Home Minister Last part books and stories free download online pdf in Marathi

होम मिनिस्टर (अंतिम भाग)

रेवा घरात खरंच सगळ्यांची लाडकी होती. तेवढी ती सुगरण ही होती म्हणा. नीलिमाचे लग्न झाल्यापासून ती रेवावर खूप जळत असे. तिला रेवाचे कौतुक केलेले अजिबात आवडत नसे. रेवाचे लग्न झाल्यावर तर हा जलकुटेपणा अगदी उच्छकोटीला गेला. कारण रेवाच्या घरात ती, तिचा नवरा, तिचे सासरे. इतकीच माणसे. घरात प्रत्येक कामाला नोकर. पण रेवाला माणसांचा फार लळा. म्हणून महिन्यात दोनदा तरी रेवाच्या घरी गेट टू गेदर होत असे. रेवा सगळे पदार्थ स्वतः घरी बनवित असे. त्यावेळेस सगळेजण अगदी चट्टा मट्टा करीत तिच्या खाण्याची तारीफ करत ते पदार्थ खात असत. हे पाहून नीलिमा अजून जळफळत असे.

असो, पोटे फॅमिलीचं गाऱ्हाणं सुरूच राहील.
पण आपल्या सोसायटीमध्ये सकाळपासून अजून काय चालयय पाहूया तरी.

मोरे काका डोक्यावरचे मोजून उरलेले दहा केस विंचरत गॅलरीत आले तेवढ्यात अरुण आणि लिमये ही गॅलरीत आले.

लिमये: काय हो मोरे आदेश कसा असेल हो प्रत्यक्षात दिसायला.
मोरे : बरा असेल. पण माझ्याइतका तरी हँडसम नाही. (डोक्यावरचे उरलेले १०-१२ केस सावरत मोरे म्हणाले)
त्याबरोबर एकच हशा पिकला.
अरुण: अहो लिमये, काय घेऊन बसलात त्या आदेश बांदेकरचं. सोडा तो विषय. नुसता वैतागलो मी उठल्यापासून. म्हटलं इथे तरी निवांत उभं राहता येईल तर इथे तुम्ही सुरू केलं.
मोरे : इंजिन गरम झालेलं दिसतंय.
अरुण : मी इथे वैतागलोय आणि मोरे तुम्ही थट्टा करताय. अहो, सकाळपासून १० टोमणे तरी झाले असतील. त्या होम मिनिस्टरवरून.
लिमये : आमच्याकडे तर सकाळपासून फोन वाजतायेत. इतके फोन तर फोन घेतल्यापासून नाही आले तितके आज आले. मिनाला जराही फुरसत नाही. मग मी आणि राजूने समोरच्या इडलीवाल्याकडून इडली, मेदूवडा मागवून खाल्ला. आता जेवणाची सोय ही करावी लागणार अस वाटतेय.
मोरे : तसं मी फार टीव्ही पाहत नाही पण आमच्या विनूने मोबाईल वर एक एपिसोड दाखवला मला. बरेच खेळ असतात म्हणे त्या प्रोग्राम मध्ये. त्या अनिलने तयारी केली असेल की काय माहीत नाही.
अरुण : मी निघतोय. आता मला हे असह्य होतंय.
मोरे आणि लिमये एकदम म्हणतात, "अरे अरुण थोडावेळ तरी थांब"
पण अरुण काही उत्तर न देता खाली निघून जातो.

इथे अरुणच्या घरात.
शमी : अगं मनी बरं झालं बाई तू आलीस. आता आपण खूप मजा करू.
मनी : ताई मी कशी दिसतेय?
शमी : माझ्या लाडूबाईला कोणा कोणाची नजर नको लागू देत. आदेश भावोजींची नजर आज तुझ्यावरून काही हटत नाही बघ.
मनी गोड लाजली.

तेवढ्यात बंटी आला.
"मावशी मावशी." बोलत मनीच्या गळ्यात पडला.

"माझं बाळ ते. हे घे चॉकलेट. पण त्याआधी चिनूच्या घरातील काही नवीन खबर" असे बोलून तिने शमीला डोळा मारला.

"हो आहे ना. चिनू बोलत होता त्यांच्याकडे भरपूर पाहुणे आले आहेत. त्याच्या रेवा आत्याने होम मिनिस्टरवाल्या काकांसाठी खूप पदार्थ बनवले आहेत. दुपारी ३ वाजता शुटिंग सुरू होणार आहे. मी त्याचा खास मित्र आहे ना मावशी म्हणून त्याने फक्त मलाच बोलावलंय घरी" बंटी म्हणाला.

