हा खेळ जाहिरातींचा Kalyani Deshpande द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हा खेळ जाहिरातींचा

एका खेड्यात बबनराव तिरशींगे नावाचा माणूस राहत असे. गमतीदार नावा प्रमाणेच त्याचा स्वभाव ही गमतीदार होता. गावात सगळेजण त्याला बबन्या म्हणून हाक मारत असत. तब्येतीने हडकूळा,उंच , गाळफड बसलेले असे एकंदरीत बबनराव चे ध्यान होते.

बबन राव च लग्न होऊन जेमतेम धा वर्षे झाली होती.

बबन्याची बायको त्याला साजेशीच होती(लग्न झालं तेव्हा) पण धा वर्षात तिला हवी तशी फिगर ची काळजी घेता आली नव्हती त्यामुळे आता मुरमुर्याचे पोते कोणते आणि सौ ठमी बबनराव तिरशींगे कोणत्या याचा जरा कनफ्युजन चा गोंधळ उडत असे.

बबनरावचा मुलगा 'डबल्या' यंदाच्या पोळ्याला आठ वर्षाचा झाला होता.

एकंदरीत असा त्यांचा छोटा संसार मोठया गुण्यागोविंदाने सुरू होता.

बबनरावला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नव्हतं पण हो त्याला जहिरातीचं जबरदस्त व्यसन होतं.

टी व्ही वरच्या मालिका,सिनेमे सोडून बबन्या जाहिराती मोठ्या तल्लीनतेने बघत असे. गावातील पाटलाकडे जेव्हा नवीन टी व्ही घेतला होता तेव्हा पहिला प्रेक्षक म्हणून बबनराव त्यांच्या दारात ठिय्या देऊन उभा राहिला होता.

बरं ह्या जाहिराती फक्त बघण्यासाठी असतात यावर त्याचा विश्वासच नव्हता,प्रत्येक जाहिरात आपण आचरणात आणली पाहिजे असा त्याचा नियमच होता.

एकदा असाच तो सकाळी अंघोळ वगैरे आटोपून प्रवचनाला जावे त्याप्रमाणे पाटलाच्या घरात प्रविष्ट झाला व मोठ्याने म्हणाला,"अवो पाटील! घरात कोनी हाय का?"

पाटलाकडे आता गावातील बरीच मंडळी टी व्ही बघायला येत असत, पण इतक्या पहाटे बबन्या सोडला तर दुसरं कोणीच येत नसे. यावेळी पाटील अंघोळ-बिंघोळ उरकत असत त्यामुळे टी व्ही लावून द्यायचं काम पाटलीण बाईंना करावं लागे.

बबन्याचा आवाज ऐकू आल्यावर झटक्यात पाटलीणबाई बाहेर आल्या. त्यांनी दिलेल्या झटक्यासरशी त्यांच्या अंगावरील दागिन्यांना एक हिसका बसला आणि एखादं झुंबर हलावं तसा आवाज झाला. पाटलीण बाईंनी बाहेर येताच असं काही बबन्याकडे बघितलं की त्याला त्याच्या गोठयातील सुंदरीचीच(म्हैस) आठवण झाली. टी व्ही लावून एक जळजळीत कटाक्ष टाकून पाटलीण बाई निघून गेल्या.

पण त्याची बबन्याला काय पर्वा! तो नेटाने टीव्ही समोर ठाण मांडून बसला.

टीव्ही सुरू होताच जाहिराती सुरू झाल्या. बबन्या डोळे फाडफाडून त्या बघू लागला.

बरं, जाहिराती पाहतांना डोळ्यांचं व ऐकताना कानांचं काम असते पण बबन्या त्याच्या तोंडाला ही कामाला लावत असे. एकसारखी त्याच्या तोंडाची उघडझाप सुरू असे. काही वेळेला आश्चर्याने तो इतका 'आ' वासत असे की एकदा तर पाटलाच्या बैठकीत घर असलेल्या पाकोळीने बबन्याचा मुखात एन्ट्री घेतली पण तिथे तिला सफोगेशन झाल्यामुळे ती त्वरित बाहेर आली.

एकदा अशीच संध्याकाळची वेळ होती, ठमी बाई देवाजवळ दिवा लावत होत्या, बबनराव अंगणात खाटेवर बसला होता,तेवढ्यात घरातील वीज गेली आणि ठमी ताईंनी कलकलाट सुरू केला.

"अवो बाई! आत्ताच या लाईटले जाचं व्हतं, माचीस कुटं गेली काहीबी दिसना गळ्या!" ठमा ताईंचा पहाडी स्वर कानी पडताच बबनराव च्या कपाळाला आठी पडली, पण क्षणभरच. पुढच्याच क्षणी त्याच्या चेहऱ्यावर हास्यलकेर उमटली. घाईघाईने त्याने त्याच्या खिशातून काहीतरी काढुन तोंडात टाकलं आणि चावून-चावून खाल्ल्यानंतर तो घाईघाईतच आतमध्ये गेला.

"थांब, थांब ठमे! म्या दावतो तुले परकाश", असं म्हणून तिला दात दाखवू लागला. ठमी ला काही समजेना आणि अंधारात धड दिसेना.

" अवो परकाश दावतो म्हनले आन कुटी गेले बापा", ठमी

" अवं त हेंबाडे ! तुह्या म्होरचं त बसेल हावो परकाश दाखवत", बबनराव

"मंग मले कामुन दिसू नई रायला परकाश?",ठमी

इतक्यात वीज आली आणि ठमीला तिच्यासमोर दात दाखवत असलेला बबन्या दिसला.

"अवो दातखीळ गितखीळ बसली का काय तुमची ? अशे काहून बसले?",ठमी

"अवं, तुले परकाश दाखवत होतो,ते चिंगम असतेना ते चावू चावू खाल्लन शान की दातातून परकाश पडते. टीव्ही गीवी पहात नसतं कावं भैताडे तू?", बबन्या

"लयच शाने लागून गेले तुमी, राखुंडी न घासू घासू दात सगये काळे ढुस्स झाले तुमचे वाले अन म्हनत व्हते परकाश पडतो म्हून. बसा भाईर गप!",ठमी

बबन्याला वाटलं खरं हाय गळ्या दात काळे झाले म्हून परकाश पडला नसंल.

काही दिवसांनी बबन्याला आधी झालेल्या प्रसंगाचा विसर पडला. पाटलाकडे जाऊन जाहिराती बघण्याचा त्याचा नियम न चुकता सुरू होता. अशात बबन रावला खोकल्याने पछाडलं,दिवसं रात्र खो-खो सुरूच शेवटी ठमीने बळजबरीने नव्यानेच सुरू झालेल्या दवाखाण्यात त्याला पाठवले. बबन्या तिथे गेला तर त्याला लांबच्या लांब रांग दिसली. "घ्या राव! आता महा नंबर लागीन कवा अन मी टीव्ही पाहायला जाईल कवा?" आयडिया! " असं म्हणून बबनराव रांग सोडून सरळ समोर गेला आणि स्वागतिका जिथे बसली होती तिथे थेट जाऊन उभा राहिला.

स्वागतिका(रिसेप्शनिस्ट) त्याच्या कडे प्रश्नार्थक मुद्रा करून म्हणाली," कार्ड काढलंय का?"

बबन्या काही उत्तर देण्याऐवजी हसत हसत थोडं पुढे सरकला आणि हाsss करून त्याने तोंड वासून श्वास सोडला. तो घाणेरडा वास येताच स्वागतिकेने त्याच्या कानफटात जी लगावून दिली की खोकला राहिला बाजूला,सुजलेल्या गालासाठी आणि तुटलेल्या दातांसाठी त्याला डेंटिस्ट कडे जावं लागलं, आणि हो यावेळेस त्याने रांग मोडण्याचा प्रयत्न तर केलाच नाही शिवाय कार्ड ही काढले. घरी ठमीने खरडपट्टी काढली ती वेगळीच.

एवढं सगळं झालं तरी बबन्याचा मनात राहून राहून एक विचार येत होता आणि तो मनाशीच म्हणाला,'खमाल हाय राजेहो! टीव्ही वर थो पोट्टा तोंड वासू वासू श्वास सोडते थ ते बाई त्याले अधिक श्वास सोड म्हंते, आन म्या तसं केलं त मायावालं थोबाड फोडलं त्या राक्केसीनं!'

झालं तेही दिवस गेले, बबन्याचे सुजलेले गाल पूर्ववत खप्पड दिसू लागले. उन्हाळा सुरू झाला होता,डबल्याच्या शाळेला सुट्टी लागली होती तसा ठमीने बबन्या कडे माहेरी जाण्याचा तगादा लावला. आणि एक दिवस बाबन्या,ठमी आणि डबल्या हे तिघेही ठमीच्या माहेरी पोचले. डबल्याला आणि ठमीला माहेरी सोडून बबन घरी जाण्याची घाई करू लागला तेव्हा त्याच्या सासूबाईंनी त्याला आग्रहाने थांबवून घेतलं.

"जवाईबापू वाइस चार दिस थांबून जावा, यंदा किशोर च लग्न कराचं ठरोलं, नजीकच्याच गावातील पोरगी हाये, तिला पाहाले उद्या जाचं होतं तवा तुमीबी चला आमच्यासंगं", सासूबाई

बबनराव नि हो नाही करत शेवटी राहण्याचं मान्य केलं.

दुसऱ्या दिवशी जवळच्या गावाला जाताना ठमीने बबनराव ला बजावून ठेवलं," हे पा म्या अ दु ग र च तुमाले सांगून ठिवतो तथी गेल्यावर अडवरटायजीचे परयोग करू नगासा. महा भाऊ 'यम ए' हाय आन थे पोरगी बी लय शिकेल हाय तवा तथी काई इचित्र पना करून शान सोताची आन आमची फोत्री करू नगा",

बबनराव ने तिच्याकडे असं बघितलं की ती समजून गेली की तिच्या बोलण्याचा काहीबी उपेग झाला नाही.

पाहुण्यांकडे यांचं उत्तम स्वागत झालं , इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मुलगी चहा घेऊन आली. सगळ्यांनी चहाचे कप हातात घेतले. वातावरण थोडं शांत आणि संकोचपूर्ण झालं होतं, तेवढ्यात सगळ्यांच लक्ष एका आवाजाकडे गेलं.

सुर्र ss सुर्र ss

बबन्या सुर्र ss सुर्र ss असा मोठा आवाज करत चहा पीत होता. किशोर कसानुसा चेहरा करून त्याच्या बहिणीकडे म्हणजे ठमिकडे बघता होता. ठमी बबन्याला नजरेने दटावत होती तर वधुमुलगी हसू दाबण्याचा प्रयत्न करीत होती.

ठमी कडे लक्ष जाताच बबन एकदा ठमिकडे मग वधुमुलीकडे आणि मग सर्वांकडे बघून म्हणाला,

"अरे! शरमाओ नही सुर्र ss करके पियो,हां खुलके"

असं म्हणून बबन पुढे म्हणाला," अरे सुर्र ss करके नहीं पिया तो चाय क्या पिया?" असं म्हणून किशोरच्या खांद्यावर त्याने जोरात थाप मारली तसा चहा किशोरच्या कपड्यांवर सांडला आणि तो वाताचा झटका यावा तसा ताडकन उठला आणि ठमिकडे रागाने बघत म्हणाला," कमाल के भाऊजी है, है ना!", असं म्हणून तरातरा चालला गेला. इकडे ठमीच्या आईवडिलांना मेल्याहून मेल्यासारखं झालं, त्यांनीही बैठक आवरती घेऊन आपलं घर गाठलं आणि ठमीने सुद्धा बबन्या,डबल्याला घेऊन आपलं घर गाठलं.

त्यादिवशीपासून ठमीने बबन शी बोलणं च बंद केलं. बबन ला आपलं काय चुकलं हे कळेचना.

काही दिवसानंतर एके दिवशी बबन चे काका त्याच्या कडे मुक्कामी आले. ठमीने त्यांची उत्तम बडदास्त ठेवली. सकाळी काकांसाठी आंघोळीचे पाणी काढताना साबण संपल्याचे ठमीच्या लक्षात आले, तिने लगेच डबल्याला साबण आणण्यास पिटाळले. तेवढ्यात बबन्या बाहेरून घरात आला, त्याला डबल्या पळताना दिसला.

बबन ने ठमीला विचारले," कुटं पाठोलं व त्याले सकायी सकायी".

"साबन आनाले", ठमी

"कोनतं साबन?",बबन

"आंघोळीचं", ठमी

"अवं पन त्याला काई नाव असन का नसन", बबन

"बाप्पा! त्यात काय हाय एवडं, कोनतं का आनेना", ठमी

" लयच गचाळ हाय तू, अवं त्यानं कोनतं बी साबन आनलं तर त्याले फोड येतीन, त्याचा वाला मंग आत्मविस्वास जायल, आरे देवा! मले त्याले वाचवावं लागन", असं म्हणून बबन्या लगबगीने बाहेर पडला.

ठमी व त्याचे काका त्याच्याकडे बघतच राहिले. बबन्या थोडा पुढे जात नाही तोच चिखलात घसरून पडला.

"आयायो वं ! माह्य कंबलडं मोडलं वो",बबन्या

बबन्याला दवाखान्यात नेऊन त्याच्यावर उपचार करण्यात आले. कमरेचे हाड दुखावल्यामुळे त्याला महिन्याभराची बेडरेस्ट सांगितली होती.

पाटलीण बाईंना हे कळताच महिनाभर का असेना सुटका झाली असे म्हणून त्यांनी निःश्वास सोडला.

ठमीला बबन्याची दया येत होती पण महिनाभर तरी बबन्याच्या जाहिरातींच्या प्रयोगापासून सुटका होणार या जाणिवेने तिला जरा हायसं वाटत होतं.

बबन्याच्या काकांना तर त्याला काहीतरी 'बाहेरची बाधा' झाल्याची शंका येत होती.

पण ह्या सगळ्यांकडे लक्ष देताना, आपलं जरा बबन्याकडे दुर्लक्षच झालं.

काय करत होता बबन्या?

"मै कहा हुं, म्या कुटं हावो?"

अरे बापरे! हा तर बबन्याचाच आवाज, आता हा कुठल्या जाहिरातीचा प्रयोग बरे?

ठमीने डोक्याला हात मारून घेतला.

*****समाप्त*****