नैवेद्य Gunjan Mahajan द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नैवेद्य

मी अरविंद , आजपण मी अनामिक भीतीत जगतोय ,कसली ही भीती ? तिच मी आज सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. भुतंखेतं फक्त कल्पना असतात अशा विचारांचा मी आज मनोरुग्ण ठरवला जातोय ! आणि का म्हणू नये मला तस ? मी आहेच की!!! " हा हा .....!!!!"
माझं गाव तस सधन . आधुनिक भारताची छाप प्रत्येक घरावर पडलीय . नीटनेटके रस्ते , भरपूर झाड ..सगळं काही अगदी आखीव रेखीव . माझ्या घरामागे विस्तीर्ण जंगल आहे .कधी काळी वाघ असायचे त्या जंगलात असं लोक म्हणतात .म्हणजे चुकून कोणी जिवंत असला आणि गावात आला तर पहिला बळी माझा हे निश्चित !!
जेव्हा मला कळायला लागल त्यादिवसापासून मी 'त्यांच' असण अनुभवतोय ! 'ते' कोण ? माहित नाही .हो खरच!! अगदी लहान असेल तेव्हाच आठवत ,रात्रीच जेवण आई बाबांसोबत व्हायचं . माझी आई जेवणातल थोड बाजूला काढून ठेवी. पुढे गरिबीमुळं पोटभर अन्न मिळेल एवढीपण ऐपत आमची नव्हती पण आईने अर्धपोटी राहुन थोड बाजूला काढून ठेवायचीच ,अगदी न चुकता !!! नेम ठरलेला असे.रात्रीच्या दहा नंतर 'ते' यायचे , 'त्यांची' जागा पण ठरलेली! घराच्या मागे आई भांडे घासायची आणि अगदी 15 पावलांवर घराच कम्पाऊंड ,आणि पुढे विस्तीर्ण जंगल !!
बरोबर भांडे घासायच्या वेळी 'ते' कंपाउंड च्या दुसऱ्या बाजूने यायचं ! आणि रडायचं ,विव्हळायचं ...गुरगुरायच !!नक्कीच तो वाघ नव्हता हे मला बालपणीच समजलं . जे काही 'ते' होत ते वेशी ओलांडून यायच्या आधीच आई उरलेल अन्न कंपाउंड च्या पलीकडे लांबून टाकायची .मग 'ते' खाऊन फस्त करायच आणि परत जंगलाकडं जायचं .जाताना त्याचा आवाज कमी कमी होत जायचा मग नंतर स्मशान शांतता !!जणू काही झालंच नाही असं . पण जेवढा वेळ 'ते' यायचं तेवढा वेळ माझं घर अनामिक भीतीच्या सावटाखाली असायच. 'त्याच' येण कधी चुकलं नाही आणि आईच त्याला खाऊ घालण पन नित्य नेमाचच !!!
आईला मी एकदा विचारलंच , "आई जर 'त्यानां' खाऊ नाही घातल तर ?"
" नसत्या कटकटी कोण करेल , तुझी आजीपण असच करायची ,मीपण तेच करतेय . उगाच तो नेम बदलून काही वाईट झालं तर ?आणि 'त्यांच्या' आवाजावरून तूला का ते किती भयंकर असेल याची कल्पना नाही का येत ?"
आई घाबरत म्हणाली .
त्या नंतर मीपण कधी विचारलं नाही आणि मी त्याकडे दुर्लक्ष करत गेलो . पुढे मी मोठा झालो गाव सोडून दुसरीकडे शिकण आलंच . मग कधीतरी घरी येण होई, पाहुण्यासारखं ! 'ते' आजपण रोज येत हे मी विसरलो होतो . एक दिवस बाबांच पत्र आल की आई आजारी आहे घरी लवकर ये .
रोजच घरकाम करून आई अगदी खंगली होती , डोळ्याभोवती काळे वर्तुळ , डोक्यावरचे केस विरळ होऊन मागे सरकले होते ,चेहरा अगदी निस्तेज. माझ्याने आईकडे बघितलं जात नव्हतं . एवढ्या वर्षात पहिल्यांदा मी आईला इतक निरखून पहिल . मग माझा मुक्काम घरीच राहिला . डॉक्टरानीही आईची जगण्याची आशा नाही हे मला सांगितलं .म्हणून शेवटचे काही दिवस तरी आईची सोबत मिळेल या अपेक्षेने तिथे राहत होतो . आई कधीच डोळे उघडायची नाही पण रात्री दहा च्या ठोक्याला ती बोलायची .." त्यानां खाऊ घाला, ते भुकेले आहेत " .
