Poet Asahya - 2 books and stories free download online pdf in Marathi

कवी असह्य. - 2 - असह्यांच झेंगाट.

चेकाळलेली दहशतवादी टोळी, बोकाळलेली महागाई व ढासळलेली अर्थव्यवस्था यापेक्षा चुरगळलेली प्रेमचिठ्ठी आणि त्यात मुरगळलेली मने ही आजच्या तरुणाईला जास्त जवळची वाटतात. शरीरात रसायनांची आलबेल झाल्याने लागलीच उत्क्रांतिवादाची सूत्रे स्वतःकडे घेऊन निसर्गाला उन्नतीकडे नेणे कोणाला नको असेल? असे असले तरी प्रत्येकाने देशाकडे सुद्धा लक्ष दिलेच पाहिजे. त्यासाठी मग लग्न नावाची संकल्पना जन्मास आली! लग्न झालं की उत्क्रांतिवाद ते औद्योगिक क्रांती असा प्रवास माणूस करतो, हा माझा स्वानुभव आहे. देशातील तरुणांना धडाधड बोहल्यावर चढवल्याने पटापट देश पुढे जाईल या सरळसोट मताचा मी आहे! हे इतकं सोपं रहस्य आज मला असह्यांच्या गळी उतरवताना भगीरथ प्रयत्न करावे लागत होते. एकीकडे मला कामाला जायची घाई, त्यात दुसरीकडे कवी असह्य गादीवर मांड रोवून बसलेले. त्यांची माळ्यावरची बाड मी काढून दिल्यावर ते त्यात काहीतरी खरडत होते. त्यांच्या रेघोट्या आणि हिच्या कपाळावरच्या आठ्या क्षणागणिक गुंतागुंतीच्या होत निघाल्या होत्या. अलीकडे कामगारांच्या मानगुटीवर तसेच प्रसंगी छाताडावर बसून कंपन्यांनी कामगारांचे यथेच्छ लचके तोडायला सुरुवात केली आहे. बायोमेट्रिक च्या डब्यात अंगठा दहा मिनिटे जरी उशिरा घुसला तर त्या दिवसाचा अर्धा पगार अदृश्य होतो. आजचा पगार अदृश्य होऊ नये इतकंच माझं—सोबतच हिचं म्हणणं आहे!

अरे कोण आहे ती? तरुणपणी (चोरून) पाहिलेल्या इंग्रजी चित्रपटातील मार्लिन मन्रो तर नाही? निश्चितच मार्लिन! तिची ती चालण्याची दिलखेचक ढब, विदेशी राहणीमानाला साजेसे कपडे, तेच सौंदर्य; पण मार्लिन इथे काय करतीये? असले प्रश्न आता कामाचे नाहीत! एक काळ होता जेव्हा मी आणि मार्लिन एकाच वयाचे! आता मात्र मी पस्तिशीत आणि मार्लिन पंचविशीतली.
'आज भरायचं नाही का पाणी?'
अरे मार्लिन मराठी कधीपासून शिकली? तिचा आवाज इतका पहाडी कधीपासून झाला? चेहऱ्याला न मानवणारा आवाज तिच्याकडे का? माझ्या अंगावरची चादर आसमंतात उडाली. भेदरून मी जागा झालो तेव्हा पुन्हा आकाशवाणी झाली. "काल लय हौस आलती ना पाणी भरायची, आज भरायच नाही का पाणी?"
मी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला परंतू डोळ्यांवरच्या चिपडांनी पापण्यांना जखडून धरलं होतं. महत्प्रयासाने एक डोळा उघडून घड्याळाकडे पाहिलं—सव्वासात वाजले होते. मग मी अपराधी भावनेने मार्लिन कडे पाहिलं!
"डोळे कसले मारताय सकाळी-सकाळी?"
चादरीचा गोळा माझ्या थोबाडावर बसला. माझा डोळा न उघडण्याची कारणे तिला न समजावता मी चादरीची घडी केली, जोडीला तिनेही 'भूपाळी' सुरू केली. असं वाटलं तिला जवळ घेऊन प्रेमाने विचारावं, 'काल मी बघ बरं तुला कसं पाऊण तास जास्त झोपू दिलं! तसं तू मला पंधरा मिनिटे जास्त देऊ शकत नाहीस?' पण तेवढ्यात मी ब्रश केला नसल्याचं मला जाणवलं. हळुवारपणे मी शेगडीवरच्या पातेल्यात तांब्या रिकामा केला. त्याच पाण्यात बोट बुडवून मी डाव्या डोळ्याच गवाक्ष उघडलं, तेव्हा कुठे मला हायसं वाटलं. काल हिचा हात चुकूनच माझ्या डोळ्यांजवळून घासून गेला त्याने डोळ्याला कोणतीही इजा झालेली नव्हती!
