वेगळा - भाग ४ Nisha G. द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वेगळा - भाग ४

भाग  - ४

नेहमी प्रमाणे बाबू शाळेत अशोकला भेटत होता , आणि कधी कधी तो त्याची इच्छा नसताना देखील अशोक सोबत डोंगरावर जाई, त्याला कळत नसे हे दोघ इतक्या लांब येऊन का भेटतात ते पण चोरून काय गरज असेल , आणि मुळात मला लांब का बसवतात , एकदा बाबू असाच अशोक सोबत गेला असताना बराच वेळ अशोक आणि सरिता बोलत बसले होते , बाबुला बसून बसून पाठीला रग लागली म्हणून तो उठला त्याने त्याचे दोन्ही हात वर ताणून धरले आणि त्याच वरच शरीर उजव्या बाजूला ताणल आणि अचानक त्याच लक्ष अशोक आणि सरिता कडे गेल , आणि पाहतो तर काय अशोक आणि सरिता एकमेकांना मिठी मारून बसले होते , त्याने लगेच त्याची नजर फिरवली , का जाणे त्याला आपण काहीतरी चुकीच पाहिलं म्हणून अपराध्या सारख वाटायला लागल , तो तसाच सुन्न अवस्थेत बसून राहिला , आणि काही वेळातच अशोक ची पाठीवर पडलेली थाप पडताच भानावर आला.

“चल निघू” अस म्हणत अशोक बाबूची उठण्याची हि वाट न बघता चालू लागला.

बराच अंतर चालल्या नंतर अशोक च्या लक्षात आल , बाबू आपल्या सोबत चालत नाहीये , त्याने खुणेनेच बाबुला काय झाल म्हणून विचारल , पण बाबू गप्प, काहीही बोलला नाही,

शेवटी जेव्हा त्याच घर जवळ आल तेव्हा अशोकने त्याला न राहवून पुन्हा विचारलच, “काय रे, गप्प का आहेस , येताना तर बरा होता”

“अशोक , मला पुन्हा कधीही तुझ्या सोबत यायला सांगू नकोस” बाबू अजूनही त्याच्या नजरेला नजर देत न्हवता.

“अरे पण झाल काय, नीट सांगशील” अशोक ने विचारल.

“काही नाही, माझा खूप वेळ जातो, आईशी पण खोट बोलाव लागत , म्हणून नको” बाबू ने कसबस उत्तर दिल.

तरीही अशोक ला काही त्याच बोलण पटेना , कारण तो जाताना छान गप्पा मारत होता , आणि अचानक घरी येताना ह्याला काय झाल , त्याला वेगळीच शंका आली.

“बाबू , काय झालय, जोवर तू मला खर काय ते सांगणार नाहीस तोवर मी तुला घरी जाऊ देणार नाही ” अशोक ने बाबुला ठामपणे सांगितलं.

बाबूचा शेवटी नाईलाज झाला आणि त्याने काय पाहिलं हे अशोकला सांगितलं, बाबू त्याच म्हणन सांगत असताना अशोक त्याच हसू कसबस दाबून ठेवत होता.

पण जेव्हा बाबू “ तू हसतोयस, मी मूर्ख आहे का, जे तुला इतक कळकळीने सांगतोय” अस म्हणाला तेव्हा बाबुचा काळजीत पडलेला चेहरा बघून अशोक मात्र परत पोट धरून हसत सुटला.

बाबू त्याला अस हसताना पाहून , रागातच घरी जायला निघाला ,अशोक ने त्याला थांबवल, आणि तो त्याला म्हणाला,

“बाबू , खर सांग, तू हे अस पहिल्यांदा पाहिलस ना”

“हो रे अशोक , माझ आजच चुकून लक्ष गेल” बाबूचा चेहरा पुन्हा काळजीत.

“ अरे बाबू, तुझ्या आता पर्यंतच्या आयुष्यात हे अस तू पहिल्यांदा पाहिलस ना, अस मी विचारतोय”

“हो, म्हणजे , होच पहिल्यांदा पाहिलं” बाबू स्वतःशीच बोलल्या सारखा बोलला.

“बाबू , तू सिनेमे तरी बघतोस की नाही” अशोक ने त्याला विचारल.

“हो, एकदा श्याम ची आई पहिला होता आणि एकदा बाल शिवाजी” बाबूने लगेच उत्तर दिल.

“आणि एखादा हिंदी सिनेमा, नाही का पहिला कधीच” अशोकला पुन्हा हसू यायला लागल.

“ अरे , ती भाषा मला नीट कळत नाही,म्हणून मग कंटाळा येतो बघायचा “ बाबू ने साळसूदपणे उत्तर दिल.

“ एक काम कर, सगळ जाऊदे आपण ना एक हिंदी सिनेमा बघूया, ताबडतोब” अशोक ने बाबूला सुचवलं.

“ते का , कशासाठी” बाबूच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होत.

“उद्याच बघूया , चल निघतो “ अस म्हणून अशोक बाबूचा निरोप घेऊन गेला

घरी येताना त्याला पुन्हा बायडा दिसली. तशीच घाई- घाईत घरी निघाली होती.

तिला बघून बाबुला ते स्वप्न आठवलं आणि ह्यावेळी मात्र बाबू तिच्याकडे बघून हसला.

त्याच हसण कदाचित तिला खर वाटल नसेल, तिने त्याच्या कडे बघून न बघितल्यासारख केल. आणि ती तिच्या वाटेने निघून गेली.

बाबूला तिचा खूप राग आला “समजते काय स्वता:ला काय माहित” अस म्हणून तो देखील घरी निघून गेला

दुसर्या दिवशी शाळा अर्धातून सोडून बाबू आणि अशोक स्टेशन नाक्या जवळच्या एका टाकीज मध्ये शिरले , तिकडे जास्त गर्दी न्हवती म्हणून त्यांना कोणीही हटकल नाही, बाबुला तो हिंदी सिनेमा ओ कि ठो कळत न्हवता, पण त्यातली काही भडक दृश्य त्याच्या अंगावर येत होती, बाबू मध्येच स्वतःचे डोळे झाकून घेई.अशोक त्याची अवस्था बघून मनसोक्त हसत होता.शेवटी तो सिनेमा एकदाचा संपला.

बाबू आणि अशोक बाहेर आले ,घरी जायला नेहमी पेक्षा जास्त उशिर झाला होता, तरीही अशोकला मात्र बाबू शी बोलायचं होत.

“काय बाबू, कसा वाटला सिनेमा” अशोक बाबुला चिडवायच्या उद्धेशाने बोलू लागला.

“काहीही कळल नाही मला, आणि मध्ये मध्ये ते एकमेकांच्या किती जवळ येत होते , मला तर बघवत पण न्हवत” बाबू कपाळावर आठ्या पाडून बोलत होता.

“लहान आहेस तू अजून , म्हणून नसेल बघवल,”अशोक अजूनही चेष्टेच्या स्वरात म्हणाला.

“तुझ्याच वयाचा आहे मी , लहान काय” बाबू आता चिडला होता.

“हो का, मग डोळे का झाकून घेत होतास मध्येच , मी झाकले का डोळे , मी तर बघत होतो ना,” अशोक त्याच्या नजरेला नजर देत म्हणाला.

“तुला सवय आहे अशोक आणि तसाही तू त्या सरिता सोबत , जाऊदे” बाबू मध्येच थांबला.

“काय सरिता सोबत, आमच प्रेम आहें एकमेकांवर , म्हणून आम्हाला एकमेकांच्या इतक जवळ यायला आवडत” अशोक ठामपणे म्हणाला.

बाबू पुढे काहीच बोलू शकला नाही, फक्त तोंडातल्या तोंडात “प्रेम” इतकच पुटपुटला.

 

क्रमशः