बस एवढंच ! याव्यतिरिक्त आई काहीच बोलायची नाही . जणू आई 'त्यांची' गुलाम झाली होती ! फक्त 'त्यांची' भूक भागवण्यासाठी ती जगत होती !!! अखेर तो दिवस पण आला की आईच्या चिंतेमुळं बाबा गेले !!! आता घरात फक्त मी आणि आई !! आई जिवंत आहे पण फक्त रात्री दहा ला , त्यानां खाऊ घाल एवढंच काय आईच बोलण!आणि मी तेवढं एक ऐकायला आतुरतेने वाट बघायचो . घरात मी एकटा नाही ,आई आहे सोबत असं फक्त तेवढ्या एका क्षणामुळं वाटायचं . आता त्यानां खाऊ घालण्याची जबाबदारी माझी होती . आईला एकट सोडून दिवसभर मला कामासाठी जावं लागायचं , तस केल्यानचं घरात अन्न येणार होत ,माझ्यासाठी नाही , 'त्यांच्यासाठी' !!! माझं शिक्षण अपूर्णच राहील .मी आता काहीपण करून 'त्याची' भूक मिटवत होतो ! रोज . एकवेळ मी उपाशी राहील पण 'त्यांच' ते गुरगुरण मला बिलकुल आवडायचं नाही , का कोणास ठाऊक उडी मारून जर 'ते' आत आले तर मुकाबला कसा करायचा ? त्यापेक्षा हे खाऊ घालण सोपं !!
एक दिवस मला यायला उशीर झाला . 'त्यांच्या' रोजच्या कटकटीपासून दूर राहण्यासाठी मी मद्यपान करीत असे. पण त्या दिवशी जरा अतीच झालं ! माझी शुद्ध हरपली आणि मी रस्त्याच्या कडेलाच पडलो , जेव्हा जाग आली तेव्हा उन्हाची कोवळी किरण माझ्या चेहऱ्यावर पडली होती आणि मी फाटक्या भिकाऱ्या सारखा रस्त्यात पडून होतो . उठलो तसा डोक्यात एक कळ गेली ,झिणझिणी सम्पूर्ण अंगात पसरली. तसाच कपडे झटकून घरी आलो . घरी आल्यावर सगळ्यात आधी आईच्या खाटेजवळ आलो ,पण हे काय आई घरात नव्हती ! एक वेळ अंगावर काटा उभा राहिला .पळत जाऊन पूर्ण घर तपासलं पण आईचा कुठं मागमूसही नव्हता !!
शेवटी घरामाग आलो जिथे आई भांडे घासायची तिथे .
पण तिथे काहीच नव्हतं . अचानक माझं लक्ष रक्ताच्या ठिबक्यांकडे गेल.रक्ताचा ओढून न्यायचा पट्टा घरामागून थेट जंगलात जात होता . 'त्यांनी' आईला ओढून जंगलात नेलं हे मी समजलो . आता अक्शाबोक्शी रडण्याशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता ! शेवटी 'त्यांची' भूक भागवली नाही म्हणून त्याचा काय परिणाम झाला हे मी बघितलं . जर मी त्यावेळी घरात असतो तर ? एक विचार अंगावर शहारे देऊन गेला . मी ही बातमी गावात सांगितली , गावकऱयांनी हे काम वाघाच आहे असं सांगून विषय टाळला . माझ्याकडे आता जे झालं ते मान्य करण्यावाचून कोणताच पर्याय नव्हता . घरात मी एकटा पडलो होतो आणि जीवनात सुद्धा . त्या रात्री 'ते' परत येईलच या अपेक्षेने मी वाट बघत होतो . दहा चा ठोका पडला ! गुरगुरण्याचे ,रडण्याचे , विव्हळण्याचे आवाज परत यायला लागले . घरात खायला असं काहीच नव्हतं , होत ते फक्त पीठ . पिठाच काय करू? चपाती बनवायला वेळ लागेल हे ओळखुन मी पाणी टाकून पिठाचे तीन लाडू बनवले आणि त्या कंपाऊंड जवळ गेलो आणि एकेक लाडू कंपाऊंड बाहेर फेकला ...क्षणभर गुरगुरण थांबल. मग लाडू खाण्याचे आवाज ऐकू येऊ लागले . मन म्हटल चल जाऊया आत घरात पण दुसर मन म्हणते होत बघूया तरी ते आहे तरी काय ? आईच मारेकरी . भीत भीतच मी कंपाउंड जवळ गेलो . मिटक्या मारण्याचा आवाज अजूनही येत होता . मी कंपाऊंड वर दोघीं हात ठेऊन जोर देऊन शरीर वर उचलल, विस्तीर्ण जंगल आता पूर्ण दिसत होत ...थंड हवा वाहत होती ,पण हा कुजका ,सडका वास कसला येत होता ? मला कंपाउंड खाली आई लाडू खातना दिसली .
डोळे मोठाले त्यात विस्तवासारखे लाल बुब्बुळ . दात अणुकुचीदार !! अर्ध शरीर चावून खाऊन काढलेल होत .हे 'त्याचंच' काम होत ! मला आईकडे बघवेना मी आवाज न करता खाली उतरलो . त्यांनी आईला पण त्यांच्यात सामील केल होत .आईपण आता कायमस्वरूपी भुकेली झाली . मनात खूप विचार आले .पण आत्ता आईला गपचूप खाऊ घालणे याव्यतिरिक्त पर्याय नाहीये ....माझा नित्यनेम झालाय ..मी न चुकता त्यानां नैवैद्य टाकतोय, माझ्या आईला सुद्धा !!! लोक वेड समजता मला . काय करू कळत नाही ...
आईसारखा मला मारल तर ? नको नको . त्यापेक्षा मी त्याला आयुष्यभर खाऊ घालेल ....मला वेडा समजलं तरी !!!!

समाप्त -

लेखक - गुंजन महाजन