Mysterious Place - 2 books and stories free download online pdf in Marathi

रहस्यमय जागा - भाग 2


रहस्यमय जागा

भाग 2 - रहस्याच्या जवळ
-----------------------------------------------------------

विराटची गाडी एका मोठ्या हायवेवरून धावत होती. हलका हलका पाऊसही सुरू झाला होता. विराटने प्रशांतकडे एक नजर टाकली. त्याची नजर खिडकीबाहेर होती. मनात नक्कीच आजोबांचे विचार सुरू असणार.
" मला वाटत , आपण कुठे तरी थांबायला हवं , काही खाल्लं पण नाही सकाळपासून. " विराट बोलल्यावर प्रशांत तंद्रीतून बाहेर आला. विराटला भुकेची जाणीव होऊन झाली होती. त्याला इतक्या वेळ ड्राईव्ह करायची सवयही नव्हती. दोन तासांपासून सलग गाडी चालवून त्याला कंटाळा आला होता.
प्रशांतने तो काय बोलला काही ऐकले नव्हते. विराटच्या लक्षात येताच त्याने मघाचे वाक्य परत बोलत त्याच्याकडे पाहिले. प्रशांतने खिशातून मोबाईल काढून त्यावर मॅप चेक केला.
" इथून पाच मिनिटांनी एक हॉटेल दाखवत आहे , तिथे थांबू. " प्रशांत बोलला.
पाच मिनिटांनी एक छोटे हॉटेल त्यांच्या नजरेस पडलं. दोघे उतरून आत गेले. बाहेर एक छोटी टपरीवर नाश्ता बनवण्याचं काम जोरात चालू होतं. आतमध्ये बसायला टेबल आणि खुर्च्या मांडलेल्या होत्या. विराट आणि प्रशांतने थेट कोपऱ्यातल्या रिकामा टेबल गाठला.
ऑर्डर देऊन दोघ पुढल्या प्रवासाचा विचार करू लागले.
" तिथे पोहोचायला अजून तीन-चार तास लागतील. " विराट बोलला.
" नॉनस्टॉप गेलो तर ! " प्रशांत उद्गारला.
" तिथे जाऊन पहिले जायचं कुठे ? " विराटने प्रश्न केला.
" माहीत नाही ! "
काहीवेळ कोणी काही बोलले नाही.
" सगळ्यात पहिले आजोबांना कोणी ओळखतं का याची माहिती काढावी लागेल. " काहीवेळाने प्रशांत बोलला.
तोपर्यंत वेटर नाश्ता घेऊन आला. ते टेबलवर ठेऊन तो निघून गेला. गरमागरम वास नाकात शिरताच विराटने नास्ता खायला सुरुवात केली. त्या सुगंधाचा मात्र प्रशांतवर काहीही परिणाम झाला नाही. तो एकटकपणे समोर बघत विचार करत होता.
ती रहस्यमय जागा नेमकी कशी असेल , तिथे काय असेल ह्या विचाराने त्याच्या मनातली उत्सुकता वाढत होती.
" खा ना ! विचार नंतर कर." विराटच्या आवाजाने तो विचारातून बाहेर आला. बळच खायचं म्हणून त्याने खायला सुरुवात केली. खाता खाता त्याचे लक्ष एकेठिकाणी अचानक थांबले. खाली टेबलजवळ त्याला एक नाणं पडलेलं दिसलं. खाण थांबवून एखादी सोन्याची मुद्रा सापडावी तसे लगबगीने खाली वाकत त्याने ते नाणं उचललं.
" काय आहे ? " विराटने अचंभीत होत त्याच्याकडे पाहिले. प्रशांतने ते नाणं उचलून समोर धरलं. त्यावरचा अस्पष्ट मजकूर वाचण्याचा प्रयत्न पाहून विराट गोंधळला.
" काय आहे प्रशांत ? कोणता नाणं आहे ते ? "
" यावर आजोबांचं नाव आहे ! " प्रशांत अडखळत बोलला.
" काय ? " विराट उडालाच.
" हे तेच नाणं आहे , जसं नाणं मला आजोबांनी लहानपणी दिलं होतं ! " प्रशांतने बोलून आपल्या खिशातून एक नाणं बाहेर काढून टेबलवर एकमेकांशेजारी मांडले. दोन्ही नाणे सारखेच होते. फक्त एक फरक होता , एका नाण्यावर कोणाचेही नाव नव्हते. तर दुसऱ्यावर प्रशांतच्या आजोबांचे !
" पण हे नाणं इथं कसं आलं ? " विराट दोन्ही नाण्यांकडे बघत बोलला.
" माहीत नाही ! " प्रशांत चांगलाच गोंधळला होता. अशा ठिकाणी आजोबांचं नाणं ! म्हणजे आजोबा इथं आले असतील ?
विचारात पडलेल्या प्रशांतने समोर काउंटरकडे नजर टाकली. तेथे एक वयस्कर माणूस पैसे घेण्यादेण्याचे काम करत होता. तोच हॉटेलचा मालक होता.
प्रशांत पटकन उठून काउंटरकडे गेला. विराट त्याच्याकडे आश्चर्याने आणि गोंधळून बघत त्याच्यामागे गेला.
प्रशांतने तिथे सापडलेलं नाणं त्या मालकासमोर धरलं.
" हे नाणं मला त्या टेबलजवळ सापडलं. याबद्दल आपल्याला काही माहिती ? "
नाश्त्याचं बिल घेण्यासाठी उभ्या मालकाने अनपेक्षित प्रश्न विचारला गेल्याने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. बाकीची बिल देण्यासाठी उभी लोकं गोंधळून प्रशांतकडे पाहू लागली.
" नाणं ? कसलं नाणं ? " मालक मोठयाने ओरडले. त्यांचा भारदस्त आवाज ऐकून प्रशांत काहीसा घाबरला. मालक त्याच्याकडे रागाने बघत होता.
" आपण थोडावेळ बाजूला येता का ? आपली मदत हवी आहे. " प्रशांत दबक्या आवाजात बोलला.
" गुपचूप बिल दे आणि निघ ! त्या नाण्याबिण्याचं मला काही माहीत नाही ! " मालक मोठ्याने संतापून ओरडले. तसा प्रशांत मागे झाला. विराट पुढं होत नाश्त्याचे पैसे देऊ लागला. प्रशांत चिडलेल्या मनस्थितीत बाहेर आला. बाकीचे लोकही त्याच्याकडे दुर्लक्ष करत आपापल्या कामाला लागले. विराट बिल देऊन बाहेर आला. नाश्ता वाया घातल्यामुळे मालकाने त्याला चांगलेच झापले. प्रशांतबद्दलचा राग मालकाने विराटवर काढला होता.
प्रशांत चिडून गाडीत बसला. त्याला बघून विराट लगबगीने गाडीचे दार उघडून आत बसला.
'" आता काय करायचं ? त्या नाण्याचं ? " विराटने गांभीर्याने प्रश्न केला. प्रशांतकडे उत्तर नव्हते.
" इथं काही कळणार नाही , आपण निघायला हवं. " प्रशांत बोलला. त्याच्या बोलण्यात थोडी निराशा जाणवत होती. विराटला त्या मालकाकडे जाऊन काहीतरी माहिती काढायला हवी , असं वाटत होतं. पण प्रशांतच्या म्हणण्याप्रमाणे इथं काही माहिती मिळण्याची शक्यता कमीच होती.
विराट गाडी चालू करणार तोच गाडीच्या खिडकीच्या काचेवर टकटक झाली. विराटने बाहेर पाहिले. कोणीतरी वयोवृद्ध बाबा उभे होते. विराटने प्रश्नांकित चेहऱ्याने काच खाली केली.