कोमट पाणी ढोसून आवश्यक सामुग्री, जे की बादलीभर पाणी, घेऊन मी वायुवेगाने निघालो. माझा डावा डोळा फडकतच होता. कोणता डोळा फडकल्यावर काय होतं हे माहीत नसल्याने मी दोन्ही डोळ्यांच्या फडकण्यासाठी अपशकुनच गृहीत धरतो.
माझा अंदाज बरोबर होता. कोणीतरी एकांत-वासात निवांत बसलेलं होतं. ती काय मुक्काम करायची जागा आहे का? एक ते शंभर व पुन्हा शंभर ते एक मी मनाला गुंतवून मानवी शारीरिक मर्यादा ताणू पाहत होतो. शेवटी दुसऱ्या वेळेसच्या तेराला, माझे तीन-तेरा होण्याआधी, स्वर्गाचे दार उघडले! मुक्तीचा अनुभव घेऊन मी माघारी येत असतानाच मला रस्त्यावर एक किडमीडी आकृती पोलिओ झाल्यासारखी पावले टाकत माझ्याच रोखाने येताना दिसली—निसंशयपणे कवी असह्य.
आमची ही कशीही असली तरी तिच्या स्वभावाला तोड नाही! मूळची पुणेरी नसल्याने ती पाहूणचारला मागेपुढे पाहत नाही. आणि (फक्त सकाळी घरी आलेल्या) माझ्या मित्रांना कधी हिडीसफिडीस देखील करत नाही. फक्त माझ्याशीच अशी का वागते हे रहस्य आहे. कवी असह्य कालच्याच कपड्यात माझ्यासमोर उभे होते, दररोज कडक ईस्त्रीचे कपडे बिचारा कवी तरी कुठून आणणार! त्यांच्या डाव्या कोल्हापूरीचा (फर्स्ट कॉपी) अंगठा तुटलेला होता व चेहरा ही कष्टी दिसत होता. कपडे थोडेसे मळकट होते, चष्मा दिसत नव्हता. नक्कीच काहीतरी बिनसलय हे मी ओळखलं.
"कामाला जायला उशीर होतो तर लवकर उठायचं कळत नाही का . . . " मी पायरीवर होतो तोपर्यंत शांत असणारी अचानक माझं 'कौतुक' करायला लागली " . . . अहो भाऊजी तुम्ही कधी आलात?" हिने पटकन विळी आणि अर्धवट चिरलेला कांदा किचनओट्यावर घेतला.
काम थांबवून तिने असह्यांची विचारपूस केली असता असह्यांनी एक शब्दही न बोलता गादीचा कोपरा पकडला. 'काय झालय?' हिने भुवई उडवली. 'माहिती नाही' मी नकारार्थी मान हलवली. कवी असह्य नक्कीच कोणत्यातरी दु:खाने पिचले होते.
"बसा असह्य मी आलोच." असह्यांनी फक्त होकारार्थी मान हलवली. मी पटकन ब्रश केला, अवयवांची चाचपणी केली, गाल खरडले, पर्यावरणासाठी एक मग पाणी राखून ठेवलं आणि आठच्या काट्याला आरशासमोर तेलाची बुदली दाबत होतो. असह्य घरात आहेत या संधीचा मी पुरेपूर फायदा घ्यायचा ठरवलं.
"आज बाजारातून तेलाची पिशवी आणून या बाटलीत ओत ग . . . " मी म्हणालो.
"हो, हो नक्कीच!" तिचा घनगंभीर आवाज दहा बाय बारा मधे प्रतिध्वनीत झाला.
कसाबसा कंगवा मारून मी पटकन असह्यांच्या जवळ बसलो. पोह्यांच प्रमाण ठरवायच्या आतच असह्य आल्याने एक प्लेट कांदेपोहे त्यांनाही मिळाले. असह्य निशब्द असले तरी त्यांचा अन्नावर राग नव्हता! असा पाहिजे माणूस अन्नावर कधीच राग धरायला नको! वास्तवात हिने पोहे बनवताना एकास-एक अशा गुणोत्तरात बनवले होते; परंतू वाटताना दिडास-अर्धा अशा गुणोत्तरात वाटले. असह्यांच अतीव दु:ख कमी करण्यात दिड प्लेट पोहे थोडातरी हातभार लावतील या विचाराने मी शांत राहीलो. दोन्ही प्लेट मी कट्ट्यावर ठेवताना खिडकीतून पाण्याच्या नळाकडे पाहण्याचा मोह आवरता घेतला. कारण, तिथे ही सुद्धा होती!
"काय झालय असह्य?" मी म्हणालो. त्यावर असह्य हळुवार काहीतरी पुटपुटले. पोहे खाण्याच्या आधी ते हळू आवाजात बोलले असते तर ठीक होतं; पण पोह्यांची ताकद असताना हळू आवाजात पुटपुटाव? "काय झालय असह्य सांगणार आहात का नाही?"
"बाड . . . "
"काय?"
"बाड कुठाय माझी?"
