मनी उवाच Geeta Gajanan Garud द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मनी उवाच

#मनी_उवाच🐈

काय मग मंडळी,कसं काय बरंय नं!
थंडी वाजतेय नं. अगं बाई,ओळख करुन द्यायची राहिलीच की. मी मीना मांजरेकरांची मनी. इथे अंगणात जरा उन्हाला बसायला आले होते. रात्रभर झोप नाही ओ . काय सांगणार तुम्हाला,अहो मांजरेकर भाऊ लई घोरतात नी त्याच्या वरच्या पट्टीत मांजरेकरीन घोरती.😾

रेकॉर्ड केलात तर एक छान संगीताचा कार्यक्रम होऊ शकतो. मला नुसतं कुडकुडायला होतं. दात दातावर आपटतात. पहिले मी चुलीजवळच्या रखेत निजायचे माजघरात. आत्ता मांजरेकर भाऊंनी गेस घेतला नं. चूल आहे पण कधी पेटवत नाहीत. मला सांगा बरं, माझ्यासारखीने काय करायचं? आधीच माझं अंग कसं मऊ मऊ, जरा थंडीची झुळूक आली की अंगावर शहारा येतो बाई माझ्या. थंड हवा मानवतच नाही मला. लगेच घसा धरतो माझा. खोकला येतो.

रात्रीची मी किनई मांजरेकरांच्या बाबूच्या अंथरुणात शिरते. मध्यरात्रीपर्यंत मोबाईल सुरु असतो बाबूचा. ते काय ते शोना,पिल्लू चालू असतं बाबूचं.💏मग वरती नीज येत नाही प्रकाशामुळे म्हणून त्याच्या पायाजवळ नीजते तर बेणं रात्रीचं लाथा घालतं माझ्या कंबरड्यात. झोपेत फायटींग करतं वाटतं. माझा बिचारीचा जीव जातो हो. कसलं कळवळायला होतं.

मग मी तिथून हळूच निघते नी मांजरेकरनीच्या आर्चीच्या अंथरुणात शिरते. ही आर्ची रात्री बरी निजते पण पहाट होता होता मला कुशीत घेते. माझा शोन्या,बाबू,हनी,पिल्लू काय काय म्हणते. माझ्या गालांचे तिच्या पारोशा तोंडाने मुके घेऊ लागते. मला कुशीत घेते.👩‍❤️‍💋‍👩 मग मात्र मला वाटतं माझं मीटू मीटू व्हतंय. कुठून मती फिरली नी ह्या राखीच्या कुशीत शिरले. कशीबशी जीव घेऊन पळते तिथनं.

पहाटे जरा गेसजवळ जाऊन बसते उबीला. दूध तापत असतं टोपात. मांजरेकरनीचा फुल टू विश्वास आहे माझ्यावर. मी लांडीलब्बाडी करत नाही. कधीच कोणत्या टोपात तोंड घालत नाही, माहिती आहे तिला. तिच्या माहेरची आहे मी. म्हणून जरा जास्तीच जीव तिचा माझ्यावर. तिने मला या मांजरेकरांच्या घरात आणलंन तेंव्हा लहानसं पिल्लू होते मी.

तिच माझी आई झाली. दुधाच्या बाटलीनेपण दूध पाजलय तिने मला. सकाळीच मला बशीभर दूध त्यात पार्लेजीची बिस्कीट नायतर खारी भिजवून देते मला. ते खाल्लं की माझा नाश्ता होतो. मी क्रुतज्ञतेने तिच्याकडे पहाते. मग ती मला जरा कुशीत घेते. माझ्या मऊशार केसांवरुन तिची बोटं फिरवते. माझ्याशी लाडे लाडे बोलते. मी मग जीभेने माझं सारं अंग स्वच्छ करत बसते. मलि किनई नीटनेटकं रहायला भारी आवडतं.

मग मांजरेकर येतात नाश्त्याला. उगा कधीमधी डाफरतात मांजरेकरनीवर. मग मला रागच येतो त्यांचा. काही झालं तरी माहेरची आहे नं मी मांजरेकरनीच्या. मी चांगलच गुरगुरते मांजरेकरावर. मांजरेकरीन तोंडाला पदर लावून खुदकन हसते. मांजरेकरीन दिसते सुंदर. गोरीपान,लांबसडक केस,शेलाटा बांधा नव्हे हं. थोडी गुबगुबीतच आहे..खात्यापित्या घरची म्हणालात तर चालेल अशी. सगळं घर कसं लख्ख ठेवते.🤰 मीपण मदत करते तिला उंदीर मारुन. एक जरी उंदीर वाशावर दिसला तरी मी उंच उडी मारुन त्याला पकडतेच आणि बाहेर न्हेऊन त्याचा खात्मा करते . मग मांजरेकरही खूश होतात माझ्यावर. मला जवळ घेतात. गाल घासतात. ते बाई मला आवडत नाही.दाढी लागते नं. बोचते मला. आणि मी मांजर असले म्हणून काय झालं एक फिमेलच नं शेवटी. समजायला नको या मांजरेकराला. कशीबशी मी त्याच्या तावडीतून माझी सुटका करुन घेते.

