योगीनींचा बेट - भाग १ Balkrishna Rane द्वारा विज्ञान-कल्पनारम्य मराठी में पीडीएफ

Featured Books
  • लोभी

          "लोभी आधुनिक माणूस" प्रस्तावनाआजचा आधुनिक माणूस एकीकडे...

  • चंद्रासारखा तो

     चंद्र आणि चंद्रासारखा तो ,जवळ नाहीत पण जवळ असल्यासारखे....च...

  • दिवाळी आनंदाचीच आहे

    दिवाळी ........आनंदाचीच आहे?           दिवाळी आनंदाचीच आहे अ...

  • कोण? - 22

         आईने आतून कुंकू आणि हळदची कुहिरी आणून सावलीचा कपाळाला ट...

  • कथानक्षत्रपेटी - 4

    ....4.....लावण्या sssssss.......रवी आणि केतकी यांचे लव मॅरेज...

श्रेणी
शेयर करा

योगीनींचा बेट - भाग १

योगीनींचे बेट
भाग१- बेटावरची कातळ शिल्पे

अठ्ठ्याहत्तर एकरवर पसरलेले एक अनोखे बेट म्हणजे पाणखोल बेट! चाळीस एक घरे...सुमारे नव्वद माणसे बेटावर वस्तीला.
सभोवार पाणी.... भन्नाट वारा...निळ्या आकाशात उडणारे सीगल पक्षी.किनाऱ्याला मासे टिपण्यासाठी टपून बसलेले बगळे.
बेटावरून बाहेर जाण्या येण्यासाठी होडी शिवाय दुसरा पर्याय नाही.प्रत्येक कुटुंबाची स्वतःची होडी.या होडीतून मुलांचं शाळेत जाणं व येणं तसच मालवणला बाजारासाठी जाणं येणे होते.बाहेरच्या
माणसाला बेटावर जायचं असेल तर बेटावरूनच एखाद्या होडीवाल्याला बोलवावं लागत. मी व अशोक(माझा मित्र) बेटाजवळ गेलो तेंव्हा आमचा नावाडी(बावकर) तिथे धक्क्यावर हजर होता.पाणखोलच्या खाडीकडे पोहचेपर्यंत पावणेतीन वाजले होते.पोटातले कावळे कोकलून मलूल पडले होते.पण समोरच दृश्य बघितल्यावर डोळ्यांची व पोटाची भूक उलट वाढली .उन्हात चमकणार पाणी...बेभान वारा...बेटाला कवटाळून बसलेली माडाची झाड...पाणी कापत एक होडी चालली होती. बहुधा बेटावरच एक कुटुंब होडीतून मालवणला चाललं होतं.
आम्ही होडीत बसलो. पाणी कापत होडी झपाझप समोरच्या किनार्यावर पोहचली.बेटावर पाय ठेवताच जाणवलं इथली हवा ...इथली माती वेगळी आहे.जिथ होडीतून उतरलो तिथे समोरच चौथी पर्यंतची मराठी शाळा दिसली.रविवार असल्याने शाळा बंद होती. या शाळेत एकूण नऊ मुलं आहेत अस होडीवाल्यान सांगितले.या शाळेत दोन शिक्षक असून ते होडीनेच शाळेत येतात व जातात. मला क्षणभर वाटलं की किमान महिनाभर अश्या शाळेत काम करायला मिळालं पाहिजे होत.इथे बाहेरच्या जगातले आवाज नव्हते. फक्त वार्यावर सळसळणारी पाने.... काठावर आदळणारे पाणी...पक्ष्यांचे आवाज ... आणि वार्याचा धोंगावता आवाज बस्स एवढंच.
आमचे यजमान आम्हाला घेऊन त्यांच्या घराच्या पाठीमागे माडांच्या गर्दीत असलेल्या मोकळ्या जागेत घेऊन गेले. एक टेबल व खुर्च्या मांडलेल्या होत्या.जेवणाची ताटे समोर आली.चिकण व मासे यावर ताव मारला.पापड वार्यावर उडतील एवढा सुसाट वारा होता.डोलणारी झाड...सात आठ फुटांवर झगमगणार पाणी...वर माडांची झावळ...