" मला माहीत आहे नाण्याबद्दल ! " थकल्यासारख्या आवाजात ते बाबा बोलले. प्रशांतने लगेच चमकून त्यांच्याकडे पाहिले.
" तुम्ही बाहेर या.. " बोलून ते बाबा हॉटेलपासून थोड्या लांब अंतरावर उभी राहिली. विराटने गोंधळलेल्या चेहऱ्याने प्रशांतकडे पाहिले. प्रशांतने मानेनेच ' चल ' अशी खून केली. दोघेही उतरून बाहेर आले. हॉटेलच्या उजव्या बाजूला असलेल्या एका पत्र्याच्या शेडजवळ उभे राहून ते बाबा त्यांच्याकडेच बघत होते. दोघे विचारांच्या तंद्रीत चालत त्यांच्याजवळ पोहोचले.
प्रशांतने त्यांच्याकडे पाहिले. सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर गंभीर आणि थकलेले भाव होते. प्रशांतला काय आणि कसं बोलावे कळेना. त्याच्या डोक्यात विचारचक्र चालूच होते.
" नाणं दाखव. " त्या बाबांनी थकलेल्या आवाजात बोलून आपला हात प्रशांतसमोर धरला. प्रशांतने गोंधळलेल्या अवस्थेत खिशातून ते मघाशी सापडलेलं नाणं त्यांच्या हातावर ठेवले.
बाबा डोळ्याजवळ धरत त्यावरचे नाव वाचू लागले , पण त्यांची दृष्टी त्यांना साथ देत नव्हती.
" मला वाचता येईना , यावर काय नाव आहे ? " त्यांनी प्रश्न केला.
" माझ्या आजोबांचं..सुदर्शन जोशी.." प्रशांत बोलला.
नाव ऐकून त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर प्रचंड गांभीर्य पसरले. धक्का बसल्यासारखे ते काहीवेळ स्तब्ध उभे होते. त्यांच्या डोळ्यात हलके पाण्याचे थेंब जमा होऊ लागलेले प्रशांतने पाहिले.
" सुदर्शन.." त्यांच्या चेहऱ्यावर हळूहळू हास्य पसरू लागले. डोळ्यातील पाणी गालांवरून ओघळत होते.
यांच्या कडून नक्कीच काहीतरी समजणार , या आशेने प्रशांत आनंदला. एक हास्य त्याच्या चेहऱ्यावर पसरले. पण त्या बाबांकडे बघून तो पुन्हा गंभीर झाला.
" तुम्ही ओळ्खता त्यांना ? " विराटने विचारलं.
बाबांनी हातातल्या नाण्यावरची नजर विराटकडे वळवली.
" ओळखायचो ! " एवढेच शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडले. त्यांना बरंच काही बोलायचं होतं , पण भावना आवरणे त्यांना शक्य होत नव्हते.
" कधी ओळखायचा ? आता ते कुठे आहेत , ते माहीत आहे का ? " प्रशांत मनातून उत्सुक झाला होता , पण त्याने चेहऱ्यावर गांभीर्य ठेवले होते. आता बाबा बोलायच्या स्थितीत नाहीत , हे पाहून विराटने त्याला डवचून घाई न करण्याचा इशारा केला. प्रशांतच्याही ते लक्षात आले.
बाबा पत्र्याच्या शेडजवळ ठेवलेल्या एका खुर्चीत जाऊन बसले. काही वेळ विराट आणि प्रशांत त्यांच्याकडे बघतच उभे होते. हातातील नाणं छातीजवळ धरून त्यांनी आपले डोळे मिटले. जसे ते देवाला आठवत असावे.
" काय झालं या बाबांना ? " विराटने त्यांच्याकडे बघून विचारले.
" आजोबांना ओळखत असावे नक्की.." प्रशांत विश्वासाने बोलला.
काहीवेळाने त्या बाबांनी डोळे उघडले. हळूच दोघांवर नजर टाकून जवळ येण्याचा इशारा केला. शेडमधून दोन लोखंडी खुर्च्या आणून त्यांनी बाहेर मांडल्या. विराट आणि प्रशांतला बसण्याची खुण करत ते देखील खुर्चीत बसले.
ते नाणं पुन्हा प्रशांतकडे सोपवत त्यांनी बोलायला सुरुवात केली.
" पंधरापेक्षा अधिक वर्षे झाली सुदर्शनला भेटून. फार चांगला माणूस होता तो. कधी या भागात आला आणि ह्या हॉटेलमध्ये येऊन माझ्या हातचा चहा घेतला नाही , असं झालं नाही. " बोलताना बाबांचा कंठ दाटून आला होता.
" तू कोण ? " बाबांनी प्रशांतला विचारले.
" मी त्यांचा नातू. त्यांना शोधायला निघालोय. "
" शोधायला म्हणजे ? " बाबांनी गोंधळून विचारलं.
" आठ वर्षांआधी ते घर सोडून गेले होते. कुठे गेले माहीत नाही. " प्रशांतने सांगितलं.
" घर सोडून ? का ? "
" घरात काही वाद झाले होते. त्यामुळे." प्रशांत मनातून दुःखी झाला होता. त्याला पुन्हा आजोबांची आठवण येऊ लागली. ते ऐकून बाबाही दुखावले. त्यांचे पाणावणारे डोळे बघून प्रशांतला वाईट वाटले.
" आपण कधीपासून ओळखायचे त्यांना ? " प्रशांतने विचारले.
" तुझे आजोबा फिरायला या भागात नेहमी येत असायचे. एक दोन वर्षांत फार ओळख झाली होती आमची. नंतर अचानक कुठे गायब झाला तो माहीत नाही..फक्त त्याची पुस्तकं वाचायला भेटायची , पण तो कधी भेटला नाही. "
" पण हे नाणं इथं कसं आलं असेल ? "
" माझ्याकडूनच पडले होते तिथे." बाबा मान खाली घालत बोलले.
" म्हणजे ? " प्रशांतने गोंधळून विचारले.
" मी हॉटेलमध्ये काम करायचो , तेव्हा त्या कोपऱ्यातल्या टेबलवर बसून हे नाणं न्याहाळायचो. जेव्हा सुदर्शनची आठवण येईल तेव्हा ! पण नंतर मी काम सोडलं. अचानक एकेदिवशी सुदर्शनची आठवण झाली म्हणून ते नाणं धुंडाळू लागलो , पण ते कुठं मिळालं नाही. वाटल एक आठवण होती सुदर्शनची , ती पण नाहीशी झाली. "
प्रशांत आणि विराट दोघेही बुचकळ्यात पडले. जर एवढ्या दिवसांपासून नाणं तिथं पडलं असेल , तर ते कोणाला दिसले नाही ? का बाबा काहीतरी वेगळंच सांगताय ?
" हे कसं शक्य आहे ? ते नाणं इतके दिवस कोणाला दिसलं नाही ! " विराट बोलला.
" कसं दिसणार ? चांगल्या लोकांनाच दिसणार ते ! " बाबांच्या वाक्यावर प्रशांतने मोठ्या गोंधळाने विराटकडे पाहिले. ' काहीतरी गडबड आहे ' अशी खूण विराटने केली. बाबा मात्र स्वतःबद्दल सांगू लागले.
" मला तुच्छ व्यक्ती समजतात सगळे ! या हॉटेलचा मालक पहिल्यापासून माझा तिरस्कार करायचा. कारण त्यालाच माहीत ! पण माझ्याकडे दुसरं काम नसल्यामुळे मला तिथे काम सोडता येत नव्हतं. पण एकेदिवशी वाद विकोपाला गेला. आणि माझं काम गेलं. ते नाणंही ! तेव्हापासून त्या हॉटेलमध्ये मी पाऊल ठेवलं नाही. आता इथं बसून भीक मागण्याशिवाय मी काहीही करत नाही ! "
" नाणं चांगल्या लोकांना दिसणार म्हणजे काय , बाबा ? " प्रशांतने विचारले. यावर बाबा मंदपणे हसले.
