रात्री ते चौघेजण नावेतून बेटावर पोहोचले. झपाझपा पावले टाकत त्यांनी मंदिर गाठले. आणि कुदळ फावड्याने आसपासची जमीन उकरू लागले. बराच वेळ उकरल्यानंतरही खजिन्याचा काहीच मागमूस दिसेना.
"सोनं सापडलं ही गोष्ट तर खरी आहे मग खजिनाही असलाच पाहिजे...... पण त्याचं दार कुठं असल ?" याच विचारांनी त्यांनी एकूण एक ठिकाणी उकरून पहिले. अगदी मंदिराची भिंतही फोडून टाकली. शेवटी एकाने शक्कल लढवली. 'कदाचित मूर्तीच्या चौथऱ्याखाली खजिन्याचं गुप्त दार असावं'. मग काय?
दणादण घनाच्या घावाखाली मूर्तीच्या ठिकऱ्या उडू लागल्या. ती शेकडो वर्षे जुनी ऐतिहासिक मूर्ती फोडताना त्यांना काहीच वाटत नव्हते. सोन्याची चमक त्यांच्या डोळ्यात बसली होती आणि तिने त्यांना आंधळं केलं होतं. दगडी मूर्ती तर फुटली पण त्याखालचा चौथरा काही फुटायला तयार नव्हता. बराच वेळ त्यांचा प्रयत्न चालू होता. इतक्यात कसलातरी प्रकाश बेटाच्या टेकडीवरून आला. "पोलीस?" सगळ्यांनी घाबरून सामान जिथल्या तिथे टाकून तेथून पोबारा केला.
सावडीत नेहमीसारखी पहाट उगवली होती. डोडोमावर पोहोचण्याची नेहमीचीच स्पर्धा सुरु झाली होती. एका मागोमाग एक होड्या डोडोमाचा रस्ता पकडत होत्या. पण बेटावर येऊन पाहतो तर काय? मूर्तीची राख रांगोळी झाली होती. चौथऱ्यावर, खांबावर, भिंतीवर घणाचे घाव स्पष्ट दिसत होते. मंदिराभोवती नुसता मातीचा ढीग लागला होता. सगळ्या मंदिराची रयाच गेली होती.
"कोणी केलं ? कोणी केलं?" सगळीकडे चर्चा सुरु झाली तोच मंदिरापासून दूर दाट झाडींपाशी काही मृतदेह सापडले.
"हे कोण आहेत? यांना कोणी मारले? आणि कसे? कोणाच्याही अंगावर कसलेच व्रण नव्हते कि कुठे रक्त सांडले नव्हते. मग यांचा मृत्यू झाला कसा? आणि मंदिरात तोडफोड कोणी केली? " लोक एकमेकांमध्येच कुजबुजू लागले. थोड्याच वेळात पोलिसांचे आगमन झाले आणि त्यांनी सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली. चोरांच्या त्या टोळीला पोलिसांनी लागलीच ओळखले. सोन्यासाठी त्यांनी आजवर कितीतरी धाडी घातल्या होत्या.
चोरांचे नाव समोर येताच सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. सोन्याच्या खजिन्याच्या लोभापोटी त्यांनी हे कृत्य केल्याचे उघड झाले. पण ते ऐकताच परिस्थिती आणखीन चिघळली. "देवाची विटंबना करणाऱ्या या नराधमांच्या शरीरालाही असंच छिन्नविछिन्न करा." अशी सगळीकडे ओरड उठली. एव्हाना गर्दीही बरीच जमली होती. सगळ्यांच्याच डोळ्यात आग भडकली होती. एवढ्या प्रक्षुब्ध जमावातून मार्ग काढत मृतदेह बाहेर नेणं मोठ्या जिकीरीचं होतं. अखेर पोलिसांनी मार्ग काढला. शवपरीक्षक डॉक्टरांनांच तिथे बोलावून त्याची जमेल तशी तपासणी केली गेली. तोवर पोलिसांनी साखळी बनवून जमावाला अडवून ठेवलं.
अखेर रिपोर्ट आला. पण मृत्यूचं कारण काही समजलं नाही. 'अपिरिचित कारणाने मृत्यू' असा शेरा देऊन डॉकटर मोकळे झाले. पण पोलिसांसाठी गुंता आणखीनच वाढला. ना शास्त्राचा वार, ना कोणता आजार, विष?.... औषध? ....... काहीच नाही. कोणतेच कारण सापडले नाही. मग या चौघांचा मृत्यू झाला कसा? पोलिसांचा विचार विमर्श चालूच होता तोवर जमाव आणखीन प्रक्षुब्ध झाला.
अखेर एका हुशार पोलीस अधिकाऱ्याने जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. "ज्या चोरांनी देवीची मूर्ती फोडली त्या चौघांचीही मृत्यू झाला आहे. आता त्यांच्या मृतदेहाला शिक्षा देऊन काहीच साधणार नाही आणि ते नीतीला धरूनही नाही. 'मृतदेहाची विटंबना करायची नसते, मग ती शत्रूचीही का असेना' असं खुद्द गीतेत कथन केले आहे. तरी तुम्ही त्यांच्या शरीराला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका. त्यांनी जो गुन्हा केला त्याबद्दल देवीने स्वतः त्यांना शिक्षा केली असं म्हणायला हरकत नाही. कारण मृत्यूचं कोणतेही कारण अद्याप सापडलेलं नाही. तरी कृपा करून तुम्ही सगळ्यांनी आपापल्या घरी जा."
त्याच्या या वक्तव्यामुळे आणि गीतेच्या दाखल्यामुळे अपेक्षित परिणाम साधला. जमाव आता शांत झाला होता. पोलिसांनी त्या चौघांचेही मृतदेह त्याच बेटावर जंगलवजा दाट झाडीत पुरले. लोकही आपापल्या घरी निघून गेले. चौघा चोरांच्या मृत्यमुळे ते थोडेफार समाधानी होते.
काही दिवसातच परिस्थिती स्थिरावली. गावात नेहमीप्रमाणे दिनचर्या सुरु झाली. पंचांनी सभा बोलावून देवीची हुबेहूब नवीन मूर्ती बनवून तिची प्रतिष्ठापना करण्याचा ठराव केला. ठरल्याप्रमाणे मंदिराच्या डागडुजीचं कामही सुरु झालं. कोळी लोक पुन्हा आपापल्या होड्या भल्यापहाटे डोडोमाकडे हाकू लागले. आणि मूर्ती जरी नसली तरी त्या अर्धवट पडक्या मंदिराच्या पायरीवर डोकं ठेऊन मासेमारीला सुरवात करू लागले. घरोघरी नेहमीचीच कामे होऊ लागली. एकूणच काय? तर सगळी परिस्थिती सामान्य झाली.
या घटनेला एक हप्ता होऊन गेला होता. आता कुठे गाडी रुळावर आली होती. सोन्याचा खजिना आता कुठे लोकांच्या डोक्यातून उतरला होता. अफवांचा गाळ ही खाली बसला होता. तोच एक नवीन अघटित घडले....
क्रमश: