Anahoot Savat books and stories free download online pdf in Marathi

Anahoot Savat

ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहिली गेली असून, त्याचा जिवंत अथवा मृत व्यक्तीशी काहीच संबंध नाही तसेच स्थळ-तारखा जुळून येणे हा केवळ योगायोग मानावा.

***********************************


2 फेब्रुवारी 2017.........

पावसाने चांगलाच जोर पकडला होता . सर्वत्र काळोख पसरला होता . रात्रीच्या प्रहरी तो परिसर अजूनच भयावह वाटत होता . रातकिड्यांची किर्र किर्र व पावसाची रिपरिप ह्या व्यतिरिक्त कसलाच आवाज कानावर पडत नव्हता . भयाण शांततेने जणू त्या परिसराला चहू बाजूंनी व्यापून टाकलं होतं .

ती जीवघेणी शांतता कसल्याश्या आवाजाने भंग पावली . तो झपझप पावलं टाकण्याचा आवाज होता . तो माणूस जीवाच्या आकांताने धावत होता . तो दर दोन मिनिटांनी मागे वळून बघत होता . त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती . त्या अंधाऱ्या रात्री समोरचं फूटभर अंतर सोडलं , तर बाकी काही नजरेस पडणं अशक्यच होतं . अधून-मधून एखादी वीज चमकून काय तो प्रकाश व्हायचा तेवढाच .

तो वाट फुटेल तिकडे धावत होता . पावसानं पूर्ण शरीर भिजलं होतं . पळून-पळून तो पार दमला होता . त्याचं हृदय विलक्षण गतीनं धडधडत होतं पण त्याचा धावण्याचा वेग मात्र कमी होत नव्हता. त्याला माहीत होतं आता जर तो थांबला तर जिवानिशी जाईल !

धावता-धावता अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला . परत उठून उभं राहायचं त्राणही त्याच्यात उरलं नवहतं . क्षणा-क्षणाला त्याच्या हृदयाचे ठोके चुकल्या सारखे वाटत होते . त्याला समोर त्याचा अंत दिसत होता . हे सगळं आता त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे चाललं होतं . ती जीवघेणी मस्करी त्याला नको-नकोशी वाटत होती . त्याने त्या विकृत खेळाला कंटाळून डोळे घट्ट मिटून घेतले . त्या अंधाऱ्या रात्री एक मोठी वीज कडाडली . विजेचा कडकडाट संपतासरशी त्या परिसरात एक आर्त किंकाळी घुमली . तो गतप्राण होऊन कायमचा अंधाराशी एकरूप झाला होता .

***********************************

वर्तमान............

'' ही आत्महत्या आहे , ह्यात काहीच शंका नाही . मिसेस अपर्णा शिंदेंनी स्वतःला गोळी मारून जीव दिला आहे . '' पोस्टमॉर्टेम रिपोर्ट टेबलवर ठेवत डॉ. सुनील म्हणाले .

'' एझॅक्टली डॉ. ''

'' हो माझं पण हेच मत आहे . ''

'' राईट डॉ. '' म्हणत कमिटी मधल्या सर्वांनी संमती दर्शवली .

'' कसला विचार करत आहेस शुभ्रा ? तुझं मत काय आहे ? रिपोर्ट मध्ये कॉझ ऑफ डेथचा क्लोज टाकायचा आहे . '' डॉ सुनील .

डॉ शुभ्रा कुलकर्णी , स्वतःशीच विचार करत हॉलच्या एका कोपऱ्यात बसली होती . बाकीच्यांच्या बोलण्याकडे तिचे अजिबात लक्ष नव्हते. डॉ सुनीलच्या प्रश्नांनी तिच्या विचारचक्रात व्यत्यय आला .

तिने चमकून विचारले - '' हं ! काही म्हणालात का तुम्ही ? ''

'' शुभ्रा , आमच्या सगळ्यांचं हेच मत आहे की ही आत्महत्या आहे . आम्ही फक्त तुझ्या सहमतीची वाट बघतोय . '' डॉ सुनील .

'' मला नाही वाटत की ही आत्महत्या आहे . '' डॉ सुनीलचे बोलणे अर्धवट तोडत शुभ्रा म्हणाली .

'' नॉट अगेन शुभ्रा ! इट्स अ क्लिअर कट सुसाईड केस . ह्यावेळी कोणती नवी थेअरी सुचलीये तुला ? '' जरा वैतागूनच डॉ सुनील म्हणाले .

'' थेअरी नाहीये डॉ सुनील , हा सरळ-सरळ खून आहे आणि तुम्ही ह्याला आत्महत्या म्हणताय ! '' शुभ्रा .

'' मिसेस शिंदेंनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली आहे, ह्यात कसलीच शंका नाही . प्रत्येक वेळी खून असलाच पाहिजे असं काही नाही . '' डॉ सुनील .

'' बरोबर आहे तुमचं ; पण तुम्ही सगळे एका महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहात . '' शुभ्रा .

हॉल मधले सगळे जण चकित झाले होते . शुभ्रा पुढे काय बोलणार , ह्याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं .

'' काय म्हणायचंय तुला ? कोणती गोष्टं ? '' डॉ सुनील .

'' सांगते . मिसेस अपर्णा ह्यांची कोरोनरी आर्टरी डॅमेज झाली आहे . मला नाही वाटत ह्या गोष्टीकडे कोणाचंच लक्ष गेलं असावं . गेलं असतं तर इतकी मोठी गोष्टं नजरेतून सुटणं अशक्य आहे . नाही का ?'' एक कटाक्ष हॉल मध्ये बसलेल्या प्रत्येकावर टाकत शुभ्रा म्हणाली .

हॉल मध्ये कुजबूज सुरु झाली . खरंच ह्या गोष्टीकडे कोणाचंच लक्षं गेलं नवहतं .

सगळ्यांना शांत करत डॉ सुनील म्हणाले - '' म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला ? ''

'' म्हणायचंय म्हणजे , सरळ-सरळ दिसतंय हा खून आहे ! अपर्णा ह्यांचा सरळ-सरळ गळा न दाबता , त्यांच्या कोरोनरी आर्टरीवर प्रेशर आणून कोणीतरी त्यांचा खून केला आहे . त्या नंतर त्यांचाच हातानी त्यांना गोळी मारली . पहिल्या गोष्टीकडे कोणाचं लक्ष जाऊ नये म्हणून त्याने असं केलं असावं . स्मार्ट मूव्ह ! '' शुभ्रा म्हणाली .

'' बरोबर बोलत आहेस तू . आमच्या कोणाच्याच ही गोष्टं लक्षात कशी आली नाही ? '' डॉ सुनील.

'' असो . रिपोर्ट मध्ये डेथ चं कारण टाकायला विसरू नका की , अपर्णा शिंदे ह्यांचा मृत्यू आत्महत्या नसून खून आहे . '' शुभ्रा हॉल मधून बाहेर पडत म्हणाली .

डॉ शुभ्रा कुलकर्णी . वय 27 वर्ष . गोरा वर्ण . मध्यम उंची . दिसायला जितकी सुंदर तितकीच हुशार . लहानपणापासून शुभ्राला रहस्य कथा वाचायची आवड होती . हीच आवड जपत तिने आपलं फॉरेन्सिक एक्सामिनर व्हायचं स्वप्नं पूर्ण केलं . केवळ डेड बॉडीचं निरीक्षण करून ती मृत्यूचं कारण सांगू शकत होती . आपल्या ह्याच हुशारी आणि कौशल्यामुळे ती नाशिकच्या फॉरेंसिक ऍनालीटीकल टीमची हेड झाली होती . अश्या कित्येक केसेस तिने मिनटात सोडवल्या होत्या .

शुभ्रा एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मली होती . ती नाशिकला आपल्या आई-बाबांबरोबर राहात असे . तिच्या आई-वडिलांना देखील तिच्या हुशारीवर अभिमान होता .

*******************************

2 फेब्रुवारी 2017.........

रात्रीचे सडे बारा वाजून गेले होते . गावात सगळीकडे अंधार पसरला होता . सरपोतदारांच्या वाड्यातला दिवा मात्र चालूच होता . अण्णा एकटेच बाहेर दिवाणखान्यात येरझाऱ्या घालत होते . ते कोणाचीतरी वाट बघत असावेत . त्यांचं मन काहीसं अस्वस्थ होतं . एकाच विचाराने मनाला विळखा घातला होता - नेमकं काय झालं असेल ? मनात असंख्य शंकांच्या पाली चुकचुकत होत्या . पुन्हा तोच खेळ सुरु झाला तर….. ह्याची त्यांना भीती होती . नकळत भूतकाळातले दृश्य त्यांच्या डोळ्यांसमोर तरळून गेले .

अण्णांच्या विचारांची तंद्री मुख्य दारावर पडणाऱ्या थापांनी भंग पावली . अण्णांनी घाईतच दार उघडलं . दारात इन्स्पेक्टर सावंत उभे होते . अण्णांनी मानेनेच सावंतांना आत यायचा इशारा केला .

'' या सावंत . इतक्या रात्री तुम्ही इथे ! काही झालं का ? '' शेवटच्या वाक्यावर काहीसा जोर देत अण्णा म्हणाले .

'' अण्णा, आता हे फार दिवस लपून राहणार नाही . हे प्रकरण आता माझ्या हाताबाहेर जातंय . '' सावंत.

'' कशाबद्दल बोलताय सावंत ? '' अण्णा .

'' अण्णा तुम्हाला चांगलाच माहीत आहे , मी कशाबद्दल बोलतोय . अनिकेतच्या मृत्यू झाला आहे . '' सावंत .

'' काय ! '' क्षणभरासाठी अण्णांना हृदयाचे ठोकेच चुकल्या सारखे वाटले .

'' होय अण्णा . ''

एक उसासा सोडून सावंत पुन्हा बोलू लागले - '' रात्री गण्या घरी परत चालला होता . जाता-जाता वाडीच्या आवारात त्याला कोणीतरी पडलेलं दिसलं . जवळ जाऊन बघितलं तर तो दुसरा तिसरा कोणी नसून अनिकेतच होता . गण्या लगोलग पोलीस स्टेशनला आला . पाहिलेला सगळा प्रकार त्याने सांगितला . ''

सावंतांचं बोलणं ऐकून अण्णांच्या चेहऱ्यावरचा रंग मात्र उडाला होता . भर थंडीत त्यांना घाम फुटला होता . त्यांचे डोळे नकळत भीतीने मोठे झाले . मनात विचारांचे चक्र वेगाने फिरू लागले . जे व्हायला नको होतं तेच झालं होतं . भूतकाळाची पुनरावृत्ती झाली होती . काही प्रमाणात ते स्वतःलाही अनिकेतच्या मृत्यूला जबाबदार ठरवत होते . सगळं माहीत असूनदेखील त्यांनी अनिकेतला तिकडे राहण्याची परवानगी दिली होती . हे कुठेतरी थांबावं असंच त्यांना वाटत होतं . ह्या पुढे असं काही घडू नये , म्हणून त्यांनी मनाशीच कसला तरी निश्चय केला . पण सध्या तरी सावंतांच्या प्रश्नांना सामोरं जाण्याखेरीस त्यांच्याकडे गत्यंतर नव्हतं . एकाएकी , कसल्याश्या आवाजाने अण्णांच्या विचार चक्रात खंड पडला .

'' गेला ...... गेला .... आणखीन एक जण गेला . कोणालाच नाही सोडणार 'ते' . तिकडे जाणाऱ्या प्रत्येकाचा बळी घेतल्या शिवाय 'ते' शांत बसणार नाही . ''

दिवाणखान्याच्या कोपऱ्यातून एक घोगरा आवाज आला . कोपऱ्यात खाटेवर साधारण नव्वदीतला एक जख्ख म्हातारा बसला होता . डोळे पार खोल गेले होते . ओठांना सुरकुत्या पडल्या होत्या . हाडांवर नावापुरती कातडी होती . शरीरात अजिबात त्राण उरलं नव्हतं .

तो म्हातारा सतत एकच वाक्य म्हणत होता - '' 'ते' कोणालाच नाही सोडणार . ''

***********************************

वर्तमान.......

नेहमी प्रमाणे सकाळी आठच्या ठोक्याला शुभ्रा हॉस्पिटल मध्ये हजर होती . नेहमीप्रमाणे आज पण आधी ती तिच्या केबिन मध्ये गेली . ती केबिन मध्ये बसून तिथल्या फाइल्स चाळत होती . इतक्यात शंकर कॉफी घेऊन हजर झाला . कॉफीचा मग टेबलवर ठेवत त्याने आपल्या राखाडी रंगाच्या शर्टच्या खिशातून एक लिफाफा बाहेर काढला .

'' मॅडम , डॉ सुनीलने हे तुम्हाला द्यायला सांगितलं आहे . '' लिफाफा टेबलवर ठेऊन तो निघून गेला .

शुभ्राने लिफाफा उचलून बघितला, तर त्यावर काहीच लिहले नव्हते . तिने लिफाफा उघडून बघितला . त्यात तिच्या नावाचं एक ट्रान्सफर लेटर होतं . डॉ सुनीलने शुभ्राची बदली वडगावच्या त्यांच्या ब्रँच मध्ये केली होती .

ट्रान्सफर लेटर वाचून शुभ्रा पार संतापली होती . डॉ सुनीलने हे जाणून बुजून केलं आहे , त्यांना आपली प्रगती नक्कीच खटकत असणार ,असं तिचं मत झालं . ती तडक डॉ सुनीलच्या केबिनकडे जायला निघाली . दरवाजा न ठोठावत ती सरळच आत गेली .

'' हे काय आहे , मला न विचारता तुम्ही असं कसं करू शकता ? '' लेटर टेबलवर आपटत शुभ्रा म्हणाली .

डॉ सुनीलना बहुधा तिची ही प्रतिक्रिया अपेक्षितच असावी . त्यांनी अगदी शांतपणे तिला बसायला सांगितलं . शुभ्राचा आता राग अनावर होत होता .

'' आधी तुम्ही ह्याचं उत्तर द्या '' ती चिडून म्हणाली .

'' मला माहीत आहे तुला राग आला आहे , साहजिकच आहे . तुझ्या जागी मी असतो , तर मला पण राग आलाच असता . तुला असंच वाटत असणार की मी मुद्दाम तुझी ट्रान्सफर वडगावला करतोय ; पण अगोदर माझं ऐकून घे , मग काय ते ठरव . '' ड्रॉवर मधून एक जाड फाईल काढत डॉ सुनील म्हणाले .

शुभ्राचा राग आता नाही म्हणलं तरी , थोडा कमी झाला होता . तिच्याकडे शांतपणे बसून डॉ सुनीलचं म्हणणं ऐकण्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता.

डॉ सुनील फाईल शुभ्राकडे देत बोलू लागले - '' मी वडगावला तुझी ट्रान्सफर करतोय पण त्यामागे तसंच कारण सुद्धा आहे . तिकडे माझा एक मित्र आहे , वैभव सावंत . गेले काही वर्षांपासून तो तिथला इन्स्पेक्टर आहे . त्याला तुझ्या मदतीची गरज आहे . '' डॉ सुनील .

'' कसली मदत ? '' शुभ्रा .

'' सांगतो . वैभवला एका केसच्या संदर्भात तुझी मदत हवी आहे . वडगाव तसं फारसं मोठं नाही . इतर गावांसारखंच ते ही एक साधारण गाव आहे ; पण गेले काही वर्ष तिथे एक विलक्षण गोष्ट घडतीये . मुख्य गावापासून थोडं दूर एक जंगल आहे . जंगल म्हणता येणार नाही पण साधारण एखाद्या ओसाड वस्ती सारखा तो एक भाग आहे . विलक्षण गोष्ट म्हणजे , गेल्या काही वर्षात त्या भागात 8 जणांचा मृत्यू झाला आहे . मृत्यूची करणे जरी वेगवेगळी असली तरी ह्या सगळ्यांचे मृत्यू नैसर्गिक मात्र नक्कीच नव्हते . डॉक्टरांना देखील ह्या व्यतिरिक्त संशयास्पत असं काहीच सापडलं नाही त्यामुळे त्यांच्याकडनं ही मदतीची अपेक्षा नाही . ''

डॉ सुनील एक दीर्घ श्वास घेऊन पुन्हा बोलू लागले - '' ही जमीन ज्या माणसाच्या मालकीची आहे , तो जरा विचित्रच आहे . ह्या प्रकरणामध्ये चौकशी करायला त्याची काहीच हरकत नाहीये ; पण हे प्रकरण गावाबाहेर जाऊ नये म्हणून त्याने बऱ्याच लोकांची तोंडं बंद केली आहेत . गेले बरेच वर्ष वैभव ह्या प्रकरणाची चौकशी करतोय . पण हाती काहीच लागत नाही .

वैभवच्या मते हे सगळे मृत्यू साधारण नसून ह्या सगळ्या लोकांचा खून केला गेला आहे . त्याचा पहिला संशय त्या जागेच्या मालकावरच आहे पण त्यांच्या विरुद्ध कसलेच पुरावे अजून सापडले नाहीत . त्याच्यामते हे खून कुठल्याही हत्याराने केले गेले नसावे पण हे अजून सिद्ध झालं नसल्यामुळे त्याला पुढची हालचाल करता येत नाहीये आणि म्हणूनच त्याला तुझी मदत हवी आहे . त्याला वाटतं की ,जर हे मृत्यू खून म्हणून सिद्ध झाले तर , नक्की काहीतरी मार्ग सापडेल आणि हे तूच करू शकतेस . कदाचित तुला असं काही सापडेल जे , सगळ्यांच्याच नजरेतून सुटतंय . मला वाटतं तू तिथे जाण्याबद्दल विचार करावास , आफ्टर ऑल इट्स युअर कॉल . ''

डॉ सुनीलचं म्हणणं ऐकून शुभ्रा अगदी निशब्द झाली होती . काय उत्तर द्यावं , तिला सुचेना . डॉ सुनीलने केसची फाईल शुभ्राला सोपवली . शुभ्रा स्वतःशीच विचार करत केबिनच्या बाहेर पडली .

***********************************

2 फेब्रुवारी 2017.........

गावात सर्वत्र नीरव शांतता होती . मध्यरात्री रस्त्यावर चिटपाखरू देखील दिसत नव्हतं . गावातल्या पोलीस स्टेशनमध्ये मात्र चिंतेचं सावट पसरलं होतं .

'' सावंत , काही सापडलं का ? नाही ना ? मी सांगतोय , ह्या केस मध्ये चौकशी करून हाती काहीच लागणार नाही . हा नसता नाद सोडून द्या . '' अण्णा सावंतांसमोर खुर्चीत बसून बोलत होते .

सावंतांच्या मनात मात्र प्रश्नांनी गर्दी केली होती . गेल्या काही वर्षातला हा आठवा मृत्यू होता . अनिकेतचा मृत्यू झाल्याची गावात कोणालाच खबर नव्हती . मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं असलं , तरी सावंतांसाठी ते समाधानकारक नव्हतं.

'' म्या सांगतो साहेब , ती जागा लय वंगाळ हाय . आज पर्यंत जो कोणीबी तिकडं गेला , जित्ता परत आला न्हाय बघा '' गण्या एका कोपऱ्यात बसून बडबडत होता .

'' गप रे गण्या , उगाच आपलं काहीतरी बडबड करू नकोस . '' अण्णा जरा चढलेल्या आवाजात म्हणाले .

गण्या अनिकेतच्या मृत्यूबद्दल गावात कोणालाच काहीच सांगणार नव्हता . अण्णांनी त्याला तोंड बंद ठेवायला भरपूर पैसा दिला होता . सावंतांना मात्र चैन पडत नव्हतं . त्यांना काही करून ह्या सगळ्याच्या मुळापर्यंत जायचं होतं .

**********************************

वर्तमान..........

रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते . शुभ्रा मात्र अजूनही जागीच होती . तिला काही केल्या झोप येणार नव्हती . दिवसभर ती वडगावच्या केसचा विचार करत होती . तिकडे जावं की नाही , हाच प्रश्न तिला सतावत होता . ह्या बाबतीत आई-बाबांशी चर्चा करूनही काहीच उपयोग होणार नव्हता . ते तिला असल्या केस संधर्भात कधीच दूरगावी पाठवणार नाहीत , ह्याची तिला पुरेपूर जाण होती . हा सर्वस्वी तिचा निर्णय असणार होता .

ही केस खरंच दिसते तितकी किचकट आहे का , असंही बऱ्याचदा तिला वाटून गेलं . न राहवून तिने केसची फाईल बाहेर काढली . ती फाईल मधल्या डिटेल्स लक्षपूर्वक वाचू लागली .

27 मार्च 2014 ………….

वडगावच्या वसंतवाडी भागात एका विवाहित जोडप्याचा मृत्यू झाला . शाल्मली वैद्य आणि श्रीकांत वैद्य अशी त्या दोघांची नावं होती . रिपोर्ट नुसार दोघांचाही मृत्यू तेथील एका वाड्याच्या गच्चीवरून खाली पडून झाला . ह्या व्यतिरिक्त इतर काही पुरावे सापडले नाहीत . महिन्याभरातच ही फाईल क्लोज झाली.

17 सप्टेंबर 2014.........

वसंतवाडी मध्ये सुजय फलटणकर नावाच्या एका तरुणाचा मृत्यू झाला . ह्या वेळी देखील चौकशी केली असता काहीच सुगावा लागला नाही . पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार मृत्यूचं कारण आत्महत्या असल्याचं समजलं . काही दिवसातंच ही फाईल क्लोज झाली .

4 जानेवारी 2015......

वसंतवाडी मध्ये एक विलक्षण गोष्टं घडली . एकाच दिवशी अजित साठे , त्याची पत्नी रेवा साठे आणि त्यांच्या 17 वर्षाच्या मुलाचा म्हणजे ऋषभ साठे , ह्या तिघांचा मृत्यू झाला . रिपोर्ट नुसार रेवा साठे आणि ऋषभ साठे ह्यांचा खून झाला असून तो अजित साठेंनीच केल्याचं सिद्ध झालं . पुढील रिपोर्टमध्ये लिहल्याप्रमाणे अजित साठेनी आत्महत्या केल्याचं समोर आलं . चौकशी केली असता ह्यावेळी देखील इतर काहीच पुरावे हाती लागले नाहीत . काही दिवस इन्वेस्टीगेशन झाल्यानंतर फाईल क्लोज करण्यात आली .

20 जुलै 2015.......

ह्यावेळी देखील वसंतवाडी मध्ये एक वेगळीच घटना घडली . अशोकराव सरपोतदारांचा नोकर , म्हणजे महादूचा वाड्यातील विहिरीत बुडून मृत्यू झाला . ह्यावेळी ही केस लगेच सुटली . महादू कामानिमित्त वाडीवर गेला होता ; पण परतताना तोल जाऊन विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला . 2 दिवसातच ही फाईल क्लोज झाली .

2 फेब्रुवारी 2017.........

वसंतवाडी मध्ये अजून एका तरुणाचा मृतदेह आढळला . अनिकेत जोशी असं त्या तरुणाचं नाव होतं . मृतांचं नाव वाचून काही क्षणांसाठी शुभ्राच्या डोळ्यासमोर अस्पष्ट असा एका व्यक्तीचा चेहरा तयार झाला . हे नाव तिला ओळखीचं किंवा कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत होतं . थोडावेळ त्या अस्पष्ट चेहऱ्याला आकार देण्याचा , किंबहुना त्या नावा संबंधित व्यक्तीला आठवण्याचा निष्फळ असा प्रयत्न करून ती पुन्हा पुढे वाचू लागली . फाईल मध्ये पुढे लिहल्याप्रमाणे अनिकेत जोशीचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता . काही दिवस नावापुरता तपास झाला पण शेवटी ही फाईल पण क्लोज करावी लागली .

तासाभरातच शुभ्राने अख्खी फाईल वाचून काढली . ह्या केस मध्ये काहीतरी गूढ नक्कीच होतं . शुभाला अशा केसेस काही नवीन नव्हत्या पण ह्या केसमध्ये नक्कीच असं काहीतरी होतं जे तिला वडगावला जाण्यासाठी प्रवृत्त करत होतं . तिच्या नकळत तिला ह्या केसच्या मुळापर्यंत जाण्याची अनामिक ओढ लागली होती .

ती फाईल मध्ये लिहलेल्या डिटेल्सची मनात जुळवा-जुळव करू लागली . काही वेळ विचार केल्यानंतर एक गोष्ट तिच्या लक्षात अली , ती म्हणजे महादू ला सोडलं तर बाकीचे सगळे जण हे गावाबाहेरचे होते . ते वडगावला देखील एकाच कारणासाठी आले होते . हे सगळे वसंतवाडीतील एक वाडा खरेदी करण्या निमित्त वडगावला आले होते ; पण त्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला .

पोलिसांचा पहिला संशय वसंतवाडीचे मालक म्हणजे अशोकराव सरपोतदारांवर होता . पण कसलंच ठोस कारण किंवा पुरावा नसल्यामुळे त्यांच्यावर आरोप करणं हे मूर्खपणाचं ठरलं असतं . ह्या केसमध्ये जितकं खोल जावं तितकाच गुंता कमी व्हायच्या ऐवजी वाढत चालला होता . ह्या सगळ्याची उकल वडगावला जाऊनच लागणार होती , हे शुभ्राला कळून चुकलं ; पण अजूनही ती द्विधा मनःस्थितीतच होती . तिकडे जाऊन तिच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकणार होता . बराच वेळ विचार केल्यानंतर ती जायच्या निष्कर्षावर पोहोचली .

***********************************

शुभ्राची कार कोकणात शिरली होती . द्राक्ष व उसाची जागा आता आंबा व फणसाच्या झाडांनी घेतली होती . सभोवतालचं वातावरण अगदी प्रसन्न वाटत होतं . दोन दिवस जी शुभ्राच्या मनाची घालमेल चालू होती , ती आता काही प्रमाणात कमी झाली होती . हो-नाही करता-करता शेवटी ती वडगावला जायला निघाली होती . कामानिमीत्त वडगावला जात आहे अशी पुसटशी माहिती तिने घरी दिली होती . अर्थात जायच्या वास्तविक करणापासून तिचे आई-बाबा अनभिज्ञच होते .

काही तासांचा प्रवास करून शुभ्रा वडगावला पोहोचली . गाव तसं फारसं मोठं नव्हातं . शंभर-दोनशे घरांची वस्ती म्हणलं तरी , ते चुकीचं ठरलं नसतं . स्थानिक लोकांना पत्ता विचारत-विचारत ती सरपोतदारांच्या वाड्यासमोर येऊन थांबली . इन्स्पेक्टर सावंत बाहेरच उभे होते . डॉ सुनीलने त्यांचा फोटो पाठवल्याकारणाने शुभ्राला त्यांना ओळखायला फारसा वेळ लागला नाही . सावंतांबरोबर ती वाड्यात गेली .

दगडी बांधकामाचा , भला मोठा , प्रशस्त असा तो वाडा होता . वाड्याबाहेर मोठी बाग , बागेत वेगवेगळ्या प्रकारची रोपं , त्यांच्यावर भिरभिरणारी पाखरं आणि ह्या सगळ्यात भर घालणारा एक मंद सुवास त्या जागेला एक वेगळीच प्रसन्नता प्रदान करत होता . वाड्यात प्रवेश करण्यासाठी एक मोठा रेखीव नक्षीकाम केलेला दरवाजा होता . वाड्यात शिरताच दृष्टीस पडणारे जुन्या पद्धतीचे पण कोरीव काम केलेले फर्निचर , प्राचीन चित्रं , दिवाणखान्याच्या मधोमध असणारे मोठे झुंबर जणू सरपोतदारांच्या वैभवाची साक्ष देत होते .

वाडा जितका सुंदर तितकाच मोठा देखील होता पण 2-3 नोकर सोडले तर वाड्यात फारसं कोणीच दिसत नव्हतं . इतका मोठा वाडा असून देखील तो रिकामाच भासत होता . बाहेर दिवाणखान्यात जवळ-जवळ 65 वर्षांचे एक गृहस्थ बसले होते . वय जरी जास्त असलं तरी शरीराने अजून धडधाकट होते . त्यांच्या नजरेतला करारीपणा अगदी स्पष्ट दिसत होता . कसलेच भाव न दिसू देता ते अगदी निर्विकार चेहऱ्याने बसले होते . मनात जरी असंख्य विचारांचं काहूर माजलं असलं तरी त्याची पुसटशी जाणीव देखील कोणाला न होऊ देण्याचा त्यांच्या प्रयत्न असावा . त्यांना बघताचक्षणी शुभाला समजलं हे स्वतः अशोकराव सरपोतदार असणार .

'' या कुलकर्णी मॅडम . बसा . तुमच्याबद्दल बरच ऐकलंय सावंतांकडून . रघु , जा पटकन चहा-पाण्याचं बघ . '' अण्णा म्हणाले .

थोडा वेळ उलटून गेला . एकमेकांच्या ओळखी झाल्या . थोडं फार इकडचं-तिकडचं विचारून झाल्यानंतर सावंतांनी मूळ विषयाला हात घातला -

'' अण्णा , शुभ्रा इकडे कशासाठी आली आहे हे तुम्हाला माहितीच आहे . मी वसंतवाडीची केस पुन्हा ओपन करतोय . '' सावंत .

वसंतवाडीचा विषय काढताच इतका वेळ निर्विकार असणारा अण्णांचा चेहरा आता मात्र थोडा गंभीर झाला .

ते आवाज जमेल तितका शांत ठेवत म्हणाले - '' हे बघा सावंत , मी तुम्हाला ह्या आधी कित्येकदा सांगितलं आहे , ह्या केस मध्ये वेळ घालवू नका . ह्या केसमध्ये इन्वेस्टीगेशन करून काहीच फायदा नाही . तरी पण मी तुमच्या कामात कसलाच अडथळा आणणार नाही . माझ्याकडून तुम्हाला जमेल तितकं सहकार्यच असेल . तुम्हाला केस रिओपन करायची असेल तर अवश्य करा . पण ही गोष्ट गावा बाहेर कोणालाच कळता कामा नये . उगाच ह्या नादात माझी बदनामी व्हायला नको . ''

अण्णांनी अगदी स्पष्टपणे त्यांचं म्हणणं मांडलं होतं . केस रिओपन करायला त्यांची काहीच हरकत नव्हती पण ह्या सगळ्यात त्यांची बदनामी व्हायला नको , एवढंच त्यांचं म्हणणं होतं . निदान त्यांच्या बोलण्यातून तरी एवढंच स्पष्ट होत होतं . ह्या सगळ्यात मात्र शुभ्राला खटकणारी गोष्ट म्हणजे , इथे काहीच सापडणार नाही ह्या बाबातचं अण्णांचं ठाम मत . त्यांना काही माहीत होतं का ? का तेच ह्या सगळ्याचे सूत्रधार होते ? असो , तूर्तास तिला कुठल्याही निष्कर्षावर पोहचायचं नव्हतं . ती वडगावला अजून काही दिवस थांबणार होती . काहीतरी पुरावा नक्कीच सापडेल ह्याची तिला खात्री होती .

शुभ्राच्या राहण्याची सोय गावातल्याच एका गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आली होती . ती एक दिवस आराम करून मग इन्वेस्टीगेशनला सुरुवात करणार होती . अर्थात ती वसंतवाडीला एक चक्कर नक्कीच टाकणार होती . तिने तशी अण्णांकडून परवानगी देखील घेतली होती .

शुभ्रा आशा ताईंबरोबर ( गेस्ट होऊसच्या केअरटेकर ) गेस्ट हाऊसवर आली . सामानाची अवरा-आवरी झाली . दुपारचं जेवण आटपून ती तिच्या खोलीत गेली . प्रवासामुळे ती पार दमून गेली होती . बेडवर पडल्याबरोबर ती झोपेच्या अधीन झाली .

शुभ्राला जाग आली तेव्हा संध्याकाळचे 5 वाजले होते . प्रवासाचा शीण निघून गेला होता . ती एकदम फ्रेश झाली होती . संध्याकाळचा चहा झाल्यानंतर तिने आशाताईंजवळ वसंतवाडीचा विषय काढला .

'' आशाताई , ही वसंतवाडी कुठे आहे तुम्हाला माहीत आहे का ? '' शुभ्रा .

वसंतवाडीचं नाव ऐकताच आशाताईंच्या चेहऱ्याचा रंग उडाला .

'' ताई तुम्ही लई मोठी चूक केली बघा ! त्या वसंतवाडीचं काम हातात घेऊन . ती जागा चांगली न्हाय . गावातलं कोणी तिकडं फिरकत बी न्हाय . '' आशाताईंच्या आवाजातली भीती स्पष्टपणे जाणवत होती .

'' काय हो आशाताई ,असं काय आहे तिकडे ? '' शुभ्रा जरा चेष्टेच्या स्वरात म्हणाली .

'' ते काय माहीत न्हाय ताई , पण तिकडे गेलेला एक बी माणूस जिवंत परत आला न्हाय बघा . '' आशाताई .

'' येता का मग आज माझ्याबरोबर ? '' शुभ्रा चेष्टेला ताणात म्हणाली .

'' न्हाय-न्हाय ताई म्या न्हाय येणार . मी तर म्हणते तुम्ही बी तिकडे जाऊ नका . '' आशाताई .

'' आशाताई , तुम्हाला माहीत आहे मी ह्याच कामासाठी वडगावला आली आहे . बरं राहिलं , तुम्ही नका येऊ , मला फक्त तिकडे कसं जायचं ते सांगा . '' शुभ्रा .

सूर्य मावळतीला चालला होता . सूर्याच्या सोनेरी किरणांच्या छटा आता हळू हळू लालसर होऊन नाहीश्या होत होत्या . क्षितिजापलीडे जाणारा सूर्य जणू गावकऱ्यांना घरी परतायचा संदेश देत होता . संध्याकाळच्या अशा रम्य वातावरणात शुभ्रा वसंतवाडीकडे जायला निघाली . ती रस्त्यात भेटणाऱ्या गावकऱ्यांना वसंतवाडीबद्दल विचारत होती . गावकऱ्यांशी बोलून एक गोष्ट तिच्या लक्षात की , त्यांच्या मते ती जागा शापित आहे . त्या जागेत नक्कीच काहीतरी अमानवीय आहे . असो . गावकऱ्यांच्या मातावरून ती मागे हटणार नव्हती .

काहीवेळातच ती वसंतवाडीजवळ पोहोचली . जवळ-जवळ 7-8 एकरचा तो भला मोठा भाग होता . वाडीत सर्वत्र घनदाट वाढलेली झाडे होती . त्या घनदाट झाडांच्या साम्राज्यात , मधोमध तो वाडा दिमाखात उभा होता . कोण जाणे , गेले किती वर्षे तो तसाच एकटा उभा असावा ! बऱ्याच जणांचे बळी देखील त्याने घेतले होते . वाड्याच्या परिसरात मानवीय वावराचा लवलेशही दिसत नव्हता . गेल्या काही वर्षत त्या 8 जणांचा काय तो झाला असेल तेवढाच . जसा-जसा तो वाडा जवळ येत होता तशी-तशी शुभ्राच्या मनात एक अनामिक भीती निर्माण होत होती . तिचं एक मन वाड्याजवळ जायला घाबरत होतं तर दुसऱ्या मनाला वाड्यात काय आहे ते बघायची उत्सुकता लागली होती . आता ती वाड्याच्या एकदम समोर उभी होती . तशी वाड्याची रचना सर्वसाधारणच होती . हे जरी त्या वाड्याचं बाह्य वर्णन झालं तरीही मनाच्या कुठल्यातरी खोल पातळीवर तो आपली एक वेगळीच छाप उमटवत होता . वाड्याच्या परिसरातलं वातावरण अगदी निर्जीव वाटत होतं . पानांची सळसळ नव्हती , पक्ष्यांचा किलबिलाट नव्हता , फुलांवर भिरभिरणारी फुलपाखरे नव्हती . एखाद्या चित्रासारखं खरं भासणारं पण स्तब्ध असं सभोवतालचं वातावरण होतं . वाड्याचा परिसर काळापासून आणि जगापासून अगदी वेगळा झाल्या सारखा भासत होता . आजूबाजूला एका नकारात्मक ऊर्जेचं अस्तित्व शुभ्राच्या सुप्त मनाला स्पष्टपाणे जाणवत होतं ; पण ते अस्तित्व तिच्या जागृत मनाला उमजत नव्हतं किंबहुना ते दिसत नसल्यामुळे मान्य करायचं नव्हतं .

ती वाड्याच्या दारापाशी आली . दाराला भलं मोठं कुलूप लावलं होतं त्यामुळे वाड्यात जायचा प्रश्नच मिटला . ती परत जायला वळणार इतक्यात , तिला दाराच्या उजव्या बाजूला असणाऱ्या खिडकीत कसलीशी हालचाल जाणवली . त्या निर्जीव , कोणाचाही वास नसलेल्या वाड्यात एखादी हालचाल होणं कोणासाठीही अनपेक्षितच ठरलं असतं . ती हालचाल कसली होती , कोणाची होती हे मात्र कोणालाच सांगता आलं नसतं . अगदी मेंदूवर ताण देऊन सुद्धा एखाद्याला , एक काळी भासणारी सावली वाऱ्याच्या वेगाने समोर येऊन नजरेआड झाली , ह्या पेक्षा जास्तं काही सांगता आलं नसतं . शुभ्रा मुख्य दारापासून थोडं मागे जाऊन , लांबूनच त्या खिडकीचं निरीक्षण करू लागली .

खिडकीच्या काचांवर धूळ जमा झाल्यामुळे आत मध्ये काय आहे ते स्पष्ट दिसत नव्हतं . ती खिडकीजवळ जाऊन आत काय आहे , ते पाहण्याचा प्रयत्न करू लागली . खरं तर तिला आत मधलं सामान बघण्यात काहीच रस नव्हता , तिला ती मगाशी झालेली हालचाल कशाची होती ते जाणून घायचं होतं . तिने खिडकीला हलकाच धक्का देऊन पाहिलं पण खिडकीचं दार काही उघडलं नाही , बहुदा आतून बंद केलं असावं . शेवटी ती त्या धूसर काचेतुनच आत काही दिसतंय का , ते बघण्याचा प्रयत्न करू लागली . वाड्याच्या आतमधली बाजू पूर्णपणे अंधाराच्या सावटाखाली होती . आत मध्ये लक्ष वेधून घेणारं फारसं काही नव्हतं . त्या अंधारात शुभ्राला काहीतरी चमकल्यासारखं वाटलं . नीट लक्ष देऊन पाहिल्यावर वाड्याच्या आत, खोल अंधारात , काहीतरी लालसर चमकत होतं . ती त्या लाल चमकणाऱ्या गोष्टीकडे टक लावून बघू लागली . ती कसली वस्तू नसून ते डोळे होते . आत मध्ये अंधार असल्यामुळे कुठल्यातरी प्राण्याने घर केलं असावं , असा शुभ्राने कयास केला . ते लाल चमकणारे डोळे बघता बघता अंधारात नाहीसे झाले , पण शुभ्रा अजूनही संमोहित झाल्यासारखी त्याच दिशेला पाहत होती .

काही क्षणातच ती भानावर आली . परत एकदा त्या वाड्यावर एक नजर टाकून ती जायला निघाली . वसंतवाडीतून बाहेर पडताच वातावरण पुन्हा प्रसन्न वाटू लागलं . हृदयावर नकळतपणे आलेलं दडपण दूर झाल्यासारखं वाटत होतं , पण हे सगळं कुठेतरी सुप्त मनाच्या पातळीवरच चालू होतं .

शुभ्रा काही वेळाने गेस्ट हाऊसवर परतली . आशाताईंनी जेवण तयार करून ठेवलं होतं . जेवण करून शुभ्रा तिच्या रूम मध्ये गेली . वाड्यातल्या प्रसंगाचा विचार करता-करता मध्यरात्री कधीतरी तिला झोप लागली .

***********************************

एका अंधाऱ्या खोलीत शुभा एकटीच डोळे मिटून बसली होती . खोलीत प्रकाशाचा अंशही नव्हता , पण ह्या गोष्टीचा शुभ्रावर फारसा फरक पडत नसावा . तिच्या चेहऱ्यावर कसलेच हावभाव नव्हते . कोण जाणे गेले कित्येक दिवस , कित्येक महिने किंवा कित्येक वर्षे ती तशीच तिथे बसून होती . तिच्या निर्विकार चेहऱ्याकडे बघून , तिला तिथे असण्याचा त्रास होत असावा , असं कोणालाही वाटलं नसतं . तिचं मन एखाद्या क्षणिक स्थिरता पावलेल्या पाण्याच्या स्रोतासारखं शांत होतं . त्यात कसलेच विचार येत नव्हते . कदाचित येतही असतील ; पण ते प्रकर्षाने तिच्या अंतर्मनापर्यंत पोहचत नसून आधीच विरून जात असावेत . त्या क्षणाला तिला फक्त मातीच्या जमिनीचा होणार स्पर्श जाणवत होता . तोच काय तो तिला तिच्या स्वतःच्याच अस्तित्वाची जाणीव करून देत होता , पण ते अस्तित्व खरोखर तिचंच होतं का ?मानवीय परिमाणांमध्ये तिच्या त्या अस्तित्वाला एखादी ठराविक जागा नियुक्त करून देता आली असती का ?

शुभ्राला तिचं शरीर एका प्रखर ऊर्जेच्या साठ्यासारखं भासत होतं . ती कसली ऊर्जा होती ? सकारात्मक होती की नाही ? शुभ्रा तिच्या आटोक्यात कशी गेली ? तिने त्या ऊर्जेचा प्रतिकार केला असेल का ? हे सगळे प्रश्न विचारायची वेळ आता निघून गेली होती . शुभ्रा पूर्णपणे त्या अनामिक शक्तीच्या अधीन झाली होती . तिने हळुवार आपले डोळे उघडले . तिला कोणाच्या तरी येण्याची चाहूल लागली असावी . एकदाही इकडेतिकडे न बघता ती अगदी संथ पावलं टाकत चालू लागली . पायाला होणारा मातीचा स्पर्श जणू तिला ओळखीचा झाला होता . ती हळू हळू खोलीच्या एका बाजूला गेली . तिकडे वर जाण्यासाठी एक दगडी जिना होता . ती दबक्या पावलांनी वर जाऊ लागली . हळूहळू अंधार नाहीसा होऊ लागला . ती जसजशी वर जात होती तशा तिच्या ओठांच्या कडा एका क्रूर , हिडीस हास्यात रुंदावत होत्या . ती आता एका दिवाणखान्यात उभी होती . तिची नजर चहू बाजूंचा वेध घेत होती . तिला हृदयाची धडधड स्पष्टपणे जाणवत होती पण ती तिची नसून दुसऱ्या कोणाचीतरी होती . त्या अमानवीय जागी कोणीतरी आलं होतं . त्या व्यक्तीला बघण्यासाठी शुभ्राची धडपड चालू होती . तिचे डोळे आता लालबुंद झाले होते . तिच्या डोळ्यांमध्ये जणू अंगाराच उतरला होता . भोवतालचं सगळं आता तिला लाल रंगाचा मुलामा दिल्यासारखं रक्तवर्णीय भासत होतं . त्या लाल रंगाच्या चित्रात बाकीच्या वस्तूंना काळ्या रंगाच्या छटा आल्या होत्या .

त्या स्तब्ध , लाल , काळ्या चित्रात ती एखाद्या जिवंत हालचालीची वाट बघत होती . तिची नजर एकवार दिवाणखान्याच्या खिडकीवर पडली आणि तिकडेच स्थिर झाली . खिडकीच्या काचांमध्ये एका मानवीय आकृतीची हालचाल दिसत होती . त्या आकृतीची नजर शुभ्राच्या लाल डोळ्यांवर स्थिर झाली होती . तिला कदाचित आत येता येत नसावं . त्या व्यक्तीची आणि शुभ्राची नजरानजर बराच वेळ चालू होती . शुभ्राला त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण ती व्यक्ती नक्कीच आत मध्ये काय असावं त्याचा अंदाज घेत होती . काहीवेळाने ती व्यक्ती तिथून निघून गेली . ती व्यक्ती गेल्यानंतर शुभ्रा पुन्हा त्या अंधाऱ्या खोलीत जाऊन बसली . त्या व्यक्तीचा चेहरा आठवून तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटलं . ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून स्वतः शुभ्राच होती .

मोबाईल मधला अलार्म वाजला तशी शुभ्रा खाडकन जागी झाली . घामाने तिचं अंग ओलंचिंब झालं होतं. श्वास घेण्याचा वेग विलक्षण वाढला होता . आपण जे पाहिलं ते सत्य होतं की एखादं वाईट स्वप्न , हा विचार करण्यात काही क्षण निघून गेले . अलार्म पुन्हा वाजू लागला तशी ती भानावर आली . हा अलार्म जर काही क्षणांपूर्वी वाजला नसता तर काय झालं असतं ह्याचा अंदाजही ती लावू शकत नव्हती .

त्या स्वप्नाला खरंच काही अर्थ होता का , हे तिचं तिलाही त्या क्षणी सांगता आलं नसतं . एखाद्या वास्तूचा भूतकाळ आपल्याला अगोदरच माहीत असेल तर त्या वास्तूबद्दल आपल्या मनात पूर्वग्रह निर्माण होतो . असंच काहीसं आपल्या बाबतीत घडलं असावं , असा तिचा कयास होता .

सकाळचे आठ वाजून गेले होते . चहा-नाश्ता करून शुभ्रा पोलीस स्टेशनला जायला निघाली . सकाळच्या घाईगडबडीत ती रात्री पडलेल्या स्वप्नाबद्दल विसरून देखील गेली . ती पोलीस स्टेशनला पोहोचली तेव्हा सावंत तिचीच वाट बघत होते . त्यांच्यासाठी ही केस लवकरात लवकर सुटणं महत्वाचं होतं .

'' हे बघ शुभ्रा केसचे डिटेल्स तू वाचलेच आहेत . पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बघून तुला काही क्लू सापडतोय का ? '' सुरवातीचं औपचारिक बोलणं टाळत सावंतांनी सरळ विषयाला हात घातला .

'' हे नुसते रिपोर्ट्स वाचून काही सापडणं अवघड आहे , पण तुम्हाला असं का वाटतंय की त्या लोकांच्या मृत्यूमागे अण्णांचा हात असावा ? '' शुभ्राने तिच्या मनातली शंका बोलून दाखवली .