" म्हणजे , ते तुला दिसावं , अशी इच्छा असावी देवाची ! नाहीतर इतक्या दिवसांनी नाणं दुसरं कोणालाही न दिसता , तुला दिसावं , हा चमत्कार आहे ! " बाबा मंद हास्य कायम ठेवत बोलले.
" पण या नाण्यावर आजोबांचे नाव ? " प्रशांतने त्या नाण्यावरचं नाव आठवत विचारलं.
" बनावट नाणं आहे ते ! रोह्यातील एका माणसाने त्यांना भेट म्हणून दिलं , अस म्हणाला होता तो. त्यातूनच एक मला दिलं. बाकीची नाणी त्याने स्वतःजवळच ठेवली होती. " रोहा गावचे नाव ऐकताच दोघे चमकले.
" रोहा ? आपल्याला या गावाबद्दल माहिती आहे ? " प्रशांतने विचारले.
" नाही. फक्त सुदर्शन प्रवासाला आला की तिथे थांबायचा एवढीच माहिती आहे. "
" आता कुठे गेला कुणास ठाऊक ? " बाबा हताशपणे म्हणाले. प्रशांतच्या आजोबांच्या आठवणीने ते भावुक झालेले दिसत होते.
" बाबा , मी माझ्या आजोबांना शोधीलचं , आपण मदत केली त्याचे धन्यवाद..आम्हाला निघावं लागेल. " प्रशांत आभार मानत बोलला.
" तूला आजोबा सापडले , तर पहिले इकडं घेऊन येशील , अस वचन दे. " बाबांनी जड आवाजात वचन मागितले. हळूच त्यांनी आपला तळहात पुढे केला.
" वचन ! " त्यांच्या हातावर हात ठेवत त्याने वचन पूर्ण करण्याचा आत्मविश्वास दाखवला.
बाबांच्या भावविवश चेहऱ्याकडे बघून तो जाण्यास मागे फिरला. त्याच्या मनातील प्रश्नांत आता अजूनच भर पडली होती. आजोबांनी ते नाणे का बनवून घेतले असावेत ? एक आवड म्हणून की अजून काही ? कितीही विचार केला तरी आता याची उत्तरे रोह्याला जाऊनच मिळणार होती. विराट थकल्यामुळे आता प्रशांत गाडी चालवू लागला.
मॅप मध्ये दाखवला जाणारा रस्ता त्यांच्या गाडीने पकडला होता.
जवळजवळ दोन तास चालवल्यावर एका जंगलासारख्या भागात प्रशांतने गाडी थांबवली. मॅप मध्ये दाखवल्याप्रमाणे त्यांचा रस्ता बरोबर होता. पण मॅपवर दिसणारा जंगलाच्या मधून जाणारा रस्ता त्यांना कुठेही नजरेस पडेना. त्याच्या शोधत ते लांब पर्यंत चालत गेले. पण हाती निराशा. पुन्हा चालत ते गाडीजवळ येऊन थांबले.
" आता काय ? " विराटने वैतागलेल्या आवाजात विचारलं.
" पावसामुळं तो रस्ता खचला असावा ! " प्रशांत समोर पाहत बोलला. विराटनेही तिकडे पाहिले. पहिले एक पायवाट असावी असावं वाटत होते. पण आता सुरुवातीची वाट सोडली तर मोठमोठे दगड वाट अडवण्याचं काम करत होते. त्यापुढे काही झाडे कोलमडून पडली होती. काही ठिकाणी खचलेली जमीन बघता प्रशांतचा अंदाज बरोबर होता. प्रचंड पावसामुळे झाडे कोलमडून पडली असावीत. जमीन खचल्यामुळे कोणीतरी मुद्दाम त्या वाटेवरून कोणी जाऊ नये म्हणून दगड लावून ती वाट बंद केली असावी. आता काय करावे हा विचार करत प्रशांत त्या वाटेजवळ जाऊन अजून थोडं दूरवर पाहू लागला. जिथे झाडांमुळे वाट अडली होती , तिथून थोडं पुढं व्यवस्थित रस्ता दिसून येत होता. तो रस्ता नक्कीच गावाकडे जात असावा. पण तिथपर्यंत पोहोचणे अवघड होते. त्या रस्त्याला जायचे कसे हा प्रश्न होता. सगळीकडे जंगल असल्याने दुसरा कोणता रस्ता असण्याचीही शक्यता कमीच.
" बोल आता काय करायचं ? तू तर सगळी माहिती काढली होती ना , मग ? " विराट काय करावे , सुचत नसल्याने हैराण होत बोलला.
" परत माघारी जावं लागेल ! "
विराट आता चिडला. प्रशांत परत जायचं म्हणतोय ! तो रागाने काही बोलणार तोच प्रशांत स्पष्टपणे बोलू लागला.
" या जंगलातून जाण्यासाठी आपल्याला आजूबाजूच्या गावातील लोकांची मदत घ्यावी लागेल. तेच आपल्याला मदत करू शकतील. रोहापर्यंत जाण्यासाठी आपल्याकडे आता दुसरा पर्याय नाही. " प्रशांत मान खाली घालून बोलला.
" बाजूलाच एक छोटे गाव आहे. तिथल्या लोकांना नक्कीच जाण्याचा दुसरा रस्ता माहीत असेल. " प्रशांत मागे वळून विराटकडे बघत बोलला.
" पण त्यांनाही माहीत नसेल तर ? " विराट बारीक आवाजात बोलला.
" अस शक्य नाही. ते नक्कीच काहीतरी मदत करतील." प्रशांत विश्वासाने बोलला.
" मला तर काही सुचत नाहीये रे ! गावात गेलं , तर आपण म्हणू तसंच होईल याची खात्री काय ? " विराट मुद्दामून गावात जाण्याचं टाळत होता. खरंतर तो याआधी कधी गावात राहिला नव्हता , ना त्याने कधी गावातले जीवन अनुभवले होते. गावात जाण्याची त्याची इच्छा नाही , हे प्रशांतच्या लक्षात आले.
" तुला गावातील लोकांवर विश्वास नाही का माझ्यावर ? " प्रशांत चिडून बोलला. विराट गोंधळात पडला.
" तू गावात जायला का नाही म्हणतो , ते मला समजतंय ! मी चाललोय , तुला यायचं तर ये नाहीतर बस इथंच ! " प्रशांत रागाने बोलला.
" मला नाही आवडत गाव ! तुला माहीत नाही का , मी कधीच गावात राहिलो नाही ते. मी फक्त आजोबांना शोधण्यासाठी तुझ्याबरोबर इथं आलो , पण आता मला विचित्र वाटतंय."
प्रशांत चिडून गाडीत ड्रायव्हिंग सीटवर बसला. विराट गोंधळलेल्या अवस्थेत उभा राहून त्याच्याकडे बघत होता. द्विधा मनस्थितीत विचार करत कितीतरी वेळ घुटमळत उभा होता. विराटचा विचार बदलेल असं वाटून प्रशांत त्याच्याकडे बघत होता. शेवटी खूप विचार करून गावाबद्दल असणारी नावड त्यागून मित्रासोबत जाणं विराटला योग्य वाटू लागलं. गाडीचे दार उघडून तो प्रशांतशेजारी बसला. त्याला पाहून प्रशांत हळूच हसला.
" माहीत होतं मला , तू मला एकटा सोडणार नाही." प्रशांत हळूच हसत बोलला. कितीतरी वेळाने प्रशांतला हसताना पाहिल्यामुळे विराट मनोमन सुखावला.
" हह..शेवटी मैत्रिपेक्षा काही मोठं नाही..याच कारणामुळे गावातील जीवन कसे असते , ते समजेल. " विराट प्रशांतकडे पाहत हसून बोलला.
प्रशांतने पुन्हा गंभीर होत गाडी चालू केली. ती जवळच्या गावाच्या दिशेने धावू लागली.

समोरून एक गावकरी आपली गुरं हाकत चाललेला बघून गावात शिरल्याची जाणीव प्रशांतला झाली. त्याने तिथं बाजूलाच गाडी थांबवली.
" गाव आलंय , चल. " प्रशांत गाडीतून उतरत बोलला. विराट त्या गुरं हाकणाऱ्या माणसाकडे कुतूहलाने बघत गाडीतून उतरला.
तो गावकरी जवळ येताच प्रशांत त्याच्याशी बोलायला त्याच्यासमोर गेला.
" काका , आम्हाला काही मदत हवी आहे. "
तो गावकरी काहीवेळ त्याच्याकडे बघतच बसला.
" तुमी कोण ? " गावकऱ्याने दोघांकडे एक नजर टाकून प्रश्न केला.
" आम्ही मुंबईवरून आलो आहे. रोहा या गावात जण्यासाठी आम्हाला मदत पाहिजे. " प्रशांत बोलला.
" क्षमा करा , म्या या गावात नवा हाय , मला काई माहीत नाय." तो गावकरी माफी मागत चालता झाला. विराटला त्याचा राग आला. मुद्दामून ही लोकं काही सांगत नाही , असं त्याच्या मनात आलं. प्रशांत पुन्हा चालू लागला.
" गाडी ? " विराट गाडीकडे बघत बोलला. प्रशांतने चालणं थांबवत त्याच्याकडे पाहिले.
" इथंच राहूदे , जास्त कोणी येणार नाही इकडे. नाहीतर गाडी बघून गावातली लोकं व्हीआयपी सारखं बघत बसतील आपल्याकडं." प्रशांत गमतीने म्हणाला. विराटलाही हसू आलं. पण मनात गाडी व्यवस्थित राहिला का नाही , या काळजीने तो तिथून निघाला.
गावातील घरे , परिसर बघत बघत दोघे चालले होते. प्रशांत या आधीही अनेक गावांत फिरला होता , त्यामुळे त्याला गावातील राहणीमानाची बऱ्यापैकी माहिती होती. गावाच्या सुंदरतेपेक्षा त्याचे लक्ष आपल्याला कोणी मदत करणार दिसत का याकडे होतं.
विराटला मात्र हे सगळं नवीन असल्याने त्याची नजर इकडे तिकडे भिरभिरत होती. पावसाळा असल्याने सगळीकडे पसरलेली हिरवाई बघून त्याला एक वेगळाच आनंद मिळाला. सर्व झाडे हिरव्या पानांनी भरून त्याचा गारवा सगळीकडे पसरवण्याचं काम करत होते. संध्याकाळच्या कोवळ्या उन्हाने पसरलेला सोनेरी रंग त्या हिरवाईत मिसळून डोळ्यांना एक वेगळंच सुख देणारा होता. काही ठिकाणी झोपड्या तर कुठे कौलारू घरे कुतूहलाने बघत विराटचे डोळे सुखावत होते. आजवर फक्त फोटोत पाहिलेल्या धोतरातल्या शेतकऱ्यांना बघून वेगळीच भावना त्याच्या मनात उमटली. ते किती कष्ट करत असावेत , याची हलकी जाणीव त्याला झाली. एके ठिकाणी शेणाने जमिन सारवण्याचं काम बघून त्याला कसेतरीच वाटले.
शहरातल्या आणि गावातील जीवनात किती फरक आहे ! शहरात आजवर मिळाला नसेल , तितका आनंद आणि वेगळेपण या गावात वाटतोय , या विचाराने विराट सुखावला. याआधी आपण गावाबद्दल काय विचार करायचो.
चालता चालता दोघे एका मोठ्या झाडाजवळ आले. त्या झाडाखाली एक मोठा चबुतरा होता. त्याच्या शेजारीच लहान मुलं आपापले खेळ खेळण्यात मग्न होऊन गेली होती. रस्त्यात कोणाला विचारावं , अस कोणी दिसलं नाही. गावात लोकही कमीच दिसत होती. कोणी ओळखीचं नसल्याने प्रशांत कोणाशी बोलायलाही जरा संकोचत होता. थोडावेळ बसावं म्हणून दोघे त्या चबुतऱ्यावर विसावले.
" किती मस्त गाव आहे ! एक वेगळीच फिलिंग येतेय. " विराट उत्साहात बोलला. मात्र प्रशांत वेगळ्याच विचारात होता.
" कोणाला विचारायचं आता ? कोण आपली मस्त करेल ? " विराट त्याच्याकडे बघून बोलला.
" तेच समजत नाहीये. एकतर सगळे अनोळखी. कोणाला विचारायला थोडं विचित्र वाटतं. " प्रशांतचा संकोच विराटला समजला.
काही वेळ काही इतर गप्पा मारत तिथे आरामात बसून राहिले. नेहमीप्रमाणे विराट त्याच्या मामाचे कौतुक गात होता तर कधी या गावाबद्दल बोलत होता. प्रशांतचे फक्त ऐकण्याचे काम होते.
" आता निघायला पाहिजे. आजची रात्र इथेच काढावी लगेल. " प्रशांत चबुतऱ्यावरून उतरत बोलला.
" इथे ? "
" आता इथून परत रोह्याला जायचं म्हणजे फारच रात्र होईल. " प्रशांत आकाशात बघत बोलला. सुर्य मावळतीला चालला होता. पश्चिमीकडे आकाश नारंगी रंगाने भरले होते. पक्ष्यांचा थवा त्याची शोभा अजून वाढवण्यास पुरेसे होते. प्रशांत निसर्गाचे नयनरम्य दृश्य बघण्यात गुंगला.
" मग आता रात्रभर कुठं रहायचं ? लवकर कोणाला तरी मदत मागावी लागेल. भूक पण लागली आहे. " विराट बोलला. कोणाचा तरी बोलण्याचा आवाज प्रशांतच्या कानावर पडला. त्याने आकाशवरची नजर त्याच्या उजव्या बाजूला वळवली. कोणीतरी दोन त्यांच्याच वयाचे तरुण त्याच्याकडे बघत काहीतरी आपापसात बोलत होते. ते बहुतेक आपल्या आणि विराट बद्दल बोलत असावे , असा प्रशांतला अंदाज आला.
" त्यांना मदत मागायची का ? " विराट त्या दोघांकडे पाहून बोलला. त्यानेही त्यांना बोलताना पाहिले होते.
" पण ते तर इथले वाटत नाहीत. " प्रशांत त्यांच्याकडे निरखून पाहत बोलला.
ते दोघे शहरातील असावेत , हे त्यांच्या पेहराववरून जाणवत होते. दोघांच्या कपाळावर लाल रंगाची पट्टी बांधली होती. दोघांचे कपडेही सारखेच. पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स. दोघांच्या शारीरिक जडणघडणीतच फक्त फरक दिसून येत होता. एक जण उंचीने लांब चपट्या चेहऱ्याचा , तर दुसरा थोडा ठेंगणा आणि सावळा. दोघे एकतर भाऊ असावेत , नाहीतर भावसारखे मित्र !
" चल बोलून बघू. " प्रशांत त्यांच्यदिशेने चालू लागला. मागोमाग विराट येऊ लागला. प्रशांत त्याच्याजवळ येताना बघून ते दोघे बोलणं थांबवत त्याच्याकडे बघू लागले. प्रशांत त्यांच्याजवळ जाऊन काही बोलणार तेवढ्यात तो उंच तरुण स्वतःहून पुढं आला.
" हेय ब्रो ! " त्याने आपला हात पुढं केला.
प्रशांतने आपला हात त्याच्या हातात मिळवला. त्याला घामाचा ओलसर पणा जाणवला.
" हॅलो , मी प्रशांत. "
दुसऱ्या तरुणाने विराटसमोर हात केला. विराटने त्याच्या गंभीर चेहऱ्याकडे बघत हात मिळवला. हात मिळताच त्याचा गंभीर चेहरा प्रसन्न झाला.
" अ..आम्हाला थोडी मदत हवी आहे. " प्रशांत बोलला.
" बोल मित्रा काय मदत ? " तो उंचापुरा तरुण बोलला. त्याच्या बोलण्यात विदेशी उच्चाराची झलक दिसत होती. त्याच्या गोऱ्या रंगाकडे बघूनही तो विदेशी असावा , असे वाटत होते.
" आम्हाला शेजारच्या एका गावात जायचे होते. पण तिथला रस्ता बंद असल्याने आम्ही मदत मागण्यासाठी या गावात आलो. कोणाला तरी दुसरा रस्ता माहीत असेल या आशेने. पण आता रात्र होत आली आहे आणि आमची कोणाशी ओळखही नाही , म्हणून या गावात रहायची सोया झाली तर बरं होईल." प्रशांतने आपली अडचण सांगितली.
" व्हाय यु आर वरी ब्रो ? आमच्या फार्म हाऊस वर चला की. " तो तरुण उत्साहात बोलला. फार्म हाऊस ऐकून विराटला जरा हायसे वाटले.
" हा चला की फार्म हाऊसवर. असं पण आम्ही दोघेच आहोत तिथं. " दुसरा तरुण बोलला.
" हा पण इथं फार्म हाऊस ? आम्हाला तर दिसलं नाही कुठं. " प्रशांत शंकेने बोलला.
" अरे ब्रो ते थोडं लांब आहे इथून. कार आहे की आमची , चला आमच्याबरोबर. " उंच तरुण त्याला विश्वास दाखवत बोलला. प्रशांतला तरीही असं ओळख नसताना जाणं बरोबर वाटत नव्हतं. पण ते दोघ विश्वासू वाटत होते.
प्रशांतने विराटकडे पाहिले. त्याने ' जाऊया ' अशी खून केली.
" चला , जास्त विचार करू नका. आम्हालाही सोबत होईल. " दुसरा तरुण बोलला.
" ठीक आहे चला." प्रशांत त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाला.
" चला. " ते दोघ तरुण पुढंपुढं चालू लागले. त्यांच्यामागे विराट आणि प्रशांत. चालत चालत ते गावाच्या बाहेर आले. तिथे विराटची गाडी उभी होती. आणि त्याशेजारी अजून एक फोर व्हीलर. ती बहुतेक त्या दोघांची असावी.
" फॉलो मि..माझ्या गाडीमागून तुमची गाडी चालवा. " तो तरुण गाडीत बसत बोलला. दुसरा तरुण त्याच्याशेजारी गाडीत बसला. विराट आणि प्रशांतही गाडीत बसले.
गाडी जशाच्या तशी उभी होती , याचे विराटला कुतूहल वाटले. शहरात अश्या ठिकाणी गाडी उभी केली असती , तर एखाद्याने पळवली असती नाहीतर काहीतरी वाट तरी लावली असती.

त्या तरुणांची गाडी ज्या दिशेला जाईल , त्या दिशेला प्रशांत गाडी पळवत होता. ते दुपारी ज्या रस्त्याला आले होते , तिथेच ते पुन्हा आले. हा रस्ता त्या जंगलाजवळच्या त्या बंद पायवाटेकडे जाणाराच होता. फार्म हाऊस जंगलाच्या जवळच तर नसेल , अशा विचाराने प्रशांत काहीसा धास्तावला. कारण अशा परिसरात जंगली जनावरं येण्याचाही धोका होता.
पण त्याच्या अंदाजाविरुद्ध त्या तरुणांची गाडी मधेच थांबली. प्रशांतने गाडी थांबवत बाजूला पाहिले. एका बंद गेटमागे एक मोठा बंगला दिमाखात उभा होता.
तो ठेंगणा तरुण गाडीतून उतरत गेटजवळ गेला. त्याचे लॉक उघडून त्याने गेट पूर्ण उघडले. तश्या दोन्ही गाड्या आत शिरल्या. गाडी पार्किंगमध्ये लावून उतरत प्रशांत त्या बंगल्याची बाहेरून दिसणारी सुंदरता न्याहाळू लागला. अगदी एखाद्या फोटोप्रमाणे वाटणारे समोरचे दृश्य होते. आकर्षक अश्या रंगांनी तो बंगला बाहेरून सजला होता. प्रशांतला लपटॉपवर एखादं वॉलपेपर बघावं तसा भास झाला.
विराट त्या दोघा तरुणांच्या मागोमाग दरवाज्याजवळ आला. दार उघडेपर्यंत प्रशांतही बंगला बघत बघत तिथे पोहोचला.
सगळे आत शिरले. सगळीकडे अंधार होता. त्या उंच तरुणाने डाव्या बाजूला जात अंदाजाने बटन दाबून लाईट्स चालू केल्या. लाईट जळताच बंगल्याच्या आतल्या सुंदरतेचं दर्शन झालं.
एखाद्या चित्रपटात दाखवतात तसा तो बंगला ! समोर काचेचा टेबल आणि त्यासमोर दोन्ही बाजूंनी आरामशीर सोफे अगदी व्यवस्थित मांडलेले होते. उजव्या बाजूच्या भिंतीवर वेगवेगळ्या पेंटिंग त्या चमकत्या भिंतीला अधिकच सुंदर बनवत होत्या. तिथेच उजव्या कोपऱ्यात वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एक जिना होता.
" वेलकम ब्रोज ! आमच्या या फार्म हाऊस मध्ये. " उंच तरुण त्यांचे स्वागत करत बोलला.
" आम्ही आमचं नाव तुम्हाला सांगितलंच नाही ! मी अजित." तो ठेंगणा तरुण पुढं होत बोलला.
" हा..मी विराट. " विराटनेही आपली ओळख करून दिली.
" अरे हा , मी पीटर.." उंच तरुणाने आपली ओळख सांगितली.
" आपण पहिले फ्रेश व्हा , मग बोलू." अजित दोघांचा थकलेला चेहरा पाहून बोलला.
" या मी तुमची रूम दाखवतो तुम्हाला. " अजित त्यांना घेऊन वरच्या मजल्यावर आला.
वर तीन रूम होत्या. त्यातली पहिली रूम अजितने उघडून त्याची चावी विराट आणि प्रशांतच्या हवेली केली. आणि तो त्याच्या शेजारच्या रूमचे लॉक उघडून आत शिरला.

प्रशांत फ्रेश होऊन बेडवर बसलेला होता. समोर बेडवर दोन नाणी मांडलेली होती. एक त्या हॉटेलमध्ये सापडलेलं. तर दुसरं त्याच्या आजोबांनी त्याला बालपणी दिलेलं. दोन्ही नाण्यांत नाव सोडलं तर काही फरक नव्हता. दारावर टकटक होताच त्याने दोन्ही नाणी बॅगमध्ये टाकली आणि उठून दरवाजा उघडला. समोर पीटर चेहऱ्यावर स्मित घेऊन उभा होता.
" डिनर तयार आहे. किचन मध्ये या. वि आर वेटिंग." पीटरने हसऱ्या मुखाने जेवणाचे निमंत्रण दिले.
" हो आलोच आम्ही. "
पीटर निघून गेला.

विराट फ्रेश होऊन आल्यावर दोघे जिन्यातून खाली आले. जिना उतरल्यावर उजव्या बाजूला किचन होते.
किचनमध्ये डाव्या बाजूला डायनिंग टेबल मांडलेला होता. जेवण वाढून ठेवले होते. अजित आणि पीटर समोरासमोर बसले होते , तर अजून दोन खुर्च्या या दोघांसाठी ठेवण्यात आलेल्या होत्या.
विराट आणि प्रशांत शांतपणे खुर्चीत बसले.
" काय मग आवडला का बंगला ? " अजित जेवण सुरू करत बोलला.
" हो , फार सुंदर आहे ! अगदी मुविमध्ये असतो तसा ! " विराट कौतुक करत बोलला. अजित हसला.
" या बंगल्यात शूटिंग सुद्धा झालंय. पीटर लीड रोल मध्ये होता त्यात. " अजितने पीटरकडे पाहिले.
" येस ब्रो , मी एक ऍक्टर आहे. आणि हे फार्म हाऊस मी बाय केलं आहे. " पीटर विदेशी स्टाईलने बोलला.
" पण मग तुम्ही गावात काय करत होतात ? " प्रशांतने विचारलं.
" मला वेगवेगळे लोकेशन बघायची सवय आहे. पुढच्या काही फिल्म्स त्या व्हिलेज मधेच शुट करायचा विचार आहे. " पीटर घास तोंडात टाकत बोलला.
" आणि तुम्ही ? " अजितने विचारलं.
" आम्ही शोधात निघालोय ! " विराट दबक्या अवजत बोलला.
" व्हॉट ? "
" हो , माझ्या आजोबांच्या. "
" आजोबांच्या ? " अजितला काही कळेनासं झालं.
" यु मिन ग्रँडपा ? " पीटरला कदाचित 'आजोबा' हा शब्द माहीत नसावा.
" हो. " प्रशांतचे उत्तर.
" शोधायला म्हणजे , ते हरवले आहेत ! " अजित आश्चर्याने बोलला.
" घर सोडून गेले होते. आठ वर्षे झाली. " प्रशांतला पुन्हा आजोबांची आठवण झाली. त्याचे जेवण्याचे कामही थांबले. अजितचे आश्चर्य अजूनच वाढले. आठ वर्षे झाली आणि हा आता का शोधायला निघालाय ?
" बट , इतका टाइम झाला आणि तूम्ही आता ? " पीटरलाही आश्चर्य वाटत होते.
" इतक्या दिवसांपासून त्यांची आठवण मला सतावत होती. पण आता त्यांना भेटल्याशिवाय मला चैन नाही ! " प्रशांत भरल्या मनाने बोलला. त्याच्याकडे बघून या विषयावर जास्त बोलणे योग्य नाही , हे ओळखून पीटर पुढं काही बोलला नाही. अजितला मात्र स्वतःच्या स्वभावामुळे शांत बसणे शक्य नव्हते. त्याला अधिक जाणून घ्यायची उत्सुकता वाढली.
" म्हणजे ते या गावात असतील , अस तुम्हाला वाटलं ? " अजितने जेवण थांबवत विचारलं.
" नाही. ते कुठे आहेत ते अजून नक्की माहीत नाही. पण रोहा या गावातून त्यांचा तपास लागण्याची शक्यता आहे. " विराट जेवता जेवता बोलला.
" त्या गावाचा रस्ता बंद असल्याने आम्ही या गावात मदतीच्या आशेने आलो. " प्रशांत इच्छा नसताना ताटातले जेवण जेवत होता.
" रोहा ? " पीटर चमकून बोलला. प्रशांतने त्याच्याकडे नजर वळवली. पीटर काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत होता. त्याला काहीतरी अचानक आठवले. पण तो काही बोलला नाही. प्रशांत त्याच्याकडे लक्ष देऊन होता. तो काही बोलत नाही हे पाहून त्याला शंका वाटू लागली. रोहाचे नाव ऐकून तो चमकला म्हणजेच त्याला काहीतरी माहीत असणार. प्रशांतही तेव्हा काही बोलला नाही.
जेवण होईपर्यंत त्या विषयावर कोणी काही बोललं नाही.
पीटरने मुद्दामून विषय बदलत , स्वतःबद्दल सांगायला सुरुवात केली होती. विराट आणि प्रशांतनेही बोलता बोलता आपल्याबद्दल सांगितलं. बोलताना पीटर आणि अजित यांच्याबद्दल सगळं विराट आणि प्रशांतला माहीत झालं.
पीटर अर्धा जर्मन तर अर्धा भारतीय. त्याचे वडील मुंबईत फिल्म इंडस्ट्री मध्ये कार्यरत होते , तर आई जर्मनीतील एक हॉटेल व्यवसायिक. पीटर लहानपणापासून मुंबईत वाढलेला. फिल्म इंडस्ट्रीचे त्याला लहानपणापासून आवड. आपल्या वडिलांच्या मदतीने त्याने ऍक्टर बनण्याचे ठरवले होते. एक दोन चित्रपटांमध्ये त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर चांगले नाव कमावले होते.
या सगळ्यातच त्याला अजित भेटला. अजित एक सिंगर. त्याचा आवाज मधुर असल्याने त्याने गाणी म्हणायचा नाद कधी सोडला नाही. त्याचे वडील उद्योजक. पण त्याला त्यात रस नाही हे त्याच्या वडिलांना चांगलंच ठाऊक होतं. त्यामुळे त्यांनी मनमोकळेपणाणे अजितला आपला मार्ग निवडण्यास समर्थन केलं होतं.
चित्रपटांत एकत्र असल्याने अजित आणि पीटरची चांगली दोस्ती जमली होती. दोघे सोबतच राहत असायचे. दोघांना फिरायची आवड असल्याने , ते कधीही कुठेही फिरायला बाहेर पडायचे. नवनवीन ठिकाणचा शोध घेऊन , कुठे कोणत्या चित्रपटाचे शुटींग करता येईल का , याचं गणित नेहमी पीटरच्या डोक्यात चालू असायचं.

सगळे जण दोन नंबरच्या रूममध्ये बसून बोलत होते. खुर्ची मध्ये अजित आणि विराट तर बेडच्या कोपऱ्यावर प्रशांत आणि पीटर.
आजोबांचं नाव असणारी दोन नाणी त्या चौघांमध्ये असणाऱ्या काचेच्या टेबलवर ठेवलेली होती. ते दुसरं नाणं पीटरचं होतं ! पीटरने रोहा गावाबद्दल काही माहिती आहे , अस सांगून वातावरणात गंभीरता आणली होती. प्रशांत अधीरतेने तो काय सांगतो याची वाट पाहत होता. ते नाणं पीटर कडे कसं आलं असेल , या विचाराने त्याच्या मनात वेगवेगळे तर्क निर्माण होत होते.
" एक इयर झालं असेल. मी रोहा नावाच्या व्हिलेजला शूटिंगसाठी गेलो होतो. फार वेअर्ड व्हिलेज आहे ते ! " पीटर बोलायला लागला. बाकी सगळे लक्ष देऊन ऐकत होते. खासकरून प्रशांत.
" तिथे खूप कमी पीपल राहतात. ओन्ली टेन- फिफ्टीन ! बाकी सगळं व्हीलेज रिकामं ! तिथल्याच एका घरात एकजण फेक कोईन्स बनवतो , अस आम्हाला समजलं. देन , तिथूनच हा कोईन विकत घेतला. माझं नेम असलेला एक कॉइन सुद्धा बनवून घेतला तिथून. " पीटर बोलायचं थांबला. तो अजून काहीतरी सांगेल या आशेने सगळे त्याच्याकडे बघत होते.
" बस्स एवढंच.." पीटर जवळ अजून काही सांगण्यासारखं नव्हतं.
" मग विचित्र अस काय ? त्या गावात जास्त कोणी नसावं , काहीतरी वेगळं कारण असू शकतं. " अजित बोलला.
" त्या व्हिलेज मध्ये सगळे ओल्ड एज पीपल राहतात. आपल्या वयाचं कोणीच नसेल. "
" खरंच विचित्र आहे ! " प्रशांत बोलला.
" आय थिंक , तुझे ग्रँडपा तेथेच असतील. मे बी मी पाहिलही असेल त्यांना." पीटर बोलला.
" तू तिथे रहस्यमय जागेबद्दल काही ऐकलं ? " विराटने दबक्या आवाजात विचारलं.
" काय ? " अजित त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला.
" रहस्यमय जागा ! जिथे आजोबा गेले आहेत. " प्रशांत पीटर कडे पाहत बोलला. रहस्यमय जागा ऐकताच पीटरचा चेहरा उडाल्यासारखा झाला. प्रशांतने ते हेरले.
तो काही तरी लपवत आहे , याची त्याला खात्री पटली.
" आजोबांनी त्यांच्या डायरीत स्पष्ट लिहिलं आहे , की ते रहस्यमय जागी गेले आहेत. " विराट बोलला.
" ती जागा कुठे आहे ? " अजितने विचारलं.
" तेच शोधायचं आहे ! रोह्याला गेल्यावर काहीतरी समजेल. आजोबांनी डायरीत रोहा बद्दल लिहिलं आहे , ते तिथे खूप आधी येऊन गेले होते. " प्रशांत बोलला.
" ती जागा कशी आहे ? नेमकं काय आहे तिथे ? " अजितची उत्सुकता वाढली होती.
" अजित , त्याबद्दल आम्हालाही माहीत नाही. काय ते आता एकाच जागी कळेल. रोहा ! " विराट बोलताच अजितची थोडी निराशा झाली.
" माझी खूप उत्सुकता वाढत आहे , अजोबा आणि त्या जागेबद्दल ! आता काहीही करून शोधायलाच पाहिजे. " अजित जरा जास्तच उत्साहित होत बोलला.
" तुमच्या सोबत मीही यायला तयार आहे तिकडे , चालेल ना ? " अजित उत्सुकतेने बोलला.
प्रशांतने मानेनेच त्याला होकार दिला.अजितची उत्सुकता पाहून त्याला मनातून फार चांगले वाटले. आपल्या या शोधमीहीमेत अजून कोणीतरी सामील झाल्याचा त्याला आनंद झाला. पण पीटर बद्दल त्याला अजूनही शंका वाटत होती. तो नक्कीच काहीतरी लपवत होता.
" मग उद्याच निघुया तिकडे. " अजितने बोलत पीटर कडे पाहिले. त्याचा चेहरा पडलेला होता.
" प्रॉब्लेम फक्त रस्त्याचा आहे. एक रस्ता बंद आहे. आपल्याला दुसरा रस्ता शोधावा लागेल. " प्रशांत बोलला.
" पीटरला माहीत असेल ना. त्याचा तर पूर्ण शहराचा नकाशा पाठ आहे. "
" ह..हो दुसरा एक रोड आहे. रोहाचा..बट थोडा लॉंग वे आहे. " पीटर चाचरत बोलला. आता प्रशांतची शंका अजूनच वाढली.
" लांब असला , तरी रस्ता आहे याला महत्व आहे. " विराट आळस देत बोलला. प्रवासाने त्याला थकवा जाणवत होता. अजितच्या ते लक्षात आलं.
" तुम्हाला आरामाची गरज आहे. आपण उद्या बोलू. " अजित खुर्चीतून उठला.
" आपल्याला उद्या सकाळीच रोह्याला निघायला पाहिजे. उशीर करण्यात काही अर्थ नाही. " प्रशांत बोलला. तोपर्यंत पीटर नजर चोरत वॉशरूममध्ये शिरला.
" आधी कसं जायचं ते ठरवावं लागेल..सध्या तुम्ही आराम करा. बघू सकाळी." अजित बोलला. प्रशांत आणि विराट आपल्या रूममध्ये जायला निघाले.

सकाळच्या प्रसन्न वातावरणात प्रशांत बंगल्याच्या अंगणात निवांतपणे बसला होता. बाकीचे कोणी झोपेतून जागे झाले नसल्याने तो एकटाच आल्हाददायक वातावरणात मग्न होऊन गेला होता. डोक्यात विचारचक्र चालूच होते. पीटर आपल्यापासून काय लपवत असेल , याचे उत्तर शोधण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. त्याला आजोबांबद्दल किंवा त्या रहस्यमय जागेबद्दल काहीतरी माहीत असावे. पण त्याला जर याची कल्पना असेल , तर तो स्पष्टपणे बोलत का नाही ? त्याला कसली भीती आहे , की तो मुद्दामून लपवत आहे.
" काय दोस्त , एकटाच बसलाय ? " अजितच्या आवाजाने त्याची तंद्री भंगली. अजित मोठ्या उत्साहाने येऊन त्याच्यासमोरच्या खुर्चीवर बसला.
" गुड मॉर्निंग.." अजितने प्रसन्न चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिले.
" गुड मॉर्निंग. " प्रशांत शक्य तितक्या प्रसन्न चेहऱ्याने बोलला.
" तुला एक विचारू ? " अजित जरा गंभीर झाला. प्रशांतने नजरेने त्याला होकार दिला.
" तुला कशावरून वाटत की तुझे आजोबा जिवंत..." अजितने नजर चोरली. प्रशांत मनातून संतापला.
आपण चुकीचा प्रश्न विचारलाय , याची त्याला जाणीव होती. पण सगळं जाणून घेण्याची त्याची इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.
" आहेत ! मला पूर्ण विश्वास आहे. " प्रशांत चिडून बोलला.
" माफ कर..पण आता आठ वर्षे झाली आहेत..म्हणून.." अजित खजील होत म्हणाला. थोडावेळ गंभीर शांतता.
" हा पीटर थोडा विचित्र वाटतो ! " प्रशांतने मुद्दामून पीटरचा विषय काढला. पीटर जे लपवतोय त्याबद्दल अजितला काही माहिती असेल , असा त्याला अंदाज होता.
" म्हणजे ? " अजितने गोंधळून विचारलं.
" तो काहीतरी लपवतोय , अस वाटतंय. "
" काय लपवतोय ? "
" ते तोच सांगू शकेल ! "
अजित शांत झाला.
" मलाही तेच वाटतंय ! " विचार करत अजित बोलला. प्रशांत चमकला.
" पीटर कधी काही लपवत नाही. पण कालपासून मला ही अस वाटतंय की तो काहीतरी लपवतोय. याआधी त्याला असा विचारात पडलेला आणि अस्वस्थ कधीही पाहिलेला नव्हता. "
आपला संशय योग्य होता , याची प्रशांतला खात्री पटली. पीटर काहीतरी लपवतोय , याचा अजितलाही संशय होता.
" म्हणजे नक्कीच त्याला त्या जागेबद्दल माहीत असणार ! "
" म्हणजे रहस्यमय जागा ? "
" हं..तो आधी इथे येऊन गेला आहे , तेव्हाच त्याला याबाबद्दल समजलं असणार. "
" पण याआधी तो याबद्दल काहीच बोलला नाही. बोलताना ही कधी तो अस काही बोललेला आठवत नाही. "
दोघे बोलत असतानाच त्यांना पीटर बंगल्यातून येताना दिसला. तसे दोघे बोलायचे थांबले.
" गुड मॉर्निंग. " पीटर जवळ येत बोलला. त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसून येत होती.
" मी रोह्याच्या रोडबद्दल अजून इन्फो काढली आहे. तिथे जायला खूप टाइम लागेल. लवकर रेडी व्हा , लवकर निघू. " पीटर बोलून लगेच मधेही निघून गेला.
त्याला पाहून दोघांना आश्चर्य वाटले. कालपर्यंत रोहाचे नाव काढताच गप्प बसणारा पीटर आज रोहाला जाण्यासाठी एवढ्या घाईत कसा ? दोघांनी आश्चर्यकारक नजरेने एकमेकांकडे पाहिले.
