प्रकरण ४
पाणिनीने बाहेर जाऊन एक सुटकेस खरेदी केली. नंतर बाहेर फुटपाथ वर एक पुस्तक विक्रेता बसला होता,त्याचे कडून काही पुस्तकं खरीदली.त्या पुस्तकवाल्यालाच विनंती केली की या सुटकेस मधे टाक सगळी पुस्तकं.त्यानंतर तो डेल्मन हॉटेलात आला आणि रिसेप्शनिस्ट ला म्हणाला,
“मला आज रात्रीपुरता मुक्काम करायचाय, मला जरा वरच्या मजल्यावरची रूम द्या.ट्राफिक चा आवाज होणार नाही अशी पाचव्या मजल्याच्या वरची द्या.”
“ तुम्हाला आज रात्री पुरते राहायचं असेल तर ११८४ नंबरची रूम देतो.नाव काय म्हणालात?”
“ पटवर्धन. ११ वा मजला उंच होईल.आठव्यावर नाही का?” पाणिनीने विचारलं.
“ त्यावरच्या सगळ्या गेल्या आहेत.”
“ सातवा? ”
“ एकच आहे, पण ती मोठी आहे आणि महाग आहे.” रिसेप्शनिस्ट म्हणाला.
“ चालेल मला, जरा जास्त भाडं असलं तरी.” पाणिनी म्हणाला
वेटर त्याचं सामान घेऊन सातव्या मजल्यावर आला.खोलीचा ताबा दिला.टीव्ही,रिमोट,ए.सी. सगळं दाखवलं आणि गेला. तो गेल्यावर पाणिनी बाहेर आला आणि ७६७ नंबरच्या रूम चे दार वाजवलं.प्रचिती ने आतून कोण आहे म्हणून विचारलं.पाणिनीच असल्याची खात्री करून तिने दरवाजा उघडला.
“ जमलं सगळं?” तिने कौतुकाने विचारलं. “ खूप करताय माझ्यासाठी तुम्ही.तुम्हाला मी दिलेले पैसे नक्कीच कमी पडले असतील.”
“ दुर्दैवाने तसच झालंय कारण तू मला तुझी माहिती अर्धवट दिल्याने तुझा तपशील मिळवण्यात माझा बराच खर्च झाला......” पाणिनी म्हणाला तेवढ्यात दारावर टकटक झाली आणि दोघेही सावध झाले.
पाणिनीने प्रचिती ला गप्प बसायची खूण केली आणि सावधपणे दार उघडलं.दारात एक आकर्षक स्त्री उभी होती.तिच्या उभं रहायच्या पद्धतीवरून आणि चेहेऱ्यावरच्या भावावरूनच तिच्यातील आत्मविश्वास जाणवत होता.
“ मला कनक ओजस ने पाठवलंय.मी समिधा द्रविड.आणि मी ओळखते तुम्हाला पटवर्धन.” ती पाणिनीला शेक हँड करत म्हणाली.
“ ये आत, बस. हे पहा, ही प्रचिती पारसनीस, या हॉटेलात प्रचिती खासनीस नावाने बुकिंग आहे तिचे.” पाणिनीने ओळख करून दिली. “ आता तुझा रोल सुरु कर.”
समिधा ने प्रचिती शी शेक हँड केला.
“ पटवर्धन सर, मी कोण असणार आहे? प्रचिती पारसनीस की प्रचिती खासनीस ? ”
“ या हॉटेलचा जोवर संबंध आहे तोवर तू प्रचिती खासनीस असणार आहेस. तुला मी पेपरात आलेली एक जाहिरात वाचायला देतो.” असं म्हणून पाणिनीने तिला प्रचिती ने पेपरात दिलेली जाहिरात दाखवली. त्यावर १२३-३२१ अशी सही होती. तिने ती काळजीपूर्वक वाचली.
“ ठीक आहे मी नेमकं काय करायचंय?” समिधा म्हणाली.
“ तू इथे प्रचिती खासनीस म्हणून राहायचं.आणि जे जे घडेल त्याची माहिती द्यायची.”
“ काय घडणे अपेक्षित आहे? मला असं सांगण्यात आलंय की मी इथे कुणाला तरी रोख रक्कम द्यायला आल्ये. समजा असं कोणी आलं आणि त्याने रकमेची मागणी केली तर?”
“ तर तू टाळाटाळ कर.” पाणिनी म्हणाला
“ माझं कार्ड तुमच्याकडे ठेवा पटवर्धन सर. फक्त माझा नंबर बदललाय तो लिहून देते.” ती म्हणाली आणि कार्डावर पेन्सिल ने कागदावर काहीतरी खरडून पाणिनीला कार्ड दिले. पाणिनीने ते वाचलं, त्यावर तिने लिहिले होते, ‘ या प्रचिती ला मी पाहिलंय.त्या दिवशी रात्री कनक बरोबर टॅक्सीत मीच होते.’
“ ठीक आहे, या बदललेल्या नंबरवर मी फोन करीन गरज पडेल तेव्हा.” पाणिनी म्हणाला “ दरम्यान तू खाली रिसेप्शानिस्ट ला सांग की मी प्रचिती खासनीस बोलत्ये आणि मला जर कोणाचा फोन आला आणि त्या व्यक्तीने नाव न सांगता १२३-३२१ असा नंबर सांगितला तर मला जोडून द्या. जमेल?”
“ मी प्रयत्न करीन नक्की. काळजी नका करू.” समिधा म्हणाली.
“ तुझं सामान कुठे आहे?”
“ मी फक्त ही पर्स आणल्ये. मला कनक ने सांगितलं की हॉटेलवाल्यांच्या नजरेत भरेल असं काही घेऊ नको.”
“ खाली मॉल आहे,तुला काही लागणार असेल तर तू इथे मागवून घेऊ शकतेस.”
“ मला इथे किती काळ रहायला लागेल पटवर्धन?”
“ कदाचित एक दिवस, कदाचित तीन-चार सुद्धा. तू निवांत रहा इथे घरच्यासारखी.जेजे घडेल ते कळवत रहा.प्रचिती,मी तुझी बॅग घेऊन माझ्या रूम नंबर ७८९ ला जातोय.नंतर थोड्या वेळाने मी तुझी बॅग घेऊन हॉटेल सोडेन.माझ्या रूम चे पैसे देऊन टाकीन नंतर देवनार ला तुझी बॅग द्यायची व्यवस्था करेन.आता माझ्या रूम नंबर ७८९ ची किल्ली घे, आणि तिथे जाऊन थांब. तुझी काळी बॅग आणि पर्स तुझ्या बरोबर ठेव.थोड्या वेळातच मी तुला ७८९ ला भेटतो.बँकेत रक्कम भरून ड्राफ्ट काढला जाई पर्यंत ती रूम सोडू नको.अत्ता आपण ज्या रूम मधे आहोत त्या ७६७ ला पुन्हा येऊ नकोस कुठल्याही परिस्थितीत.आणि सर्व अलबेल असल्याचा संकेत मी देत नाही तो पर्यंत ७८९ नंबरची रूम सोडू नकोस.”
“ पण कधी नेमके? आणि तुम्ही सगळ अलबेल असल्याचा संकेत देण्यापूर्वीच बँक बंद झाली तर?” प्रचिती ने शंका व्यक्त केली.
तसं झालं तर देवनार ला जाई पर्यंत तुला पैसे तुझ्याच जवळ सांभाळून ठेवावे लागतील.तिथल्या बँकेत जाऊन पैसे भरून ड्राफ्ट खरेदी कर पण ड्राफ्ट मिळे पर्यंत ऑफिसात जाऊ नको.उद्या ऑफिस उघडेल तेव्हा मी असेनच मदतीला.७८९ नंबरची रूम सोडायच्या आधी आपण तपशील ठरवून घेऊ.आता निघावं लागेल तुला इथून.” पाणिनी म्हणाला
“ मला बाथरूम मधून माझ्या काही वस्तू घ्यायच्यात.” प्रचिती म्हणाली आणि उठली.