हवेचा खारा गंध...या वातावरणात जेवण म्हणजे गंमतच.सायंकाळी बेटावर फेरफटका मारला.इथे खारी जमीन असली तरी शेती केलेली दिसत होती.
गवताच्या कुड्या...एक देऊळ.... भाजीपाला लागवड...वड व पिंपळाची प्रचंड झाडे...गुरांचे गोठे...मोकळ्या जागेत व्हॉलीबॉल खेळणारी मुलं..
आम्हाला दिसली.इथल पाणी मचूळ असल्याने ग्रामपंचायतीने पाणी नळाद्वारे बेटावर पोहचवले आहे. पावसाळ्यात काही वेळा बेटावर फूट दोन फूट उंची पर्यंत पाणी चढत.१९८३ सालात मात्र प्रचंड पाणी बेटावर चढले होते व सर्व रहिवाशांना वरच्या मजल्यावर चढून आश्रय घ्यावा लागला होता.
जेवल्यावर जलफेरीसाठी पुन्हा किनार्यावर आलो.
होडीतून जात असताना....समोरच एक वीतभर लांबीचा चमकता मासा हवेत उडी घेत सात ते आठ फूट पाण्यात अंतर कपात पुन्हा पाण्यात पडला.वाळू काढणारी काही होडकी खाडीत आली होती.ऊन कमी झाल्यावर ते वाळू काढण्यासाठी
आले असावेत.प्रत्येक होडीवर दहा बारा कामगार होते. सगळे परप्रांतीय कामगार होते.जोमाने वाळू काढत होते. खाडीवरील पुलाला वळसा घालत आमची होडी खोतजुवा येथे गेली.हे सुध्दा एक बेट होते.नारळी पोफळीची झाड ...आधुनिक शिडी वापरून नारळ काढणारी माणसं दिसली.थोडा वेळ तिथल्या सावलीत बसून आम्ही पुन्हा पाणखोल बेटाकडे परतलो.साधारण तासाभराचा प्रवास आम्ही केला.
आम्ही इथं आलो त्याच कारण वेगळंच आहे.इतिहास संशोधन व पुरातन वस्तू गोळा करण्याचा माझा छंद(संदर्भ- गूढ,लालसा, तांडव कथा) मला सतत भटकंती करायला लावतो.दोन दिवसांपूर्वी मी वर्तमानपत्रात बातमी वाचली की मालवणला हडी येथील पाणखोल बेटावर काही कातळ शिल्पे सापडली आहेत.त्यांचे फोटो बघून मी काही ठोकताळे बांधले होते.मला ती कातळशिल्पे किमान सातशे वर्षांपूर्वीची वाटत होती. आकृत्या अनाकलनीय होत्या.चित्र विचित्र आकृत्या ....काही भूमितीय रचना...त्यात होत्या. माझ लक्ष वेधून घेतले ते एका दांडगोलाकृती आकाराच्या मोठ्या आकृतीने! वर व खाली गोलाकार भागात छोटे कप्पे दिसत होते.तर दंड गोलाच्या मधल्या भागात बंद दरवाजा असतो तस् वाटत होत.काय होते ते?एखाद हत्यार...की एखाद यान ! नेमक कळत नव्हत. एकंदरीत ती चित्रे व चिन्ह बघून ती कातळ शिल्प किमान सातशे वर्षांपूर्वीची असावित असं वाटतं होतं.मी सारी माहिती मिळवली.हडी हे बेट सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे आहे.यापूर्वी मी सिंधुदुर्ग किल्ल्यावर दोन वेळा गेलो होतो.त्यामुळे तिथला परिसर व वातावरण परिचित होते. मी हडीला भेट देण्याचं निश्चित केलं तेव्हा माझा मित्र अशोक माझ्या सोबत यायला स्वतः तयार झाला.मी त्याला अश्या संशोधना वेळी येणारे धोके समजावले पण तो ऐकेना.अखेर त्याला सोबत घेऊनच मी मालवण गाठले.आम्ही बुलेट घेऊनच कोल्हापूरहून मालवणला आलो होतो.( बुलेट किनार्यावर ठेवावी लागली होती.)
चहा झाल्यावर मी बावकरला म्हणालो...