" बहुतेक रोह्याला गेल्यावरच उलगडा होईल. " अजित गंभीर आवाजात बोलला. त्याची उत्सुकता अजूनच वाढली. तो लगेच तयार होण्यासाठी बंगल्यामध्ये शिरला.
प्रशांत मात्र कितीतरी वेळ विचार करत बसूनच होता.

विराटची गाडी गर्द झाडीतून जाणाऱ्या रस्त्यावरून धावत होती. पाऊस चालू असल्याने पीटर ला ड्रायव्हिंग करणे थोडे कठीण वाटत होते. पण तरीही तो सावकाशपणे गाडी चालवत होता. त्याच्या शेजारी बसलेला विराटचे एका कागदावर आखलेला नकाशा बघून रस्ता बरोबर आहे की नाही , हे वेळोवेळी सांगण्याचे काम चालले होते.
तो नकाशा पीटरने आखलेला होता. त्याला माहीत असलेला रोह्याला जाणारा दुसरा रस्ता गर्द झाडीतून जाणारा जरी असला , तरी सोयीस्कर आहे , असा पीटरचा अंदाज. पावसामुळे या भागात दरडी कोसळणे , रस्ता खचणे अशा घटना होत असाव्यात , असा इशारा देत प्रशांतने सर्वांना सावध केले होते. मात्र आता तरी दुसरा पर्याय नव्हता.

जवळजवळ तासभराने पीटरने गाडी एका मंदिराजवळ थांबवली.
" चला. आलं रोहा. " पीटर गाडीतून उतरला. एका शंकराच्या मंदिराजवळ ते उभे होते. प्रशांतची नजर चहुबाजूंनी फिरू लागली. समोर त्याला एक बोर्ड दिसला. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. - रोहा गाव.
या शोधमीहीमेत एक लढाई जिंकल्यासारखं त्याला वाटलं. पण अजूनही बरंच काही जिंकण्याचं बाकी होत.
" चला दर्शन घेऊन येऊ. " विराट मंदिराकडे चालू लागला. त्याच्या मागोमाग अजित. पीटरचा तर देव-मंदिर याच्याशी काही संबंधच नव्हता. प्रशांत मंदिराकडे वळणार तोच त्याची नजर एके ठिकाणी खिळली. चेहऱ्यावर आश्चर्य पसरले. समोर लावलेल्या एका छोट्या लाकडी बोर्डमध्ये लावलेल्या फोटोकडे पाहत पाहत त्याच्याजवळ जाऊ लागला.
" व्हॉट हॅप्पेन प्रशांत ? " पीटर गोंधळून त्याच्याकडे पाहू लागला. त्याचा आवाज ऐकून विराट आणि अजितही थांबून प्रशांतच्या दिशेने पाहू लागले.
प्रशांत त्या फोटोसमोर जाऊन स्तब्ध उभा राहीला.
बाकी तिघे गोंधळून त्याच्याजवळ आले.
त्या फोटोकडे नजर टाकताच विराट आश्चर्याने पाहत उभाच राहिला.
" सुदर्शन जोशी ! म्हणजे..म्हणजे तुझे आजोबा ! " अजित त्या फोटोखालचे बारीक अक्षरातले नाव वाचून आश्चर्याने ओरडलाच.
तो आजोबांचा फोटो होता ! वृद्धत्वाची लक्षणे चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. डोळ्यात तेज जरी कमी असले , तरी ओठांवर निर्मळ हास्य कायम होते. तो फोटो प्रशांतने कधी पाहिला नव्हता.
प्रशांतने अजून थोडं पुढं होत फोटोखाली दिलेला मजकूर वाचला.
' सुप्रसिद्ध लेखक श्री. सुदर्शन जोशी यांनी हे मंदिर उभारण्यासाठी दिलेल्या निधीबद्दल आम्ही सर्व भक्तजन त्यांचे मनापासून ऋणी आहोत. '
त्याखाली तारीख आणि सही होती. ' १२ - ०१ - २०१९ ' आणि आजोबांची सही !
सहा महिन्यांअधीची तारीख आणि सही ! म्हणजे अजोबा इथेच असणार !
" आजोबा इथंच असतील ! ही तारीख सहा महिन्याधीची आहे. आणि ही आजोबांचीच सही आहे ! " प्रशांत उत्साहाने ओरडला. त्याला पहिल्यांदाच इतका उत्साही झालेला पाहून विराट आनंदला.
" येस..म्हणजे आता ती जागाही सापडेल आणि आजोबा सुद्धा ! " अजित आनंदाने बोलला. आजोबांपेक्षा त्याला त्या जागेच कुतूहल जास्त होतं.
" चला , लगेच गावात..आपण अगदी जवळ पोहोचलो आहोत ! " प्रशांत अधीरतेने बोलला. अजित आणि विराटही देवाचे दर्शन घेण्याचा विचार सोडून समोरच्या वाटेने गावाकडे जायला निघाले.
पीटर मात्र त्या फोटोकडे बघत स्तब्ध उभा होता. चेहऱ्यावर अस्वस्थता आणि गोंधळ.
" स्टॉप..वेट.." पीटरने अस्वस्थ आवाजाने बाकीच्यांना थांबवले. सगळे जागीच थांबले.
" आता काय पीटर ? अजून काही सापडलं का ? " अजित त्याच्याजवळ येत बोलला. प्रशांत गंभीर होत त्याच्याजवळ आला. पीटर काहीतरी वेगळं सांगणार , हे त्याच्या चेहऱ्यावरून प्रशांतने हेरले.
" काय झालं पीटर ? " विराटही त्याच्याजवळ येऊन उभा राहिला. सगळेजण प्रश्नांकित चेहऱ्याने पीटर कडे बघत होते. पीटरने काहीश्या खजील झाल्यासारख्या नजरेने प्रशांतकडे पाहिले.
" मला याबद्दल आधी माहीत होतं ! " पीटरच्या वाक्यावर विराट जाम गोंधळला. प्रशांत आणि अजितने चमकून एकमेकांकडे पाहिलं. त्यांचा अंदाज जवळजवळ खरा ठरला होता.
" म्हणजे ? काय माहीत होतं ? " प्रशांतने गंभीरतेने विचारलं.
" मी सगळं सांगतो , बट नॉट नाऊ. मला वाटत , की आपण पहिले चंद्रा अंकलकडे जायला हवं. तिथं सगळं समजेल ! "
" कोण चंद्रा अंकल ? " अजितचा प्रश्न.
" मी आता काहीही सांगणार नाही. बट , आता फक्त माझ्यासोबत चला. " पीटर बोलून गावाच्या रस्त्याने चालू लागला. सगळे गोंधळ , आश्चर्य , उत्सुकता असे मिश्रित भाव घेऊन त्याच्या मागोमाग चालायला लागले.
पीटर कुठं घेऊन जातोय ? त्याला काय माहीत आहे ? चंद्रा अंकल कोण ? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रशांतच्या डोक्यात विचारचक्र फिरायला लागले. एकीकडे आपण आजोबांच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत उत्सुकता त्याच्या मनात होती , तर दुसरीकडे पीटरबद्दल शंका. पीटरने हे सगळं आधी का नाही सांगितलं ? इथं पोहोचल्यावरचं त्याने सगळं सांगण्याचं का ठरवलं ? तो खरं बोलतोय , याचा विश्वास कसा ठेवायचा ? असे कितीतरी प्रश्न प्रशांतच्या मनात एकाच वेळी येऊन आदळत होते. पण या सर्वांची उत्तरे त्याला गावात गेल्यावरचं मिळणार होती.

**********************************
क्रमश.
( पुढचा भाग लवकरच.. )


इतर रसदार पर्याय