"बाड न्यायला आलात!" मी आवाजातील आनंद लपवण्यासाठी केलेला प्रयत्न निष्फळ ठरला! मी पटकन मोरीतला पाट घेतला. एक पाय किचन कट्ट्यावर, एक दरवाज्याच्या कडीवर असा नेत्रदीपक डोंबारी खेळ करत कवी असह्यांची माळ्यावर भिरकावलेली बाड मी बाहेर काढली. पाट मोरीत टाकला आणि ती बाड (निष्ठुरता कच्चीप्रत) मूळ मालकाकडे सुपूर्त केली.
"मी तर तुम्हाला चांगला मित्र समजत होतो." असह्य विषण्णपणे म्हणाले.
"मग आता काय बिघडलय" मी आनंदात ओरडलो.
"एकाच दिवसात तुम्ही माझी पोर माळ्यावर फेकलीत!"
'पोर?' ते बाडीविषयी बोलताहेत हे मला अमळ उशीराच कळालं. कवी माणूस काहीही सहन करेल; पण त्याच्या काव्याचा अपमान कदापि सहन करणार नाही. कोणी एखादी कविता, संपूर्ण, ऐकतो म्हणलं की असह्य त्यांची मान गिलेटीन खाली द्यायलाही तयार होतील!
"तसं नाही असह्य . . . " मी शब्द शोधू लागलो " . . . तुमची बाड मला नाविलाजाने पोटमाळ्यावर ठेवावी लागली." मी म्हणालो.
"का?" असह्यांचा आवाज पूर्वपदावर येत होता.
"आमची ही उगाचच बाड चाळत बसली होती म्हणून!"
"मग तुम्हाला काय त्रास होत होता?" असह्यांचा कालचा खणखणीत आवाज त्यांना परत मिळाला. बहुधा पोह्यांचा परिणाम असावा!
"स्वयंपाक." मी स्पष्टीकरण दिलं.
"स्वयंपाक? आणि तुम्ही?" कवींना अर्थबोध झाला नाही मात्र अर्थाचा अनर्थ त्यांनी व्यवस्थित लावला.
"स्वयंपाक म्हणजे ही वेळेवर स्वयंपाकच करत नव्हती. काल सारखीच तुमची चित्रे तपासायची." एक खोटं लपवायला शंभर खोट्यांच पाठबळ असावं लागतं! "म्हणून मग शेवटी कंटाळून मी रागाने घेतली बाड आणि . . . व्यवस्थित माळ्यावर ठेवली!"
मी शेवटचं वाक्य बोललो तेवढ्यात ही कमरेवर पाण्याचा हंडा घेऊन आत आली. मी तत्परतेने तिच्या कमरेवरचा हंडा उचलून नियोजित जागी पोहचवला. मी वळालो तेव्हा ही हंडा दुसरा आणायला गेलेली. मी असह्यांजवळ केलेली तिची खोटी कागाळी तिने ऐकली होती का नाही हे मला कामावरून घरी आल्यावरच कळणार होतं! मी पंखा चालू करून असह्यांच्या जवळ बसलो.
"कोणती चित्रे बघत होत्या वैणी?"
'ए बाबा तुला काय पडलंय?' मी मनातल्या मनात चरफडलो. 'तू कशाला आलाय ते बोल ना.' मी सावधानतेने आधी चित्रकला व काव्य या शाखा वेगवेगळ्या केल्या, तसा हुशार आहे मी! मग कवी असह्यांच्या बाजूचा उजवा डोळा उघडा ठेवला आणि डावा डोळा झाकला, त्रास झाला तर एकाच डोळ्याला होईल!
"बघा हे चित्र, जे काय आहे, ते तिला खूप आवडलं."
"हे चित्र होय . . . " असह्य आनंदाने ओरडले " . . . हे चित्र तर कोणालाही आवडेल. पंचमहाभूतातून निसर्गाने निर्मिलेली बेजोड कलाकृती म्हणजे मानव व मानवानेच निसर्गाची कलाकृती बनवावी हा चमत्कारच आहे, नाही का?" असह्यांची गाडी सुसाट सुटली.
"हे पहा बगुल पक्षांचा थवा . . . " मलातर मराठीतला ४ आकडा चार-तीन-दोन-एक अशा उतरत्या क्रमाने दहावेळा काढलेला दिसत होता! "हे पहा डोंगर . . . " मी काढलेल्या भूमितीतल्या त्रिकोणांना रेखीवपणा कमी असावा! "ही पहा नदी . . . " नदीतील स्फटिकासारखे पाणी पाहून माझे डोळे दिपले! नंतर अलीकडे त्या नदीवर पूल होता, एक झोपडी होती. मानव आकृत्या हुबेहूब काढण्याचे कष्ट वाचावेत म्हणून असह्यांनी वारली चित्रांचा प्रयोग केला होता! त्या चित्रात जागोजागी तण माजलेल होतं! चित्र बघताच माझा डावा डोळा पुन्हा सताड उघडला गेला!
