कोण होती ती ? Durgesh Borse द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कोण होती ती ?

साधारण पाच सहा वर्षांनी मी पुन्हा एकदा गावाकडे आलो होतो. लहानपणापासून बाहेर शिक्षण आणि शहरात झालेल्या संस्कारामुळे गाव म्हटलं की मनात एक वेगळेच कुतूहल होते. गावाकडे न जाण्याची खुप कारणे दिली आणि पुढे ढकलेल्या फेऱ्या यासर्वांमुळे आत्तापर्यंत वाचत असलेला मी शेवटी आई आणि बाबांच्या ओढीमुळे गावाला भेट द्यायला गेलो. आई बाबा म्हणजे माझे आजी आजोबा, वाढत्या वयामुळे तब्येत ठीक नसते. अचानक काकांचा फोन आला आणि बाबांची तब्येत ठीक नाही असे सांगून, लवकर निघून ये, बस इतकच सांगून आमच्या शहरातल्या घरात बॉम्ब टाकून फोन ठेवला. जोडून आलेल्या शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्यामुळे सर्व गावाकडे जाणार होते. मी एव्हाना मनातल्या मनात शंभेर कारणे शोधून ठेवली होती. पण एकशे एक नंबरच कारण सांगून मला घरचे घेऊनच गेले. शुक्रवारी रात्री उशिरा मजलदरमजल करत आम्ही सर्व गावाकडे पोहचलो. घरात पाय ठेवताच बाहेर पाऊस सुरू झाला. सर्वांनी आधी अंघोळी केल्या त्यानंतर आम्ही आजोबांची विचारपूस केली. त्यांना औषधे देऊन झोपण्याचा सल्ला देऊन आम्ही सुध्दा जेवलो आणि झोपी गेलो.

रात्रीच्या पावसामुळे मी उशिरा झोपलो होतो. पण सकाळी होणाऱ्या घरातल्या लगबगीने मला लवकरच जाग आली. मी उठून पाणी तापवण्याच्या चुलिकडे जाऊन बसलो होतो. धुराची एक सरळ रेख कौलामधून प्रकाशाबरोबर आली होती. मी त्याच्याकडे बघत होतो आणि खिडकीकडे लक्ष गेले. आई तीन हंडे घेऊन निघाली होती. मी सुध्दा आईच्या मागे मदत करायला गेलो कारण चिखल खुप असल्यामुळे तीन हंडे उचलणं कठीण होत. सकाळचे साडेसहा झाले होते. सूर्य ढगाआड असला तरी त्याच्या प्रकाशने सर्व काही उजळून निघाले होते. रात्रीच्या पावसाने गारवा होता आणि एक वेगळ्याच प्रकारचा नैसर्गिक अत्तराचा गंध सर्वत्र पसरला होता. मी झऱ्यावर पोहचलो होतो.

झऱ्याच्या खळखळाटातून मला एका पैंजनचा आवाज ऐकू येत होता. आईचं पाणी भरून झालं होत, मी तिला एक डोक्यावर आणि एक कमरेवर हंडा ठेवू लागलो. तिसरा मी उचलला आणि वर पाहिलं तर मला पहिल्यांदा ती दिसली. पैंजण तिच्याच पायाच वाजत होत, माझी नजर पायापासून वर जात होती. तिचे पाय चिखलाने माखले होते मध्येच कुठेतरी शेण लागले होते आणि निसर्गाच्या त्या सुगंधात शेणाचा वास येत होता. तिच्या पायात चप्पल नव्हती. तिने गाऊन घातला होता आणि त्यावर ओढणी होती. आत नेसलेल्या परकरमध्ये तिने कमरेवरचा गाऊन आत खोसला होता. नखशिखांत ती भिजलेली होती. काळे केस त्यावर काही तांबड्या रंगाच्या छटा होत्या. केस कशाचीही मदत न घेता बांधले होते. केसांतून घामाच्या धारा कपाळावरून मार्ग काढत काही कानामागून तर काही डोळ्यांच्या आणि कानाच्या मधून ओघळत होत्या, मानेवरून खाली त्या तिच्या गाऊन मध्ये जात होत्या. कमेवरचा भाग घामाने तर कमारेखालचा भाग पाण्याने भिजला होता. तिच्या भुवया मधल्या भागाला जुळत होत्या. डोळे लाल आणि मिशरी खासल्यामुळे ओठ काळे पडले होते. तिच्या हातात तीन मोठे हंडे आणि एक छोटी कळशी होती. आल्या आल्या तिने तिच्या कळशी मध्ये पाणी घेतले. कळशीतून ओंजळीत आणि ओंझळीतून पाणी घेऊन चूळ भरली आणि बोट तोंडात टाकून दोन्ही बाजूने फिरवू लागली. पाणी पूर्ण तोंडातून फिरवून शेवटी लांब पिचकारी मारून तिने ते पाणी बाहेर टाकले. दुसरी ओंजळी भरून ती पाणी प्यायली. आल्यावर तिथेच गप्प उभ राहून ती माझ्याकडे बघत होती. तिच्या उजव्या बाजूने मी हंडा घेऊन निघालो तर मला खामाचा आणि शेणाचा तीव्र वास आला.
मी मार्ग काढत पुढे गेलो मागून गोड आवाज आला "मामी",

मागे पाहिले तर ती धावत धावत येत होती तिच्या हातात माझा फोन होता. मी तिच्या हातातून तिच्या हाताने ओला झालेला फोन घेतला. आमची दोघांची नजरानजर झाली, फोन देऊन ती मागे फिरली आणि मी तिच्याकडेच बघत उभा होतो. जरा पुढे जाऊन तिने एकदा मागे मागे वळून पाहिले.

मी आईला विचारलं, "कोण होती ती ?"