तिच्या खोलीतूनच येत आहेत. त्याने लगेच तिच्या खोलीचा दरवाजा वाजवला पण काहीच प्रत्युत्तर आले नाही. मग मात्र त्याने जोरात दरवाजा ढकलला..आणि तो रिहानाच्या खोलीत गेला आणि पाहतो तर, रिहानाच्या हातात ती पेटी होती ती पण उघडलेली आणि त्याच पेटीतून ते हजारो कीटक बाहेर येत होते.त्याने लागलीच रिहानाला त्या पेटीपासून दूर केले आणि तिला त्या खोलीतून बाहेर काढले. हे सगळे खूपच अनपेक्षित आणि विचित्र होते.

तसेच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली की, रिहाना बरोबर काहीतरी वेगळचं घडत आहे आणि ते सामान्य नाही. कदाचित ह्याचं कारण ती पेटी?????

जुलिया आणि रिहानाला लिसाकडे सोडून पीटरने दुसऱ्याच दिवशी सगळ्या घरात पेस्टकंट्रोल केले. इथे लिसाला जुलियाने पीटरच्या घरी घडलेले सर्व प्रकार सांगितले. पण तिला सारखं असे वाटतं होते की, पीटर आणि तिच्या घटस्फोटाचा परिणाम म्हणून रिहाना असे विचित्र वागत असेल. पण तिला कुठे माहीत होते की, यामागील खरं कारण काहीतरी वेगळेच होते..

असेच एकेदिवशी पीटरला जुलियाच्या शाळेतल्या वार्षिक स्नेहसंमेलनाला जायचे होते, जुलियाने तसे फोन करून आदल्यादिवशीच निरोप दिला होता, परंतु त्याच दिवशी योगायोगाने पीटरला ऑफिसमध्ये भरपूर काम होते आणि तो ऑफिसच्या कामात इतका गुंतला की, तो कार्यक्रमाला जायला पूर्णपणे विसरला आणि जेव्हा त्याच्या लक्षात ही गोष्ट आली, तेव्हा वेळ निघून गेलेली होती..त्याला खूपच वाईट वाटले..त्याने लगेच जुलियाला फोन केला, पण ती खूपच रागात होती. म्हणून तीने पीटरचा आवाज ऐकताच फोन रिहानाकडे दिला.

पण रिहानाचं काहीतरी वेगळच चाललं होतं..ती सारखी पीटरला ती पेटी नीट ठेव आणि तिला हाथ नको लावू अशा वारंवार सूचना देत होती..पिटरने वैतागून फोनच ठेवून दिला..तो ऑफिसवरून घरी आला तरी त्याच्या कानात रिहानाचे तेच शब्द घुमत होते..त्याला इतका प्रचंड संताप आलेला की लागलीच तो रिहानाच्या रूममध्ये गेला आणि त्याने शक्य त्याप्रकारे ती पेटी उघडण्याचा प्रयत्न केला..पण त्याला ह्यात काहीही यश आले नाही.. मग त्याने त्या पेटीला तिथेच टाकून तो झोपायला निघून गेला.

इथे काहीतरी वेगळच घडत होतं..अचानक रिहानाला तिच्या तोंडात काहीतरी असल्याचे जाणवले. ती तडक वॉशरूम मध्ये गेली..आणि बॅटरीचा फ्लॅश तोंडाच्या आत मारून बघू लागली आणि तिला तिच्या तोंडात कोणाचीतरी बोटे असल्याचे दिसले, ती घाबरून जोरात ओरडण्याचा, किंचाळण्याचा प्रयत्न करू लागली.. पण तिचा आवाज काही केल्या बाहेर निघतच नव्हता..अशातच ती पेटी तिला तिच्या वॉशरूम मध्ये दिसली..जी पीटरच्या घरातल्या तिच्या रूममध्ये होती. रिहानाने पटकन ती पेटी स्वतःच्या बॅगमध्ये ठेवली आणि ती झोपली..

दुसऱ्या दिवशी शाळेत रिहानाची बॅग मस्करीत एका मुलाने लपवून स्वतःजवळ ठेवली. ज्यामध्ये ती पेटी होती. रिहाना सगळीकडे तिची बॅग शोधू लागली आणि जेव्हा तिला तिची बॅग त्या मुलाकडे आढळली..तशी रिहाना अचानक खूपच आक्रमक झाली की, तिने त्या मुलाच्या २-३ कानशिलात मारून त्याच्याकडून ती बॅग हिसकावून घेतली.
शाळेतल्या टीचर मार्टिना ह्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती काहीच ऐकायला तयार नव्हती..मग मार्टिनाने तातडीने रिहानाच्या आई-वडिलांना शाळेत बोलवले.

मार्टिना रिहानाच्या आई-वडिलांकडे रिहानाची तक्रार करत म्हणू लागली की, "रिहाना आजकाल खूपच एकटी एकटी राहते..कोणत्याच मुलांमध्ये मिसळत नाही..तसेच ती खूप आक्रमक ही झाली आहे, तिचा गृहपाठ पण तिने करणे पूर्णपणे बंद केले आहे. एक आई-वडील म्हणून तुम्हाला तुमच्या मुलीला वेळ देणे जरुरी आहे.." असे बोलून मार्टिनाने रिहानाची बॅग जप्त करून ती घेऊन टीचर रूम मधल्या लॉकरमध्ये ती कुलूपबंद केली. पण तिला काय माहीत त्या बॅगच्या आत काय होते ते..