“ पटवर्धन सर,मला अजून जरा सविस्तर सांगा.” समिधा म्हणाली. “ समजा मला कोड नंबर चा संदर्भ देऊन कोणी फोन करून रोख रक्कम घेऊन भेटायला बोलावलं तर?”
“ काहीतरी सबब सांगून वेळ घालव आणि कनक ला कळव.”
“ पण त्यासाठी वेळ नसेल तर?”
“ तो काढावा लागेल तुला.” पाणिनी म्हणाला
“ हे सगळ कशाबद्दल आहे मला कळेल का?”
“ पार्श्वभूमी न समजलेली बरी तुला,पण एवढंच सांगतो की तू श्रीमंत आहेस,पण तेवढीच खमकी आहेस.पैसे आहेत तुझ्याकडे पण ज्यासाठी ते आहेत,ती गोष्ट मिळाल्याशिवाय ते तू हातून जाऊ देणार नाहीस अशी तू स्त्री आहेस. रिव्हॉल्व्हर आहे तुझ्याकडे?” पाणिनीने विचारलं.
तिने उत्तरं देण्या ऐवजी रिव्हॉल्व्हर काढून दाखवलं.
“ छान. याची गरज लागेल असं नाही वाटत पण असलेलं बर.”
तेवढ्यात प्रचिती बाहेर आली.पाणिनीने तिची सुटकेस उचलली. “आपण ही रूम नं ७८९ ला नेतोय.तू काळी बॅग घे. माझ्या सूचना लक्षात ठेव.”
“ तुम्ही मला देवनार ला भेटाल?” प्रचिती ने विचारलं.
“ हो.तुझा नंबर आणि पत्ता मला देऊन ठेव.मी संपर्कात राहीनच तुझ्या.७८९ मधून मी सांगितल्याशिवाय बाहेर जायचं नाही.” पाणिनीच्या डायरीत तिने फोन आणि पत्ता लिहून दिला.समिधा ला धन्यवाद दिले. “ मी घेते दोन्ही बॅग. काळी आणि पैशांची दोन्ही.माझ्याकडे ७८९ ची किल्ली आहे.” प्रचिती पाणिनीला म्हणाली आणि ७८९ ला जायला निघाली.
ती गेल्यावर पाणिनी खुर्चीत बसला. “ ब्लॅक मेलर ची अपेक्षा असणार की पैसे देणारा पुरुष असेल.”
तेवढ्यात दार वाजलं.
“ बापरे! प्रचिती ७८९ मधे पोचली असावी म्हणजे मिळवलं.” पाणिनी म्हणाला आणि दार उघडायला उठला.
“ कोण आहे? ” पाणिनीने विचारलं.आणि दरवाजा उघडला. दारात एक बुटका माणूस उभा होता. “ येस, काय हवंय?” पाणिनीने विचारलं.
“ पेपरातल्या एका जाहिरातीच्या संदर्भात मी.....” तो म्हणाला आणि त्याच लक्ष समिधा कडे गेलं.
“ ठीक,ठीक, या आत.” पाणिनी म्हणाला
“ मी विवस्वान.तुम्ही स्वत: याल इथे असं मी अपेक्षित केलं नव्हतं मिस्टर....?” याने आपला हात पाणिनीला शेक हँड साठी पुढे करत म्हंटलं.
“ नावं घेऊ नका कुणाचीच.” पाणिनी म्हणाला
“ ओके,ओके.” विवस्वान म्हणाला.त्याची नजर समिधा कडे गेली. “आपण ओळखी वगैरे नको करून द्यायला.” पाणिनी म्हणाला
“ संबंध नसलेली व्यक्तीच इथे नको.” विवस्वान म्हणाला.
“ ठीक आहे मी जाते बाहेर.”
“ समिधा सॉरी, आपल्याला फार बोलायला नाही मिळालं, पण हे आल्यामुळे मला जरा महत्वाचं बोलायचं आहे, त्या नंतर मला जरा बाहेर जाऊन यायचंय.मी मोकळा झालो की फोन करीन, पण वाट बघू नकोस फोन ची तुझ्या मनानुसार काय करायचं ते कर.”
समिधा ने पाणिनीच्या बोलण्यातली खूण ओळखली. “ ठीक आहे आलं माझ्या लक्षात.” पाणिनीच्या गळ्यात पडत ती म्हणाली आणि बाहेर पडली.
“ छान आहे पोरगी.” विवस्वान म्हणाला.
“ मला आवडते ती.” पाणिनी म्हणाला
“ जुनी ओळख दिसत्ये.”
“ फार जुनी नाही.” पाणिनी म्हणाला
“ मूळ मुद्यावर येऊ या. आणली आहेस?”
“ काय?”
अचानक तो उठला, आतल्या खोलीत गेला, बाथरूम उघडलं.खोलीत मायक्रोफोन, कॅमेरा काही नाही ना हे नीट तपासलं.
“ तू काही केलं असशील असं वाटत नाही पण खबरदारी घेतलेली बरी.तू काहीच बोलत नाहीयेस.मलाच बोलायला भाग पाडतो आहेस.मला तुझा संशय यायला लागलाय. ” तो म्हणाला.
“ त्यात संशय काय यायचाय? आणि तुला इतका वेळ का लागला यायला?” पाणिनीने विचारलं.
“ मला इतर कामं होती. ते जाऊदे, एका पेपरात जाहिरात आली होती,तुला त्याबद्दल काय माहिती आहे?” विवस्वान म्हणाला.
“ मला एवढं माहित्ये की मला हव्या असलेल्या गोष्टीची खात्री करून घेण्यासाठी नेमलेल्या टॅक्सीतल्या प्रवाशांना संधी देण्यात माझा बराच वेळ वाया गेला. ”
“ बाहेरून काहीच संकेत मिळाला नाही?”
“ नाही.”
“ हे काय चाललंय ते मला आवडलेलं नाही. दुसरेच कोणीतरी या डील मधे घुसतंय. अरे, तुमचा चेहेरा पहिल्या सारखा वाटतोय. आपण भेटलोय का या आधी?” विवस्वान म्हणाला.
“ नाही.”
“ अरे तुमचे फोटो पाहिलेत मी पेपरात ! ”
“ ते शक्यच नाही.” पाणिनी म्हणाला
“ नक्की.. अरे तुम्ही पाणिनी पटवर्धन तर नाही ?” विवस्वान म्हणाला.
“ हो.”
“ मला माझ्या डील मधे वकील यायला नको होता. तुझ्या लक्षात आलं का की तू काही गडबड केली असतीस तर तुझ्या अशिलाला धोका होता.”
पाणिनी काही बोलला नाही.
“ आम्ही तुझ्या अशिलाला जोखण्यात कमी पडलो.तुझ्या सारख्या महागड्या वकीलाला नेमायची जिची क्षमता आहे तिच्या कडून आम्ही जास्त अपेक्षा करायला हवी होती. आणि ही देणगी नाही, ती आम्हाला देणे लागते ते.”
“ तू पैशाबद्दल बोलत असशील तर सॉरी.माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि असते तरी तू जो काही प्रस्ताव दिला आहेस त्या साठी दिले नसते.”
“ तुझ्या या कृतीमुळे तुझा क्लायंट संधी गमावतोय.आधी ठरलेल्या किंमतीला आता हे डील होणार नाही.”
“ अशी दमदाटी केलीस तर आधी ठरलेली किंमत सुद्धा खाली येईल.” पाणिनी म्हणाला
“ तुला काय वाटतंय आयत्या वेळी तू पोतडीतून ससा काढून मला चकित करशील?”