"व्वा रे माझ्या पठ्ठ्या" असे म्हणत मनीने त्याच्या हातात डेअरी मिल्क दिली.

रेवामूळे खरं तर निलिमाचा कामाचा भार हलका झाला होता. पण त्याकडे कानाडोळा करून ती पार्लरमध्ये तयार व्हायला निघून गेली. रेवाने आजच्या प्रोग्रामसाठी स्वतः सगळे चमचमीत पदार्थ बनविले होते. तिला नीलिमाचा स्वभाव माहीत होता. त्यामुळे तिने बाकी सगळं आवरायला तिच्या घरचा घरगडी सख्याला बोलाविले होते. सख्याने अगदी लखलखीत किचन साफ केले मग रेवा तिच्या तयारीला लागली.

जॉइंट थीममुळे तिने तिच्या पार्लरवालीला घरीच बोलाविले होते आणि बरोबर अजून २-३ जणींना मदतीला घेऊन ये असेही तिला सुचविले होते.

पार्लरवाल्या ताई आणि त्यांच्या टीमने सर्वांना उत्तम रीतीने तयार केले. रेवा तर दृष्ट काढण्याइतकी सुंदर दिसत होती. रेवाने अनिलचा तो नको म्हणत असतानाही पार्लरवाल्या ताईकडून लाईट मेकअप करून घेतला.

तेवढ्यात नीलिमा तयार होऊन घरी आली. नीलिमाला पाहताच अनिल तिला बघतच राहिला. नीलिमा आज खूप सुंदर दिसत होती. तिला पाहताच अनिल थोड्यावेळापूर्वी निलिमाचा आलेला राग विसरला. त्याने शिटी वाजवून निलिमाला इशारा केला. नीलिमा ही लाजली आणि आतल्या खोलीत गेली.

इकडे सोसायटीत ऋतुजाने संस्कारभारतीची मोठी रांगोळी काढली होती. त्यामध्ये सुस्वागतम् होम मिनिस्टर असेही लिहिले होते. सोसायटीच्या तरुण मंडळींनी मेन गेटला फुलांनी सजविले होते. तसेच स्वागतासाठी रेड कार्पेटही अंथरले होते. समीरा आणि तिच्या पंटर लोकांनी या दिवसाची जय्यत तयारी केली होती.

गेम खेळले जातील म्हणून सोसायटीचे अंगण झाडून त्यावर पाणी शिंपडले गेले होते. सोसायटीचे वातावरण अगदी स्वच्छ आणि निर्मळ दिसत होते. ३ वाजायला अर्धा तासच उरला होता. बाकी सोसायटीचे रहिवाशी तयार होऊन आदेश भावोजी येण्याची वाट पाहत होते.

विनू आणि राजूने फटक्यांची माळ आणि २-३ ढोल वाजविणाऱ्यांची सुद्धा व्यवस्था केली होती.

शमिने आधीच समिराला फोन करून आदेश भावोजी येताच कळवायला सांगितले होते.

मोरे, लिमये, काटकर, सबनीस अगदी सदरा पायजमा घालून घरात लग्न समारंभ असल्यासारखे नटले होते. आज लिमये दाम्पत्याला नीलिमाच्या घरी सख्खे शेजारी म्हणून सन्मान दिला जाणार होता. त्यामुळे लिमये जरा जास्त फॉर्म मध्ये होते.

लिमये: मिना जरा तिजोरीतली माझी चैन, अंगठी आणि ब्रेसलेट दे पाहू. आज टीव्हीवर दिसणार आहोत आपण दोघे मग नको का तयार व्हायला.
मिना : हे घ्या. कशी दिसतेय मी?
लिमये: वाह! अगदी लक्ष्मी दिसतेय माझी राणी.
असं म्हणत तिला जवळ घेत ते पुढे म्हणाले,
लिमये : तो लक्ष्मीहार पण घालायचास ना. तुला फार शोभून दिसतो.
मिना : नको बाई, ह्या साडीवर तो जराही सूट करत नाही. तस पण जास्त सोनं डोळ्यात खुपत लोकांच्या. म्हणून म्हटलं आज अंगावर फक्त कानात सोन्याचे जुमके आणि दोन हार, त्यावर पाटल्या आणि सोन्याच्या चार बांगड्या, सोन्याचे बाजूबंद आणि कमरपट्टा इतकेच दागिने घालते. सिम्पल आणि सोबर.

असे म्हणत मिना स्वतः ला आरशात न्याहरू लागली. तेवढ्यात तिला आठवलं. तिला शेजारी बनण्याचा मान मिळाला आहे हे शमिकाला सांगायला तर ती विसरली. म्हणून ती लागलीच शमीकाच्या घरात गेली.

मिनाला असं सजलेल बघून शमिका आणि मनी दोघांनाही आधी हसू आवरले नाही. पण नंतर मिनाचे सगळे दागिने बघण्यात त्यांचा वेळ निघून गेला.

तेवढ्यात खाली फटाक्यांचा जोरदार आवाज आला आणि ढोल वाजू लागला. म्हणून सगळे रहिवाशी पटापट गेटकडे धावले. तर कळलं की काटकरांच्या चिंटूने दिवाळी समजून घरातून अगरबत्ती आणून कोणाचे लक्ष जायच्या आत माळ पेटविली होती आणि ढोलवाल्यांनी त्यांना आधी सुचना दिल्याप्रमाणे फटाके वाजल्यावर ढोल वाजवला होता.

विनूने चिंट्याला एक रपटा दिला. एक तर मुश्किलीने फटाके मिळाले होते ते ही गेले ह्याबद्दल सगळ्यांना थोडे वाईट वाटले.

त्याचबरोबर खाली आलेले रहिवाशी फजिती झाली म्हणून मागे फिरले. जोशी काकू गुडघे सांभाळत कशाबशा गेटपर्यंत आल्या होत्या त्यांचा ही हिरमोड झाला.

सगळे घरी परतले तेवढ्यात अनिल फोनवर बोलत धावतच खाली आला. त्याच्यापाठोपाठ आरतीची थाळी घेऊन नीलिमा आणि त्यांचा मुलगा चिन्मय उर्फ चिनू ही खाली आले. पुन्हा ढोल वाजायला लागले आणि होम मिनिस्टरच्या गजरात आदेश भावोजींचे स्वागत झाले.

आदेश भावोजी आल्यामुळे पूर्ण सोसायटीत होम मिनिस्टरचा जयघोष सुरू झाला.

सोसायटीतील सगळे रहिवाशी आदेश भावोजींची एक झलक बघायला आतुर झाले होते. तेवढ्यात नीलिमाने सजवलेली आरतीची थाळी पुढे करून भोवोजींचे औक्षण केले. मग एक सुंदर उखाणा म्हटला. सगळ्यांनी टाळ्या वाजवून निलिमाचे कौतुक केले.

मग गर्दी बाजूला सारीत अनिल आणि नीलिमा आदेश भावोजींना त्यांच्या घरात घेऊन गेले. शूटिंगच्या सेटअप साठी आधीच काही मंडळी १५ मिनिटांपूर्वी घरी आली होती. त्यांनी कॅमेरा सज्ज केला आणि मग काही वेळातच आदेश भावजींचे पोटेंच्या घरात आगमन झाले.

इथे घराबाहेर भरपूर गर्दी जमली होती. इतका आवाज, गोंधळ की विचारायलाच नको. त्यामुळे शूटिंगचे रिटेक होऊ लागले. आदेश भावोजी पुरते वैतागले.

मग त्यांनी स्वतः घराबाहेर येऊन सोसायटीतील रहिवाशांना विनंती केली व ते म्हणाले, "शूटिंग सुरू झालेले आहे तर कृपया करून कोणीही आवाज, गडबड, गोंधळ करू नये. तसेच फोटोचा फ्लॅश ही पाडू नये. त्यामुळे आमच्या शुटिंगमध्ये व्यत्यय येत आहे. शूटिंग संपल्यावर फोटो काढण्यासाठी मी तुम्हाला १० मिनिटांचा वेळ नक्की देईन. त्यामुळे आता सर्वांनी शांतता राखा."

त्यांचे बोलणे ऐकल्यावर सगळे रहिवाशी शूटिंग संपण्याची वाट बघू लागले.
इथे बाहेर काहीजण भावोजी काय काय बोलत आहेत ते कान देऊन ऐकत होते. तर काहींचे इशाऱ्यांमध्ये बोलणे चालू होते पण कोणीही दरवाज्याच्या बाहेरून हटत नव्हते. काय माहित कोणत्याही क्षणी भावोजी बाहेर येतील आणि त्याच वेळेला आपण इथून गेलो तर त्यांच्याबरोबर फोटो काढण्याची संधी हुकेल.