त्यादिवशी मार्टिना टीचररूममध्ये रात्री उशिरापर्यंत काहीतरी काम करत होती..इतक्यात अचानक त्या रूम मध्ये जोराचा वारा वाहायला लागला..त्याचा जोर इतका होता..की टेबल वरचे कागद रूममध्ये इतस्ततः पसरले..ती ते गोळा करण्याचा प्रयत्न करत असतानाच तिच्या हातावर कसलातरी ठिपका पडला. तिने हाथ लावून बघताच तिला कळले की ते रक्त आहे..आणि नंतर अक्षरशः तिच्या डोळ्यातून अश्रूंसारखे ते गळायला लागले..मार्टिना हा सगळा प्रकार पाहून खूपच घाबरली आणि ती ओरडणार इतक्यात तिचे शरीर हवेत इकडे तिकडे आपटायला लागले..आणि शेवटी ते खिडकी तोडून बाहेर फेकले गेले आणि त्यातच ती मरण पावली..त्या सैतानी पेटीने अजून एक जीव घेतला होता..

दुसऱ्या दिवशी मार्टिनाच्या अकस्मात निधनामुळे शाळा बंद ठेवण्यात आली..तिचं हे अचानक मरण एक गूढ बनून राहिले. तिच्या मृत्यूला सुसाईड(sucide) हे कारण देऊन शाळेने हा विषय संपवला.

रिहाना आणि जुलिया काही दिवसांसाठी पीटरच्या घरी राहायला आल्या..कारण लिसाला दोन दिवसांसाठी कामानिमित्त परगावी जायचे होते.

रिहानाने आल्यापासून एकच चंग बांधला होता..ती सारखी पीटरला तिची बॅग शाळेतून परत आणायला सांगत होती..तिला काहीच पर्वा नव्हती की, तिची टीचर मार्टिना आता या जगात नाही.

पीटर रिहानाला म्हणाला,"उद्या शाळेत गेल्यावर तुझी बॅग परत आणू..पण त्या बॅगेत असे काय आहे, ज्यामुळे तू अशी वागलीस. त्या मुलाला कानशिलात मारलेस?"
त्यावर रिहाना बोलू लागली की, "त्या बॅगमध्ये माझी आवडती पेटी आहे आणि त्या पेटीमध्ये माझी एक मैत्रीण राहते..जिला कोणीच बघू शकत नाही आणि ती मैत्रीण माझ्यासाठी खूप महत्वाची आहे."

हे सगळे पीटरला थोडे विचित्रच वाटले.. त्यामुळे पीटरने रिहानाला कळायच्या आत दुसऱ्या दिवशीच तिची जप्त झालेली बॅग परत मिळवून त्यामध्ये असलेल्या पेटीला तो लांब कुठेतरी सोडून आला..

रिहानाला तिच्या बॅगेत जेव्हा ती पेटी दिसली नाही तेव्हा ती पीटरवर खूपच रागावली आणि त्याला घालून पाडुन बोलली..इतकी की, तिला समजत नव्हते ती किती आणि काय काय बोलत आहे ते.

ती सारखी बोलत होती की, "तुम्ही खूप वाईट आहात, म्हणून मम्मीने तुम्हाला सोडले. मम्मीचा प्रियकर खूपच चांगला आहे..तोच आमचा वडील होण्यायोग्य आहे..तुम्ही नाही..मी तुमचा द्वेष करते" वगैरे वगैरे..पीटरला हे सगळे ऐकून फार दुःख झाले..

त्याने रिहानाला तिच्या रूममध्ये जायला सांगितले, पण त्याचवेळी रिहानाला अदृश्य शक्तीने कानशिलात लगावले..पण असे दिसले की, पीटरनेच तिला मारले असावे..रिहाना जोरात रडायला लागली आणि पीटर वर आरोप करायला लागली, तेवढ्यातच जुलिया तिथे आली आणि तिला वाटले की, पीटरनेच रिहानाला कानशिलात मारले असावे.. ती काही बोलायच्या आत रिहाना घरातून रागाने बाहेर पडली आणि ती रस्त्यावरून धावत धावत त्या पेटीपर्यंत पोहोचली..जणूकाही ती पेटीचं तिला बोलवत होती. तिथे पोहचल्यावर ती त्या पेटीशी एका सांकेतिक भाषेत बोलायला लागली..ते बोलता बोलता रिहानाच्या तोंडातून खूप सारे कीटक निघायला लागले आणि ती त्याच जागी बेशुद्ध पडली..

पीटर सुद्धा रिहानाच्या पाठी धावत धावत तिथपर्यंत पोहोचला. तो रिहानाला उचलून घरी घेऊन जातच होता..तितक्यात तिथे लिसा आणि जुलिया आले..लिसा नुकतीच घरी पोहचली असेल तेवढ्यात तिला जुलियाचा फोन आला आणि तिने लिसाला फोनवर सांगितले की, पीटरने रिहानावर हाथ उचलला. लिसा दोन्ही मुलींना आपल्याबरोबर घरी घेऊन गेली..आणि पीटरला आता कोर्टात भेटू अशी धमकी ही तिने दिली.

यासंदर्भात कोर्टाने हा निर्णय घेतला की, पीटर आता कधी ही त्याच्या मुलींना भेटू शकणार नाही.. कारण त्याने रिहानावर हाथ उचलला होता..लिसा इतकी रागवलेली होती की, तिने पीटरची बाजू ऐकून ही घेतली नाही..पीटर ही ह्या वर काहीच बोलला नाही..

क्रमश:

(ही कथा आवडल्यास ह्या कथेला लाईक आणि आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. ह्या कथेद्वारे अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा कोणताही हेतू नाही..ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी ही विनंती🙏)

©preetimayurdalvi