एक टॅक्सी-दोन प्रवासी - भाग 1 Manini Mahadik द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक टॅक्सी-दोन प्रवासी - भाग 1ठिकाण:कुठलसं शांत.

वेळ:अर्ध्या रात्रीची.

टॅक्सीतुन दोन जण उतरले.एकमेकांना अनोळखी.अगदी रात्रीच भेटलेले,पण एकाच गुंत्याने त्यांना एकत्र आणलेलं. रक्त गोठवुन टाकणारी थंडी होती.टॅक्सीतुन पाय खाली टाकवेना,पण माणुसकीच्या नात्याने,अर्ध्या रात्री देवमाणसासारखा भेटलेला टॅक्सी ड्राइवर इथवर सोडतो असं स्वतःहून म्हटल्यामुळे त्यांचं फावलेलं.अशातच त्याला अमक्या ठिकाणी सोड म्हणणं वावगं ठरणार होतं अन उजाडायला जेमतेम काहीच तास उरल्यामुळे त्यांच्यासाठी सोयीचही जाणार होतं.

ते उतरले.टॅक्सी चालकाला धन्यवाद केला अन उपकृत नजरेनं जात्या टॅक्सीला नजरभरून पाहिले.मागच्या काचेवर लावलेला रेडियम चा एका महाराजांचा फोटो आशीर्वाद देण्यासाठी उंचावलेला होता.रात्रीच्या चांदण्यातून तो चमकून गेला.

दोघांनी एकमेकांना पाहिलं.दुरदूरवर आठवून पाहिलं पण त्यानी कधीच एकमेकांना पहिलं नव्हतं.पण आज मात्र खूप वर्षांची ओळख असल्यासारखं वाटलं त्यांना.

संभाषणाची सुरुवात करावी म्हणून एकजण बोलला, माझं नाव जोसेफ,आणि तुमचं?

दुसरा इसम म्हणाला मी जतीन.

जोसेफ: चला तिथे शेकोटी दिसतेय,आपण तिकडे जाऊया.

जतीन: हो,थंडीपण खूप आहे,तिथे गप्पाही मारता येतील.


ते शेकोटीजवळ गेले पण तिथे कुणीच नव्हतं. तिथं त्यांना एक सिगारेट च पाकीट मिळालं, अत्यंत महागड्या ब्रॅण्डचं. पण कुणाचं का असेना आपल्याला काय असा विचार करून दोघांनी सिगारेटी तोंडाला लावल्या.आता जरा बरं वाटलं त्यांना.


जतीन: मी एक जनावरांचा व्यापारी आहे, त्यासाठी टेम्पो भरून जनावरे नेलेली,मी दुचाकीवर मागून होतो; टेम्पो पुढे निघून गेला पण माझी गाडी ऐन घाटात बंद पडली.अन फोनचं नेटवर्कही नसल्यामुळे मला कुणाशी संपर्क साधता आला नाही.पण एवढ्या रात्री तू तिथे कसा?


जोसेफ: मी एवढ्या सहज तिथे आलो नव्हतो,माझा तर नेहमीचा रास्ता देखील नव्हता तो,पण नेमका तो रस्ता बंद आहे असं कळालं, अन मला घाटातून जावं लागलं,माझी गाडीही घाटाच्या थोडी पुढेच बंद पडलेली, बरेच तास मी पण तिथेच अडकून पडलो होतो.


जतीन: मग तू माझ्या आधीच आलेला असशील कारण मी एकही गाडी जाताना पहिली नाही.


जोसेफ: होय कदाचित. अंधार वाढल्यानंतर मात्र माझी घालमेल सुरू झालेली,घरी तर उशीर होईल म्हणून सांगितलं होतं त्यामुळे तिकडून कुणी शोधत येईल ही अशाच नव्हती.


जतीन: हो ना,म्हटलं तर रात्रीचाच प्रश्न होता पण 4-5 तास उलटून गेले तरी एकही वाहन नाही,हे जरा अनाकलनीयच नाही का?


जोसेफ: अहो त्यात न काळण्यासारखं काहीच नाही.खूप मोजकी वाहन जातात तिथून,अन रहदारी नसतेच कधी तिकडे.


जतीन: मग टेम्पो ड्राइवर ने मला तिकडून का नेले असेल? माझी जनावरे घेऊन पळून तर गेला नसेल ना?


जोसेफ: असू शकतं तसंही, नाहीतर तो तरी आलाच असता ना तुम्हाला शोधत.


जतीन: आता इथून निघाल्याशिवाय अन सकाळ झाल्याशिवाय मार्ग नाही सापडणार.


जोसेफ: मी घाटात आजूबाजूला कोणी आहे का म्हणून शोधायला रस्त्याने जरा मागे आलो तर तिथे तुम्ही दिसलात अन जरा हायसं वाटलं. अगोदर वाटलं कुणी लुटारू तर नसेल पण नंतर संशय दूर झाला.


जतीन: बरच केलंस, मी पुरता भांबावून गेलो होतो,तशा अंधारात अन दाट झाडीत सोबतीला कुणीतरी आहे म्हटल्यावर जीवात जीव आला माझ्या.


--तर अश्या प्रकारे ते दोघे भेटले होते-

अन अचानक ही टॅक्सी देवदूत म्हणून आली होती.

गप्पा मारत,सिगारेट चे झुरके मारून दोघे मुटके होऊन तिथेच झोपी गेले.

सकाळ झाली.दोघेही उठून बसले,आता एकमेकांचे चेहरे स्पष्ट बघितले अन पाहून हसले देखील.सभोवार जरा नजर टाकली.


जतीन: (जवळ जवळ ओरडतच)

शेकोटी कुठेय?

जोसेफ:अरेच्चा!विझली म्हणावं तर राखही नावाला राहिली नाही,अन सिगारेट च पाकीट

जतीन: तेही नाही,साधी थोटकंही नाहीत. हा काय प्रकार आहे?

दोघेही डोळे चोळत उठले,अन कदाचित आपणच झोपेत जागा बदलली असेल म्हणून इकडे-तिकडे हिंडून आले.पण शेकोटीचं नावही नव्हतं.

आता मात्र ते दोघे घाबरले. यापेक्षा रात्रीचा अंधारच बरा होता असे त्यांना वाटायला लागलं.

आजूबाजूला पाहिलं तर झाडीच झाडी.रस्त्याचा तर पत्ताही नको,पण रात्री टॅक्सीतुन उतरल्यावर त्यांनी खात्रीशिरपणे दूरवर दिसणाऱ्या घरांच्या मिणमिणत्या बत्त्या पहिल्या होत्या.अन सकाळी इथे झाडी कशी? अन जर इथे कुठला रस्ताच नाही तर टॅक्सी इथवर आलीच कशी?.................


-----क्रमशः-----