'' एकाच ठिकाणी इतक्या जणांचा गूढरित्या मृत्यू होणं जरा विचित्र आहे , असं नाही का वाटत तुला ? आणि माझा संशय अण्णांवर आहे , कारण हे चक्र ते वडगावला परत आल्यापासून सुरु झालं . '' सावंत .

'' म्हणजे ? '' शुभ्रा .

'' म्हणजे इतके वर्ष अण्णा इथे नव्हते . ते त्यांच्या मुलांबरोबर शहरात स्थायिक झाले होते . पण काही वर्षांपूर्वी ते वडगावला परतले . त्यांचं परत येण्याचं कारण फारसं कोणाला माहीत नाही . ज्यांना थोडाफार अंदाज आहे ते सांगतात की ते वसंतवाडीचा वाड्याला गिऱ्हाईक मिळे पर्यंत इथे राहणार आहेत . '' सावंत .

'' पण ह्यात त्यांच्यावर संशय घेण्याचं कारण काय ? '' शुभ्रा .

'' पाहिलं कारण हेच की अण्णा परत आल्या पासून हे मृत्यू चक्र सुरु झालं आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे हे की वसंतवाडीची जमीन आणि वाडा मुळात अण्णांचा नाहीच . ही जमीन एके काळी कोणा वसंतराव आपट्यांच्या मालकीची होती . बरेच वर्ष ती जमीन पडिकच होती . नंतर वसंतरावांनी तिथे वाडा बांधला पण वाडा बांधल्यानंतर काही दिवसातच वसंतराव आणि त्यांच्या कुटुंबियांचा अकाली मृत्यू झाला आणि ती जमीन आणि तो वाडा अण्णांच्या मालकीचा झाला . हे सगळं खूपच विचित्र आहे असं नाही का वाटत तुला ?

अण्णांवर सध्यातरी कोणतीही कारवाई करणं कायद्याच्या दृष्टीने अयोग्य ठरेल , पण जर हे सगळे मृत्यू साधारण नसून खून असल्याचं सिद्ध झालं , तर पुढची कारवाई करता येईल . जर माझा अंदाज खरा असेल तर ह्या लोकांचे खून कुठल्याच हत्याराने केले गेले नसावेत . ह्या सगळ्या पोस्टमॉर्टेम रिपोर्ट्समध्ये काहीतरी नक्कीच असेल , जे सगळ्यांच्या नजरेतून सुटतंय , आणि तेच शोधून काढण्यासाठी मला तुझी मदत हवी आहे . '' सावंत .

शुभ्रा शांतपणे सावंतांचं म्हणणं ऐकत होती . कुठेतरी तिलाही ते पटत होतं . थोडा वेळ विचार केल्यानंतर ती म्हणाली - '' मला तुमचं म्हणणं पटतंय पण ह्या रिपोर्ट्सवरून तरी मी काहीच सांगू शकत नाही. मी एकदा ज्यांनी ह्या सगळ्यांचे पोस्टमॉर्टेम रिपोर्ट्स तयार केले त्या डॉक्टरांना भेटून येते . त्यांच्याशी बोलून काही समोर येतंय का बघू . ''

सावंतांना देखील शुभ्राचं म्हणणं पटलं .

'' राणे , शुभ्रा मॅडमला डॉ पटवर्धनांकडे घेऊन जा . '' सावंत म्हणाले .

थोड्याच वेळात शुभ्रा आणि राणे पटवर्धनांच्या हॉस्पिटल जवळ आले . डॉ पटवर्धन गावातल्या मोजक्या 4-5 डॉक्टरांपैकी होते .

'' डॉ साहेब आत येऊ का ? '' राणे

'' या राणे आज आमच्याकडे काय काम काढलंत ? '' डॉ पटवर्धन .

'' ह्या डॉ शुभ्रा कुलकर्णी . ह्या ....... '' राणे

'' मला माहीत आहे ह्या कोण आहेत ते . '' राणेंचं बोलणं अर्धवट तोडत डॉ पटवर्धन म्हणाले .

'' राणे , तुमची काही हरकत नसेल , तर मी डॉ पटवर्धनांशी थोडावेळ एकटी बोलू शकते का ? '' शुभ्रा .

'' माझी काय हरकत असणार मॅडम ? मी बाहेर थांबतो . '' राणे केबिनच्या बाहेर जात म्हणाले .

'' तर शुभ्रा इकडे कसं काय तुझं येणं झालं ? '' डॉ पटवर्धन .

'' मी वसंतवाडीच्या केससंदर्भात वडगावला आली आहे . इथे आल्यावर कळलं की तुम्ही गेल्या काही वर्षांपासून इथेच आहात . '' शुभ्रा .

'' हो ,गेले काही वर्ष मी इथेच आहे पण वसंतवाडीच्या केसबद्दल तुला कसं काय माहीत ? '' डॉ पटवर्धन .

'' सर , इन्स्पेक्टर सावंतांनी मला ह्या केस मध्ये त्यांची मदत करायला बोलावलं आहे , म्हणूनच मी इथे आली आहे . मला तुमच्याशी ह्या केसविषयी थोडं बोलायचं होतं . '' शुभ्रा .

'' आय सी . बोल ना काय बोलायचंय तुला . '' डॉ पटवर्धन .

'' सर तुम्हाला नाही वाटत का , ही केस खूपच विचित्र आहे . मी तुमच्याकडे आले कारण तुमच्या नजरेतून काही सुटेल हे शक्यच नाही . तुम्हाला काही खटकलं का ? '' शुभ्रा .

'' मला कळतंय , तुला काय म्हणायचंय , पण ही केस माझ्यासाठी पण तितकीच विचित्र आहे . अशी केस मी माझ्या उभ्या आयुष्यात कधी बघितली नाही . ह्या सगळ्यांच्या मृत्यूचं कारण सांगायचं झालं तर मी जे रिपोर्ट्स बनवले आहेत ते अगदी योग्य आहेत . हे बघ मी जे रिपोर्ट्स बनवले आहेत ते फक्त डेड बॉडीला तपासून , तुझ्याकडे ही संधी आहे , जर तू ह्या केसचा दोन्ही बाजूने विचार केलास तर तुला नक्कीच काहीतरी सापडेल ह्याची मला खात्री आहे . '' डॉ पटवर्धन .

'' हो सर , तुमच्या बोलण्याचा मी नक्कीच विचार करेन . परत एकदा तुम्हाला भेटून बरं वाटलं . '' शुभ्रा .

'' मॅडम काही कळालं का ? '' राणेंनी शुभ्राला बाहेर येताच प्रश्न विचारला .

'' नाही , अजून तरी काही नाही पण लवकरच काहीतरी नक्की हाती लागेल . '' शुभ्रा .

दिवसभर शुभ्रा केसच्याच विचारात होती . ही पहिली अशी केस होती जी सोडवायला तिला इतका वेळ लागत होता . रात्री जेवण करून शुभ्रा तिच्या खोलीत गेली . डोक्यात अजूनही केसचाच विचार चालू होता . डॉ पटवर्धनांना भेटून देखील काहीच फायदा झाला नव्हता . आपल्या नजरेतून काहीतरी महत्वाचं सुटतंय असं तिला सारखं वाटत होतं . न राहवून तिने केसची फाईल पुन्हा बाहेर काढली . ह्यावेळी ती एक-एक वाक्य लक्षपूर्वक वाचत होती . ह्यावेळी मात्र एक गोष्ट तिला खटकली , ती म्हणजे ह्या 8 जणांपैकी 6 जणांचा मृत्यू हा वाड्याच्या आत झाला होता आणि अनिकेत आणि महादू मृत्यूच्या काही वेळापूर्वी वाड्यातच होते , त्यांना देखील वाड्यात काहीतरी दिसलं किंवा जाणवलं असणार . त्या वाड्यातच काहीतरी असेल का ज्याने ह्या सगळ्यांचा मृत्यू झाला , ही शंका शुभ्राच्या मनात घर करून बसली . ती कितपत खरी ठरणार होती , हेही तिला माहीत नव्हतं ; पण तिला प्रत्येक शक्यतेचा विचार करणं भाग होतं . तिने ह्या विषयी सावंतांशी बोलायचं ठरवलं . आता ह्या प्रकरणाचा प्रत्यक्षपणे भाग झाल्याशीवाय काहीही उमजणार नाही हे तिला कळून चुकलं .

***********************************

वाड्याच्या परिसरात अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं . चंद्राचा किरकोळ प्रकाशदेखील वाड्याच्या अवती-भोवती वाढलेल्या गर्द झाडांनी रोखून ठेवला होता . इतक्या काळोखात वाड्याच्या आतमधलं दृश्य नजरेस पडणं अशक्य होतं , पण वाड्याच्या एका खिडकीत दोन लाल डोळे चमकत होते . हे तेच होते , जे शुभ्राकडे एकटक पाहात होते . शुभ्राला जरी जाणवलं नसलं तरी 'त्याने' तिला पाहिलं होतं .तिला जरी तेव्हा माहीत नसलं तरी 'ते' तिथंच होतं . तिच्या मनात काय चालू आहे ते 'त्याने' ओळखलं होतं . 'त्याला' त्याचं पुढचं सावज सापडलं होतं .

रात्रीच्या अंधारात आता 'ते' एखाद्या हिंस्त्र श्वापदासारखं वाड्यात फिरत होतं . कधी वाड्याच्या तळमजल्यावर तर दुसऱ्याच क्षणी वरच्या मजल्याच्या एखाद्या खिडकीत दिसत होतं . वाड्याचा कोपरानकोपरा 'त्याच्या' काळ्या सावटाखाली होता जणू वाड्यावर 'ते' आपला हक्क गाजवत होतं . बऱ्याचवेळा 'ते' वाड्याबाहेर देखील आलं . वाड्याच्या चहू बाजूला एकसारख्या घिरट्या घालू लागलं पण 'त्याचा' तो खेळ तिथपर्यंतच मर्यादित होता . गेले बरेच महिने 'त्याने' वाट बघितली होती पण आता त्याची प्रतीक्षा संपणार होती . 'त्याला' त्याचं नवीन सावज सापडलं होतं .

***********************************

सकाळी पोलीसा स्टेशन मधलं वातावरण जरा तंगच होतं . शुभ्राचं बोलणं ऐकून सावंतांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या . ती असं काही बोलेल ह्याची त्यांना अपेक्षा नव्हती . थोडा वेळ शांतपणे विचार करून सावंत म्हणाले - '' नाही . मी तुला ह्या गोष्टीची परवानगी नाही देऊ शकत . त्या वाड्यात एकट्याने राहणं धोक्याचं आहे . ''

'' पण सध्यातरी मला हाच मार्ग योग्य वाटतोय . '' शुभ्रा .

'' त्या वाड्यात जर राहून काही सापडणार असतं तर ते मी आधीच केलं नसतं का ? '' सावंत .

'' पण एकदा प्रयत्न करण्यात काय हरकत आहे ? '' शुभ्रा .

'' हे बघ मी तुला ह्या प्रकरणात फक्त एक एक्स्पर्ट म्हणून बोलावलं होतं . तिथे जाणं तुझ्या जीवाला धोक्याचं ठरू शकतं . '' सावंत .

'' हो मान्य आहे मला , पण ह्या प्रकरणात नुसते रिपोर्ट्स वाचून काही होणार नाही आणि नाही म्हणलं तरी आता नकळतपणे मीही ह्या प्रकरणाशी जोडली गेली आहे . मलाही आता ह्या सगळ्याच्या मुळापर्यंत जायचं आहे . '' शुभ्रा .

शुभ्राचा निश्चय अगदी पक्का होता . वाड्यात राहूनच सत्य काय आहे ते समोर येईल असं तिचं ठाम मत होतं . थोडा वेळ हो-नाही करता करता शेवटी तिने सावंतांना देखील आपलं म्हणणं पटवून दिलं . शुभ्राच्या मनात मात्र आता घालमेल सुरु होती . वाड्यात राहण्याचा निर्णय तिने घेतला तर होता पण तो कितपत खरा होता , हे वाड्यात जाऊनच कळणार होतं . वाड्यात तिच्या जीवालाही धोका असू शकणार होता . आशाताईंनी , वाड्यात पाऊल पण ठेवणार नाही , असं स्पष्ट सांगितलं होतं . शुभ्रा वाड्यात एकटीच असणार होती .

दुसऱ्या दिवशी सकाळीच शुभ्राची आवराआवरी सुरु होती . 10 च्या सुमाराला सावंत गेस्ट हाऊसवर आले . शुभ्राने त्यांना आत येताच प्रश्न विचारला - '' काय म्हणाले अण्णा ? ''

'' त्यांची काहीच हरकत नाही . अर्थात आधी ते नाहीच म्हणत होते , पण असो , हे घे वाड्याच्या किल्ल्या . '' किल्ल्या शुभ्राकडे सोपवत सावंत म्हणाले .

'' मला वाटतं तू पुन्हा विचार करावा . त्या वाड्यात एकटं राहणं धोक्याचं आहे . ही केस मी हॅन्डल करतोय , त्यामुळे तुझा जीव धोक्यात घालणं मला पटत नाही . '' सावंत .

'' हो पण हाच एक मार्ग आहे आणि काही वाटलंच तर मी नाही राहणार तिथे ! '' शुभ्रा .

***********************************

अण्णांच्या मनाला चैन पडत नव्हतं . ते दिवाणखान्यात येरझाऱ्या घालत होते . मनात असंख्य विचारांनी घर केलं होतं . शुभ्राला वाड्यात राहण्याची परवानगी तर त्यांनी दिली होती पण त्याचा परिणाम काय होईल , ह्याचा फक्त अंदाजच ते लावू शकत होते . वाड्यात तो जीवघेणा खेळ पुन्हा सुरु होऊ नये हीच प्रार्थना ते सतत देवाकडे करत होते .

'' नाही सोडणार........... कोणालाच नाही सोडणार...... मृत्यूचा खेळ पुन्हा सुरु होणार ! '' एका कोपऱ्यात बसून आबा स्वतःशीच बोलत होते .

'' आबा काय बोलताय तुम्ही ! '' अण्णा .

'' खरं तेच बोलतोय . तू त्या पोरीला वाड्यात राहण्याची परवानगी देऊन चूक केली . '' आबा .

'' मी तरी काय करणार होतो ? त्या वाड्यात काय आहे ते फक्त आपल्यालाच माहीत आहे . शुभ्रा आणि सावंतांना सांगूनसुद्धा काही फायदा होणार आहे का ? आजकालच्या विचारांचे आहेत ते , असल्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवणार . '' अण्णा .

'' विश्वास असो किंवा नसो , 'त्याच्या' अस्तित्वाला आपल्याला नाकारता येत नाही . 'ते' अजूनही त्या वाड्यात आहे . आपल्या नव्या सावजाची वाट बघतंय . नाही सोडणार 'ते' , कोणालाच नाही सोडणार . '' आबा .

***********************************

शुभ्रा वसंतवाडीला आली तेव्हा तिथल्या वातावरणात काडीमात्र फरक पडला नव्हता . वाडीत प्रवेश करताच सगळं स्तब्ध झाल्या सारखं वाटत होतं . मोठ्या वाढलेल्या झाडांमुळे भर दुपारी वाडीत अंधार होता . तिथलं वातावरण अगदी अनैसर्गिक वाटत होतं पण आता काही दिवस का होई ना शुभ्राला ह्याच्याशी जुळवून घेणं भाग होतं . ती वाड्याच्या दाराजवळ आली . एका सहज प्रेरणेने तिने बाजूच्या खिडकीत डोकावून पाहिलं पण लक्ष वेधून घेणारं असं तिला काहीच दिसलं नाही , पण खरंच काही दिसावं अशी तिची अपेक्षा होती का ? आणि खरंच काही दिसलं असतं तर ? असो . ती खिडकीपासून दूर होत पुन्हा मुख्य दारासमोर आली . दाराला भलं मोठं कुलूप होतं . तिने पर्स मधून किल्ली काढत कुलुपाला लावली . थोडा फार आवाज झाला , पण त्या वाड्याचं भलं मोठं दार उघडायला तिला फारसा वेळ लागला नाही .

वाड्यात प्रवेश करताच एक थंड वाऱ्याची झुळूक तिच्या सर्वांगाला शहारे आणून गेली . आत मध्ये अंधाराने आणखीनच भयावह स्वरूप धारण केलं होतं . साहजिकच शुभ्राने लाईट लावून अंधार घालवायचा प्रयत्न केला तसा वाड्यात दिव्यांचा प्रकाश पसरला . आतमधलं दृश्य अगदी स्पष्ट दिसू लागलं . शुभ्रा वाड्याच्या दिवाणखान्यात उभी होती . सगळ्या आधुनिक सुविधा असल्या तरी वाड्याची मूळ रचना जुन्या पद्धतीची होती . त्यात कुठल्याच प्रकारचा आधुनिक बदल केला गेला नव्हता . दिवाणखान्याच्या मधोमध जुन्या पद्धतीचा , सोफा होता , भिंतींवर प्राचीन चित्रे लटकवलेली होती , सामान नाही म्हणलं तरी थोडं अस्ताव्यस्त पडलं होतं . दिवाणखान्याच्या डाव्या बाजूला काही खोल्या होत्या , खोल्यांना लागूनच एक जिना होता , वरच्या मजल्यावर साधारण तितक्याच खोल्या होत्या . दिवाणखान्याच्या उजव्या बाजूला स्वयंपाकघर होतं . त्याला लागूनच आणखीन एक दरवाजा होता , जो मागच्या अंगणात उघडत होता . अंगणात एक मोठी विहीर होती .

वाड्यातलं सामान नीट लावून , शुभ्रा प्रत्येक खोलीचं बारकाईने निरीक्षण करू लागली . कोणत्याही खोलीत तिला विलक्षण असं काहीच सापडलं नाही . न राहवून ती वाड्याच्या मागच्या अंगणात गेली . अंगणात विहीर सोडली तर दुसरं काहीच नव्हतं . तिकडेही तिला विलक्षण असं काहीच दिसलं किंवा जाणवलं नाही . ती पुन्हा दिवाणखान्यात येऊन बसली . स्वतःशीच विचार करता-करता तिचा केव्हा डोळा लागला तिचं तिलाच कळलं नाही .

***********************************

वाड्यात नीरव शांतता पसरली होती . सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं . थंडीने शुभ्राचं अंग कुडकुडत होतं . अंधारामुळे तिला आजूबाजूचं काहीच दिसत नव्हतं . स्वयंपाकघराचा दिवा मात्र चालूच होता . शुभ्रा स्वयंपाकघराच्या दिशेने जायला निघाली . स्वयंपाकघरात पाऊल ठेवताच तिला एका बाजूला , खालच्या दिशेला उघडणारा एक दरवाजा दिसला . तो नक्कीच तळघराचा दरवाजा असावा . ती कसलाच विचार न करता त्या दरवाज्याच्या दिशेने निघाली . एक-एक करत ती त्या दगडी पायऱ्यांवरून खाली जाऊ लागली . शेवटच्या पायरीवर पाय ठेवताच एक विजेचा झटका बसल्यासारखा झटका तिला बसला आणि ती खाडकन झोपेतून जागी झाली .

तिच्या सर्वांगाला घाम फुटला होता , घशाला कोरड पडली होती . दोन क्षण आजूबाजूला बघितल्यानंतर तिला लक्षात आलं ,ती अजूनही दिवाणखान्यातच होती . जे पाहिलं ते स्वप्नच होतं , ह्यावर तिचा विश्वास बसायला काही वेळ गेला , पण ते तळघराचं दार , जे तिला ह्या आधी वाड्यात कुठेच दिसलं नव्हतं , स्वतःकडे आकर्षित करत होतं . तो स्वप्नात का असेना ; पण आलेला अनुभव तिला ओळखीचा जाणवत होता .

शुभ्रा कसलाच विचार न करता स्वयंपाकघराकडे जायला निघाली . तिकडे जाताच तिची नजर तळघराच्या दारावर पडली . तो दरवाजा ह्या आधी तिला नक्कीच दिसला नव्हता , तो खरंच तिथे होता का ? होता तर मग ह्या आधी का दिसला नाही ? ह्या गोष्टींचा तर्क-वितर्क लावण्याच्या मनःस्थिती ती नव्हतीच . तिला तळघरात जायची अनामिक ओढ लागली होती . तळघराचं दार बंदच होतं . कडी बाजूला सरकवून तिने दरवाजा उघडला . वरच्या दोन-तीन पायऱ्या सोडल्या तर खाली मिट्ट काळोख होता . बॅटरीच्या प्रकाशात ती एक-एक पायरी उतरू लागली . त्या पायऱ्यांचा होणार थंडगार स्पर्श तिला अजिबात अनोळखी वाटत नव्हता . 15-20 पायऱ्या उतरून ती तळघरात पोहोचली .

टॉर्चच्या व्यासातला भाग काय तो नजरेस पडत होता . तेवढा भाग सोडला तर भोवतालच्या अंधारात काय असेल त्याचा अंदाज देखील कोणी लावू शकलं नसतं , पण का कोणास ठाऊक तो अंधार देखील शुभ्राला अनोळखी नव्हता . नकळतपणे शुभ्रा त्या बॅटरीच्याच प्रकाशात तळघराचा कोपरा न् कोपरा निरखून बघू लागली . तळघर पूर्णपणे रिकामं होतं . एके काळी धान्य साठवण्यासाठी त्याचा वापर केला जात असावा , पण आता तिथे काहीच नव्हतं . निदान त्या प्रकाशाच्या वलयात तरी काहीच येत नव्हतं .

ते तळघराच्या चहू बाजूंचा वेध घेणारं प्रकाशाचं वलय एका ठिकाणी येऊन थांबला . त्या वलयात दिसणाऱ्या गोष्टीवर शुभ्राची नजर खिळली होती . ते साधारण एका रेडिओसारखा दिसणारं यंत्र असावं . तिने ते यंत्र उचलून हातात घेतलं . तो रेडिओ तर नक्कीच नव्हता . त्यावर बऱ्याच प्रकारचे , रंगीत बटणं होती . एका वेगळ्याच भाषेत कसला तरी मजकूर लिहिला होता . त्या यंत्राच्या मधोमध एक मीटर होतं . ते यंत्र कशासाठी वापरलं जात असावं? त्याचं नाव काय होतं ? ते त्या तळघरात कसं आलं ह्यातलं काहीच शुभ्राला माहीत नव्हतं . ती थोडा वेळ तशीच त्या यंत्राकडे बघत होती . तिची तंद्री भंग पावली , ती कोणाच्यातरी चाहुलीने . तिला तळघरात आपल्या व्यतिरिक्त आणखीन कोणीतरी आहे अशी जाणीव होत होती , पण त्या अंधारात तिला कोणीच दिसलं नाही , पण नक्कीच ती एकटी नव्हती . तिच्या व्यतिरिक्त कोणाचंतरी अस्तित्व तिला प्रकर्षाने जाणवत होतं . अंधारात तर कोणी दबा धरून बसलं नसेल ना , ह्या सहज विचाराने पुन्हा एकदा तिने बॅटरीचा प्रकाश तळघरात सगळीकडे फिरवला , पण तिला काहीच दिसलं नाही . तिला फार वेळ तिथे थांबणं आता योग्य वाटत नव्हतं . ती ते यंत्र घेऊन परत जाऊ लागली . तळघराच्या बाहेर येताच तिने एक मोठा उसासा सोडला . तिला कसलं तरी दडपण कमी झाल्यासारखं वाटत होतं . एकदा पुन्हा मागे वळून पाहावं , असं तिला वाटलं पण तो विचार सोडून ती दिवाणखान्यात निघून गेली .

तिने जर मागे वळून बघितलं असतं तर....... त्या तळघराच्या अंधारात दोन लाल डोळे चमकत होते . ते टक लावून शुभ्राकडेच बघत होते . थोडावेळ चमकून ते लाल डोळे तळघराच्या अंधारात नाहीसे झाले .

***********************************

शुभ्रा दिवाणखान्यात परत येऊन बसली . सहज म्हणून तिने एकदा स्वयंपाकघराकडे वळून पाहिलं आणि परत एकदा त्या यंत्राकडे बघू लागली . तिला त्याच्यावर काय लिहिलं आहे , ते समजत नव्हतं , ते कुठेतरी पहिल्या सारखं वाटत होतं . तिने शेवटी कंटाळून ते तिथेच बाजूच्या टेबलवर ठेऊन दिलं .

ती आता पुन्हा एकदा त्या तळघरात आलेल्या अनुभवाचा विचार करू लागली . ती खरंच तिथे ह्या आधी गेली होती का , हे तिला समजत नव्हतं , पण ती तिथे एकटी नव्हती . तिला कोणी दिसलं जरी नसलं तरी , कोणीतरी आजूबाजूला असल्याची पुरेपूर जाणीव तिला होत होती . त्या अंधारात खरंच काही होतं का ? तिथल्याच कुठल्यातरी अंधाऱ्या कोपऱ्यात ? किंवा तिच्याच मागे ? त्या प्रकाशाच्या वर्तुळाबाहेर काय होतं , हे कोण सांगू शकलं असतं ? जरी शुभ्राने सगळीकडे प्रकाश करून पाहिलं असलं , तरी क्षणोक्षणी त्या प्रकाशाच्या वलयाबाहेर राहणारा भाग अंधाराच्या सावटाखालीच होता , तिथे कोणी असलं असतं , तरी ते तिला ते दिसलं असतं ह्याची जरा शंकाच होती.

तिच्या जागृत मनाने , तिथे काही न दिसल्यामुळे , त्या प्रसंगाच्या खोलवर जाण्याच्या प्रयत्न केला नाही , पण तिच्या मनाच्या कुठल्यातरी खोल अप्रत्यक्ष पातळीवर , ज्याला आपण सुप्त मन असे म्हणतो , त्या प्रसंगाचा साधकबाधक विचार करायला सुरवात देखील केली होती . कितीही विचार केला तरी तिकडे काहीच न दिसल्यामुळे त्या अस्तित्वाचा ती पूर्णपणे स्वीकार करू शकत नव्हती . तिला जरी काही जाणवलं असलं , तरी त्याला काही यांत्रिक प्रणालीने सिद्ध करता आलं असतं का ? जसं आपण 'anemometer' ह्या यंत्राच्या मदतीने वायूवेग आणि वायूदाब अशा न दिसणाऱ्या पण अस्तित्वात असणाऱ्या , भौतिक मापांना मोजू शकतो , तसं जर आजूबाजूच्या ऊर्जेचं मापन करणारं यंत्र अस्तित्वात असतं तर ?

तिच्या डोक्यात असला विचार येताच तिला काहीतरी आठवलं . तिने लगेचच ते टेबलवरचं यंत्र पुन्हा उचललं . त्या यंत्राच्या मागे 'A.J.' असं लिहिलं होतं . तिनं तिचा मोबाइल बाहेर काढला आणि त्यावर अनिकेत जोशी , पॅरानॉर्मल इन्वेस्टीगेटर ,असं टाईप केलं .

केसची फाईल वाचतांना 'अनिकेत जोशी' नाव वाचताच ती जे आठवायचा प्रयत्न करत होती , ते तिला ते यंत्र बघून लक्षात आलं होतं . अनिकेत जोशी , हा भारतातला नावाजलेला पॅरानॉर्मल इन्वेस्टीगेटर होता . होताच म्हणावं लागेल कारण , गेले काही वर्ष तो कुठे आहे ते कोणालाच माहीत नव्हतं . तो भारतातल्या वेगवेगळ्या अनैसर्गिक/अतिमानवीय ठिकाणांवर जाऊन तिथलं सत्य जाणून घायचा प्रयत्न करत असे . शुभ्राने देखील त्याचे बरेचशे आर्टिकल्स वाचले होते , वेगवेगळ्या ठिकाणांचे त्याचे 'vlogs' पाहिले होते . केसची फाईल वाचतांना कदाचित तिला लक्षात आलं नसावं , पण आता तिची खात्री पटली होती की हा तोच अनिकेत होता .

ती अनिकेतच्या 'पॅरानॉर्मल हंटींग' ह्या नावाच्या वेबसाइटवर गेली . 1 फेब्रुवारी 2017 नंतर त्यावर कसलेच अपडेट्स दिसत नव्हते . त्या वेबसाइटच्या होम पेजवर अनिकेत जोशीची माहिती होती . त्याने उलगडलेल्या वेगवेगळ्या रहस्यांची तपशीलवार माहिती होती . तिथेच तिला एका कोपऱ्यात त्या रेडिओ सारख्या दिसणाऱ्या यंत्राबद्दलची माहिती दिसली .

तिथे लिहिल्याप्रमाणे त्या यंत्राला 'EMF' (electromagnetic field ) प्रोब असे म्हणतात . ह्या यंत्राच्या साह्याने आजूबाजूच्या परिसरातील ऊर्जेचं प्रमाण मोजलं जातं , मग ती सकारात्मक असो ; किंवा नकारात्मक . नकारात्मक ऊर्जेच्या क्षेत्रात येताच ह्या यंत्रावरील मीटरचा काटा आपोआप हलायला लागतो . तिथे त्या यंत्राचा वापर कसा करावा , हेही लिहिलं होतं . एकवार शुभ्राने त्या यंत्रावर नजर टाकली आणि पुन्हा वाचू लागली .

तिथे उल्लेख केलेल्या बऱ्याच अतिमानवीय ठिकाणांमध्ये , एका ओळीत तिला वसंतवाडी, वडगाव , असं नाव दिसलं. वसंतवाडी नाव वाचताच तिला थोडं आश्चर्य वाटलं . तिने ती लिंक ओपन केली आणि त्यावरील अनिकेतने लिहिलेलं आर्टिकल वाचू लागली.

' 1 फेब्रुवारी 2017 , आज माझा वसंतवाडीतील ह्या वाड्यातला पहिला दिवस ( खाली वाड्याचा फोटो होता ) . ह्या वाड्यात गेल्या काही वर्षात बरेच मृत्यू झाले , असं मला कळालं . हे मृत्यू सर्वसाधारण नसून , इथे झालेल्या प्रत्येक मृत्यूमागे काहीतरी गूढ आहे . गावकऱ्यांच्यामते ही जागा झपाटलेली आहे . ह्या वाड्यात गावातलं कोणीच पाऊल पण ठेवत नाही . त्यांना हा कसलातरी भूतबाधेचा प्रकार वाटत असावा . ह्या वाड्याबद्दल ऐकलं आणि इथे राहून , ह्या खूनांमागे खरंच एखाद्या अनैसर्गिक शक्तीचा हात आहे का , हे जाणून घेण्यासाठीचा माझा मोह आवरला नाही . आज माझा पहिला दिवस ह्या वाड्यात फारसा खास गेला नाही . 'EMF' प्रोब मध्ये देखील मायनर फ़्लक्‌चुएशन व्यतिरिक काहीच दिसलं नाही , पण इथे एका नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव मला प्रखरपणे जाणवतोय . ही ऊर्जा वाड्यात सगळीकडे थोड्या-थोड्या प्रमाणात आहे . ह्या ऊर्जेचं स्रोत कदाचित वाड्यातल्या तळघरात असावं . तळघराच्या दारापाशी मला मीटरमध्ये लक्षणीय हालचाल दिसली , पण आज तिथे जाण्यात काही उपयोग नाही . उद्या 2 फेब्रुवारी 2017 ला अमावस्या आहे . अमावास्येच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव प्रखरपणे जाणवतो . इथे खरंच काही असेल तर ते उद्याच जाणून घेता येईल . ह्या वाड्यात काय आहे ते उद्या सगळ्यांना कळेलंच , तर भेटूया उद्या म्हणजेच 2 फेब्रुवारीला , वसंतवाडीतील वाड्याच्या रहस्यभेदासकट .'

ते आर्टिकल वाचल्यानंतर शुभ्रा साहजिकच 2 फेब्रुवारी 2017 चं आर्टिकल शोधू लागली पण 1 तारखे नंतर त्या पेजवर काहीच अपडेट्स नव्हत्या . ती पुन्हा-पुन्हा पेज रिफ्रेश करून बघत होती ; पण त्यावर काहीच येत नव्हतं . तिला काहीतरी आठवलं आणि तिने वसंतवाडीची केस फाईल बाहेर काढली . त्यावरील अनिकेत जोशीच्या मृत्यूची तारीख ती शोधू लागली .

2 फेब्रुवारी 2017. तो दुसऱ्या दिवशी आर्टिकल लिहू शकला नाही कारण त्या आधीच त्याचा मृत्यू झाला . काय झालं असेल त्याच्या सोबत ? तो त्या तळघरात गेला होता हे नक्की . त्याला खरंच तिथे काही दिसलं असेल का ? त्या तळघरातल्या अस्तित्वानेच तर त्याचा जीव घेतला नसेल ना ? खरंतर हेच शोधायला शुभ्रा त्या वाड्यात गेली होती ; पण ही केस असलं वळण घेईल हे तिच्या ध्यानी-मनीही नव्हतं .

आता शुभ्राला त्या वाड्यात राहणं धोकादायक वाटत होतं . शुभ्राने अमानवीय शक्तींच्या असण्याची शक्यता कधीच नाकारली नव्हती , पण तिची उत्सुकता तिच्या डगमगणाऱ्या मनावर एकप्रकारे मातच करत होती , नाहीतर सर्वप्रथम ती वाड्यात राहायलाच गेली नसती . आत्ताही तिची उत्सुकता तिला वाड्यात राहून , तिथल्या रहस्याची उकल करायला भाग पाडत होती , मग त्याच्या मुळाशी एखादं मानवीय अस्तित्व असो किंवा अमानवीय.जर वाड्यात काही होतं तर ते अजून काही करत का नसावं ? त्याचं अस्तिव , त्याची शक्ती त्या तळघरापर्यंतच मर्यादित होती का ? असो . शुभ्राच्या मनाने अजाणतेपणे त्या अस्तित्वाचा स्वीकार केला होता . ती पुढे जे काही करणार होती ते त्या अस्तित्वाला गृहीत धरूनच करणार होती ह्यात काही शंकाच नव्हती .

*********************************

शुभ्रा अजूनही त्याच वाड्यात होती . ती पुढे काय करणार होती हे तिचं तिलाही माहीत नव्हतं , पण ती सगळं अर्धवट सोडून जाणार नव्हती हे मात्र नक्की . त्या तळघरात आलेल्या एकाच अनुभवामुळे तिच्या विचारचक्राचा वेग आणखीनच वाढला होता . त्या तळघरात सापडलेल्या यंत्राबद्दल ती तुर्तास सावंतांना काहीच सांगणार नव्हती. त्यांचा ह्या सगळ्यावर विश्वास बसेल की नाही . ह्याची जरा तिला शंकाच होती . तिने त्यांना सांगितलं तरी काय असतं ? तिचा स्वतःचा तरी ह्या गोष्टीवर पूर्णपणे विश्वास बसला होता का ?

त्या तळघरात जर काही होतं तर ते समोर का आलं नाही ? त्यानं काहीच का केलं नाही ? जर बाकीच्यांचा जीव पण त्यानेच घेतला आहे तर त्याने आपल्याला का काही केलं नाही ? ते कशाची वाट बघत असावं का ? का हे सगळं त्याने आपल्याला तळघरात बोलवायला केलं होतं ? ह्या असंख्य प्रश्नांनी शुभ्राला घेरलं होतं पण त्यांची उत्तरं देणारं कोणीच नव्हतं .

पुढे काय करावं , हे तिला सुचत नव्हतं . ती त्या तळघरात पुन्हा जाण्याचा विचार करत होती . बऱ्याच विचारांनी मनात घर केलं होतं आणि इतक्या सगळ्या विचारांच्या पसाऱ्यातून तिला कसलाच निष्कर्ष काढता येत नव्हता . सध्यातरी ती काहीच करण्याच्या मनःस्थितीत नव्हती . ह्या एकाच दिवसात आलेल्या विचित्र अनुभवाचा विचार ती दिवसभर करत होती . रात्रीसुद्धा दिवसभर घडलेल्या घटनांचा विचार करत केव्हातरी तिला झोप लागली .

मध्यरात्री केव्हातरी शुभ्राला जाग आली . सर्वत्र नीरव शांतता पसरली होती . शुभ्राच्या चेहऱ्यावर कसलेच हावभाव नव्हते . भोवतालचं जग तिला रक्ताचा मुलामा दिल्यासारखं दिसत होतं . तिने आजूबाजूला बघितलं . ती तिच्या खोलीत नसून तळघरात होती . तळघरात प्रकाशाचा लवलेशही नव्हता . ती तळघराच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात शांतपणे बसून होती . तिच्या मनात कसलेच विचार चालू नव्हते . ती कोणाचीतरी वाट बघत होती . तिने ज्या व्यक्तीला तळघरात बोलावलं होतं ती कोणत्याहीक्षणी तळघरात येणार होती , पण त्या व्यक्तीला माहीत होतं का , तिला कोणी बोलावलं आहे ? असो . ती व्यक्ती तळघरात येणार हे नक्की होतं .

तळघराच्या वरच्या पायऱ्यांवर थोडा प्रकाश झाला , तसं शुभ्राच्या चेहऱ्यावर एक हिडीस हास्य पसरलं . ती तशीच त्या अंधाऱ्या कोपऱ्यात बसून होती . जसजसा वेळ पुढे जात होता . तसा तळघराच्या एक-एक पायरी वरून एक प्रकाशाचं वर्तुळ खाली-खाली सरकत होतं . ते प्रकाशाचा वर्तुळाने आता तळघराच्या जमिनीचा वेध घेतला . ते तळघरात सगळीकडे फिरत होता . ते एखाद्या बॅटरीच्या प्रकाशाचा वर्तुळ असावा . ती बॅटरी कोणी धरली आहे , हे दिसत जरी नसलं ; तरी शुभ्राला ती व्यक्ती कोण आहे , ह्याची पुरेपूर जाण होती .

शुभ्राला ती व्यक्ती , एखाद्या लाल चित्रातल्या काळ्या छटेसारखी दिसत होती . त्या व्यक्तीला बघताच तिच्या डोळ्यात आणखीनच क्रूर भाव दिसू लागले . ती त्या व्यक्तीच्या मागे-मागे चालत होती . दोन-तीन वेळा त्या व्यक्तीने शुभ्राला पाहण्याचा प्रयत्न केला , पण दर वेळी शुभ्रा त्या प्रकाशाच्या विलयाला चुकवत होती . त्या व्यक्तीचा घाबरलेला चेहरा बघून तिच्या मनातल्या असुरी महत्वाकांक्षा उफाळून येत होत्या , पण ती त्या व्यक्तीला काहीच करत नव्हती . तिला काही करता आलं नसतं अशातला भाग नाही पण ही ती योग्य वेळ नव्हती . ती त्या योग्य वेळेची वाट बघत होती . ती व्यक्ती कसलीतरी वस्तू त्या तळघरातून घेऊन पुन्हा जाऊ लागली . एक दोनदा त्या व्यक्तीने पुन्हा मागे वळून पाहिलं पण तिला कदाचित शुभ्रा दिसली नसावी . जसजशी ती व्यक्ती तळघराच्या बाहेर जात होती , तसतशी शुभ्रा तिच्या मागे जात होती . ती व्यक्ती तळघराच्या बाहेर पडली , तिने एकदाही मागे वळून बघितलं नाही . शुभ्रा त्या व्यक्तीच्या मागे तळघराबाहेर गेली नाही . ती पुन्हा संथ पावलांनी तळघराच्या त्याच अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन बसली . काहीतरी साधल्याचा आनंद तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता .

शुभ्रा विजेचा झटक बसल्या सारखी , झोपेतून जागी झाली . सर्वांगाला दरदरून घाम फुटला होता . तिला समजत नव्हतं , ती कुठे आहे . तिला सामान्य स्थितीत यायला काही वेळ जावा लागला . वाढलेल्या श्वासाचा वेग पूर्ववत झाल्यानंतर शुभ्राने एकवार सगळीकडे नजर फिरवली . ती अजूनही वाड्याच्या तिच्या खोलीतच होती . गेल्या काही दिवसात तिला दुसऱ्यांदा असलं स्वप्न पडलं होतं . त्याला स्वप्न तरी कसं म्हणावं , शुभ्राला त्या स्वप्नात घडलेली प्रत्येक गोष्ट जाणवत होती . ती शरीरातून वाहणारी प्रखर ऊर्जा , त्या व्यक्तीला बघितल्यानंतर जाणवणारी तुच्छता , तो ओळखीचा झालेला अंधार , ते लाल चित्र , अगदी सगळं !

शुभ्रासाठी आता त्या स्वप्नातला आणि वास्तविक जगातला फरक मिटत चालला होता . ती स्वतःला त्या स्वप्नाचाच एक भाग समजत होती . स्वप्नाला आणि वास्तविक जगाला वेगळं करणारी रेषाच कुठेतरी हरवल्यासारखी झाली होती .

शुभ्रा तशीच स्वप्नाचा विचार करत बेडवर आडवी पडली . ह्या सगळ्याचा संबंध नक्कीच त्या तळघराशी आहे हे तिला कळून चुकलं होतं . तिने मोबाईल मध्ये वेळ बघितला , रात्रीचे 2:30 वाजले होते . इतक्या रात्री तिला तळघरात जाणं योग्य वाटत नव्हतं . तिने सकाळ व्हायची वाट बघायचं ठरवलं . ती जर तेव्हाच तळघरात गेली असती तर काय झालं असतं , माहीत नाही , पण गेल्या कित्येक वर्षांच्या मानवाच्या अंतःप्रेरणेचा (instincts) अभ्यास केला तर माणूस सकाळी , किंवा प्रकाशात स्वतःला जास्त सुरक्षित समजतो . ही अंतःप्रेरणा कदाचित मानवात बरीच आधी विकसित झाली असावी . एखाद्या अंधाऱ्या खोलीत माणूस प्रकाशाचा स्रोत हुडकायचा सर्वात आधी प्रयत्न करतो , त्याने खरंच काही होत असेल की नाही , ते सांगता येणं जरा अवघडच आहे पण हीच वर्षानुवर्षो विकसित झालेली अंतःप्रेरणा अजूनही माणसाच्या बऱ्याचश्या कृत्यांमध्ये दिसून येते . असो . शुभ्राने सकाळी तळघरात जायचं ठरवलं .

सकाळी शुभ्रा तळघरात जायला निघाली . कालच्या आलेल्या अनुभवानंतर तिला तिथे पाऊल ठेवायची देखील इच्छा नव्हती पण सगळ्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी तळघरात जाणं भाग होतं . ती स्वयंपाकघरात गेली . तळघराचं दार उघडंच होतं . बॅटरीच्या प्रकाशात ती पुन्हा एकदा तळघराच्या पायऱ्या उतरू लागली . तळघरात पोहोचताच एक थंड वाऱ्याची झुळूक तिच्या सर्वांगाला स्पर्श करून गेली . तिनं पुन्हा एकदा बॅटरीच्या प्रकाशात तळघराचा कोपरा न् कोपरा पाहू लागली . तळघर रिकामंच होतं .

तळघरात एक कुबट वास पसरला होता . तिथली हवा थंड होती . वातावरणात कोंदटपणा जाणवत होता . शुभ्राला आता श्वास घायला त्रास होऊ लागला . समोरचं चित्र धूसर दिसू लागलं . कानात चित्र-विचित्र आवाज घुमू लागले .

दोन क्षणांसाठी तिच्या डोळ्यांसमोर पूर्ण अंधार पसरला . वास्तवाचा जणू तिला विसरच पडला .

अचानक कसल्याशा आवाजाने ती भानावर आली . सगळं पुन्हा स्पष्ट दिसू लागलं कानात घुमणारे चित्र-विचित्र आवाज बंद झाले . आता शुभ्राला एकच आवाज ऐकू येत होता . ती पळतच तळघराच्या बाहेर आली . कोणीतरी वाड्याचं मुख्य दार ठोठावत होतं . इतक्या पहाटे कोण असेल ह्याचा विचार करत तिने दार उघडलं . दार उघडून , कोण आहे ते बघण्यासाठी तिने नजर वर केली , तर तिला तिच्याच डोळ्यांवर विश्वास बसेना .

'' आदिनाथ सर तुम्ही ! सर तुम्ही इतके वर्षंकुठे होता आणि आज अचानक इथे ! '' शुभ्रा पटकन बोलून गेली .

अधिनाथ शास्त्री . गोरा वर्ण . घारे डोळे . डोळ्यांवर साधा चष्मा . तो साधारण 35-शीतला असावा . जीन्स-शर्टच्या सध्या पेहरावात , आदिनाथ वाड्याच्या दारात उभा होता .

आदिनाथला बघून शुभ्रा अगदी स्तब्ध झाली होती . काही क्षणांसाठी भूतकाळाची झापड तिच्या डोळ्यांवर पडली . शिक्षण पूर्ण झाल्यावर लंडनच्याच एका हॉस्पिटलमध्ये काही वर्ष प्रॅक्टिस करत होती . तिथेच तिची भेट डॉक्टर आदिनाथ शास्त्रीशी झाली . आदिनाथने पॅरासायकॉलॉजी ( parapsychology ) मध्ये पी. एच. डी. केली होती . पॅरासायकॉलॉजीला मराठीत अतींद्रिय मानसशास्त्र असे म्हणतात . ह्या मध्ये - परा प्रत्यक्ष , परीचित्तज्ञान ( telepathy ) , पूर्वज्ञान ( prevision ) आणि विचित्र घटना ( occult / strange phenomenon ) या विषयांचं प्रयोगिक अन्वेषण करण्यात येतं . थोडक्यात वर्णन करायचं झालं म्हणजे , पॅरासायकॉलॉजी मध्ये अमानवीय , अतिमानवीय व अनैसर्गिक घटनांना , मानवीय नियमांच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला जातो .

शुभ्राला , डॉ अदिनाथच्या कामाविषयी नेहमीच उत्सुकता होती . तिचे क्षेत्र जरी वेगळे असले तरी , ती नेहमीच आदिनाथने मांडलेल्या वेगवेगळ्या थिअरीज् चा अभ्यास करत असे . ती त्याने लिहिलेले लेख देखील आवडीने वाचत असे . काही महिन्यांनी शुभ्रा जरी भारतात परतली असली तरी ती डॉ आदिनाथच्या संपर्कात होती , पण 3 वर्षांपूर्वी आदिनाथ एकाएकी गायब झाला . तो कुठे आहे ते कोणालाच माहित नव्हतं . गेल्या 3 वर्षात शुभ्रा आणि आदिनाथचं एकदाही बोलणं झालं नव्हतं . आज अचानक आदिनाथला समोर बघून शुभ्रा गोंधळून गेली होती . गेल्या काही दिवसात तिच्या बाबतीत जे घडत होतं , आत्ता काय घडतंय , ह्याची ती जुळवाजुळव करत होती .

'' सर आत या ना . '' भानावर येत ती म्हणाली .

शुभ्राच्या पाठोपाठ आदिनाथ आत आला . वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्याचं निरीक्षण तो अगदी बारकाईने करत होता . तो काही न बोलता सरळ स्वयंपाकघरात गेला . त्याच्या मागोमाग शुभ्रा देखील आत गेली . तळघराचं दार उघडं बघून आदिनाथच्या कपाळावर आठ्या पडल्या .

'' तू आत गेली होतीस ? '' त्याने अचानक विचारले .

'' हो गेले होते , तुम्ही आला तेव्हा मी खालीच होते . दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला म्हणून वर आले . '' शुभ्रा .

शुभ्राचं बोलणं ऐकून आदिनाथ कसल्यातरी विचारात पडला . त्याची नजर त्या तळघरावर स्थिर होती .

'' सर , तुम्ही असे एकाएकी कुठे गायब झाला होता ? '' शुभ्राच्या प्रश्नानी तो भानावर आला .

'' मी गेले 3 वर्ष इथेच होतो , वडगावला '' आदिनाथ .

'' काय ! तुम्ही इथेच होता ? मग कोणालाच काहीच कसं माहीत नाही ? पटवर्धन सर पण इथेच असतात , त्यांनाही काहीच कसं माहीत नाही ? '' शुभ्रा .

'' पटवर्धन सरांना माहीत आहे . '' आदिनाथ .

'' मग त्यांनी मला का नाही सांगितलं ? '' शुभ्रा .

'' मीच त्यांना तसं सांगितलं होतं . '' आदिनाथ .

'' पण का ? '' शुभ्रा .

'' सांगतो , सगळं सांगतो पण इथे नको , आपण माझ्या घरी जाऊन बोलूयात . '' आदिनाथ .

एक कटाक्ष त्या तळघरावर टाकत दोघही वाड्याबाहेर आले . गावाच्या थोडं बाहेर आदिनाथचं घर होतं . दोघही घरात गेले . आदिनाथ दोघांसाठी चहा घेऊन आला . चहा पिता-पिता आदिनाथने सांगायला सुरुवात केली .

'' मला इथे बघून तुला नक्कीच धक्का बसला असेल . साहजिकच आहे . मी इथे येण्यामागे तसंच विचित्र कारण आहे . काही वर्षांपूर्वी माझा मावस भाऊ , अनिकेत जोशी , वडगावला आला होता . तुला तर त्याच्या बद्दल माहीतच असेल , तो प्रख्यात पॅरानॉर्मल इन्वेस्टीगेटर आहे , म्हणजे होता . '' आदिनाथ .

शुभ्राने होकारार्थी मन हलवली .

‘’ काही वर्षांपूर्वी तो वसंतवाडीला आला होता . त्याच्या मते ही जागा इतर अनैसर्गिक जागांसारखीच असावी . त्याला इथे होणाऱ्या अमानवीय घटनांच्या मुळापर्यंत जाऊन , त्याच्यावर एक 'vlog' बनवायचा होता . तसा तो ह्याआधीही बऱ्याच अशा ठिकाणांना भेट देऊन आला होता ; पण इथे त्याला काहीतरी विचित्र जाणवलं असावं . एका दिवशी अचानक मला त्याचा फोन आला . मी तेव्हा लंडनलाच होतो . त्याचा आवाज कापरा येत होता . त्याने मला सांगितलं , वसंतवाडीत आल्यापासून त्याला विचित्र अनुभव येत होते . भयानक स्वप्नं पडत होती , ना-ना प्रकारचे आवाज कानांवर पडत होते . त्याचं मत होतं की ह्या सगळ्याचा संबंध वाड्याच्या तळघराशी आहे . तो दुसऱ्या दिवशी त्या तळघरात जाणार होता . कदाचित गेलाही असेल . पण नंतर काय झालं ते कोणालाच माहीत नाही . त्याचा नंतर मला फोन किंवा मेसेजmकाहीच आलं नाही . थोड्या दिवसनी तो गेल्याची बातमी मला कळाली.

अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांनी मी भारतात परत आलो . अनिकेतला त्या वाड्यात काहीतरी विचित्र अनुभव आला होता , हे माझ्या व्यतिरिक्त कोणालाच माहीत नव्हतं . त्या नंतर काही दिवसांनी मी वडगावला आलो . इकडे माझी पटवर्धन सरांशी पुन्हा गाठ पडली . सरांनी मला वसंतवाडीच्या केसबद्दल सगळं सांगितलं , ते ऐकून माझी खात्री पटली की अनिकेतचा मृत्यू सर्व-साधारण नक्कीच नव्हता . त्यात नक्कीच काहीतरी गूढ होतं . मी ह्या केसचा बरेच दिवस विचार केला , ही केस दिसते तितकी साधारण नाहीये , इतक्या जणांचा गूढरीत्या मृत्यू होणं साधारण गोष्ट नाही . माझं ठाम मत आहे , हे कोणा माणसाचं काम नाही , त्या वाड्यात नक्कीच काहीतरी आहे ज्यामुळे हे सगळं घडतंय . ''

'' व्हॉट डू यु मीन सर ? माणसाचं काम नाही ! '' शुभ्राने चमकून विचारलं .

'' म्हणजे त्या वाड्यात जे काही आहे ते अमानवीय आहे , ते आपल्या जगातलं नाही . एक गोष्ट मात्र नक्की , ते आपल्या जगात येऊन त्याचं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतंय. ते काय आहे ? कोण आहे ? त्याच्या जगात ते कसं दिसतं ? ते आपल्या जगात येण्याचा प्रयत्न का करतंय ? हे अजून तरी सांगता येणार नाही , पण सध्यातरी ते आपल्या जगात केवळ एका ऊर्जेच्या स्वरूपात आहे . सकारात्मक नक्कीच नाही . '' आदिनाथ .

'' सर , तुम्ही हे इतक्या ठामपणे कसं काय सांगू शकता ? '' शुभ्रा .

'' मी दोन वर्षांपूर्वी त्या वाड्यात गेलो होतो , तिकडे नक्की काय चाललंय ते बघायला , पण मलाही त्या जागेत काही विचित्र अनुभव आले . त्या वाड्यात जे काही होतं ते मला तळघरात बोलावण्याचा सतत प्रयत्न करत होतं . त्याला माझा भासही म्हणता आलं नसतं , कारण एकाच प्रकारचं स्वप्न सतत पडणं योगायोग नाही . '' आदिनाथ .

'' सर , हे कोणा माणसाचं काम पण असू शकतं ना , आय मीन एखाद्याच्या मनात भास वगैरे निर्माण करणं . '' शुभ्रा .

'' एक्झॅक्टली , मलाही आधी हेच वाटलं होतं पण त्या वाड्यात राहून माझी ही शंका पण दूर झाली . '' आदिनाथ .

'' म्हणजे ? '' शुभ्रा .

'' म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर , एखाद्या व्यक्तीच्या मनात भास निर्माण करायला आपल्याला एखाद्या माध्यमाची गरज असते . मग ते माध्यम काहीही असू शकतं . म्हणजे गोळ्या म्हणा , औषधं म्हणा किंवा अगदी सोप्यातलं-सोपं म्हणलं तर गोष्टी किंवा दंत कथा , पण त्या वाड्याशी संबंधित तसं काहीच माध्यम नाही . तुझं , माझं किंवा अनिकेतचं म्हणशील तर , आपल्याला माहीत होतं की त्या वाड्यात अगोदर मृत्यू झाले आहेत पण मग बाकीच्यांचं काय ? '' आदिनाथ .

शुभ्रा आदिनाथचं बोलणं ऐकत होती . वास्तविकता आणि कल्पनेतला फरक तिच्यासाठी मिटत चालला होता . आदिनाथच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याशिवाय तिला गत्यंतर नव्हतं . तिनेही त्या वाड्यात काहीतरी विचित्र अनुभवलंच होतं . नकळत का होईना ; पण तिला कोणाचंतरी अस्तित्व जाणवलं होतं . शुभ्राच्या विचारचक्रात कोणाच्यातरी आवाजाने खंड पडला .

'' येऊ का आत ? '' दारात डॉ पटवर्धन उभे होते .

'' तर मग गाठ पडली का दोघांची ? आदिनाथने तुला वाड्याबद्दल सांगितलं वाटतं ? '' डॉ पटवर्धन सोफ्यावर बसत म्हणाले .

'' सर , मी जेव्हा तुमच्याकडे आले होते तेव्हा तुम्ही मला का नाही सांगितलं की आदिनाथ सर इथेच आहेत ? '' शुभ्रा .

'' मला आदिनाथनेच तसं सांगितलं होतं . '' डॉ पटवर्धन .

'' हो , कारण मला तुझ्या मतांमध्ये ढवळाढवळ करायची नव्हती . मला बघायचं होतं , तुलाही तेच वाटतं का जे मला वाटलं होतं . जरी मी तुला सांगितलं असतं , तू माझ्यावर विश्वास ठेवला असता ह्याची शाश्वती नव्हती ; जरी ठेवला असता तर तुझ्या मनात पूर्वग्रह निर्माण झाला असता . '' आदिनाथ .

'' सर तुमचा विश्वास आहे ह्या सगळ्यावर ? '' शुभ्राने डॉ पटवर्धनांना विचारले .

'' विश्वास न ठेवायचं कारणंच नाही . ह्या केसने मला प्रत्येक शक्यतेचा विचार करायला भाग पाडलंय . जी गोष्ट आपल्याला माहीत नसते त्याचं अस्तित्वच नाही हे ठरवणं अयोग्य आहे . '' डॉ पटवर्धन .

'' हं . सर पण आता आपण पुढे काय करायचंय ? त्या वाड्यात नेमकं काय असेल आणि त्याला आपण कसं थांबवायचं ? '' शुभ्रा .

'' ह्याचाच विचार मी पण करतोय . त्या वाड्यात नेमकं काय आहे हे तर आपल्याला माहीत नाही , पण जर ह्या सगळ्या मृत्यूंचा आपण नीट विचार केला तर ह्या सगळ्यांमध्ये एका गोष्टीचं साम्य आहे , ती म्हणजे प्रत्येक वेळी एक जण त्या ऊर्जेच्या 'होस्ट' प्रमाणे वागत होता . म्हणजे पहिल्यांदा श्रीकांत वैद्य , नंतर सुजय फलटणकर आणि मग अजित साठे . ते त्या ऊर्जेच्या आवाक्यात आले असावेत . '' आदिनाथ .

'' म्हणजे मला जे अनुभव आले आहेत ते त्यांना देखील आले असतील ? पण मग असे अनुभव आल्यानंतर देखील त्यांचं वाड्यात थांबण्याचं कारण काय असावं ? '' शुभ्रा .

'' त्यांनाही असेच अनुभव आले असतील ह्या गोष्टीची मला खात्री आहे , पण कदाचित त्यांना हे सगळं प्रोसेस करायला किंवा त्याचा प्रतिकार करायला वेळ नसेल मिळाला . त्या फाईल मधल्या डेट्स एकदा बघितल्या तर कळेल की , श्रीकांत आणि शाल्मली वैद्यचा मृत्यू वाड्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झाला , सुजयचा मृत्युतर ज्या दिवशी तो वाड्यात आला त्याच दिवशी झाला , अजित साठे आणि त्याच्या परिवाराचा मृत्यू पण वाड्यात गेल्यानंतर आठवड्याभरातच झाला . '' आदिनाथ .

जसं-जसं आदिनाथ सांगत होता तसं-तसं शुभ्रा त्या डेट्स चेक करत होती . एक गोष्ट तिला खटकली आणि ती म्हणाली - '' सर , ह्यात आणखीन एक गोष्ट साम्य आहे ती म्हणजे ह्या सगळ्यांचा मृत्यू अमावास्येच्या दिवशी झाला आहे . '' शुभ्रा .

'' हो , पण ह्या दोन गोष्टी सोडल्या तर आपल्याला काहीच माहीत नाही . '' डॉ पटवर्धन .

'' एक मार्ग आहे , त्या वाड्यात जे काही आहे , त्याची पुढची शिकार मी असणार आहे हे तर स्पष्टच झालं आहे , मी जर तिथे परत गेले तर आपल्या हाती नक्की काहीतरी लागेल . '' शुभ्रा .

'' तू म्हणतीये ते बरोबर आहे पण तिथे तुझ्या जीवाला धोका आहे . तिथे काय असेल किंवा ते काय करू शकतं ह्याची पुसटशी पण कल्पना आपल्याला नाहीये . '' आदिनाथ .

'' हो पण जर त्याला काही करायचं असतं तर आत्तापर्यंत केलंच असतं आणि जर माझा अंदाज खरा असेल तर ते अमावास्येच्या आधी काहीच करणार नाही . '' शुभ्रा .

***********************************

वाड्यातली हवा थंड पडत चालली होती . तळघरातला कोंदटपणा वाढत चालला होता . तळघराचं दार उघडंच होतं . त्या तळघरात जीवघेण्या अंधाराव्यतिरिक्त आणखीन काहीतरी होतं . त्या अंधारात त्याचे लाल बुंद , आग ओकणारे डोळे स्पष्ट दिसत होते . त्याचं सावज त्याच्या कचाट्यातून सुटलं होतं . 'ते' आता चवताळलं होतं . ते निखारे ओकणारे डोळे तळघराच्या दरवाज्याजवळ येत होते . 'ते' आता तळघराच्या बाहेर आलं होतं . आपल्या जळजळत्या नजरेचा कटाक्ष सर्वत्र टाकत 'ते' एक सारखं गुरगुरत होतं . 'ते' वाड्यात अनिर्बंधपणे फिरत होतं . वाड्याचा कोपरा न कोपरा त्याच्या काळ्या सावटाखाली होता . 'ते' एक हिडीस हास्य करत पुन्हा तळघराच्या दिशेने निघालं . त्याला त्याच्या सावजाची चाहूल लागली होती . त्याची काळी आकृती तळघराच्या अंधारात नाहीशी झाली . शुभ्रा वाड्यात परत आली होती . त्याला आता फक्त अमावास्येपर्यंत वाट बघायची होती .

***********************************

शुभ्रा वाड्यात परत आली होती . वाड्याचं दार उघडंच होतं . एक कुबट वास वाड्यात पसरला होता . आत पाऊल ठेवताच एका अनामिक भीतीने तिच्या अंगावर काटा आला . वाड्यातील सर्व काही अजून तसंच होतं , स्तब्ध . त्या स्तब्ध वातावरणात तिला कोणाच्यातरी हालचालींची अपेक्षा होती का ? त्या जीवघेण्या शांततेत तिला कसलासा आवाज कानावर पडावा असं वाटत होतं का ? तसं जर झालंच असतं तर तिने काय केलं असतं , हे तिचं तिलाही माहीत नव्हतं , पण वाड्यात ती एकटी नाही हे तिने केव्हाच स्वीकारल होतं .

शुभ्रा पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेली . तिथे जाताच तिचं लक्ष तळघराच्या दारावर गेलं . दार सताड उघडंच होतं . त्या अंधारात बघायची देखील तिची हिम्मत होत नव्हती . तिने लगेचच तळघराचं दार बंद केलं .

बराच वेळ शुभ्रा तिच्या खोलीतच बसून होती . ती कसला तरी विचार करत होती . एकाएकी वातावरणातला गारवा वाढू लागला . शुभ्राला मात्र इतक्या थंडीतही घाम फुटला होता . तिने आजूबाजूला बघितलं पण तिथे कोणीच नव्हतं . हा भास होता का ? तिला कळत नव्हतं ; पण आपल्या व्यतिरिक्त खोलीत आणखीन कोणीतरी आहे ह्याची पुसटशी जाणीव तिला झाली होती . ती त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू लागली , पण तिला सतत असं वाटत होतं की कोणीतरी तिच्यावर नजर ठेवून आहे .





2 दिवसांनंतर .......

आदिनाथ हॉल मध्ये बसला होता . तो कसल्यातरी टेंशनमध्ये होता . दर 2 मिनिटांनी तो फोन चेक करत होता . गेले दोन दिवस त्याचा शुभ्राशी काहीच संपर्कही झाला नव्हता . वाड्यात तिला एकटीला पाठवून चूक तर केली नाही ना ,असं त्याला राहून-राहून वाटत होतं . एकदा वाड्यावर जाऊन यावं असं त्याने ठरवलं . काहीवेळातच तो वाड्यावर पोहोचला . वाड्याचं दार उघडं बघून त्याला जरा आश्चर्यच वाटलं . तो वाड्यात गेला .

आत मध्ये सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं पण त्याला शुभ्रा कुठेच दिसत नव्हती . तो तिला वाड्यात सगळीकडे शोधत होता पण तिचा कुठेच थांगपत्ता नव्हता . तो परत जाणार , इतक्यात त्याला काहीतरी आठवलं आणि तो पळतच त्या तळघराकडे गेला . तळघराचं दार देखील उघडंच होतं . त्या अंधारात त्याला काहीच दिसत नव्हतं . त्या तळघरात जायची त्याची अजिबात इच्छा नव्हती , पण शुभ्रा तळघरात असेल , ही शक्यता नाकारता येत नव्हती .

तो बॅटरीच्या प्रकाशात , संथ पावलं टाकत तळघराच्या पायऱ्या उतरू लागला . तळघरात पूर्ण अंधार असल्यामुळे काहीच दिसत नव्हतं . बॅटरीच्या प्रकाशात काय जो भाग दिसत होता तेवढाच . शेवटच्या पायरीवर पाय ठेवताच एक थंड वाऱ्याची झुळूक त्याच्या सर्वांगावर शहारे आणून गेली .

तो तळघरात सगळीकडे शुभ्राला शोधत होता . बॅटरीच्या प्रकाशाचं वलय जसं-जसं पुढे सरकत होतं , तसं-तसं तेवढा भाग नजरेस पडत होता . ते वलय तळघराच्या एका कोपऱ्यात येऊन थांबलं . शुभ्रा तळघराच्या एका कोपऱ्यात डोळे मिटून बसली होती . तिच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते . बॅटरीचा प्रकाश पडताच तिच्या चेहऱ्यावर तणावाच्या काही रेषा उमटल्या . कदाचित आदिनाथचं तिथं येणं तिला आवडलं नसावं .

आदिनाथसाठी हे अनपेक्षित होतं . त्याला थोडं विचित्र वाटलं .

'' शुभ्रा , इथे काय करतीयेस तू ? चाल माझ्यासोबत . '' तो तिला उठवत म्हणाला .

तिने त्याला काहीच उत्तर न देता त्याचा हात झटकून दिला . त्याने तिला पुन्हा एकदा उठवण्याचा प्रयत्न केला . ह्यावेळी मात्र शुभ्राच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव स्पष्ट दिसू लागले . तिचा निर्विकार चेहरा क्षणात रागाने लाल झाला . ती झटक्यात उठून उभी राहिली . ती आदिनाथकडे जळजळीत नजरेने बघत होती .

ती शुभ्रा नसून दुसरंच कोणीतरी होतं . तिची जळती नजर अजूनही आदिनाथवर स्थिर होती , पण ती त्याला काहीच करत नव्हती . ती पुन्हा त्या कोपऱ्यात जाऊन बसली .

आदिनाथला शुभ्राचं वागणं फार विचित्र वाटत होतं . त्याने पुन्हा एकदा तिला हाक मारली . ह्यावेळी मात्र शुभ्रा पार संतापली . तिचे डोळे बघता-बघता लाल बुंद झाले , तिने रागातच बाजूला असलेला सुरा उचलला . ती त्या सुऱ्याने आदिनाथवर वर करणार इतक्यात त्याने तिचा हात पकडला आणि जोरात उद्गारला - '' काय करतीयेस शुभ्रा ! भानावर ये . ''

आदिनाथच्या बोलण्याचा शुभ्रावर काय प्रभाव पडला असेल माहीत नाही ; पण एक विजेचा झटका बसल्या सारखी ती थोडं मागे सरकली . तिचे इतकावेळ लाल बुंद झालेले डोळे आता पूर्वस्थितीला आले होते . तिचा चेहरा पूर्ण घामाने भरला होता . काय चाललंय ते तिचं तिलाही कळात नव्हतं . ती भिरभिरत्या नजरेने इकडे तिकडे बघत होती . ती तळघरात आहे हे तिला समजायला काही वेळ जावा लागला . सवतःला तळघरात पाहून ती खूप घाबरली होती . तिचे हात पाय थरथरत होते .

ती कापऱ्या आवाजात म्हणाली - '' मी इथे कशी आले . मी नाही थांबणार इथे , ते आहे तिथे , माझ्याकडेच बघतंय . '' तिने एका कोपऱ्याकडे बोट दाखवलं .

'' कोण आहे तिथे ? '' ती जिथे बोट करत होती त्या दिशेला आदिनाथ बघत म्हणाला .

'' तू इथून चाल आधी . '' आदिनाथ खेचतच तळघराबाहेर घेऊन आला . तो क्षणाचाही विलंब न करता तिला वाड्याबाहेर घेऊन आला . शुभ्राला अजूनही भेदरलेल्या अवस्थेत बघून तो काही न बोलताच तिला त्याचा घरी घेऊन गेला .

शुभ्रा आणि आदिनाथ वाड्याबाहेर जाताच 'ते' तळघराबाहेर आलं . 'ते' एकटंच वाड्यात फिरत होतं . सावज हातातून सुटल्याचा राग अजिबात त्याच्या डोळ्यात दिसत नव्हता . एक वेगळीच चमक त्याच्या डोळ्यात होती . त्याला आता ह्या सगळ्याची मजा येऊ लागली होती . एक हिडीस हास्य करत ते पुन्हा तळघरातल्या अंधारात नाहीसं झालं .

शुभ्रा अजूनही घाबरलेलीच होती . ती जाऊन सोफ्यावर बसली . आदिनाथने तिला प्यायला पाणी दिलं . थोडावेळ हॉलमध्ये शांतता पसरली होती . थोड्यावेळाने शुभ्रा थोडीशी नॉर्मल झाली .

'' आता सांग पहिल्यापासून काय झालं ते . '' आदिनाथ .

'' सर , मी वाड्यावर परत गेले , तेव्हा रात्रीपर्यंत सगळं नॉर्मलच होतं . मध्यरात्री मला जाग आली . मी खोलीत एकटी नव्हते . खोलीत जरी कोणी दिसत नसलं तरी तिथे कोणीतरी होतं . त्याचे अदृश्य डोळे एकटक माझ्याकडे बघत होते . 'ते' खोलीतच कुठेतरी होतं . कुठल्यातरी अंधाऱ्या कोपऱ्यात दबा धरून बसलं होतं . बऱ्याच वेळा 'ते' माझ्या अगदी जवळ आलं . त्याच्या गरम , कुबट श्वासाचे उसासे मला जाणवत होते . रात्री खूप प्रयत्न केल्या नंतर मला झोप लागली पण... ''

'' पण काय ? '' आदिनाथ .

'' पण मग मला ते स्वप्न पुन्हा पडलं . तिसऱ्यांदा . पहिल्या दोन स्वप्नात मला त्याच्या आणि माझ्या अस्तित्वातील फरक जाणवत होता . त्याच्या नजरेतूनच मी स्वतःला बघत होते , पण त्या तिसऱ्या स्वप्नात मी पूर्णपणे त्याच्या आवाक्यात होते . मला माझं स्वतःचं अतित्वच जाणवत नव्हतं . भोवतालचं जग मला लाल रंगाचा मुलामा दिल्या सारखं वाटत होतं . त्या अमानवीय वातावरणात राहणं मला आवडू लागलं होतं . मी त्याच तळघरात होते .