कोपऱ्यात उभ्या राहिलेल्या शमिका आणि मनी हळू आवाजात एकमेकांशी बोलत होत्या.
मनी : त्या जोशी काकूंना बघ तरी. नुसतं पुढे पुढे. नाही त्या वेळेला यांचे गुढगे दुखून येतात. आता बऱ्या उभ्या आहेत.
शमि : तेच ना आणि त्या काटकर त्यांना फोटो काढण्यात कधीच इंटरेस्ट नसतो आता बऱ्या उभ्या आहेत जोड्याने.
मनी : ताई, तू नुसती बघत राहा. आज एक एकाचे रंग दिसतील तुला.
शमि : सोड त्यांना. आपण आपलं सेल्फी काढुया आणि हॅशटॅग 'होम मिनिस्टर शूटिंग -सिस्टा लव्ह' असे देऊयात.
मनी : आता कसं बोललीस.

आणि मग ह्या दोघींचे फोटोसेशन सुरू झाले. मग समीरा सुद्धा त्यांच्यात सामील झाली. असे म्हणता म्हणता एक एक करून सगळीच फोटोत येऊ लागली.

त्यावेळेपुरते सोसायटीमधले सगळे रहिवाशी एक झाले होते. अगदी सणवार असल्यासारखं सगळीकडे वातावरण होतं.

समिराने सबनीसांच्या मदतीने सगळ्यांसाठी स्नॅक्सची सुद्धा व्यवस्था केली होती. असे म्हणता म्हणता काही वेळात शूटिंग संपुष्टात आलं. नीलिमाला मोरपिशी रंगाची पैठणी मिळाली होती. ती नेसून ती घराबाहेर आली आणि मग एक लास्ट शॉट अंगणात घेतला गेला. तिथे सोसायटीतील सगळे रहिवाशी होम मिनिस्टर असा जयघोष करीत असताना अनिल निलिमाला उचलतो.

हा शॉट ही उत्तमरित्या शूट झाला. मग ठरल्याप्रमाणे आदेश भावोजींनी सगळ्यांबरोबर भरपूर फोटो काढले.
मग भावोजींनी सबनीस यांच्याकडून सोसायटी तर्फे देण्यात आलेला मान म्हणजे श्रीफळ आणि शाल यांचा स्वीकार केला.

ते सुरू असताना बंटी गर्दीतून पुढे आला आणि आदेश भावोजींना म्हणाला, "होम मिनिस्टर वाले काका तुम्ही गेम घेणार होता ना? मग ते कधी घेणार आहात. आम्ही सगळे कधीपासून वाट बघतोय. मी आणि चिनूने प्रॅक्टिस पण केली आहे. मला माहित आहे जो गेम जिंकतो त्याला तुम्ही पैठणी गिफ्ट देता. मला पण ते गिफ्ट पाहिजे. फोटो नंतर काढा आधी गेम घ्या."

बंटीच्या ह्या बोलण्याने एकच हशा पिकला. शमिने डोळे मोठे करून बंटीला दटावले.

बंटीचे धैर्य बघून आदेश भावोजींनी त्याला जवळ बोलाविले आणि त्याला होम मिनिस्टर तर्फे एक गिफ्ट आणि चॉकोलेट प्रेमाने दिले. बंटीचा आनंद गगनात मावत नव्हता.
शमिका आणि मनी हे पाहून आधी आश्चर्यचकित आणि मग आनंदी झाल्या.

मग आदेश भावोजींनी पोटे फॅमिलीचा निरोप घेतला आणि जाता जाता रेवाने बनविलेल्या पदार्थांचे सुद्धा कौतुक केले आणि ह्या सोसायटीतील रहिवाशांच्या ऐक्याला सलाम करत ते निघून गेले.

मग समीरा आणि तिच्या पंटर गॅंगने ठरविल्याप्रमाणे स्नॅक्स आणि थंडाची पार्टी सोसायटीतील राहिवाशांना दिली.
सगळ्यांनी त्या पार्टीचा मनमुराद आनंद लुटला.
अशाप्रकारे गोड-कडू आठवणी घेऊन सगळे आपापल्या घरी परतले.

~समाप्त~

(ही कथा कशी वाटली हे नक्की कळवा. कथा आवडल्यास तिला नक्की शेअर करा. धन्यवाद.)

@preetisawantdalvi

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED