महाजन
कुटुंब हे गुण्यागोविंदाने एकत्र पद्धतीने राहणारं असं कुटुंब होतं.
विद्याधरराव महाजन त्यांची पत्नी कुमुदिनीबाई
विद्याधररावांचे कनिष्ठ बंधू गंगाधरराव आणि
त्यांच्या पत्नी सुहासिनी बाई. विद्याधरराव आणि गंगाधरराव हे जुळे भाऊ. आणि
कुमुदिनीबाई आणि सुहासिनीबाई ह्या सख्ख्या जुळ्या बहिणी होत्या.
विद्याधर राव व कुमुदिनीबाईंचे दोन मुलं भास्कर आणि
पुष्कर हे जुळे होते. गंगाधरराव व सुहासिनीबाईंच्या दोन जुळ्या कन्यका इशा आणि
निशा दोघींचे लग्न व्हायचे होते.
भास्कर ची बायको भावना आणि पुष्कर ची बायको
प्रेरणा. भावना-प्रेरणा ह्या दोघी सख्ख्या जुळ्या बहिणी होत्या. भास्कर भावना ला
दोन जुळे 5 वर्षांचे मुलं होते ओम आणि सोम तर पुष्कर-प्रेरणाला दोन जुळ्या तीन
वर्षांच्या मुली होत्या सोहा आणि नेहा, असे चौदा जणांचे ते आनंदी कुटुंब होते.
आता दिवाळी आठ दिवसांवर येऊन ठेपली होती,घरात
दिवाळीची लगबग सुरू होती. घराची स्वच्छता, रंगरंगोटी, नवीन कपडे आणणे, फराळाचे रोज
एकेक पदार्थ बनवणे,कपाटातून आकाशकंदील काढून स्वच्छ करून तयार
ठेवणे,दिव्यांच्या माळा काढून दिवाळीला लावण्यासाठी सज्ज ठेवणे,जुन्या पणत्या
काढणे,नव्या पणत्या आणणे. हे सगळे कामं सुरू होते. ह्या सगळ्या कामात ओम-सोम
सोहा-नेहा लुडबुड करत असत.
भावना-प्रेरणा,इशा-निशा आणि
कुमुदिनीबाई-सुहासिनीबाई ह्या सगळ्या मिळून फराळाचे पदार्थ करायला बसत.
चिवडा,बेसनाचे लाडू,चकल्या,शेव,खारे- गोडे शंकरपाळे, करंज्या, अनारसे,चिरोटे असे
सगळे पदार्थ त्या करत होत्या.
आज बेसनाचे लाडू आणि करंज्या करून घेऊ असं त्यांनी
ठरवलं.
कुमुदिनीबाईं-सुहासिनीबाईंनी बेसन भाजायला घेतलं,
प्रेरणा-भावनाने गूळ किसायला घेतला, इशा-निशा विलायची कुटु लागल्या असं करता करता
लाडू चं मिश्रण तयार झालं, सगळ्या मिळून लाडू वळू लागल्या आणि एकेक लाडू बाजूच्या
परातीत ठेवू लागल्या. थोड्यावेळाने प्रेरणाच्या लक्षात आलं की लाडू जेवढ्याला
तेवढेच आहेत, आपण सगळ्या लाडू बांधून राहिलोय पण लाडूंची संख्या वाढायच्या ऐवजी
आहे तशीच राहतेय.
तिने हळूच लक्ष ठेवले आणि पटकन लाडू हळूच घेणारा
छोटा हात पकडला तशी सोहा पटकन पळून गेली,नेहा मात्र प्रेरणाच्या तावडीत सापडली.
भिंती पलीकडून छोटी नेहा आणि सोहा एकेक लाडू पळवत होत्या.
"ऐ लब्बाडे! तू आहेस तर! केव्हाचे एकेक लाडू
घेऊन चालली आहेस तू, एवढे लाडू तू खाऊन राहिली की काय? तू केवढीशी! इतके लाडू खाऊन
पोट बिघडेल न तुझं!",प्रेरणा नेहाला म्हणाली.
"मी एकतीच नाही खात आहे काई! सगल्यांना वाटून
खातेय मी. मला माहिताय शेअलिंग इज केअलिंग",नेहा बोबड्या स्वरात म्हणाली.
"बघू बरं तुझं शेअरिंग आणि केअरिंग", असं
म्हणून कुमुदिनी बाई बाहेर बैठकीत आल्या आणि अवाकच झाल्या. सगळ्यांच्या हातात अगदी
विद्याधररावांपासून तर ओम-सोम भास्कर-पुष्कर सोहा सगळ्यांच्या हातात एकेक
लाडू होता आणि सगळे हसत मजेत खात होते.
कुमुदिनी बाई आलेल्या बघताच सगळ्यांनी लाडू
लपवण्याचा निष्फळ प्रयत्न केला.
कुमुदिनी बाई डोक्याला हात लावून विद्याधर रावांना
म्हणाल्या,
" काय बाई! अगदी कहर झाला! लहान मुलं तर लहान
मुलं पण तुमचं काय? तुम्ही तर लहानापेक्षाही लहान झालात!", भास्कर-पुष्कर ला
उद्देशून त्या म्हणाल्या," आणि काय रे पोरांनो, तुमच्या बायका तिकडे मरमरून
लाडू करून राहिल्यात आणि इथे तुम्ही त्याचा फन्ना उडवणे सुरू केलं! अशाने लाडू कसे
मिळतील आपल्याला दिवाळीला."
भास्कर,पुष्कर आणि विद्याधर राव सगळे उरलेला लाडू
पटकन तोंडात टाकून उगीच इकडे तिकडे बघत बसले.
"भाऊजी बघा बरं! एक सुद्धा लाडू खाल्ला नाही
त्यांनी, त्यांच्या सारखं वागा जरा",असं कुमुदिनीबाईंनी गंगाधररावांचे कौतुक
करताच गंगाधररावांनी फुशारून विद्याधररावांकडे पाहिलं.
"अरे कशाचं शिका! माझ्या हातातला लाडू दादा मी
लहान आहे नं असं म्हणून ह्यानेच घेतला आणि क्षणात संपवला",विद्याधरराव
म्हणाले.
हे ऐकून कुमुदिनीबाईंनी कपाळाला हात लावला. आणि
सुहासिनीबाईं गालातल्या गालात हसू लागल्या.
"आजी काय होते गं आम्ही थोडे खाल्ले तर!तुझ्या
पूजेतल्या त्या बालकृष्णानेच खाल्ले असं का वाटत नाही तुला?", ओम आणि सोम
तोंडाचा चंबू करून म्हणाले.
"अरे बाळांनो खायला मी नाही म्हणतच नाही, पण
एकदम खाण्यापेक्षा हळूहळू खावं म्हणजे पोट बिघडत नाही, आता आपल्याकडे आपल्या
ओळखीतले लोकं येतील, हो की नाही! मग! म्हणून म्हटलं थोडं थोडं खा",कुमुदिनी
बाई नातवंडांचे गालगुच्चे घेऊन म्हणाल्या.
एका रविवारी कुमुदिनीबाई आणि त्यांच्या दोन्ही
सुना, सुहासिनी बाई आणि त्यांच्या दोन्ही मुली दिवाळीच्या खरेदीला गेल्या. जाताना
भावना-प्रेरणाने भास्कर-पुष्करला "आम्ही येईपर्यंत मुलांकडे नीट लक्ष द्या
बरं!" असं सांगितले.
घरच्या बायका बाहेर गेल्या आणि घरातल्या पुरुषांना
आणि लहान मुलांना खूप आनंद झाला. त्यांनी विचार केला की चला आता बिनधास्त फराळाचा
फडशा पाडता येईल पण घरच्या बायका सगळ्यांना ओळखून होत्या त्यांनी फराळाचे थोडे
थोडे पदार्थ फक्त बाहेर ठेवले बाकी सगळे पदार्थ कुलूपबंद करून ठेवून दिले.
सगळ्या पुरुष मंडळींची घोर निराशा झाली.
स्वयंपाक घराच्या ओट्यावर थोड्या प्रमाणात
ठेवलेले सगळे फराळाचे पदार्थ ओम-सोम आणि सोहा-नेहा ह्यांनी मिळून एक स्टूल
आणून त्याच्यावर चढून फस्त केले. त्यांची खुडबुड ऐकून त्यांचे आजोबा म्हणजे
विद्याधर राव आले आणि म्हणाले,
"काय रे बिलंदरांनो! काय कारभार सुरू आहे
तुमचा?"
"काही नाही आजोबा काहीच नाही",असं
हातवारे करून ओम-सोम आणि सोहा-नेहा ह्यांनी एक सुरात म्हंटल आणि अंगणात खेळायला
पळून गेले.
भलीमोठी खरेदी करून संध्याकाळपर्यंत सगळ्या बायका
परतल्या.
आमच्यासाठी काय आणलं असं म्हणून ओम-सोम आणि
सोहा-नेहा ह्यांनी लुडबुड करून सगळ्या बॅगा उघडून बघितल्या. स्वतः चे नवीन कपडे
आणि खेळणे घेऊन त्यांनी घरभर उच्छाद मांडला.
दिवाळी दोन दिवसावर येऊन ठेपली. महाजन निवास
सुशोभित झाले.
पुष्कर ने त्याच्या ऑफिस मधले कलीग घरी दिवाळीत
मुक्कामी येणार असं घरातल्या सगळ्यांना सांगितलं.
त्याचे हे दोन कलीग फॉरेनर होते एक लंडन चा जॉन
स्मिथ आणि एक टोकियो चा जेरी आबे. भारतात,महाराष्ट्रात त्यांची नुकतीच चार
महिन्यापूर्वी बदली झाली होती.
त्यांना भारतीय संस्कृती बद्दल फार कुतूहल असल्याने
त्यांना दिवाळी कशी असते हे अनुभवायचं होतं. एकूण काय त्यांना दिवाळीची नव्हाळी
होती त्यामुळे पुष्कर ने त्यांना आमच्या घरीच का येत नाही असं म्हणून निमंत्रण
दिलं होतं, त्यांनीही फार आनंदाने ते स्वीकारले.
पुष्करने त्यांना वसुबारस पासून तर भाऊबीजेपर्यंत
दिवाळीतल्या सगळ्या दिवसांचं महत्त्व थेरोटीकली सांगितलं. आता प्रॅक्टिकली बघायला
ते येणार होते.
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस उगवला.
पुष्करचे कलीग्स आले त्याने त्यांची व्यवस्था
वरच्या मजल्यावरील गेस्ट रूम मध्ये केली होती.
आल्या आल्याच जॉन आणि जेरी ने सगळ्यांना अभिवादन
केले.
घरातील सगळ्या जुळ्या मंडळींना बघून ते अवाकच झाले
पण जेव्हा त्यांना कळलं सगळ्या जुळ्यांमधले सगळे ज्येष्ठ सावळे आहेत आणि सगळे
कनिष्ठ गोरे आहेत तेव्हा त्यांना नावं आणि चेहरे लक्षात ठेवणे जमू लागलं.
"काय तुझं नाव बेटा",कुमुदिनीबाईंनी
विचारलं
"Nhamaste aunty! I am John
"(नमस्कार
काकू मी जॉन),असं जॉन ने सांगितलं.
"वाताशी वा जेरी आबे", असं जेरी म्हणाला(
म्हणजे माझं नाव जेरी आहे असं तो म्हणाला) आणि कुमुदिनी बाई उसळून म्हणाल्या,
"मुळीच नाही! साठी पार केली मी पण अजून सुद्धा
मला वात शिवला नाही! की मी जेरीस आली नाही! अगदी ठणठणीत आणि काटक आहे मी आणि बेटा
असं आल्या आल्याच पहिल्या भेटीत आबे तुबे करू नाही रे!",आणि लगेच
विद्याधररावांकडे बघून म्हणाल्या,"काय हो! सांगा याला, वात शिवला म्हणतो आणि
मी जेरीस आली म्हणतो हा! वरून आबे तुबे पण करतो!"
पुष्करने डोक्याला हात मारून घेतला,जेरी भांबावून
बघू लागला.
"अगं आई त्याने त्याच्या भाषेत त्याचं नाव
सांगितलं, तुला वात झाला असे तो कशाला म्हणेल, आणि त्याचं नाव जेरी आहे, तू जेरीस
आली असं नाही म्हंटल त्याने. आणि त्याचं आडनाव आबे आहे तुला कशाला आबे तुबे
करेल तो. उगीच गैरसमज नको करु",पुष्कर कुमुदिनीबाईंना समजावत म्हणाला.
"असं आहे काय! बरं बरं चालू द्या
तुमचं",कुमुदिनी बाई म्हणाल्या आणि स्वयंपाक घरात निघून गेल्या.
सुहासिनीबाई गालातल्या गालात हसत होत्या.
भावना-प्रेरणा हसू मोठ्या मुश्किलीने दाबून
बेडरूममध्ये पळून गेल्या. इशा-निशा एकमेकींना शुsss शांत राहा, हसू नको ह्या अर्थाने डोळ्याने दटावत तिथेच उभ्या
राहिल्या.
जॉन जेरीने सगळ्यांना हाय हॅलो केलं आणि ते गेस्ट
रूम मध्ये निघून गेले.
संध्याकाळी अंगणात इशा आणि निशा ने सुंदर रांगोळी
काढली.
संध्याकाळी कुमुदिनीबाई आणि सुहासिनीबाईंनी गाई आणि
वासराला नैवेद्य दाखवून ओवाळले.
जॉन आणि जेरी कुतूहलाने बघत होते. पुष्कर ने
त्यांना सांगितलं की तुमच्याकडे कसे वेगवेगळे डेज साजरे करून कृतज्ञता व्यक्त
करतात तसेच आमच्याकडे वसुबारस ला गाईवासराला ओवाळून कृतज्ञता व्यक्त करतात.
त्यांना फारच छान वाटलं.
"Wow what a beautiful design!! It's Rangoli
! Isn't it?"(व्वा किती छान नक्षी आहे! ही रांगोळी आहे न!), जॉन पुष्करला
म्हणाला.
"येस माय सिस्टर्स ह्याव ड्रॉन
दॅट"(माझ्या बहिणींनी काढली रांगोळी),पुष्कर
बाजरीची भाकरी, ठेचा,लोणी मिक्स भाजी, मोतीचूर लाडू
असा वसुबारस दिवशी जेवणाचा बेत होता.
"It's too spicy सss",जॉन म्हणाला.
जॉन ला ठेचा आणि भाजी दोन्ही तिखट झाले होते.
जेरी मात्र शांतपणे जेवत होता त्याला बहुतेक तिखट
खाण्याची सवय असावी.
"तिखट झालं का बेटा! घे लाडू
खा!",कुमुदिनी बाई म्हणाल्या.
"अगं आई त्याला एवढं मराठी समजत
नाही",असं पुष्कर म्हणाला आणि जॉन कडे बघून म्हणाला,"ईट दॅट स्वीट
मोतीचूर लड्डू"
जॉन ने पटकन पाण्याचा पेला तोंडाला लावला आणि लाडू
खाल्ला तेव्हा कुठे त्याला बरं वाटलं.
ओम-सोम आणि सोहा-नेहा जॉन काका आणि जेरी काका
म्हणून त्यांच्या मागे लागले.
सोहा-नेहा जॉनला म्हणाल्या,"तू लहानपणी चोरून
साखर खात होता का? म्हणूनच तुझे बाबा तुला जॉनी जॉनी eating शुगर असं म्हणत होते न"
पुष्करने जॉनला त्याचा अर्थ सांगताच तो हसायला
लागला.
इकडे ओम-सोम जेरी ला टॉम ला का नाही आणलं? आम्हाला
किती आवडतात टॉम आणि जेरी असं म्हणून मागे लागले.
"चला रे मुलांनो झोपा आता जॉन आणि जेरी
काकांना झोपू द्या", असं म्हणून भास्कर ने त्यांना आत नेलं.
दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी होती, सगळ्यांनी स्नानादि
आटोपून फराळ केला, जॉन ला मुळीच तिखट खाण्याची सवय नसल्याने त्याचं पोट बिघडलं,
टॉयलेट च्या अनेक वाऱ्या करून तो थकून झोपून गेला.
संध्याकाळी जॉन ला बरं वाटू लागलं म्हणून तो खाली
येऊन अंगणात उभा राहिला.
अंगणात निशा पणत्या लावत होती.
Can I help you? (मी काही मदत करू का?),जॉन ने विचारलं.
नो थँक्स, निशा म्हणाली.
तेवढ्यात आतून भास्कर आणखी पणत्या घेऊन आला आणि
निशाला देत देत जॉन ला have a seat (बाजूला असलेल्या झोक्यावर बस) असं म्हणाला.
जेरी आणि पुष्कर इलेक्ट्रिक लायटिंग माळा टेरेसवर
लावत होते.
इशा आणि भावना-प्रेरणा रांगोळी काढत होत्या.
विद्याधरराव आणि गंगाधरराव ओम-सोम आणि सोहा-नेहा
बरोबर फुलझडया उडवत होते, कुमुदिनीबाई आणि सुहासिनीबाई घरात काहीतरी काम करत
होत्या.
सगळे जण काही न काही कामात होते.
अश्या तऱ्हेने आनंदात तो दिवस साजरा झाला. सगळे
लवकर झोपले कारण दुसऱ्यादिवशी नरकचतुर्दशी होती त्यामुळे सगळ्यांना पहाटेच उठायचं
होतं.
जॉन आणि जेरी ला उद्या पहाटे उठायचं असते आणि
सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करायचं असते असे पुष्कर ने सविस्तर समजावून
सांगितले, नरकासुराची गोष्ट पण सांगितली. सगळे पहाटेचा गजर लावून झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी सगळ्यांचं सूर्योदयापूर्वी साग्रसंगीत शहनाईच्या सुरात सुगंधी
उटणे-तेल लावून अभ्यंग स्नान झालं.
जॉन जेरीलाही पुष्करने सुगंधी तेल आणि उटणे दिले
कसे लावायचे हे सुद्धा सांगितलं आणि त्यांच्याही रूम मध्ये शहनाई ची ट्यून लावून
दिली.
थोड्यावेळाने जॉन खाली आला आणि समोर विद्याधरराव
बसले होते त्यांना तो 'उटना' असं म्हणाला, वास्तविकतः झालं काय होतं की जेरीने
पूर्ण उटणं संपवलं होतं त्यामुळे जॉन साठी काहीच उरलं नव्हतं म्हणून तो खाली उटणं
मागायला आला पण त्याच्या 'उटना' उच्चारामुळे विद्याधररावांना वाटलं की तो त्यांना
गप्पा मारण्यासाठीच उठ ना असं म्हणून राहिला की काय.
विद्याधरराव उठले आणि त्याच्याजवळ जाऊन
म्हणाले
"टेल बेटा, व्हॉट हापंड?" (सांग बेटा काय
झालं?)
जॉन ला वाटलं ते उटणं देण्यासाठीच आले की
काय,त्याने एकदा पुन्हा म्हंटल उटना
"अरे मी उठलोच आहे, आता ज्या अवस्थेत मी आहे न
त्याला उठलेलाच म्हणतात अजून काय उटना?",विद्याधरराव आश्चर्य चकित होऊन
म्हणाले.
जॉन गोंधळून त्यांच्याकडे बघू लागला.
त्याला गोंधळलेला बघून परत विद्याधरराव इंग्लिश
बोलण्याचा प्रयत्न करत म्हणाले,
"व्हाय आर यु गोंधलींग बेटा, आय ह्याव अलरेडी
उठन "(तू का गोंधळला बेटा मी आधीच उठलो आहे)
जॉन ला काय बोलावं कळेचना, तेवढ्यात पुष्करने तिथे
येऊन जॉन ला उटण्याची वाटी दिली. जॉन सुटकेचा श्वास सोडून वर पळून गेला.
"अहो बाबा! तो उटणं मागत होता,तुम्ही काय बोलत
होते त्याच्याशी?",पुष्कर वैतागत म्हणाला.
"असं काय! मला वेगळंच वाटलं काहीतरी",
असं म्हणत मिशीतल्या मिशीत हसत ते निघून गेले.
इकडे पुन्हा एकदा भावना-प्रेरणा हसू दाबत
बेडरूममध्ये पळून गेल्या, इशा-निशा एकमेकींना शुsss शांत राहा, हसू नको ह्या अर्थाने डोळ्याने दटावत तिथेच उभ्या
राहिल्या आणि सुहासिनीबाई पुन्हा एकदा स्वयंपाक घराच्या दारात उभ्या राहून
गालातल्या गालात हसत होत्या.
अश्या तऱ्हेने सगळ्यांचे स्नान उरकले गंगाधररावांनी
देवाची पूजा केली, देवाला नैवेद्य दाखवून सगळ्यांना फराळ दिला.
ओम-सोम आणि सोहा-नेहा एकमेकांशी तोंडात घास ठेवून
गंभीर विषयावर चर्चा केल्यासारखे बोलत होते.
भास्कर-पुष्कर ने जॉन आणि जेरींना सगळ्या फराळाच्या
पदार्थांचे नावं सांगितले ते कशापासून बनवतात हे ही सांगितलं.
जॉन wow! Delicious! (व्वा चविष्ट!)म्हणत खात होता. जॉन ने तिखट पदार्थ बेतानेच घेतले
होते, गोड पदार्थांनाच त्याने आज प्राधान्य दिलं होतं.
जेरी oishi sugiro tabemono(खूप स्वादिष्ट अन्न!) म्हणत खात होता.
"बाई ह्याला तर मालवणी सुद्धा येते की काय!
आईशी आईशी म्हणतो हा!",कुमुदिनीबाई म्हणाल्या.
"अगं आई तो ऑईशी म्हणजे स्वादिष्ट टेस्टी झालंय
सगळं असं म्हणतोय! मालवणी कुठून आलं इथे? तू लक्ष देऊ नको बरं त्याच्या
बोलण्याकडे!",भास्कर म्हणाला.
पुन्हा एकदा भावना-प्रेरणा हसू दाबत बेडरूममध्ये
पळून गेल्या. इशा-निशा एकमेकींना शुsss शांत राहा, हसू नको ह्या अर्थाने डोळ्याने दटावत तिथेच उभ्या
राहिल्या आणि सुहासिनीबाई गालातल्या गालात हसल्या.
"बरं! राहिलं!",कुमुदिनीबाई म्हणाल्या.
कुमुदिनीबाईंनी विद्याधरराव आणि गंगाधररावांना
फराळाची थाळी दिली,तेव्हा विद्याधरराव त्यांना म्हणाले,
"अरे एक गोष्ट विसारताय तुम्ही
कुमुदिनीबाई!"
"कोणती?"
"ह्या फराळाच्या थाळीसोबत एक एक छोटी हातोडी
पण द्या सर्वांना म्हणजे अनारसे फोडून खायला बरं"
हे ऐकताच कुमुदिनीबाई डोळे मोठे करून म्हणाल्या,
"काही टोमणे मारायची गरज नाही बरं! मागच्या
वेळेस झाले होते थोडे कडक अनारसे पण ह्यावेळेस खूप कुरकुरीत झालेले आहेत, आधी खाऊन
तर बघा!"
"कशाचे थोडे कडक? मागच्यावेळेस अनारसे
खाल्ल्यामुळेच ही कवळी बसवावी लागली मला!",असं म्हणून विद्याधरराव आपल्या
फराळाच्या थाळी कडे वळले आणि थाळीतले अनारसे कमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आलं.
"अरे माझ्या थाळीतले अनारसे कुठे
गेले?",विद्याधरराव म्हणाले.
गंगाधररावांनी त्यांच्या खांद्याला हात लावून
म्हंटल,
इकडे बघ दादा! इथे आहेत तुझे अनारसे!",असं
म्हणून स्वतःच्या पोटाकडे अंगुलीनिर्देश केला.
"घ्या! दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ
झाला",कुमुदिनीबाई आतून म्हणाल्या.
सुहासिनीबाईं परत एकदा गालातल्या गालात हसल्या.
"अरे तूच म्हंटल न अनारसे चावल्या जात नाही
म्हणून. तुला त्रास होऊ नये म्हणून मी तुझी मदत केली!",गंगाधरराव भोळा भाव
आणून म्हणाले.
"आहाहाहा!! फार छान मदत केली तुम्ही
गोडाजी!!", असं गंगाधररावांना म्हणून आत बघत विद्याधरराव मोठ्याने
म्हणाले,"मला पण दे गं अनारसे, आता तशीही कवळी लागलीच आहे तर खाऊन बघतो"
आतून सुहासिनीबाई अनारसे घेऊन आल्या. त्यांना बघत
गंगाधरराव म्हणाले,
" तुझं नाव सुहासिनी आहे हे सगळ्यांना माहीत
आहे त्यासाठी सारखं गालातल्या गालात हसायची काय गरज?"
हे ऐकूनही सुहासिनीबाई विद्याधररावांना अनारसे
वाढून गालातल्या गालात हसतच स्वयंपाक घरात निघून गेल्या.
सगळ्यांनी यथेच्छ फराळ केला आणि तृप्तीचा ढेकर
दिला.
दुपारी जेवणं आटोपल्यावर सगळे थोडावेळ झोपले.
संध्याकाळी लक्ष्मीपूजन होतं.
सगळ्यांनी नवनवीन कपडे, दागिने घातले होते, कपाळाला
कुंकू-गंध लावलं होतं. जॉन-जेरी दोघांनी छान रेशमी झब्बा पायजमा घातला होता,
कपाळाला गंध लावून घेतलं होतं.
भास्कर-पुष्कर ने जॉन जेरीला लक्ष्मीपूजनाबद्दल
माहिती दिली त्याचं काय महत्व आहे ते सांगितलं.
विद्याधररावांनी पूजा केली, नैवेद्य दाखवला,
सगळ्यांनी आरती केली. कोणी टाळ्या वाजवत कोणी टाळ वाजवत छान आरती झाली.
सगळ्यांचा फोटो काढण्याचं ठरलं, सगळे जण उभे
राहिले, विद्याधर राव जॉन ला म्हणाले "जॉन स्मिथ, कर जरा तू स्मित" आणि
जेरीला म्हणाले " आबे, इकडे उभा राहा म्हणजे फोटोत येशील" जॉन आणि
जेरीला काही कळलं का नाही माहीत नाही पण विद्याधररावांच्या हातवारे बोलण्यावरून
काय करायचंय हे त्यांना कळलं. जॉन ने smile(स्मित) केलं आणि जेरी विद्याधररावांच्या जरा जवळ सरकला त्यामुळे
ऑटोमॅटिक कॅमेराने सगळ्यांचा छान फोटो आला.
त्यानंतर सगळे अंगणात फटाके उडवू लागले. फुलझडया,
बॉम्ब, सापाच्या गोळ्या, लाईट्स, झाड, अनार, रॉकेट, चक्र असे सगळे फटाके उडवून
झाले.
ओम-सोम आणि सोहा-नेहा ने जॉन-जेरीचा ताबा घेतला.
जॉन च्या खांद्यांना एकीकडून ओम दुसरीकडे सोम आणि जेरीच्या खांद्यांना एकीकडे सोहा
आणि दुसरीकडे नेहा असे लटकले आणि त्यांना गोल फिरायला लावून चक्री-चक्री खेळले.
सगळ्यांनी एन्जॉय केलं.
दुसऱ्यादिवशी पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी होते.
पाडव्याला स्त्रिया वडिलांना, काकांना औक्षण करतात, पत्नी आपल्या पतीला ओवाळते.
घरातील कर्त्या पुरुषांना ओवाळण्याचा तो दिवस असतो. तसेच भाऊबीजेला बहीण आपल्या
भावाला ओवाळते. असं सगळं सविस्तर भास्कर-पुष्कर ने जॉन-जेरीला सांगितलं. त्यांनीही
ते नीट लक्ष देऊन ऐकलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सगळ्यांचं
अभ्यंगस्नान आटोपलं, पूजा-नैवेद्य-फराळ आटोपला.
आता जॉन ला थोडं थोडं तिखट खायची सवय झाली होती.
दुपारी पंचपक्वान्नाचा बेत होता. सगळ्यांनी जेवण झाल्यावर दिवसभर छान गप्पा
मारल्या, आराम केला आणि संध्याकाळी सगळे मेकअप करून फटाके उडवायला तय्यार झाले.
थोडे फटाके उडवल्यावर, ओवळण्याची तयारी।झाल्यामुळे
सगळे पुरुष रांगेत बसले. पाडव्यानिमित्त इशा-निशा, भावना-प्रेरणाने विद्याधरराव
आणि गंगाधरराव ह्यांना ओवाळले. कुमुदिनीबाईंनी विद्याधरराव आणि सुहासिनीबाईंनी
गंगाधररावांना ओवाळले. भावनाने भास्करला आणि प्रेरणाने पुष्करला ओवाळले.
भाऊबीजेच्या निमित्त ओम-सोम ला सोहा-नेहा ने
ओवाळले. भाकर-पुष्कर ला इशा-निशाने ओवाळले.
सगळ्या पुरुषांनी स्त्रियांना ओवाळण्या
दिल्या.
जॉन-जेरीच्या आग्रहाखातर भाऊबीजेच्या निमित्त
त्यांनाही भावना-प्रेरणा आणि इशा-निशाने औक्षण करायचं असं ठरलं.
जॉन ला भावनाने,मग प्रेरणाने त्यानंतर इशाने ओवाळले
त्याने सगळ्यांना ओवाळणी दिली आणि निशा ओवाळायला येणार तेवढ्यात
थँक यु ! वेरी मच! असं म्हणत जॉन हसत उठून गेला.
जेरीलाही भावना,प्रेरणा आणि निशाने ओवाळले त्यानेही
सगळ्यांना ओवाळणी घातली आणि इशा ओवाळायला येणार तेवढ्यात
अरीगतो(धन्यवाद) असं म्हणून जेरी कोणाचा तरी आलेला
फोन घेत उठून गेला.
सगळे गप्पांच्या गडबडीत होते, त्यांना काही लक्षात
आलं नाही पण पुष्करच्या लक्षात आलं की भाऊबीजेच्या निमित्ताने जॉन ने निशाकडून आणि
जेरीने इशाकडून ओवाळून घेतलं नाही, हे योगायोगाने झालं की मुद्दामहून हे मात्र
त्याला कळलं नाही. ते दिवाळी झाल्यानंतर ऑफिसमध्ये क्लीअर होईलच ह्याची त्याला
खात्री होती.
रात्री सगळ्यांचे गप्पा मारत मारत जेवणं आटोपले,
सगळे रात्री गच्चीत गप्पा मारत बसले. जॉन आणि जेरी पुष्करच्या घरातील खेळीमेळीचे
वातावरण बघून,दिवाळीचा सोहळा बघून भारावून गेले. त्यांनी पुष्करला आणि घरच्या
सगळ्यांना धन्यवाद दिले.
सगळे जण आपापल्या खोलीत जाऊन झोपी गेले.
रात्री झोपायच्या आधी जॉन-जेरीला काही हवं नको
बघायला भास्कर-पुष्कर त्यांच्या गेस्ट रूम मध्ये आले
तेव्हा जॉन ने त्याला निशाशी लग्न करण्याची इच्छा
आणि जेरीने त्याला इशाशी लग्न करण्याची इच्छा जाहीर केली. हे ऐकून भास्कर-पुष्कर
आश्चर्यचकित झाले.
पुष्करने दोघांना इंग्लिश मध्ये म्हंटल की असं कसं
जमेल? आमचं मराठी कल्चर! तुमचं विदेशी कल्चर! वेगवेगळं. पुन्हा आईबाबा,काका
काकूंचं काय मत आहे हे जाणून घ्यावे लागेल. विशेष म्हणजे इशा-निशा ला काय वाटते
हेही जाणून घ्यावे लागेल. आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत, आणि आमच्याकडे असलेल्या
पद्धतीप्रमाणे इशा-निशा साठी आम्हाला जुळे मुलंच बघावे लागतील,त्याव्यतिरिक्त इशा
निशाला टोकियो आणि लंडन सारख्या लांब ठिकाणी द्यायचं की नाही हे सुद्धा काही
ठरलं नाही.
त्यावर जॉन म्हणाला, "I will learn Marathi, I Will
become pure vegetarian and will adapt your culture. I will completely change
myself for Nisha. And we have already decided to settle in Maharashtra "(मी मराठी शिकेन,मी शुद्ध शाकाहारी होईल, मी मराठी
संस्कृती आत्मसात करेन. मी निशासाठी पूर्णतः बदलेल आणि आम्ही आधीच इथेच
महाराष्ट्रात स्थायिक होण्याचे ठरवले आहे.)
जेरीनेही इशासाठी मी पूर्णपणे बदलेल असं सांगितलं.
"आणि जुळे असण्याबद्दल काय?",पुष्कर
म्हणाला.
त्यावर जॉन म्हणाला की तो आणि जेरी सख्खे जुळे भाऊच
आहेत. हे ऐकून पुष्करला आश्चर्य वाटलं.
"ते कसं काय शक्य आहे काहीही गम्मत करू नको.
तू लंडनचा हा टोकियोचा?"
तेव्हा जॉन-जेरीने त्याला सांगितलं की जॉन-जेरीचे
वडील ब्रिटिश आहेत आणि त्यांची आई जपानी आहे. जॉन-जेरीचा जन्म एकाच दिवशी एकाच
आईच्या पोटी एकच वेळी झाला. त्यांचे चेहरे सारखे नव्हते, जॉन वडीलांसारखा आणि जेरी
आईसारखा दिसत होता पण होते ते जुळेच भाऊ.
"अरे पण मग तू लंडनला आणि हा टोकियोला कसे
राहत होतात?", पुष्करने जॉनला आश्चर्याने विचारले.
त्यावर जेरीने सांगितले की जेरीला त्याच्या
आत्याकडे तिला मुलबाळ नसल्याने लहानपणी दत्तक दिलं होतं, त्याची आत्या
ब्रिटिश आहे आणि तिचा नवरा जापनीज आहे. आणि आता सगळ्यात आश्चर्याची गोष्ट
म्हणजे जॉन-जेरीचे बाबा-आत्या आणि आई-मामा हे जुळे भावंडं आहेत.
जॉन ने भास्कर-पुष्करला त्यांचे सगळे फॅमिली
फोटो दाखवले.
ते बघून ते खरं बोलतायेत याची त्यांना खात्री पटली.
आश्चर्याने थक्क होण्याची पाळी आता भास्कर-पुष्कर वर आली होती. काहीवेळ ते शांतच
बसून राहिले.
थोड्यावेळाने भास्कर-पुष्कर जॉन-जेरीला म्हणाले,
"ठीक आहे आपण विचार करू आणि मगच काय ते ठरवू आत्ताच वाच्यता करू नाही,
सगळ्यांच्या मनाचा कल बघूनच आपल्याला ठरवावं लागेल."
जॉन जेरीलाही ते पटलं. भास्कर-पुष्कर जॉन-जेरीला
शुभरात्री म्हणून खाली येऊन आपापल्या खोलीत झोपून गेले.
सकाळी सगळ्यांचे जेवणं झाल्यावर कुमुदिनीबाई आणि
सुहासिनी बाईंनी जॉन-जेरीला फराळाचा डबा दिला.
घरातील सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी जॉन-जेरीला मधून
मधून येत जा हं घरी, असं सांगितलं.
त्यांनीही ते मोठया आनंदाने मान्य केलं.
जाताना जॉन ने नजरेनेच पुष्करला मी काय म्हंटल ते
लक्षात असू दे अश्या अर्थाने खूण केली.
पुष्करने ही नजरेने त्याला आश्वासित केलं.
घरातील सगळ्या ज्येष्ठ मंडळींना नमस्कार करून ते
आनंदाने, समाधानाने आपल्या निवासस्थानी निघाले.
अश्या तऱ्हेने महाजन कुटुंबियांची नव्हाळीची दिवाळी
साग्रसंगीत आनंदाने साजरी झाली.
★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★