“ त्यासाठीच मी ओळखला जातो.हवं तेव्हा ससा काढतो आणि अजिबात अपेक्षा नसताना हातात एक्का दाखवतो.” पाणिनी म्हणाला
“ तुझ्या अशिलाने पाच लाख द्यायलाच लागतील.”
“ त्याच्या बदल्यात माझ्या अशिलाला काय मिळेल?”
“ सुरक्षितता. ” विवस्वान म्हणाला.
“ पुराव्याचे काय?” पाणिनीने विचारलं.
“ कसला पुरावा? ”
“ माझ्या अशिलाला सुरक्षितता मिळेल याचा पुरावा.” पाणिनी म्हणाला
“ करार करुया आपल्यात.” विवस्वान म्हणाला.
“ विचार करून ठेवतो. कुठे भेटू तुला?”
“ फार प्रश्न विचारतोस तू.”
“ ठीक आहे, पैसे द्यायचे असं मी ठरवलं तर कुठे द्यायचे? ” पाणिनीने विचारलं.
“ तुझ्या ऑफिस चा फोन मी मिळवू शकतो. तुला फोन करेन मी.”
“ कधी?” पाणिनीने विचारलं.
“ माझी तयारी झाली की.”
विवस्वान म्हणाला आणि जोरात दार आपटून बाहेर पडला.तो गेल्यावर तीन मिनिटांनी पाणिनीने कनक ओजस ला फोन केला.
“ समिधा ने तुला फोन करून एका माणसाचा पाठलाग करायला तुझा माणूस पाठव म्हणून सांगितलं का?”
“ अजून तरी नाही. तुला भेटल्ये ना ती डेल्मन हॉटेल मधे?”
“ भेटल्ये, मी तिच्याशी बोलत असतांनाच एक माणूस आला,म्हणून मी तिला बाहेर जायला सांगितलं.पण त्याचा पाठलाग कर म्हणून तिला संकेत दिलाय मी.”
“ तू तिला हिंट दिली असशील तर ती ओळखेल .हुशार आहे ती.पण ती माझा माणूस कशाला मागवून घेईल? स्वत:च करेल की पाठलाग.”—कनक
“ ज्याचा पाठलाग करायचाय त्याने तिला पाहिलंय ना हॉटेलातच. त्यामुळे दुसरा अनोळखी माणूस असलेला बरा पाठलाग करायला.”
“ बरोबर.वाट बघू जरा. खूप अर्जंट होतं का पाठलाग करणं?”
“ खूपच.”
“ पाहतो मी.”-कनक म्हणाला आणि फोन बंद केला.
पाणिनीने रूम नंबर ७८९ ला फोन लावला.प्रचिती ने फोन घ्यायला जरा वेळ लावला.पाणिनी अस्वस्थ झाला.
“ मी पटवर्धन. काय गं? एवढा वेळ का लावलास?”
“ फोन घ्यावा की नाही या विचारात होते.तुमचं कसं चाललंय? तुम्ही येणार होता ना?”
“ तेवढ्यात ब्लॅक मेलर आला, मी त्याला घुमवायचा प्रयत्न केला पण त्याने मला ओळखलं की मी पाणिनी पटवर्धन आहे. माझ्या पेपरात येणाऱ्या फोटो वरून ”
“ हे आपल्या दृष्टीने वाईट आहे?”-प्रचिती
“ नाही नाही. उलट बरंच झालं.तो घाबरलाय त्यामुळे.”
“ मी आता काय करू? बँकेत कधी जाऊ? देवनार ला जायचं तिकीट कधी काढू?”
“ अजून तासभर तरी खोलीतच लपून रहा.मी सांगितल्या शिवाय बाहेर नको पडू.” पाणिनी म्हणाला आणि फोन ठेवला.
( प्रकरण ४ समाप्त.)