कोणाचीतरी चाहूल लागली आणि मी वाड्याच्या दिवाणखान्यात आले . दिवाणखान्यात मला एक मानवी आकृती दिसत होत्या . तिच्या धडधडणाऱ्या हृदयाचा आवाज मला स्पष्टपणे ऐकू येत होता . पहिल्यांदाच कोणालातरी बघून मनात तुच्छतेची भावना निर्माण होत होती . ती आकृती जागीच स्तब्ध होत्या . मला तिचा चेहरा दिसत नव्हता , म्हणून मी तिच्या जवळ गेले तर , आकृती तुमची होती ! हा फरक मी आत्ता सांगू शकत असले , तरी तेव्हा ती आकृती बघून एकच जाणीव मला होत होती . समोर सावज उभं आहे असं मला जाणवत होतं , पण मी काहीच केलं नाही , कारण मला माहीत होतं की, मला अमावस्येपर्यंत वाट बघायची आहे . मी तेव्हा पूर्ण त्याच्या अधीन झाले होते . त्याला जाणवणाऱ्या सगळ्या भावना मला जाणवत होत्या , पण हे सगळं कुठेतरी माझ्या स्वप्नांच्याच पातळीवर चालू होतं पण काल ते सगळं खऱ्या जगात सुद्धा घडू लागलं . '' शुभ्रा

'' म्हणजे ? '' आदिनाथ .

'' काल , सकाळी मला त्याचा आवाज ऐकू येऊ लागला . 'ते' तिथेच कुठेतरी आजूबाजूला होतं . एखाद्या हिंस्त्र श्वापदासारखं सतत गुरगुरत होतं . मधनंच त्याच्या हिडीस हास्याने काळजात धस्स होत होतं . मी तुम्हाला फोन लावायचा बराच प्रयत्न केला पण तुमचा फोन बंद होता . थोड्यावेळाने त्याचं ते गुरगुरणं थांबलं पण ते तेवढ्यापुरतं . थोड्यावेळाने तोच खेळ पुन्हा सुरु झाला . त्याच्या गुरगुरण्याचा आवाज मधनंच लांब जायचा तर मधनंच कानाच्या अगदी जवळ ऐकू येत होता . त्याचं ते कुचकट हास्य मला सहन होत नव्हतं .

मी दिवाणखान्याच्या एक कोपऱ्यात बघितलं तर तिथे मला 'ते' दिसलं . 'ते' हळूहळू माझ्या समोर येऊन उभं राहिलं . त्याचे लाल , निखारे ओकणारे डोळे , काळीज चिरत होते . 'ते' कधी सरपटत तर कधी उड्या मारत माझ्या दिशेने येत होतं . त्याची अमानवीय आकृती , आकृती नाहीच , तो नुसता कळा धूर होता आणि त्यात ते दोन लाल डोळे .

एका क्षणासाठी समोर दिसत होतं तर दुसऱ्याच क्षणी हवेत विरून जात होतं . 'ते' माझ्या आजूबाजूला घिरट्या घालत होतं . कधी दोन पाऊलं मागे जायचं तर कधी झेप घेऊन अंगावर यायचं . त्या काळ्या धुरात 'त्याचा' वासलेला जबडा स्पष्ट दिसत होता . त्यातून कसलातरी चिकट द्रव जमिनीवर पडत होता . त्याच्या त्या अणुकुचीदार नखांचा जमिनीवर होणार आवाज कानठळ्या बसवत होता .

त्याच्या त्या लाल डोळ्यांनी माझा वेध घेतला . क्षणात समोरचं सगळं धूसर दिसू लागलं . स्वप्नात दिसणारी चित्रं आता डोळ्यासमोरून वेगात फिरू लागली . समोरचं सगळं हळू-हळू रक्तवर्णीय दिसू लागलं . मला समजत होतं की 'ते' माझ्यावर वर्चस्व साध्य करण्याचा प्रयत करतंय . हे कळत असूनही मला त्याचा प्रतिकार करता येत नव्हता . त्याच्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव मला माझ्या मनामध्ये , हृदयात , नसांमध्ये वाहतांना स्पष्ट जाणवत होता पण मला काहीच करता येत नव्हतं . थोड्यावेळाने ते सगळं बंद झालं . पण तोपर्यंत मी पूर्ण त्याच्या सावटाखाली होते .

मला समोरचं सगळं जग त्याच्या नजरेतून दिसत होतं , मला स्वतःच्या नाही ; तर त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत होती . मी मग कधी त्या तळघरात जाऊन बसले माझं मलाच कळालं नाही . तुम्ही जेव्हा तळघरात आलात , तेव्हा पण मला ते समजत होतं , पण एक तुच्छतेची भावना मनात येत होती . त्याने तोपर्यंत पूर्णपणे माझ्यावर ताबा मिळवला होता . मी कशी भानावर आले ते मला माहीत नाही , पण जर तेव्हा मी भानावर आले नसते तर काय झालं असतं ते माझं मलाही माहीत नाही . '' शुभ्रा .

सगळं सांगता-सांगता शुभ्राचे डोळे नकळत मोठे झाले होते . चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती . ती अजूनही धक्क्यात होती . ती आता पुढे काही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हती . आदिनाथने तिला झोपेची गोळी दिली आणि थोडावेळ आराम राम करायला सांगितलं . गेले 2 दिवस तिची तसंही नीट झोप झालीच नव्हती .

जाग आली तेव्हा तिला थोडंफार बरं वाटत होतं . गेल्या 2 दिवसात घडलेल्या घटनांचा तिला थोडाफार विसर पडला होता . तिने समोर बघितलं तर आदिनाथ कसलीतरी फाईल वाचत बसला होता . त्याने समोर बरेच कागद मांडून ठेवले होते .

'' हे काय करताय सर ? '' शुभ्रा .

'' तू कधी उठलीस ? ......... मी , वसंतवाडीच्या केसची फाईल बघत होतो . '' आदिनाथ .

'' काही सापडलं का ? '' शुभ्रा .

'' बरंच काही सापडलंय , असं म्हणू शकतेस . '' आदिनाथ .

''म्हणजे ? '' शुभ्रा .

“म्हणजे त्या वाड्यात काय आहे त्याचा अंदाज मला आला आहे पण .... '' आदिनाथ .

'' पण काय ? '' शुभ्रा .

'' काही नाही . शुभ्रा , तू इथे आल्यापासून काय काय घडलं ते मला सविस्तर सांग . '' आदिनाथ .

आदिनाथचं म्हणणं ऐकून शुभ्रा जरा चकितच झाली . ती आदिनाथला वडगावला आल्यापासून काय काय घडलं ते सविस्तर सांगू लागली . तिचं वडगावला येणं , वाडा बघून येणं , वाड्यात आलेला विचित्र अनुभव , ते विचित्र स्वप्न , अगदी सगळं .

'' हं , म्हणजे माझा अंदाज बरोबर होता . '' शुभ्राचं बोलणं ऐकून आदिनाथ म्हणाला .

'' म्हणजे ? '' शुभ्रा .

'' म्हणजे त्या वाड्यात काय आहे , त्याचा साधारण अंदाज मला आला आहे . '' आदिनाथ .

'' सर , नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला ? '' शुभ्रा .

'' म्हणजे त्या वाड्यात जे काही आहे ते माणसाच्या मनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतंय . मी इतके दिवस विचार करत होतो , त्या वाड्यात असं काही माध्यम आहे का ज्याच्या मदतीने ते हे सगळं करतंय ? - . पण नाही तो अख्खा वाडा आणि तो परिसर हेच त्याचं माध्यम आहे . त्या वाड्यात सगळीकडे त्याचा प्रभाव आहे आणि ते तळघर म्हणजे त्याच्या ऊर्जेचं स्रोत आहे . तळघरात गेलेल्या प्रत्येकाच्या मनात ते अगदी सफाईने आपलं अस्तित्व उमटवतंय . '' आदिनाथ .

'' हे कसं शक्य आहे ! '' शुभ्रा .

'' तू जेव्हा वाडीवर गेली तेव्हा तुला विचित्र अनुभव आला , बरोबर ? त्यानंतर तुला चित्रविचित्र स्वप्न पडू लागली आणि मग तुला हळूहळू खऱ्या जगात त्याच्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागली आणि मग काल सकाळी 'ते' तुला दिसलं . बरोबर ना ? '' आदिनाथ .

'' हं '' शुभ्रा .

'' मला जे सांगायचंय ते आता नीट ऐक . आपल्या मेंदूचे पाच भाग असतात - frontal lobe , parietal lobe , temporal lobe , occipitial lobe आणि cerebellum . हे पाचही भाग आपल्या पाच वेगवेगळ्या इंद्रियांचं नियंत्रण करतात . ह्या व्यतिरिक्त आपल्याला एक सहावं इंद्रिय असतं ज्याला आपण '6th scence' असं म्हणतो .

एखाद्या व्यक्तीच्या मनावर पूर्णपणे नियंत्रण करण्यासाठी , ह्या पाचही भागांवर नियंत्रण करावं लागतं . ह्या सगळ्यापैकी आपलं सहवा इंद्रिय आपल्या सुप्त मनाचा ( subconcious mind ) भाग असतो . त्याच्याचमुळे आपल्याला आपल्या आजूबाजूला होणारे बदल जाणवतात , एखाद्या अनाहूत संकटाची चाहूल आपल्याला अगोदरच लागते . आपल्या सुप्त मनावर नियंत्रण करणं सगळ्यात सोपं असतं ! कारण त्या मनाला कसलाच दृश्यमान पुरावा लागत नाही . त्यामुळेच तुला पहिल्याच दिवशी वाड्याजवळ एका ऊर्जेचं अस्तित्व जाणवलं .
ही फक्त सुरुवात होती . ह्या सगळ्याला तुझ्या तळघरात जाण्याने आणखीनच वेग मिळाला . तू तळघरात गेल्यानंतर त्याने तुझ्या सुप्त मनावरची त्याची पकड अजूनच घट्ट केली . तुला एकाच प्रकारचे स्वप्न पुन्हापुन्हा पडू लागले पण तुला त्याचा प्रतिकार करता येत नव्हता .

बाकी इंद्रियांपैकी स्पर्श आणि आवाज ऐकण्याची क्षमता , हे सगळ्यात तीव्र असतात . सहाव्या इंद्रियावर एकदा नियंत्रण आलं की मग ह्या दोन इंद्रियांवर नियंत्रण करणं अगदी सोपं होऊन जातं . म्हणूनच तुला त्याचा आवाज देखील ऐकू येऊ लागला .

'occupitial lobe' वर नियंत्रण मिळवणं सगळ्यात अवघड असतं . माणसाला सहजासहजी समोरच्या दृष्या ऐवजी दुसरं एखादं दृश्य दाखवणं शक्य नाही , पण शेवटच्या इंद्रियावर एकदा नियंत्रण मिळवलं तर हे सहज शक्य आहे ज्याला आपण मेडिकल टर्म मध्ये 'hallucinations' असे म्हणतो . माणसाच्या मनात भास निर्माण करणं हा संमोहनाचा शेवटचा टप्पा असतो .

आपण हे सगळं जर एका ओळीत बसवलं तर सगळ्यात आधी तुला चित्रविचित्र स्वप्न पडू लागली , नंतर तुला त्याचं अस्तित्व जाणवलं आणि मग शेवटी तुला 'ते' दिसलं सुद्धा . म्हणजे ........ '' आदिनाथ .

'' म्हणजे आता त्याचं माझ्यावर पूर्णपणे नियंत्रण आहे . बरोबर ना ? '' शुभ्रा .

'' हं .... पण ... '' आदिनाथ .

'' पण काय ? '' शुभ्रा .

'' हे जर तुझ्या बाबतीत घडतंय आणि इतरांच्या बाबतीत घडलं असेल , तर मग माझ्या बाबतीत का नाही घडलं ? मीही त्या वाड्यात गेलोच होतो . '' आदिनाथ .

हॉल मध्ये थोडावेळ शांतता पसरली . थोडा विचार करून शुभ्रा पुढे म्हणाली - '' सर तुम्ही म्हणाला होता की पहिल्यांदा तुम्ही त्या तळघरात गेला नाहीत . ह्या सगळ्याचा संबंध देखील त्या तळघराशीच आहे . आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या वाड्याचा भूतकाळ जाणून घेतल्यावरच मिळतील . आपण अण्णांशी बोलूयात . त्यांना नक्कीच काहीतरी माहीत असेल ''

दोघं क्षणाचाही विलंब न करता अण्णांच्या वाड्यावर गेले . घडलेला सगळा प्रकार त्यांनी अण्णांना सांगितला . सगळं ऐकून अण्णांचा चेहरा मात्र निर्विकारच होता . कदाचित त्यांना हे अपेक्षितच होतं .

'' तुला सांगितलं होतं , त्या वाड्यात जाऊ नकोस , चांगली जागा नाहीये ती ! सावंतांनाही बऱ्याचवेळा सांगितलं होतं , तिथे काही सापडणार नाही , पण त्यांनी पण माझं ऐकलं नाही . '' अण्णा .

'' म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून माहीत होतं , त्या वाड्यात काय आहे ते . '' आदिनाथ .

अण्णांनी मानेनेच होकार दिला . शुभ्रा आणि आदिनाथ , अण्णांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन होते .

शेवटी अण्णा एक उसासा सोडून बोलू लागले –

'' तो वाडा खरंतर माझा नाहीच . म्हणजे कागदो-पत्री जरी तो माझ्या नावावर असला तरी , तो माझ्या वडिलोपार्जित संपत्तीचा भाग नाही . वसंतवाडी , माझ्या वडिलांच्या मित्राची , म्हणजे वसंतराव आपट्यांची होती . त्या काळातील वडगावचं मोठं प्रस्थ . वसंतरावांचं कुटुंब तसं छोटंसच , पत्नी आणि एक मुलगा . त्यांचा मुलगा माझ्याच वयाचा होता पण थोडा वेडसर होता .

1971 साली , वसंतरावांनी त्यांच्या पडीक जमिनीवर तो वाडा बांधला . वाडा तसा मोठा नाही , पण सुरेख होता . बाबांचं आणि वसंतरावाचं सारखं एकमेकांकडे जाणं असायचं . बऱ्याचदा मी त्यांच्याबरोबर त्या वाड्यात गेलो होतो पण का कोणास ठाऊक , मला तो वाडा थोडा विचित्रच वाटायचा , त्या वाड्यात जायची माझी फारशी कधीच इच्छा झाली नाही . वाड्याच्या आवारात खेळायला भरपूर जागा होती , तरी वसंतरावांचा मुलगा मात्र वाड्याच्या तळघरात बसून असायचा , तळघरात काहीतरी आहे असं सतत सांगायचा पण त्याच्याकडे फारसं कोणीच लक्ष दिलं नाही .
एके दिवशी एकाएकी त्याचा तळघरात गूढरीत्या मृत्यू झाला . तो गेल्यानंतर काळ चक्र वेगात फिरू लागलं . वाड्यात लोकांना चित्रविचित्र भास होऊ लागले . वसंतरावांच्या पत्नीचा देखील एकेदिवशी असाच मृत्यू झाला .

न राहवून वसंतरावांनी अप्पांना निरोप धाडला . अप्पांना पंचक्रोशीत मान होता . अनेक वर्ष अभ्यास करून कमावलेल्या विद्येचा वापर ते लोकांच्या भल्यासाठी करीत असत . अप्पांना वाड्यात पाऊल ठेवताक्षणी कसल्यातरी अनाहूत संकटाची चाहूल लागली .
बरेच दिवस अप्पा , वसंतराव आणि माझे बाबा त्या वाड्यात होते . त्या दरम्यान वाड्यात काय घडलं हे कोणालाच माहीत नाही आणि मीही कधी ते जाणून घायचा प्रयत्न केला नाही . अप्पांनी 'ते' जे काही होतं त्याला तळघरात बंदिस्त केलं पण वसंतरावांना ते वाचवू शकले नाहीत वसंतरावांनी जाता-जाता तो वाडा बाबांच्या नावावर केला आणि आजच्या तारखेला तो माझ्या नावावर आहे . ''

अण्णांनी सांगितलेली हकीकत ऐकून आदिनाथ आणि शुभ्रा बराच वेळ शांतच होते . कदाचित आत्तापर्यंत घडलेल्या घटनांची जुळवाजुळव ते करत असावेत .

'' अण्णा तुम्हाला जर सगळं माहीत होतं , तर तुम्ही वाडा विकायचा निर्णय का घेतला ? ह्या बद्दल तुम्ही कोणालाच काहीच का नाही सांगितलंत ? '' आदिनाथ .

'' तो वाडा म्हणजे एक अमंगल वास्तू आहे . तो मला माझ्या नावावर पण नको होता . म्हणूनच मिळेल त्या किमतीत तो वाडा विकायला मी तयार होतो . हे मी सावंतांना सांगितलं होतं पण त्यांचा ह्या गोष्टींवर विश्वास नाही , हे सांगून त्यांचा माझ्यावरचा संशय अजूनच वाढला असावा . वाड्यात आलेल्या लोकांचे मृत्यू व्हायला लागले तेव्हा मी ठरवलं की आता परत तिथे कोणालाच जाऊ देणार नाही .
हे सगळं कोणालाच माहीत नव्हतं अशातला भाग नाही . माझा एक नोकर महादू , त्याला जेव्हा मी हे सगळं सांगितलं तेव्हा तो मला म्हणाला , अशा गोष्टींमधलं थोडं फार ज्ञान त्याला आहे . मी त्याला अडवायचा खूप प्रयत्न केला पण तो शेवटी तो त्या तळघरात गेलाच . त्याला 'त्याच्या' शक्तीचा अंदाज नव्हता . त्याला देखील त्याचा जीव गमवावा लागला . अनिकेतने जेव्हा वाड्यात राहायची इच्छा बोलून दाखवली तेव्हा पण मी त्याला सगळी हकीकत सांगितली पण त्याने देखील माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं . '' अण्णा .

'' पण आता त्या वाड्यात पुन्हा 'ते' अनिर्बंधपणे फिरतंय . त्याची पुढची शिकार शुभ्रा आहे . आपण काहीतरी करायला हवं . '' आदिनाथ .

'' तुम्हाला असं वाटतं का मला हे सुचलं नसेल ? गेले बरेच वर्ष मी अप्पांना शोधण्याचा प्रयत्न करत होतो ; पण त्यांचा कुठेच थांगपत्ता नव्हता . मी ठरवलं की आता त्या वाड्यात कोणालाच जाऊ देणार नाही , पण मग शुभ्रा त्या वाड्यात राहायला गेली . माझ्या मनाला हुरहूर लागली होती , म्हणून गेल्या काही दिवसात पुन्हा अप्पांना शोधण्याचा प्रयत्न केला . सुदैवाने मला त्यांचा नंबर मिळाला . फोन केला तर समजलं , ते इहलोकात नाहीत . 4 वर्षांपूर्वीच त्यांचं निधन झालं . '' अण्णा .

हे ऐकून सगळ्यांचीच पार निराशा झाली होती . आशेचा शेवटचा सूर्य देखील अस्त झाला होता . आता वाड्यात शुभ्राच्या जीवाला धोका होता . अण्णांनी , शुभ्रा आणि आदिनाथ , दोघांनाही त्यांच्या वाड्यात राहायचा आग्रह केला . त्यांनीही फार आढे-वेढे न घेता अण्णांचं निमंत्रण स्वीकारलं . पुढे काय करावं हे कोणालाच सुचत नव्हतं .

***********************************

सकाळी अण्णांच्या वाड्यात सगळीकडे गोंधळ चालू होता . जो-तो वाड्यात शुभ्राला शोधत होता . तिचा कुठेच पत्ता नव्हता , ती नेमकी गेली कुठे , हाच प्रश्न सगळ्यांना पडला होता .

इकडे शुभ्रा एकटीच रस्त्यावरून चालत होती . भोवतालचं भान तिला राहिलं नव्हतं . नजर कुठेतरी शून्यात गढली होती . सम्मोहित झाल्यासारखी ती त्या वाड्याच्या दिशेने जात होती . ती कसलाच विचार न करता वाड्यात गेली . ती जर भानावर असती तर कधीच त्या वाड्यात गेली नसती . ती सरळ तळघराच्या दिशेने जाऊ लागली . ती तळघराचं दार उघडून आत पाऊल ठेवणार , इतक्यात कसलासा झटका बसून ती भानावर आली .

तिला समजायला काही क्षण गेले की ती त्याच वाड्यात आणि त्याच तळघराबाहेर उभी आहे . तळघराचं दार उघडं बघून ती दचकली . तिच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला होता . ती तिथे कशी पोहोचली ह्याचाच विचार ती करत होती . इतक्यात तळघराच्या अंधारात काहीतरी चमकलं . 'ते' हळूहळू वर येत होतं . शुभ्रा दचकून दोन पाऊलं मागे सरकली . ती लगबगीने वाड्याबाहेर जायला धावली पण समोर दारात तेच उभं होतं . शुभ्रा त्याच ठिकाणी स्थिर उभी होती . भीतीने तिच्या सर्वांगाचा थरकाप उडाला होता . त्याच्या गुरगुरण्याचा आवाज सतत कानावर पडत होता .

शुभ्राला आता पुढे काय होणार ह्याची भीती वाटत होती . तिला पुन्हा-पुन्हा त्या एकाच खेळाचा भाग व्हायचा कंटाळा आला होता . तिला पुन्हा तिच्यात आणि त्याच्यात होणाऱ्या , अस्तित्वाचं वर्चस्व सिद्ध करणाऱ्या खेळात भाग घायचा नव्हता . तिला माहीत होतं , ती त्याच्याबरोबर कधीच जिंकू शकणार नाही . तिला आता हे सगळं नको-नकोसं वाटत होतं . त्याला जर फक्त तिच्यावर नियंत्रण मिळवायचं असतं तर ते त्याने मगाशीच केलं असतं पण नाही . त्याने तिला पूर्णपणे शुद्धीत येऊ दिलं . त्या दोन अस्तित्वांमधल्या वर्चस्व सिद्ध करणाऱ्या युद्धात , त्याला तिच्या मनाची तडफड होतांना बघायची होती , तिचा स्वतःच अस्तित्व जपून ठेवणारा निरर्थक प्रयास बघायचा होता , तिच्या मनाच्या होणाऱ्या झटापटीची जणू तो खिल्लीच उडवत होता . शुभ्राला आज पहिल्यांदा पूर्णपणे हतबल झाल्यासारखं वाटत होतं , प्रथमच तिला मानवीय मनाच्या दुर्बलतेची किळस वाटत होती .
तिला त्या खेळात पुन्हा झुंजायचं नव्हतं . तिने त्याला कसलाच प्रतिसाद न देता त्याचं वर्चस्व स्वीकारलं होतं . ती तशीच तिथे डोळे मिटून उभी राहिली . आता जे काही करायचं होतं ते त्यालाच करायचं होतं .

एकाएकी तो गुरगुरण्याचा आवाज बंद झाला . शुभ्राचे डोळे अजूनही मिटलेच होते . तिच्या नकळत तिला कोणीतरी वाड्याबाहेर खेचत होतं . तिने डोळे उघडून समोर बघितलं तर समोर साधारण 30 शीतला एक माणूस होता . त्याला बघून नकळत तिच्या तोंडातून 'श्रेयस अग्निहोत्री' असे शब्द बाहेर पडले . तो तिला वाड्याबाहेर घेऊन आला . बाहेर असलेल्या कार मध्ये त्याने तिला बसवलं .

ती अजूनही भेदरलेल्या मनःस्थितीतच होती . त्याने तिला प्यायला पाणी दिलं .

'' are you ok ? miss .... ? '' तो म्हणाला .

'' शुभ्रा कुलकर्णी . i am ok '' थरथरत्या आवाजात शुभ्राने उत्तर दिलं .

'' मी डॉ श्रेयस अग्निहोत्री '' तो पुढे बोलला .

'' ओळखते मी तुम्हाला . '' तिचा आवाज अजूनही कापराचा येत होता .

'' आपण सरपोतदारांच्या वाड्यावर जाऊन बोलूयात '' श्रेयस .

शुभ्राने फक्त होकारार्थी मान हलवली .

डॉ श्रेयस अग्निहोत्री हे पॅरासायकॉलॉजीच्या क्षेत्रातलं मोठं नाव . फार कमी वयात त्याने ह्या क्षेत्रातल्या नामवंत लोकांमध्ये आपलं नाव जोडलं होतं . श्रेयसने अमेरिकेत शिक्षण पूर्ण करून तो तिथेच स्थायिक झाला . शुभ्राने , आदिनाथकडून बऱ्याचदा श्रेयसचं नाव ऐकलं होतं . श्रेयस कॉन्फरन्स साठी लंडनला गेला होता तेव्हा तिची आणि त्याची भेट देखील झाली होती , पण आज पुन्हा त्याला वसंतवाडीत भेटणं तिच्यासाठी अनपेक्षितंच होतं .

***********************************

इकडे अण्णांच्या वाड्यावर सगळे शुभ्राला शोधात होते . शेवटी अण्णा आणि आदिनाथ वसंतवाडीला जायला निघाले पण तेवढ्यात शुभ्रा आणि श्रेयस तिथे आले . श्रेयसला बघून आदिनाथ अगदी अचंबित झाला होता . सगळ्यांच्याच मनात अनेक प्रश्न घर करून बसले होते . दोघंही वाड्यात आले . घडलेला सगळा प्रकार श्रेयसने सांगितला . सगळं ऐकून अण्णा आणि आदिनाथच्या कपाळावर आठ्या आल्या . असलं काहीतरी घडेल ह्याची त्यांना अपेक्षाच नव्हती . आदिनाथला त्याहून जास्त आश्चर्य श्रेयसला बघून झालं होतं .

'' श्रेयस , तू इथे कसा काय ? '' न राहवून आदिनाथने विचारलं .

'' मी आजोबांचं राहिलेलं काम पूर्ण करायला आलोय '' श्रेयस .

'' म्हणजे ? मला काही कळालं नाही ...... '' आदिनाथ .

'' एक मिनिट , म्हणजे तुम्ही अप्पा अग्निहोत्र्यांचे नातू , बरोबर ? आपलं फोनवर बोलणं झालं होतं . '' आदिनाथचं बोलणं अर्धवट तोडत अण्णा म्हणाले .

'' हो , बरोबर ओळखलंत , मी अप्पांचा नातू . '' श्रेयस.

शुभ्रा आणि आदिनाथ , त्या दोघांचं बोलणं आ वासून ऐकत होते . हे सगळं आता फार गुंतागुंतीचं झालं होतं .

श्रेयसने , आदिनाथ आणि शुभ्राची परिस्थिती समजून घेत , तणाव कमी करण्यासाठी हसूनच बोलला - '' आता सगळं इथेच बोलत बसायचं का ? आत्ताच तर आलोय , थोडं फ्रेश होऊन मग बोलूया . तुम्हाला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तर मी आलोय . ''

'' हो चालेल . तुम्ही फ्रेश होऊन या. रघु तुम्हाला खोलीत घेऊन जाईल '' अण्णा .

'' अण्णा प्लीज , मला आहो-जाहो करू नका . मी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे . मला नुसतं श्रेयस म्हणलं तरी चालेल . in fact , everyone just call me shreyas . '' एक कटाक्ष प्रत्येकावर टाकत तो म्हणाला .

सगळे फ्रेश व्हायला आपआपल्या खोलीत गेले . शुभ्राच्या मनात मात्र असंख्य प्रश्नांमुळे आणि भीतीमुळे काहूर मजलं होतं . त्या वाड्याचा विचार जरी मनात आला तरी तिच्या अंगावर काटा येत होता . सकाळी जर श्रेयस आला नसता तर काय झालं असतं ह्याचा विचारही तिला करवत नव्हता . तिचं मन कितपत तिच्या स्वतःच्या नियंत्रणात राहिलं होतं , हेही आता ती सांगू शकत नव्हती . जरी सगळ्यांसमोर ती काहीच दाखवत नसली तरी , ती आतून खूप घाबरलेली होती . सकाळसारखा प्रसंग अजून कितीदा घडेल ? कितीदा आपल्याला त्या खेळात झुंजल्यानंतर हार पत्करावी लागेल ? कितीदा त्याचं वर्चस्व स्वीकारावं लागेल ? आणि हे सगळं आताच इतकं भयानक रूप घेत असेल तर मग अमावसेला नक्की काय होईल , त्याचा परिणाम काय होईल ह्याचाच विचार ती करत होती .

'' शुभ्रा... '' श्रेयस खोलीच्या दारात उभा होता .

'' तू आज त्या वाड्यात कशी काय गेलीस ह्याचाच विचार करत आहेस ना ? फार विचार करू नकोस . हे घे . आजोबांनी अभिमंत्रित केलेल्या धाग्यांपैकी आहे . उजव्या मनगटावर बांध ; पुन्हा सकाळसारखा प्रसंग येणार नाही . '' श्रेयस शुभ्राला एक लाल दोरा देत म्हणाला .

शुभ्राला थोडं आश्चर्य वाटलं . तिला थोडं हसू देखील आलं .

'' श्रेयस डॉ असून हे असे धागे-दोरे वगैरे देतोय . '' ती मनातल्या मनात म्हणाली .

'' म्हणलं ना फार विचार करू नकोस . तो धागा बांध आणि लवकर खाली ये . '' श्रेयस .

थोड्यावेळाने सगळे खाली जमले .

'' श्रेयस , आता सगळं सविस्तर सांग . '' आदिनाथ .

'' सांगतो . तर तुम्हाला माहितीच आहे की मी आजोबांचं काम पूर्ण करायला आलोय . अण्णा , आपलं ह्या विषयी फोनवर बोलणं झालं होतं . '' श्रेयस .

अण्णांनी होकारार्थी मान हलवली .

'' 4 वर्षांपूर्वी आजोबा गेले तेव्हा जाता-जाता ही कामगिरी माझ्यावर सोपवून गेले . त्यांना माहीत होतं , आज न उद्या असा प्रसंग येणारच . 'ते' फार काळ वाड्यात बंदिस्त राहणार नाही . '' श्रेयस .

'' मग आता त्याला परत त्या तळघरात बंदिस्त करायचं का ? '' अण्णा .

'' ते आता शक्य नाही . '' श्रेयस.

'' म्हणजे ? '' अण्णा .

'' म्हणजे इतके वर्ष 'ते' तळघरात बंद होतं . इतके वर्ष त्याने वाट बघितली होती . 'ते' आता चवताळलंय . 8 जणांना त्याने आपलं सावज देखील बनवलंय . त्याची ताकत कित्येक पटीने वाढली आहे त्यामुळे त्याला बंदिस्त करणं आता शक्य नाही . आपल्याला ह्यावेळी त्याला संपवावंच लागेल . '' श्रेयस .

'' हो पण जे काम अप्पा करू शकले नाहीत ते आपण कसं करणार ? '' अण्णा .

'' अण्णा , आजोबा त्यावेळी 'त्याला' संपवू शकले नाहीत , त्यांनी फक्त त्याला कैद केलं , हे सत्य आहे पण हे केवळ अर्धसत्य आहे . त्यावेळी नेमकं काय झालं ते मी तुम्हाला सांगतो .

आजोबांना वाड्यावर जाताच समजलं होतं , वाड्यात अमानवीय शक्तीचा वावर आहे . त्यांनी वाड्यात राहून वाड्याचे नकाशे बनवून घेतले . वाड्याच्या रचनेचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला तेव्हा त्यांना समजलं की ,वाड्याची रचना चुकीच्या पद्धतीची आहे . ह्या चुकीच्या रचनेमुळे वाड्यात सकारात्मक ऊर्जेचा नसून नकारात्मक ऊर्जेचा वावर आहे ., आणि ह्या ऊर्जेचं स्रोत म्हणजे ते तळघर . आपल्या आजूबाजूला होणारे भौतिक बदल आपल्याला जरी जाणवत नसले तरी ते सतत होतच असतात . बऱ्याचवेळा सामान्य माणसांचं लक्षसुद्धा अशा गोष्टींकडे जात नाही .
आता जगात बऱ्याच ठिकाणी रचनेच्या चुकांमुळे आपल्याला चित्रविचित्र घटना घडतांना आढळून येतात पण ते तिथपर्यंतच मर्यादित असतं . मी बऱ्याच केसेस अशा देखील पहिल्या आहेत ज्यांच्यामध्ये माणूस अजाणतेपणे , एका वेगळ्याच जगाचा दरवाजा उघडतो ज्याला आपण सायंस मध्ये 'warm hole' असं म्हणतो . हे दरवाजे नकळतपणे उघडले गेल्यामुळे , आजूबाजूच्या परिसरात आपल्याला त्याचा प्रभाव जाणवतो आणि सामान्य माणसाला साहजिकपणे हा भूतबाधेचा प्रकार वाटतो . '' श्रेयस .

'' अरे पण हे कसं शक्य आहे ? ज्या गोष्टींच्या थिअरीज सुद्धा अजून सिद्ध करता आल्या नाहीत , ज्या गोष्टींचे फॉर्मुलेसुद्धा आपल्याकडे तयार नाहीत , त्या गोष्टी घडतात असं तू म्हणतोस ! '' आदिनाथ .

'' हे बघ ह्या गोष्टी आपल्यासाठी नवीन असतील , आपण अजून त्यांच्या मुळापर्यंत पोहचू शकलो नाही , म्हणून असं तर नाही होत ना की त्या घडूच शकत नाहीत .

आता सोपं उदाहरण बघ ना पाषाण युगात , माणसाला कुठे माहीत होतं की दोन वस्तू एकमेकांवर घासल्यावर आग निर्माण होते . तू म्हणतोयेस तसं त्या लोकांना ह्या गोष्टीची थोडीतरी कल्पना असेल का की , प्राणवायूच्या (oxygen) उपस्थितीत एखाद्या इंधनाचे जर दोन किंवा अधिक अणू (atoms) जेव्हा अंतर्गत कंपामुळे विलग होतात तेव्हा ते एका अस्थिर वायूच्या रूपात बाहेर पडतात आणि ह्यालाच आपण अग्नी असे म्हणतो . नाही ना . मग तेव्हा त्यांना हे माहीत नव्हतं म्हणून काय जंगलांमध्ये आगी लागत नव्हत्या का ? ज्वालामुखीचा उद्रेक होत नव्हता का ?

आपल्याला एखादी गोष्ट माहीत नाही किंवा आपल्याला तिचा प्रतिकार करता येत नाही म्हणून ती गोष्ट घडतच नाही , असा कयास करणं मूर्खपणाच नाही का ? आणि ह्या गोष्टी आपल्यासाठी आत्ता नवीन असल्यातरी आपल्या पुराणांमध्ये ह्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे . telepathy , prevision , time travel , mind reading , warm hole सारख्या बऱ्याचशा गोष्टींचा संदर्भ आपल्या दंतकथांमध्ये आहे . पुराणात ज्या ब्रह्मास्त्रांचा संबंध येतो त्याला आजकाल आपण अणू बॉम्ब असं नाही का म्हणत ? किंवा वायू रथाला , aeroplane हे नाव देणं चुकीचं नाही ठरणार . जर आपण ह्या सगळ्याचाफक्त दंतकथा किंवा पौराणिक कथा , ह्या पलीकडे जाऊन विचार केला तर , हाच निष्कर्ष निघतो की ,त्या काळातला मानव तंत्रज्ञानात आजच्यापेक्षाही जास्त विकसित होता , पण कदाचित मानव ह्या सगळ्यासाठी अयोग्य असावा , म्हणूनच एकाएकी हे ज्ञान नष्ट झालं .
असो . मी ह्यातला काही जाणकार नाही किंवा मला ह्याच्या खोलात जायचं नाही . आजोबा असते तर , त्यांनी नक्कीच हे सगळं सविस्तर आणि सोप्या पद्धतीने सांगितलं असतं . '' श्रेयस .

एक उसासा सोडून श्रेयस परत बोलू लागला - '' तर मी 'warm hole' बद्दल सांगत होतो . त्या वाड्यात नकारात्मक ऊर्जेच्या स्रोतामुळे तळघरात नकळतपणे अवकाश काळाचा एखादा दरवाजा तयार झाला असावा, पण हे इतक्या सहज आणि नकळतपणे घडलं की सामान्य लोकांच्या ते लक्षात देखील आलं नसावं . ह्या गोष्टीचा परिणाम म्हणून फारफार तर काही विचित्र घटना घडल्या असतील इतकंच , पण हा जो दरवाजा आहे त्याच्या दुसऱ्या टोकाला जे काही होतं ते इकडे येण्यासाठी तडफडत होतं . त्याला ह्या जगात येण्यासाठी एका माध्यमाची गरज होती . त्याला ते माध्यम वसंतरावांच्या मुलाच्या रूपात मिळालं असावं .
तो थोडा वेडसर होता बरोबर ? अशा लोकांना आजूबाजूला होणारे अमानवीय बदल पटकन लक्षात येतात . म्हणूनच तो 'त्याची' पहिली शिकार ठरला . आजोबांनी मला सांगितल्या प्रमाणे हे सगळं अमावस्येच्या दिवशी घडलं . त्यांच्या मते ही साधी नसून 50 वर्षातून एकदाच येणारी आमावस्या असावी . ह्या दरम्यान सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा ह्या दोन्ही त्यांच्या टोकाला असतात . त्या तळघराची चुकीची रचना , ती अमावस्या आणि तो दरवाजा ( warm hole ) , ह्या सगळ्या घटकांना उत्प्रेरक ठरला वसंतरावांचा मुलगा . त्याचा बळी घेऊन 'ते' ह्या वाड्यात ऊर्जेच्या स्वरूपात वावरू लागलं . मग त्याने वसंतरावांच्या पत्नीचा देखील बळी घेतला .

आजोबांना हे समजेपर्यंत वसंतराव त्याची पुढची शिकार ठरले . आजोबांनी 'त्याला' तळघरात बंदिस्त केलं . त्यांच्या मते ‘त्याचा’ निर्माण ज्या अमावस्येला झाला त्याच अमावस्येला ‘त्याला’ संपवणं शक्य आहे तोपर्यंत ते तळघराच्या बाहेर पडायला नको होतं . आजोबांच्याच सांगण्यावरून वसंतरावांनी तो वाडा अण्णांच्या वडिलांच्या नावावर केला जेणेकरून पुढच्या अमावस्येपर्यंत 'ते' बाहेर पडू नये ; पण अण्णांनी तो वाडा विकायला काढला आणि ते तळघर पुन्हा उघडलं गेलं . असो . त्यावेळी आजोबांनी त्याला कैद केलं पण त्यासाठी वसंतरावांना त्यांचा जीव गमवावा लागला . बरेच वर्ष आजोबा माझ्याबरोबर अमेरिकेतच होते . तेव्हा त्यांनी मला ह्या प्रकरणाबद्दल सांगितलं . त्यांची प्रकृती खालावत चालली होती , हे जाणून त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली . ''

''पण जर 'ते' ह्या जगात पूर्ण स्वरूपात नाहीच , तर त्याने इतक्या सगळ्यांचे बळी घेतलेच कसे ? तेही इतक्या सफाईने ? '' आदिनाथ .

'' त्याला गरजच नाही त्यासाठी ह्या जगात यायची ! 'ते' माणसाच्या मनावर नियंत्रण मिळवणं जाणतो , आदिनाथ . एखाद्या त्या व्यक्तीच्या मनावर ताबा मिळवला की मग ती व्यक्ती त्याच्या अधीन होते . ह्या जगात सगळंच ऊर्जेपासून निर्माण झालंय , काही सकारात्मक ऊर्जेपासून तर काही नकारात्मक ऊर्जेपासून , मग त्यात आपणही मोडतो . ह्या ऊर्जेचा वापर कुठल्याही पद्धतीने केला जाऊ शकतो .
आपण ठरवलं तर आपल्यात असलेल्या ऊर्जेचा वापर बरंच काही साध्य करायला करू शकतो , पण आपल्या ऊर्जेच्या वापराला काही मर्यादा असतात . त्या मर्यादा आपल्या अवयवांमुळे , इंद्रियांमुळे , इतकंच नाही ; तर आपल्या शरीर रचनेमुळे देखील तयार होतात , पण त्याच्या ऊर्जेच्या साठ्याला काही मर्यादाच नाही . त्याचं शरीर फक्त ऊर्जेपासून बनलंय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही . एक अशी ऊर्जा जिला स्वतःचा मेंदू आहे पण त्यावर काही मर्यादा नाहीत . ती स्वतः विचार करू शकते पण तिच्यामते तिच्या व्यतिरिक्त बाकीच्यांचं अस्तित्वाला किंमत नाही . ती अशी ऊर्जा आहे जी फक्त समोरच्याला संपवणं जाणते . '' श्रेयस .

श्रेयसचं बोलणं सगळे चकित ऐकत होते . बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली होती पण त्याच बरोबर आणखीन नवे प्रश्न निर्माण झाले होते . आदिनाथ आणि शुभ्रासाठी तर हे फारंच विचित्र होतं .

त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव श्रेयसने ओळखले आणि पुढे बोलला - ''मला कळतंय हे तुमच्यासाठी फार विचित्र आहे . मी गेले 4 वर्ष कुठे होतो आणि आजोबांनी मला काय सांगितलं , हेच प्रश्न तुम्हाला पडले असतील , बरोबर ना ?’’

सगळ्यांनी फक्त माना डोलावल्या .

'' खरंतर मलाही ह्या गोष्टींचं आश्चर्य वाटायचं . आजोबा जे काही करतात त्याला काही तर्क आहे का , ह्याचाच विचार करायचो . पॅरासायकॉलॉजिस्ट झाल्यावर मला कळालं की , आपलं आणि त्यांचं क्षेत्र फार काही वेगळं नाही . आपण अमानवीय घटनांना तर्क लावायचा प्रयत्न करतो , पण ते ह्या गोष्टींना गृहीत धरूनच त्यांचा नायनाट लावायचा प्रयत्न करतात . हे समजायला मला वेळ लागला पण जेव्हा समजलं , तेव्हा त्यांच्याप्रती आदर अजूनच वाढला .
तसं बघायला गेलं तर आजोबांसारख्या लोकांची कामगिरी आपल्यापेक्षा फार मोठी आहे . एखाद्या आजाराच्या मुळापर्यंत जाऊन काय फायदा जर तो आपल्याला बराच करता आला नाही ? आजोबांनी जेव्हा ही जबाबदारी माझ्यावर सोपवली तेव्हा मीही घाबरलोच होतो , पण तेव्हा ते म्हणाले की ही माझ्या हातूनच पार पडावी हीच देवाची इच्छा असावी आणि ह्यासाठी मला स्वतःहून काहीच करावं लागणार नाही , वेळ आली की मार्ग मिळेलच '' श्रेयस .

'' मग आता पुढे काय करायचं ? '' आदिनाथ .

'' अरे सांगीन ना . इतकी काय घाई आहे . मला आधी थोडी तयारी करावी लागेल . तुम्ही सगळे एक जण काम करा , संध्याकाळी माझ्या खोलीत या . '' श्रेयस .

'' अरे , पण तोपर्यंत सकाळ सारखं काही घडलं तर ? '' आदिनाथ .

'' काही नाही होणार . शुभ्रा , तो धागा अजिबात हातातून काढू नकोस . '' श्रेयस .

'' हो , पण हे सगळं जर इतकं भयानक असेल , तर ह्या एका धाग्याने काय होईल ? म्हणजे मला काही हरकत नाही हा धागा घालायला , पण सहज मनात शंका आली म्हणून विचारलं . '' शुभ्रा मनगटावरच्या धाग्याला गोल-गोल फिरवत म्हणाली .

'' हा प्रश्न पडणं साहजिकच आहे . हा धागा साधारण नाहीये . हा अजोबांनी अभिमंत्रित करून ठेवलेल्या धाग्यांपैकी आहे . हा धागा जो कोणी बांधतो त्याच्या भोवती सकारात्मक ऊर्जेचं आवरण तयार होतं . तुला आठवतंय , मी सकाळी वाड्यात आलो होतो ? तेव्हा ह्याच धाग्यामुळे मला त्या वाड्यात एका अनाहूत संकटाची चाहूल लागली . '' स्वतःच्या मनगटावर बांधलेला धागा दाखवत श्रेयस म्हणाला .

'’बरं, ते सगळं आपण संध्याकाळी बोलू . आठवणीने 6 वाजता सगळे माझ्या खोलीत या . '' श्रेयस

दिवसभर सगळे आपापल्या खोलीतच होते . 6 च्या ठोक्याला सगळे श्रेयसच्या खोलीत गेले . खोलीत जाताच एक मोहक सुगंध सगळ्यांना आला . खोलीतलं वातावरण अगदी प्रसन्न वाटत होतं . खोलीच्या चारही कोपऱ्यांमध्ये सुगंधी धुप लावले होते . समोर भिंतीवर अप्पांचा फोटो लावला होता . अप्पांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज दिसत होतं . अप्पांच्या फोटोला बघून सगळ्यांचे हात नकळत जोडले गेले आणि सगळ्यांनी अप्पांच्या फोटोला नमस्कार केला .

श्रेयस टेबलवर बरेच कागद मांडून बसला होता . सगळे जण आत येताच त्याने कागद बाजूला ठेवले आणि त्यांच्या जवळ जाऊन बसला .

'' श्रेयस , काय करायचंय आपल्याला ? '' आदिनाथ .

'' हो सांगतो . आत्ता त्याचीच जुळवाजुळव करत होतो . 'त्याला' संपवणं इतकं सोपं नाहीये आणि म्हणूनच आपल्याला हे काम दोन टप्य्यांमध्ये करायचंय , आणि शुभ्रा , ह्या सगळ्यात तुझी भूमिका महत्वाची असणार आहे . मी आता जे सांगतोय ते नीट ऐका . मी जे सांगतोय ते प्रत्येकाला नीट कळालं पाहिजे कारण आपलं एक जरी पाऊल चुकीचं पडलं तर सगळ्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल . '' श्रेयस .

हे ऐकताच सगळ्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या .

'' आपल्याला माहीत आहे की 'ते' त्या वाड्यात ऊर्जेच्या स्वरूपात आहे . त्याचं पुढचं सावज शुभ्रा आहे , म्हणजे सध्या तरी तुझ्या मनावर त्याचा ताबा आहे आणि ह्याच गोष्टीचा उपयोग करून आपल्याला पूर्णपणे त्याला ह्या जगात आणायचंय . जोपर्यंत 'ते' पूर्णपणे ह्या जगात येत नाही म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जोपर्यंत ते भौतिकदृष्ट्या इथे येत नाही तोपर्यंत आपण त्याला संपवू शकत नाही . '' श्रेयस .

