दिलदार कजरी - 10 Nitin More द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दिलदार कजरी - 10

१०

द्वितीयोध्याय:!

प्रथमग्रासे माशीपतनाचा अनुभव खरोखरच येत राहिल असे दिलदारला वाटले नव्हते. म्हणजे गावाच्या वेशीवर त्याचा व्यवसाय बंधू दिसावा नि त्यामुळे सारंच बिघडू लागावे? हाती पत्रे घेऊन इकडेतिकडे न पाहाता तो देवळाबाहेर पोहोचला. सायकल उभी ठेऊन कजरी दर्शनाची वाट पाहू लागला. थोड्याच वेळात त्याला ध्यानात आले, हे असे उभे राहणे जास्त वेळ शक्य नाही कारण उभ्या उभ्या सवाल येऊ लागले,

"नवीन आलाय जणू?"

"मास्तर, शहरासून चिठ्ठी आली का?"

"सकाळची डाक कितीला निघते?"

"मास्तर, गाव कोणतं तुमचं?"

असल्या प्रश्नांचा मारा चुकवायचा असेल तर इथे थांबून चालायचे नाही.. तो देवळात शिरला. घंटी वाजवून देवीला आल्याची वर्दी दिली. एक डोळा आतून कजरीदेवीचे दर्शन होते का यावर ठेवत तो हात जोडून उभा राहिला. कजरीचे काही चिन्ह दिसेना.. आता काय करावे? आजवर तो साधा गावकरी म्हणून बिनकामाचा कितीतरी वेळ काढायचा. आता पोस्टमन म्हणून तसे करणार कसे? काही कल्पना सुचून त्याने देवळाच्या गाभाऱ्यात मांडी ठोकली. डोळे बंद करून हात जोडून बसला. देवीचा परमभक्त, आराधना करायला बसलेला.. मग कोण त्याच्या वाटेस जातेय .. तो उठला तेव्हा पुजारीबुवा उघडेबंब भोपळ्यासारखे पोट घेऊन समोर उभे होते .. प्रसाद वाटत. त्यांच्याकडून प्रसाद हातावर घेता घेता दिलदार मनाशी म्हणाला, सासरेबुवा, प्रत्यक्ष आपल्या जावयाला प्रसाद देताय.. ध्यानी आलेय का तुमच्या? त्याची ओळख कुणास पटून पुजारीबुवांचा दुसराच कुठला प्रसाद मिळायच्या आत तो घाईघाईत देवळाबाहेर पडला. असेही बसून बसून तो बसणार होता किती वेळ? अर्धा तास उलटला होता.. आजचा दिवस भाकड समजत सायकलीवर टांग टाकून तो निघाला.

काल नि आज.. कितीतरी फरक होता. काल कजरीच्या चार शब्दांनी कान तृप्त झालेले. तिच्या दर्शनाने डोळे निवलेले. आणि परत दुसऱ्या दिवशी ती कधी भेटणार याची हुरहुर निघतानाच लागलेली. आज त्यातील काहीच घडू नये. एका क्षणी वाटले त्याला, हे डाकियाचे सोंग टाकून परत देवळाबाहेर मुक्काम ठोकावा. पण एकूण दूरदृष्टीचा विचार करता हे धोक्याचेच होते. काल अति उत्साहाने चाललेला दिलदार आज कशीबशी सायकल रेटत होता. परतताना त्या स्फूर्तीदात्या पोस्टमनचा उद्धार करत होता.. त्याच्या दर्शनानेच सारे काही बिनसले असावे .. बिचारा तो खराखुरा पोस्टमन .. कारण नसताना उचक्या लागून बेजार झाला असावा!

पण आज कजरी का दिसू नये? कजरी मुद्दाम तर बाहेर न येता आत बसून राहिली नसेल? म्हणजे उत्तर देणे टाळण्यासाठी. म्हणजे तिचा नकार .. की काहीतरी नक्कीच समस्या असू शकते. ती कामात गुंग असेल नाहीतर अजून काही.. कदाचित तब्येत बरी नसेल? की तिला लिहिता वाचता येत नसेल? मग कुणाला तरी चिठ्ठी दाखवली असेल .. नि तिच्या त्या खाष्ट मावशीने तिला कोंडून ठेवले असेल? पण तसे असते तर पुजारीबुवांच्या चेहेऱ्यावर तशी लक्षणे दिसली असती.. किंवा नसतील ही दिसली. त्यांच्या तुकतुकीत चेहऱ्यावर अशा ताणतणावाच्या रेषा उमटावयास जास्त वाव होताच कुठे? अशा ढोलासमान पित्याच्या पोटी कजरीसारखी नाजूक सुंदरी जन्माला यावी? निसर्गाचे नियमच असे न्यारे..

दिलदार पोहोचला तेव्हा संतोकसिंग सगळ्या टोळीचे बौद्धिक घेत होता. टोळीतील सर्वांनी कसे अधिक दृढ निश्चयाने काम केले पाहिजे आणि टोळीचे नाव उज्ज्वल केले पाहिजे याबद्दल प्रवचन सुरू होते. अर्थात स्वतः सरदारपुत्राचे बेजबाबदार वागणे ही सरदार संतोकसिंगची दुखती नस होती. पण तसे उघड सांगण्याची टोळीतील कुणाची हिंमत नव्हती. नाहीतर कुणी उपदेश करे लोकां.. शेंबूड आपल्या नाका म्हणाला असता तर चुकीचे झाले नसते. संतोकसिंगचाही नाईलाज होता. आजचे प्रवचन, बौद्धिक आणि व्याख्यान संपवून त्याला परत शहरात राजकीय पक्षाच्या पंखाखाली जायचे होते. आता तर आपलाच मुलगा असा उडाणटप्पू निघाला म्हटल्यावर राजकीय आश्रय अधिकच महत्त्वाचा होता. दिलदार ते भाषण ऐकत बसला.. आज तो स्थितप्रज्ञावस्थेत पोहोचलेला.. त्यामुळे सोने आणि माती समान ते चित्ती या प्रमाणे डाका आणि देवपूजा समान ते चित्ती म्हणत ऐकत बसला. संतोकसिंगने भाषण संपवले नि दिलदारकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून तो निघून गेला. सगळे टोळीकर गप्प होते. दिलदारही आपल्या तंबूत परतला. आजचा दिवसच असा.. प्रथम घासातच नव्हे तर सबंध जेवणातच मक्षिकापतन सुरू असावे जणू.

समशेर पाठोपाठ आलाच ..

"आज काय? ठीक दिसत नाही?"

"काहीच ठीक नाही यार.."

"का? ती सरळ नाही म्हणाली?"

"ती? नाही म्हणायला दिसली तर पाहिजे. मी पोस्टमनच्या वेशात कितीवेळ थांबणार. तरी अर्धातास देवळात जपजाप करत बसलो. सासऱ्याच्या हातून प्रसाद घेतला नि मग निघालो .."

"सासरा? मग इतका तोंड पाडून का बसलायस?"

"कजरीचा पत्ता नाही. माझी चिठ्ठी कोणाच्या हाती पडली नि तिला कोंडून तर ठेवले नसेल?"

"असं काय होते चिठ्ठीत?"

"तू नाही समजणार. त्यासाठी बंदुकीच्या ऐवजी हातात लाल गुलाबाचे फूल हवे.. माणसं मारण्याऐवजी .."

"बस.. कळलं.. इतकेच की आज भाभीदर्शन झालेले नाही. डाकियाबाबू हात हलवत परतले.. त्यात आल्या आल्या सरदारांचे भाषण.. थोडक्यात दिलदारच्या दिलाचे काही खरे नाही.. पण तिने अजून नाहीतर नाही म्हटले. मग इतका कोमेजलेल्या जास्वंदाच्या फुलासारखा का आहेस तू?"

"जास्वंद आणि मी?"

"अर्थात. अरे गुलाब वगैरे भाभीसाठी राखून ठेवलेस तू.. तर तू जास्वंदीसारखा.. सध्या कोमेजलेला .. पण आपला उसूल आहे यार.. जोवर सारे संपले नाही तोवर त्याला शेवट म्हणू नये.. थोडक्यात तुझ्या प्रेमप्रकरणात धुगधुगी अभी बाकी है मेरे दोस्त!"

"ते मला ठाऊक आहे. पण आजचे काय? तिला न बघता एकेक तास मुश्किलीने जातो मग दिवसाचे काय? आता उद्या परत ती नाही दिसली तर?"

