चौपाडी - एक भूक! - ०३ Khushi Dhoke..️️️ द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चौपाडी - एक भूक! - ०३

आतापर्यंत आपण बघीतले,

चौपाडी प्रथेमुळे भावरुपाने सहन केलेल्या शारीरिक यातना तिने दित्या आणि हजुरआमा समोर जिवाच्या आकांताने मांडल्या होत्या. त्या ऐकून दित्याने उद्गमची विल्हेवाट लावायची युक्ती सुचवली होती!

आता पुढे!

सायंकाळी ०६:०० च्या सुमारास!

"दित्या बाळा चल, चौपाडी जायचं आहे." शेजार पाजारच्यांना आवाज जाईल इतक्या मोठ्याने भावरूपा ओरडून म्हणाली.

"हो आमा." दित्या बाहेर पडली आणि भावरूपाच्या हातात हात घालून चौपाडीच्या दिशेने निघाली.

तांड्यात गर्दी जमली आणि समूहात कुजबुज सुरू झाली. त्या समूहात एका व्यक्तीची त्या दोघींवर नजर होतीच!

दित्याला चौपाडीवर सोडून देत भावरूपा घरी परतली.

रात्री ११:०० वाजता!

काळ्या रंगाची शाल फक्त डोळे उघडे राहतील अशी अंगाला गुंडाळून एक व्यक्ती चौपाडीच्या दिशेने निघाला. चौपाडीपासून काहीच अंतरावर उभं राहून त्याने आजूबाजूला नजर टाकत सर्व काही सुरळीत असल्याची शहानिशा केली आणि चौपाडीच्या दिशेने धाव घेतली.

चौपाडी आत प्रवेश करणारंच की, त्याच्यावर मागून कोणी तरी हल्ला चढवला! लोखंडी रॉड डोक्यात घालत त्याला जखमी करण्यात आले. एकावर एक सपासप वार करत त्याच्या डोक्याला पूर्ण ठेचून त्याचा खून करण्यात आला!

चौपाडी बाहेरून ऐकू येणाऱ्या आवाजाने दित्या बाहेर पडली आणि समोरचे दृश्य पाहून जागीच कोसळली. मागून हजुरआमा पळतंच आली आणि दित्याला सावरत त्यांनी तिला शुद्धीवर आणले! शुद्धीवर येत दित्या, हजुरआमाला बिलगत मोठ्याने रडू लागली.

"आमा, तू हे काय केलंस? अग आपण त्याला पोलिसांच्या ताब्यात देणार होतो ना! तू त्याला जिवाने का संपवलंस?" रडतंच तिने भावरूपाला प्रश्न केला.

"हे काय केलंस पोरी? तांड्यात जर हे माहीत झालं तर आपलं काय?" हजुरआमाने घाबरतंच विचारले.

"आजवर उद्गमने केलेल्या हत्यांचे रहस्य उलगडले का? मग या खूनाचा उलगडा ही आपण होऊ द्यायचा नाही! तसं ही उद्गम सोबत मला जुने हिशोब पूर्ण करायचेच होते!"

"कसले हिशोब?" दित्या आणि हजुरआमा दोघींनी एकमेकींकडे डोळे विस्फारून बघीतले!

"खूनाचा बदला!"

"काय? खूनाचा बदला!"

"हो, माझ्या नवऱ्याचा खून!"

"काय? बत्सलचा खून! पण, तो तर एका अपघातात मारला गेला होता ना?" हजुरआमाने गोंधळून विचारले.

"नाही आमा, उद्गमने त्याची हत्या घडवून आणली होती!"

"पण का?" हजुरआमाने रडतंच विचारले.

"कारण त्याला मी हवे होते!"

"काय!" हजुरआमा आणि दित्या दोघींच्या भुवया उंचावल्या.

"हो!"

"पण….!" प्रश्नार्थक नजरेने भावरूपाकडे बघत दोघी एकत्र आश्चर्याने उद्गारल्या.

"सर्व सांगते……!" भावरूपाने मोठा श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली.

"आमा, ज्यावेळी यांचे काम गेले; त्यावेळी उद्गमने दित्याच्या बुबांना काम मिळवून दिले होते. तेव्हापासून बत्सलकडे काही तरी काम काढून तो घरी यायचा. असेच दिवस जात होते. एक दिवस मी चौपाडीवर असताना उद्गमने बळजबरीने माझा उपभोग घेतला. मी विरोध केला तर संपूर्ण तांड्यात आपली बदनामी करून आपल्याला हाकलून लावेन अशी धमकी त्याने दिली. तेव्हा मी शांत बसले. एक वर्ष असेच सुरू राहिले. अचानक एक दिवस बत्सलने उद्गमला चौपाडीवर मी असता रंगेहाथ पकडले! रागात येत तो उद्गमवर धावून आला. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यात हरामखोर उद्गमने त्याचा जीव घेतला. मी तक्रार केल्यास आपल्या पुर्ण कुटुंबाला तो असाच संपवेल अशी धमकी त्याने दिली! मी बत्सलला गमावले होतेच; पण, तुम्हाला गमवावे लागू नये म्हणून निमूटपणे आजवर मी हे सर्व सहन केले. दिवस गेले आणि उद्गमची भूक वाढतंच गेली. गाम्म्या सारख्या कितीतरी मुलींना त्याने स्वतःच्या हावापायी गिळले! मला सर्व काही माहीत असून मी शांत बसले. पण आता नाही! यावेळी गोष्ट माझ्या दित्याची होती! इतक्या वर्षांपासून सहन करत असलेल्या यातनांचा मला आज शेवट करायचाच होता."

"आमा!" दित्याने भावरूपाला कवटाळले आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

"आमा, दिवस उजाडण्याआत आपल्याला उद्गमची विल्हेवाट लावावीच लागेल!" हातातल्या रॉडची पकड मजबूत करत भावरूपा हजुरआमांना उद्देशून म्हणाली.

"हो, चल! याला मागे घेऊन जाऊया!"

भावरुपाने केलेल्या गुन्ह्याचे पुरावे मिटविण्यात त्या दोघी यशस्वी होऊ शकतील का? बघूया पुढील भागात!
.
.
.
.
क्रमशः

© खुशाली ढोके.