अघोरी सूड - भाग १ Om Mahindre द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अघोरी सूड - भाग १

लहानपणी आजोबांनी सांगितलेली गोष्ट. आफ्रिका खंडातील बऱ्याच देशात काळ्या जादूचा उपयोग वर्षानुवर्षे चांगल्या आणि वाईट गोष्टींसाठी केला जातो. या लोकांचा त्यांच्या काळ्या जादूवर फार विश्वास असतो. बऱ्याच वेळा ती अंधश्रद्धाच असते पण काही लोकांनां त्यांच्या पिढीजात चालत आलेल्या रूढी परंपरांचा चांगला अभ्यास असतो आणि हे लोक त्यांची अघोरी विद्या पण कशी वापरावी हे जाणून असतात.
घाना या देशावर अगोदर ब्रिटिशांचे राज्य होते. त्यावेळी बऱ्याच ठिकाणी या देशातील लोक गोऱ्या अधिकाऱ्यांच्या शेतावर मजूर म्हणून काम करत असत. अशाच एका थॉमस हार्बीन नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या शेतावर माम्बो नावाचा एक स्थानिक युवक काम करत होता. माम्बो कामात चांगला होता पण त्याला एक वाईट सवय होती कि तो दिवसेंदिवस कामावरून गैरहजर राहायचा. थॉमसने बऱ्याच वेळा त्याबद्दल त्याला खडसावले होते आणि त्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली होती. प्रत्येक वेळी माम्बो त्याला असे परत होणार नाही असे आश्वासन देऊन कामावरून न काढण्यासाठी विनवणी करायचा.
पण एके दिवशी कंटाळून थॉमसने त्याला कामावरून काढून टाकले आणि पुन्हा त्या शेतावर न दिसण्याचा आदेश दिला. माम्बोला याचा फार राग आला होता आणि त्याच्या भाषेत जोरजोरात शिव्या देत तो तिथून निघून गेला.
काही दिवस गेले असतील थॉमस संध्याकाळी शेताची पाहणी करण्यासाठी शेतात एकटाच फेरफटका मारत होता. सगळे शेतमजूर दिवसाचं काम संपवुन घरी गेले होते. फिरत असताना एका शेतात अचानक एका ठिकाणी त्याला एक रानटी डुक्कर दिसले. त्या रानटी डुकरावर नजर पडताच थॉमस भीतीने दचकला. ते डुक्कर दिसायला फारच भयावह होते. नजर रोखून ते एक टक थॉमस कडे पाहत होते. तोंडातून बाहेर आलेले वक्राकार सुळ्यासारखे दात त्या जनावराला अधिकच भीतीदायक बनवत होते.
पहिल्या क्षणी थॉमसला वाटले कि तिथून पळून जावे. पण ते डुक्कर तिथे राहिले तर शेताची नासधूस होण्याची पण शक्यता होती आणि जर तो पळाला तर ते डुक्कर मागे लागण्याची पण भीती होती. थोडा वेळ तिथे स्तब्ध उभा राहून थॉमस ने विचार केला कि न घाबरता हातातल्या दांड्याने त्या जनावराला हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास ते भीतीने पळून जाईल. थॉमस ने दांड्यावरची पकड घट्ट केली आणि दोन्ही हाताने पकडून दांडा वर करून आक्रमक पावित्रा घेतला. या वेळी थॉमस च्या लक्षात आले कि ते डुक्कर फक्त रोखून पाहत नव्हते तर गुरगुरण्याचा आवाज पण करत होते. थॉमस चा तो पावित्रा बघून तर ते जास्तच गुरगुर करायला लागले होते. त्याला कळले कि डुक्कर घाबरत नाही आहे आणि ते पण आक्रमणाच्या स्थितीत आहे. काही क्षणातच डुक्कर पायाने माती मागे उडवत थोडेसे पुढे आले. थॉमस भीतीने थोडा मागे सरकला. थॉमसला समजले कि पळून जाण्यासाठी तोच क्षण होता कारण पुढच्याच क्षणी ते डुक्कर त्याच्यावर धावून येणार होते. तो थोडासा वळला आणि शेतातल्या धान्याच्या कोठाराच्या दिशेने धूम ठोकली. तो धावत असताना त्याला आवाज येत होता कि ते डुक्कर पण त्याच्या मागोमाग धावते आहे. त्याला वाटले कि कोणत्याही क्षणी ते डुक्कर त्याच्यावर झडप घालेल पण कसाबसा तो धान्याच्या कोठारापर्यंत पोचला. नशिबाने कोठाराचे दाराला कुलूप लावले नव्हते. थॉमसने पटकन दार उघडून तो आत गेला आणि दार बंद केले.
भीतीने आणि धावण्याच्या कारणाने थॉमस फार घामाघूम झाला होता आणि धापा टाकत होता. त्याच्या लक्षात आले कि त्या कोठाराच्या आत आल्यानंतर त्या डुकराचा काहीच आवाज येत नव्हता. कदाचित ते तिथून निघून गेले असेल. पण भीतीपोटी आणि दमलेल्या अवस्थेत असल्याने थॉमस ने कोठारात काही मिनिटे विश्रान्ती केली आणि नंतर त्या कोठारातली एक मशाल पेटवून त्याने दार उघडण्याचे धाडस केले. एव्हाना काळोख झाला होता. पण बाहेर ते डुक्कर नव्हते. त्याने मशालीच्या उजेडात जेवढ्या दूरवर पाहता येईल तेवढे पहिले. तिथे ते डुक्कर नव्हते. एका हातात मशाल आणि दुसऱ्या हातात दांडा घेऊन तो आपल्या गाडीपाशी आला आणि जास्त वेळ न घालवता घराचा रस्ता पकडला