आजचा दिवस ढकलला गेला. शक्य असते सूर्यास लवकर मावळून लवकर उगवायला सांगितले असते. पण सूर्यचंद्र वगैरे आपल्या मर्जीचे मालिक.. त्यामुळे चोवीस तास वाट पाहाणे आले. काल हुकुमी स्वप्नाने दगा दिलेला.. तर आज स्वप्न न पडले तरच बरे.. पण स्वप्न पडायला डोळ्याला डोळा लागावा लागतो.. इकडे दिलदार तळमळत पडलाय.. केव्हातरी तो झोपला. उठला तो थेट समशेरच्या हाकेमुळे. तयार झाला.. नदीत डुंबून लागोपाठ तिसऱ्या दिवशी अंघोळ करण्याची वेळ खूप दिवसांत पहिल्यांदाच आलेली. त्यामुळे त्याचा मूळ रंग पाण्यात विरघळून जातो की काय असे वाटायला लागलेले. सायकलीवर निघताना आज तरी कजरी भेटू देत.. एवढाच विचार नव्हता, तर कालचा तो मक्षिकापतनास निमित्त डाकिया आजतरी दिसू नये हा ही होता.

कालचा दिवस भाकड गेल्यावर आजतरी कजरी दिसेल अशी आशा.. माशीरूपी पोस्टमन न दिसूनही फोल झाली. आजही जपजाप्याचेच पुण्य गाठीस पडले. भावी सासऱ्यांच्या हातचा प्रसाद मिळाला. देवी दर्शन झाले. चार गाववल्यांनी इकडतिकडची खबरबात विचारली.. पण ज्या कामासाठी हा मार्ग धरला ते कजरीदर्शन मात्र नाही झाले ते नाहीच. दिलदार उदास मनाने परतला. फक्त आज संतोकसिंग परत गेल्याने टोळीतील वातावरण सैलावले होते. हेडमास्तर शाळेत फिरत असतील तर चिडीचुप शातंता नि त्यांची पाठ वळली की दंगा.. असे टोळीतील सर्वांचे झाले होते. एरवी ही सरदार हल्ली शहरातच जास्त असायचे, तेव्हा टोळी इमानेइतबारे कामे करायची. पण सरदार परतून आले नि गेले की टोळीतील सर्वांना शाळेला सुट्टी झाल्यासारखा आनंद व्हायचा. त्यात दुर्मुखलेला तो एकटा दिलदार.. समशेरने त्याला विशेष काही विचारले नाही. दिलदारही आपल्या तंबूत आपल्या अधांतरी भविष्याबद्दल विचार करत बसला.

पुढे काही दिवस थोड्याफार फरकाने हीच गोष्ट होत राहिली. रोज रोज प्रसाद घेऊन परतताना खरा कजरीचा प्रसाद कधी मिळेल यावा विचार करत दिलदार सायकल दामटत असे. त्या आठ दहा दिवसांत झाले ते इतकेच.. तीन वेळा सायकलीच्या टायरांत हवा भरावी लागली. कशी कोणास ठाऊक पण सायकलीची घंटी बिघडली.. आणि ती दोन नंबरची चार शब्दी चिठ्ठीच डिलिव्हर न झाल्याने पुढे लिहावे काय नि कसे हा प्रश्न दिलदारला पडेनासा झाला.

शेवटी दिलदारच्या मनाने घेतले ते हे की, कजरीला घरात डांबले गेले आहे.. नि काही करून पुजारीबुवांच्या घरात प्रवेश करून तशी खात्री करणे आणि तिची सुटका करणे हे त्याचे परम आणि आद्य कर्तव्य आहे. पण पुजारी निवासात प्रवेश कसा होणार? पोस्टमन भले असो लाडका सर्वांचा.. पण म्हणून त्याला कोणी घरात बसवून घरातील चार गोष्टी सांगत बसत नाहीत. पोस्टमनशी जिव्हाळा असलाच तर फक्त दिवाळीचे पोस्त देण्यापुरता. कोण शिरू शकेल त्या देवळापाठीमागच्या त्या घरात?

दिवसभराच्या धावपळीतून थकला भागला समशेर तंबूत आला.. भर मध्यरात्री काही गंभीर विचार विनिमय झाला.. भर रात्री दूर गावची मोहिम आखली गेली.. तीही दिलदारच्या संमतीने. कजरी प्रकरणात दुसरा अध्याय लिहिण्याची तयारी सुरू झाली.. अर्थातच त्यामागे मेंदू समशेरचा. अशा मोहिमा आखताना विचार करायचा तो सर्व बाजूंनी ही सवय त्याला इकडे उपयोगी पडली.. दुसऱ्या दिवशी सकाळी वेडात दौडले टोळीतील सात आठ वीर.. अर्थात दिलदार मागेच राहिला. गुरुदासपूरात डाका पडला ..