'' पण आपण हे कसं करणार ? '' शुभ्रा .

'' शुभ्रा , 'ते' आता फार काळ शांत बसणार नाही . एकदा नाहीतर अनेकदा तू त्याच्या तावडीतून सुटली आहेस . दोन दिवसात म्हणजे अमावास्येच्या दिवशी 'ते' नक्कीच काहीतरी करेल . त्या आधी आपल्याला पहिला टप्पा पूर्ण करायचा आहे . '' श्रेयस .

'' म्हणजे नेमकं काय करायचंय आपल्याला ? '' आदिनाथ .

'' आपल्याला 'त्याला' आपल्या जगात बोलवायचं आहे . त्यासाठी आपल्याला त्याचा प्रत्येत मार्ग बंद करायचा आहे, ज्याने तो शुभ्राला अप्रत्यक्षपणे मारण्याचा प्रयत्न करू शकतो . एकदा तो मार्ग बंद झाला तर त्याला इथे येण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही . शुभ्रा , आता पहिल्या टप्प्यात आपल्याला काय करायचंय ते मी तुला सांगतो . हे काम आपल्याला आज... आत्ताच पूर्ण करायचं आहे . '' श्रेयस .

शुभ्राने मानेनेच होकार दिला .

'' आज जे आपल्याला करायचं आहे , ते 'त्याला' इकडे बोलावण्याची पहिली पायरी असेल आणि दोन दिवसांनी आपल्याला काय करायचंय त्याचाही थोडाफार अंदाज तुला येईल . आज आपल्याला फक्त 'त्याचा' तुझ्या सुप्त मनावरचा कन्ट्रोल कमी करायचा आहे . आज मी तुझ्या सुप्त मनाला hypnotism च्या माध्यमातून त्या वाड्यात आणि मग त्या तळघरात पाठवणार आहे . '' श्रेयस .

'' पण त्याने काय होणार आहे ? '' आदिनाथ .

'' मी म्हटलं ना की आपल्याला दोन दिवसांनी जे करायचं आहे त्याची ही छोटी पायरी आहे . शुभ्रा एकाच वेळी मनाच्या प्रत्येक पातळीवर त्याचा सामना नाही करू शकणार . त्याची शक्ती अफाट आहे . '' श्रेयस .

'' शुभ्रा , मी तुला hypnotism च्या माध्यमातून त्या वाड्यात पाठवणार आहे . एकदा तू त्या वाड्यात गेलीस की , मग तुला त्या तळघरात जायचं आहे . एकदा तू तिथे गेलीस की , तुझ्या मनावर दोन जणांचा कन्ट्रोल असेल , एक 'त्याचा' आणि एक तुझा स्वतःचा . कदाचित ह्यावेळी तुला वाडा वेगळा भासेल , भयानक दृश्यं दिसतील . कदाचित तुला 'त्याचा' भुतकाळातले पण काही प्रसंग दिसतील पण तुला त्या तळघरातून आणि मग त्या वाड्यातून बाहेर यायचं आहे . 'ते' पूर्ण प्रयत्न करेल , तुला वाड्यातून बाहेर न पडू देण्याचा ! पण तुला बाहेर यायचंच आहे . एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेव , त्याने काहीही केलं तरी प्रत्यक्ष स्वरूपात सध्यातरी ते काहीच करू शकत नाही . एकदा तू त्या वाड्यातून बाहेर आली म्हणजे तुझ्या सुप्त मनावर पुन्हा तुझं स्वतःच वर्चस्व सिद्ध होईल आणि मग आपलं पुढचं काम सोपं होईल . तू तयार आहेस ना ? ''

'' हो , मी तयार आहे . '' शुभ्रा .

'' आदिनाथ , अण्णा तुम्ही दोघं थोडावेळ बाहेर थांबा . '' श्रेयस .

आदिनाथ आणि अण्णा बाहेर जाऊन बसले .

खोलीतलं वातावरण शांत होतं . श्रेयसने शुभ्राला हातातला धागा थोडावेळ काढायला सांगितला . ती एका खुर्चीवर डोळे मिटून बसली होती . वातावरणातल्या शांततेत फक्त श्रेयसचा आवाज येत होता .

'' शुभ्रा , आता तू त्या वाड्याजवळ जात आहेस . तुला वाडा दिसला का ? '' श्रेयस .

शुभ्राने होकारार्थी मान हलवली .

'' तू आता त्या वाड्यात जाणार आहेस . '' श्रेयस .

तिने पुन्हा मान हलवली .

हळूहळू श्रेयसचा आवाज कमी होत-होत बंद झाला . वातावरणात एक गूढ शांतता पसरली . शुभ्रा संथ पावलं टाकत वाड्याच्या दिशेने जात होती . आज तो वाडा फारच विचित्र भासत होता . शुभ्रा वाड्यात गेली , तेव्हा तिथे भयाण शांतता पसरली होती . ती हळूहळू तळघराच्या दिशेने जाऊ लागली . तळघराचं दार सताड उघडं होतं . ती दबक्या पावलांनी तळघरात जाऊ लागली . हृदयाचे ठोके विलक्षण वाढले होते . तळघरात आज अंधाराच्या ऐवजी मंद लाल प्रकाश पसरला होता . विलक्षण असं काहीच दिसत नव्हतं पण कोणीतरी आजूबाजूला असल्याची जाणीव शुभ्राला होत होती . तिने एकदा तळघरात सर्वत्र नजर फिरवली आणि परत जायला निघाली इतक्यात तिला गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला . तिने मागे वळून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं .

एकाएकी तिला तिचं डोकं जड पडल्यासारखं वाटू लागलं . समोरची दृश्यं क्षणाक्षणाला बदलू लागली . 'ते' पुन्हा तिच्या मनाचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होतं . हळूहळू समोरचं चित्र पूर्ण बदलू लागलं . तिला सगळं जग रक्तवर्णीय भासू लागलं . भोवतालचा देखावा बदलू लागला . तिने डोळे गच्च मिटून घेतले .

काहीवेळाने तो आवाज बंद झाला . तिने डोळे उघडून बघितलं तर , ती एका वेगळ्याच ठिकाणी होती . त्या ठिकाणी पूर्ण अंधार होता . अंधारात काहीच दिसत नव्हतं . हळूहळू त्या अंधारात एका ठिकाणी एक वलय तयार झालं . ती त्या वलयाच्या दिशेने जात होती . त्या वलयाच्या दुसऱ्या बाजूला एक तळघर होतं आणि तिथे एक मुलगा होता . तो कदाचित वसंतरावांचा मुलगा असावा . तो देखील त्या वलयाकडे चकित होऊन बघत होता . शुभ्राच्या चेहऱ्यावर त्याला बघून एक हिडीस हास्य पसरलं . ती हळूहळू त्या वलयाच्या दुसऱ्या बाजूला जात होती . शुभ्राला बघून तो मुलगा पार घाबरला होता . तो तळघराच्या बाहेर जायचा प्रयत्न करत होता पण इतक्यात शुभ्राने तिच्या अणुकुचीदार नखांने त्याच्यावर वार केला . तो तिथेच गतप्राण होऊन खाली पडला . शुभ्राला समजत होतं की ती जे काही बघतीये ते 'त्याच्या' दृष्टीतून बघतीये . ती त्याला प्रतिकार करायचा प्रयत्न करत होती पण सध्यातरी त्याचं वर्चस्व तिला प्रकर्षाने जाणवत होतं .

एकाएकी समोरचं दृश्य पुन्हा बदलू लागलं . आता शुभ्रा तळघरात नसून वाड्याच्या गच्चीवर होती . तिला सगळं रक्तवर्णीय दिसत होतं . समोर एक स्त्री उभी होती . ती कदाचित शाल्मली वैद्य असावी . ती शुभ्राला बघून खूप घाबरली होती . जसजशी शुभ्रा पुढे सरकत होती तसतशी ती मागे-मागे जात होती . एकाएकी तिचा तोल गेला आणि ती वाड्याच्या गच्चीवरून खाली पडली . तिला बघून शुभ्राच्या चेहऱ्यावर एक विकृत आनंद दिसत होता .

असेच तिला वाड्यात झालेला प्रत्येक मृत्यू त्याच्या नजरेतून दिसत होता .

ती त्या चक्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती पण तिला ते जमत नव्हतं . तिला श्रेयसचे शब्द आठवले - '' ते तुला प्रत्यक्षपणे काहीच करू शकत नाही . '' . शुभ्राने तसेच पुन्हा आपले डोळे मिटून घेतले . बराच वेळ ती तशीच डोळे बंद करून होती . काही वेळाने तिने डोळे उघडले तर ती तळघरातच होती . अजूनही गुरगुरण्याचा आवाज येतच होता . ती तळघराच्या बाहेर जायला धावली . कानावर एकसारखा आवाज येतच होता . ती तशीच तळघराच्या बाहेर आली . वाड्याबाहेर येताच ती दचकून जागी झाली . तिचा श्वास घेण्याचा वेग विलक्षण वाढला होता . हृदय जोरात धडधडत होतं . तिने आजूबाजूला बघितलं तर ती अजूनही खुर्चीत बसली होती . थोडावेळ ती तशीच बसून होती . श्रेयसने तिला तो धागा पुन्हा बांधायला सांगितला .

ती थोड्यावेळाने नॉर्मल झाल्यावर श्रेयसने विचारले - '' तू तिथे काय बघितलं , ते आता मला सविस्तर सांग . ''

शुभ्राने सगळं सविस्तर सांगितलं .

'' तुला आता कळालंच असेल , त्याला इथे बोलवणं सोपं काम नाही . ह्यावरून आपण अंदाज लावू शकतो की जे आधी झालं तेच पुढच्या अमावास्येला पण होणार . दरवेळी एक जण त्याच्या ऊर्जेचा होस्ट असतो आणि बाकीचे त्याचं सावज . ह्यावेळी तू त्याची होस्ट असणार आहेस आणि कदाचित आम्ही सगळे त्याचं सावज . असो . आजचं काम नीट पार पडलं पण ह्यापेक्षा महत्वाचं काम आपल्याला अमावास्येला करायचं आहे . '' श्रेयस .

***********************************

दुसऱ्या दिवशी सहजच शुभ्रा आणि आदिनाथ श्रेयसच्या खोलीत गेले . खोलीत देवांचे बरेच फोटो लावलेले होते . तो कसलंतरी पुस्तक वाचत होता . त्याच्या भोवती वेगवेगळ्या प्रकारचं सामान ठेवलेलं होतं .

'' या . '' श्रेयस त्या दोघांना बघून म्हणाला .

दोघंही खोलीत ठेवलेल्या वेगवेगळ्या वस्तूंकडे बघण्यात मग्न होते . टेबलवर ठेवलेल्या पाच गोष्टींकडे त्यांचं खास लक्ष गेलं . टेबलवर गंगाजल , थोडी सुपीक माती , 'सूर्याचं' चिह्न असलेलं लॉकेट , ' ॐ ' चं चिह्न असलेलं लॉकेट आणि कसलातरी अंगारा ठेवला होता .

'' हे सगळं काय आहे आणि कशासाठी ? '' शुभ्रा .

'' हे , हे त्याला संपवण्याचं सामान . '' श्रेयस अगदी सहजपणे म्हणाला .

'' ह्याने संपवणार आपण त्याला ? म्हणजे अशा भौतिक वस्तूंनी ? '' आदिनाथ .

'' हो , तू हॉरर मुव्हीज बघत नाही का ? '' श्रेयस हसून म्हणाला .

'' खरंच ह्या भौतिक गोष्टींमध्ये इतकी ताकत असते का ? '' आदिनाथ .

'' नाही . ताकत ह्या गोष्टींमध्ये नसते . ह्या फक्त सकारात्मक ऊर्जेच्या कंडक्टरचं काम करतात . '' श्रेयस .

'' म्हणजे ? '' शुभ्रा .

'' म्हणजे आपल्या मनातली जी पॉझिटिव एनर्जी असते ती आपण ह्या भौतिक गोष्टींमध्ये चॅनलाइज करतो . ह्या टेबलवर ठेवलेल्या वस्तू पण असंच काहीसं काम करतात . हा अंगारा अभिमंत्रित केलेला आहे आणि ह्या बाकीच्या 4 गोष्टी म्हणजे पृथ्वीवरच्या जीवनाचे मूलभूत तत्वं . पाणी , भूमी , 'सूर्याचं' चिह्न असलेलं लॉकेट म्हणजे अग्नीचं स्वरूप , ' ॐ ' चिह्न असलेलं लॉकेट म्हणजे परिपूर्ण वास्तवाचं ( absolute reality ) प्रतीक , आणि हवा- ती तर सगळीकडेच असते . '' श्रेयस .

'' पण आपण ह्याचा वापर कसा करणार ? '' शुभ्रा .

'' ते मी सांगीन , पण आज नाही वेळ आल्यावर . '' श्रेयस .

***********************************

अमावास्येच्या रात्री ..............

रात्रीचे 9 वाजले होते . अमावास्येचा मुहूर्त सुरु झाला होता . शुभ्रा एकटीच वाड्याच्या दिवाणखान्यात बसली होती . वसंतवाडीच्या वाड्यात . आज तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता . एक वेगळीच चमक तिच्या डोळ्यात दिसत होती . घड्याळात 9 चा ठोका पडताच तिने हातातला दोरा काढून बाजूला ठेऊन दिला . पर्समधून तिने श्रेयसने दिलेले धूप बाहेर काढले आणि वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यात लावू लागली . प्रत्येकवेळी ती मागे वळून बघत होती . 'ते' तिथेच तिच्यावर लक्ष ठेवून आहे ह्याची तिला पुरेपूर जाण होती . तिने तळघराचं दार उघडलं . आतमध्ये काहीतरी चमकलं . ती त्याच्याकडे लक्ष न देता , सरळ दिवाणखान्यात जाऊन बसली . वाड्यातील वातावरण गूढ होत चाललं होतं . आता 'ते' तिच्या भोवती घिरट्या घालत होतं . मधेच त्याच्या गरम श्वासाचे उसासे तिला अगदी जवळ जाणवत होते . शुभ्रा तशीच सगळ्याकडे दुर्लक्ष करत डोळे मिटून बसली होती . सकाळचं बोलणं ती आठवत होती .

अमावास्येच्या सकाळी ..............

शुभ्रा , श्रेयस , आदिनाथ आणि अण्णा एकत्र बसले होते .

'' सगळे जण तयार आहात ना ? '' श्रेयस .

सगळ्यांनी होकार्थी मान हलवली .

'' आज रात्री 9 वाजता अमावास्येचा मुहूर्त सुरु होणार आहे . शुभ्रा , आज तुला त्या वाड्यात जायचं आहे . एकटीला . म्हणजे मी आणि आदिनाथ तिथे असू पण वाड्याबाहेर . वाड्यात तू एकटी असणं गरजेचं आहे . 9 चा ठोका पडताच तू हा हातातला धागा काढून ठेवायचा आणि मी दिलेले धूप वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यात लावायचे . पुढे काय करायचंय ते तेच करेल . फक्त एवढं लक्षात ठेव , ह्या जगात तो येईपर्यंत तो प्रत्यक्षपणे काहीच करू शकत नाही , म्हणूनच तोपर्यंत तू त्याच्या खेळाला बळी पडायचं नाही . 'ते' इथे आल्याचं मला माझ्या धाग्यामुळे कळेलच , पण मग लगेच तू तुझा धागा उजव्या मनगटावर पुन्हा बांधायचा . पुढे काय करायचंय ते मी सांगीन पण ह्या सगळ्यात कुठेच चूक होता कामा नये . '' श्रेयस .

अमावास्येच्या रात्री .........

आता शुभ्राला त्याचा आवाज ऐकू येऊ लागला होता . 'ते' सतत तिच्या आजूबाजूला गुरगुरत होतं . शुभ्रा तशीच डोळे मिटून बसली होती ती त्याला कसलाच प्रतिसाद देत नव्हती . तिनं एकदा डोळे उघडून बघितलं पण तिला कोणीच दिसलं नाही . ती तळघराच्या दिशेने जायला निघाली . तळघराच्या पायरीवर 'ते' तिला दिसलं पण ह्यावेळी ती घाबरली नाही . 'ते' विकट हास्य करत तळघराच्या अंधारात जाऊ लागलं . शुभ्रा देखील त्याच्या मागे-मागे जाऊ लागली . तळघरात काळोख तसाच होता पण त्या अंधारात , एका कोपऱ्यात ते लाल डोळे चमकत होते . ते लाल डोळे अंधारात तिच्या आजूबाजूला फिरत होते . एक दोनदा ते डोळे अगदी तिच्या जवळ येऊन गेले पण काहीच करू शकले नाही . शुभ्रा आता थोडी घाबरली होती . परत जायचा विचार तिच्या मनात येऊन गेला पण आता परत फिरणं मूर्खपणाचं ठरलं असतं . एकाएकी समोरचं दृश्य पुन्हा बदलू लागलं . कानावर हिडीस आवाज पडत होते . आता तिला समोर फक्त तेच दिसत होतं . तिने डोळे मिटून घेतले तरीही तिला त्याची अमानवीय आकृती दिसतंच होती , जणू ती तिच्या मनावर छापली गेली होती . तिला एक रेष दिसत होती . त्या रेषेच्या एकाबाजूला ती आणि दुसऱ्या बाजूला तिला 'ते' दिसत होतं . 'ते' त्या रेषेच्या ह्या बाजूला यायचा प्रयत्न करत होतं . रेषेच्या एका बाजूला शुभ्रा त्याचा प्रतिकार करत होती . ती रेषा शुभ्राच्या मनाला त्याच्या पासून विलग करणारी असावी . एका अप्रत्यक्ष पातळीवर शुभ्राचा 'त्याला' रेषेच्या दुसऱ्या बाजूला न येऊ देण्याचा संघर्ष सुरु होता . ती जिवाच्या आकांताने प्रयत्न करत होती . त्याला रेषेच्या एका बाजूला येऊ देणं सोपं होतं पण हेच 'त्याला' होतं . ती डोकं धरून खाली बसली . हृदयाची धडधड प्रचंड वेगाने चालू होती . त्याचा हिडीस आकार काही केल्या डोळ्यासमोरून जात नव्हता . ती त्याच्या खेळाला बळी पडणार इतक्यात तिला पुन्हा आठवलं - 'ते' जोपर्यंत इथे येत नाही , तुला प्रत्यक्षपणे काहीच करू शकत नाही . तुला , त्याला बाहेर आणायचंय . '' .

ती पुन्हा उठून उभी राहिली . थोड्यावेळाने तो आवाज बंद पडला . समोरचं दृश्य पुन्हा स्पष्ट दिसू लागलं . आता समोर 'ते' नव्हतं . तळघराच्या एका कोपऱ्यात प्रखर प्रकाशाचं वलय तयार झालं . त्या वलयातून 'ते' बाहेर आलं , त्याच्या खऱ्या स्वरूपात .

त्याचं शरीर म्हणजे नुसता काळा धूर होता आणि त्यातच ते दोन डोळे होते , जे शुभ्रावर खिळले होते . त्याच्या वासलेल्या जबड्यातून कसलातरी चिकट द्रव जमिनीवर पडत होता . त्याचे काळे , अणुकुचीदार नखं जणू शुभ्राचा वेध घायला तयारच होते . 'ते' सरपटत शुभ्राच्या दिशेने येत होतं . शुभ्राला कळून चुकलं होतं की 'ते' आलंय . ती तो धागा परत बांधण्यासाठी शोधू लागली . तो धागा वरच्या टेबलवर राहिला आहे , हे तिला समजे पर्यंत , 'ते' तिच्या अगदी जवळ आलं होतं . ती तशीच तळघराच्या बाहेर जायला धावली . ती शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचणारच होती इतक्यात , त्याच्या टोकदार नखांचा वार तिच्या हातावर झाला . ती एकाएकी खाली पडली . वार एकदम खोलवर झाला होता , पण तिला त्याची चिंता नव्हती . तिला 'ते' हळू-हळू तिच्या दिशेने येतांना दिसत होतं .

वाड्याबाहेर ............

श्रेयसच्या मनगटावरचा धागा गडद लाल झाला होता .

तो आदिनाथला म्हणाला - '' 'ते' आलंय , आपल्याला आता आत जावं लागेल . ''

'ते' शुभ्राच्या आणखीन जवळ येत होतं , तेवढ्यात तळघरात श्रेयस आणि आदिनाथ आले . श्रेयसने आपल्या हातातला अंगारा कसले तरी मंत्र पुटपुटत त्याच्यावर फेकला , तसं 'ते' अंगावर जळते निखारे पडल्या सारखं मागे सरकलं , इतक्या वेळात श्रेयसने त्याच्या भोवती अंगाऱ्याचं रिंगण आखलं . 'ते' त्या रिंगणात एखाद्या बंदिस्त केलेल्या जनावरासारखं घुसमटत होतं . रिंगणात घिरट्या घालत , गुरगुरत होतं . 'ते' निरंतर रिंगणाबाहेर यायचा प्रयत्न करत होतं .

'' हे फार वेळ बंदिस्त राहणार नाही . '' म्हणत श्रेयसने त्याच्या बॅगमधून गंगाजल , सुपीक माती , 'सूर्य' आणि 'ॐ' चं चिह्न असलेले लॉकेट बाहेर काढले .

'' हे म्हणजे पृथ्वीवरच्या सकारात्मक ऊर्जेचे स्वरूप . आपल्याला ह्याला ह्या ऊर्जेच्या अधीन करायचं आहे . मी आता काही मंत्र म्हणीन , त्या नंतर मी इशारा करताच ह्या सगळ्यांची आहूती एकाचवेळी द्यायची . '' तो पुढे बोलला .

श्रेयस एक सारखा मंत्र पुटपुटत होता . 'ते' आणखीनच चवताळत चाललं होतं . मंत्रोच्चारण संपताच आखलेल्या रिंगणाने पेट घेतला . श्रेयसने इशारा करताच दोघांनीही त्या वस्तूंची आहूती त्या आगीत दिली . एकाएकी त्या रिंगणात मोठा स्फोट झाला . दोन क्षणांसाठी तळघर प्रकाशाने उजळून निघालं . काही वेळाने सगळं पूर्वस्थितीत आलं . त्या रिंगणात आता फक्त राख उरली होती . 'ते' कायमचं संपलं होतं .

दुसऱ्यादिवशी ..................

'' तुमच्या तिघांचे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत . '' अण्णा .

'' आमचे आभार मानायची काहीच गरज नाहीए अण्णा . आभार मानायचे असतील तर मनोमन आजोबांचे माना आणि हो आ, ता तो वाडा लवकरात लवकर पाडून टाका . ती वास्तू अमंगलच आहे . मग तुम्हाला त्या जमिनीचं काय करायचं आहे ते तुम्ही करू शकता '' श्रेयस .

'' चालेल तू म्हणतोयेस तसंच करीन , पण एक बरं झालं आता मी सावंतांना खरोखर सांगायला मोकळा की तिथे आता काहीच सापडणार नाही . '' अण्णा हसत म्हणाले .

*समाप्त*

इतर रसदार पर्याय