मांजरेकरांचा बाबू लयच वात्रट.👀 मला उभं करतो दोन पायांवर व चालायला लावतो. मला खांद्यावर घेऊन घरभर फिरवतो. कधी त्याचा तो मित्र ,संजू आला तर दोघे मिळून माझा चेंडू करतात. मला हवेत उडवून केच केच खेळतात. मग कुठुनशी मांजरेकरांची आर्ची येते न् माझा जीव वाचवते. ती मला तिच्या खोलीत घेऊन जाते. तिच्या ड्रेसिंग टेबलवर सगळं मेकअपचं सामान असतं. ती मला टेबलावर ठेवते नी तिच्या चेहऱ्यावर रंगरंगोटी करु लागते. काय ते फाऊंडेशन क काय ते लावते. डोळ्यांना कसल्याशा पेन्सिलने रंगवते,रुज लावते. मग लिपस्टीकची कांडी घेते नी ओठांवर दोनतीनदा फासते.💋 केसांचे कसलेकसले प्रकार करते. मग मला हातात घेते नी तोंडाचा चंबू करून फोटू काढत बसते न् पाठवते सगळ्यांना मी विथ माय मनी लिवून.

खरंच सांगते तुम्हांला मला असं सोशल होणं मुळीच आवडत नाही पण सांगेल कोण या यड्या आर्चीला. तिथून मी कशीबशी सुटते न् मांजरेकरनीच्या रुममध्ये जाते. मांजरेकरीन साडी नेसत असते. मला आवडतं ती साडी नेसताना तिच्या साडीत घुटमळायला. तितक्यात ती त्या मांजरेकराला हाक मारते. अहो,जरा माझ्या पदराला पिन लावा नं नी या निऱ्या जरा नीट करा. मग बाई मी तिथून रफा होते कारण कोणाच्या प्रायव्हेट गोष्टीत लक्ष घालणं बरं नव्हं येवढं कळतं मला.

तुळशीच्या पेळेवर जरा उन्हाला जाऊन बसते. तिथे जरा आळोखेपिळोखे घेते तर तो सावंतांचा बंड्या नी दळव्यांचा गोट्या, दोन्ही बोके लाळ गाळत माझ्याकडे बघत बसलेले असतात. मला बाई परत मीटू मीटू वाटतं. मेल्यांना लाजाच नाहीत. दोन्ही बोक्यांच्या आपल्याआपल्या मांजरी नी आपलीआपली पिल्लं आहेत तरी माझ्यासारख्या तरण्याताठ्या मांजरीकडे का बरं बघतात? बघूनबघून घेणार नी विनयभंगाचा गुन्हाच दाखल करणारै मी त्यांच्यावर.😾

एकट्या मांजरीचं जीणं खरंच कठीण आहे. मीपण शोधतेय माझ्यासाठी एखादा चांगलासा बोका पण अजून कुणी मनात भरलाच नाही. नाही म्हणायला त्या पडव्यातल्या माशेवालीचा बोका आहे एक. रोज तिच्यासोबत येतो. तो लाईन मारतो माझ्यावर. दोनतीनदा आँखोही आँखोमें इशारा हुआ झालंय आमचं. पण मला बाई कच्चे मासे आवडत नाहीत. सारातले न् फ्रायच आवडतात. काटे वगैरे मी खात नाही. मांजरेकरीन मला माशाचे कप्पे काढून वाढते. माहेरची आहे न् मी तिच्या. पण हा मासेवालीचा बोका कच्चीच मच्छी खातो. मला बाई बघूनच वीट येतो. तोंडाला किती घाण वास येत असेल नं त्याच्या नी मलापण कच्चे मासेच खावे लागतील जर मी त्याच्यासोबत एंगेजमेंट केली तर.
तर असा सारासार विचार करुन मी त्या पडव्यातल्या मासेवालीच्या बोक्याचं प्रपोजल रिजेक्टलय.

दुसरा एक जोशी भटणीचा बोका आहे. कसला गुटगुटीत आहे. लय भारी,देखणा गडी दिसतो. मिशा कशा झुपकेदार. सगळ्याच मांजरी मरतात त्याच्यावर. मलापण त्याच्याकडे पाहिलं की कुछ कुछ होता है वालं फिलिंग येतं😽 पण बाई त्या भटणीकडे गेले तर दूध,दही,ताकभाताशिवाय काही मिळायचं नाही मला. दोन महिन्यात सांगाडा होईल माझा. आखिर पापी पेट का सवाल है भाया. तेंव्हा तो भटणीचा बोका कितीही देखणा असला तरी रिजेक्टच करते बाई.

घरजावई असतो नं तसा घरबोका आणायचा प्लेन चाललाय माझ्या मनात. देसायांचा बोका एक दिसायला बरा आहे.😻 जरा आखडू आहे. पण मी आणेन त्याला सुतासारखा सरळ. त्याला विचारुन पहाणार घरबोका होशील का म्हणून. नाहीतर बाई मीच जाईन त्याच्याकडे रहायला पण त्या देसाईनीने सासुरवास नाही केला म्हणजे मिळवले. आमच्या मांजरेकरनीला का कमी छळायची मांजरेकराची म्हातारी. सतरांदा चहा करायला लावायची. पण तशी मायाळूही होती हो ती. उगा काड्या करायला आवडत नाही मला. म्हातारी ताजा शेव द्यायची मला बशीतून. खाल्ल्या मिठाला जागते बाई माझी मांजराची जात. 😼

आज मांजरेकरांनी करली आणलेली. सार छान झालेला. मांजरेकरनीने गाभोळीच्या दोन फ्राय केलेल्या तुकड्या,सारभात नी काटे काढून करलीचे कप्पे वाढलेले मला. माझी गुणाची मांजरेकरीन ती.😻

आज जरा दोन घास जास्तच खाल्ले. आत्ता जरा पडते. तो वाशावरून गलेलठ्ठ उंदीर जातोय पण बाई माझं पोट तुडुंब भरलंय. मुळीच इच्छा नाहीए मला उडी मारण्याची. जाओ जाओ चुहे.🐀 तुमभी क्या याद करोगे। इस रईस मनी मांजरीनीसे पाला पडा है तुम्हारा।🐱

-----------गीता गजानन गरुड.