पण आता मी जो मुद्दा मांडणार आहे.. तो खूप नाजूक पण वास्तवाशी निगडित आहे..
स्त्रीची लैंगिक कुचंबणा..
मी स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे अशा कितीतरी स्त्री पेशंट मी बघते. ज्यातल्या काही अकाली विधवा झाल्या आहेत, काही जणींना त्यांचा नवरा तिला हवे तसे लैंगिक सुख देऊ शकत नाही किंवा काहींचे नवरे कामासाठी वर्षानुवर्ष आपल्या पत्नी पासून दूर रहात असतात..अशा स्त्रियांना आहे का स्वातंत्र्य त्यांचं लैंगिक समाधान मिळवण्याचं ?..
नवऱ्याचे अकाली झालेले निधन , सासू सासऱ्यांची अचानक अंगावर आलेली जबाबदारी,मुलंबाळं, नातेवाईक...ही सगळी कर्तव्य ती विनातक्रार पार पाडत असेल . पण तिला नाही का लैंगिक सुख मिळवण्याचा हक्क ?
"कशाला हवे आहे दुसरं लग्न, मुलं मोठी आहेत.नवऱ्याची इस्टेट आहे. स्वतः कमावती आहे.अजून काय हवंय?" असे नैतिकतेचे डोसही समाजाकडून फुकटात मिळत असतात..
काहींचे नवरे त्यांच्या बायकांना लैंगिक सुख देऊ शकत नाहीत. त्याची बरीच कारणे असू शकतात. तिच्या नवऱ्याला एखादी शारीरिक व्याधी असू शकते, एखादा पुरुष लैंगिक सुख देण्यासाठी सक्षमच नसतो ,पण तिला मात्र हे लग्नानंतर समजतं, एखादयाचे बाहेर प्रेम प्रकरण असतं आणि आईवडिलांच्या इच्छेखातर नाईलाजाने तो त्यांच्या आवडीच्या मुलीशी लग्न करतो.. त्यामुळे लग्नाच्या बायकोला तो किती लैंगिक आणि मानसिक सुख देईल ? हे प्रश्नचिन्ह कायमस्वरूपी राहतं.काही स्त्रियांचे नवरे कामासाठी वर्षानुवर्ष बाहेर असतात. अशा बायकांनी त्यांची लैंगिक भूक भागवण्यासाठी काय करावं? की त्यानी तोंड दाबून बु्क्यांचा मारच सहन करायचा ?त्या नुसतं परपुरुषाशी बोलल्या तरी समाज त्यांना व्यभिचारी, बाहेरख्याली ठरवतो...ती बऱ्याच वेळा तिला अनावर होणाऱ्या लैंगिक इच्छांना तिलांजली देत असेल . का तर समाज काय म्हणेल.कुटुंब काय म्हणेल.
स्त्रियांच्या व्यथा समजण्यापलीकडे आहेत.
आणि एखादी जर सक्षमपणे अशा परिस्थितीत घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत येऊन पोहचली तर खरचं तिचं काय चुकलं ?
जसं अन्न, वस्त्र ,निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत तसंच लैंगिक भूकही मनुष्य प्राण्याची मूलभूत गरज आहे..
आणि ही मूलभूत गरज पूर्ण करण्याचा हक्क जसा पुरूषाला आहे तसा या स्त्रियांना नाही का ?
तुम्हाला काय वाटतं याबद्दल ??
एक उदाहरण सांगते...
ओळखीचेच एक गृहस्थ, पत्नी ऐन तारुण्यात सतत आजारी असल्यामुळे त्यांचे बाहेर परस्त्रिशी शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.. त्यांच्या पत्नीला आणि इतर नातेवाईकांच्या कानावर हळू हळू ही गोष्ट गेली.. पण जास्त उघड उघड कोणीच विरोध केला नाही..
एक नातेवाईक तर अगदी सहज म्हणाले," बायको सतत आजारी असते तर त्याने काय करावं.."
असा हा स्त्री पुरुषात होणारा भेदभाव काही अंशी आपल्या समाजात अजूनही पाहायला मिळतो...
मी म्हणत नाही की सगळेच असा विचार करतात पण 10%तरी आजचा समाज अजूनही स्त्रियांच्या बाबतीत हवा तेवढा बदलला नाही आहे...
स्त्रियांच्या समस्या, त्यांचे प्रश्न, गरजा, त्यांच्यावर होणारे अत्याचार या सगळ्या गोष्टी चित्रपट, नाटक, वेबसिरीज, शॉर्ट फिल्म्स यांतून मांडल्या जात आहेत. 'वीरे दि वेडिंग' सारख्या चित्रपटातून आजची स्त्री किती स्वतंत्र, स्वच्छंदी आहे, हे दाखवले आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी आपण बोलतो; पण त्या प्रत्यक्षात उतरताना मात्र काही अंशीच दिसतात.
आपण फक्त जागतिक स्त्री दिनी , नारी किती महान , नारी तूच दुर्गा, तूच भवानी , स्त्री आहे म्हणून घराला घरपण आहे . असे बरेच नारे लगावले जातात.तिला या आदर्शवादाचं दडपण येतं नसेल ?
ह्या सगळ्या नैतिकतेच्या चौकटी ती झुगारून देईल का ?..
करेल का , ती तिच्या मनाचा आणि शरीराचा विचार ?,
करेल का ती बंड आपल्याच कुटुंबाविरुद्ध,आईवडील आणि मुलांविरुद्ध ?
आणि जरी मध्यमवर्गातील एखादीने हे धाडस केलं तर किती जण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील ?
बरंय,अशी परिस्थिती सगळ्याचं स्त्रियांच्या वाट्याला येते असं नाही.
पण ज्या काही मोजक्या स्त्रियांच्या वाट्याला हे दुःख आलं असेल , त्यांच्या बाबतीत एक सुजाण नागरिक म्हणून सकारात्मक दृष्टिकोन ठेवूया !!
मला वाटतं, एक सुज्ञ वाचक आणि सुज्ञ नागरिक म्हणून आपण नक्कीच आपापल्या परीने या बदलाला सुरुवात करुया... या समाजातील अशा स्त्रियांना न्याय द्यायचा असेल तर सुरुवात स्वतः पासून झाली तरच हा बदल घडू शकतो. जे विचार वर मांडले गेलेत ते खूप आधीपासून काही मान्यवर व्यक्तींनी समाजापुढे मांडले आहेत. तरीही हवा तेवढा बदल, आजही दिसत नाहीये. आजही कित्येक स्त्रिया अशा प्रसंगातून जात आहेत. त्यांना अजूनही स्त्री असल्याची शिक्षा भोगावी लागत आहे. कोणताही बदल सहज आणि लगेच घडत नसतो. आपल्या मनावर रुढी परंपरांचा पगडा एवढा घट्टआहे की ते सहज झुगारून देणं प्रत्येकाला जमेलच असं नाही.पण या रुढी परंपरांच्या साखळदंडातून जेंव्हा आपला समाज मुक्त होइल,त्याची एक एक कडी निखळत जाईल तेंव्हाच उद्याच्या सुंदर जगाची अपेक्षा आपण करू शकतो. नुसतं लिहून किंवा यावर भाष्य करून काही होणार नाही..
या अनुषंगाने कवी दुष्यंतकुमार यांचे काही शब्द शेवटी मी आपल्यासमोर ठेऊ इच्छिते -
'हो गई है पीर पर्वत - सी पिघलनी चाहिए,
इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए।
आज यह दीवार, परदों की तरह हिलने लगी,
शर्त लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए।
सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं,
सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।
वाचकहो, आपापल्या परीने जिथं खरचं गरजेचा आहे त्या स्त्रियांच्या बाबतीत आपण असा विचार करून बघा एकदा...
डॉ. स्वाती अनिल मोरे
कांदिवली पूर्व..