गुप्त धन - 1 Mitl Naik द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गुप्त धन - 1

#गुप्तधन भाग 1- काल्पनिक स्वरचित

तो वैतागून गेलेला कर्जबाजारीपणाला, बायकोच्या टोमणे आणि सावकाराच्या तगाद्याला आणि मुलांच्या डोळ्यातील पाण्याला.

बस आपण एक नालायक मुलगा आणि अयशस्वी पती व बाप आहोत ही भावना त्याला आतून पोखरून काढत होती. झालं तेवढं पुरे झालं आता आयुष्य संपवायचं. त्यांन रात्री म्हणजे बरोबर मध्यरात्री कानोसा घेतला. बायको शांत झोपलेली होती. मुलंही तिला कवटाळून निर्धास्तपणे निद्रेच्या आहारी गेली होती. एका कोपऱ्यात बारीक दिवा जळत होता त्याचा प्रकाश त्याच्या आईच्या फोटोवर पडलेला, त्याने आईच्या फोटोकडे बघून हात जोडले आणी म्हणाला आई मी येतोय तुला भेटायला.

कर्जबाजारी झालेल्या अजितने आता मरणाचा मार्ग निवडला होता, म्हणजेच न सावकाराचा तगादा न बायकोचे टोमणे ना शेजारी असलेल्या लोकांचा हळूहळू कुजबुजणे. काहीच नाही! अजिबात आवाज न करता त्यांन झोपडीचा दरवाजा उघडला आणि अंधारात बाहेरचा रस्ता तोडू लागला. तो कुठे निघाला त्यालाच माहीत नव्हता. जीव द्यावा म्हणला तर विष खायलाही त्याच्याकडे पैसे नव्हते. मग त्यांनी ठरवलं गावाबाहेर जाऊन वीस फूट खोल कोरड्या विहिरीत उडी मारून आपली जीवन यात्रा संपवायची.

अजित म्हणजे एक कष्टाळू कामगार. अंगात हत्तीच बळ आणि कोणत्याही कामाला कधीच नाही न म्हणण्याची वृत्ती. त्याने जिथे जिथे काम केले ते सर्व मालक, मुकादम त्याच्यावर कायम खुश होते. परंतु एकाएकी सरकारने लोकडाऊन लावला आणि सगळ्यांवरच उपासमारीची वेळ आली. मालक कामगार लोकांना ना पगार देत ना उसने पैसे देत. मालक आगर मुकादमाकडे पैसे मागायला गेलं की एकच उत्तर मिळायचं "अरे इथे आमचे धंदे आहेत ते थंड पडलेत आणि तुला कुठून पैसे द्यायचे?" एकदा दोनदा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन रक्त विकून त्याने पैसे उभे केले , पण रक्त विकून तरी किती दिवस पुरणार?

तो आणि त्याची बायको दिवसातून एकदाच जेवायचे तर कधी दोन दिवसातून एकदा. मुलं सुद्धा मोठी झालेली त्यांना कळत होतं की आई बाप उपाशी राहून आपल्याला खायला घालतात म्हणून तीही कधी कोणत्या गोष्टीसाठी हट्ट नाही करायची. पण इतर मुलं आज-काल कबड्डी खोखो लंगडी पळती क्रिकेट असले खेळ न खेळता दिवसभर मोबाईलवर पडिक असायची या या बिचाऱ्या पिल्लांकडे मोबाईल काय घरात लाईटच नव्हती मग कसली शाळा आणि कसला ऑनलाइन गेम.शेजारपाजारचे लोकं मोबाईल वर गेम खेळायची तेव्हा अजित चा मुलगा जाऊन पाठीमागनं त्यांचा गेम बघून मनाचं समाधान करायचा. पण आज त्यातल्या एका टग्या न त्याला हटकलं. '"कीशात नाही आना आणि हवलदार म्हणा! ऐपत नाही मोबाईल घ्यायची तर आमचा गेम बघायला कशाला येतो? जा त्या झोपडीत जाऊन मर" मग तो बिचारा रडत रडत घरी आला आणि आईला आपली हकिकत सांगू लागला. आई आपल्या नशिबाला दोष देत स्वतःचा कपाळ बडवत रडू लागली बाजारातून परत आलेला अजित खिडकीतून बायकोचं रडणे ओरडणे पाहत होता आणि या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत म्हणून सामानाच्या पिशव्या दरवाजात ठवून कुठेतरी निघून गेला.

पाच-सात किलोमीटर चालत शेजारच्या गावात खोता च्या वाड्यावर जाऊन खोताची मनधरणी करायचा प्रयत्न केला. निम्म्या पगारावर काम करतो पण काहीतरी काम द्या म्हणून हात पाय जोडले. पण अडल्यानडल्या ची मदत करेल तो खोत कसला. "अरे मीच कर्जाचे हफ्ते फेडायला असमर्थ आहे आणि नवीन कामगार कुठून घेऊ?" म्हणून खोताने त्याला गोड बोलून परत लावलं. परत येई तो संध्याकाळ झाली, अजित घरी आला. बायको नुसतीच बसून होती तिच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते ती फक्त आढ्याकडे बघत होती शून्यात नजर लावून.... बाजारातून आणलेल्या सामानाच्या पिशव्या तशाच पडलेल्या होत्या. तो तिच्याजवळ गेला पण ती काहीच बोलायला तयार नव्हती मुलंही उपाशीपोटी तशीच झोपलेली दिसत होती. रडून-रडून शेवंती चे डोळे सुजलेले. तिला आपल्या जवळ घेऊन तिला धीर देत म्हणाला लवकर सगळे ठीक होईल. आता मी आज सामान घेऊन आलोय तू जेवण बनव मुलांना उठवून जेवायला घाल.