" आम्हाला कातळ शिल्पे बघायची आहेत.इथून किती वेळ लागेल?"
तो काही क्षण गप्प राहिला.
" पंधरा एक मिनिट लागतील. पण काळोख पडण्याअगोदर जाऊन यावं लागेल."
"काळोख पडण्यापूर्वी! पण का?" मी विचारले.
" ती कातळ शिल्पे सापडल्यावर गेल्या पंधरा दिवसात काही अश्या घटना घडल्या की लोक दिवसाही तिथे जायला घाबरतात."
" नेमकं काय घडलंय?" मी उत्सुकतेने विचारले.
" रात्री विचित्र व भयावह आवाज येतात...तिथल्या वातावरणात क्षणाक्षणाला बदलत होतो. कधी सौम्य प्रकाश तर कधी मिट्ट काळोख...कधी संगीत तर कधी स्मशान शांतता.ज्या गुराख्याला ती शिल्पं सापडली तो आता वेड्यागत फक्त समोर बघत राहतो. या सगळ्या घटनांमुळे तिथे जायला कोणीच तयार नाही."
हे ऐकून माझी उत्सुकता आणखीनच वाढली.आम्ही तिघे तातडीने तिथं जायला बाहेर पडलो. पंधरा मिनिटांत आम्ही त्या जागेजवळ पोहोचलो. संपूर्ण बेट हे सपाट जमिनीवर पसरले होते.पण या जागी शंभर एक मीटरचा परीसर सुमारे विस ते पंचवीस फूट उंच होता. कातळ व त्यावर मातीचे ढिगारे दिसत होते.या मातीच्या ढिगाऱ्याखाली कातळावर विविध आकृत्या दडलेल्या आहेत हे कुणालाच माहीत नव्हते. त्या गुराख्याने सहज म्हणून काठीने खोदल्यावर त्याला ठिकाणी काही चित्रे दिसली होती.आम्ही तो उभा चढ चढलो.काताळावरचे मातीचे ढिगारे बाजूला केल्याने परीसर मोकळा झाला होता.समोर काळ्याशार दगडांवर स्पष्ट अश्या आकृत्या चितारलेल्या होत्या.दगडावर आकृत्या काढण्यासाठी
टोकदार व कठिण हत्यारांचा वापर केला होता. काही मानवी आकार ... काही चिन्हे.... काही प्राणी त्यात बैल...वाघ.. हत्ती..हरण अशी चित्रे होती.मी सगळी चित्रं न्याहळत पुढे सरकलो.अगदी टोकाला खाडीच्या किनार्यावर ती दंडगोल आकृती मला दिसली साधारण दहा फूट लांब व पाच ते सहा फूट
रूंद अशी ती आकृती होती.मी बारकाईने तरीच निरीक्षण करत होतो.ते एखादं अंतरीक्ष यान असावं या मतापर्यंत मी पोहोचलो होतो.मागच्या भागात इंधन व मधल्या भागात प्रवासी बसत असावेत.पण सातशे वर्षांपूर्वी असं यान अस्तित्वात होतं का? त्यांचा वापर होत होता का? की हे कुणी कल्पकतेने चितारलेले चित्र आहे?असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले.
" पावण्यांनू लवकर चला. काळोख पडताहासा." बावकर म्हणाला.
" होय , चला." त्याची भिती लक्षात घेता मी म्हणालो.
खरं तर मला त्या अर्ध्या तासात तिथं काही वेगळेपण वाटलं नव्हतं.
अंधुक प्रकाशात आम्ही खाली उतरु लागलो.पाय घसरू नये म्हणून खबरदारी घ्यावी लागत होती.सोबतीला जोरदार गार असा वारा सुटला होता आणि अचानक एक वातावरण चिरीत जाणारा आवाज कानात घुमला.तो आवाज एवढा विलक्षण होता की ह्रदयात धडधड सुरु झाली.
" पावण्यानू ऐकलात...?"
" होय, कदाचित वारा खडकांच्या भेगांमधून घुमत येत असल्याने असा आवाज येत असावा." मी काहीतरी बोलावे म्हणून म्हणालो.