कला म्हणलं की माझा मेंदू सुन्न होतो. कोणत्याच कलेतील मला काहीच कळत नाही, अज्ञान मान्य करायला लाजायचं कशाला? मी कला-अज्ञानी नसतो तर असह्यांच्या निसर्गचित्रात मला निसर्ग जरूर सापडला असता! माझ्या मते ते निसर्गचित्र होतं; पण दुसऱ्या ग्रहावरच! हे चित्र-विचित्र प्रकरण संपण्याआधीच ही दुसरा हंडा घेऊन हजर झाली.
"वैणींना विचारू का, या चित्रातलं काय आवडलं?"
'अरे मूर्ख माणसा,' मी मनातल्या मनात म्हणालो, 'तुझा त्रास काय आहे?' मी पटकन उठून हिच्याकडून हंडा घेतला आणि नियोजित जागी ठेवला.
"काय विचारायचय भाऊजी?" हिने पदराला हात पुसत विचारलं. असह्य तिला त्यांची वारली चित्रे दाखवणार तेवढ्यात मी तिच्या खांद्याला धरून पटकन तिला उंबऱ्यावर सोडलं.
"मी बघतो तो काय म्हणतोय तू जा पाणी आणायला." मी प्रेमाने सांगितलं. मग घरात येऊन "तुम्ही बाड कशासाठी मागवलीये?" असह्यांना विचारलं.
"अरे हो विसरलोच की?"
'बरं केलत!' मी म्हणालो, "आता तुमच्या येण्याच खरं कारण सांगा मलाही कामाला जायला उशीर होतोय."
असह्यांना शब्दापेक्षा कृतीवर जास्त प्रेम आहे. त्यांनी शांतपणे, न विचारता, टेबल वरचा पेन घेतला, बाडीतील एक कोरं पान काढलं आणि आडव्या-तिरक्या रेघोट्या मारायला सुरुवात केली. आठ वाजले होते. मी पंख्याची घरघर ऐकत असताना वेळ भरभर निघून जात होता. शेवटचा हंडा आला तो सुद्धा मी सांभाळला. हिला तिसरा हंडा वर ठेवता येत नाही कारण, तिची उंची थोडी थोटकी आहे. तिच्या मते मी उंच आहे, बहुधा तिचच खरं असावं! घड्याळ सव्वाआठकडे सरकू लागलेलं. असह्यांच्या रेघोट्या आणि हिच्या कपाळावरच्या आठ्या गुंतागुंतीच्या होत निघालेल्या. आठ-वीसला (न मागता) डबा आणून माझ्या हातात अडकवला गेला. मी असह्यांना हटकणार तेवढ्यात असह्य आनंदाने चित्कारले, पोह्यांचा परिणाम बाकी काय!
"लग्नाचा बँड आता तुझ्याच दारात वाजवायचाय . . . " असह्यांनी मान हलवली.
"वाह, वाह!" मी.
बाडीत गिचमिड काला झाल्याने पुढच्या अक्षरांचा अर्थबोध कवींनाच झाला नाही! पुन्हा पाच मिनिटे खाऊन नवीन काव्यरचना करून असह्य सुरू झाले.
"लग्नाचा बँड आता तुझ्याच दारात वाजवायचाय,
भिंतीच्या कोपर्‍यात अडवून मी तिला सांगत होतो.
आपण दोघे बिछान्यावर असताना दिवापण मलाच मालवायचाय, हरेक दिवस आता आयुष्यातला मला तुझ्यासोबत घालवायचाय!
अचानक झालेल्या प्रकाराने बावरलेली ती थोडीशी सावरली. उत्तर ऐकवलच तिने,
मलापण आता संसार तुझ्याच सोबत रचायचाय,
विरहाने हरवलेला प्रत्येक क्षण पुन्हा एकदा जगायचाय!
आनंदविभोर होऊन मी म्हणालो, प्रेमावरची कविता ऐकवू का? इथेच तर चूक झाली.
इथेच तर चूक झाली, कवितेचे नाव ऐकून ती पटकन म्हणाली, थांब मला माझा निर्णय बदलायचाय!"
"वाह, वाह . . . क्या बात, क्या बात . . . " मी ओरडलो. दोन टाळ्याही वाजवल्या!
असह्यांना हे अपेक्षित नसावं. त्यांनी उसासा टाकला आणि एक अस्फुट हुंदका बाहेर पडला. मी हिच्याकडे पाहिलं, 'काय झालं याला?' तिला इशारे बरोबर कळतात. 'इकडे या.' ती म्हणाली मलाही इशारे बरोबर कळतात. तिने माझ्या मानेला पकडून माझा कान तिच्याकडे खेचला. स्वतः टाचा उचलणे तिच्या तत्वात बसत नाही!
"अहो भाऊजींचा प्रेमभंग झालाय आणि तुम्ही टाळ्या काय पिटताय? ते बिचारे सांत्वनासाठी इथे आलेत तर तुम्ही वाह वाह काय म्हणताय?"
"काय झालय असह्य?" मी मान चोळत गादीवर बसलो.
खिशातला रूमाल काढून मी असह्यांना दिला. असह्यांनी अनावर झालेली आसवे पुसली मग श्वासनलिकेत दाटलेल प्रेमभंगाच सगळं दु:ख रूमालावर रितं केलं! दु:खाचा फवारा मारलेला रूमाल त्यांनी मला देऊ केला.
"असुद्या तुमच्याकडेच." मी म्हणालो. एरवी पाच रूपयांसाठी पंचर वाल्याची नजर चुकवून गाडीत हवा भरून पळून जाणारा मी, आज रूमालाचे पंचवीस रूपये मला अगदीच चिल्लर वाटले! घड्याळात शेवटची पाच मिनिटे बाकी होती. पाच मिनिटात हे प्रकरण मिटवलं नाही तर कामाला उशीर होणार हे नक्की.
"असह्य तुमचा चष्मा दिसत नाही कुठे?" मी विषयांतर करण्याचा प्रयत्न केला.
"फुटला!"
"कोठे? कधी? कसा?" उत्सुकतेने माझा ताबा घेतला.
"तुमचा झालाय का कधी प्रेमभंग?"
"काय?" उत्तराच्या जागी अनपेक्षित प्रश्न आल्याने मीच प्रश्न विचारला.
"तुमच्या तरुणपणात तुमचा कधी प्रेमभंग झालाय का?" असह्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला.
मी हळूच डाव्या डोळ्याने कवटीच्या सीमा भेदून हिच्यावर तिरकस नजर टाकली—माझ्याकडेच पाहत होती!
"आमच्या काळात प्रेम-बिम असलं काही नव्हतं. आमच्या काळात सरळ लग्न लावून द्यायचे. चांगली, सुशील, सुंदर, सुलक्षणी, सुगरण बघून लग्न लावून दिलं जायचं. आता माझेच उदाहरण घ्या की!" मी साखरपेरणी केली. "तुम्हीही या प्रेमात वगैरे अजिबात फसू नका. अहो काही ठराविक पोरी असतातच फसव्या, त्यांच्या नादी न लागता तुम्ही एक सद्‍गुणी मुलगी बघून माझ्यासारखं लग्न करून टाका बाबा!"
मी साखर पेरतच निघालो होतो; पण माझ्या बोलण्यात थोडसं तथ्य होतं. पोटाच्या गरजा कशा भागवायच्या हा मूळ विचार न करता शरीराच्या गरजा भागवण्याकडे जास्त ध्यान दिलं की प्रेमभंग हा व्हायचाच! आई-वडिलांच्या अखत्यारीत असताना जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या मुलभूत गोष्टींचा तुटवडा नसतो, म्हणून त्यावेळी प्रेम ही भावना सहजशक्य वाटते. फक्त प्रेमाने पोट भरत नाही, फक्त प्रेमाने गरजा भागत नाहीत आणि फक्त प्रेमाने संसाराच रहाटगाडग खेचता येत नाही हे कळायला लग्नच करून पहावं लागतं! सरळ कुठल्यातरी अर्थकारणाचा स्त्रोत धरून मग प्रेमात पडावं या निर्लज्ज मताचा मी पुरस्कर्ता आहे. जीवनाचा हा सहजसोपा मंत्र असह्यांकडून कसा वदवून घ्यायचा हा यक्षप्रश्न होता. प्रेम भले तुम्हाला रात्र घालवायला मदत करेल देखील; मात्र त्यापलीकडे असलेल्या सोळा तासांच्या दिवसाच काय?
"प्रेमभंग ही कल्पनाच चुकीची आहे असह्य. तिने, जिने कोणी, तुम्हाला आता नाकारलय तिला पुढे चालून पश्चाताप होईलच."
"का होईल?" असह्यांना कारण हवं होतं.
"नाही तिला पश्चाताप व्हावाच असा काही नियम नाहीये! पण तिला पश्चाताप होईलच!" असह्यांनी गालातच कुत्सित हास्य केलं. "प्रेम काय एकदाच करायची गोष्ट आहे? पुन्हा-पुन्हा प्रेम करतच रहायचं असतं! वारंवार, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रेम करायचं असतं, नवनवीन नाती, नव्या व्यक्ती, नव प्रेम हाच बदलाचा मुळ सिद्धांत आहे!"
"हम्म . . . " हिने घसा खाकरल्याच्या आवाजाने मी कादंबरीच्या विश्वातून पृथ्वीवर आलो!
"बर चला आता मला उशीर होतोय. तुम्हाला सोडतो आणि मी कामाला जातो." असह्य उठून दरवाजाकडे निघाले. "अहो तुमची बाड राहिली!" मी आठवण करून दिली.
"तुम्हालाच दिलीये ती, विसरलात तुम्ही?"
म्हणजे संकट अजून टळलेलं नव्हतं. "पण जर तुम्हाला नवीन काही सुचलं तर?" मी खडा टाकला.
"तर मी दुसऱ्या बाडीत लिहिणं! ही तुमच्याकडेच असू द्या." असह्यांनी उंबरा पार केला.
"जातो मी." एवढा वेळ माझ्याकडे एकटक पहात उभी होती परंतू जेव्हा मी येतो म्हणालो तेव्हाच मान गर्रकन फिरवून खिडकीच्या बाहेर बघायला लागली! "येतो म्हणलं" मी तिच्या खांद्यावर थापटून सांगितलं—प्रतिसाद शून्य. शांततेलाच तिचा होकार गृहीत धरून मी निघालो. पटकन बाड पोटमाळ्यावर फेकली, फाटली वाटतं—बरं झालं!
मी बाहेर आलो तेव्हा कवी असह्य कोल्हापुरी (फर्स्ट काॅपी) खडावा पायात घालत होते. डाव्या पायाच्या कोल्हापुरीचा अंगठा तुटलेला होता. त्यांना जोरात पळावं लागलं असण्याचा अंदाज मी बांधला. नसत्या चौकशा नकोत म्हणून मी काही बोललो नाही. गाडीवर मांड ठोकून सटासट किका मारता-मारता पाच मिनिटे गेली. गाडी चालू झाली, रस्त्याला लागली. आण्णा भोकसेच्या घरासमोरून गाडीने वळण घेतलं तेव्हा मी वेग वाढवला. घरासमोरून जोरात गाडी नेणाऱ्याची वंशावळ आण्णा घरबसल्या काढून देतात! म्हणून मी आण्णांच्या घरासमोरून गाडी दामटत नाही.
"असह्य," मी बोलता झालो, "आयुष्यात पहिलं प्रेम, खरं प्रेम, शाश्वत प्रेम हे सगळं थोतांड आहे. मान्य आहे प्रित जडते; पण समजा जरी ती जडली नाही तरी तिच्या वाचून काही अडत नाही! प्रेम ही चिरंतन भावना आहे. या भावनेत नव्या गोष्टी, व्यक्ती, स्वप्ने येतात आणि जातात. इथे तुमचं जोडीदाराच प्रेम भंगलय म्हणून तुम्ही उदास झाला आहात, विचार करा तुमचा जोडीदार किती सुखात असेल! म्हणजे माझ्या बोलण्याचा वाईट अर्थ काढू नका, नीट समजून घ्या. मला फक्त इतकच म्हणायचं आहे की तुम्हालाही नवीन प्रेम मिळेल. तेव्हा आनंदाने जग दोस्ता आनंदाने जग." गाडीच्या लागणाऱ्या भरारा वाऱ्याने माझ्या मैत्रीप्रेम भावना असह्यांजवळ पोहोचवल्या का नाही ते मला माहिती नाही माझ्या कानापर्यंत मात्र असह्यांच रडगाणं सुरू झालं.
"मैं खुश हूँ मेरे आँसुओं पे न जाना, मैं तो दीवाना दीवाना दीवाना . . . "
मी असह्यांना वाऱ्यावर सोडून दिलं! प्रत्येक कठीण प्रसंगात हेच तर होतं असतं—इतरांना तो प्रसंग क्षुल्लक वाटतो आपल्यासाठी मात्र तोच कठीण प्रसंग विश्वातला सर्वात मोठा प्रश्न असतो. थोड्या काळासाठी आपण बावचाळतो मात्र काळ उलटत जाईल तस प्रसंगाच गांभीर्य निवळत जातं.
"लेखक इथे थांबायचय."
"कुठे?"
"बाळू टापेकडे."
"टापेकडे कशाला? मला उशीर होतोय?"
"इथे मी अखंड नैराश्यात बुडालोय लेखक आणि तुम्हाला कामावर जायचय? कवितांची इतकी अमूल्य बाड तुमच्याकडे दिली त्याचं हे फळ?"
"कसलच फळ नकोय मला! मला कामाला जायचय. तुम्हाला जायच असेल तर जा टापेकडे." मी म्हणालो. 'जमलच तर बाड पण घेऊन जा!' हे शब्द माझ्याच्याने रेटले नाहीत.
"नव्हतो घडवणार इतिहास पण घडला . . . "
"घेतोय मी गाडी बाळू टापेकडे! असह्य शांत व्हा." माझ्या विनवणीचा असह्यांवर काहीही परिणाम झाला नाही, होणारच नव्हता.
"नव्हतो घडवणार इतिहास पण घडला, माझ्यातला आशिक तिला भिडला, मग तिच्या तीर्थरूपांनी मला फोडला!
इथे मित्राने मित्र वाऱ्यावर सोडला, अशा मित्रापेक्षा दुश्मन परवडला!"
"उतरा आलं बाळू टापेच दुकान." मी क्षणापूर्वी एका कानाने ऐकलेला दस्ताऐवज दुसऱ्या कानातून निघावा म्हणून मान वाकडी करुन उड्या मारल्या—उपयोग शून्य. असह्यांनी पेशी खाणारा किडा मेंदूत सोडलाच होता.
बाळू टापे म्हणजे सगळ्या गावाचा उतारा! 'उडपी बाळू टापे' असं त्यांच संपूर्ण टोपण नाव. हा माणूस उडपी कसा झाला किंवा याला उडपी कोणी बनवला? तसेच हा चमत्कारी सहाफुटी बाळू टापे नक्की माणूस आहे का? अशा कितीतरी चर्चा आमच्या गल्लीत कायमच चालू असतात. माझ्या चेहऱ्याची जेवढी उंची आहे तेवढी बाळू टापेच्या जबड्याची रुंदी आहे! ज्याच्याकडे एकही गिर्‍हाईक, पैसे न देता, फुकट खाऊन जात नाही असा एकमेव खाद्यपदार्थ विक्रेता म्हणजे बाळू टापे. पिण्याच्या पाण्याच्या नळाला हात धुण्याची इथे कोणाचीच टाप नाही, असा गजब बाळू टापे. टापेच्या आवाजात खतरनाक जरब होती. 'बाळू टापे फुकट बसू देत नाही' हे खुद्द खैराबांडा बाळू टापेच दुकानात शिरताना सांगतो.
"बाळू टापे फुकट बसू देत नाही." अर्थातच टापे.
"काय म्हणतोस बाळू?"
"काय म्हणू?" दगडी आवाजात सहाफुटी बाळू म्हणाला.
"काही नाही रे असचं या असह्यला हुक्की आली म्हणाला 'चल बाळू टापेकडे.' "
"इथे हुक्की करायला जागा नाय! इथे फक्त इडलीची प्लेट रिकामी करायची आसल तरच बसायचं."
मी नियम व अटी समजून घेत असतानाच असह्य टेबल वर बसून पोऱ्याला काहीतरी समजावत होते.
"बसा लेखक."
"काय मागवलय असह्य?"
"इडली."
"मला नकोय."
"अहो घ्या हो, माझ्या एकट्याचे बिल तुमच्या नावी नको वाटतं!"
वास्तवात सकाळी (दिड प्लेट) पोहे चापल्यानंतर सुद्धा असह्यांना इडली खायची होती हे मला असह्य झालं. माझी एक इडली अर्धी संपेपर्यंत कवींच्या ताटातील दोन्ही इडल्या पूर्ण संपल्या! मी त्यांना बोलतं केलं.
"काय झालय असह्य? सकाळी घरी आलात तेव्हाही काही सांगितलं नाही. नुसताच प्रेमभंग झालाय म्हणताय, नक्की काय झालय ते तरी सांगा." मी म्हणालो. माझी दुसरी इडली निम्मी संपेपर्यंत शांततेच राज्य होतं.
"माझी कैफियत मी तुमच्याजवळ मांडेन लेखक; पण काव्याच्या माध्यमातून."
मी इडली कचाकच चावली, पटापट गिळली. "चला हो मला उशीर होतोय."
"ऐका तर माझी मुक्तछंदातील कविता 'तडक!' "
"काय तडस?"
"तडस नाही लेखक तडक, त-ड-क."
ही कविता ऐकून कदाचित मला तडस लागण्याची शक्यता 'दाट' होती!
"तडक तडक तडक, तडक बेधडक!"
असह्यांकडून कवितेची सुरूवात देशभक्तीपर गीतासारखी जोशात झाल्याने मी सावरून बसलो.
"तडक तडक तडक, तडक बेधडक! आयुष्याची सडक, निघाली रडतखडत!"
"मी आहे इथेच बिल देतो." मी पळतच बाळू टापे समोर उभा राहिलो.
"चाळीस रुपये." टापे गरजला.
"हे घ्या!" पैसे चुकते करून मी तडक गाडी गाठली, बेधडकपणे गाडीवर बसलो मग तुटलेली चप्पल घेऊन रडतखडत असह्य आले. त्यांच्याशी चुकार शब्द न बोलता मी गाडी त्यांच्या दारात उभी केली. "काळजी घ्या असह्य" मी म्हणालो.
"चारोळी संपूर्ण ऐका तरी!"
मनात विचार धावला 'दुसर्‍या कवींची असते ती चारोळी, तुमची ती आरोळी! नको तुमची आरोळी, त्यापेक्षा बरी बंदुकीची गोळी!' मी असह्यांना न जुमानता गाडी कंपनी च्या रस्त्याला लावली. बहुधा त्यांच्या संगतीचा वाईट परिणाम माझ्यावरही व्हायला लागला होता! नंतर मलाच वाईट वाटलं. प्रेमळ हृदयाच्या माणसाने आपल्याला कविता ऐकण्यासाठी पुसाव आणि आपण पळाव? मधेच थांबून मी मागे वळून पाहिलं. असह्य घरात गेलेत याची खातरजमा करूनच मी निघालो, हृदयभंग झालेल्यांचा भरोसा नसतो!
कामाला जायला उशीर व्हायचा तो झालाच, पर्याय नव्हता. मी गुपचूप कार्यालयात शिरलो, बायोमेट्रिक लावला तेव्हा आपोआपच साहेब अवतरले. गुरुजीने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना झापावं त्यापेक्षा अधिक करड्या आवाजात त्यांनी मला सुनावलं, असो, एवढं तेवढं चालायचंच! मी असह्यांच प्रकरण त्यांना सांगितलं असतं तर त्यांनी मला संपूर्ण दिवसाची (विनापगारी) सुट्टी देऊ केली असती; पण कामावरच्या निष्ठेसाठी मी तोंड दाबून शब्दांचा मार सहन केला! शेवटी मग तिथून सुटका झाली मात्र असह्यांच्या प्रेमप्रकरणातून मला सुटका मिळणार नव्हती. मी विचारात गुंतत गेलो, वेळ सरत गेला.
संध्याकाळी सातला मी गाडीजवळ पोहचलो तेव्हा फोन वाजायला लागला. 'कवी असह्य' हा माणूस माझा पिच्छा कधीच सोडणार नाही बहुतेक.
"बोला असह्य आता काय झालय?"
"बाळा मी असह्यची आई बोलते आहे, न विचारता तुला आधी सांगूनीया पाहे!"
"बोला ना?" मी म्हणालो. असह्यांच्या आईचा आवाज मी ओळखला. यांना काकू म्हणावं तर ते माझ्या रेड्यासारखा देहाला शोभलं नसतं आणि इतर विशेषणे लावायची तर असह्य माझे मित्र. त्यामुळे मी नाते विशेषण न लावता आवजाव बोलण्याची प्रथा कायम ठेवली आहे.
"असह्य काहीच बोलत नाई, तू येऊन त्याला भेटूनीया जाई!"
"का काय झालं असह्यला?"
"कसलातरी आलाय राग म्हणून केलाय त्याने जेवणाचा त्याग!"
"छे, छे, असह्य जेवणावर राग काढणाऱ्यांपैकी नाहीत." दहा तासापूर्वीचे दोन्ही प्रसंग मला आठवले.
"माहिती नाही त्याला झालय काय आता, तुम्ही चक्कर मारा घरी जाता जाता!"
"बरं बरं येतो मी भेटायला त्याला."
"दोघांसाठी भरते चहाचे कप दोन, चला आता मी ठेवते फोन!"
मी काही बोलण्याच्या आतच त्यांनी फोन ठेवलाही होता. असह्यांच्या घरी जायचं म्हटलं की माझ्या पोटात पोटशूळ उठतो! डोक्यात अर्धशिशीचा त्रास होतो! हाताचे तळवे, बहुदा पित्तामुळे, खाजवायला लागतात! पाठीत हुक भरते! आणखीही काही छोटेमोठे बिघाड होतच राहतात.
कवी असह्यांची आई कवयत्री व वडील चित्रकार! आणि या दोघांच्या (कन)फ्युजन मधून तयार झालेले कवी असह्य हे तिघे एकत्र आले की दया, क्षमा, शांती, माणुसकी ती जागा सोडून पळ काढतात!
"मला घरी जायला उशीर होईल." मी हिला म्हणालो.
"का बरं?"
"असह्यांच्या घरी चाललोय, काम आहे तिथे थोडं."
"नक्की का?" आवाजाची पट्टी वर सरकली.
"नक्कीच!" ज्या आवाजाच्या पट्टीत प्रश्न आला त्याच पट्टीत मी उत्तर दिलं.
"लवकर येणार ना? नाही तुमचा डावा डोळा सकाळी थोडा दुखत होता तो दुखायचा राहिला का?"
"येतो मी लवकरच." मी आवाजात, जमेल तितकं, मार्दव आणून म्हणलो!
कवी असह्यांच्या घरी जायचं तर तिथे प्रेमप्रकरणाचा उल्लेख करणं भाग होतं. मुळात जे मलाच माहित नव्हतं ते मी इतरांना काय समजावणार? इथे तर प्रत्यक्षात कवयत्री-चित्रकार जोडीशी गाठ होती! त्यांना असह्यांचा प्रेमभंग कसा समजवायचा याचा विचार करता करताच माझा डावा डोळा पुन्हा फडफडायला लागला.


क्रमश :



[ ही कथा संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील पात्रे, स्थळ, काळ, वेळ अथवा इतर कोणत्याही गोष्टीचा वास्तवाशी काहीएक संबंध नाही. असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग आहे. सोबतच कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्ती, संघटना किंवा धर्माला दुखावण्यासाठी हे लेखन करण्यात आलेले नाही. असे आढळल्यास आधीच क्षमा मागतो. क्षमस्व.

कथा स्वरचित असली तरी कथेत 'फक्त वातावरण निर्मितीसाठी' वापरण्यात आलेल्या चित्रपटातील गीतांवर लेखकाचा अधिकार नाही. गीतांचे एकाधिकार संबंधीत व्यक्तींच्या अखत्यारीत येतात —आपलाच रंगारी. ]

इतर रसदार पर्याय