शेवंती काही न बोलता भाकऱ्या बनवायला लागली. पण तिची मनाची घालमेल अजित पासून लपलेली नव्हती . काल तिचं त्याचं कडाक्याचं भांडण झालं तेव्हा ती बोलून गेली "झक मारली आणि तुझ्याशी प्रेम विवाह केला . माझे आई-वडील चांगलं सांगत होते हा बघितलं तर दगड फोडणारा कामगार, तुला काय सुखात ठेवणार ? आणि मी त्यांचं न ऐकता तुझ्या सोबत पळून आले आणि आता दोन वेळच्या जेवणाची सुद्धा मारामारी आहे" हे ऐकून अजित हादरला आणि आता आपल्या बायकोचा आपल्यावरील विश्वास पूर्णपणे संपलेला आहे हे पाहून त्याच्यावर अस्मान कोसळलं.

तिने स्वयंपाक केला खरा पण ना ती जेवली ना तीन मुलांना उठवलं. अजितच्या पुढ्यात ताट वाढून ती घराबाहेर जाऊन गुडघ्यात डोकं घालून बसली. त्याच्या घशाखाली घास उतरेना. त्यांने मुलांना उठवून जेवायला घातलं. शेवंतीला जेवण्याची विनवणी करू लागला पण ती काहीच ऐकत नव्हती . मग तोही काही न बोलता हात धुवून कोपऱ्यात जाऊन पडला . थोड्या वेळाने शेवंती पलीकडच्या बाजूला जाऊन झोपली. इकडे अजितला मात्र झोप लागत नव्हती आपण एक नालायक बाप, नवरा आहोत या जाणिवेतून त्यांने ठरवलं आता हे आयुष्य संपवायचं आणि याच विचारातून तो मध्यरात्री निघालेला गावाबाहेरच्या खोल विहिरीत उडी मारायला.

अमावस्येची रात्र होती आणि त्याचा नेहमीचा पायाखालचा सवयीचा रस्ता सुद्धा आज अति भयानक वाटत होता . एक साप सळसळत त्याच्या पायातून झाडीत नाहीसा झाला आणि त्याला घाबरायचं सोडून अजित इथे थांबून म्हणाला " अरे बाबा चाऊन गेला असतास तर निदान मी शांतपणे मेलो तरी असतो" पण आज ते सुद्धा त्याच्या नशिबी नव्हतं . खिशातुन तंबाखुची बटवी काढून तंबाखू मळत अजित पुढे निघाला आणि त्या
गावाची वेस ओलांडून अजित बाहेर पडला आणि जंगलाच्या दिशेने पुढे जाऊ लागला.

दाट झाडीत ती खोल विहीर जमिनीत आपला आ वासून जणू काही भक्ष्याची वाट बघत होती आणि अजित तिची भूक भागवायला आणि स्वतःला मोकळं करायला निघाला होता. सगळ्या त्रासातून मोकळा व्हायला. पण नियतीच्या मनात बहुतेक काहीतरी वेगळंच होतं . आज कुठूनही कोल्हा कुत्र्यांच्या ओरडण्याचा आवाज येत नव्हता किंवा रातकिड्यांचा ही कसलाच आवाज नव्हता . एकदम शांत रात्र , जणू काही त्या रात्री ने सुद्धा झोपेचे पांघरून ओढले असावे. आता फक्त आपली जीवन यात्रा कायमची संपवायची या विचाराने अजित झपझप पावले टाकत विहिरीजवळ आला. त्याने वळून गावाकडे बघितलं. गावालाही शेवटचा नमस्कार केला आणि मनातल्या मनात प्रार्थना केली की निदान माझ्या मृत्यूनंतर तरी माझ्या बायकापोरांना काही कमी पडू नये. मुलांची आठवण होताच त्याचे डोळे पाणावले व अश्रू पुसत पुसत तो विहिरीच्या दोन पायऱ्या चढला. पुढचे पाऊल टाकणार इतक्यात झुडपातून फिदीफिदी हसण्याचा आवाज आला आणि एक पाठीला कुबड आलेली , हातात काठी घेतलेली , तोंडात बहुधा एकच दात असलेली , पिंजारलेले केसांची, फाटक्या तुटक्या चिंध्या पांघरलेली म्हातारी झाडाझुडपातून धबधबा पावले टाकत पुढे आली.

अजितला विहिरीत उडी मारून मरायची भीती वाटत नव्हती पण त्या म्हातारीचा अवतार आणि ज्या वेगाने ती त्याच्या दिशेने येत होती ते पाहून अजित चमकला. त्याच्या काळजाचा ठोका चुकला आणि मी खरंच मरायला आलो याचा त्याला सेकंदभर विसर पडला. म्हातारी त्याच्या दिशेने येत होती आणि अजित मागे मागे सरकत होता. विहिरीला तीनच पायऱ्या होत्या त्यातील दोन तो आधीच चढलेला आणि तिसऱ्या पायरीवर गेला तोच म्हातारी करड्या स्वरात बोलली "जागेवरून हलला तर माझ्या एवढा वाईट कोण नाही!"

कोण होती ही म्हातारी? अजित तर जीव द्यायला निघालेला, मग ही म्हातारी आता त्याचं काम तमाम करणार की अजितच्या नशिबाचे भोग अजून संपलेले नाहीत ? जाणून घेण्यासाठी वाचा गुप्तधन भाग 2