आम्ही झपाझप पावलं टाकत बावकरांच घर गाठलं.मी रात्री तिथं पुन्हा जाण्याचं निश्चित केलं होतं.चहा पिऊन आम्ही अंगणात बसलो.गार वारा ..
लाटांचा आवाज... रातकिड्याचे आवाज यामुळे वातावरणात एक रंगत आली होती.
एवढ्यात कानांवर गलका ऐकू आला. बॅटर्या ...मोबाईलच्या फ्लॅश लाईटचा प्रकाश दिसू लागला.दहा एक माणसं बांवकरा़च्या अंगणात आली.
" मयग्या (महेश), अरे बाहेरे ये. "
"काय झाला? असे भियाल्यासारखे घाईघाईने कश्याक ईलात?"
" अरे, बाळगो (बाळा) गायब झालो हा."
" नीट बघल्यास, मालवणाक गेलो आसात!" मिठबावकराने विचारलं.
" सगळ्या होड्या जागेवर आहेत.त्याचा फोनही लागत नाही.काही वेळापूर्वी त्याला त्या जोगीणींच्या माळाकडे जाताना दामोदर ने बघितले होते." प्राथमिक शाळेतले शिंदे गुरुजी म्हणाले.
" म्हणजे त्या कातळाकडे! अरे देवा!"
मी कान टवकारले.त्या कातळाला जोगिनींचा माळ म्हणतात तर.
" चला, आपण त्या कातळावर जाऊन शोधू या." मी म्हणालो. सगळीकडे स्मशान शांतता पसरली. कदाचित माझ्याबरोबर यायला कुणीच तयार नव्हते.
" ठिक आहे.मी त्या जोगीणींच्या माळावर जातो. तो पर्यंत तुम्ही इतरत्र शोध घ्या.कदाचित उद्या सकाळपर्यंत त्यांच्या बाबत आपल्याला निश्चित असं कळेल." मी म्हणालो.
" मी पण येतो." अशोक माझा मित्र म्हणाला.
" गरज लागली तर मी बॅटरी ने इशारा देईन.मला अश्या घटनांची सवय आहे." मी म्हणालो.
झटपट जेवून मी व अशोक बाहेर पडलो.दोन बॅटर्या, मोबाईल,काठी ,लायटर व पाण्याची बाटली घेऊन आम्ही कातळावर जायला बाहेर पडलो.
योगीनींचे बेट भाग २
रात्रीचा थरार
मी व अशोक कातळावर पोहचलो. वाटेत आम्ही बाळा खोताचा शोध घेत होतो.हाकारे देत होतो.पण त्याचा मागोवा लागत नव्हता.कातळावर उभं राहून मी सभोवताली नजर फिरवली.अजून चंद्र उगवला नव्हता.सर्वत्र अंधार होता.आकाशात असंख्य चांदण्यां चमचम करत होत्या.वारा थोडा मंदावला होता.पाण्याचा मचमच असा आवाज.पाणपक्ष्यांच्या पंखांची मध्ये मध्ये ऐकू येणारी फडफड....वर झेप घेऊन पाण्यात पडणाऱ्या माश्यांची डुबकी असे आवाज येत होते.आम्ही दोघं कातळावर बसलो.आता डोळे अंधाराला सरसावले होते. रात्रीचे नऊ वाजले असावेत.इथ कातळावर खूपच छान वाटत होते.अशोकने तर कातळावर सरळ झोपूनच दिलं.मी अंगाखांद्यावरून जाणार्या गार वार्याचा स्पर्श अनुभवत डोळे मिटून घेतले.
" रत्नाकर, जरा दगडाला कान लाव.विचित्र आवाज येतोय." अशोक म्हणाला.
पालथ पडून मी कातळाला कान लावला.मी प्रचंड दचकलो.संपूर्ण कातळ थरथरल्याचा भास होत होता. खालून स्पष्टपणे घरघरीचा आवाज येत होता.या कातळाच्या खाली एखादी गुहा किंवा भुयार आहे का? एखादं यंत्र चालू अस असल्यासारखा आवाज का येत होता? मी विचारात पडलो.
" खाली एखादी गुहा किंवा पोकळी असावी त्यात एखादा रानटी प्राणी असावा." मी माझा अंदाज सांगितला.
" किंवा लटारूंची टोळी वैगरे इथं राहत असावी." अशोकने आपला अंदाज सांगितला.
" तसं असतं तर बेटावरच्या रहिवाशांना त्यांचा कधी ना कधी सुगावा लागला असता." मी मान हलवत म्हणालो.
" जो कोण असेल त्यानेच बाळाला ओढून नेलं नसेल?" अशोकने शंका विचारली.तो थोडा घाबरलेला दिसला.
खाली पोकळी असेल तर तिथे जाण्याचा एखादा मार्ग असणारच .चांदणं पडल्यावर आपण शोध घेवूया."
खाली बेटावरचे दिवे बंद झाले होते. बाळाचा शोध लागला की नाही? हे कळत नव्हतं.कदाचित गावकरी सकाळ पर्यंत वाट बघत थांबले असावेत.
अचानक तो सायंकाळचा वातावरण चिरत जाणारा आवाज घुमला.अगदी या आवाजाची अखेरची किण्...किण् सुध्दा स्पष्ट ऐकू आली.
अचानक सगळीकडे पांढर्या शुभ्र घुक्याची चादर संपूर्ण कातळावर पसरली.मार्च महिन्यात या वेळी असं घुंक ! कसं शक्य आहे? ते सुध्दा एवढ्या जलदगतीने कसं काय. मला काहीच कळेना.डोक गरगरायला लागलं.नंतर जाणवलं की या घुक्याला सुध्दा एक गोड सुगंध येत होता.या गंधामुळे डोळे जड होवू लागले होते. मनाची विचार करण्याची शक्ती कमी होत चालली होती.माझ लक्ष अशोक कडे गेलं.तो डोळे मिटून निपचीत पडला होता.मी डोकं झटकले. कोणत्याही परिस्थितीत या संमोहनाला बळी पडायचे नाही असं ठामपणे ठरवले.अखेरचा उपाय म्हणून ओठ दाबत खिशातली टाचणी अंगठ्यात खुपसली.(टाचणी, ब्रशचा उपयोग मिळालेल्या वस्तू साफ करण्यासाठी होतो...म्हणून माझ्या जवळ या गोष्टी नेहमी असतात.)रक्ताची एक चिळकांडी उडाली...वेदना व रक्ताच्या गरम स्पर्शाने मी भानावर आलो.समोरच्या खाडीवर सुध्दा घुंक पसरलं होतं.डोळे रुंदावत मी घुक्यापलीकडे पाहण्याचा प्रयत्न करत होतो.पण काहीच दिसत नव्हते.
हळूहळू धुक विरल्यागत झालं.चंद्रही उगवला होता.पाणी चांदण्यामुळे चमचमत होते.अशोक उजूनही जाणीवेपलिकडे झोपल्यागत होता....आणि अचानक ते विलक्षण दृश्य मला दिसले.मला समजेना मी स्वप्नात आहे की जागा? मी स्वतःला एक चिमटा काढला. वेदनेची एक कळ मेंदूपर्यंत पोहचली.ते दृश्य एवढे अनाकलनीय होते की कुणाचाही त्यावर विश्वास बसला नसता. पलीकडे खाडीच्या पाण्यात दोन आकृत्या जलक्रीडा करत होत्या.अती सुंदर अश्या त्या तरुणी पाण्यात सुर मारत होत्या. त्यांची शरीरे पारदर्शक स्फटिका सारखी होती. चांदाणेही त्यांच्या शरीरातून आरपार जात होते.त्यांच्या शरीरा भोवती एक अद्भुत प्रभा चमकत होती.सार शरीर प्रकाशाने झगमगत होत.उन्नत वक्षस्थळे...कमनीय बांधा...अरुंद कंबर आणि विस्तारलेले नितंब...कुणीही मोहात पडावा एवढ्या त्या सुंदर होत्या. कोण होत्या त्या? देवता...अप्सरा...परी की योगिनी ! त्या खचीतच मानवी स्त्रिया नव्हत्या.
आपली लांब सडक बोटे हवेत फिरवत त्या दोघी रंगांचे फवारे उडवत होती.जणू रंग उधळण्याची त्यांची स्पर्धा चालली होती.मी माझा राहिला नव्हतो.
मला सारखं वाटतं होतं की सरळ धावत जावं पाण्यात उडी मारावी व त्यांच्या पर्यंत पोचावे.मी अति निकाराने माझी ही इच्छा दाबली.कदाचित समोरच दृश्य हे एखाद भ्रमजाल असावं. असं वाटतं होतं की काळ थबकला होता.वारा अडवल्यासारखा चिडीचूप होता. मी आणि ती दोघं सोडून आसमंतात कोणीच जागा नसावा.मला दरदरून घाम फुटला होता.समोर जे काही घडत होतं ते एकतर दैवी किंवा अमानवीय होते. अचानक त्या दोन्ही स्त्रीया हवेत उंच उडाल्या व वेगाने कातळाच्या दिशेने येवू लागल्या.भितीने माझी बोबडीच वळली मी तिथेच कातळावर झोपून दिल.
काही क्षण अतिव शांततेत गेले व त्यानंतर थबकलेला वारा सुरू झाला.लाटांचा आवाज ऐकू येवू लागला.मी डोळे उघडून समोर पाहिले.धुक नाहिसा झाल होत.स्वच्छ चांदणं सभोवताली पसरलं होतं. त्या स्त्रीच्या कुठे वाहिन्या झाल्या ते समजत नव्हतं.
" रत्नाकर, मी झोपलो होतो का?" अशोकने उठत विचारले.
मी गप्पच राहिलो.त्याला नेमकं काय सांगायचे ते माझ्या लक्षात येईना.
' हो..हो.. " मी एवढंच बोललो.
बसलेल्या धक्क्यातून मी अजून सावरलो नव्हतो.
मी विचार करत होतो.त्या स्त्रीयांचा संबंध या कातळाशी तर नव्हता? कातळाखालच्या गुहेत त्या राहत तर नसाव्यात. गायब झालेल्या बाळा खोताशी त्यांचा संबंध तर नसावा? प्रश्न अनेक निर्माण झाले होते.पण त्यांची उत्तरे सापडत नव्हती.
" आपल्याला आता खाली गावात जावं लागेल."
मी म्हणालो.
" आत्ता? पण आपण तर इथं रात्र काढण्यासाठी आलो होतो." अशोक म्हणाला.
मी काही न बोलता बॅटरी ऑन केली.माझ ह्रदय धडधडत होतं.
" आपण उद्या सकाळी इथं पुन्हा येणार आहोत." मी मागे वळून बघायच टाळलं होत.बिचार्या अशोकला इथं काय घडलं त्याचा पत्ताही नव्हता.त्याला माहीत नाही हेच बरं झालं.मला राहून - राहून वाटत होतं की ह्या कातळाखाली काहीतरी आहे.त्याचा छडा लावण्यासाठी मी उद्या सकाळी व वेळ पडली तर उद्या रात्री इथं येणार होतो.पंचविस एक मिनीटात आम्ही बावकरांच्या घरी आलो.आम्हाला बघून तो आश्चर्य चकित झाला.
" बाळा खोताचा सुगावा लागला?" मी विचारले.
" नाही.उद्या दुपारपर्यंत आला नाही तर पोलीस केस करायचं ठरवलंय.त्याच्या आईची रडून रडून हालत खराब झालीय."
" आम्ही अंगणातच झोपतो.चांदण्यात व वार्यावर छान झोप लागेल." मी म्हणालो.
बावकर ने दिलेल्या चटईवर आम्ही अंग टाकले.मला खात्री होती की पोलीस बाळा खोतालाला शोधू शकणार नाहीत याची.उद्या त्या गुराख्याला व बाळा खोताच्या आईला भेटायचं असं मी ठरवलं.त्यांच्याकडून काही माहिती मिळते का ते पाहायचे होते. विचार करता करता कधी डोळा लागला ते कळालेच नाही.कधितरी पहाटेला मला स्वप्नात त्या स्फटिक स्रीया दिसल्या आणि मी दचकून जागा झालो.आलेला घाम पुसत मी झोपायचा प्रयत्न करू लागलो.
------*------*-------------*--------*----------*-------
भाग १समाप्त